राजयोग - २२

Primary tabs

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
24 Jul 2020 - 12:38 pm

राजयोग - २१

***

नक्षत्ररायचा छत्रमाणिक्य या नावाने मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याच्या खजिन्यामधे फार थोडे धन शिल्लक होते. प्रजेचं सर्वस्व लुटून मुघल सैनिकांना त्यांचा ठरलेला मोबदला देऊन परत पाठवाव लागलं. कठीण दुष्काळ आणि दारिद्र्य सोबत घेऊन छत्रमाणिक्य शासन करू लागला. चारी बाजूंनी फक्त आरोप प्रत्यारोप आणि आक्रोशच ऐकू येऊ लागला.

ज्या ज्या गोष्टींशी गोविंदमाणिक्यांच्या आठवणी निगडीत होत्या, ती प्रत्येक गोष्ट आपला तिरस्कार करते असं नक्षत्रला वाटू लागलं. मग ते गोविंदमाणिकयांचे सिंहासन असो, त्यांची शय्या असो कि त्यांचे विश्वासू सेवक. एखाद्या तणाचे बीज जसे जमिनीत आपली मुळे घट्ट रोवून पसरत जाते तशीच ही तिरस्काराची भावना हळूहळू नक्षत्रच्या मनात रुजू लागली. दिवसागणिक ती भावना त्याला असह्य होऊ लागली. गोविंदमाणिक्यांची आठवण करून देतील अशा गोष्टी आपल्या नजरेसमोरही येणार नाहीत याची तो कटाक्षाने काळजी घेऊ लागला. त्यांच्या नेहमीच्या वापरायच्या वस्तू नष्ट केल्या, त्यांच्या विश्वासू, जवळच्या सेवकांना त्याने सेवेतून काढून टाकले. गोविंदमाणिक्यांचे कुणी नावही उच्चारलेले त्याला सहन होत नसे. कुणी त्यांचा विषय काढला की ते आपल्यालाच टोमणे मारत आहेत असे त्याला सतत वाटू लागले. आपल्याला राजा म्हणून मानसन्मान देत नाहीत ही भिती वाढतच गेली. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. रागाच्या भरात राजसभेमध्ये कधीही विनाकारण आकांडतांडव करू लागला. त्याच्या या वागण्याला सगळे सभासद वैतागले होते. राज्यकारभार कसा करावा याची त्याला यत्किंचितही माहिती नव्हती, पण कुणी त्याला सल्ला द्यायला आलं की चिडून म्हणत असे, “मला काय एवढंही कळत नाही का? मूर्ख समजता का मला?”

छत्रमाणिक्यला वाटे, आपण या सिंहासनावर बसायला नालायक आहोत, भावाला लुबाडून राज्य मिळवलं असंच सगळ्यांना वाटत असेल. ही कमीपणाची भावना त्याच्या मनात इतकी रुजली की तो नको तिथे आपले शक्तिप्रदर्शन तो करू लागला. मीच इथला राजा आहे, माझी इच्छाच अंतिम असेल हे सिद्ध करण्यासाठी त्याने अपात्र व्यक्तींना मोठ्या पदांनी भूषविले, तर पात्र व्यक्तींना सेवेतून काढून टाकले, ज्यांना मृत्यूदंड देणे योग्य नव्हते,त्यांना मृत्यूदंड दिला. एकीकडे प्रजा दुष्काळामुळे हैराण झाली होती, दिवसेंदिवस लोक मृत्युमुखी पडत होते तर दुसरीकडे छत्रमाणिक्यच्या नाचगाण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या मैफिलींना अंत नव्हता. याआधी कुठल्याही राजाने सिंहासनावर बसल्यावर आपल्या अधिकाराचे पंख पूर्णपणे फैलावून अशी अद्भुत लीला केली नव्हती.

प्रजा नाराज होऊ लागली,सगळीकडे या विचित्र परिस्थितीच्या चर्चा होऊ लागल्या. छत्रमाणिक्यचा अजूनच जळफळाट होऊ लागला. त्याला वाटलं हे सगळं फक्त आपला धिक्कार करण्यासाठीचं निमित्त आहे. प्रजेची नाराजी वाढेल अशाच गोष्टी तो जाणूनबुजून करू लागला. प्रजेवर अत्याचार करू लागला. दडपशाही करून सगळ्यांची तोंडं बंद करू लागला. सगळया राज्यात एखाद्या भयाण रात्रीसारखी शांतता पसरली. कधीकाळी शांत स्वभावाचा नक्षत्रराय छत्रमाणिक्य झाल्यावर असं काही वागेल, यात खरंतर आश्चर्य वाटेल असं काहीच नव्हतं. कमकुवत मनाच्या लोकांना सत्ता मिळाली की ते बरेचदा असेच ताळतंत्र सोडून वागतात.

रघुपतीचं काम पूर्ण झालं होतं. या संपूर्ण घटनाक्रमात त्याच्या मनातली सुडाची भावना कायमच तीव्र होती असेही नाही. हळूहळू ती भावना निवळली होती, फक्त हातात घेतलेलं काम तडीला न्यायचंच या एकाच ध्यासाने तो पछाडला होता. किती डावपेच खेळून, अनेक अडचणी-संकटांचा सामना करून रात्रंदिवस ज्या गोष्टीचा ध्यास घेतला, ती पूर्ण झाल्यावर त्याला त्या यशाची नशा चढली. त्याचा संकल्प पूर्ण झाला. आता त्याला कुठल्याही बाह्य सुखाची आवश्यकता नव्हती.

रघुपती मंदिरात गेला. तिथे चिटपाखरूही नव्हतं. जयसिंह आता नाही हे त्याला चांगलंच ठाऊक होतं, पण मंदिरात प्रवेश करताना त्याला या गोष्टीची पुन्हा नव्याने जाणीव झाली. कधी वाटायचं की जयसिंह इथेच कुठेतरी असेल, मग पुन्हा लक्षात येत असे की तो नाही. वाऱ्याच्या झोताने दारं उघडली, त्यानं मोठ्या आशेने मागे वळून पाहिलं, पण जयसिंह आला नाही. मंदिराच्या मागे ज्या घरात जयसिंह राहत असे, तिथे तो कदाचित असेल असं त्याला वाटलं. तरीही रघुपतीचं त्या घरात जायचं धाडस झालं नाही, आपण तिथे गेलो आणि तो तिथे नसला तर! त्याला ही कल्पना असह्य वाटू लागली.

शेवटी जेव्हा संध्याकाळचा अंधार दाटू लागला, तेव्हा रघुपती सावकाश जयसिंहाच्या घरात गेला. कितीतरी काळापासून बंद असलेल्या त्या घरात एखाद्या समाधीमंदिरासारखी शांत निस्तब्धता पसरली होती. एका कोपऱ्यात एक लाकडी संदूक आणि तिच्या बाजूला जयसिंहाच्या धुळीने माखलेल्या खडावा पडल्या होत्या. भिंतीवर जयसिंहाने स्वतः काढलेलं कालीमातेचे चित्र होतं. पूर्वेकडील कोपऱ्यात एक पितळी दिवा धातूच्या खांबावर ठेवलेला होता. गेल्या वर्षभरापासून तो दिवा कुणी पेटवला नव्हता. कोळ्यांनी विणलेल्या जाळ्यांमध्ये तो कुठेतरी हरवून गेला होता. खांबाला लागून असलेल्या भिंतीवर दिव्याच्या ज्योतीचा काळा डाग पडला होता. या काही गोष्टी सोडल्या तर त्या घरात बाकी कशाचंही अस्तित्व नव्हतं. रघुपतीने एक दीर्घ, खोल निश्वास सोडला. त्या नि:श्वासाचासुद्धा त्याला प्रतिध्वनी ऐकू आला. हळूहळू अंधारात सगळं जग बुडून गेलं. काहीही दिसायचं बंद झालं. भिंतीवर कुठेतरी एक पाल तेवढी अधूनमधून चुकचुक करू लागली होती. थंड हवेचा झोत उघड्या दारातून आत आला आणि संदुकीवर बसलेला रघुपती थंडीने गारठला.

अशाप्रकारे त्या निर्जन मंदिरात रघुपतीने कसातरी एक महिना घालवला. पण हळूहळू एकटेपणा त्याला खाऊ लागला. पौरोहीत्य सोडून तो राजसभेत पोचला. राज्यकारभारात हस्तक्षेप करू लागला. छत्रमाणिक्यच्या नावावर अन्याय,अत्याचार आणि अनागोंदी राज्य करीत होती. त्याने राज्यात पुन्हा सुव्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरु केले. छत्रमाणिक्यला राज्यकारभाराविषयी वेळोवेळी योग्य सल्ले देऊ लागला.

त्याची अशी लुडबुड सहन न झाल्याने छत्रमाणिक्य चिडून म्हणाला, “ठाकूर, राज्यकारभार कसा करायचा तुम्हाला काय माहीत? या सगळ्या गोष्टी तुमच्या बुद्धीच्या पलिकडच्या आहेत.”

राजाचं धाडस पाहून रघुपती अवाक झाला. त्याला खात्री झाली, आता तो पूर्वीचा नक्षत्रराय राहिलेला नाही. दिवसेंदिवस दोघांमध्ये खटके उडू लागले. छत्रमाणिक्यला वाटायचं, रघुपती समजतो फक्त त्यानेच नक्षत्रला राजा बनवलं. रघुपती नजरेसमोरही आला तर त्याचा तिळपापड होऊ लागला.

शेवटी एक दिवस स्पष्टपणे रघुपतीला म्हणाला, “ठाकूर, तुम्ही आपलं मंदिराचंच काम बघा. राजसभेत तुमची काही आवश्यकता नाही.”

रघुपतीने नक्षत्ररायवर जळजळीत कटाक्ष टाकला. थोडासा ओशाळलेला नक्षत्रराय मान खाली घालून तिथून निघून गेला.

***

गोविंदमाणिक्य यात्रा करीत रामूच्या दक्षिणेला राजाकूलजवळ असलेल्या मग (त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल मधील मंगोलियन समाजाशी साधर्म्य असलेली एक जमात) जमातीच्या किल्ल्यापर्यंत पोचले. आराकानच्या राजाची परवानगी घेऊन ते तिथेच राहू लागले.

गावातली सगळी लहान मुलं उत्सुकतेने गोविंदमाणिकयांजवळ गोळा झाली.त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांनी किल्ल्यातच एक मोठी शाळा सुरु केली. ते स्वतः त्यांना शिकवत, त्यांच्याशी खेळत, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर रहात, मुलं आजारी पडली तर त्यांची शुश्रुषाही करीत. एखाद्याला वाटेल की ही सगळी मुलं स्वर्गातून आली असतील, किंवा कुणा देवीदेवतांची ती दूत असतील. पण या मुलांमध्ये मनुष्य आणि दानवांच्या गुणांची बिलकुल कमतरता नव्हती. स्वार्थ, क्रोध, लोभ, द्वेष, हिंसा सगळेच गुण त्यांच्यात पुरेपूर उतरले होते. त्यात भर म्हणून घरातही चांगलेच संस्कार होतील अशी काही खात्री नव्हती. त्यामुळे माघांच्या किल्ल्यात, लहानग्या मगांचा राज्यकारभार सुरु झाला. किल्ल्यात जणूकाही वायूची एकोणपन्नास रूपं आणि चौसष्ट भुतं एकत्र नांदू लागली. मोठ्या धीराने गोविंदमाणिक्य जे साधन उपलब्ध होईल त्यातून या मुलांमध्ये माणूस घडवू लागले. आयुष्य ही प्रत्येकाला मिळालेली केवढी मोठी देणगी आहे. या देणगीचं पालनपोषण करून तिचं रक्षण केलं पाहिजे हा एकच ध्यास गोविंदमाणिक्यांच्या मनात होता. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचीच सर्वप्रकारे प्रगती व्हावी, मनुष्यजन्म मिळाल्याचं सार्थक व्हावं या एका स्वप्नापोटी ते झटत होते. त्यांच्या आयुष्याचं आता तेच ध्येय बनलं. त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले, अपमान सहन करावा लागला तरी त्यांना त्याची चिंता नव्हती. कधीकधी मात्र त्यांना असं वाटे की त्यांचे प्रयत्न कमी पडतायत, बिल्वन असता तर त्याने या चांगल्या कामाला मनापासून हातभार लावला असता.

काही दिवसांपूर्वी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला ध्रुव ते मागे ठेवून आले होते. आता मात्र तेच गोविंदमाणिक्य इथे शेकडो ध्रुवांच्या सहवासात रमले होते.

***

क्रमश:

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

24 Jul 2020 - 1:22 pm | श्वेता२४

पुढे काय घडणार याची उत्सुकता आहे.

प्रचेतस's picture

24 Jul 2020 - 4:09 pm | प्रचेतस

ओघवता अनुवाद.
रविंद्रनाथांच्या लेखणीतले सामर्थ्य वादातीत आहे.

अभिरुप's picture

25 Jul 2020 - 9:47 pm | अभिरुप

पुन्हा एकदा सुंदर लेखन. पु. भा. प्र.

अनिंद्य's picture

26 Jul 2020 - 10:23 pm | अनिंद्य

उत्तम !
पु. भा. प्र.