जिंदगी फिर भी.....

ज्येष्ठागौरी's picture
ज्येष्ठागौरी in जनातलं, मनातलं
21 Aug 2020 - 10:28 am

जिंदगी फिर भी.....

लेकीची नुकतीच एक मोठी( सत्व )परीक्षा झाली त्यात ती उत्तीर्णही झाली आणि द्विपदवीधरही झाली आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळात काही काळ शिकायचा मनसुबा नसल्याचं तिनं जाहीर केल्यावर मी जरा मऊ(!) आवाजात तिला विनंती केली की तिनं आता तिची खोली आवरावी. म्हणजे तसा पसारा म्हणला तर फक्त पुस्तकं आणि वह्या आणि कागद , तिच्या वळणदार अगदी सुंदर अक्षरात लिहिलेली टिपणं आणि वह्या, पण गेल्या आठ वर्षात एक चिटोराही तिनं फेकला नाही किंवा फेकू दिला नाही.तिच्या या प्रचंड विश्वाला हात घालण्याचं धाडस मी आणि तिच्या बाबानं केलं,आतापर्यंत मुलांची खाजगीपण जपायचं म्हणून,कुठल्याही कपाटाला कुलूप नसताना ,एक नियम म्हणून मुलांचं कपाट आवरायचं ते त्यांच्या समोर असं ठरवलं होतं,आत्ताही तेच करत होतो.इयत्ता आठवीचं फ्रेंचचं पुस्तक,choir चं नोटेशन,राधिकानी दिलेली कंपासबॉक्स पासून gray's anatomy पर्यंत अनंत वस्तू या सागरात होत्या.पहिला दिवस तिनं आमची परीक्षा पाहिली मग हे तिच्या मनुष्य प्रयत्नांच्या पलीकडे आहे आणि आम्ही तिला दाखवल्याशिवाय काही टाकणार नाही हे जाणवून तिनं आम्हाला मुभा दिली आणि कामाचा आवाका,तीन दिवस,चार (कामचुकार)मजूर ह्या काळ काम वेगाच्या गणितासारखं काही काळानंतर खूपशी न लागणारी गर्दी कमी झाली ,कागद बारीक तुकडे करुन, कोरे कागद अगदी मध्यमवर्गीय आपलेपणानी बाजूला काढून आणि पेनं, पेन्सिली रबर यांचे मालक बदलून, आम्ही ते शिवधनुष्य पेललं म्हणा आणि आमच्या घरानी मोकळा श्वास घेतला.तिच्या याच खोलीत तिला तिच्या अभ्यासक्रमासाठी (भौतिकोपचार~physiotherapy) लागणारा हाडांचा सापळा,कवटीसहित टेबलावर काही काळ मांडून ठेवला होता,हाडं वेगवेगळी होती. पहिल्या दिवशीच काम करणाऱ्या आमच्या अनिताला हिव भरायची वेळ आली होती.नंतर आम्हालाही त्या कवटीची सवय झाली आणि पहिल्या वर्षानंतर तो बॅगेत गडप झाला आणि नंतर पुढच्या batch च्या मैत्रिणीला गेला.जसा आला तसा गेला पुढे.गेले आठ वर्षात साठवलेले,उपयोगी पडलेले,उपयोगी न पडलेले,आवडलेले,न आवडलेले तिचे शिक्षणाचे, कॉलेजचे,मैत्रिणींशी गप्पांचे,हसण्याचे,ताणाचे शिक्षकांचे,मैत्रिणींचे, रात्रभर अभ्यासाचे (याला बोली भाषेत नाईट मारणे म्हणतात)पाठांतराचे (रट्टा मारणे)आशेचे, निराशेचे,अपेक्षांचे क्षण तिच्या समोरुन हातातून डोळ्यासमोरुन निघून गेल्याचं दुःख स्पष्टपणे दिसत होतं.मधूनच काहीतरी अचानक सापडल्याचा आनंदही होत होता.पण एकंदर खूप पसारा बाळगल्याचा पश्चाताप झाला असं या घडीला तरी वाटलं.मुळात तिची वृत्ती संचयी आहे,बांधिलकी मानणारी आहे आणि प्रामाणिक आहे. तिच्या अभ्यासक्रमात पुढे काहीही लागू शकतं या काळजीपायी साठवलेला हा खजिना रिकामा करताना तिला यातना झाल्या.पण एक धडा जरुर मिळाला की एवढा संचय आवश्यक नाही. असो.जाता जाता एक मजेशीर गोष्ट, माझ्या ऑफिसजवळ एक बंगला आहे त्याचं नावच पसारा आहे.(ही टेप नाही)माझा नवरा म्हणतो तो पिसारा असणार पण ते नक्की पसारा आहे असं माझं मत आहे.आणि तसं असेल तर इतका प्रांजळ नाव दुसरं नाही घराला. पाय पसरून मोकळेपणाने गप्पा मारत असलेल्या एकत्र कुटुंबाचं चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर.पण मुलगीच कशाला ,मीसुद्धा जराही हयगय न करता किती संग्रह केलाय. कपड्यांचा,दागिन्यांचा,पुस्तकांचा,भांड्यांचा, झाडांचा,लेखन साहित्याचा, ई मेल्सचा, माणसांचा , पिशव्यांचा, भावनांचा.या सगळ्याच गोष्टींनी मला खूप साथ दिली आहे,आनंद दिला आहे.समाधान दिलं आहे,सहवास दिला आहे आहे.खोटं कशाला बोला! एकंदरच आपल्याकडे भौतिक गोष्टींचा भरपूर साठा असेल तर श्रीमंती असं समीकरण आहे आणि काही वेळा परिस्थितीनुसार ते अगदी योग्य आहेच.पण मला आता मी किती अनावश्यक वस्तूंचा संग्रह करतीये हे गेल्या काही वर्षांत लक्षात येतंय. आता आवश्यक आणि अनावश्यक हे फार सापेक्ष आहे आणि विपश्यनेत शिकवतात तसं अनिश्च आहेच त्यामुळे माझ्याही बाबतीत, कधी आवश्यक असणारी गोष्ट ही अचानक अनावश्यक वाटू लागते आणि अनावश्यक वाटणारी गोष्ट उद्या आवश्यक वाटू शकते.म्हणजे लेकीने केलेल्या संचयाचं कारण परंपरागत असणार.असो !तर माझ्या भावनांच्या संग्रहापैकी अनावश्यक भावनांचा संग्रह हा त्यातलाच एक भाग आहे.मी काही लोकांबद्दल राग, असूया, द्वेष हे बाळगते का कधीतरी, हे तपासून पहायला हवं आणि तसं असेल तर त्याचाही निचरा व्हायला हवा आणि ही कृती वारंवार व्हायला हवी.हे आता जाणवतंय.आणि त्यातूनच एकंदरीत less is more हे फक्त मेकअप किंवा राहणीमानापुरतं मर्यादित नाही हे पटायला लागलंय बहुतेक बाबतीत.तसा चंगळवाद हा कायमच वाईट मानला गेलाय आणि सूक्ष्मवाद हा पूर्वीपासून आपल्याकडे होता,योग्य प्रमाणात अन्न रांधलं जायचं आणि ग्रहण केलं जायचं.काटकसरीने आणि निगुतीने संसार होत होते.अगदी सधन घरातसुद्धा ही अंगवळणी पडलेली चाल रीत होती. किंवा एक साधन म्हणूनही दागिन्यांकडे पाहिलं जायचं ,साध्य म्हणून नाही. खूप सतत उपलब्धता नसल्यामुळे जे साठवलं जायचं ते वेगळं,पण आता मी सगळं चोवीस गुणिले सात आणि तीनशे पासष्ठ दिवस बाजारात उपलब्ध आणि मिळणाऱ्या गोष्टीला मी तरीही माझ्या फ्रीजमध्ये दडपून ठेवते ही असुरक्षितता नाही तर काय.कोंड्याचा मांडा करणाऱ्या बायका होत्या माझ्या मागच्या पिढीत ,उत्तम परिस्थिती असूनसुद्धा अन्न वाया न जाऊ देणे किंवा आणलेल्या गोष्टीचा पुरेपूर वापर करणे हेच योग्य होते.सूक्ष्मवाद नेमके हेच सांगतो .Love the people and use the things and not otherwise..हे किती खरंय.
सुचूनी मागे एकदा मधुमेहाबद्दल बोलताना सांगितलं होतं की आपली मानवाची म्हणजे विशेषत आशिया खंडांतल्या लोकांची जनुके ही उपासमारीची आहेत त्यामुळे आता जेंव्हा आपण जेव्हा भरमसाठ खातोय ते साठवलं जातंय आणि त्यातून हे जीवनपध्द्तीचे आजार होताहेत. म्हणजे जगण्यापुरतं खाणं अर्थात minimalism हाच योग्य मार्ग आहे.ते ओंजळी एवढं सात्विक असावं असं प्राचीन शास्त्र सांगतं.तेही सूक्ष्मवादाशी तंतोतंत जुळणारं आहे.वस्त्र एक कटीवर एक काठीवर ,हा जमाना गेलाय खरा पण त्यातला आशय आता माझ्या लक्षात यायला लागलाय.आसक्ती थांबलेली नाही, पण ही आसक्ती आहे ही जाणीव व्हायला लागलीये हेही नसे थोडके.अजूनही दोन कपडे घेतले की दोन द्यावे अशी आदर्श परिस्थती आली नसती तरी एक देण्यापर्यंत मजल आहे.
सूक्ष्मवादाकडे जायची वाट खडतर आहे.त्याचं पहिलं पाऊल म्हणजे Declutter अर्थात अनावश्यक वस्तूंचा त्याग.
मेरी कोंडो नावाच्या जपानी, फार छान बाई आहेत त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत"art of tidying up' किंवा "spark joy" अशा नावानी.आणखी त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सल्ला देतात घर कसं नीट नेटकं ठेवावं ह्याबाबत.एकूणच सध्या त्यांचं खूप कौतुक होतंय ते ऐकून मी त्यांचे व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या.तर ती एक जपानी मुलगी आहे चटपटीत. अनावश्यक वस्तू कशा दूर कराव्यात ह्याचं फार गोड विवेचन ती करते.ती वस्तूंचं कपडे, पुस्तकं, कागदपत्रं, संकीर्ण (जसे इलेक्ट्रॉनिक वस्तू वायरी वगैरे)आणि भावनिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अशा पाच तत्वात वर्गीकरण करते.मेरी कोंडो प्रथम एकेक वर्गीकरण केलेली गोष्ट उदा कपडे, सर्व कपडे एकत्र आणून त्यातले न वापरले जाणारे,न होणारे,बाजूला ठेवले जातात ,मेरी कोंडो विचारते की "does it spark joy?एखादी गोष्ट तुम्हाला आनंद देते का,याचं उत्तर होकारार्थी असेल तर ती वस्तू ठेवायची आणि नसेल तर बाजूला काढायची.ती बाजूला काढण्याआधी तिला मनापासून धन्यवाद म्हणायचं कारण त्या वस्तूंनी आपली सेवा केलेली असते.सगळ्यात अवघड पाचवी पायरी आहे ती म्हणजे भावनिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी,यापासून स्वतःला दूर करणं फार मुश्किल. म्हणून हे काम सगळ्यात शेवटी करायचं असंही मेरी कोंडो म्हणते.
तिच्या पुस्तकाला प्रतिसाद म्हणून घरातल्या गोष्टींचा आढावा घेतला आणि खरंच खूप गोष्टी निघाल्या ज्या वर्षानुवर्षं मी वापरत नव्हते आणि देतही नव्हते त्यामुळे दुसऱ्याला वापरायला दिले जात नव्हते. त्यात अनावश्यक मेल्स काढून टाकणं हेही आलं,त्यातून ऊर्जा वाचवली जाते असं वाचलंय.किंडल आणल्यामुळे काही पुस्तकं निघाली ज्यांना अलग करणं शक्य झालं पण तरीही माझ्या लाडक्या मराठी पुस्तकांना निरोप देणं मला माझी 'बस की बात' वाटली नाही.झाडं तर जिवंत आहेत त्यांना कसं सोडू?पण तरीही ही जाणीव नक्की आली की आता साठवायचं नाही तर आवरायचं, बेतात रहायचं,आणि जी वस्तू बाजूला करायची तिला सन्मानपूर्वक निरोप द्यायचा.कृतज्ञ राहून तिला पुढं जाऊ द्यायचं.असुरक्षित वाटण्याची भावना मागे टाकून, वापरात नसलेल्या वस्तू, वास्तवातल्या किंवा आभासी दोन्ही.
संग्रह केलेली गोष्ट त्या त्या वेळी उपयोग ,आनंद, सोय, समृद्धी, समाधान तर देतेच पण त्याबरोबर एक काहीतरी मिळवल्याचा आनंदही देते.आपला अहं सुखावणारी भावना त्यात असतेच असते.पण त्या संग्रहाच्या पलीकडे एक निर्मोही भावना असते म्हणजे असायला हवी, संग्रहाचं दडपण, किंवा त्याचा गर्व ,दंभ नको पण लक्षात येत नाही चटकन. निर्भेळ आनंद फार छोट्या गोष्टींमधून मिळतो.हे कळायला फार काळ जातो पण कधीतरी ते उमजतं, कधीतरी ते सत्यात येतं.पण येतं तेंव्हा लखलखीतपणे येतं.
पाँव सूखे हुए पत्तों पर अदब से रखना
धूप में माँगी थी तुमने पनाह इनसे कभी
मला ऋचाबरोबर आवराआवरी करताना नेमक्या ह्या जीवघेण्या ओळी आठवल्या आणि हे आवरणं तिला का अवघड जात होतं ते समजलं.आणि त्याबरोबर हेही समजलं की जगण्यात आनंदाच्या छोट्या छोट्या खिडक्या असतात.संचय करण्यात आनंद जरुर आहे पण चिरकाल टिकणारा आनंद छोट्या गोष्टींमध्ये असतो. संचयामध्ये रेंगाळणं हा काही गुन्हा नाही.त्यात गुंतून पडणं किंवा गुंतागुंत होणं.विपश्यनेत सांगतात तसं "गांठे मत बांधो"तसं लेकीला सांगावंसं वाटलं ,सांगितलं पण तिचं तिला उमजलं तर जास्त बरोबर. वयानुसार आयुष्याच्या टप्प्यानुसार संचय होत राहणार, पण तरीही तो चांगला असावा.दहा स्वस्त गोष्टींपेक्षा एक मूल्यवान पण टिकाऊ गोष्टीचा ,चांगल्या शिक्षणाचा, विचारांचा, चांगल्या माणसांचा असावा. चांगल्या मूल्यांचा, बांधिलकीचा असावा.तो खूप लांबवर उपयोगी पडतो.साधं जगायला फार काही लागत नाही.आपल्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा हेच आपलं आकाश असतं.भौतिक गोष्टी काही काळ आनंद, मान जरुर देतात पण एखादं चांगलं पुस्तक,पातळ पोह्याचा चिवडा,माठातलं गार पाणी,काहीतरी सृजनात्मक,काही रचनात्मक घडणारं काम,आर डी बर्मनचं पाठीमागे चालू असणारं गाणं,मित्रमैत्रिणींची निर्विष चेष्टा मस्करी,सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप,चार पायाच्या दोस्तांची घसट, सुखाची व्याख्या आणि व्याप्ती यापलीकडे जात नाही,हे कळायला लागणारा विवेक जरा केस पिकायला लागल्यावर येतो.धावपळ करता करता ,संचय करता करता ,एका आयुष्यात सगळं करणं शक्य नाही हे एक क्षणी समजतं, पटतं आणि मग तो क्षण येतो,नीरव,संथ, उमजण्याचा,आणि गुलजा़रकाकांचे शब्द ,न बोलवता ,न राहवून आपली सोबत करत राहतात."थोडा है थोडे की जरुरत है,जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है!"

ज्येष्ठागौरी

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

21 Aug 2020 - 12:19 pm | संजय क्षीरसागर

मांडणीचा पसारा फार झालायं.

मिनिमलीजम हा जगण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला तो पूर्णपणे आणि सहजगत्या आचरणात आणायचा असेल तर ३ गोष्टी कराव्या लागतात :

१. केवळ वर्तमानात जगणं > यामुळे भविष्यकाळासाठी साठवण करायची चुकीची सवय संपते.
२. एकावेळी एकच काम > यामुळे काम उत्तम होतं, पसारा होत नाही आणि काम झाल्यावर आवराआवरी करावी लागत नाही. शिवाय वस्तू वेळच्यावेळी जागेवर ठेवल्यानं शोधाशोधीत वेळ जात नाही.
३. उत्तम वस्तूंची निवड : सर्वोत्तम वस्तू निवडल्यानं कामाची इफिशियंसी वाढते आणि एकदा खरेदी झाल्यावर, मनात निर्णयापश्चात उहापोह होत नाही.

ज्येष्ठागौरी's picture

21 Aug 2020 - 12:46 pm | ज्येष्ठागौरी

निश्चितच! पण सगळ्यांना जमतं असं नाही आणि मीही त्यातलीच आहे, पण तो निर्मळपणा आहे त्यामुळे, जाणीव असल्यानं नक्की सुधारणा होतेच! प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मिनिमलीजम हा त्याचा परिणाम आहे. हे लक्षात ठेवलंत की जमेल.

चौथा कोनाडा's picture

21 Aug 2020 - 12:27 pm | चौथा कोनाडा

व्वा खुप सुंदर लिहिलंय ! लेखनशैली आवडली !
कवटी, हाडांचा सापळा, हाडं असला फिजिञो थेरपीचा पसारा वाचून दचकायला झालं !
माणुस जन्माला आला की पसारा चालू होतो, जाताना त्याने स्वतः आवरला नाही तर इतरांना आवरावा लागतो !
(वपुंना फोटो काढायचा प्रचंड नाद होता, घर फोटोंच्या पसार्‍यांनी भरून गेले होते, ते गेल्यावर त्यांच्या मुलाने सुमारे ३ हजार फोटो फाडून टाकले होते असं वाचल्याचं आठवतं !

मेरी कोंडोचं "कोनमारी" बद्दल शर्मिला फडके यांचा वाचलेला हा सुंदर लेख आठवला.
https://www.lokmat.com/manthan/japanese-method-home-cover-konamari/

मोर म्हटलं की पिसारा आलाच,
माणुस म्हटलं की पसारा आलाच !

पुढिल लेखनाच्या प्रतिक्षेत !

ज्येष्ठागौरी's picture

21 Aug 2020 - 12:49 pm | ज्येष्ठागौरी

प्रतिसाद फार भावला! धन्यवाद, मोर आणि पिसारा आणि माणूस आणि पसारा ;)

गणेशा's picture

21 Aug 2020 - 3:57 pm | गणेशा

अतिशय सुंदर लिहिले आहे..
पुस्तक आणि पसारा वाचताना जास्त छान वाटले..

आठ वर्षात साठवलेले,उपयोगी पडलेले,उपयोगी न पडलेले,आवडलेले,न आवडलेले तिचे शिक्षणाचे, कॉलेजचे,मैत्रिणींशी गप्पांचे,हसण्याचे,ताणाचे शिक्षकांचे,मैत्रिणींचे, रात्रभर अभ्यासाचे (याला बोली भाषेत नाईट मारणे म्हणतात)पाठांतराचे (रट्टा मारणे)आशेचे, निराशेचे,अपेक्षांचे क्षण तिच्या समोरुन हातातून डोळ्यासमोरुन निघून गेल्याचं दुःख स्पष्टपणे दिसत होतं.

हे जास्त आवडले..

मी गेल्या वर्षी घराच्या कलर चे काम 9 वर्षांनी काढले..
आणि मग त्याही अगोदरच्या 10 वर्षांची पुस्तके, फिरायला जायचे plan, त्यावेळी कॉलेज संपताना कसले book द्यायचे ते अभिप्राय द्यायला (? नाव विसरलो ) ते सापडले..
C & data structure, c++ by balguru swami, dbms by kortgz,अशी असंख्य रेफ़रन्स बुक्स पडलेली होती..
English grammer, अनेक सर्टिफिकेट्स.. सगळ्यां काढलेल्या नोट्स..
यावर एक पुर्ण लेख लिहावा वाटतोय आता तुमचे वाचून..
.
माणुस मोठा झाला कि हळू हळू नंतर भावनांचा आणि आठवणींचा पसारा असाच समोर येत राहतो, किती ही आवरायचे म्हंटले तरी काहीतरी पुन्हा पुन्हा जपून ठेवावे वाटते..

अगदी वहीत पिंपळाच्या पानाची जाळी झाल्यावर ते कसे नक्षीदार दिसते, अगदी तसेच ह्या पसाऱ्याच्या अनेक नक्षी डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात...

प्रकाश घाटपांडे's picture

22 Aug 2020 - 2:29 pm | प्रकाश घाटपांडे

माणुस मोठा झाला कि हळू हळू नंतर भावनांचा आणि आठवणींचा पसारा असाच समोर येत राहतो, किती ही आवरायचे म्हंटले तरी काहीतरी पुन्हा पुन्हा जपून ठेवावे वाटते.

कटू आठवणी कोळसा उगाळल्या सारख्या असतात तर सुखद आठवणी या चंदन उगाळल्या सारख्या असतात. दोन्ही आठवणी येतातच. :)

ज्येष्ठागौरी's picture

21 Aug 2020 - 5:07 pm | ज्येष्ठागौरी

धन्यवाद गणेशा, प्रतिसादाबद्दल! तुमचा लेख वाचायला आवडेल नक्की.

अरे काय छान लिहीले आहे तुम्ही.
काही म्हणा , जुन्या वस्तु या नुसत्या वस्तु नसतात. त्या सोबत छान क्षण जाग्या करतात.
माझ्या बायकोने माझ्या मुलाची लहानपणीची खेळणी ( काही तुटलेली आहेत तरीही) अजीन जपून ठेवली आहेत.
हे काढून टाकुया की असे म्हणाय्चे एकदाच धाडस केले होते. त्यानंतर पुन्हा नाही.
माझ्या एका मित्राची आई गेली. त्यावेळेस तो म्हणाला होता " आई गेली की आपला इतिहास संपतो"

तुषार काळभोर's picture

21 Aug 2020 - 6:26 pm | तुषार काळभोर

मोबाईलमधले फोटो , कॉम्प्युटर वर साठवलेले फोटो हा सर्व या पसार्‍याचाच भाग.
सर्वात जास्त जीव अडकलेला असतो मुलांच्या लहानपणापासून काढलेल्या फोटोत अन कॉलेजच्या फोटोत.

संग्रहाचं दडपण, किंवा त्याचा गर्व ,दंभ नको पण लक्षात येत नाही चटकन. निर्भेळ आनंद फार छोट्या गोष्टींमधून मिळतो.हे कळायला फार काळ जातो पण कधीतरी ते उमजतं, कधीतरी ते सत्यात येतं.पण येतं तेंव्हा लखलखीतपणे येतं.

अगदी प्रत्येकाला आपआपला संग्रह प्रिय असतो,त्याच अमुल्य मोल हीच त्याची प्रेरणा असते.
मस्तच!!

ज्येष्ठागौरी's picture

21 Aug 2020 - 7:41 pm | ज्येष्ठागौरी

धन्यवाद! मी माझा पहिलाच लेख मिसळ पाववर पोस्ट केला आहे, आपला प्रतिसाद खूप उत्साहदायी आहे!

सिरुसेरि's picture

21 Aug 2020 - 11:40 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी . जपान मधे याच संदर्भात - TPM - Total Productivity Maintenance , 4S Implementation अशी प्रणाली वापरात आहे असे वाचले आहे .

टर्मीनेटर's picture

22 Aug 2020 - 8:14 am | टर्मीनेटर

खूप छान लिहिलंय! आवडले.
पुढील लेखनास शुभेच्छा!