कंदील (रहस्यकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
14 Jul 2020 - 4:38 pm

कंदील (रहस्यकथा)

मार्चचा महिना लागून काहीच दिवस उलटले होते.तरी वातावरणात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या. वातावरण संमिश्र होऊन,कधी उन्हाचा चटका बसायचा,तर मध्येच थंडीची झुळूक अंगाला झोंबून जायची.कदाचित वीस तीस मैलावर असलेल्या पश्‍चिम घाटाचा तो परिणाम असावा. पण हे वातावरण कसेही असो,कनकपुरचा प्राचीन वस्तूंचा बाजार माणसांनी फुलून गेला होता.आठवड्यातील गुरुवारी भरणारा तो बाजार,सगळ्या दक्षिण भारतात प्रसिद्ध होता.कनकपुर म्हटले,की डोळ्यापुढे केवळ प्राचीन वस्तूंची रासच दिसायची. दोन तीन किमी चौरस परिसरात तो बाजार पसरलेला होता.बाजाराची रचना मुद्दामहून प्राचीन स्वरूपाची बनवलेली असल्याने ,बाजाराचा सगळा परिसर प्राचीन सभ्यतेतील एखाद्या बाजारहटासारखा भासायचा. हडप्पा किंवा मग मोहंजदडो संस्कृतीमध्ये बाजार भरला आहे,असे ऐकून आकृतीमान त्या बाजाराचे भासायचे.
प्राचीनतेच एक उत्तम नमुना तिथे पाह्यला भेटायचा.
गावापासून थोड्या दूर टेकडीवर बाजाराचे स्थान निश्चित केलेल होते. पाठीमागील डोंगराला समांतर बाजाराच्या रांगा पसरलेल्या होत्या. प्रत्येक रांगेत वीस बाय पंचवीस फुटाचे ओटे बांधलेले होते. प्रत्येक रांगेत तीन तीन फुटाच्या अंतराने बांधलेले, ते काळे गुळगुळीत दगडी ओटे, प्राचीन सभ्यतेची साक्ष देत होते. काळ अजून पाठीमागे गेला आहे असे वाटायचे. प्रत्येक ओट्यावर, उंटाच्या कातडीच्या रंगाचे पालं वर लावलेले होते. चारी बाजूंनी चार बांबू आणि मध्यभागी एक बांबू रचून, पालं ओट्यावर छताप्रमाणे बांधलेले होते. अनेक वर्षांपासून तेच ते पालं वापरल्यामुळे, ते काळवंडून गेले होते. खालच्या ओट्यांच्या काळ्या रंगात, त्या पालांचा काळा रंग, बेमालूमपणे मिसळून गेला होता.
त्या प्रत्येक ओट्यावर, अतिशय प्राचीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मांडलेल्या होत्या. सगळ्या वस्तु दुर्मिळ असायच्या. त्यांच्याकडे प्रथमदर्शी पाहिलेकी ते जाणवत होते. काही वस्तू खूप प्राचीन तसेच काही अलीकडच्या काळातीलही होत्या. वेगवेगळ्या सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळेचे नाणे, खाजगी खोदकामात आढळून आलेले भांडे, दगडी, लोखंडी, तांबे, पितळी मुर्त्या, दगडांच्या विविध घरगुती वस्तु, अश्मयुगीन, प्रागैतिहासिक काळातील मानवी वापराचे साहित्य, हत्यारे, लपून किंवा तस्करी करून आणलेल्या प्राचीन राजे, सेनापती सैनिके यांच्या तलवारी, ढाली, साखळदंड, रथाची चाके. जुन्या काळात काळ्या जादूची मोहिनी फार होती.अनेक अघोरी प्रथांचा सुळसुळाट होता. त्या अघोरी विधींचे अनेक प्राचीन साहित्य येथे मांडलेले होते. दगडी कवट्या, चित्रविचित्र आकाराच्या मुर्त्या, लाल रंगाचे गोटे, मानवी अवयवांपासून बनवलेल्या माळा, हाडांचे अलंकार. तसेच राजवाड्यातील जुन्या खुर्च्या, हातपंखे, वस्त्रे, उजेडाचे दिवे, कंदील बाजारात ओळीने मांडून ठेवलेले होते.
नेहमी बाजारात असणारी गर्दी, आजही तेवढ्याच जोमाने जमलेली होती. लांबून लांबून माणसे प्राचीन वस्तूंच्या खरेदीसाठी येत. वस्तू जेवढी प्राचीन, तेवढीच वस्तूची किंमत  मोठी होती. येथे मोठमोठाले व्यवहार अगदी चुटकीसरशी होत. कोणी आवड म्हणून वस्तू खरेदी करत. तर कोणी प्रतिष्ठेच्या दिखाव्यासाठी वस्तु खरेदी करत. कोणी काही उपयोग करण्यासाठी विकत घेत. तर कोणी निव्वळ मनोरंजन म्हणून, त्या प्राचीन वस्तु पाह्यला येत. एकूण प्राचीन वस्तूंसाठी कनकपुर, दक्षिण भारताबरोबरच पूर्ण भारताभर प्रसिद्ध होते.

कनकपुर पासून वीस मैलांवर दुर्गापूर वसलेले होते. त्या वीस मैलांचे अंतर कापून, माधव कनकपूरच्या बाजारात आला होता. माधव एक प्रतिष्ठित आणि नावाजलेला मूर्तिकार होता. एक सधन मूर्तीकार म्हणुन पंचक्रोशीत तो प्रसिद्ध होता. प्राचीन वस्तू पाहण्याचा, तसेच त्या खरेदी करण्याचा त्याला मोठा छंद होता. आजही काहीतरी खरेदी करण्यासाठी तो मुद्दामहून कनकपूरला आला होता. दुपारचा सुमार झाला होता. माधव एक एक दुकान पहात, पुढे सरकत होता. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अद्भुत, चित्रविचित्र, प्राचीन वस्तू पाहून तो मनापासून सुखावून गेला. एखादे लहान मूल, खेळण्यातील बोलणाऱ्या बाहुली कडे पाहून, जसे आनंदुन जाते. अगदी तसा तो आनंदून गेला होता. प्रत्येक वस्तूकडे पाहतांना तो तनमन हरखून जायचा. डोळे एक एक वस्तु जणू कैद करत आहेत. तो त्या वस्तू पाहत पाहत पुढे सरकत होता. अचानक एका दुकानात काहीतरी चमकताना त्याला दिसले. कुठलातरी किमती खडा चमकत असावा असा त्यांचा अंदाज होता. तो पुढे झाला. तो एक कंदील होता. त्याच्या काचावर सूर्याची किरणे पडून तो चमकत होता.तो कंदीलाकडे निरखून बघू लागला. सामान्य कंदीलापेक्षा तो कंदील काहीसा वेगळा भासत होता. प्रथमदर्शी पाहील की एकदम प्राचीन वाटत होता. पण त्याची जडणघडण पाहता,तो जास्त प्राचीन आहे असेही वाटत नव्हते. जुन्या-नव्या घडणीतून बनलेला तो कंदील, पहिल्याच नजरेत त्याला एकदम आवडला. त्याला त्या कंदिलाने खूपच आकर्षित केले होते. त्यात काहीतरी जादू होती. एक आकर्षकता होती. अजुन जवळ जात त्याने कंदील हातात घेऊन पाहिला. जवळपास एक फूट उंचीचा, काळ्या रंगाचा, एकाच घडणीत घडवलेला तो कंदील काहीसा चित्र विचित्र होता. त्यात काहीतरी कमी होते. इतर सामान्य कंदील आणि यात काहीतरी भेद होता. पण तो लवकर त्याच्या लक्षात येईना. आणि अचानक त्याच्या लक्षात आले. नेहमीच्या कंदीलाला तेल टाकण्यासाठी असणारी, छोटी टाकी त्या कंदिलाला नव्हती. खाली भरीव गोल आकाराचा स्टँड होता.
त्यात कुठेच तेल टाकण्यासाठी छिद्र नव्हते. किंवा मग टाकी नव्हती. त्याने चार पाच वेळा कंदील आलटून पालटून पाहिला. पण कुठेच तेल टाकायला जागा सापडली नाही. मग बिगर तेलाचा, हा कंदिल पेटेल तरी कसा? हा प्रश्न त्याला पडला. पण त्याला काही बोध होईना. त्याने हळूच वरचा काच बाजूला काढला. काच काढल्यावर, गोल लोखंडी भरीव स्टँडवर, एक अर्धा फूट लांबीची लोखंडी नळी लावलेली होती. आणि त्या नळीत एक वात खोचलेली होती. खाली बुडापर्यंत जवळपास गुंडाळलेल्या अवस्थेत, दोन फुटांपर्यंत ती वात असावी. त्याने त्या वातीला हात  लावला. लगेच पटकन त्याने तो हात बाजूला काढला. काहीतरी थंड, लिबलिबीत हाताला लागले. लिबलिबीत जेलीसारख्या एखाद्या पदार्थाला हात लावला आहे,असा त्याला भास झाला. ती साधी वात नसावी, हे त्याच्या लक्षात आले. सामान्य वात ही कापसाची किंवा कापडी असते. परंतु या दोन्हींपासून ही वात बनलेली  नव्हती. त्याने नीट निरीक्षण करून बघितले. पुन्हा हळूच तिला हात लावला. पुन्हा तसाच थंड आणि लिबलिबीत स्पर्श त्याला झाला. त्याने पुन्हा हात झटक्यासरशी बाजूला काढला. ही वात कुठल्यातरी विशिष्ट चरबीची आहे हे त्याने ओळखले. जुन्या काळात तेल नसल्यामुळे, कंदिलात अशा वाती वापरत. त्यांना तेलाची गरज पडत नसे. त्या वाती चरबीच्या असल्यामुळे त्यात तेलाचा अंश मुळातच असे. त्यात पुन्हा एखादा घटक मिळून, जास्त दिवस चालणारी वात तयार करत. ती वात पेटवली की बरेच दिवस चालत असे. इथेही तशीच वात होती. पण त्याला एक प्रश्न पडला होता. हा एवढा जुना कंदील असूनही, त्याची वाट एवढी ताजी कशी? त्याला काही उत्तर सापडेना. पण ते काहीही असो, त्या कंदिलात काहीतरी आकर्षित करणारे होते. एवढी साधी रचना असणारा, तो कंदील कुठल्यातरी आंतरिक शक्ती ने परिपूर्ण आहे,असे त्याला वाटत होते. कुठली तरी एक जाणीव माधवच्या मनात उमटली. तो कंदील खरेदी करण्याची, त्याची उर्मी वर उफाळून आली. त्याने कंदिलाचा काच त्यावर ठेवून दिला. तो खरेदी करण्याचा त्याने पक्का निश्चय केला. पुन्हा थोडी पाहणी करून, शेवटी त्याने तो कंदील खरेदी केलाच. उजव्या हातात तो कंदील धरून,तो आपल्या गाडीत बसला.
आणि गावाकडे निघाला.
दुर्गापुर पाच- सहाशे घरं असलेलं, मध्यम स्वरूपाच गाव. गावात एका मोठ्या वाड्यात माधव, त्याची पत्नी अलका, आणि त्यांची एकुलती एक मुलगी जानकी रहात होते. तसं समाधान कुटुंब ते. घरी सगळ्या सुख,सोयी होत्या. घरी अमाप पैसे, अलंकार, द्रव्य, किमती वस्तु, देखाव्याच्या वस्तु उपलब्ध होत्या. भौतिक वस्तूंनी घर भरून गेले होते.अनेक दुर्मिळ वस्तु घरात ठिकठिकाणी मांडलेल्या होत्या. घरी तीन चार रक्षक ठेवलेले होते. कामाला दिवसा माणसे येत. सगळे जिथल्या तिथे होते. माधव दगडापासून, धातूंपासून, संगमरवरी पाषाणापासून मुर्त्या बनवायचा. त्या बाहेरच्या देशात निर्यात करायचा. तेथील मोठमोठ्या लोकांना विकायचा. त्यातून तो अमाप पैसे कमवायचा. एकंदरीत आरामशीर चालणारे आयुष्य जगत होता तो.

तासा दोन तासात माधव गावात पोहोचला. कंदील हातात घेऊन तो घरी आला. संध्याकाळी निवांत वेळ काढून त्याचे निरिक्षण करु, असा विचार करून त्याने अलमारीत तो कंदील बंदिस्त करून टाकला.
असेच दोन तीन दिवस उलटले. संध्याकाळचा सुमार झाला होता. वातावरणात अंधार दाटून येत होता. हळूहळू वातावरण काळवंडून आले होते. माधव त्याची बायको, मुलगी रात्रीचे जेवण करून झोपायच्या तयारीत होते. थोड्याफार गप्पा मारुन ते झोपेच्या आधीन झाले. 
एरवी अंथरुणात अंग टाकले की, माधव काही वेळात झोपायचा. परंतु आज झोप येत नव्हती. या अंगावरून त्या अंगावर नुसताच चुळबुळत होता. आज रात्रीचे वातावरणही काही वेगळेच भासत होते. घरातील सगळे दिवे अचानक बंद झाले. कदाचित वीज गेली असावी. पर्यायी दिवेही लागले नाहीत. कदाचित तेही बंद झाले होते. दिवे बंद झाल्यामुळे काळोख दाटला होता. त्याला आश्चर्य वाटले. सगळेच दिवे कसे बंद झाले. रक्षकांना आवाज द्यावा अशी इच्छा झाली. पण त्याला उठायचा कंटाळा आला. येईल थोड्या वेळात वीज असे म्हणून,तसाच अंथरुणात पडून राहिला.अंधाराने सगळे घर व्यापले होते. काहीशी विचित्र हुरहूर मनाला लागून गेली होती. घनघोर अंधारात कोणीतरी दबा धरून बसले आहे, अशी जाणीव होऊ त्याला होऊ लागली. माधव झोपेतून उठला. जागेवरच बसून राहिला. बाजूलाच बायको, मुलगी झोपी गेल्या होत्या. आज काहीतरी विचित्र घडणार आहे अशी जाणीव त्याला होऊ लागली. तो उभा राहिला. थोडे पाणी पिल्यावर त्याला बरं वाटलं. तो चाचपडत मूर्तीशाळेत जाऊन आला. पण सगळीकडे अंधार असल्यामुळे, त्याच्या नजरेत काहीच पडले नाही. तो पुन्हा येऊन अंथरुणात पडला. आणि त्याला अचानक त्या कंदिलाची आठवण झाली. तो खाडकन उभा राहिला. कसेतरी चाचपडत त्याने काडीपेटी हातात घेतली. आणि पाठीमागच्या खोलीतील आलमारी जवळ गेला. आलमारी मधून कंदील बाहेर काढून शेजारच्या टेबलावर ठेवला. तो बाजूच्या खुर्चीवर बसला. कंदील बाहेर काढल्यावर, अचानक वातावरणात काहीतरी बदल झाल्यासारखा वाटला. वातावरण त्याच्या विरोधी झाल्यासारखे वाटू लागले. खरंतर त्या अंधारात, वातावरणात झालेला बदल त्याच्या नजरेस पडला नाही. पण वातावरणात खूप बदल झाला होता. घराभोवती कोणीतरी फिरत आहे, कोणाच्यातरी चोर पावलांचा आवाज येत आहे, आजूबाजूला कोणाचीतरी उपस्थिती आहे, असे त्याला राहून राहून वाटू लागले. पण या अशा अंधारात काय दिसणार? वीज गेल्याचा त्याला आता राग येऊ लागला. त्याने चाचपडत कंदिलाला हात लावला.  त्यावरचा काच त्याने अलगद बाजूला काढला. त्याच्या हाताला ती कंदिलाची वात लागली. पुन्हा तोच स्पर्श हाताला झाला. थंड आणि लिबलिबीत. त्याला कसंतरी झालं. त्याने एकदम मागे हात घेतला. का कोण जाणे? पण त्याला त्या वातीचा स्पर्श खूप तिरस्कारणीय वाटत होता. एखादा शेलाटी सर्प हातात धरावा, तसा काहीसा तो स्पर्श त्याला लिबलिबीत वाटायचा. पण दुसरी एक बाजू होती. मनाने कितीही विरोध केला तरी, त्याला वातीला स्पर्श करायचा मोह व्हायचा. पुन्हा पुन्हा त्या वातीला स्पर्श करू वाटायचा. तो स्पर्श कितीही तिरस्कारणीय वाटत असला तरी, त्यात काही तरी अनामिक अशी शक्ती होती. आकर्षण होतं. जे त्याला पुन्हा पुन्हा त्या वातीला स्पर्श करण्यासाठी आकर्षित करत होतं.
सभोवतालची ही अशी विचित्र परिस्थिती, हातात काडीपेटी, समोर तो विचित्र कंदील, अवतीभवतीचा घनदाट अंधार अशा या वातावरणात, त्याला तो कंदील पेटवायचा मोह झाला. पण मेंदूतून काही संकेत बाहेर येत होते, 'हा कंदील पेटवू नकोस' अशी जाणीव ते करून देत होते. कंदील पेटवला की काहीतरी अपशकुन घडेल. काहीतरी दुखद घडेल. असे त्याला राहून राहून वाटत होते. पण मनाची जिज्ञासा मोठी होती. ती स्वस्थ बसू देत नव्हती. ती कंदील पेटवायची आज्ञा देत होती. जिज्ञासा कधीकधी माणसाला एखाद्या कठीण परिस्थिती अडकवू शकते. किंवा आपल्या खूप मोठ्या समस्येचे कारणही बनवू शकते. curiosity killed the cat..अती उत्सुकता तुमच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते.
अचानक माचिसकाडी पेटल्याने, आजूबाजूचा अंधार लुप्त झाला. काडीचा उजेड अवतीभोवती पसरला. सभोवतालच्या वस्तू दृश्यमान झाल्या. त्यांचे आकृतीमान डोळ्यात उमटून गेले. समोर टेबल होता. त्याच्याच शेजारी दोन खुर्च्या होत्या. त्यातील एका खुर्चीवर तो बसलेला होता. आणि त्या टेबलावर तो कंदील होता. शेजारीच कंदिलाच्या वरचा काच काढून ठेवलेला होता. कंदिलाच्या वरच्या स्टँडवर अडकलेल्या लोखंडी पाईपमधून, इंचभर वात वर आलेली होती. त्याच वातीला अग्नी लावला की, कंदील पेटणार होता. त्याचा उजेड आजूबाजूला पसरणार होता.
त्याने वर आलेल्या वातीवर, ती पेटलेली काडी धरली. बराच वेळ काडी वातीवर धरूनही वातीने पेट घेतला नाही. पहिली काडी विझली होती. त्याने पुन्हा दुसरी काडी पेटवली. पुन्हा अंधार जाऊन उजेड झाला. त्याने वातीवर काडी धरली. हळूहळू वात पेट घेऊ लागली. चर्sssss असा आवाज होऊ लागला. काहीश्या निळ्या, पिवळ्या अशा रंगात वात जळू लागली. पण त्याव्यतिरिक्त एक हिरवट रंगही आजूबाजूला पसरला होता. क्षण दोन क्षण गेले. वातीने चांगला पेट घेतला. संथ गतीने वात जळू लागली. कंदिलाचा प्रकाश चांगला मोठा पडला. सगळी खोली प्रकाशाने उजळून निघाली. माधवला तो प्रकाश पाहून आनंद झाला. तो मनातून सुखावून गेला. सगळीकडे आजूबाजूला अंधार आणि त्यात कंदिलाचा प्रकाश पडल्याने, तो प्रकाश मोहक वाटू लागला. संथ जळणार्‍या त्या वातीकडे पाहून, तो हरखून गेला. त्यातील पिवळा, निळा आणि काहीसा तो हिरवट प्रकाश पाहून तो मोहरून गेला. तो प्रकाश त्याला आनंदी वाटू लागला. त्याचे डोळे एकटक त्या वातीच्या प्रकाशावर स्थिर झाले. हळूहळू त्याला कसलातरी गंध येऊ लागला. तो सौम्य गंध नाकात शिरू लागला. तो गंध कसा होता, हे सांगणे कठिण गेले असते. पण तो निश्चितच चांगल्या सुवासिक फुलासारखा नव्हता, किंवा मग एकदम सडक्या अंड्यासारखा घाणही नव्हता. तो चांगला किंवा वाईट असा कुठल्याच प्रकारचा नव्हता. त्या गंधाने त्याला काही मोठे नुकसान झाले नाही. परंतु एक प्रकारची स्थिरता त्याला प्राप्त झाली. त्याची नजर त्या कंदिलांच्या वातीवर स्थिर झाली. अगोदर सौम्य असणारा गंध आता, गडद होऊ लागला. तो गंध नाकाला झोंबू लागला. जसा जसा तो गंध श्वासाद्वारे उरात जाऊ लागला, तशी तशी त्याची जाणीव कमी होऊ लागली. ह्रदयाचे ठोके मंद झाल्यासारखे जाणवू लागले. डोळे जड पडत आहेत असे वाटू लागले. आजूबाजूचा परिसर स्वतःभोवती फिरत आहे, किंवा मग तोच स्वतः त्या परिसराभोवती गोल गोल चकरा मारत आहे, असा काहीसा भास त्याला होऊ लागला. शरीरातून काहीतरी निघून जात आहे, शरीर क्षीण होत आहे ही जाणीव त्याला होऊ लागली. कंदीलाचा उजेड आणि त्या वातीचा गंध सामान्य नाही हे त्याने जाणले. काहीतरी विषारी रसायन त्या वातीला लावलेले असावे. हे त्याने ओळखले. पण आता उशीर झाला होता. कंदीलाची वात विझवण्याची त्याची हिम्मत होईना. किंवा मग वात विझवण्या एवढीही शक्ती त्याच्या शरीरात उरली नव्हती. अचानक त्याला आता आजुबाजूला काहीसे अस्पष्ट मानवी चेहरे दिसू लागले. ते नक्की चेहरेच होते का? कारण त्या कंदिलाच्या उजेडात,ते चेहरे एकदम काळेभिन्न दिसत होते. त्या चेहऱ्यांवर कुठलाच अवयव दिसत नव्हता. मानवी चेहऱ्यावर असलेले कान, नाक, डोळे, ओठ या चेहऱ्यांवर दिसत नव्हते. एकदम सपाट चेहरे. त्या प्रकाशात ते अस्पष्ट चेहरे मागे पुढे होत होते. जवळ लांब होत होते. त्याने त्या चेहऱ्यांच्या खालचे शरीर पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सगळेच शरीर असपष्ट दिसत होते. त्याने पुन्हा पुन्हा डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले. अंधार दाटू लागला. म्हणजे ते चेहरे स्पष्ट होते, याचेच डोळे कमजोर झाले होते. त्याचे डोळे मिटत चालले होते. ते कोणत्याही वेळी झाकले गेले असते. शेवटी डोळे मिटता मिटता त्याला एवढेच दिसले,
त्या अस्पष्ट चेहऱ्यांच्या हातात कुठलेतरी भाल्यासारखे शस्त्र होते. चारी बाजूंनी ते चेहरे पसरले होते. आजूबाजूचे सगळे आकारमान त्यांनी व्यपाले होते. ते राक्षसदुत भासत होते. त्यांच्या चेहर्‍यावर  एक हास्य विलासत होते. कुठल्यातरी असंस्कृत भाषेत, ते चेहरे संभाषण करत होते. त्या भाषेचा त्याला काहीच बोध होईना. तो असह्य होत चालला होता.
'धाडकन्sss' असा आवाज झाला. माधव खुर्चीवरून खाली पडला. त्या खुर्चीच्या आवाजाने त्याची बायको आणि मुलगी जाग्या झाल्या. धावत त्या खोलीत आल्या. समोरचे दृश्य पाहून क्षणभर त्यांना काहीच बोध होईना. समोर कंदील पेटलेला होता. त्याचा पिवळा, निळा प्रकाश आजूबाजूला पसरला होता. आणि टेबलाच्या खाली, खुर्चीच्या बाजूला माधव वेड्यावाकड्या अवस्थेत पडला होता. त्यांना आश्चर्याचा आणि सोबतच भीतीचा एक जबरदस्त धक्का बसला. एकदम पुढे होत, त्यांनी माधवला हलवून उठवायचा प्रयत्न केला. पण माधवची काहीच हालचाल होत नव्हती. शरीर निपचित झाले होते. पण एक चांगले होते ,मंदगतीने त्याचा श्‍वास सुरू होता.खूप मोठी इजा झाली नव्हती.तो बेशुद्ध पडला होता. त्या जोरात हलवून त्याला उठवायचा प्रयत्न करत होत्या. पण माधवची काहीच हालचाल होईना. अचानक त्या दोघींना कसलातरी गंध आला. आधी सौम्य वाटणारा तो गंध, हळूहळू गडदपणे त्यांच्या नाकात शिरू लागला. तो नाकाला झोंबू लागला. हळूहळू त्या गंधाची मोहिनी त्यांच्यावर पडू लागली. श्वासाबरोबर गंध आत जाऊ लागला. त्यांची शक्ती क्षीण होत गेली. आता त्यांनाही माधवला दिसलेले, ते अस्पष्ट चेहरे दिसू लागले. ते दूर जवळ, मागे पुढे, होऊ लागले. जोरजोरात हसू लागले. त्या दोघींना भीतीने घेरले. त्या दोघींच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. आणि त्या दोघीही मूर्च्छित होऊन खाली पडल्या.
त्या दोघींच्या किंकाळीने, बाहेरचे चारही रक्षक धावत खोलीत आले. काय झाले पाहू लागले. त्यांनी खोलीतले दृश्य पाहिले. ते तिघेही बेशुद्ध पडले होते. ते भयंकर दृश्य पाहून ते भयभीत झाले. पण काही क्षणातच त्या कंदिलाच्या गंधाने चारही रक्षक मूर्च्छित होऊन पडले. आता त्या खोलीत माधव, त्याची बायको, मुलगी, रक्षक सगळे मूर्च्छित होऊन पडले होते. सगळं वातावरण भयप्रद झालं होतं. घरात सगळीकडे काळोख दाटला होता. हळूहळू ते अस्पष्ट चेहरे बाहेर येऊ लागले. भेसूरपणे जोरजोरात हसू लागले. त्या कंदिलाच्या प्रकाशात, ते सगळे चेहरे भितीदायक दिसत होते. त्यांच्या हातातील ते भाल्यासारखे शस्र चमकत होते. त्यांच्यापैकी एकजण पुढे आला. हात लांब करून त्याने कंदिलाची वात विझुन टाकली. कंदील विझला. सगळीकडे पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले. हळूहळू ते अस्पष्ट चेहरे सगळीकडे घुमू लागले. घरात सगळीकडे ते चौफेर पसरले. सगळे घर त्यांनी व्यापून निघाले. मोठे आवाज होऊ लागले. काहीतरी ओढल्याचा, काहीतरी तोडल्याचा, काहीतरी सरपटण्याचा, तोडफोड केल्याचा आवाज घरभर घुमू लागला. सगळ्या घरात मोठा गोंधळ निर्माण झाला. बराच वेळ या गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. परंतु घरातील सगळेजण बेशुद्ध असल्याने, त्यांच्या कानावर हा गोंधळ कधी पोहोचलाच नाही.
सकाळ झाली. सूर्याचे आगमन झाले होते. सकाळ खरेतर प्रसन्न करणारी होती. पण माधव जड झालेल्या अंगाने उठला. शरीरात वेदना होत होत्या. खुर्चीतून खाली पडल्यामुळे, त्याचे सगळे अंग ठणकत होते. डोळे चुरचुरत होते. आठ नऊ तास तो बेशुद्ध होता. त्याने आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. बाजूला त्याची बायको, मुलगी, रक्षक अजूनही बेशुद्ध पडलेले होते. अचानक त्याला कालच्या रात्रीचे स्मरण झाले. त्याच्या मनःपटलावर रात्रीचा सगळा प्रसंग आला. त्याने टेबलावरच्या कंदिलाकडे नजर वळवली. पण रिकामा टेबल पाहुन त्याला अश्चर्य वाटले. कंदील टेबलावर नव्हता. त्याने इतरत्र पाहण्याचा प्रयत्न केला. पण कंदील कुठेच दिसेना. त्याने ते सोडून दिले. त्याने बायको, मुलीला आणि रक्षकांना उठवले. संभ्रमित अवस्थेत ते सगळेजण उठले. क्षणभर त्यांना कशाचाच बोध होईना. थोड्यावेळाने सगळे काही पूर्वपदावर आले. ते सगळेजण मूर्च्छित होऊन पडले होते. त्या कंदिलाच्या गंधाचा हा सगळा परिणाम होता. त्या गंधाने सगळेजण बेशुद्ध झाले होते. कंदीलही गायब झाला होता. ते सगळेजण उठून बसले. कंदील शोधायचा प्रयत्न केला. सर्व घर फिरून पाहिले. कंदील कुठेच सापडला नाही. परंतु सर्व घरात सगळा पसारा अस्तव्यस्त पडला होता. तिजोरी, मोठी अलमारी तोडली होती. किमती मुर्त्या, सोन्याचे अलंकार, एक एक करून जमवलेल्या प्राचीन वस्तु सगळं लंपास झालं होत. एकही किमती वस्तू जागेवर नव्हती. सगळं घर रिकामं होतं. भिंतीवरची कृत्रिम पक्षी असलेली घड्याळ सुद्धा जागेवर नव्हती. त्याने मूर्तीशाळेत चक्कर टाकली. तेथील सर्व दगडी, पितळी, पंचधातू असलेल्या मूर्त्या गायब होत्या. सगळे घर साफ करण्यात आले होते. घरी मोठी चोरी झाली होती. काय समजायचे ते सगळे माधव समजून गेला. रात्री कंदिलाच्या गंधाने मूर्च्छित होणे, ते अस्पष्ट चेहरे दिसणे, त्यानंतर बायको, मुलगी बेशुद्ध पडणे. त्यानंतर त्यांच्या किंकाळीने रक्षकांचे इकडे येणे. तेही मूर्च्छित होऊन पडणे. आणि सगळ्यात शेवटी, सगळे घर साफ होणे. हे सगळेच योगायोगाने घडले हे शक्यच नाही. एका गोष्टीत योगायोग होऊ शकतो. परंतु इथे प्रत्येक घटना, दुसऱ्या घटनेला जुळलेली होती. हा योगायोग नव्हता. ती योजना होती. अतिशय सुरेख योजना. उत्तम योजना. आणि ती योजना यशस्वी झाली होती. ते अस्पष्ट दिसणारे चेहरे, बुरखाधारी लुटारूंचे होते, हे त्याला आता समजले. पण आता काय फायदा. जे व्हायचे ते झाले होते. कंदिलाच्या वातीला  मूर्च्छित होणारा गंध लावलेला होता. त्याच गंधाने सगळी योजना यशस्वी केली होती.

ते पाच जण मजेत चालत, कनकपूरच्या प्राचीन बाजारात आले. एकाच्या हातात कंदील होता. हो हो तोच कंदील! थंड आणि लिबलिबीत वातीचा! त्यांनी एका दुकानदाराला एकदम रास्त भावात तो कंदील विकला. दुकानदाराने तो कंदील विक्रीसाठी  दुकानात ठेवला. आता ते पाचजण त्याच दुकानाच्या बाजूला, एका आडोशाला थांबले. पुन्हा एखादा माधवसारखा खरेदीदार येण्याची वाट बघत. त्यांना एका गोष्टीची जाणीव होती. कंदील खरेदीसाठी एखादा धनदांडगा येणारच. एकदा का त्याने कंदील खरेदी केला, की मग तिथून पुढे त्यांची योजना सुरू व्हायची. आधी त्याचा पाठलाग करायचा. त्याचे घर बघायचे. एखादी चांगली शुभरात्र बघून, घरातील लाईट बंद करायचे. मग कंदील पेटण्याची वाट पाहायची. मग बुरखा घालून घरात घुसायचे. आणि सगळे घर साफ करायचे. आणि हो! न विसरता तो कंदील उचलुन घ्यायचा. पुढच्या चोरीसाठी...!

**समाप्त..
अभिप्राय नक्की सांगा.
वैभव देशमुख.

कथालेख

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

14 Jul 2020 - 5:24 pm | सोत्रि

मस्त जमलीय कथा!

- (कंदील बलोचची आठवण झालेल) सोकाजी

king_of_net's picture

14 Jul 2020 - 5:32 pm | king_of_net

छान आहे कथा!!

मदनबाण's picture

14 Jul 2020 - 5:55 pm | मदनबाण

कथा आवडली !
कंदील म्हंटले की आंबोळी ची आठवण येते [ आंबोळी हा आयडीच आहे ] तर... मिपावर कधी काळी त्यानी कंदील लेख लिहले होते त्याची आज या लेखाने आठवण झाली !
कंदील
कंदील २

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

डॅनी ओशन's picture

14 Jul 2020 - 5:55 pm | डॅनी ओशन

कथा आवडली. बिल्टअप सुरेख. शेरलॉक होम्सची"शैतानाचे पाऊल" ही कथा आठवली.

vaibhav deshmukh's picture

14 Jul 2020 - 6:03 pm | vaibhav deshmukh

सर्वांचे मनापासून आभार.

कुमार१'s picture

14 Jul 2020 - 6:15 pm | कुमार१

कथा आवडली !

Gk's picture

14 Jul 2020 - 8:00 pm | Gk

छान

योगी९००'s picture

14 Jul 2020 - 11:07 pm | योगी९००

कथा आवडली.... बाजाराचे, कंदीलाचे व एकंदरीत बर्‍याच गोष्टींचे वर्णन छान झाले आहे...!!

वीणा३'s picture

15 Jul 2020 - 1:46 am | वीणा३

छान झालीये गोष्ट!!!

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

15 Jul 2020 - 10:59 pm | सौ मृदुला धनंजय...

कथा आवडली. मस्त जमलीय.

Jayant Naik's picture

16 Jul 2020 - 7:23 pm | Jayant Naik

कथेला बाज चांगला आलेला आहे. म्हणजे जवळजवळ शेवटपर्यंत नक्की काय होणार हे समजत नाही. काही तरी अती मानवी असावे असे वाटता वाटता एकदम मानवी हुशारीची कथा होते. मस्त.

vaibhav deshmukh's picture

16 Jul 2020 - 10:29 pm | vaibhav deshmukh

सर्वांचे मनापासून आभार..