रंगराज्य -३ सौ शहरी, एक संगमनेरी

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
21 Jul 2020 - 10:23 am

मागिल एका लेखावर मित्राची प्रतिक्रिया होती "संगमनेर च्या मातीचा हा गुणच म्हणावा की काय जणू एखाद्या साहित्यिकाने त्याच्या शब्द संपदेच्या रक्ताने ही भूमी जणू काही हजारो वेळा शिंपडून तृप्त केली असावी त्यामुळेच तर तिथल्या गल्लीबोळात बालपण जगलेल्या तुमच्या सारख्या मित्रांकडून अशी काही साहित्यिक मेजवानी अनुभवावयास मिळते की....लाजवाबच....खूप सुंदर..."

तसं "कला" प्रकरण घरचंच, वडीलांनी हाती ब्रश धरायचं सोडुनही वीस हुन अधिक वर्ष झाली असतील पण शैक्षणिक क्षेत्रात असताना १९८७ ची स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सव त्यानंतर किल्लारी भुकंपा सिरीजचे लाईफ साईज ऑईल पेंटींग्ज अजुन जसेच्या तसे डोळ्यासमोर आहेत. ही चित्रकला माझ्यापर्यंत जरी झिरपली नाही तरी आईसोबत स्टुडिओ अन् आऊटडोअर करुन लेन्समागची नजर मात्र आली. .

त्या काळातले शाळाबाह्य उपक्रम म्हणजे रंगारगल्लीत रणजीत च्या मैदानावरचे मैदानी खेळ . तिथं जातीनं हजर असायचे ते राजाभाऊ अवसक. राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय पदाधिकारी आहेत बहुदा आता राजाभाऊ. मोठ्या सुटीत गीता परिवाराचे बाल संस्कार वर्ग असायचे अन् या वर्गांवर दिवसभर सजग नजर असायची ती संजयभाऊ मालपाणी यांची. वाचन, पाठांतर, सामान्य ज्ञान, गटचर्चा, निबंध लेखन हे सगळं नववी दहावीला Competition Success Review वाचायला सुरु करण्याच्या कैक अगोदरपासून करत होतो. पेटीट शाळेत होणारी कवी अनंत फंदी व्याख्यानमाला ही आणखी एक शाळा. . प्रा. शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर ही नाव, व्यक्ती अन् त्यांचे शब्द वयाच्या दहाव्या वर्षातच ऐकायला मिळालेत. .

डॉ सोमनाथ मुटकुळेंनी शाळेच्या गॅदरिंगमध्ये बसवण्यासाठी एकांकिका लिहुन दिल्या, बसवुन घेतल्या. एका वर्षी तर आमच्या अतुल कासटच्या मागे लागुन नाटकात वापरायला खर्‍याखुर्‍या तलवारी पैदा केल्या अन् नंतर मुख्याध्यापकांच्या शिव्या खाल्या. हे असं पडी पडायचे योग वारंवार यायचे अन् बहुसंख्य वेळा विरोधी पार्टीत असायचे सेमच शाळेत शिक्षक असलेले पितामह. शाळादेखील पुरकच राहिलीय या घडवणुकीत. सगळ्यात हौशी होते ते विज्ञानाचे शिक्षक विजय कोडूर. . पाठ्यपुस्तकाबाहेरचे संदर्भ, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे दौरे अन् काय काय.

हे सगळं अगदी फार काही जगावेगळं असं काही नसलं तरी जगण्याची बीज मात्र रुजली.©

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 8:12 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त लिहिलंय !
आपले ते दिवस आयुष्य घडवणारे असतात, ज्या वेळी मोठी माणसे आपल्याला ऐकायला मिळतात !
तुमच्या बाबतीत तर प्रा. शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर असे दिग्गज ऐकायला मिळाले हे भाग्यच म्हणायचं !

vcdatrange साहेब, तुमचे आणखी लेखन नक्की आवडेल,
पुलेशु.