माझा डबा

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
11 Oct 2020 - 2:26 pm

माझा डबा
आपलं बायकांचं कसं असतं ना..अपल्या घरातल्या चमच्यांपासून डबे, वाट्या, ताटं, ताटल्या सगळ्यांत जीव  गुंतलेला असतो. त्यातून सगळं स्वतः घेतलेलं असलं तर जास्तच आणि माहेरहून मिळालेलं असेल तर मग विचारायलाच नको.
आणि ह्यातलं काही कोणाला दिलं गेलं तर परत मिळेपर्यंत जीव कित्ती कासावीस झालेला असतो नाही? झालं असं..
आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. थोडक्यातच करायची, म्हणून जवळचेच मित्र मैत्रिणी बोलावले होते.  सगळं व्यवस्थित पार पडलं. मैत्रिणीच्या मुलाला शिरा खूपच आवडतो म्हणून तीने  माझ्या अत्यंत लाडक्या अशा थोड्याशा वेगळ्या आकाराच्या डब्यात भरून नेला. डब्याच्या विशिष्ट अशा तबल्यासारख्या आकारामुळे तो माझा अतिशयच प्रिय, इतका की नाव टाकताना त्यावर खुणा येतील म्हणून नावही नव्हतं टाकलेलं मी.
मनात कासावीशी.."हिला (म्हणजे मैत्रिणीला अरूणाला) दुसरा डबा नाही का दिसला ट्राॅलीत..नेमका 'तोच'  नेला"..त्यातून माझी हि मैत्रिण जाम विसराळू म्हणजे एकदा का एखादी गोष्ट हिच्याकडे गेली कि ती परत मिळवायला फार प्रयास पडतात. नेमकी मी गडबडीत म्हणून हिने स्वतःच ट्राॅलीतून 'तोच' डबा उचलला. मला काही म्हणताच आलं नाही.
असेच एक दोन महिने गेले. काही ना काही कारणाने त्या डब्याची आठवण हमखास यायची पण त्याच्या विरहात एखादा अश्रु यायचा पण काय करणार हलकासा सुस्कारा सोडून मी पुढे जायची.
मधे मधे फोन झाला कि इतर बोलताना मी मुद्दाम चिवटपणे गाडी त्या दिवशीचा सत्यनारायण, शिरा इ गोष्टींकडे न्यायची..भेटु एकदा लवकरच म्हणायची..
पण ती काही डब्याचं नाव काढायची नाही नी भेटीचाही योग येत नव्हता लवकर. तसं डोंबिवली- मुलूंड काही  खूप अंतर नाही पण येणंजाणं सतत होत नसे आणि फोन, चॅटींग या माध्यमांतूनच गप्पा होत. एखादं नाटक चांगलं आलं तर ठाण्यात गडकरीला जायचो किंवा इथे कालीदासला. पण अशात तेही घडलं नव्हतं.
हळुहळू मलाही विसर पडला नाही तरी विरहाची तीव्रता कमी झाली.
आणि अचानक ती संधी चालून आली. मी चार दिवस आईकडे म्हणून नाशिकला राहुन आले. त्याच दिवशी त्या मैत्रिणीचा फोन, "उद्या राहुलच्या सी ए झाल्याची पार्टी कम गेटटुगेदर ठरवलय सगळ्या येणारेत. तु तर हवीसच. नशीब तु नाशिकहून आलीस लवकर नाहीतर मी पार्टी पुढे ढकलणार होते.."  वा ! मस्तच !! सगळ्या मैत्रिणी भेटणार गप्पा होणार यापेक्षा जास्त आनंद मला माझा डबा परत मिळवता येईल याचा होता.
या आनंदाच्या भरात "मी नाशिकला गेलेय आज येणारे"  हे तीला कसं समजलं हे प्रश्न मला पडलेच नाहीत. कारण गेल्या दहा-पंधरा दिवसात बोलणं नव्हतं झालेलं आमचं आणि मी अचानकच जाऊन आले होते नाशिकला. त्यामुळे तीला कसं समजलं हे अनुत्तरीतच राहिलं मी हि जास्त ताण दिला नाही डोक्याला. आज संध्याकाळी आले. नवरा, मुलगा दोघांनी चार दिवस काही करून खाल्लं कि बाहेरून मागवलं ते बोलायला दोघेही घरी नव्हते. उशीरा आले. मी केलेली मुगाची खिचडी जेवले. आपापल्या कामाला लागले.  मी हि दमलेली त्यात उद्याची तयारी साडी कोणती नेसावी इ. या विचारांतच झोपले लवकरच. सकाळी उठून नेहमीप्रमाणेच आवरलं. दोघे ऑफीसला गेले. मी निवांत गॅलरीतल्या बागेची देखभाल केली भुक लागल्यावर जेवले. एक दोन मैत्रिणींशी फोन झाले.  मग आवरून चारला निघालेच. स्टेशनवर दोघी भेटल्या एकत्रच गेलो.
डोंबिवलीला तीच्या घरी सगळी तयारी छानच केली होती तीने. सगळ्या जमल्यावर हास्यविनोदामुळे मैफील मस्तच जमली.  आधी सरबत झालं.  मग बटाटेवडे तीची बाई गरमगरम तळून देत होती . मी ही मधे मधे किचन मधे डोकावले हेतु हा की माझा लाडका कुठेय कसा आहे ते बघायला मिळावं.
जेवायला पण मस्त बेत होता मसालेभात,श्रीखंड पुरी  कुर्माभाजी शिवाय वरती सोलकढी. सगळ्या मस्त खुष होऊन जेवलो. गप्पा गाणी अगदी छानच झाला कार्यक्रम. तरी माझं लक्ष त्या डब्यातच होतं
आम्ही सगळ्या एकाच ऑफीसातून रिटायर झालेल्या बायका  या ना त्या कारणाने एकत्र जमून गप्पा गाणी अशी मैफील जमवतो सगळ्या तशा मोकळ्या झाल्यात. मुलं मोठी झालीत.काहींना सुना जावईही आलेत.
नऊ वाजले तशा सगळ्या हळुहळू निघायला लागल्या. मी मैत्रिणीला म्हटलं, "मसालेभात मस्त झालाय माझ्या समीरला आवडतो खुप. नेते थोडा". ती म्हणाली,"हो ने की गं. त्यात काय. खूप आहे".
 ती आणि मी किचनमधे गेलो. मी "त्याला" शोधत होते तेवढ्यात ट्राॅलीत "तो" दिसलाच. माझा हात आपसूकच पुढे झाला त्याचा स्पर्श मला वेगळाच भासला पण म्हटलं खूप दिवसांनी भेटला म्हणून असेल. तशी ती म्हणाली "अगं तो नको तो लहान आहे. हा मोठा घे दोघांना भरपूर ने मसालेभात" ..मी नेटाने, "अगं असू दे एकट्या समिरला पुरेल यात नेला तर..हे नाहीत सध्या इथे",  ती जास्त नेण्यासाठी मोठ्या डब्याचा आग्रह करत असताना मी अगदि हाच डबा हवाय म्हणत हट्ट करत शेवटी यशस्वी झाले.
अन् माझ्या लाडक्याला उराशी धरून घरी आणताना जणू काय जग जिंकलय अशा थाटात आले.
त्या रात्री मला अगदि  निवांत शांत  झोप लागली.
सकाळी फ्रेश मुडमधे गाणं गुणगुणतच किचनमधे आले. चहाचं आधण ठेऊन. फ्रिजमधे आलं बघत होते. तर खालच्या कप्प्यात माझा प्रिय डबा वाकुल्या दाखवत हसत होता. पटकन उचलला उघडला तर त्यात दोन नारळ वड्या दिसल्या.
"हे काय ? हा डबा कुठून आला, नारळ वड्या कोणी दिल्या आणून?"  मी प्रश्न विचारतच डायनींग टेबलपाशी आले तशी चिरंजीव समीर बोलले," अगं आई हो सांगायचच राहिलं तु आजीकडे गेलीस त्याच दिवशी अरूणामावशी येऊन हा डबा देऊन गेली होती. मस्त होत्या वड्या. मी, बाबांनी फस्त केल्या. दोनच तुझ्यासाठी राखून ठेवल्यात".
काल याचा हमशकल आणताना केलेला हट्ट आठवून स्वतःचच खूप हसू आलं. तरीच स्पर्श वेगळा भासला होता. अच्छा म्हणून  मी नाशिकला गेलेय कधी येणारे हे तीला माहित होतं तर.
 मला खुदूखुदू हसताना बघून समीरने ह्यांनी विचारलं, "काय झालय, अशी का हसते आहेस ?"
मी काय बोलावे ते न सुचून नुसतीच डब्यावरून मायेने हात फिरवीत राहिले. किती दिवसांनी भेटला होता माझा लाडका.
© सौ वृंदा मोघे
27/4/19

कथालेख

प्रतिक्रिया

बाप्पू's picture

11 Oct 2020 - 3:48 pm | बाप्पू

छान..

VRINDA MOGHE's picture

11 Oct 2020 - 4:14 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद

काही गोष्टी खरंच दिसायला खूप सिम्पल असतात पण त्यासोबत खूप आठवणी जोडलेल्या असल्याने त्या खूप प्रिय असतात.
लहानपणापासून ते अगदी 7-8 वी पर्यंत मी एकाच ताटात जेवायचो.. त्यामध्ये एका हत्तीचे चित्र होते.. त्यामुळे लहानपणापासून हत्तीचे ताट असल्याशिवाय जेवणच जायचं नाही. पण नंतर कधीतरी सामान शिफ्ट करताना ते ताट हरवून गेले.. पण आजही आठवलं कि खूप छान वाटत.

चौथा कोनाडा's picture

11 Oct 2020 - 4:13 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त लिहिलंय ! लेखनशैली आवडली.
आणखी लेखन वाचायला आवडेल !

अश्या वस्तूंमध्ये जीव गुंततो, आपला तरी गुंततोच. पण आजची तरुण पिढी याबाबती बेफिकिर आहे, कदाचित वस्तूमुबलकतेच्या काळात जन्म घेतला असावा म्हणुन.
धामस्करांची यावर एक सुंदर कविता आहे, सापडली की डकवेन इथं !

VRINDA MOGHE's picture

11 Oct 2020 - 4:15 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद

विजुभाऊ's picture

11 Oct 2020 - 7:05 pm | विजुभाऊ

छान आहे आठवण

सतिश गावडे's picture

11 Oct 2020 - 11:16 pm | सतिश गावडे

"माझा डबा दे" ही तीन शब्द सांगण्यासाठी किती अवघडल्यासारख्या झाला होतात ताई तुम्ही :)
अर्थात हे बहुतेकांचेच होते. गोष्ट छोटीशी असते, मात्र आपला जीव अडकलेला असतो त्यात. आणि मनातील भीडेमुळे आपल्याला स्पष्ट शब्दात तसे सांगता येत नाही.

छान व्यक्त केली आहे मनाची घालमेल,.

हि सत्यघटना नाही. काल्पनिक कथा आहे.

सतिश गावडे's picture

12 Oct 2020 - 10:16 pm | सतिश गावडे

तुमचं नाही, वाचकांचं. :)

अश्या वस्तूंमध्ये जीव गुंततो, आपला तरी गुंततोच. पण आजची तरुण पिढी याबाबती बेफिकिर आहे, कदाचित वस्तूमुबलकतेच्या काळात जन्म घेतला असावा म्हणुन.>>>>

असमत अजुनही सगळ्यांनाच तेच ताट, तीच वाटी आणि तोच ग्लास हवे असते. कारण सवय झालेली असते. आमच्याकडे अजुनही असेच आहे.

तुमची घालमेल समजली.

छान आहे हलके फुलके लेखन.

VRINDA MOGHE's picture

12 Oct 2020 - 8:30 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद

VRINDA MOGHE's picture

12 Oct 2020 - 8:30 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद

सिरुसेरि's picture

12 Oct 2020 - 10:09 am | सिरुसेरि

छान आठवण . +१ . वरील सर्व समर्पक प्रतिसादांशी सहमत .

विनिता००२'s picture

12 Oct 2020 - 12:04 pm | विनिता००२

माझे पण असेच होते. काय करणार.....स्वभाव ना! :)

दुर्गविहारी's picture

12 Oct 2020 - 7:08 pm | दुर्गविहारी

छान लिहिले आहे. पण काही वेळा थोडं स्पष्ट बोललं तर पुढची गुंतागुंत होत नाही. बोलताना अवघडल्यासारखे होत असेल तर व्हॉट्स ऍप वगैरेतुन एखादा मेसेज टाकता आला असता. असो.

गामा पैलवान's picture

12 Oct 2020 - 7:57 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

दरवेळेस असं शक्य नसतं. उदा. : टमरेल बदललं की सुरुवातीस अशीच घालमेल व्हायची. जुना डब्बा सापडला की कोण आनंद व्हायचा. झाले मोकळे आकाश की स्वर्ग दोन बोटे उरला म्हणायचा. नायतर मग आहेच आपलं प्राप्त परिस्थितीस जुळवून घेणं.

आता टमरेलाबाबत कुणाशी स्पष्टपणे बोलणार आणि कसला कायप्पा संदेश टाकणार!

आ.न.,
-गा.पै.

नीलस्वप्निल's picture

12 Oct 2020 - 9:02 pm | नीलस्वप्निल

_/\_ :)

वीणा३'s picture

13 Oct 2020 - 11:04 am | वीणा३

माझ्या आईकडे क्लास लावा. कॉलेज ला असताना माझ्या १-२ मैत्रिणींना काहीतरी डब्यात घालून दिलं होतं. आई ने ४-५ वेळा मला आठवण करून दिली, पण डब्यासाठी कुठे मागे लागायचं म्हणून मी बोलत नव्हते. त्या मैत्रिणी एकदा घरी आल्या, दोघींच्या पाठीत एक हळूच धपाटा घालून आई ने "माझा डबा आणून द्या नाहीतर घरी येऊन घेऊन जाईन " म्हणून सांगितलं. त्यांनी नशिबाने गमतीत घेतलं, आता त्याचं लग्न झाल्यावर त्या पण तेच करतात वर माझ्या आईची आठवण काढतात . आई च्या मैत्रिणी पण "बाई तुझा डबा देते नाहीतर कटकट सुरु करशील" म्हणून लवकर डबा देतात :D