पाऊस आणि ती

सहज सिम्प्लि's picture
सहज सिम्प्लि in जनातलं, मनातलं
8 Jul 2020 - 6:10 pm

ऐन जुलै महिना. पावसाने अगदी मनावर घेतलं होतं की ह्या वेळी कोणालाही तक्रार करायची संधी द्यायची नाही. आणि म्हणून तो दररोज मनसोक्त बरसत होता. बिचारे मुंबईकर नेहमीच पावसाचे बळी ठरतात. पण असा एकही मुंबईकर शोधून सापडणार नाही ज्याच्याकडे पावसाची एखादी रंगवून सांगावी अशी गोष्ट नसेल. त्या दिवशीचा तो दिवस हा असाच एक नेहमीसारखा पावसाळी दिवस होता, पण कोणासाठी तरी तो त्यांची पावसाळ्याची गोष्ट ठरला.
सलग छत्तीस तास पडणार्‍या पावसाने मुंबई ची ‘लाइफ़ लाइन’ रखडायला सुरुवात झाली होती. पाउस कमी होण्याची चिन्हं न दिसल्यामुळे सगळी ऑफिसेस लवकर सोडण्यात आली होती. जे नशीबवान होते ते घरी पोचले. पण काही लोक मात्र अर्ध्या रस्त्यात अडकले. रुळांवर खूप पाणी साचल्यामुळे गाडी दोन स्टेशनांच्या दरम्यान गेले अडीच तास उभी होती. पुढील स्टेशन दिसत नसलं तरी ते थोडयाच अंतरावर आहे हे रोज प्रवास करणार्‍याला माहित होतं. आणि म्हणूनच गाडीतल्या बर्‍याच लोकांनी तासाभरातच परिस्थितीला वैतागून गाडीतून रुळावर उड्या मारल्या आणि चालत स्टेशन गाठलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी रुळावरचं पाणी कमी झालं नव्हतं. 'ती' सुद्धा त्याच गाडीमध्ये गेले अडीच तास बेहाल होत होती. एक-दोन वेळा तिने विचारही केला उडी मरायचा. पण धीर होईना. अखेर तिने हिम्मत करायचं ठरवलं आणि दाराजवळ आली. बाहेर डोकावलं तर अनेक धाडसी लोक आधीच हिम्मत एकवटून रुळावर उतरलेले तिला दिसले. एवढे लोक जातायत. आपल्याला ही जमेल. तिने मनाशी पक्कं ठरवलं. पण रुळाची खोली पाहून पाउल अडखळलं. दोन मिनिटे ती तशीच दारात घुटमळत उभी राहिली. आता पुरे झालं. ती दारात खाली पाय सोडून बसली. ही पद्धत जरा सोपी पडेल असा तिने विचार केला आणि एकदा घट्ट डोळे मिटले.
“मी मदत करू का?”
तिने डोळे उघडले. आवाज अनपेक्षित होता. तो रुळांवरून चालणार्‍या गर्दीतलाच एक होता. गाडीचे अनेक डबे रूळावरून चालत मागे टाकताना त्याला अचानक एका दरवाज्यात ती दिसली. दारातली पावसाची पागोळी तिच्या अंगावर पडत होती. ती टाळायचा प्रयत्न करत ती अंग चोरत होती. सडसडीत बांधा, उंचीला फार नाही, काहीसा भिजलेला, साधासा सलवार कुर्ता, केसांचा अर्धवट सुटत आलेला सैलसर आंबाडा, एका खांद्यावर घेतलेली पर्स हाताने घट्ट धरलेली. तो क्षणभर बघत राहिला.
आणि हळूच स्वतःशीच हसला. तिचा चेहरा दमला-भागलेला होता, पण डोळे मात्र बोलके होते आणि अज्ञात मदतीच्या आशेने भिरभिरत होते. तो चालता-चालता ती उभ्या असलेल्या दाराजवळ येत होता. ती गाडीच्या दारात बसली आणि डोळे बंद करून तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिची धडपड त्याने ओळखली आणि त्याच्याही नकळत काही विचार न करता त्याने अपोआप हात पुढे केला.
त्याचा आवाज अनोळखी असला तरी आश्वासक वाटला. तिने चमकून डोळे उघडले आणि त्याच्याकडे एक नजर बघितलं. तो तिच्या पायांजवळ खाली रुळांवर उभा होता पण तरीही गाडीच्या उंचीपर्यंत पोचू शकत होता. लॅपटॉप ची बॅग एका खांद्यावरून तिरकी घेतली होती. साधासा शर्ट, बहुदा घरून निघताना व्यवस्थित इन केला असावा, बाह्या कोपरापर्यंत दुमडलेल्या. त्या दुमडलेल्या बाह्यांमुळे दिसणारं त्याचं मनगट, त्यावर ऐटीत बसलेलं ठसठशीत घड्याळ आणि नियमित व्यायामाने तरारून आलेल्या त्याच्या हातावरच्या शिरा सहाजिकच कोणाचंही लक्ष वेधून घेतील अशा होत्या. पावसात चालल्यामुळे तो पुरता भिजला होता. शरीर भक्कम तरी चेहरा मोहक आणि निरागस होता. पण त्याच्या आवाजाशी त्याची प्रतिमा अगदी तंतोतंत जुळत होती. ती नुसती त्याच्याकडे पाहत होती. ती स्तब्ध झालेली पाहून त्याने पुन्हा चेहऱ्यावर शक्य तितके नम्र भाव आणून हळू आवाजात तिला विचारलं “मी मदत करू का उतरायला?”
ती भानावर आली. अत्ता आपल्याला मदतीची गरज आहेच. तिने होकारार्थी मान डोलावली. त्याने हात पुढे केला. “तुमची पर्स माझ्याकडे द्या”. ती जरा गडबडली.
पण तिने त्याचं ऐकलं. तिची पर्स दुसर्‍या हातात धरत त्याने पुन्हा तिला हात दिला. तिने त्याचा हात धरला.
“आता अजिबात विचार न करता पटकन उडी मारा. फार खोल नाही आहे.”
तिने त्याच्यावर विश्वास ठेवायचा असं ठरवलं, आणि शेवटी एकदाचा सगळा धीर एकवटून खाली उडी मारली. तिच्या नकळत तिने त्याचा हात घट्ट धरला होता. त्याला मात्र ते जाणवलं. उंचीमुळे ती रुळांवर जरा अडखळली पण त्याने तिला सावरायला मदत केली. तिने तोल सावरला आणि त्याच्याकडे बघितलं. त्याच्या चेहर्‍यावर हसू होतं. ते पाहून ती जरा चिडली. आपला हात त्याच्या हातातून तिने पटकन काढून घेतला आणि त्याच्या कडून आपली पर्स घेतली. काहीतरी मोठ्ठ काम केल्याचं समाधान तिच्या चेहर्‍यावर होतं. पण त्याचा चेहरा पाहून जरा चिडत तिने विचारलं “हसताय का?”
हसू आवरत तो म्हणाला, “सॉरी, पण एवढ्या का घाबरत होतात उडी मारायला?”.
“किती खोल आहे ते. आणि मला सवय नाही”
“अहो मग आम्ही काय रोज उड्या मारतो का?”
तिने एक कटाक्ष टाकला आणि चुकीच्या वेळी पानचट विनोद करू नये हे त्याच्या लक्षात आलं.
काही न बोलता तिने चालायला सुरुवात केली. पण चार पावलातच हे फार कठीण असल्याचे तिला जाणवले. तिने डोळ्यांच्या कोपर्‍यातून मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तो कमरेवर हात ठेऊन तिच्या कडे बघत होता. पण या आगाऊ माणसाकडे मदत मागायची नाही असं तिने ठरवलं आणि चालायचा प्रयत्न करू लागली. तो मागून जरा जोरातच म्हणाला, “यु आर वेलकम”, गालातल्या गालात हसला आणि चालू लागला. तिला मागे टाकायला त्याला दोन सेकंद लागली. एकमेकांच्या बाजूने जाताना दोघांना आपल्या उंचीमधला फरक जाणवला. ती जरा बाचकली, त्याला मात्र आणखी हसू आलं. पण ते आवरून तो मुद्दाम हळूहळू चालत होता. ती मुकाट्याने त्याच्या मागे चालत होती. तिची मागे होत असलेली धडपड त्याला जाणवत होती. पण गरज नसताना उगाच त्याने मदतीसाठी पुढे-पुढे न करणे त्याला योग्य वाटले.
पावसाचा जोर वाढत होता. सुमारे पंचवीस मिनिटे चालल्यावर स्टेशन नजरेच्या टप्प्यात आलं आणि तिच्या जिवात जीव आला. पण जसा जसा प्लॅटफॉर्म जवळ आला तसा तिला पुन्हा टेन्शन आलं. त्याच्याही ते लक्षात आलं. पण ती काही स्वतः मदत घेणार नाही तेव्हा आपणच माघार घ्यावी असं ठरवून तो थांबला. त्याने मागे वळून बघितलं. ती जवळच होती. त्याला बघून ती पण थांबली. शेवटी तो म्हणाला, “इथे प्लॅटफॉर्मला पायरी नाही आहे. आणि बाहेर पडायचा दुसरा रस्ता नाही.” ती थोडी थांबली, पण दुसरा पर्याय नव्हता हे तिला माहीत होत. ती पुढे आली. त्याने तिला हात दिला आणि प्लॅटफॉर्म चढायला मदत केली. ती अजूनच अवघडल्यासारखी झाली, पण त्याला मात्र तिची अवस्था पाहून गम्मत वाटत होती. प्लॅटफॉर्मवर आल्यावर या वेळी मात्र ती म्हणाली “थँक यू”. तो हसला. दोघे एकत्रच बाहेरच्या दिशेने चालू लागले. वातावरण जरा निवळलेलं पाहून त्याने शेवटी शांतता भंग केली.
“आज पावसाने जरा जास्तच त्रास दिला नाही का!”
“हो ना. अगदी वेळ साधतो हा पाउस”
अबोला संपला. बोलता बोलता त्यांना कळलं कि दोघांचं इप्सित ठिकाण एकमेकांपासून फार लांब नाही. पण जसे ते स्टेशनच्या बाहेर पडले तसे त्यांना आणखी मोठा धक्का बसला. गाड्यांची भली मोठी रांग लागली होती. लोक आरडा-ओरडा करत होते. प्रचंड ट्रॅफिक जाम झालं होता. त्यात पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. दोघे काळजीत पडले. खरंतर ते आपले आपले मार्ग निवडू शकत होते. पण ना तो जागचा हलला ना ती. का कोण जाणे पण तिला त्याच्या बाजूला एक प्रकारे सुरक्षित वाटू लागलं होतं. या सर्व प्रकारात साधारण तीन-चार तास होऊन गेले होते. तिच्या चेहऱ्यावर आणि चालण्यात थकवा अगदी जाणवत होता. तो सुद्धा खूप दमला होता. रात्र खूप झाली होती. पोटात सुद्धा आता कावळे ओरडू लागले होते. चालता-चालता अनपेक्षितपणे त्याला एक चहाची टपरी दिसली. एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावरही जेवढा आनंद नाही होणार तेवढा त्याला ती टपरी बघून झाला.
“आपण एक चहा पिऊया का? तुम्ही पण दमल्यासरख्या वाटताय.”
परिस्थिती अशी होती की नाही म्हणणं तिला अगदी अशक्य झालं, “हो. चालेल.”
ते रस्ता ओलांडून टपरी जवळ जाऊ लागले. तिथे आधीच बर्‍यापैकी गर्दी होती. जवळ गेल्यावर त्यांना दिसलं की त्या टपरी शेजारी आडोशाला अंडा भुर्जी ची एक गाडी उभी होती. अशा वेळी ते सुद्धा पंचपक्वान्नाप्रमाणे वाटतं.
“तुम्ही भुर्जी खाणार का? आपण संध्याकाळपासून काही खाल्लं नाहीये.”
“अं.. बरं चालेल.”
त्याने आपलं पाकीट काढलं. पण पावसात भिजल्यामुळे पाकिटातले पैसे सुद्धा पूर्ण भिजले होते. त्याने अपराधी नजरेने तिच्या कडे पाहिलं. ‘श्या! काय मूर्ख आहोत आपण. खरंच’
या वेळी तिला हसू आलं. तिने आपली पर्स उघडली. त्यामधून प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलेली आपली छोटी पर्स काढून तिने पैसे काढले आणि त्याच्या हातात दिले. मेल्याहून मेल्यासारखं झालं त्याला.
“पुरतील की नाही माहीत नाही.” ती म्हणाली.
“तुम्ही थांबा इथेच. मी बघतो.”
जरा वेळाने तो हातात दोन कटिंग आणि एक प्लेट घेऊन आला.
त्याला बघून तिच्या जीवात जीव आला. “किती वेळ?”
“सॉरी. जरा गर्दी होती. एकच प्लेट मिळू शकली” त्याने एक कटिंग तिच्या हातात दिला आणि प्लेट पुढे केली.
“हरकत नाही”. तिने चहाचा एक घोट चेतला. असा चहा आपण आयुष्यात कधी घेतला नसेल असं वाटलं. ती शेजारच्या एका कट्ट्यावर बसली. तो समोर उभा होता.
कटिंग तोंडाला लावून त्याने पहिला घोट घेतला. डोळे बंद करून मान वर केली आणि एक सुस्कारा सोडला. कमालीचं समाधान होतं त्याच्या चेहऱ्यावर. एवढ्या वेळात पहिल्यांदा तिने त्याचा चेहरा निरखून पाहिला होता. अगदी आखीव रेखीव चेहरा होता. मिशी आणि दाढी मिळून दोन्ही गाल झाकून टाकत होते. त्याने जीन्स च्या खिशात हात घालत अर्धवट भिजलेला रुमाल काढला. हाताने झटका देत त्याची घडी उलगडली आणि मानेवरून फिरवला. त्याचं लक्ष आजूबाजूच्या गर्दी कडे होतं.
चहाचा घोट घेत त्याने दुसर्‍या हाताने आपल्या शर्टाची बाही वर सारली. तोच त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती मान वर करून त्याच्याकडे बघत होती. काही न बोलताच भुवया उंचावून त्याने तिच्या कडे पाहिलं. क्षणभर तिला काही सुचलं नाही. तिने पटकन हातातली प्लेट त्याच्या समोर केली. त्याने एक चमचा तोंडात टाकला. विषय बदलत ती म्हणाली, “माझ्या फोन ची बॅटरी डेड झाली आहे. घरचे काळजी करत असतील.”
त्याने जीन्स च्या खिशातून आपला मोबाईल काढत तिला दाखवला “मला अजिबात नेटवर्क मिळत नाही आहे. नाहीतर माझा फोन दिला असता. बहुतेक सगळीकडे लाईट सुद्धा गेले असावेत.” आजूबाजूला बर्‍यापैकी अंधार होता. स्ट्रीट लाईट नसले तरी ट्रॅफिक मध्ये उभ्या गाड्यांचे लाईट होते त्यामुळे रस्ता नीट दिसत होता. “मला वाटतं आपल्याकडे आता चालत जाण्यावाचून पर्याय नाही आहे. मला माहीत आहे तुम्ही दमला असाल खूप. आणि अंतरही तसं बरंच आहे. पण एकदा घरी पोचलो की झालं. माझ्या मते दोन तासात आपण पोचू शकू. म्हणजे किमान मध्यरात्रीपर्यंत तरी घर गाठूच. चालेल का तुम्हाला?”
“दमायचं काय. तुम्ही सुद्धा दमलाच आहात की.”
“माझं काय हो. चालतं!”
“पण आपण इथे रस्त्यावर तर नाही वाट बघू शकत ना. बरोबर आहे तुमचं. अत्ता निघालो तर मध्यरात्री तरी पोचूच कसेबसे.”
“हो. खाऊन घ्या थोडं. मग लगेच निघू.”
ते पुन्हा चालू लागले. आणखी दोन तास तरी चालावं लागणार या कल्पनेने खरंतर तिच्या पोटात गोळा आला होता. काहीशा विचारात ती हरवली. नशिबाने पाऊस जरा वेळ थांबला होता. तंद्रीतच तिने आपल्या केसांना हात लावला. केसांची क्लीप काढून ती कुर्त्याला लावली आणि आंबाडा सोडला. केस चिंब भिजले होते. मानेला हलकासा झटका देत तिने केस सावरले. बोटं केसातून फिरवत केस मोकळे केले आणि एका बाजूला पुढे घेतले. तो प्रयत्नपूर्वक तिच्याकडे बघणं टाळत होता पण कठीण जात होतं. ती विचारात हरवली आहे हे त्याने ओळखलं. तिने चेहर्‍यावर आलेले केस कानामागे टाकले.
“कसला एवढा विचार करताय?”
आपण त्याच्या शेजारी चालतोय हे तिला अचानक जाणवलं. तिने वर त्याच्याकडे बघितलं. तो खाली मान घालून चालत होता. तिने पटकन मान उलट दिशेला वळवली आणि कुर्त्याला लावलेली क्लीप काढून केसांना लावली. “थोडया अंतराने आपले मार्ग वेगळे होतील.”
मगासचा काही वेळ बोलताना तिच्या आवाजात आलेला शांतपणा अत्ता अचानक गायब झाला होता. स्वर बावरलेला होता. आणि नजर रस्त्यावर उगाचच भिरभिरत होती. त्याने तिला पहिल्यांदा गाडीच्या दरवाज्यात उभी असताना पहिली होती अगदी तशी. तिच्या मनात सुरू असलेली घालमेल त्याला जाणवली. “काळजी करू नका. तुम्ही तुमच्या हद्दीत सुखरूप पोचेपर्यंत आपले रस्ते एकच आहेत.”
त्याचे शब्द अत्यंत गंभीर होते. एक प्रकारची जबाबदारी होती त्या आवाजात. तिची नजर स्थिरावली. मनात उगाच उसळलेली भीती कमी झाली. या वेळी मात्र तो हसत नव्हता. दोन्ही हात जीन्सच्या खिशात घालून खाल मानेने मुकाट्याने तिच्या शेजारी चालत होता. ती काही म्हणाली नसती तरी तिला सुखरूप पोचवल्याशिवाय आपल्या घरी नाही जायचं असं त्याने आधीच ठरवलं होत. दोघे चालत होते. तिचं घर जवळ येऊ लागलं होतं. पण अंगातले त्राण संपत चालले होते. प्रत्येक पावलानिशी आपली शक्ती कमी कमी होत आहे कि काय असं तिला वाटत होतं. तो मात्र एका लयीत चालला होता. तो दमला होता हे खरं पण त्याचं चालणं अजूनही ताठ होतं. काही ठिकाणी पाउल बुडेल इतकं तर काही ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त पाणी साचलं होतं. चालता चालता मधेच तो तिला रस्त्याच्या कडेला घेत होता, कधी गाड्यांपासून लांब घेत होता. कधी विचारून तर कधी उत्स्फुर्तपणे. पण आता ती कोणतीही हरकत घेत नव्हती. ना तिच्या वागण्यात अवघडलेपणा उरला होता. दोन तासांची ती पायपीट तिला वर्षानुवर्षासारखी वाटू लागली होती. ते एका गल्लीच्या तोंडाशी आले. आणि गल्लीच्या शेवटच्या टोकाशी तिला अखेर तिची सोसायटी दिसली. सगळा थकवा अचानक उडून गेला. त्या दिशेने बोट दाखवत ती जवळ-जवळ ओरडली. “ते माझं घर.”
एवढ्या तासात पहिल्यांदा त्याने तिला आनंदात पाहिलं. मोहीम फत्ते झाल्याचं विजयी तेज तिच्या डोळ्यात तरळलं. तिला हसताना पाहून त्याला मनातून फारच आनंद झाला. मनावरचं एका जबाबदारीचं फार मोठ ओझं हलकं झाल्यासारखं त्याला वाटलं. “नशीब! देवा! पोचलो एकदाचे” तिने हात जोडून आभाळाकडे बघत डोळे मिटले. काहीही केलं तरी ती त्यच्या फार तर खांद्यापार्यांतच येत होती हे त्याला पुन्हा एकदा जाणवलं. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर आलेलं हसू त्याला आलं. तिने पाहिलं. पण यावेळी ती सुद्धा मनापासून हसली. तेवढ्यात समोरच्या गेटमधून एक माणूस आणि एक छोटं मूल अशा दोन आकृत्या त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसल्या. अंधार होता त्यामुळे चेहरे दिसत नव्हते. पण तिने बरोबर ओळखलं. ती जवळ-जवळ त्या दिशेने धावू लागली. तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत तो मोठ्याने म्हणाला “सावकाश. जरा सांभाळून जा.”
मागे वळून न बघता तिने उत्तर दिल “हो....”
लांब जाणार्‍या तिच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे तो एक टक बघत तिथेच उभा राहिला. समोरून साधारण तीन-चार वर्षांचं एक छोट मूल धावत तिच्या कडे आलं. ती रस्त्यातच खाली गुडघ्यावर बसली आणि तिने तिला घट्ट मिठी मारली. त्याची जबाबदारी संपली. “आई......” त्या मुलीने तिला घट्ट मिठी मारत आपला बांध फोडला.
आपल्या पिल्लाला बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला बिलगताना ती सगळं विसरली. तेवढ्यात एक माणूस तिच्या जवळ आला. ती उभी राहिली. तिने आपल्या मुलीला उचलून कडेवर घेतलं.
“नशीब तू सुखरूप घरी आलीस. आम्हाला किती काळजी वाटत होती माहित आहे. तुझा फोनसुद्धा लागत नव्हता. काय करावं काही सुचत नव्हतं". त्याने तिला आणि मुलीला जवळ घेतलं.
“खरंच नशीब. पोचले एकदाची. आता मात्र पाय उठत नाही आहेत. आज पावसाने कहर केला.”
“अगं पण तू आलीस कशी? आणि एकटी? तो कोण होता सोबत?”
तिला अचानक त्याची आठवण झाली.
“अरे त्याच्याचमुळे मी आज घरी पोचू शकले. तो मला गाडीत भेटला आणि...” तिने मागे वळून पाहिलं. पण तो तिथे उभा नव्हता. ती गोंधळली. आपल्या नवर्‍याला आणि मुलीला बघून तिचं भान एवढं हरपून गेलं की तो मागून कधी निघून गेला तिला कळलंच नाही. तिला फारच अपराधी वाटू लागलं. ‘काय वेडे आहोत आपण’ तिचा तिलाच राग आला. एवढ्यात तिचा नवरा म्हणाला “हो मी पाहिलं त्याला तुझ्या सोबत अत्ता. पण गेला कुठे इतक्यात?”
ती कावरी-बावरी झाली “माहीत नाही.”
“पण नशिबच म्हणायचं तो होता. कोण होता तो? किमान आभार तरी मानले असते त्याचे”
‘खरोखर आपल्या सारखे मूर्ख आपणच'. तिला आता स्वतःचा आणखीनच राग आला. ‘त्याने आपल्याला एवढी मदत केली. आणि आपण साधे त्याचे आभार सुद्धा मानले नाहीत. त्याला किमान घरी बोलवून दम टाकू दिलं असत. पण नाही. आपलं कुटुंब दिसलं आणि कसलंच भान उरलं नाही. किती तो स्वार्थीपणा.’ तिचा चेहरा पडला. तिच्या नवर्‍याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. “असो. आता तू आलीस हे जास्त महत्वाचं. चल लवकर घरी. किती भिजलीयेस तू. आजारी पडशील. सगळेच काळजीत आहेत दिवसभर.” ते तिघे घराच्या दिशेने चालू लागले. तिने घडला सगळा प्रकार त्याला सांगितला. “भली माणसं असतात. बरं त्याचं नाव काय? म्हणजे पुन्हा कधी चुकूनमाकून भेटला तर आभार तरी मानता येतील.” आता मात्र हद्द झाली. आभार मानायचे फार लांब राहिले. आपण साधं नाव सुद्धा विचारलं नाही त्याला.
तिच्या मनावरचं ओझं वाढू लागलं. खरंच चुकलं आपलं. ‘देवा! अजून एकदा आमची भेट घडव. फक्त एकदा.’ पण देव सुद्धा आपल्यावर हसत असेल असं तिला वाटलं.
तिने आपल्या मुलीला जेव्हा घट्ट मिठी मारली तेव्हाच तो तिथून निघाला होता. ती आता तिच्या माणसांकडे सुखरूप पोचली आहे याची खात्री त्याला पटली होती. तिला सोडून स्वतःच्या घराकडे चालू लागल्यावर मात्र आता त्याला आपण दमलोय हे जाणवू लागलं. पण डोळ्यात तिचं चित्र तरळत होत. पहिलं वहिलं, जेव्हा ती बावरलेल्या नजरेने गाडीच्या दारात उभी होती. दिसायला अगदी अप्सरा नसली तरी तिच्याकडे बघत राहावं अशी होती. तिची ती छबी त्याने डोळ्यात साठवली होती. पण त्या पहिल्याच नजरेत त्याला तिच्या गळ्यातलं छोटसं एका मण्याचं मंगळसूत्र सुद्धा दिसलं होतं. गेले काही तास सतत तिच्या सोबत असताना त्याने आपली अदब आणि मर्यादा जराही सोडली नव्हती. तो तिला दर वेळी योग्य तो मान देऊन आणि अंतर राखून मदत करत होता. पण ती त्याच्या कायम लक्षात राहणार होती. ती, आणि तो पाउस. प्रत्येक वेळी एखाद्या नात्याला नाव आणि व्याख्या द्यायची गरज नसते. काही नाती न समजणारी असतात. पण म्हणून त्यांचं महत्व कमी होत नाही. ती फक्त अनुभवायची असतात आणि जमेल तशी जपायची असतात. नंतर जेव्हा ती आठवतात तेव्हा त्या आठवणी फार सुंदर असतात.

कथा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

10 Jul 2020 - 7:19 am | प्राची अश्विनी

आवडली कथा.

सनईचौघडा's picture

10 Jul 2020 - 8:09 am | सनईचौघडा

मस्त कथा रोजच्या मुंबईच्या जीवनात कधीतरी घडणारी.

आवडली.

रातराणी's picture

10 Jul 2020 - 12:34 pm | रातराणी

गोड कथा :) mr अँड mrs अय्यर आठवला.