येड लागलं, येडं लागलं, या छंदाचं येड लागलं

लोकहो,

आज तुम्हाला येड लावण्याचा विडा उचलून आम्ही लेखन करीत आहोत. आम्ही ठार "येडे" झालोच आहोत, आता तुम्हालाही करतो.

या वेडाचे कारण म्हणजे लवंगलता छंद. हा छंद माणसाला वेड लावणारा आहे. या छंदाचे नोटेशन असे आहे.

प| प| प| -|-| =१४ अक्षरे

येथे प म्हणजे पद्मावर्तनी म्हणजे ४ अक्षरे (जातींमध्ये प च्या ८ मात्रा मोजल्या जातात)

तर या छंदात एका ओळीत १४ अक्षरे असतात. पण लेखनाच्या सोयीसाठी आणि कवितेच्या सौंदर्यासाठी १४ अक्षरांची ओळ दोन भागात विभागून लिहिली जाते.

म्हणजे ८ अक्षरांची पहिली व उर्वरीत ६ अक्षरांची दुसरी. अशा दोन ओळी एकत्र येऊन २ आणि ४ या ओळींचा यमक.

हा एक अत्यंत गोड व मधुर छंद आहे. एकदा हा अवगत झाला की बरेच लेखन या छंदात होते. कारण हा छंद सुलभ आहे. येथे "खेळायला" वाव आहे.

उदाहरणार्थ या छंदातली कविवर्य ग्रेस यांची ही कविता पहा

पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्‍या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार.....

प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?

पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली

आमची या छंदातली एक कविता अशी

घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड
पालवीन फुलते का
वठलेले खोड?

परतुनी येईल का
सुटलेला बाण?
बाहुलीला कधीतरी
येईल का न्हाणं?

घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड|

मेघ येता आषाढाचा
नाचे फक्त मोर
अवसेला दिसते का
कधी चंद्रकोर?

घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड|

मोठेपणा दावण्याची
ज्याला त्याला हाव
बाभळीला मिळतो का
बकुळीचा भाव?

घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड|

नवरीला नवर्‍याचा
सहवास नाही
पारूबाई तरी तुला
नातवाची घाई

घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड
पालवीने फुलते का
वठलेले खोड?

आपला,
(ठार-येडा) धोंडोपंत

धोंडोपंत, ल

धोंडोपंत,
लवंगलता या छंदाची ओळख करुन दिल्या बद्दल आभार. या छंदशास्त्राच्या लेखमालेमुळे दिसणार्‍या प्रत्येक कवितेच्या ओळीतली अक्षरे मोजण्याचा नवाच नाद मला लागला आहे..

तुम्ही केलेली लवंगलतेतली रचना छानच आहे.

हे नाव ऐकून पुलंच्या कुठल्याशा गोष्टीत मिस लवंगलतिका असे नाव आल्याचे आठवले.. (चूभूदेघे)

छंदशास्त्रातल्या या लेखांत जास्त गतीने एकामागोमाग छंद येत असल्याने मागचा छंद डोक्यात मुरायला सवड मिळत नाहिये असे मला वाटते. आपण अधून मधून आधिच्या छंदातली एखादी चांगली कविता उदाहरण म्हणुन देत गेलात तर ते अजून फायद्याचे होईल असे वाटते.
-- लिखाळ.

छंद आवडला. मात्र

छंद आवडला. मात्र

छंदशास्त्रातल्या या लेखांत जास्त गतीने एकामागोमाग छंद येत असल्याने मागचा छंद डोक्यात मुरायला सवड मिळत नाहिये असे मला वाटते.

+१
अजून अनुष्टुभहि नीट कळला नाहि आहे Sad

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

काव्य स्पर्धा

या छंदावरची काव्य स्पर्धा पुठल्या महिन्यात का?
विषय कळल्यावर प्रयत्न करता येतील यात खेळायचा.

हा एक अत्यंत गोड व मधुर छंद आहे ,मग लवंगलता हे नाव का दिल असेल? याचा विचार करते आहे.

मीनल.

वा

वा पंत..!

आत्ताच हा लेख चाळला... आता जरा टाईम भेटला की ष्टडी करून लागतो या छंदाच्या पाठीमागे! Smile

आपला,
(ष्टुडंट) तात्या.

हो का?

मस्त आहे हो...

गंमत

गंमत माहित्येय?
"राणी माझ्या मळ्यामंदी घुसशिल का?"
या गाण्याचा छंद (बराचसा) लवंगलताच आहे!

----------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !