अवेळीचा पाहुणा .

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
20 Jul 2020 - 10:22 am

अवेळीचा पाहुणा

सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायची सवय असणाऱ्या स्वरूप ने आपल्या बेड शेजारील टेबल वरच्या नोटपॅड वर लिहिलेल्या नोंदिकडे परत एकदा अगदी शेवटची नजर टाकली.
एक ,दोन ,तीन असे इंग्रजीत आकडे लिहून त्या पुढे इंग्रजीत सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या यादीत काही विसरले तर नाही ना ? याची खात्री करून घेतली.
बाहेरचा मुख्य दरवाजा नीट लावला होता. बाहेरच्या दरवाज्यावर उद्या दुध नको अशी चिठ्ठी लिहिली होती.घरातील सगळे नळ नीट बंद केले होते. उगाच एखादा नळ चालू राहिला तर त्याच्या आवाजाने शेजारच्या सदनिकेतील कोणी ठणाणा करत येऊ नये. आता संध्याकाळचे सात वाजले होते. उद्या कमीत कमी दुपारचे १-२ पर्यंत तरी कोणीही येऊन बेल मारू नये अशी काळजी त्याला घ्यायची होती. बाहेरच्या जेवायच्या टेबलावर त्याने चिट्ठी लिहून ठेवली होती. त्याच्या आई वडिलांसाठी. ते तिकडे दूर सांगलीला होते. पण हे सगळे झाले म्हणजे ते येणारच ..त्यांना काहीही त्रास नको व्हायला. ..पाण्याचा ग्लास बेड शेजारी होताच. ..मोबाईल बंद केला होता.
बाहेरचा दिवा बंद करायचा . बरोबर रात्री ९ वाचता ,शेजारच्या बाटलीतील सगळ्या झोपेच्या गोळ्या खायच्या आणि शांत पणे झोपेच्या आधीन व्हायचे .. परत कधीही न उठण्यासाठी . आपले मृत्युपत्र करून त्याने आपल्या कपाटात सहज सापडेल असे ठेवले होते.
हे असे काही तो करेल हे त्याचे त्याला सुद्धा खरे वाटत नव्हते. चांगली IT मध्ये नोकरी होती. स्वताः चा २ बेडरूम चा फ्लॅट होता ,गाडी होती ..खूप पैसे मिळत होते पण एकाएकी त्याची कंपनी बंद पडली . त्याची नोकरी गेली. गेले सहा महिने तो नोकरी हुडकत होता. पण सगळी कडे नन्नाचा पाढा.त्याचे सगळे सेविन्ग्स संपत आले होते. पुढच्या महिन्याचा या फ्लॅट चा EMI त्याला भरता येणार नव्हता. आई वडिलांनी येव्हडे कष्ट करून शिकवले पण हा असा बेकार ..काय म्हणतील ते ?
जग काय म्हणेल ? ...या फ्लॅटचा हप्ता ..गाडीचा हप्ता तो कसा काय भरणार होता ? विचार करून त्याचे डोके फुटायची वेळ आली होती. शेवटी खूप विचार करून त्याने हा मार्ग निवडला. आत्महत्या. हा एकच मार्ग आता त्याच्या पुढे होता. तो भेकड नव्हता . असहाय होता. पूर्ण विचारांती हा निर्णय होता. त्याला त्याच्या आवडत्या Star Treak मालिकेतील एक वाक्य आठवले …
“Highly illogical decision logically arrived at …”
त्याही अवस्थेत त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मितहास्य आले.
सगळी तयारी झाली होती. त्याने घड्याळात पाहिले. संध्याकाळचे ७ वाजत होते. त्याने झोपेच्या गोळ्यांचे झाकण उघडले.भरपूर गोळ्या आहेत कि नाहीत याची खात्री करून घेतली. आता त्याला फक्त २ तास काढायचे होते. दिवाणखान्यात जाऊन दूरदर्शन वर कुठली तरी सिरिअल पहावी असा विचार करून तो उठला . तेव्हड्यात त्याच्या दाराची बेल कुणीतरी वाजवली.
“ आता या अवेळी कोण आले ? ..” असे म्हणत तो दरवाजा न उघडता तसाच उभा राहिला. कोण असेल ते बेल वाजवून जाईल असे त्याला वाटले. तो बेकार झाल्यापासून त्याच्या मित्र म्हणवणाऱ्या सगळ्यांनी त्याच्या कडे यायचे बंद केले होते. याचे रोजचे रडगाणे काय ऐकत बसायचे ? आणि पार्ट्या करायला स्वरूप कडे पैसे कुठे होते?
पण परत एकदा बेल वाजली . स्वरूप आता दिवाणखान्यात जाऊन उभा राहिला.
दिवा बंद करावा का ? म्हणजे जे असतील ते निघून जातील . पण बाहेर जो कोणी असेल त्याने दिवा पाहिला असणार . तो पायांचा आवाज न करता दारापाशी गेला आणि eye hole मधून बाहेर पाहिले. बाहेर एक कोणी तरी अनोळखी मुलगा उभा होता. त्याच्या हातात एक वही होती आणि गळ्यात एक पिशवी होती. थोडेफार बोलून याला लवकरात लवकर कटवले पाहिजे असे विचार करून दार न उघडताच स्वरूप म्हणाला ,
“ कोण आहे ? मला आत्ता काहीही विकत घ्यायचे नाही ..”
“ काका ..मी अरुण रामचंद्र जुन्नरकर. पलीकडे असलेल्या विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी आहे. दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास म्हणून आमच्या रेगे सरांनी आम्हाला काही वस्तू विकायला सांगितल्या आहेत. काही पुस्तके आहेत ..उदबत्या आहेत ..मेणबत्या आहेत ..फेस पावडर आहे ...तुम्ही फक्त बघा...माझ्याकडे माझे ओळख पत्र पण आहे ..मी फार वेळ घेणार नाही तुमचा …” तो मुलगा अगदी गडबडीने बोलत होता ..बहुदा अनेक ठिकाणी असा संवाद त्याने केला असावा. दरवाजा न उघडण्याचा अनुभव त्याला बऱ्याच ठिकाणी आला असावा.
गेल्या सहा महिन्यात नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी नकार मिळल्याने नकार घेतल्यावर काय वेदना होतात याची त्याला कल्पना होती. स्वरूपला या मुलाबद्दल जरा आत्मीयता वाटली. त्याने जरा नाखुषीनेच दरवाजा उघडला . तो मुलगा बाहेरच उभा होता. तपकिरी रंगाची फुल पॅन्ट आणि नीट खोचलेला पांढरा शर्ट. त्यावर त्याच्या शाळेचा लोगो सुद्धा होता. आपल्या गळ्यात अडकवलेले ओळखपत्र स्वरूप कडे करत तो मुलगा मोठ्या अदबीने म्हणाला ,
“ धन्यवाद काका ,दरवाजा उघडल्याबद्दल ..हे माझे ओळख पत्र.”
“ असे दे ..ये आत ..”
तो मुलगा आपल्या चपला बाहेरच काढून आत आला. तो बराच दमलेला दिसत होता.
“ काय रे ..पळत आलास कि काय ?”
“ नाही काका ..तुमची लिफ्ट बंद आहे ..त्या मुळे जिना चढून आलो.”
“ अरे बाप रे ! तू पाच जिने चढून आलास ? थांब तुला पाणी देतो ..”
स्वरूप ने त्याला पाणी दिले. त्याच्या आईची शिकवण. घरी कोणीही आले तरी पहिल्यांदा त्याला पाणी द्यायचे. आईच्या ,वडिलांच्या आठवणीने त्याला एकदम गलबलून आले.
“ हे बघ अरुण मी जरा गडबडीत आहे ..आणि मी तुला सांगितले तसे मला आत्ता तरी काहीही विकत घ्यायचे नाही ..” स्वरूप गडबडीने म्हणाला . या मुलाला लवकरात लवकर जायला सांगायला पाहिजे.
“ हो काका ..मला तुम्ही ते मघाशीच सांगितले आहे. पण आमच्या रेगे सरांनी सांगितले आहे कि वस्तू विकल्या नाहीत तरी चालतील पण त्या फक्त दाखवून आलास तरी चालेल मग मला माझ्या वहीत तुमचे नाव आणि पत्ता नोंद करता येईल .”
“ बर दाखव ..पण पटकन दाखव ..मला काम आहे ..”

अरुणने मग आपल्या पिशवीतून काही पुस्तके ,उदबत्या , मेणबत्या ..पावडर अश्या चार पाच वस्तू काढून दाखवल्या. त्या दाखवताना तो त्या कश्या चांगल्या दर्जाच्या आहेत आणि सगळ्यांना त्या कश्या आवडतात ..असे वर्णन सुद्धा तो करत होता. स्वरूप ला त्याची ही योग्य शब्दात सांगायची पद्धत आवडली. स्वरूप स्वतः अनेक ठिकाणी presentation करत असल्याने कमी शब्दात आपल्याला काय सांगायचे आहे हे सांगणे किती महत्वाचे आहे याची त्याला कल्पना होती.
“ हे असे दारोदार वस्तू विकायचे तुला कुणी आणि कश्यासाठी सांगितले ?सगळ्याच मुलांना सांगितले आहे का ? ..” स्वरुपने थोड्याश्या कुतूहलाने विचारले .
“ आमच्या शाळेच्या रेगे सरांनी . ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. दिवाळीच्या सुट्टीत अशी बरीच कामे त्यांनी आम्हा मुलांना सांगितली आहेत ..”
“ काय काय कामे सांगितली आहेत .?”
“ ह्या वस्तू विकायच्या. त्याचा योग्य हिशोब ठेवायचा ..तीन किवा चार वेळा बँकेत जाऊन वडिलांचे पैसे भरायचे ..चेक भरायचा ..बाजारात जाऊन भाजी विकत आणायची ..एखाद्या दुकानात जाऊन घरी नेहमी लागतात त्या वस्तू विकत आणायच्या ..”
“ अरे वा ! फारच छान ..म्हणजे तुम्हा मुलांना बाहेरच्या जगाची ओळख होते. समाजात कसे वागावे हे समजते ..फार सुंदर कल्पना आहे ही..”
स्वरूपला त्याही अवस्थेत ही कल्पना आवडली. भेटायला हवे या रेगे सरांना एकदा. मग एकदम त्याला लक्षात आले कि आता केव्हा भेटणार तो रेगे सरांना ? अश्या किती तरी गोष्टी करायच्या राहून जाणार ..
“ असू दे आता. ठेऊन दे या सगळ्या वस्तू .”
“ हो काका ..तुम्ही काही तरी घेतले असते तर बरे झाले असते. या मेणबत्या तरी घ्या. इथले दिवे सारखे जातात ..तुम्हाला उपयोगी येतील ..”
“ अरे अरुण ..मी नको म्हणालो ना ? मग नकोत .आणि तसा माझ्याकडे इन्व्हर्टर आहे. “ स्वरूप जरा तिसडेपणे म्हणाला.जात का नाही हा मुलगा ?
अरुण ने त्या सगळ्या वस्तू नीट उचलून आपल्या पिशवीत ठेवायला सुरुवात केली . स्वरूप ला एकदम शरमल्या सारखे झाले. पण या वस्तू घेऊन आता काय करणार होता तो ?
“ काय रे अरुण ..माझ्यासारखे वस्तू न घेणारे तुला भेटत असतीलच ना ? मग तुला वाईट वाटत नाही ? आमचा राग येत नाही ?”
“ काका ..मी जेव्हा पहिल्यांदा या वस्तू विकायला सुरवात केली ..तेव्हा अगदी पाहिल्याच दिवशी भरपूर वस्तू विकायच्या असा निश्चय करून मी बाहेर पडलो ..तेव्हा एका सोसायटीच्या रखवालदाराने मला आतच येऊ दिले नाही. वस्तू विकायचे तर दूरच. मग मी तसाच घरी गेलो ..किती तरी वेळ रडतच होतो मी. मग आईने माझी समजूत काढली आणि मला परत त्याच सोसायटीत जाऊन पुन्हा दुसरे दिवशी प्रयत्न करायला सांगितले.”
“ मग काय झाले ..किती वस्तू विकल्यास ?”
“ काही ही नाही ..पण मी सोसायटीच्या सेक्रेटरी ना भेटून त्यांची परवानगी मिळवली. आणि ३ सदनिकेपर्यंत पोचू शकलो .”
“ त्या लोकांनी काहीच घेतले नाही ?”
“ दोघांनी आम्हाला काहीही नको असे दरवाजा न उघडताच सांगितले आणि एका आजोबांनी दरवाजा उघडला पण माझे सगळे ऐकून न घेताच मला काहीही नको असे म्हणून दरवाजा धाडकन बंद केला ते खूप वैतागलेले होते ..”
“ अरे रे ..मग तू काय केलेस ?”
“ त्या दिवशी सुद्धा मी खूप रडलो .. माझ्या तोंडावर हे लोक दरवाजा कसा काय बंद करतात? मी काही भिकारी होतो का ? भिकारी लोकांशी सुद्धा असे वागू नये. मला तो अपमान सहन झाला नाही मग मी आमच्या रेगे सरांना भेटलो. अगदी रडतच त्याना माझा अपमान सांगितला . मी एव्हडा वर्गात पहिला येणारा मुलगा ...माझ्याशी लोकानी असे वागावे ?”
“ मग तुझे हे रेगे सर काय म्हणाले ?” स्वरुपने उत्सुकतेने विचारले .
“ ते माझ्या जवळ आले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले .. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव . ते तुला हाकलून घालत नाहीत ..तू विकणाऱ्या वस्तूंना हाकलत असतात. त्यांना तू नको असतोस असे नाही ..त्यांना तू विकणाऱ्या वस्तू त्या वेळी नको असतात. तू चुकीच्या वस्तू चुकीच्या माणसाना तरी विकत असतोस किवा त्या चुकीच्या वेळी तरी विकत असतोस. तुला वाईट वाटायचे काहीच कारण नाही ..अपमान झालाच असेल तर त्या वस्तूंचा ..तुझा नाही …आणि हे बघ . विक्री कारणे ही एक कला आहे. ती कष्टपूर्वक आत्मसात करावी लागते. तेव्हा ही कला शिकताना तू किती वस्तू विकल्यास हे महत्वाचे आहेच पण तू जिथे त्या विकू शकला नाहीस तिथे तू का विकू शकला नाहीस? हे समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. ”
स्वरूप एकदम अंतर्मुख झाला. म्हणजे त्याला नोकरी साठी अनेक ठिकाणाहून नकार आला तो त्याला नव्हताच . त्याच्या कडे जे कौशल्य आणि अनुभव होता तो त्या कंपन्यांना आत्ता या वेळी नको होता . इतकाच त्याचा अर्थ. माझा अपमान झाला ..मला ते कसे काय नकार देऊ शकतात? असे समजून त्याने जो आपला इगो दुखावून घेतला होता तो एक तद्दन बावळटपणा होता .आपण या सर्व अनुभवातून काय शिकलो ? याचा त्याने विचारच केला नव्हता. त्याचे बाबा नेहमी सांगत असत . पराजय हा खूप मोठा गुरु आहे. त्याला एकदम लक्षात आले. उपदेश लक्षात ठेवणे सोपे असते पण ..योग्य वेळ येताच तो अमलात आणणे फार अवघड असते.
“ मला खूप बरे वाटले आणि एका नव्या उमेदीने मग मी वस्तू विकायला सुरवात केली …. चार पाच दिवसात मी खूप फिरलो आणि पाचव्या दिवशी दोन पुस्तके विकली...मला खूप आनंद झाला.” अरुण पुढे सांगत होता.
स्वरूप ने आता या मुलाकडे जरा नीट निरखून बघितले . किडकिडीत शरीरयष्टी , सावळा रंग ,एका बाजूला नीट विंचरलेले केस ..१३/१४ वर्षाचे वय. पण एक चमक त्याला या मुलात जाणवली . इतकावेळ उभाच असलेला स्वरूप आता सोफ्यावर बसला . अरुणचे सगळे सामान आता भरून झाले होते.
स्वरूपच्या लक्षात आले. हे रेगे सर या मुलांना नकार कसा पचवायचा याचे शिक्षण देत होते. आणि तेही नुसते पुस्तकी नव्हे ..जळजळीत अनुभवातून. हेच स्वरूपला आत्मसात करायची गरज होती.
“ तुझे आई वडील काय करतात?” स्वरुपने जरा कुतूहलाने विचारले.
“ माझे वडील रिक्षा चालवतात. आई ३,४ ठिकाणी पोळ्या करायचे काम करते . तुमच्या घरी कोणी बाई माणूस नाही का ? त्यांना माझ्याकडची ही पावडर आवडली असती ..”
“ नाही रे ..माझे अजून लग्न झाले नाही .”
“ तुम्हाला पोळ्या करायला कोणी हवे आहे का ? माझी आई फार सुरेख पोळ्या करते . ती तुमचा पूर्ण स्वयपाक सुद्धा करेल . .”
स्वरूपला गम्मत वाटली. हा मुलगा आपले प्रयत्न सोडत नव्हता.
“ अरे आमच्या कडे एक बाई येतात...पण मला एक सांग तू इतक्या ठिकाणी फिरतोस ..काही ठिकाणी तुझ्या वस्तू विकल्या जातात तर काही ठिकाणी नाही ..तुला वाईट वाटल्यावर तू आता काय करतोस ? मागच्या सारखा रडतोस ?”
अरुण आता जरा मोकळे पणे बोलायला लागला होता
“ नाही काका .आता मी रडत नाही . मी आता ही अडथळ्यांची शर्यत केली आहे ..”
स्वरूपला एकदम आश्चर्य वाटले .
“ म्हणजे काय रे ?”
“ म्हणजे काका ,आमच्या शाळेत मी बऱ्याच वेळा अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेतो . एकामागोमाग अडथळे पार करत जायचे ..सगळे अडथळे पार झाले कि मग ती शर्यत संपते. या वस्तू विकायच्या म्हणजे तसेच आहे. पहिल्यांदा सोसायटीत प्रवेश मिळवायचा ..मग आपण काय विकतो आहे हे सांगून दार उघडण्याची वाट पहायची ..मग घरात प्रवेश मिळवायचा ..मग आपल्या वस्तू दाखवायच्या ..त्या कश्या चांगल्या आहेत हे सांगायचे ..मग त्या विकायच्या. मी किती वस्तू विकल्या या पेक्षा आज मी किती अडथळे पार केले असा विचार करतो मग मला तेव्हडे वाईट वाटत नाही ..मी किती अडथळे पार केले ..यातच मी आनंद मानतो ..”
“ अडथळ्यांची शर्यत काय ? फार मस्त कल्पना आहे ..” स्वरूपला एकदम कुणी तरी आपल्याला अंगावर गार पाणी टाकून गाढ झोपेतून उठवते आहे असे वाटले .
Count your winnings… Process defining.आपल्याला हे नुसते वाचून माहिती आहे . हा मुलगा हे अमलात आणतो आहे.
“ अरुण तू कितवीत आहेस ?” स्वरुपने जरा कौतुकाने विचारले .
“ मी ८ वी क मध्ये आहे काका . आमची मराठी शाळा आहे ..अ आणि ब मध्ये खूप हुषार मुले आहेत मी पण माझ्या तुकडीत पहिला येतो. आमचे रेगे सर म्हणतात हा मुलगा माझ्या पेक्षा हुषार असे म्हणू नका ..मागच्या परीक्षे पेक्षा तुला जास्त मार्क पडलेत कि नाही ..हे बघा ..तुमची शर्यत तुमच्याशी असू द्या. ”

“ अरे वा ! या तुझ्या रेगे सरांना भेटायला पाहिजे . आणखी काय सांगतात हे सर? ..”
रेगे सर हा बहुतेक अरुणचा आवडीचा विषय असावा. त्याचा चेहरा एकदम उजळून निघाला
“ आमचे तर ते देव आहेत. काका तुम्ही नक्की त्यांना भेटायला या. त्यांना आवडते असे लोकांना भेटायला. पण माझे नाव सांगा बरका ?”
“ नक्की भेटेन .”
“ परवा काका एक गम्मत झाली . चार पाच दिवस मी बराच फिरलो पण माझी एक ही वस्तू विकली गेली नाही .. माझे काही तरी चुकते आहे हे समजून घ्यायला मी पुन्हा रेगे सरांकडे गेलो. त्यांनी मला मी काय काय करतो हे विचारले मग सगळे ऐकून झाल्यावर ते हसले आणि मला म्हणाले ‘ you did not put one foot inside the house ..’ मला इंग्रजी चांगले समजते बर का काका ..मला काही ते फारसे समजले नाही ...आणि मला काहीच समजले नाही हे लक्षात आल्यावर सर एकदम हसले .”
स्वरूप स्वतः MBA होता. इंजिनिअर होता . त्याला हे चटकन समजले पण या लहान मुलाला काय समजले आहे हे पाहण्यासाठी तो म्हणाला ,
“ मग रेगे सर काय म्हणाले ? ..”
“ ते म्हणाले . अरुण तू अनेक अडथळे पार करतोस पण या सगळ्यात महत्वाचा अडथळा ..म्हणजे तू घरात प्रवेश मिळवणे ..हे जर तुला जमले नाही तर बाकीचे अडथळे पार करून काही उपयोग नाही . आणि ते जर करायचे असेल तर त्या घरात कोण कोण राहतात ? ते केव्हा घरी असतात ? आणि त्यांना काय विकायचा प्रयत्न केला असता ते विकत घेऊ शकतात याचा अभ्यास केला पाहिजे ..आणि मग ते दार ठोठावले पाहिजे .. त्या लोकांना काही तरी फुकट दे. घरात बायका असतील तर , दोन पावडरचे डबे घेतले तर एक टिकल्यांचे पाकीट फुकट देईन असे काही सागितलेस तर दरवाजा उघडेल आणि तुला ताबडतोब तुझा उजवा पाय आत टाकता येईल ..मग तुला तुझ्याकडे जे आहे ते विकायची संधी तुला मिळेल ….”
“ वा ! फारच सुंदर प्रकारे त्यानी हे तुला समजावून सांगितले आहे..”
“ काका ..मला अजून सगळे हे समजले नाही ..पण मला एकदम लक्षात आले कि गणित सोडवताना ...बऱ्याच गणितात कसे असते ? ..त्यात एक महत्वाची स्टेप असते. ती जमली कि मग ते गणित लगेच सोडवता येते. अगदी तसेच . तुमचा घरात शिरकाव झाल्याशिवाय तुम्ही काहीही विकू शकत नाही.”
“ अगदी बरोबर समजले आहे तुला.”
“ ..काका तुमच्या कडे पुस्तके बरीच आहेत .. रणजीत देसाई चे स्वामी तुम्ही वाचले आहे का ? माझ्याकडे आहे ते . तुम्हाला देऊ का ते ? तुम्हाला नक्की आवडेल ..” अरुणने आपली चिकाटी सोडली नाही .
स्वरूप हसला .
“ दे. आणि तुझ्या कडे ते विवेकानंदांचे पुस्तक आहे ते सुद्धा दे.”
अरुणने मोठ्या आनंदाने ती पुस्तके दिली आणि आपल्या कडील बिल बुक काढून त्यावर बिल सुद्धा करून दिले . दारावरची पाटी वाचून त्यावर स्वरुपचे नाव सुद्धा लिहिले.

“ बैस जरा. मी पैसे घेऊन आलो.” असे म्हणून स्वरूप आत बेडरूम मध्ये आला. पाकीटा तून पैसे काढताना त्याचे लक्ष समोरील नोटपॅड कडे गेले. त्याला आपल्या पळपुटेपणाची लाज वाटली. हा इतका लहान मुलगा इतके नकार पचवून सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही आणि मी इतका उच्च शिक्षित असून मैदान सोडून पळून निघालोय ? एक नवी उर्जा त्याला मिळाल्यासारखे वाटले. मग त्याने शांतपणे आत्महत्येची ती चेकलिस्ट फाडून टाकली. त्याने एक दुसरी TO DO लिस्ट करायचे ठरवले . पहिल्या जागी असणार होते. “ रेगे सरांना भेटणे ..”
बाहेर येऊन त्याने अरुणला पैसे दिले. अरुण ने पुस्तके नीट टेबलावर ठेवली . त्यावर पावती पण ठेवली आणि तो दरवाज्याकडे वळला .
“ धन्यवाद काका ..अरे हो ..माझे कार्ड तुम्हाला द्यायचे राहूनच गेले . .. मी काही माझे कार्ड छापले नाही . पण माझ्या वहीच्या कागदाचे चार भाग करून त्यावर माझे नाव आणि पत्ता माझ्याच अक्षरात लिहिला आहे . आणि यात जो फोन नंबर आहे तो माझ्या बाबांचा आहे. .हे घ्या.” असे म्हणत अरुणने आपल्या वरच्या खिशातून वहीच्या कागदाचे चार पाच तुकडे काढले आणि त्यातील एक कागद त्याने आपल्या दोन्ही हातात धरला . मग तो कमरेत वाकला आणि मोठया अदबीने तो कागदाचा चिटोरा त्याने स्वरूपच्या पुढे धरला.
स्वरूप नोकरीत असताना त्यांनी किती जणांना आपले व्हिजिटिंग कार्ड दिले होते ,आणि किती तरी जणांचे स्वीकारले होते. खोटा खोटा आदर दाखवत ..अगदी कमरेपासून झुकून आपले दोन्ही हात पुढे करून ..
पण या मुलाचे ..ते वहीच्या एका चौकोनी तुकड्यावर बालिश अक्षरात ..अगदी मराठी अक्षरात लिहिलेले ते व्हिजिटिंगकार्ड घेताना त्याला जेव्हडा आदर वाटला तेव्हडा कधीच वाटला नव्हता. त्याने दोन्ही हात पुढे करून आपल्या हाताच्या ओंजळीत तो चिटोरा घेतला . अगदी खऱ्या खुऱ्या आदराने घेतला. मग तसाच तो आपल्या कपाळाला लावला .
मग अगदी अनावर झालेले आपले अश्रू आवरत स्वरूप ने त्या मुलाचा हात आपल्या हातात घेतला ... अगदी एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या प्रेसिडेंट चा हात हातात घ्यावा तसा ... आणि तो म्हणाला ,
“ it is a privilege to meet you sir…and I mean it.”
आपल्याला हे काका सर म्हणाले म्हणून असेल किवा स्वरुपने एव्हडा आदर दाखवला म्हणून असेल पण अरुण एकदम लाजला ..आणि जिन्याकडे वळला. भर भर जिना उतरून नाहीसा झाला .
स्वरूपला म्हणावेसे वाटले अरे ..तू कसला लाजतोस ? मीच लाजले पाहिजे. थोडे वाईट दिवस काय आले ..मी तर पळूनच जात होतो.
त्या मोकळ्या जिन्याकडे पहात स्वरूप किती तरी वेळ गेल्या १५ /२० मिनिटात घडलेल्या घटनेचा विचार करत निशब्द उभा राहिला. त्याला वाटले , हा अरुण नको त्या वेळीचा पाहुणा म्हणून आला खरा… पण , जाताना , माझ्या जीवनात अरुणोदय करून गेला .

*******************************************************

कथालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

20 Jul 2020 - 11:09 am | विजुभाऊ

सध्या बरेच जण या अवस्थेतून जात आहेत

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:23 am | Jayant Naik

हि गोष्ट मला या सध्याच्या परिस्थिती मुळेच सुचली. मला वाटते ती वेळ काही करून चुकवणे महत्वाचे असते.

सिरुसेरि's picture

20 Jul 2020 - 3:14 pm | सिरुसेरि

कथा आवडली . + १

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:23 am | Jayant Naik

आपला आभारी आहे.

शलभ's picture

20 Jul 2020 - 3:56 pm | शलभ

खुप छान कथा.
रेगे सरांना भेटले पाहिजे. :)

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:28 am | Jayant Naik

खरे तर असे अनेक रेगे सर आपल्या आजूबाजूला असतात. माझ्या मते जेव्हा गुरुजींचे मास्तर आणि मास्तर चे मास्तर्ड्या झाले तेव्हा पासून शिक्षणाचा पायाच खचतोय. असे अनेक रेगे सर पुन्हा यायला हवेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2020 - 4:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरेखच लिहिली आहे,
रेगे सरांना भेटणे मष्ट आहे
पैजारबुवा,

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:29 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल अतिशय आभार. आपला प्रतिसाद मला नेहमीच उत्तेजन देतो.

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2020 - 4:19 pm | संजय क्षीरसागर

सुरेख कथा लिहिलीयेस !

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:30 am | Jayant Naik

तुझे अनेक अनेक आभार.

king_of_net's picture

20 Jul 2020 - 4:21 pm | king_of_net

छान !!!

कधीकाळी ह्याच परीस्तीथीतुन गेलोय... रीलेट झालो.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:32 am | Jayant Naik

वाचकाला कुठे तरी भिडणारी कथा लिहिली जाणे हेच प्रत्येक लेखकाचे ध्येय असते. धन्यवाद .

जयन्त बा शिम्पि's picture

20 Jul 2020 - 5:41 pm | जयन्त बा शिम्पि

छान बोधप्रद कथा, मनापसून आवडली.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:37 am | Jayant Naik

आजकालच्या सर्व तरूण पिढीत हा एक महत्वाचा दोष मला दिसतो . नकार पचवता न येणे. जरा कमी मार्क मिळाले ..आपल्याला हवा तो मोबाईल मिळाला नाही ..बाईक मिळाली नाही ..हव्या त्या कंपनीत नोकरी मिळाली नाही ..ई.ई. अश्या किती तरी क्षुल्लक कारणानी आत्महत्या करणारे आपल्याला दिसतात ..यांना जर नकार पचवणे शिकवले तर ?

कानडाऊ योगेशु's picture

20 Jul 2020 - 9:53 pm | कानडाऊ योगेशु

कथा आवडली.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:38 am | Jayant Naik

आपले अनेक अनेक आभार.

सुचिता१'s picture

20 Jul 2020 - 11:04 pm | सुचिता१

खुप आवडली, रेगे सरांना भेटायला आवडेल.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:39 am | Jayant Naik

आता मला एक नवी कथा लिहायला लागणार . रेगे सरांना घेऊन .

रीडर's picture

21 Jul 2020 - 2:22 am | रीडर

छान कथा

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:40 am | Jayant Naik

आपले शतशः आभार.

श्वेता२४'s picture

21 Jul 2020 - 11:31 am | श्वेता२४

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव . ते तुला हाकलून घालत नाहीत ..तू विकणाऱ्या वस्तूंना हाकलत असतात. त्यांना तू नको असतोस असे नाही ..त्यांना तू विकणाऱ्या वस्तू त्या वेळी नको असतात. तू चुकीच्या वस्तू चुकीच्या माणसाना तरी विकत असतोस किवा त्या चुकीच्या वेळी तरी विकत असतोस. तुला वाईट वाटायचे काहीच कारण नाही ..अपमान झालाच असेल तर त्या वस्तूंचा ..तुझा नाही …
खरंच हे तत्वज्ञान म्हणावे अशा ओळी आहेत. प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी नकाराला सामोरा जातोच. पण या ओळी त्या नकारालही सकारात्मकतेने पाहायला शिकवतील. अप्रतीम कथा . खूप आवडली.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:50 am | Jayant Naik

आपण ज्या ओळी इथे परत लिहिल्या आहेत ..त्या या गोष्टीचा गाभा आहेत. थोडा वेगळा विषय आहे पण .. लोक तुम्हाला कधीच दुखवू शकत नाहीत . ते म्हणणे ऐकून तुम्हीच तुम्हाला दुखावून घेता. खूप पूर्वी मी एका हाताने ..डाव्या ..अधू असलेल्या माणसाला भेटलो होतो. मी भेटल्यावर हस्तांदोलना साठी त्याने आपला अधू हात ..डावा.. पुढे केला. माझी सहानुभूती मिळवण्याची त्याची ती युक्ती होती ..पण मुद्दा हा कि आपले व्यंग तो आपले हत्यार म्हणून वापरत होता .. तो रडत ,कुढत बसला नाही ..

चिगो's picture

21 Jul 2020 - 1:36 pm | चिगो

खुप सुंदर कथा लिहीली आहे. आवडली..

लिहीत रहा.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:51 am | Jayant Naik

नक्की लिहित राहीन ..तुम्ही असेच माझ्या गोष्टी वाचत रहा म्हणजे झाले.

सुबोध खरे's picture

21 Jul 2020 - 7:25 pm | सुबोध खरे

फारच सुंदर कथा आहे.

पराभवाकडे असे सकारात्मक रित्या पाहायला शिकले पाहिजे हेच खरे.

अशाच अनेक घरी आलेल्या मुलामुलींना घरातही न घेता मी बाहेरच पिटाळले आहे याची कुठे तरी लाज / खंत वाटते आहे.
निदान त्यांचे ऐकून घ्यायला हवे होते.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:54 am | Jayant Naik

खरे साहेब ..आपला अभिप्राय नेहमीच माझा हुरूप वाढवत आला आहे. आपण म्हणता ते खरे आहे ...आपण सर्वानीच थोडे जास्त संवेदनशील झाले पाहिजे .

अभिरुप's picture

21 Jul 2020 - 10:13 pm | अभिरुप

खुपच छान कथा. अरुण जुन्नरकर आवडला आणि रेगे सर सुद्धा.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:54 am | Jayant Naik

आपले अनेक आभार.

जेम्स वांड's picture

23 Jul 2020 - 9:44 am | जेम्स वांड

साधं सिम्पल अन सुटसुटीत लेखन पण अतिशय सकारात्मक अन कालानुरूप बोध. बोधकथा फक्त लहान पोरांना सांगायलाच असतात असे नाही, हल्लीच्या काळात "सर्व्हायव्हल"चा प्रश्न भेडसावणाऱ्या कितीतरी लोकांनाही त्याची गरज आहे अन तुम्ही ती उणीव खुबीने पूर्ण केलीत.

अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 9:57 am | Jayant Naik

माझ्या मते ती काळाची गरज आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

तेजस आठवले's picture

23 Jul 2020 - 11:28 am | तेजस आठवले

फारच सुरेख लिहिली आहे. अप्रतिम

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 2:24 pm | Jayant Naik

तेजस जी आपले आभार

राघव's picture

23 Jul 2020 - 12:41 pm | राघव

एक गोष्ट जे सांगू शकते, ते हजार पानांचे तत्वज्ञानाचे पुस्तकही कदाचित नाही सांगू शकणार! आवडलं. धन्यवाद! :-)

मला अशा परिस्थितीत नेहमीच "बेडर" आठवतो. त्याची ही छोटी ओळख खूप आधी लिहिली होती. विषयाला अनुरूप वाटले म्हणून येथे दिले.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 2:26 pm | Jayant Naik

गोष्टी आपल्याला किती तरी शिकवतात. आपला बेडर लेख वाचला. खरच स्फूर्ती दायक आहे. आणि तुम्ही लिहिले सुद्धा मस्त आहे.

परिंदा's picture

23 Jul 2020 - 12:50 pm | परिंदा

फारच सुंदर!!

यश राज's picture

23 Jul 2020 - 2:11 pm | यश राज

सुंदर लिहिली आहे.

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 3:51 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

अप्रतिम लिहिलेत नाईकसाहेब.
आवडले

Jayant Naik's picture

23 Jul 2020 - 3:52 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार

मूकवाचक's picture

23 Jul 2020 - 5:27 pm | मूकवाचक

+१

Jayant Naik's picture

24 Jul 2020 - 8:55 am | Jayant Naik

मुकवाचक आपले आभार .

Ajit Gunjal's picture

24 Jul 2020 - 9:24 am | Ajit Gunjal

अतिशय छान <a href="https://www.akolenews.com/sangamner-taluka-news/" title="Sangamner">Sangamner News</a>

Ajit Gunjal's picture

24 Jul 2020 - 9:38 am | Ajit Gunjal

Friend

Nice Information
If ever there is tomorrow when we're not together…there is something you must always remember. You are braver than you believe, stronger than you seem, and smarter than you think but the most important thing is, even if we're apart
sangamner News

Jayant Naik's picture

24 Jul 2020 - 9:43 am | Jayant Naik

आपला अकोले न्यूज खूप छान वाटला. शुभेच्छा. माझी कथा आपण आपल्या वाचकांपर्यंत पोचवू शकता.

रातराणी's picture

24 Jul 2020 - 11:24 am | रातराणी

सुरेख कथा!!

Jayant Naik's picture

24 Jul 2020 - 11:39 am | Jayant Naik

अनेक अनेक धन्यवाद

मदनबाण's picture

24 Jul 2020 - 8:25 pm | मदनबाण

कथा आवडली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ari Ari Ari... :- Bombay Rockers

Jayant Naik's picture

25 Jul 2020 - 9:17 am | Jayant Naik

मदनबाण आपले अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी's picture

25 Jul 2020 - 5:26 pm | मार्गी

आधी वाटलं लेख धुमकेतूबद्दलचा असावा! :) पण त्याहूनही सुंदर आहे! धन्यवाद!

Jayant Naik's picture

25 Jul 2020 - 7:03 pm | Jayant Naik

आपला भ्रमनिरास झाला खरा पण कथा तुम्हाला आवडली हे खूप छान झाले.

प्राची अश्विनी's picture

5 Aug 2020 - 5:38 pm | प्राची अश्विनी

अतिशय सुंदर लेख. मी वाचला, मुलांना वाचूनक्षदाखवला. अनेकांना दुवा पाठवला. सर्वांनाच आवडला.
पाठ्यपुस्तकात घ्यावा असा लेख.

Jayant Naik's picture

7 Aug 2020 - 9:57 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार ..पण पाठयपुस्तक वगैरे .. स्वप्नवत वाटतंय सध्या तरी....

असा मी असामी's picture

6 Aug 2020 - 5:25 pm | असा मी असामी

अप्रतीम कथा

Jayant Naik's picture

7 Aug 2020 - 9:58 pm | Jayant Naik

फार छान वाटले.

महासंग्राम's picture

12 Aug 2020 - 2:02 pm | महासंग्राम

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ईर्षेमुळे म्हणा अथवा अजून कोणत्या गोष्टीमुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्पर्धा आलीये आणि त्या मागोमाग ती वस्तू नाही मिळाली तर आलेले निराशपण आपल्याला आत्महत्येसारख्या गोष्टींकडे जायला प्रवृत्त करते. याला बहुदा सोशल मीडिया कारणीभूत असावा असे वाटते. असो हे विषयांतर झाले पण आपली कथा आवडली. असेच लिहिते रहा

Jayant Naik's picture

13 Aug 2020 - 11:23 am | Jayant Naik

survival of the fittest.या नियमा प्रमाणे सद्य स्थिती ला तुम्ही तोंड देऊ शकला नाहीत तर ..तुम्हाला exit घ्यावी लागेल. निराशा पचवायची ताकद आणि ती पचवून पुढे जायची हिम्मत हि आजकालच्या जगात जरूरिची आहे.

छान सकारात्मक कथा ! शब्दयोजना आणि मांडणी उत्तम !

Jayant Naik's picture

12 Aug 2020 - 6:18 pm | Jayant Naik

अतिशय आभार.

राजाभाउ's picture

12 Aug 2020 - 5:52 pm | राजाभाउ

अप्रतीम

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव . ते तुला हाकलून घालत नाहीत ..तू विकणाऱ्या वस्तूंना हाकलत असतात. त्यांना तू नको असतोस असे नाही ..त्यांना तू विकणाऱ्या वस्तू त्या वेळी नको असतात.

हे खुपच आवडले. म्हणजे माणुस आणि त्याचे वर्तन हे वेगळे करा म्हणजे तुम्ही जजमेंटल होत नाही हे सगळे सांगतात, पण हे स्वता:लाही तंतोतंत लागू केल तर आपण स्वता: बाबतही जजमेंटल होत नाही

रच्याकाने हे काय्प्पावर वाचले होते दुर्दैवाने तुमच्या नावाशिवाय पण आता तुमचा आहे हे कळाले
मनापासुन धन्यवाद पुलेशु

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. नावाशिवाय गोष्ट फिरवल्याने काय होते कुणास ठाऊक ?