ओढ

उमेश तुपे's picture
उमेश तुपे in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 am



ओढ

सूर्याची कोवळी किरणे गवतावरील दवबिंदूंना भेटण्यास अतुर झाली होती. पक्ष्यांच्या किलबिलाटानं आबांना जाग आली. त्यांनी खाटेखालची बादली घेतली अन् तांब्याभर पाणी बादलीत ओतून गोठ्यात शिरले. त्यासरशी गोठ्यातल्या गाई हंबरू लागल्या, वासरांनी एकदम कान टवकारले. आबांनी दूध काढून अमितला आवाज दिला. "आमत्या, ये. आमत्या, आरे.. बारक्या, वासराला सोड." अंथरुणावर लोळत पडलेला लहानगा अमित आबांच्या आवाजानं उठून वासरांना सोडू लागला. एवढ्यात एक वासरू त्याच्या हाताला हिसका देऊन आपल्या आईला जाऊन ढुसण्या मारू लागलं. ती गाय आपल्या पिल्लाला मायेनं चाटू लागली. हे आईचं वात्सल्य पाहून अमितची नजर आज बऱ्याच वेळ तिथच खिळली होती. हे मातृप्रेम त्याला विलक्षण वाटलं.

आबांना वासराचा धक्का लागल्यानं ते अमितवर जरा रागवलेच होते. यामूळं नाराज झालेला अमीत घराच्या शेजारी असलेल्या विहीरीवर जाऊन विहिरीतील शांत पाण्यात खडे मारत बसतो. त्या पडक्या विहिरीतील दगडातून बाहेर आलेली किरळ पाण्यात डोकाऊ पहात होती. तिच्या बुंध्याला लटकलेली सुगरणीची चार पाच खोपी वाऱ्याच्या झोताप्रमाणे डुलत होती. या सुंदर दृश्यानं अमितच लक्ष वेधून घेतलं. विणीचा हंगाम असल्यानं नरानं त्या झाडाला चार- पाच खोपे विणले होते. पिवळे धम्मक डोके आणि पोटावर पिक्कट पिवळया तपकरी रेषांची सुगरण अमितला वेगळी चिमणीच आहे असं वाटल, आणि तो कुतूहलानं तीला न्याहळत बसला. इतक्यात एका खोप्यातून हळूच इवलूसं गोंडस पिल्लू खोप्याबाहेर आलं. टकामका इकड-तिकड पाहू लागल. बहुदा ते आपल्या आईची वाट पाहत असावं. लगेचच एक सुगरण येऊन त्या खोप्याला खालून लटकली. तीनं गरगर मान फिरवून एक नजर आजूबाजूला टाकली आणि काही समजायच्या आत आपल्या पिल्लाला घास भरवून. ..भुरकन ..उडून गेली.. ..

प्रेम भावनेनं ओतप्रोत भरलेलं हे दृश्य पाहून अमीतचं हळवं बालमन हेलावलं. गाईच्या वात्सल्यात आणि चिमणीच्या मायेत तो आपल्या आईला पहात होता. चिऊ- आणि माऊचे घास भरविणारी आई आज त्याच्यापाशी नव्हती. तिच्या एका स्पर्शासाठी तो.. आसुसला.. होता. आईच्या आठवणीनं भावुक झालेल्या अमितच्या डोळयातून घळ घळ पाणी वाहू लागलं. बऱ्याच दिवसांनी आज तो मनसोक्त रडला होता.

बऱ्याच वेळानं शांत झालेला अमित घरी आला. शाळेची तयारी केली पण आज कशाचत त्याच मन नव्हतं. सवयी प्रमाणे बाल्यानं त्याला हाक.. दिली. "ये. . . आमत्या, .. .चल लवकर आज लई जबरी गंमत आहे माझ्याकडं." बाल्या आणि राहूल अमितचे खास मित्र होते. अगदी लंगोटी यार म्हणावेत असे. योगायोग म्हणजे तिघांचा जन्मही एकाच वाडयात दोन-तीन महीन्यांच्या फरकानं झालेला. तिघंही एकाच पाळण्यात मोठी झालेली आणि एकाच इयत्तेत तीसरीत शिकणारी. आणि याचं शेपूट म्हणजे बाल्याचा लहान भाऊ सतू.

आज चौघेही शाळेत निघाली होती... बाल्यानं आपल्या खाक्या हाफ चड्डीच्या खिशात हात घालून खिशातले चिंचूके खळखळ वाजविले, आणि राहुल्याला म्हणाला. "राहुल्या बघ कसला जबरा पिस्टल आहे आपल्याकडं, आज तुला पुंगुलच करणार." राहुल मोठ्या उत्सुकतेनं तो भला मोठा चिंचूका पाहत होता. अमित आपल्या आईच्या आठवणीत हरवला होता. आईचा हसरा चेहरा पाहून तो मनातच आईशी बोलत होता. आईला प्रश्न विचारात होता. वास्तविक जीवनापेक्षा स्वप्नंच आता त्याला आपली वाटू लागली होती. बाल्याच्या आवाजानं त्यानं एक आवंढा गिळला आणि स्वतः ला कसबस सावरलं. त्या उदास, निरागस चेहऱ्यावर आईच्या आठवणीचे भाव लपू शकले नाही. अमितला आईची आठवण आली आहे हे बाल्या आणि राहूल्याने बरोबर ओळखलं. याच दुःख त्यांनाही वाटायचं. अमितला हसविण्याचे सारे प्रयत्न त्यांनी केले पण यश आलं नाही. शेवटी तशाच शांततेत जड पावलांनी त्यांनी शाळेची वाट धरली.

अमित, बाल्या आणि राहूल हे एक वेगळंच रसायन होतं. एक क्षणही हे त्रिकुट वेगळं दिसायचं नाही. मार खाण्याची वेळ आलीच.. तर तिघांवर एकाच वेळी यायची. यांच वैशिष्ट्य असं की, यांना एकाच चुकीची दोनदा शिक्षा मिळायची. दोन्ही घरचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याने एकदा आमितचे चुलते आणि राहूलचे मामा म्हणजेच... आबां ......आणि एकदा बाल्याचे मोठे भाऊ म्हणजे... दादा, कुणाच्या ही तावडीत पडले तरी मारं तिघांना बसायचा. बाल्याच्या आईनं यांची झकास अशी नावं ठेवली होती. आम्ड (अमित), ओम्ड (बाल्या) आणि कोम्ड (राहूल) ही नावं माहीत नसलेली व्यक्ती गावात शोधून मिळायची नाही. शाळेत निघाल्यावर तोंडावरून मायेने हात फिरवून खाऊला गुपचूप रुपया देणारी, खुप सार गोड कौतुक करणारी... आईच ..आज अमितला हावी होती. त्याला आपल्या आईच्या कुशीत शिरुन बसायचं होतं...तिच्या आठवणीनं तो पुरता गलबलून गेला होता. न समाजणारे अनेक प्रश्न त्या बाल मनाला पडले होते. .. एक निरागस मन होतं ते.. . या जगाची खरी ओळख नसलेलं.

अमितच्या आईला भेटायला जावं असं बाल्या आणि राहूलला कित्येकदा वाटायचं, तसं आजही वाटलं पण.....चिंचेचा प्रसंग आणि .....दादा व आबांचा चेहरा नजरेसमोर आला की आवसान गळायचं. शांत स्वभावाच्या अमितवर आपल्या मित्रांमूळे बऱ्याचदा मार खाण्याची वेळ यायची. परवा शाळा बूडवून यांनी भर दुपारी चिंचेच्या झाडावर चढाई केली. बाल्या आणि राहूल्या वर चढले, अमित खाली चिंचा गोळा करायला थांबला. इतक्यात रस्त्यानं आबा येतानां दिसले. आणि यांची एकच भांबेरी उडाली. अमितनं चिंचा पिशवीत भरल्या आणि आपली चड्डी एका हाताने पकडून धूम ठोकली. बाल्या आणि राहूल्या मात्र आबांच्या तावडीत सापडले. आबांच्या फटक्यासरशी जो रडण्याचा आवाज येऊ लागला तसा अमित जोरात पळू लागला. घरी येऊन आपल्या आजीच्या मागे लपला. पण त्याला आता अजूनच भिती वाटू लागली. आबा येऊन आपल्याला आता कसे धू- धू धुणार आणि रात्री दादांना समजल्यावर परत मार खावा लागणार याच सगळं चित्रच त्याला दिसत होतं. आपण तिथेच थांबलो असतो तर बरे झाले असते असे त्याला आता वाटू लागले होते. बाल्या आणि राहूल्याचा रडण्याचा आवाज आता घराच्या जवळ येऊ लागला.... तसा अमित अजूनच घाबरला. ..इतक्यात एक चप्पल अमितच्या कानाखाली बसली अन् दूसरी पाटीत... अमितचा भोंगा सुरू झाला तसा या दोघांचा आवाज बंद झाला. अमीत वाचलाय याचच त्यांना जास्त दु:ख झालं होत. दादाला ही बातमी कळल्यावर परत मार बसणार या भीतीने तिघेही घाबरली. यावर उपाय म्हणून पुस्तके घेऊन एकमेंकांची सुजलेली तोंडे न्याहाळत ही दादांची वाट पाहत बसली. त्यांचा उपाय कामी आला आणि दादांचा मार वाचला .

नेहमीप्रमाणे आज शाळा भरली होती. कडक शिस्तीच्या दराडेबाईनीं अभ्यासाकरिता वर्गातील मुलांच्या चार ओळी तयार केल्या होत्या. वर्गाच्या भिंतीच्या कडेला हूशार मुलांची ओळ राहत. त्यानंतर वाचता न येणाऱ्या मुलांची ओळ असायची, तीला सर्व जण गाढवांची ओळ असे म्हणून चिडवायचे. थोडेसे अंतर सोडून पून्हा वाचता न येणाऱ्या मुलींची ओळ (गाढवाची ओळ) आणि शेवटी हूशार मुलींची ओळ अशी काय ती बैठक व्यवस्था असायची. या त्रिकुटाचा क्रमांक गाढवाच्या ओळीत शेवटून असायचा.

आईची आठवण अमितला अस्वस्थ करत होती. शरीरान शाळेत असलेल्या अमितच मन मात्र अजूनही त्या विहिरीवरच होतं. हे कमी होतं म्हणून की काय, समोरच्या सातवी 'अ' च्या वर्गात बोडके सरांचा मराठीचा तास सुरु झाला. योगा-योगने सरांनी कवी यशवंत यांची 'आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी' ही कविता शिकविण्यास सुरवात केली. त्या कवितेतील खालील ओळी अमितच्या कानावर पडल्या आणि त्याच्या हूंदक्यांचा आवाज पूर्ण शाळेत घूमू लागला.

चारा मुखी पिलांच्या,
चिमणी हळूच देई,

गोठयात वासरांना,
या चाटतात गाई.

इवलूश्या अमितला कवितेचा अर्थ कळला नाही, पण भाव मात्र तो एकटाच आज अनुभवत होता. जणू कवी यशवंत यांनी ही कविता अमित साठीच लिहिली होती.... आईच्या तीव्र आठवणीनं तो रडू लागला. संपूर्ण शाळा कविता आणि अमित यांच्या आवाजानं दुमदुमून गेली होती. शाळेत तांदुळाची गाडी आल्यानं दराडे बाई वर्गाबाहेर गेल्या होत्या. अमितचा अवतार पाहून बाल्यानं मघाशी मनात आलेला विचार वास्तवात आणण्याची योजना राहूल्या आणि अमितला बोलून दाखविली. सर्व जण तयार झाले. आता फक्त सतूचा प्रश्न राहिला होता. सतूला सोडून जावे तर आपलं भिंग फुटण्याची दाट शक्यता होती. म्हणून त्याला ही सोबत घेण्याचं ठरल. संधीचा फायदा घेऊन राहूल्या आणि अमित खिडकीतून उडी मारुन बाहेर पडले. घरी मामा आल्याचा बाहना करुन बाल्यानं पहिलीच्या वर्गातून सतुला सोबत घेतलं आणि धूम ठोकली. ठरल्याप्रमाणे चिंचेच्या झाडाखाली ते सर्व एकत्र जमले . ..आणि... सुरु झाला एक अविस्मरणीय . . . बारा मैलांचा .....प्रवास.

एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेल्या अमितला लहापणापासूनच आपल्या आजीचा लळा होता. आई दिवसभर आपल्या कामात असायची... आपल्या बाळाला कितीही घेऊ वाटलं तरी तिला ते जमायचं नाही. वडील कामानिमित्त मुंबईलाच राहायचे.... अमितच्या जन्मानंतर वडिलांच्या गावाकडील फेऱ्या हळू हळू कमी होऊ लागल्या होत्या...... सणासुदीला तरी घरी येतील या विचारानं अमितची आई रस्त्याला डोळे लाऊन बसायची. पण बऱ्याचदा तिची निराशाच होत असे. अमित हळू हळू मोठा होऊ लागला होता पण बापाचं प्रेम मात्र त्याच्या वाट्याला कधी आलंच नाही.. आईच्या डोळ्यातलं पाणीही आता आटू लागलं होतं पण वडील काही गावाकडे येत नसायचे... असेच दिवसांमागून दिवस लोटत गेले आणि शेवटी एक दिवस वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा निरोप कळाला. एका क्षणात त्या माय लेकरांच नशीब फाटलं. बाप असून ते पोरं अनाथ झालं आणि नवरा असून ती बायको निराधार बनली. सगळं घर शोकसागरात बुढालं होत.

आयुष्याच्या अर्ध्यावर आणून वडीलांनी आईची साथ सोडली होती. ती घुसमट सहन न झाल्यानं तिनं आपल्या माहेरी जाण्याचं ठरविले. पण अमितच काय करावं हे तिला कळायचं नाही. आपल्या माहेरची परिस्थिती हलाकीची असल्यानं आणि अमितला आजीचा खुप लळा असल्यामूळं तिनं अत्यंत जड अंतःकरणाने अमितच्या भविष्याचा विचार केला. अमितला आजीपाशी सोडून माहेरी जाण्याचा शेवटी निर्णय घेतला. अमितचे आजोबा गुरुजी असल्यानं अमितला चांगले शिक्षण मिळेल... हे त्या अडाणी आईच्या मनाला पटलेलं होतं.. दूर राहूनही ती मनानं मात्र कायमच अमितच्या जवळ होती. अमितला लहान असल्याने तेंव्हा त्याला आई नसल्याच काही वाईट वाटायचं नाही. पण वाढत्या वयानुसार हळू हळू त्याला आईची परिभाषा उमगू लागली होती.

आईची भेट होणार या कल्पनेनेच अमित खुलला होता. .... पण जायचं कुठं आणि कसं हा मोठा प्रश्न होता....खुप दिवसांपूर्वी अमित आपल्या आईसोबत मामाच्या गावी गेलेला...... पण आता त्याला रस्ताही धड आठवत नव्हता...... गावाच्या बाहेर पडून डांबरी रस्ता लागला की माथ्याकडं सरळ जायचं .... खुप वेळ गेला की मग सरमकुंडी फाटा लागतो तेथून पुढं गेलं की मग एक वडाच झाड दिसतं आणि त्यापूढं घाटपिंपरी लागते ...तेच माझ्या मामाच गाव.... असं एवढच काहीसं त्याच्या लक्षात होतं. आणि तेच तो पुन्हा पुन्हा सांगत होता. शेवटी त्याप्रमाणे जाण्याचं ठरतं पण गावातून गेलं तर लोकं पाहतील, कुठं चाललात असं विचारतील मग काय सांगणार? म्हणून शेताशेतानी जायचं, नदी ओलांडायची आणि मग गावाच्या बाहेर पडल्यावर डांबरी रस्त्याला लगायच असं काय ते ठरलं. ठरल्याप्रमाणे अगदी मजेत सर्व निघाले ..... सोबत लहानगा सतूही होता. . त्यांचा हा आनंद किती क्षणिक आहे याची त्या चिमुकल्यांना कल्पना नव्हती. आईच्या भेटीने आनंदी झालेला मित्राचा चेहरा त्यांना पहायचा होता एवढीच काय त्यांची शुद्ध भावना होती. आबा आणि दादांच्या माराचाही त्यांना क्षणभर विसर पडला होता. आईच्या प्रेमापायी आठ नऊ वर्षांची ही पोरं एका भावनेनं प्रेरित होऊन सगळं विसरुन मायेच्या प्रवासाला निघाली होती.

पोटात अन्न आणि पायात त्राण होता, तोपर्यंत रस्त्यानं रमत गमत ही पोरं निघाली. कधी शेतातून तर कधी पाऊलवाटेनं .... जसे जमेल तसं ही चालत होती. रस्त्यानं कधी वेल रबराच्या पांढऱ्या शुभ्र म्हाताऱ्या काढून हावेत उडवत... तर कधी एरंडाचा चिक काढून फुगे बनवत. रस्त्यानं भेटणाऱ्या साऱ्या गोष्टींचा आनंद घेत ती आपल्या ध्येयाकडे आगेकूच करत होती. आमित मात्र आपल्या आईला भेटण्यास आतुर झाला होता. तो सर्वांना पटपट चालण्यास सांगत होता. बरच अंतर चालल्यानं पोरं आता पार गळून गेली. रस्त्यानं येणाऱ्या गाड्यांना वर हात करुन ते आता थकले होते पण गाडी काही थांबत नव्हती. बाल्याच्या आईनं दिलेले आठाणे सोडले तर यांच्याकड एक पैसाही नव्हता. सकाळी ११ वा. निघालेल्या चिमुकल्या पावलांनी सलग दोन तास चालून पाच सहा मैलाच अंतर पायी कापलं होतं.

सूर्य डोक्यावर आला होता. पोटातलं अन्न संपलं होतं सगळ्यांनाच कडाडून भूका लागल्या होत्या. पाणीही कुठं दिसेनासं झाल होतं. घसा कोरडा पडला होता. थूंका गिळून गिळून तो ही आता संपला होता. दूर दूर पर्यंत एखादं घर नजरेला पडत नव्हतं. रस्ता सामसूम होता. पंधरा वीस मिनिटांनी एखादी गाडी यायची... पण ती ही थांबत नसायची. . बिचारा सतू खूपच थकला होता..... सहा वर्षाचं लेकरू ते. चालून चालून किती चालणार. ... रडायला लागलं मोठ मोठ्यानं...... भूक आता त्याला सहन होत नव्हती...... त्याचा चेहरा पाहून बाल्याही रडकुंडीला आला होता. आता काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. भावनेच्या भरात आपण हे काय करुन बसलोत याची हळूहळू जाणीव त्यांना होऊ लागली होती. आबा आणि दादांचा चेहरा समोर आला तर आपल्या निर्णयाचा त्यांना अजूनच पश्चाताप होत होता. शेवटी बाल्या, राहूल्या आणि अमित यांनी पाळी पाळीन सतुला आपल्या कडेवर, खांद्यावर जमेल तसं घेतलं .... कसं तरी ओढत फरफटत हळू हळू ते चालू लागले. ......

थोड्यावेळाने दूर वर एक झोपडी दिसली. काहीतरी मिळेल या आशेनं ते झोपडीपाशी गेले. झोपडीत एक आजीबाई होती. तिला लेकरांची कीव आल्यान तिने सर्वांना पोटभर पाणी दिलं. सगळी ढसा ढसा पाणी पिली. आजीने टोपल्यातली उरलेली आर्धी भाकरी खायला दिली. भूक तर प्रचंड लागली होती पण अर्धी भाकर चौघे खाणार कशी हा मोठा प्रश्न होता. शेवटी सतू लहान असल्याने सर्व भाकर सतुला देउन त्यांनी आपली भूक पाण्यावरच भागविली आणि पून्हा रस्त्याला लागली. हा वनवास काही केल्या संपत नव्हता.

सशासारखी पळणारी पोरं आता गोगलगायी सारखी चालली होती. चालणं अशक्य झाल होतं. पाय जड पडले होते. अजून तर सरमकुंडी फाटा ही आला नव्हता. बरचसं अंतर कापून झाल होतं. पोटातली भूक काही शांत बसू देत नव्हती. आणखी थोड चालल्यावर शेवटी सरमकुंडी फाटा आल्याचा दिसल्यान त्यांच्या जरा जीवात जीव आला. दोन दिवसापूर्वीच दसरा असल्यानं लोकांनी नदीत घट टाकले होते. घटात लोक पैसे टाकतात याची कल्पना राहुल्याला होती. मग काय सगळे त्यावर तुटून पडले. मोठ्या मुश्किलीने यांना साडे तीन रूपये मिळाले. त्या साडेतीन रुपयातला एक एक रुपया त्यांना आज बैलगाडीच्या चाकाएंवढा दिसत होता. बाल्याकडे आईने दिलेले आठाने होते.....मग चार रुपये झाल्यानं बाल्याला आनंद झालां. एक मस्त जुगाड जमून आलं होतं. एका किराणा दुकानातून चार रुपयांचा पारले बिस्किटचा पूडा त्यांनी विकत घेतला. आलेली २० बिस्कीट चौघांनी वाटून घेतली. बिस्किट लवकर संपू नये म्हणून ते खाण्याऐवजी चघळत चघळत ही पोरं आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली.

सकाळी गुलाबा सारखे टवटवीत वाटणारे चेहरे पार कोमेजून गेले होते. शेवटी त्या परमेश्वरालाच या लेकरांचे हाल पहावले नसावेत म्हणून की काय ध्यानी मनी नसतानां एक टेम्पो अचानकपणे त्यांच्यापाशी येऊन थांबला... अचानक थांबलेल्या टेम्पोमूळं आगोदर सगळीच घाबरली पण टेम्पोवाला प्रेमानं बोलल्यानं आणि टेम्पोत बसायला भेटल्याने पोरांच्या थकलेल्या चेहऱ्यावर एक समाधानाची छटा थोडयावेळ का होईना दिसली. पण एवढया सहजासहजी त्यांचा प्रवास संपणारा नव्हतां. त्यांच्या आनंदावर पून्हा विरजन पडलं. टेम्पो दुसऱ्या रस्त्यानं जाणार असल्यानं घाटपिंपरीच्या एक मैल मागे असतांनाच टेम्पोवाल्यानं पोरांना उतरुन दिलं. आता परत एक मैल चालायचं पोरांच्या जीवावर आलं होतं. पण शेवटी कसंबसं उठत बसत त्यांनी एक मैलाचं अंतर पार केले आणि एकदाचे गावात पोहचले. घाटपिंपरी गावात आल्याची खात्री झाल्यावर मात्र एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकू लागला होता. त्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यांची भूक आता कधीच कुठे पळून गेली होती. जग जिंकल्याचा आनंद त्यांना झाला होता. त्यांचे सारे दुख आणि वेदना संपल्या होत्या. नव्या उमेदीने आता त्यांची पाऊले झपाझप पडू लागली होती.... अमितला ओढ होती फक्त ती.... आपल्या आईच्या भेटीची.....तिच्या एका प्रेमळ स्पर्शाची.....आणि घट्ट मिठीची. तो क्षण एकदाचा कधी येईल असं त्याला झाल होतं. तो मनातच कल्पना करुन आनंदी होत होता.

पोरं शाळेतून गायब झाल्याची बातमी एव्हाना आबा आणि दादांपर्यंत जावून धडकली होती. सगळं गाव पालथ घालून झालं होतं पण पोरं काय मिळत नव्हती. शेवटी कोठूनतरी दादांना माहिती मिळाली आणि सारा प्रकार उघडकीस आला. सर्व जण अंचबीत झाले होते. " पोरं एवढं डेरींग करतील असं वाटलं नव्हतं". आणि " काट्टी गेली तर गेली पण सतूला घेऊन गेली " एवढी दोनच वाक्य सगळयांच्या तोंडातून निघत होतं. दादांचा संताप अनावर झाला होता. तिथकीच लेकरांची काळजीही त्याला वाटतं होती. घरी आल्यावर दादा आणि आबांचा चांगलाच मार भेटरणार याची त्यांना कल्पना होती. ती तयारी ठेवूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता .

शाळेच्या कपडयातील उन्हानं काळवंडलेल्या चेहऱ्याची तीन पोरं , एक छोट लेकरु सोबतीला आणि अशा अवस्थेत गावात येतांना पाहून घाटपिंपरी गावाच्या वेशीतील पारावर बसलेल्या लोकांच लक्ष त्यांच्यावर गेलं. गावात आल्याच्या आनंदान अमित आपल्या आईच्या नावानं रडतच सुटला होता. बाल्या आणि राहूल्या दिसेल त्याला शालन मावशीचं घर कुठयं ? शालन मावशीचं घर कुठयं ? हा एकच... प्रश्न विचारत होते. गावकरी ही क्षणभर बुचकाळयात पडले. हा नेमकं काय प्रकार आहे हे काही त्यांच्या लक्षात येईना. शेवटी गावकऱ्यांनी त्यांना विश्वासात घेतलं. त्यांच्याशी बोलल्यावर सगळा प्रकार लक्षात आला. " हे आपल्या शालूचं पोरंग, वाशीवरुन बारा मैलाचं अंतर पायी चालून आपल्या आईला भेटायला आलयं". असं गर्दीतलं एक जण म्हणलं एवढी छोटी पोरं थेट वाशिवरून पायी चालत आलीच कशी हाच सगळ्यांना प्रश्न पडला होता. सगळे जण अचंबित झाले होते. ही बातमी इतक्या वेगानं गावभर पसरली की बघता बघता लोकांनी त्यांना पाहिला गर्दी केली.

अमित आलाय ही बातमी शालूपर्यंत जाऊन पोहचली पण तिला काही विश्वास बसला नाही. आबा आणि दादा असतांना अमित काय पायी येणार नाही याचा तिला पूर्ण विश्वास होता. पण सोबत त्याच्या वयाची आणखी दोन पोरं आणि एक छोटं पोरग आहे असं कळल्यावर मात्र तिला सगळं कळून चुकलं. ती आई आपलं अस्तित्व विसरुन गेली. गेली कित्येक महिन्यापासून तीनं आपल्या पिल्लाला पाहिलं सुध्दा नव्हंत.. त्याच्या आठवणीनं तिचा एकही दिवस पूर्ण झाला नव्हतां. कित्येक रात्री फक्त आपल्या लेकरांच्या आठवणीत जागून घालविल्या होत्या. माझ लेकरू कसं आसल, त्याला आपल्या आईची आठवण येत असेल का ? मी त्याला टाकून आले.... याचंच तिला सारखं वाईट वाटायचं. तेच लेकरू आज बारा मैल चालून आपल्या आईला भेटायला आलं होतं...... यापेक्षा दुसरा आनंद त्या आईला नव्हता. ती आई आपल्या पाडसाला भेटायला आतूर झाली होती. तिच्या भावना आज फक्त एक आईच समजू शकत होती. ती आपलं देहभान विसरुन हातातलं काम आहे तसंच सोडून अनवाणी पायानं आपल्या कोकराला कवेत घेण्यासाठी रस्त्यानं धावत निघाली. ते कोकरुही सकाळपासूनच आपल्या आईला बिलगण्यास असुसलेलं होतं. मायेच्या स्पर्शासाठी आणि दोन कौतुकाच्या शब्दांसाठी व्याकूळ होतं.

पश्चिमेला झुकलेला त्या सूर्याची किरणेही क्षणभर थांबली.... वाहणाऱ्या वाऱ्यानी वाट मोकळी करून दिली. आणि.... माय लेकरांची नजरानजर होताच संगळ काही बोलून झालं. धडधडणारी दोन ह्रदय एकत्र आली. आकाशाला फाडून विजेनं धरणीच्या काळजात खोलवर शिरावं. . वाटेत येणाऱ्या प्रचंड मोठया पर्वतांना नदीने बाजूला सारुन सागरात कायमचं विलीन व्हावं..... अशीच काय ती माय लेकरं एकमेकांना बिलगली होती. सगळा परिसर मातृप्रेमात आज आसमंत न्हाऊन निघाला होता. मोठं- मोठ्यान टाहो फोडून आपलं मन ती हलकं करत होती. . या दृश्यानं सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. उभं गाव आई मुलांच्या मिठीत आज .....विरघळलं होतं.

सकाळी उठल्यापासूनच शुन्यात असलेला अमित अचानकच शेजारी बसलेल्या आईच्या गळयात पडून मोठं-मोठयान रडू लागला. आज दुसऱ्यांदा अमित एवढा भावूक होऊन आपल्या आईच्या गळ्यात पडून रडत होता. आईलाही नेमका काय प्रकार घडलाय हे लक्षात येईना. बऱ्याच दिवसांनी आज ओंकारचा ( बाल्या ) अमितला फोन आला होता. चार तास ते आज मनसोक्त बोलले होते. साऱ्या जुन्या आठवणी उचंबळून आल्या होत्या. त्यामुळे आपल्या वीस वर्षापूर्वीचा हा सारा प्रसंग अमितला आज जशाच्या तसा आठवला होता.. ..अमित आज जागतीक स्तरावरील एक प्रसिध्द चित्रकार झाला आहे. आई आणि तो अगदी स्वकर्तृत्वावर मजेत राहत असून त्याच्या चित्रांना आज विदेशातूनही मोठी मागणी आहे.

@ उमेश तुपे , अहमदनगर
(मो. 7387348172)

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

14 Nov 2020 - 4:06 pm | सिरुसेरि

छान लेखन . +१

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 8:37 pm | टर्मीनेटर

@उमेश तुपे

'ओढ'

ही तुमची भावस्पर्शी कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:24 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली.

सुखी's picture

24 Nov 2020 - 12:25 pm | सुखी

कथा आवडली...

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Nov 2020 - 5:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

अशी जिद्दी लेकरे ही असतात.. ही लेकरे फारच आवडली.

फक्त एकच वाटले

सगळा परिसर मातृप्रेमात आज आसमंत न्हाऊन निघाला होता. मोठं- मोठ्यान टाहो फोडून आपलं मन ती हलकं करत होती. . या दृश्यानं सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. उभं गाव आई मुलांच्या मिठीत आज .....विरघळलं होतं.

कथा इथेच संपली असती तर जास्त परीणामकारक वाटली असती. पुढचा परिच्छेद अनावश्यक वाटला.

अर्थात लेखकाचे लेखनस्वातंत्र्य मान्यच आहे. पण एक वाचक म्हणून जे वाटले ते सांगितले.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Nov 2020 - 5:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

अशी जिद्दी लेकरे ही असतात.. ही लेकरे फारच आवडली.

फक्त एकच वाटले

सगळा परिसर मातृप्रेमात आज आसमंत न्हाऊन निघाला होता. मोठं- मोठ्यान टाहो फोडून आपलं मन ती हलकं करत होती. . या दृश्यानं सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. उभं गाव आई मुलांच्या मिठीत आज .....विरघळलं होतं.

कथा इथेच संपली असती तर जास्त परीणामकारक वाटली असती. पुढचा परिच्छेद अनावश्यक वाटला.

अर्थात लेखकाचे लेखनस्वातंत्र्य मान्यच आहे. पण एक वाचक म्हणून जे वाटले ते सांगितले.

पैजारबुवा,

फ्रुटी's picture

24 Feb 2021 - 4:06 pm | फ्रुटी

छान कथा

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2021 - 5:41 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर कथा !
+१

आईपासून दुरावलेल्या अमितची कहाणी वाचून डोळे पाणावले !
या बाबतीत आपण किती नशिबवान आहोत हे जाणवून अंतर्मुख झालो.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

26 Feb 2021 - 3:48 pm | मधु मलुष्टे ज्य...

कथा खुप आवडली.