जाज्वल्य राष्ट्राभिमान, थोरा मोठ्यांचे पुण्यस्मरण वगैरे...

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
22 Jun 2020 - 4:47 pm

या देशात जरा चुकीच्याच काळात आपण जन्माला आलो हि भावना आजकाल फार बळावते. स्वातंत्र्यानंतरची बहुदा दुसरी पिढी असावी आमची. येता जाता म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अगोदरच्या पिढीने केलेला अभ्यास, स्वतंत्र भारतात जन्माला आल्याचे भाग्य, वगैरे गोष्टी कानावर आदळत असत. स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलनात घेतलेली उडी, आसुडाचे फटके, नखं उपसून काढणे, दगडी घाण्याला जुंपून घेणे, फाशी जाणे अशा शिक्षा भोगणे असे सहन केलेल्या लोकांनाच राष्ट्राभिमानी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असे कुठे तरी वाटायचे.

हे कमी म्हणून कि काय, त्या वेळेस अभिनव असणारी गोष्ट म्हणजे परदेशी वास्तव्य. मग तिकडची स्वच्छता आणि शिस्त, भ्रष्टाचाराचा मागमूस नसणे, जीवनावश्यक गोष्टींनी ओसंडून वाहणारी दुकानं अशी परीकथाच वाटावी अशी वर्णनं. आणि इथे आपण रेशनच्या रांगेतून गॅसच्या रांगेत, घरी आल्यावर डोळे ताणून धान्य निवडणे अशी कामं करून कसाबसा अभ्यास करतो. सततची टंचाई, कपात, आणि रांगेत उभं राहणं हेच वैशिष्ठ्य जणू काही होऊन गेलेलं होतं. अशावेळेस कुठला असणार आपल्या देशाचा अभिमान? तरीपण जमिनीच्या ज्या तुकड्यावर आपण उभे आहोत त्याच्या विषयी प्रेम वाटले नाही तरी कृतघ्न व्हायचे नाही एवढे धोरण स्वतःशी बाळगले. पुढील काळात मिळवता झाल्यानंतर सहसा कधी कच्च्या पावतीचा व्यवहार केला नाही, 'पावती फाडायची कि कसं' असं पोलिसांनी विचारल्यावर पावती फाडा असे स्पष्ट सांगण्याचे धाडस आणि अशाच काही सोप्या गोष्टी यालाच देशाची सेवा समजून वागत राहिलो.

होता होता या देशातील जगणेही हळू हळू सुसह्य व्हायला लागले. बऱ्याच गोष्टींसाठी परदेशाचे अप्रूप वाटावे अशी काही परिस्थिती राहिली नाही. कपडे, सुगंधी द्रव्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी परदेशी ब्रॅन्डच्याच मिळू लागल्या. जीवनावश्यक गोष्टींची रेलचेल तर इतकी वाढली कि चीनच्या युध्दात एकवेळ जेवून राहणं किंवा तांदूळ आणि साखर अशा वस्तू टाळणं या गोष्टी नव्या पिढीसाठी अतर्क्य प्रकारातल्या झाल्या. आता अशा देशाबद्दल कुणाला प्रेम वाटणार नाही? मग त्या प्रेमाचे अविष्कार देखील जन्माला आले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लफ्फेदार फेटा बांधणं, मुलींनी कचकचीत नऊवारी नेसणं, कपाळावर चंद्रकोर आणि हनुवटीवर तीळ असा सरंजाम करून फोटो काढणं आणि हेटाळणी आणि धिक्कार करण्यासाठीच असलेल्या जमातीवर शेरेबाजी करणं असा साधा सोपा राष्ट्रवाद जन्माला आला. म्हणूनच वाटतं आपल्या जन्माची वेळच चुकली. आपला राष्ट्रवाद अजूनही आसुडाचे फटके, दगडी घाना आणि फाशीच्या दोराभोवती घुटमळतो आहे.

समाजविचार

प्रतिक्रिया

सामान्यनागरिक's picture

22 Jun 2020 - 6:20 pm | सामान्यनागरिक

किती दिवस आपण " अमक्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवुन दिलं " म्हणुन त्यांच्या पुण्यतिथीला / जयंतीला गोडवे गात रहाणार आहोत. स्व्ततंत्र्यानंतरची तिसरी पिढी आहे. त्यांना २ ऑक्टोबरला उगीचच ड्राय डे असतो हे खुपतं. आपणही ढोंगी पणाने " नाही... नाही..... गांधी जयंतीला दारु ? छे छे ! " असे म्हणत त्यांना दाबत रहातो.

आजच्या पिढीने लोकांनी आपल्या आजोबांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला या गोष्टीचे भांडवल करुन अनेक सवलती लाटल्याचे पाहिले आहे. आणि त्यांचे नांव घेऊन राजकारणात अनेक कोलांट्या उड्या मारल्याचे पाहिले आहे. त्यांना राष्ट्रवाद कसा शिकवणार ?

निदान फ़ेसबुक / इन्स्टाग्राम साठी का होइना, ते भारत माता की जय म्हणतात हेच खुप झालं. बाकी जेंव्हा वखत बडा बांका येईल तेंव्हा काळच शिकवील त्यांना.