फाटका ट्रेक ढाकचा...! भाग १

विखि's picture
विखि in जनातलं, मनातलं
10 Jul 2020 - 12:30 am

दुपारचे चारेक वाजले असतील. आमच्या गाड्या जांबवली गावात शिरल्या. रोड आता बरा झाला होता. कामशेत सोडल्याव तर लय वेळ डांबरी होता, नंतर सगळा फुफाटा. पन तरी पहिल्या मानानी चांगलाच होता.
"अय बारीक शाळेपशी गाड्या लावू" मी मागून आवाज दिला. तशा गाड्या तिकडं वळाल्या. चारी गाड्या शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शिस्तीत लागल्या. कन्टीन्यु तीन साडे तीन तास, गाडी चालवल्यामुळ मुंग्या आल्यागत झाल होतं. कामशेतला जरा किराना घ्यायला थांबलो तेवढच.
"च्यायला, शिट दुखायला लागलं गाड़ी चालवून चालवून" पुंडल्या गाड़ी लावून बाहेर आला.
"पुढच्या ट्रेकपासुन एखादी उशी आनत जा बरोबर मंग" बारीक उड़लं. ह्ये बारीक म्हणजे बाण तानूनच बसलं असतंय. कोण काय बोललं की घापकनी सोडतंय.
बारीक-पुंडल्या आणि मी शाळेपासून एकत्र. बारीक म्हणजे चेतन जाधव, शाळेत लय बारीक होतं, आता मोठं झालंय, Software Engineer ते काय का असंना पण बारीक म्हणजे बारीक. पुंडल्या उर्फ रोहित पुंडलिक देशस्थ ब्राह्मण का काय म्हणतात ते, आमच्यात राहून बाटलं ते, मंग त्याचा झाला पुंडल्या ह्ये पण Software Engineer, प्रसाद चावरे-सेनेचा मानुस, आमच्या बरोबर बऱ्याच ट्रेकला असतोय, दोस्ते आपला, अंशुमन कनकधर- मूथय्या मुरलीधरनची फस्ट कॉपी तशेच डोळे पण फिरवतंय, अकाउंटचा मास्तरे, मधीच अजय-अतुल मधल्या अजय गोगावले सारखं दिसतंय त्यामुळं तशीच गाणीपण म्हणतंय
सुम्या-ईशान सोलापूरची पोरं, माझ्या टीम मधली मित्र, थोड्याच टायमात सुम्या आपला खास झाला, अमित बारीकचा चुलतभाऊ अशे आम्ही 8 जण आलो ढाकच्या ट्रेकला. खास ढाक बहिरीच्या गुहेत मुक्काम करायचा म्हणून. गाड्या लावून सगळी बाजूच्या हापश्यावर तोंडावर पाणी मारत होती.
"पानी भरायचं का रे इथून" सुम्या विचरत होता
"नको रे, वर गुहेत मस पानीऐ" मी बोललो. गावात जरा शुकशुकटच होता. नायतर इरवी कोण न कोण अस्तैच. गाव म्हणजे 20-25 घराची वस्ती.मस्त डोंगराच्या पायथ्याला. शाळेच्या बाजूलाच मारुतीचं देउळ होतं. मारुतीची चांगली मोठी मूर्ती होती. आत गाभारा पन मोठा होता, 10-15 जन आरमात मावतील एवढी जागा. मागच्या वेळेस आम्हाला जांबवली मध्ये यायलाच रात्री 10 वाजले होते, मग या मंदिरातच मुक्काम केला. शेकोटी लावून रात्री कितीतरी वेळ भुताच्या गोष्टी सांगून एकमेकांची फाडाफाडी सुरू होती. त्यात ते बारीक माझ्याकडं कितीतरी वेळ एकटक पापणी न लवता बघत होतं. दोन मिनिटं मी पण गंडलो होतो.
हागरं लय लोकांवर ट्राय करतं ह्ये, बरीचजण गंडतातपण. असलं काय काय आघोरी उद्योग करतं हे.
"विक्या, मागच्या वेळेस भारी मजा आलती कारे मंदिरात" पुंडल्या बोलला
"हा, लय मजा आलती, मलापण" बारीक दात काढत बोललं
"तू गपे झपाट्लेल्या, सारखं भूत लागल्यागत बघत बसलं होतं माझ्याकडं, अंगात आल्यावानीच करतं कधी कधी ह्ये" पुंडल्या उडलं बारीक वर
"सोड रे आता, चला आता लवकर, लेट व्हील नायतर" म्हणत मी माझी जड झालेली बॅग खांद्यावर घेतली. चालायला सुरुवात केली तेवढ्यात बाजूच्या झोपडीतून एक म्हातारं काठी टेकवत बाहेर आलं. "काय रं पोरांनो, कुठून आला,आन कुठंसा निघालेत" म्हातारं पार सुरकूतलेलं, तरी खमकं वाटत होतं
"बाबा ढाकला चाललोय" मी जरा त्यांच्या जवळ जात बोललो.
"ढाकला आन आता? आरं टाईम काय झालाय,दिस मावळायला आलाय, आता कुठं जाता, उद्या जावा पहाटच्याला, वाटलं म्या बी येतो निम्म्या रस्त्याव वाट दावायला, आज हिथच मंदिरात मुक्काम करा" म्हातारबाबा पार तोंडाजवळ येऊन बोलत होतं, बोलताना तोंडातून तुषार सिंचनाचे फवारे उडत होते, एका सेकंदाला मी डोळे बंदच करून घेतले, पोरं दात काढायचं कंट्रोल करून उभी होती. "नको ओ, नवीन नाय आम्ही ,लय वेळा येऊन गेलोय, रातच्याला वर गुहेत मुक्कामाला जायचंय म्हणून तर
आता चाललोय" मी फवाऱ्याला घाबरून माघार घेतली
"कशाला काय बी खूळ घेता रे डोक्यात तुमी शेरातली मानसं, उद्या काय कमीजास झाल्याव लोकं आमालाच धरत्यात" बाबा भलतीकडंच चाललं होतं.
"आहो तुम्ही नका लय काळजी करू,जातो आम्ही व्यवस्थित" म्हणत चावरे फ्रंट वर आला
"काय यवस्थीत जाता, तुमी जाता निघून, पुढं सगळं आमाला निस्तरायला लागतंय, एवढं सोपं असतयं व्हय ह्ये, त्यो काय येडा नाय, बगतोय त्यो" म्हणत म्हातारबाबा पिलू सोडून परत झोपडीत गेलं. तसं आम्ही पुढं आलो ."च्यायला बाबानी पार भिजून टाकलं मला, अजून थोडा वेळ थांबलो असतो तर बाबानी माझ्या तोंडावर
एखादं पीक घेतलं असतं" खिशातून रुमाल काढून तोंड पुसून घेतलं मी, लय वेळ कंट्रोल केलेल्या पोरांचा ह्याह्याह्या करून बांध फुटला. "शोले मधलं ऐ के हंगलच दिसतंय बाबा, इतना संनाटा क्यू हे भाई" बारीकच्या जोकनी सगळेच दात काढायला लागली
"विक्या ऐक ना तसं पण चार वाजून गेलेत, अंधार पडायच्या आत जाऊ का गुहेत आपण, बघा नायतर इथं मंदिरातच राहू, पहाटं लवकर निघू" आता चावरे पिलू सोडायला लागलं "नाय रे बाबा, आपलं आधीच ठरलं होतं, रात्री गुहेतच राहायचं म्हणून, नायतर मी आलो पण नसतो" बारीक काय ऐकत न्हवता
"अजून टाईमे रे मस, तुम्ही हितच टाईमपास केला तर नाय जमायचं मंग, चला पटापटा पुढं शंकराच्या मंदिरातपण वेळ जाईल" म्हणत मी पोरांना ढकललं.
ढाक बहिरीचा ट्रेक तसा आम्हाला नवीन न्हवता. लय वेळा झालाय. पण वरच्या गुहेत कधी मुक्काम नाय केला. म्हणून या वेळेस खास वर राहायचं म्हणून हा प्लॅन केला. जंगलातल्या पायवाटा पाठ होत्या. पुढं शंकराच्या मंदिरा पासून थोडा चढ होता, वर पठार, मग जंगल सुरू, पुढं लय वेळ उतार, मग परत सपाटी, नंतरचा चढ पार छातीवर होता, तेवढी चढून झालं की घळ लागायची ती पुढं पुढं लय अरुंद व्हायची, एका टायमला एकच मानूस बसल एवढी, तेवढं क्रॉस केल्याव तिरप्या कातळाची भिंत लागायची ती तेवढी जपून पार करायची, तिथल्या खोबणीत हात-पाय नीट टाकून पुढं दोर आणि बांबू एकत्र बांधून एक उभा पॅच होता, तो वर चढून जायचा की आली गुहा. रॉकपॅचची तशी उंची लय न्हवती पण हितं जर हात-पाय सटकला की संपलं. खेळ खल्लास. असा हा ढाक बहिरी. ढाक बहिरी बाकी लोकांसाठी ट्रेक असला तरी तिथल्या आसपासच्या आदिवासी-कातकरी जमातीचं ते जागृत देवस्थान. ढाकोबा त्यांचा देव. या लोकांनी वरच्या गुहेतच शेंदूर फासलेली ढाकोबाची मूर्ती स्थापन केलीय. हा ढाकोबा लय कडके म्हणतात. बाई माणसाचा वारा पण त्याला चालत नाय. प्रसाद म्हणून बकरं लागतंय त्याला. आम्हीपण दोन किलो चिकन घेतलं होतं पण ते आमच्यासाठी होतं खास डिनर म्हणून. रस्त्यात लागलेल्या महादेवाचं दर्शन घेतलं. पुढचा चढ आरामात चढून वर पठारावर आलो. पठारावर आल्या आल्या समोर ढाकची गुहा दिसती. भल्या मोठ्या अखंड कातळात बरोबर मधीच ती गुहा कोरलीत. च्यायला काय काय कलाकार असतील त्या टायमला असं वाटायचं. पोराचं मधी मधी फ़ोटोसेशन सुरू होतं. अजून मस उजेड होता त्यामुळं सगळीच निवांत चालली होती.
"विक्या ते बाबा मगाशी काय म्हणत होतं रे, कोण बघतंय म्हणून, कोण असतंय का तिकडं" सुम्या आणि बाकी पोरं कानापशी येऊन विचरत होती. सुम्या-ईशान कनकधर मास्तर नवीन मेंबर होते. पहिल्यांदाच आलेली. म्हातार बाबाच्या डायलॉगमुळं यांना डाऊट पडला होता.
"कोण नाय रे, गुहेत त्यांचा देव ढाकोबा ऐ, ही लोकं आपण शिस्तीत राहावं म्हणून कायपण पुड्या सोडतात" मी त्याचं शंकानिरसन टाईप कायतरी केलं. सुरुवातीला सगळीकडं कार्वीची झाडं. त्यामधून पायवाट गेलेली. किर्रर्रर्र झाडी एवढी की सूर्याचा उजेड पण नीट येत न्हवता. दानदान करत उतार संपवून टाकला. कणकधर मास्तर मागून लय मोठ्यानी दर्दी गाणी म्हणत होतं. जंगल संपवून परत चढ लागला, हा चढ लय बेक्कारे,एकदम अंगावर. हाफत हाफत तो चढून वर घळीच्या तोंडापशी आलो. इथं आल्यावर लय भारी वाटतं. समोर घळीतून जोरात वारं येतं तोंडावर. एकदम सुकून्न्न-जन्नत. हितं सगळी टेकली जरा.पाणी पीत परत फ़ोटो सुरू झाले त्यात चावरेनी एक मोठा रॅम्बो आणला होता मंग काय सगळ्यांना उत आला.तिकडं सूर्य मावळायला सुरुवात झाली.फ़ोटो काय उरकंना. रॅम्बोच्या एका बाजूला असलेल्या चार भोकातून
सूर्य-बिर्य पकडत फ़ोटो चालू होते, घळ चढून आल्यामुळं सगळीच दमुन बसली होती या सगळ्या नादात लयवेळ गेल्यागत झालं. मला तर झोप लागायचंच बाकी होतं एवढं भारी वारं लागत होतं.
"अरे अय, अंधार पडायला लागलाय,जायचं का नाय पुढं" पुंडल्या एकदम वरडलं. तशी पोरं उठली. बारीक पण बोंबललं "त्यो येडा नाय रे, बघतोय त्यो, उठा चला" सामान उचलत सगळी हसायला लागली. "निघा रे पटापटा, लय वेळ गेला राव, थोडा उजेड आहे तोवर घळ उतरा" मी पण आवाज दिला. एक एक करत घळ उतरायला सुरुवात केली. घळीत घाई करून उपयोग न्हवता, इथं पडापड झाली तर डायरेक्ट खाली, त्यामुळं सगळी बॅलन्स करून उतरत होती, पण यात लय वेळ गेला. खाली आलो तोवर अंधार पडला होता. सगळी एकमेकाची तोंड बघायला लागली. जरा अवघड झाल्यागत वाटायला लागलं होतं.कॉर्नरला एक सपाट जागा होती तिथं जरा दम खात परत सगळे थांबलो. इथून खाली खोल दरी सुरू. सगळी वाट अरुंद आणि साईड साईडनी. वर आक्खा उभा कातळ.
"काय करायचं रे आता?" सगळेच विचरायला लागले. "काय कारायचं काय, मगास पासून म्हणतोय चला चला,आता घ्या केळं, पडला अंधार" पुंडल्या पुरा वैतागलं होतं. मगाशी भारी वाटत असलेला निसर्ग आता भेसूर टाईप, डेंजर वाटायला लागला होता. भयाण शांतता पसरली होती. सोसाट्याचा वारा त्यात अजूनच भर घालत
होता. उगं कोणतरी आपल्या मागं तर नाय असं वाटायचं, त्यात काळाकुट्ट अंधार आणि खाली न दिसणारी खोल दरी. दिसत न्हवती ते एक बरंच होतं नायतर तिथंच फाटाफाट झाली असती. एकंदरीत परीस्थिती गंभीर बनत चालली होती. त्यात नवीन मेंबर जरा बावचळल्यागत झाले. कायतरी डिसिजन घ्यायला लागणार होता.
"हे बघा इथं बसून काय होणार नाय, आताचं सोडा पण रात्री गारठा वाढल आणि उग एखाद्या जनावराची पण रिस्के, इथं उघड्यावर रात्र काढण्यापेक्षा थोडी डेरिंग करून वर गुहेत जाऊ, मागं तर काय फिरता येणार नाय, काय बोलता" म्हणत मी पोरांची तोंड बघायला लागलो, जी अंधारात नीट दिसत पण न्हवती.
"च्यायला त्या बाबाची कुडकुडी लागली" बारीक बाबावर घसरलं.
"बाबाला मरू दे, पुढं काय करायचं ते बोला, लईत लय अर्धा-पाऊणतास लागल गुहेत जायला,बोला" मी जरा फोर्सच केला. खरं तर माझी थोडी का होईना फाटलीच होती,पण इथं थांबण्यात काईच अर्थ न्हवता ते कळत होतं "आरे पण शेवटचा पॅच जमल का?" पुंडल्या जरा डाऊटफुल होता.
"जमल रे जमल, नाईच जमलं तर इथंच येऊन रात्र काढू बास, कोण कोण तयारे बोला" बारीक, चावरे, नवीन पोरं पण तयार झाली. दुसरा काय पर्याय पण न्हवता. सगळी तयार झाली. बॅटऱ्या बाहेर काढल्या. मी पुढं बाकी पोरं मधी बारीक सगळ्यात शेवटी. रस्ता पाठ होता त्यामुळं चुकायचा प्रश्न न्हवता. तिरप्या कातळात कोरलेल्या खोबणीत हात-पाय गुतवत उभ्या पॅचच्या पायथ्याला आलो. एक एक पाय जपून टाकत बाकी पोरं पण आली.आता फक्त वीसेक फुट राहिलं, उभा कातळ अंगावर
आल्यागत वाटत होता. वरून एक दोर सोडलेला, त्याला दोन तासलेल्या जाड खोडागत बांबूचा सपोर्ट, त्या खोडामधीच झीगझाग शेप मधी पाय गुतवायला खोबणी केल्या होत्या. ही आदिवासी मानसं पण लय कलाकार राव ."मी निम्म्यात जातो मंग या तुम्ही" म्हणून मोठा श्वास घेउन मी दोर पकडला, खोडात पाय गुतवला, चार-पाच ढांगा वर आलो तोच बांबू फिरायला लागला. छाती बेक्कार धडधडली, थरथरल्यागत झालंपण दोर घट्ट धरला होता. कंट्रोल करत निम्म्यात पोचलो. "पोरांनो सावकाश या, दोर जाम धरा, बांबू हलतोयमधीच पण टेन्शन नका घेऊ, दोर सोडू नका" मी वर जाऊन हात देतो. बऱ्यापैकी उरकलं होतं. धा-बारा ढांगात गुहेत पोचलो. पहिली पाठीवरची बॅग काढली तेव्हा कुठं हलकं वाटलं. डोळे मिटून मोठा श्वासघेतला तोवर चावरे वर आला त्याला हात दिला, मंग पुंडल्या वगैरे करत करत शेवटचा बारीक पण वर पोचला. हुश्श....आता कुठं जीवात जीव आला. सगळी वर व्यवस्थित पोचल्यामुळं एकच गलका झाला. ऑलंपीक मारल्याच्या वर धिंगाणा सुरू झाला. " त्यो काय येडा नाय, त्यो बगतोय रे" बारीक जोरात बोंबललं."आरे गप की भाड्या" म्हणून पुंडल्यानी त्याचं तोंड दाबलं "लय किडेत ह्याला" सगळ्यांनी पडी घेतली बारीकवर.
खुशीके मारे लय धुतला त्याला. पण ही ख़ुशी लय टिकनार न्हवती. पुढं जाऊन अजून फाटायची बाकी होती, कारण रात्र वैऱ्याची होती......!
क्रमश:

कथालेख

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

10 Jul 2020 - 5:42 am | सोत्रि

जबरदस्त!

पुभालटा...

- (फाटायची बाकी असलेला) सोकाजी

तुषार काळभोर's picture

10 Jul 2020 - 6:25 am | तुषार काळभोर

झकास अनुभव आणि वर्णन.
विखी शेठ, तुमची लिहिण्याची श्टाईल आवडली.
समारोपाला पाच पन्नास फोटो टाका :D

हे माझं राहिलंच आहे. पण फोटो टाका संध्याकाळपर्यंतचे .
रॅम्बोच्या एका बाजूला असलेल्या चार भोकातून
सूर्य-बिर्य पकडत फ़ोटो चालू होते,
ते हवेत.
बाकी इकडून खालून सांडशी गाव. तिथून जांबवली गाठली पण बहिरी गुहा राहलीच. गावातले काही तरणेताठे जातात वर पण इतर कुणी नाही.
ग्रुपची मजा करायची पद्धत छान उतरवलीय.

सचिन काळे's picture

11 Jul 2020 - 12:17 pm | सचिन काळे

जबरदस्त अनुभव आणि लिखाण! पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

चौथा कोनाडा's picture

11 Jul 2020 - 1:35 pm | चौथा कोनाडा

जबराट ख्खी:ख्खी लिव्हलंय म्हून वख्ख विखि वूख्खू करत हासत हासत वाचत र्‍हायलो तर फाटली ना भाऊ !

विखि भौ, येउन द्या लवकर पुढचा भाग!

सिरुसेरि's picture

11 Jul 2020 - 3:25 pm | सिरुसेरि

रंजक कथन . उत्सुकता वाढली आहे . पुभाप्र . पुभाशु . +१

शा वि कु's picture

11 Jul 2020 - 3:56 pm | शा वि कु

पुभाप्र.

शिवलेला भाग दुसरा लवकर टाका.

विखि's picture

14 Jul 2020 - 3:04 pm | विखि

सर्वांचे आभार _/\_

सुखी's picture

14 Jul 2020 - 9:37 pm | सुखी

विखी bhau, lavkar taka पुढचा भाग