सभा आणि मागच्या-पुढच्या वेळा

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
6 Jul 2020 - 2:52 am

वेळ- सभेचा दिवस

शनिवार होता, सकाळपासूनच प्रंचड उत्सुकता होती, साहेब काय बोलणार?, कामावरुन बरोबर सहाला सुटला तो, शहरातल्या तलावाच्या जरा अगदी पुढे बाजूच्या रस्त्यावरच सभा असणार होती, नेहमी नेमका वर्दळीचा, गाडयांनी भरलेला रस्ता आज माणसांनी भरुन जाणार होता, इतके दिवस तो साहेबांना टीव्हीवरच बघत होता, आज प्रत्यक्ष बघायचं होतं, साहेबांच्या नावातच वलय होतं, करिश्मा होता. समोरच्याला मोहित करेल, भारावून टाकेल असचं भाषण करायचे. समोरचा त्यांच्या कितीही विरोधी विचाराचा असो…. साहेबांच्या भाषणनंतरच्या पुढच्या क्षणाला साहेबांच्या ओंजळीत आपलं मत टाकावा इतकं काहीतरी विलक्षण होतं त्यांच्या वाणीत, इथल्या निवडणुक आयोगाने जर सभेनंतर दुस-या क्षणाला लगेच तिथल्या तिथे निवडणुकीची मुभा दिली असती तर अख्खा महाराष्ट्र एव्हाना साहेबांनी काबीज केला असता, लोक नुसते साहेबाचें पाठीराखे नव्हते तर फॅन होते, एक खूप मोठा तरुणांचा वर्ग त्यांच्याकडे आशा लावून बसला होता, लोकांना आपला राग व्यक्त करणारा, आपल्या बाजूने बोलणारा, इथले प्रश्न तडीस नेण्याची गोष्ट करणारा, घडणा-या प्रत्येक घटनेवर आणि विषयावर आपली सदसद्विवेकबुद्धी वापरुन भूमिका मांडणारा नेता हवा असतो जो त्यांच्या भावविश्वातलं सगळं जग समावून घेईल, कुणीतरी आपल्या मातीतला आपला वाटणारा तितकाच बंडखोर लीडर हवा असतो, ते सगळं त्यांच्यात होतं, पण नुसती तरुणच नव्हे तर समाजातल्या सगळ्या गटातटात त्यांच्याबदल कुतूहूल होतं, आदरयुक्त भीती होती, अप्रूप होतं, हेवा होता, सगळं आयुष्य उधळून दयावं असचं व्यक्तिमत्व…. आणि तशी प्रत्यक्ष जीवापाड प्रेम करणारी लोकंही होती….. गर्दी ही अफाट जमायची, मात्र त्याने त्यांची सभा प्रत्यक्ष कधीच अनुभवली नव्हती, आज कामापासूनच जवळच सभा होती आणि दुस-यादिवशी रविवार होता त्यामुळे आराम, मग काय रात्री किती पण उशीर झाला तरी चालेल. संध्याकाळी साडेसातपर्यंत चालू होईल सभा, तो सभेच्या मागच्या बाजूला जाऊन उभा राहायला तिथंही रस्ताच होता, तो ही वाहतुकीसाठी बंद ठेवलेला, साहेब तिथूंनच स्टेजच्या दिशेने येणार होते, खूप उत्सुकता होती, सध्या काही निवडणुका नव्हत्या, निव्वळ लोकांमध्ये आपली बाजू मांडण्यासाठीची एक सभा होती, तिथं आजूबाजूला सतत कधी येणारं, कधी येणारंची विचारणा चालली होती, मागच्या सगळ्याच निवडणुका या पराभव पाहणा-या आणि एकूणच कार्यकर्ते, पदाधिकारी यांना निरुत्साही करणा-या होत्या, आजूबाजूची लोकांची मत ही पक्षाच्या फेवरमध्ये बोलणारी नव्हती, पक्षासाठी सारचं निराशाजनक होतं….. लोकसभेत एकही पक्षाचा खासदार नव्हता आणि विधानसभेवर फक्त एकच, त्यामुळे येणा-या काळासाठी जोरदार प्रयत्न आतापासूनच सुरु होते, सध्याचं वातावरण विरोधीपक्षास पोषक बनत चाललं होतं, कसली तरी जोरदार उपेक्षा पदरी पडल्याची भावना लोकांमध्ये होती, या अश्या वातावरणातली मत आपल्या बाजूने करण्यासाठीची ही सभा, आणि इतर ही बरेच विषय बोलण्यासारखे होते, तो ही तिथं जाऊन उभा राहिला, न्यूजपेपरमधून आणि मराठी वृत्तवाहिनी यावरुन दाखवणा-या व वाचनात येणा-या राजकीय घडामोडी येवढंच काय ते राजकारणचं आकलन होतं त्याचं, आता तो तिथं उभा होता वाट बघत, एखादया चित्रपटाला शोभावी तशी साहेबांची इन्टरी झाली, सहा-सात सफेद गाडया, पोलीसांचा लवाजमा, मीडियांच्या गाडया सारं काही एकापाठोपाठ एक येत होत्या, आणि तितकीच जोरदारपणे लोक साहेबाच्यां नावाने घोषणा देत होते, लोकांचा हा… हा…. गराडा जमला होता…. पण पोलिसांचा बंदोबस्त तितकाच तगडा होता, त्याला जे साहेबं प्रत्यक्ष बघायचे होते ते निमूटसे का होईना ओझरते दिसले, ते गेल्या गेल्या मंचाचा ताबा घेत बोलायला लागतील अशी त्याला काय, कुणालाच अपेक्षा नव्हती, पण तसं झालं नाही, ते लगेचच भाषण देणारं असल्याचं कळालं, इकडे मागे उभे राहून काहीच दिसणार नव्हतं , पाठमोरे पडदे लावले होते, फक्त साहेबांना येताना बघता यावं यासाठीच त्यांच्यासारखीच खूप सारी पब्लिक स्टेजच्या मागच्या बाजूला उभी राहिली होती, ती आता तिथूनं निघत दुस-या गल्लीतून थेट स्टेज जिथून दिसेल तिथून भाषण ऐकायला पुढच्या बाजूला जाणार होती, अंदाज चुकला पुढच्या गल्लीतून मेन जिथून हा पूर्णपणे सभामंडप दिसेल अशी जागाच उरली नव्हती, सगळं पॅक होतं, लोक कुठल्या कुठल्या फांदीला, खांबाला टेकू बनवून चिकटून उभे होते, पुढचे तेवढे काही बसले होते, हे काही मोकळं मैदान नव्हतं, चिंचोळया रस्त्याच्या दोन्ही बाजूही बंदिस्त होत्या. तरी एका ठिकाण्याहून आत शिरण्यास वाव होता, आत त्या गर्दीत घुसण्याशिवाय पर्याय नव्हता, पाठीवर एक बॅग होती त्यात डबा होता आणि थोडे पैसे होते, त्यामुळे ती खांदयाला बॅग पाठमोरी न लावता पोटाशी घेत तो आत शिरला, आत कुठेच जागा नव्हती तरी पाठीमागून अजून लोक ढकलत होते, इकडे साहेबांची सभा सुरु झाली आणि कमाल म्हणजे त्यांनीही या जागेबदल पोलीसांना बोललेंच “सभा मैदानातच घ्यायला हवी होती….रस्त्यावर नव्हें”, तो थोडासा आत शिरला पण तरी काही दिसण्यास वाव नव्हता, समोर फक्त माणसांची डोकीच दिसत होती, भाषण सुरु झालं तरी तो आणि इतर अनेक लोकं तिथें उभ्या असलेल्या जागेबाबत समाधानी नव्हतें, आता तिथून हलणं मुश्कील होतं मग काय नुसतं तिथं उभं राहून ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता, किमान दीड लाख लोक त्या चिंचोळया रस्त्यात भाषण ऐकण्यासाठी उभी होती, त्यातही एखादा त्या घुसलेल्या लोकातून बाहेर येणारा आणि त्यातही अजून आत शिरणारा होताच, यावेळी इतरवेळेसारखा केबल कट करुन भाषण न दाखवणं या सारख्या गोष्टीने भाषण प्रसारास रोख बसणारं नव्हती कारण भाषण फेसबुकवर लाईव्ह होतं, साहेब टिवीटर यायला अजून अवकाश होता, तिथं पुढेच उभ्या असलेल्या मोठया स्क्रीनवर थेट लाबंच भाषण समोर दिसत होतं आणि स्पीकर पण लावला होता आवाजासाठी, पण त्यात मजा नव्हती, सगळं वातावरण पुन्हा नव्याने पक्ष उभारण्यासाठी सुरु केलेलं, तिथल्या उभ्या असलेल्या लोकांची सगळी धडपड भाषणातला एकही शब्द सुटू नये यासाठीचं होती.

साहेब जोशात होते, भाषणाच्या पहिल्या वाक्यापासूनच आजचा सूर कळत होता, “आम्ही ब्लूप्रिटं सादर केली नी भाजपने ब्लू फिल्म!” गुजरात निवडणुका ऐन भरात होत्या, गुजरात प्रतिष्ठेची लढाई पंतप्रधानांनी केलेली किंवा मीडियाने मुददाम बनवलेली होती. सध्या साहेबांचे प्रमुख विरोधक हेच, साहेब आज एक एक करत सगळ्या विषयावर बोलत होते, महागाई, भष्ट्राचार, बकाल शहर, उदास राजकारणी, स्थानिक भूमिपुत्र, रोजगार, अस्मितेचं राजकारण, बुलेट ट्रेन, गुजरात-जैन, शाकाहारी-मांसाहारी, भारत माझा देश आहे, बाकीची राज्य, अस्मितावाद, कुपणं-शेत, विदर्भ, पंतप्रधान, नोटबंदी, योगा, दंडुके, पत्रकार, मालक-संपादक, खोटया केसेस, मुंबई तोडण्याचा डाव आणि फेरीवाले….. जे काही बोलत होते ते पोटतिडकीने बोलत होते….जवळजवळ एक तास भाषण चाललं…भाषणाच्या शेवटी ते बोलले “बांबानो हे जे मी आपल्याला सांगतोय…. समजावतोय…. विचार करा या गोष्टींचा…. माझा वेळ जात नाही म्हणून हे मी तुम्हाला सांगत नाहीय, मला जे वाचताना, फिरताना, बघताना, ऐकताना जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडतोय, जसा मी पाहतोय….. तसा मी ऐकतोय…. तसं मला असं वाटत की तुम्ही देखील आजपासून पाहायला सुरवात केली पाहिजे ….. ऐकायला सुरवात केली पाहिजे, बघायला सुरवात केली पाहिजे, का हे? असं का? हे असचं का? अश्याच गोष्टी का होतायतं? जो पंधरा-वीस वर्षापूर्वीचा जो सलोखा होता सर्व समाजामधला तो जर निर्माण होणार असेल तर पहिला हात राज ठाकरेचा पुढें जाईल आणि वेगळं काही करायचा प्रयत्न केला तर हाच हात वर जाईल…. हे सगळं जे काही आजूबाजूला चालू आहे हे तुम्हाला समजावं….. कळावं…. याच्यासाठीचा हा मी आपल्यासमोर इथं आलो….. तुम्ही सतर्क राहा….. बेसावध राहू नका….. माझं महाराष्ट्राला…… सतत सागणं आहे….. माझं तें मागणंच आहे…. की माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या….. मराठी बांधवानो….. बेसावध राहू नका….. सगळे तुम्हाला गिळायला बघतायतं….. गिळले जाऊ देऊ नका….. एवढीच आज प्रार्थना आपल्या समोर करतो….. आणि आपल्या सर्वाची रजा घेतो….. धन्यवाद….. जयं हिदं….. जय महाराष्ट्र….”

लोक आता निघायला लागले, त्यांने पण आता परतीचा रस्ता बघायला सुरवात केली, हे जे आता ऐकलं त्याने डोक्याचा पार भुगा होतो, काही कळतं नाही, या मांडलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर काय…देऊन टाकावं का मत….पण त्या फेसुबुकच्या लाइव्ह भाषणाखालच्या कंमेन्ट वेगळ्या विरोधी विचार करायला भाग पाडतात…

वेळ- साधारण तीन महिने अगोदर

त्या रात्री त्यानें साडेअकरापर्यंत टीव्ही चालू ठेवला होता जशी झोप आली तशी त्याने बंद करायला घेतला, न्यूज चॅनेल होतं, बातमी होती, एल्फिस्टन स्टेशनचं प्रभादेवी नामकरण करण्याविषयी, तो झोपी गेला, दुसरा दिवस उजाडला, तो कामावर गेला, तो जिथं कामाला होता तिकडे कामावर इंटरनेट इतर गोष्टींसाठी बंद, तिथं मोबाईलची रेंजच यायची नाही, आफिसच्या बाहेर जावं लागे, त्यामुळे बातमी कळणं कठीण होतं, बातमी आली, आजूबाजूची लोक काहीतरी “स्टमप्रेड…. स्टमप्रेड…. अपघात…. त्या पूलावर कसं काय शक्य एवढी माणसं….” आहे वैगेरे बोलत होती….. बातमी तीच एल्फिस्टन पूलासंदर्भातील…..लंच झाला, त्यात कंपनीत आज कसलातरी इन्जॉयमेंटचा कार्यक्रम होता, सगळ्याना या बातमीच काही गांभीर्य नव्हतं, तिथं मस्त केक वैगेरे कापला जात होता….रात्री साडेनऊच्या न्यूज चॅनेलच्या डिबेटवाल्या चर्चा जोरदार होत्या, लगेच दुस-या दिवशी सरकार कामाला लागलं. जिथं रोज त्या प्रत्येक रेल्वेस्टेशनपाशी, तिथल्या पादचारी पूलापाशी जी लोकं बसायची ती अचानक गायब झाली, खूप सा-या मोकळ्या जागा दिसू लागल्या, तिथं ते मेंदूवडा विकणारे, खाणारे, वरुन तिथचं खाणा-याकडे भीक मागंत आपल्यासाठी मेंदूवडा घ्यायला लावणारे भिकारी, गजरा विकणारे, लुळे पागळें, हातात कटोरे घेत तुमच्या आतला खरा माणुसकीचा आत्मा बाहेर काढणारे भिकारी, मोबाईल कव्हर-इअर फोन विकणारे, सगळे-सगळे गायब होते, त्या रोजच्या पादचारी पूलापाशी आता मोकळेपणाने चालता येत होतं…. हे सगळं केव्हा झालं जेव्हा कुणीतरी आपला जीव गमावला तेव्हा… इथं मरण एकदम सजून सवरुन येतं…. असलं भयानरुप दाखवतं की काळीज पिळवटून जातं… तरीसुदधा लोक बोलतात “हे तरं होणारचं होतं….” कश्याचा तरी प्रचंड हव्यास, मजबूरी आणि सदाबहारतेचा शाप असलेली मायजाल मुंबई…. यांचा परिपाक….. अजून दुसरं काय?

वेळ- सभा सुरु होऊन थोडा अवकाश झालायं

आता त्यात एक दारुडा आत शिरला, अख्ख्या त्या सभेची आयमाय करायला टपलेला, तिथं भाषणाच्या त्या प्रत्येक शब्दागणिक हा काय ना कायतरी वेगळंच बरळत होता आणि तिथलं अर्ध पब्लिक भाषण ऐकायचं सोडून यांच्या त्या फालतू बोलण्याला ऐकून घेत होते, एकजण वैतागला त्यानं कानाखाली जाळं काढण्याची भाषा केली पण केलं काहीचं नाही, शेवटी काय झालं तर तो दारुडा ओरडतच होता “….एक नारा….“ त्याला त्या सभेतून बाहेर काढण्याऐवजी लोक ही ब्याद किमान इथं नको म्हणत सरळ सरळ आतमध्ये ढकलं जात होतें, तो आता कितीपर्यंत आत जात लोकांचा भाषण ऐकायचा लागलेला चांगला मूड बिघडवणार देव जाणे…

वेळ- सभा संपल्यानंतर फेसबुकवर दिसलेली एका जाणत्या चित्रपटसमीक्षकाची छोटीशी राजकीय पोस्ट

“तो गॉडफादर पेक्षा बॅटमॅन जास्त वाटतो, आणि याइथल्या गोथॅम शहरातल्या जोकरची जिरवायची असेल तर बॅटमॅनला त्यांच्या मूळ फॉर्मत परतावचं लागेल”

वेळ- सभा आटोपल्यावर निघतानाच्या गर्दीकडे पाहत त्यांच्या मनात आलेले विचार

एखादया चांगल्या वक्ता असलेल्या नेत्याला अजून काय लागतं, ही लाखोची पब्लिक, शांतपणे आणि येणा-या प्रत्येक वाक्याला अपेक्षित येणारा टाळ्यांचा प्रतिसाद, हेवा वाटावा… असचं सारं…. पण ही लोक जातात कुठे नंतर….. का हयाची वोटींग कार्डच बनलेली नाहीत हा प्रश्न पडावा ?…..

आजूबाजूच्या परिस्थितीची उत्तम जाण, भविष्याचा अंदाज ओळखत, इतिहासाचे रफेरन्स सांगणारा, कलेची जाण असलेला, साहित्याविषयी आदर असणारा, या राज्याबदल…. इथल्या आपल्या लोकांबदल कळकळ असणारा….. असं सगळं…… एखादया राजकारण्याकडे क्वचितच आढळणारे गुण असूनदेखील इथली जनता अपेक्षित प्रतिसाद निवडणुकीत का देत नाही…. हे प्रश्न त्यांला एकटयालाच पडत नसतं….

कधीकधी वाटत की हा माणूस काहीतरी पुढचं सांगू पाहतोय आणि हया इथल्या लोकांची ते ऐकून घेण्याची तयारीच नाही, लोक ‘बदल’ या संभावनेलाच टाळू पाहतात, त्यांना असं थोडसं विचार करायला लावणारं काहीएक नकोय, इतिहासाचे संदर्भ देणारे, अस्मितेचा भावनिक हुंकार देत अस्तित्वाची जाणीव करुन देणारं काहीएक नकोय….

इथे आता लोक प्रत्येक दिवस साजरा करु लागलेत, त्यांना प्रत्येक क्षण नव्याने जगायचाय, मागचं पटापट विसरुन जायचयं, रोज नवे लाईक, नवे अपडेटस, लोकांना रोज नवीन काहीतरी वेगळं हवं आहे, ते आता कश्याचचं भान ठेवतं नाहीत, सगळं विसरुन जातात, जागोजागी आता उत्साह आणि उत्सव साजरी करण्यासाठीच्या साधनाची दुकान वाढत चालीयतयं, येणा-या प्रत्येक दिवशी माणूस शोधून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो, आपली मानसिक अवस्था, पद, मेहनत, वाटणं, जगणं, शोधण तो सोशल मिडियाच्या स्टेटसच्या प्लॅटफॉर्मवर मांडून जातो, व्हॅटसअप, कॅन्डी करश, इन्सटाग्राम यात लोक चांगलाच वेळ घालवतात, राजकीय पक्ष तिथें ही येतील आणि त्यांना ही ते अपरिहार्य असेल. पण तिथं त्या सोशलमिडियावर पण फेमस असुनसुदधा निवडणुकीत अपयश का ? “निवडणुका येता-जातात” हे वाक्य टाळायला हवं का?, ते नसायला हवं! पुढची “प्रत्येक निवडणुक शेवटची” अशीच म्हणून लढायला हवी.

मेहनत कार्यकर्ता करतो माणसाला माणूस जोडतो, तो तिथं ख-या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ होतं सगळ्या समाजाला एक करतो, हवं तरं नेत्याच्या कानात सांगतो की इथं या समाजाच्या विरोधात वाक्य नको, सगळी माणसं आपलीच आहेत…

काहीना प्रत्येक दिवस जगणंच महत्तवाचं होऊन बसलयं…नाही जगावसं वाटलं की आत्महत्या करतात, संवेदनशील कवी कविता करतात असल्या मरणावरं, काही जण कुजत कुजत तेच जगणं जगत बसतात… त्यांना या अस्मितावादाशी काही घेणं देणं नाही, त्यांना मराठी आलं तरी कवी काय नी कविता साहित्य आणि साहित्यिक कशाशी परिचय नसतो, त्याला आल्या प्रहरी जगायचं तेवढं माहित असतं, त्याला तुम्ही कसले सांगणार भाषावाद आणि अस्मितेचे हुंकार, कशी पेटवणार वादाची ठिणगी?

प्रत्येक वेळी वेन ड्रायग्राम सारखी अशी किती प्रकारची विभागणी आपण समाजात विचारानिहाय करणार आहोत, आणि नुसती मत मांडून विचार सादर करुन काय होणार, आणि दमदाटीच्या राजकारणाने कुठे काही दूरगामी परिणाम थोडीचं होतात, प्रत्येक गोष्टीत राजकारण करु पाहणारी बाकीची मंडळी जरुर तुमच्या या विचारणीय अस्मितावाल्या राजकारणांचा जरुर…. नक्की… शंभर टक्के फायदा उचलणार त्यांच काय?, इतिहासाविषयी एक वाक्य बोललं जात, “इतिहास, नाही म्हणत की माझ्यापासून काही शिका, तो म्हणतो सावध रहा मी पुन्हा घडेन” हे सगळं भयानक आहे…. कोण बरोबर कोण चूक काही कळतं नाही….

वेळ- सभा आटोपली.

सभा संपली तसे राष्ट्रगान सुरु झालं पण त्याअगोदर तिथल्या गर्दीची पांगापांग सुरु झाली, तो देखील तिथल्या बाकीच्या लोकांसोबत तिथल्या त्या छोटाश्या गल्लीतून वाट काढत बाहेर पडत होता, अंधार होता, लोक एकमेंकाचा हात पकडत बाहेर पडत होते, मध्ये-मध्ये “एल्फिस्टन एल्फिस्टन” असे गंभीरपणे हसत ओरडत होते, त्या गल्लीपलीकडे अजून एक रस्ता होता. तिथेंदेखील कार्यकर्ते होतेच. पलीकडे एक वेज हॉटेल ग्राहकांनी फुल तुंडूब भरलेलं होतं, बाहेरही तेवढीचं लोक उभी होती लाईनीत, त्यानें एकदा नजर फिरवली तो घरच्या वाटेला निघाला, मोबाईल चालू केला, जे काही भाषणात साहेब बोलले ते सगळं काही आता सोशल मिडियावर झळकत होतं, फेसबुक-टीवटर सगळीकडे तेच, बातमी म्हणून झळकताना, ज्यांचा तुम्ही हिस्सा होतात तींच जर बातमी असेल तर त्याचं काही विशेष अप्रूप तुमच्यापुरतं उरत नाही त्यांचदेखील तसंच झालं, रात्रीचे पावणेनऊ वाजले होते ट्रेन लागलीच होती फलाटावर, लगेच पकडली, गाडी पण कार्यकर्त्यांनी भरुन गेली होती, काहीतरी त्यांच्या त्यांच्या पुरता संदेश गवसल्याचं एकूणच चेह-यावरुन दिसून येत होतं, आता नऊ वाजले, स्टेशन आलं, तो गाडीतून उतरला, इथले त्या एरियातले खूप सारे कार्यकर्ते उतरले, त्यांच्या हातात पक्षाचें झेंडे, गळ्याभोवती पक्षाच्या नावाच्या घालायच्या पटटया होत्या, उतरल्यापासूनच जोरदार घोषणाबाजी सुरु झाली, आज घरी जायला उशीर होणारं म्हणून तो चालत न जाता बसने निघाला, त्यासाठी बसस्टॉपच्या लाईनीत उभा राहिला, थोडयावेळाने बस आली, आत त्या बसमध्ये सुदधा त्या सभेचीच चर्चा लोक करत होती, काही कार्यकर्तेही त्या बसमध्ये होते, गाडीने आता एलबीएस रोड क्रॉस केला. समोरच्या त्या रस्त्याला लागून लाईनीत चहावाले, टोपी आणि ब्लेट विकणारे, मोबाईल एअर फोन आणि कव्हर विकणारे, चायनीज भजी आणि भेळ विकणारे, फालूदा आणि आईसक्रीम कोन विकणारे, मेंदूवडयाची गाडी चालवणारे हे एकसाथ पळताना त्या बसच्या खिडकीतून दिसत होते, समजायला थोंडा उशीर झाला, ते मगाचेच ट्रेनमधल्यापैकीं काही कार्यकर्ते होते, बसमधली काही लोक “बरं झाल असंच पाहिजे” म्हणत होती, काही प्रवासी हळहळत होती, काही नुसतेच बघत होते, कंडक्टर सुटयापाश्यासाठी आग्रही होता, गाडी आता एलबीएसवरुन वळत मेन नगरात आत शिरली तसं सगळं दिसणं बंद झालं, तो घरी आला टीव्हीवर तेच भाषण आणि त्यांवरची चर्चा सुरु होती, निवेदक त्यांच्या पक्षाच्या कमबॅकची वार्ता करत होते, इतर पत्रकार त्यांच्या पक्षाला येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्र पिजूंन काढण्याविषयी सांगत होते, त्या पक्षाचे प्रवक्ते इतर सा-यांनी पंतप्रधानाच्या विरोधात एकवटण्याची भाषा करत होते. दिवस संपला होता, रविवार आरामात गेला, पुन्हा सोमवार सुरु झाला होता, तश्याच त्या संध्याकाळी परत तिथे त्या एलबीएसच्या रस्त्यावर ते तशेच लाईनीत विकायला बसले होते.

वेळ- सभेअगोदर काही दिवस. तारीख. तेरा ऑक्टोबर..

आजचा दिनविशेष, क्लुडिअस रोम स्रामाज्याचां राज्यकर्ता होता, मेला तो या दिवशी… कुणी मारलं याबदल इतिहास संशोधक शोध घेतायतं…. बाकी काही नाही….. राजकारण फार गढूळ असतं, ते तुरुटी टाकून लगेच पारदर्शी दिसायला लागत नाही…. एक एक थेंब सूक्ष्मदर्शीकेखाली घेऊन निरिक्षण करत अनुमान लावता येत नाही. साम-दाम-दंड-भेद. एंन्ग्री यंग मॅनला जोरदार डिवचलं… खूप सारेजण वाट पाहतायातं याचं उत्तर कसं असेल.

त्यांच्या इथल्या एका एरियात पोटनिवडणुक झाली, कुणी तरी हरलं, कुणी तरी जिकलं, तराजू हलला, कुणीतरी वल्गना केल्या, मुंबई तोडण्याची भाषा होती…खरचं…कुणीतरी सावध झालं… चक्र फिरली… खूप जलदगतीने एका कानाचं दुस-या कानाला कळणारं नाही इतक्या अलगदपणे हालचाली झाल्या….कटटरपणा…पक्षनिष्ठा….विश्वासघात….सगळ्यानां सगळं काही कळालं…लोकशाही…..वैगरे….सत्ता…डावपेच…ते पण..राजकारण इथं नाही मग आणखी दुसरीकडे कुठे करायचं….पारडं कुणाच्यातरी बाजूने झुकलं….कौरव कोण आणि पांडव कोण…काय फरक पडतो…पण साला महाभारत अजून रंगतदार झालयं…. नव्याने सुरु झालयं…तो आणि असे किती तरी जण यांच उत्तर कस दिलं जातयं त्यांची वाट बघतायतं….लोकशाहीत लोकप्रतिनिधी निवडुन देण्याचा मूळ मुददा म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीचा…..ही सगळी संख्याबेरीज….आणि हा खटाटोप त्यासाठीचा वाटतो का….मुळीच नाही…सहा नगरसेवक फोडले…बातमी झाली नंतर….

लेखनवाला किंडल ईबुक kindle ebook

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं UNCUT भाषण

-लेखनवाला

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

समाजअनुभव