पुस्तक परिचय - The Great Game

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
20 Jun 2020 - 12:51 pm

(पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच दोन भागात हा पुस्तक परिचय देत आहे.)
पुस्तक : The Great Game
लेखक : Peter Hopkirk

ग्रेट गेम म्हणजे काय? ग्रेट गेम हा शब्द जरी रुडयार्ड किपलींग या इंग्रजी लेखकाच्या किम या पुस्तकामुळे लोकप्रिय झाला असला तरी त्याआधी सुद्धा हा शब्द वापरण्यात आला होता. एकोणवीसाव्या शतकात ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांच्यात मध्य आशियावर वर्चस्व ठेवण्यासाठी जो संघर्ष झाला त्यालाच ग्रेट गेम असे नाव दिले गेले. या संघर्षात मुख्य खेळाडू होते रशिया आणि ब्रिटन. दोन्ही देशांना मध्य आशियात वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. असे असले तरी हे दोन देश मध्य आशियात कधीच एकमेकांसमोर युद्धासाठी उभे ठाकले नाही. एका बाजूने रशिया उत्तरेकडून दक्षिण दिशेने भारताकडे सरकत होता तर ब्रिटन रशियाला भारतापासून दूर ठेवण्यासाठी दक्षिणेकडून उत्तरेकडे जात होता. अगदी बुद्धिबळासाख्या वाटणाऱ्या या खेळात डाव, प्रतिडाव, चाली, प्रतिचाली, आतराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, आक्रमण, प्रति आक्रमण सारकाही होते. आज जरी वाचताना हा एक रंजक थरार वाटत असला तरी हा सारा रक्तरंजित इतिहास होता. सत्य हे कल्पनेपेक्षा किती भयंकर असते किंवा असू शकते याची जाणीव करुन देणारा साम्राज्यशाहीचा रक्तरंजित इतिहास होता.

एकोणवीसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातच संपूर्ण भारतभर ब्रिटिशांचे राज्य पसरले होते. भारत हे ब्रटिशांच्या हातातले फार सधन राज्य आहे अशी समजूत युरोपात होती. ती खरीही असली पाहिजे त्याचमुळे भारतावर परदेशी आक्रमणे होतील अशी भिती ब्रिटिशांना वाटत होती. एकोणवीसाव्या शतकात पूर्वार्धातील नेपोलियनचा काळ सोडला तर ब्रिटिशांना टक्कर देऊ शकनारी तोलामोलची शक्ती होती रशिया. रशियाला मध्य आशियातील व्यापारावर वर्चस्व गाजावायचे होते आणि हळूहळू भारताकडे सरकायचे होते. तेंव्हा संघर्ष अटळ होता. पुस्तकाविषयी जाणून घेण्याआधी त्याकाळातली भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती जाणून घेऊ या.

भौगोलिक आणि राजकिय परिस्थिती: आज जर जगाच्या नकाशावर नजर टाकली तर कॉस्पियन समुद्र आणि चीन यांच्या मधे जे देश दिसतात त्या भागाला मध्य आशिया असे म्हणतात. या भागाच्या उत्तरेला रशिया तर दक्षिणेला इराण, अफगाणिस्तान असे देश येतात. उझबझकीस्तान, तुर्कमानस्तान, ताझाकिस्तान आणि चीनमधील काशगिरीया (आताच्या चीनच्या XUAR चा काही भाग)या देशांचे उल्लेख हे ग्रेट गेम मधे येतात. पूर्वी या संपूर्ण भागाविषयी फार कमी माहिती होती. युरोपियन लोक मध्य आशियाच्या संपूर्ण पट्टयाला टाराटारीया असे म्हणत आणि तिथल्या लोकांना टारटर म्हणत. मंगोलियन सुलतान चंगेज खान याने तेराव्या शतकात मध्य आशियातील संपूर्ण परिसर जिंकला. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या मुलाबाळांनी नातेवाईकांनी भाग वाटून घेतला. हेच ते खानेट. हा मुख्तत्वे वाळवंटी भाग या वाळवंटात ओएसिसच्या आसपास जी शहरे बसली होती त्यावर या खानेटसचे राज्य होते. यात प्रमुख होते खिवा, बुखारा, समरकंद आणि कोकंड (किंवा कोखंड) . तेथील मोठमोठ्या इमारती आणि व्यापारासाठी हि शहरे प्रसिद्ध होती. या मोठ्या शहरांच्या आसपास तुर्कमानच्या टोळ्यांचे राज्य होते. खाली अफगाणिस्तानातली महत्वाची शहरे हेराथ, काबूल आणि कंदहार होती. काबूलवर दोस्त महंमदचे राज्य होते. कंदहार हे सुद्धा दोस्त महंमदच्या प्रभावाखाली होते. हेराथवर कामरान शहाचे राज्य होते.

नक्की भिती काय होती? ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज जरी भारतात समुद्रमार्गे आले होते. ब्रिटिशांनी समुद्री सीमांची सुरक्षा राखली होती. त्यामुळे आता समुद्रमार्गे कुणी भारतात येणार नाही याची ब्रिटिशांना खात्री होती. सिकंदरच्या काळापासून भारतावर हिंदुकुश पर्वतातून खैबर खिंड किंवा बोलान खिंडातून आक्रमणे झाली होती. एकोणवीसाव्या शतकात सुद्धा तीच भिती होती. ही आक्रमणे थोपविण्यासाठी ब्रिटिशांच्या दृष्टीने अफगाणिस्तानचे महत्व अनन्यसाधारण होते कारण बोलान खिंड किंवा खैबर खिंड गाठायला अफगाणिस्तानातूनच जावे लागत होते. दुसऱ्या बाजूला रशियाच्या झारच्या राजधानीचे शहर होते सेंट पिटसबर्ग. हे शहर जरी बरेच उत्तरेला असले तरी ऱशियाचे साम्राज्य दक्षिणेत कॉस्पियन समुद्राच्या पश्चिमेला जॉर्जिया पर्यंत पसरले होते. इतकेच काय आताच्या आर्मेनिया आणि अझरबैझानचा भाग सुद्धा रशियाच्या ताब्यात होता. रशियाला आता कॉस्पियन समुद्राच्या पूर्वेकडे साम्राज्य वाढवायचे होते. रशिया असा साम्राज्यविस्तार करीत भारताच्या दिशेने वाटचाल करणार ही भिती ब्रिटिशांना अस्वस्थ करीत होती.

भारतावर आक्रमण करण्याचा अजून एक मार्ग होता. मूरक्रॉफ्ट नावाच्या एका ब्रिटिश प्रवाशाने एकोणवीसाव्या शतकाच्या सुरवातीलाच हा मार्ग सुचविला होता. काशगर, यारकंद आणि नंतर काराकोरम पर्वतरांगा ओलांडून परकिय सैन्य लदाखमधे येऊ शकते. त्या भागाची दुर्गमता बघता तेथे सैन्याची हालचाल करणे अशक्य आहे म्हणून ब्रिटिशांनी सुरवातीला तिकडे दुर्लक्ष केले. साधारण साठ वर्षानी ब्रिटिशांच्या लक्षात आले कि काश्मिरच्या वरील पामिर पर्वतरांगा (काहींच्या मते या पामिर पर्वतरांगा म्हणजे ज्याला आपण मेरु पर्वत म्हणतो तो. त्याला काही पुरावा नाही.) वाटतात तितक्या कठीण नाही. डोंगरांच्या मधे बराच भाग पठाराचा आहे. पामिरवरु बोर्गहिल खिंड मार्फत चित्रालला येऊन त्याकाळच्या ब्रिटिश भारतात प्रवेश घेता येऊ शकतो. पामिरहून इश्कमान या खिंडितून सरळ गिलगिट पर्यंत पोहचता येते. पुढे जाऊन ब्रिटिशांना या मार्गाचा सुद्धा बंदोबस्त करावा लागला.

सुरवात: ग्रेट गेमची सुरवात कधी झाली हे सांगणे कठीण आहे पण बरेच लोक १८३० च्या आसपास सुरवात झाली असे मानतात. पुस्तकाची सुरवात मात्र १७१७ सालच्या एका प्रसंगाने होते. प्रथमच रशियाने मध्य आशियाकडे आपला मोर्चा वळविला होता. एक रशियन सैनिक अधिकारी काही सैन्य सोबत घेऊन अतिशय खडतर प्रवास करीत खिवापर्यंत पोहचला. खिवासोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी, व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी तो रशियाच्या झारचा संदेश घेउन आला होता. खिवाच्या खानाने त्याचे स्वागत केले. खान स्वतः शहराबाहेर त्याला भेटायला आला. शहरात प्रवेश करताना खानाने सांगितले इतक्या मोठ्या रशियन सैन्याने जर खिवात प्रवेश केला तर तेथील नागरिकांमधे कोलाहल होईल. सैन्य तुकड्या तुकड्यामधे विभागून मग शहरात प्रवेश करावा. हा डाव तो रशियन अधिकारी ओळखू शकला नाही. जसे सैन्य छोट्या तुकड्यात विखुरल्या गेले. ते एकमेकांपासून दूर गेले तसे त्यांना वेगवेगळे गाठून त्या सैन्याची क्रूर कत्तल करण्यात आली. काहींना गुलाम बनविण्यात आले. त्या रशियन अधिकाऱ्याची सु्द्धा क्रूर कत्तल करण्यात आली. या अशा रक्तपाताची, विश्वासघाताची, फसलेल्या मुत्सेद्देगिरीची क्रूर कहाणी म्हणजे ग्रेट गेम. शेंभर वर्षाचा रक्तरंजित इतिहास म्हणजे ग्रेट गेम. असा खेळ जो या खेळातले खेळाडूं स्वतःच्या मैदानात खेळले नाही. दुसऱ्या कोणाच्या घरात जाऊन खेळले. त्याची किंमत त्यांना द्यावी लागली ज्यांच्या घरात हा खेळ खेळल्या गेला. काही ब्रिटिश अधिकारी तर काही रशियन अधेकारी यांचे जीव नक्कीच गेले पण तुर्कमानच्या टोळ्या, अफगाणिस्तान, खिवा, इराणाचा काही भाग या भागाचे नुकसान खूप मोठे होते.

प्रवास– ग्रेट गेममधे प्रवासाचा वापर एखाद्या सैनिकी शस्त्रासारखा केला होता. तेच शस्त्र लेखकानेही तितक्यात ताकदीने या पुस्तकात वापरले आहे. या पु्स्तकातील एकेक प्रकरण म्हणजे एका प्रवासाचे वर्णन आहे. तो प्रवास कधी आक्रमणासाठी केला असतो, कधी त्यात हेरगिरी असते, कधी मुत्सदेगिरी असते तर कधी फक्त साहसी प्रवास असतो. हेन्री पोटिंगर, मूरक्राफ्ट, वाटकेविच, इग्नेटीव्ह, शेक्सपियर, अलेक्झांडर बर्नेस, जेम्स अॅबॉट, बर्नबी, जॉर्ज हेवर्ड, कर्झन, Younghusband अशा कितीतरी प्रवाशांचे प्रवास वाचताना अंगावर काटा येतो. त्याकाळात नकाशे नव्हते, उंटाच्या तांड्यावरुन हे प्रवास व्हायचे. जिविताची, मालमत्तेची सुरक्षितता हा प्रवासातील सर्वात मोठा धोका होता. तुर्कमानच्या टोळ्या, बलुची टोळ्या, किंवा स्थानिक टोळ्या मध्य आशियातील विविध भागात सक्रिय होत्या. लूटमार, जीवित हानी, किंवा गुलाम बनविणे हेच काम या टोळ्या करीत असत. तुर्कमानच्या टोळ्या प्रवाशांना पकडून त्यांची खिवा, किंवा बुखाराच्या गुलाम बाजारात विक्रि करीत असत. या तुर्कमान टोळ्यांनी कास्पियन समुद्रात मासेमारीला आलेल्या रशियन मच्छिमारांना पकडून गुलाम म्हणून विकले होते. दुसरा मोठा धोका होता अतिशय खडतर परिसर आणि तेथील हवामानाचा. हिंदुकुश पर्वतांच्या रांगा, लदाखच्या उत्तरेकडील पर्वतरांगा, पामिरच्या पर्वतरांगा या भागातील प्रवास तेथील थंडी आणि दुर्गमतेमुळे कठीण होता. विस्तीर्ण वाळवंटामुळे मध्यआशियातले प्रवास खडतर होते.

साहसी प्रवाशांच्या प्रवासाचा मुख्य उद्देष होता नकाशे तयार करणे. मध्य आशियातला बराचचा भाग हा ब्रिटिशांच्या किंवा रशियाच्या नकाशावर नव्हता. त्यामुळे शत्रूचे सैन्य कोणत्या मार्गाने येऊ शकते किंवा तुमचे सैन्य कुठल्या मार्गाने प्रवास करु शकते हे समजण्यासाठी नकाशांची गरज होती. नकाशे मिळविण्यासाठी केलेले प्रवास बऱ्याचदा फार कमी ताफा सोबत घेऊन केलेले होते त्यामुळे त्यात खूप धोका होता. प्रवासातला हा धोका आणि थरार हीच या पुस्तकाची ताकत आहे. यातील प्रवास वर्णन कांदबरीसारखे लिहिले आहे. ‘तो हेराथला जाणाऱ्या ताफ्यात सामील झाला. त्याने सांगितले उद्या माझ्या सोबत माझा मित्र येणार आहे.’ अशा मांडणीमुळे हे इतिहासाचे पुस्तक असले तरी रंजक आणि थरारक वाटते. यातील काहींचे प्रवास यशस्वी ठरले, त्यांनी त्यांच्या देशाला महत्वाची माहीती पुरविली. तर काही प्रवासांचा भयानक अंत झाला. मूरक्राफ्ट ऑक्सीस नदीच्या तीरावर मेला, जॉर्ज हेवर्डची क्रूरपणे कत्तल करण्यात आली. प्रवास हा यशस्वी होईलच याची खात्री नसल्याने प्रवास वाचण्यातली उत्कंठा कायम राहते.

ब्रिटन आणि अफगाणिस्तान: ग्रेट गेमच्या इतिहासातील सर्वात काळा आणि रक्तरंजित इतिहास म्हणजे ब्रिटन आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष. अलेक्झांडर बर्नेस या ब्रिटिश अधिकाऱ्याने सिंधू नदीतून लाहोरपर्यंत प्रवास केला. त्यात त्याने सिंधूच्या आसपासच्या भागाची पाहणी केली, त्याची ब्रिटिशांना पुढे सिंध पांत ताब्यात घेताना मदत झाली. लाहोरवरुन तो पुढे काबूल आणि बुखारा पर्यंत गेला. त्याचा बुखारा पर्यंतचा प्रवास इतका गाजला कि त्याला बुखारा बर्नेस सुद्धा म्हणत होते. तो ब्रिटिश राजदूत म्हणून अफगाणिस्तानात कार्यरत होता. त्यावेळेला तेथे दोस्त महमदचे राज्य होते. दोस्त महमद रशियाची मदत घेतो आहे असा संशय ब्रिटिशांना आला होता. १८४२-४३ चा काळ होता. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ज्यांनी कधी अफगाणिस्तान बघितले नाही अशा लोकांनी काबूलवर आक्रमण करुन तेथे ब्रिटिशांचा मांडलिक राजा नेमावा असा सल्ला दिला. त्याला कलकत्ता आणि लंडन दोन्हीनी मान्यता दिली. गझनीला सोडले तर इतर ठिकाणी ब्रिटिश सैन्याला फार विरोध सहन करावा लागला नाही. योजनेप्रमाणे ब्रिटिशांनी दोस्त महमदच्या भावाला गादीवर बसले, दोस्त महंमदला भारतात अज्ञात स्थळी पाठविण्यात आले. काबूल फत्ते झाले, इथे शांतता आहे असा संदेश लंडन आणि कलकत्त्याला पोहचला. काबूलच्या गल्ल्यांमधे मात्र काहीतरी वेगळेच शिजत होते. दिवसेंदिवस ब्रिटिशांविरुद्ध रोष वाढत होता. एकदिवस या साऱ्याचा उद्रेक झाला. बर्नेसमुळे ब्रिटिश अफगाणिस्तानात पोहचले अशी अफगाणी लोकांची भावना होती म्हणून अफगाणी बंडखोरांनी बर्नेसची हत्या केली. ब्रिटिशांच्या छावनीला वेढा घातला. युद्ध झाले परंतु संख्येने अफगाण ब्रिटिश सैन्यापेक्षा जास्त होते. ब्रिटिश माघारी परतायला लागले. हेच ते इतिहासातील काळे पान. जवळ जवळ साडेचार हजार ब्रिटिश ज्यात सैनिक, नोकर, मुल, बायका सामील होते काबूलवरुन जलालाबादकडे निघाले. जलालाबादला ब्रिटिशांची छावणी होती. या साडेचार हजारापैकी फक्त एक व्यक्ती डॉ. विल्यम बेफोर्ड जलालाबादला पोहचू शकली. बाकी सारे प्रवासात मारल्या गेले. ब्रिटिशांना खिंडीत गाठून अफगाणांनी हल्ले केले. ब्रिटिशांनी याचा बदला लवकरच अतिशय क्रूरपणे घेतला. परत दोस्त महमदला काबूलच्या गादीवर बसविले. ज्याला हटविण्यासाठी हा रक्तपात घडला होता त्यालाच परत गादीवर बसविले. ब्रिटिशांची सैनिक छावणी तेथून हलविली.

दोस्त महंमदच्या हयातीत अफगाणिस्तान आणि ब्रिटिश यांचे संबंध व्यवस्थित होते पण त्याच्या मृत्युनंतर काबूलमधे यादवी झाली. बरेच राजे आले आणि गेले. १८८० मधे ब्रिटिश परत एकदा अफगाणिस्तानात आले. परत काबूल जिंकले. ब्रिटिश मध्यस्थी आणि मुत्सदेगिरीचे जगभर कौतुक झाले. परत एकदा कॅवनेरी या ब्रिटिश अधिकाऱ्याची काबूलमधे नेमणूक करण्यात आली. परत एकदा ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या झाली. ब्रिटिशांच्या छावनीतील सैन्याने यावेळेला परत जाण्यापेक्षा युद्ध करणे पसंत केले. अर्थात पराभव झाला. यावेळेला जनरल फेड्रिक रॉबर्टस फार मोठी फौज घेऊन मागेच होता. त्याने काबूल जिंकले. अफगाणी बंडखोरांना फार दूर पर्यंत हुसकवुन लावले. काबूलमधे या घडामोडी घडत असतानाच हेराथच्या शहाने हेराथवरुन ब्रिटिशांच्या कंदहारच्या छावनीवर हल्ला करायला सैन्य पाठविले. त्या सैन्याला थोपवायला ब्रिटिशांच्या फौजा कंदहारमधून निघाल्या. मैवांद (Maiwand)येथे ब्रिटिश आणि हेराथच्या शहाच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. हिच ती प्रसिद्ध मैवांदची लढाई. ब्रिटिशांचा पराभव झाला. अफगाणी सैन्याने पुढे येऊन कंदहारला वेढा घातला. जनरल रॉबर्टसने प्रचंड वेगाने ब्रिटिश सैन्याच्या हालचाली केल्या. काबूल ते कंदहार हे अंतर कापायला त्याकाळी साधारणतः तीस दिवस लागायचे. जनरल रॉबर्टस आणि त्याच्या सैन्याने हे अंतर फक्त एकवीस दिवसात कापले. रॉबर्टसचे सैन्यापुढे अफगाणी फौजाचा टिकाव लागणे शक्य नव्हते. ब्रिटिशांनी दोस्त महंमदचा नातू अब्दुल रहमान याला काबूलच्या गादीवर बसविले. असे म्हणतात कि रशियाला हेच करायचे होते. रशियाला अशी संधी देऊन त्यांना अफगाणिस्तानात प्रवेशाची संधी देण्याएवजी ब्रिटिशांनी तेच करुन रशियाला दूर ठेवले.

क्रमशः

मित्रहो
https://mitraho.wordpress.com

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

Marathi_Mulgi's picture

20 Jun 2020 - 1:22 pm | Marathi_Mulgi

या पुस्तकाविषयी थोडेफार ऐकून होते. फारच उत्कंठावर्धक आहे हे सारं.
पुढची भाग लवकर टाका.

कुमार१'s picture

20 Jun 2020 - 8:03 pm | कुमार१

चांगला परिचय

अफगाणी बंडखोरांनी बर्नेसची हत्या केली. ब्रिटिशांच्या छावनीला वेढा घातला. युद्ध झाले परंतु संख्येने अफगाण ब्रिटिश सैन्यापेक्षा जास्त होते. ब्रिटिश माघारी परतायला लागले. हेच ते इतिहासातील काळे पान. जवळ जवळ साडेचार हजार ब्रिटिश ज्यात सैनिक, नोकर, मुल, बायका सामील होते काबूलवरुन जलालाबादकडे निघाले. जलालाबादला ब्रिटिशांची छावणी होती. या साडेचार हजारापैकी फक्त एक व्यक्ती डॉ. विल्यम बेफोर्ड जलालाबादला पोहचू शकली. बाकी सारे प्रवासात मारल्या गेले.

त्यांचे एक चित्र सर्जन कमांडर कोट्स यांच्या धाग्यावर सादर केले होते.

हे पुस्तक जबरदस्त आहेच. परिचयदेखील आवडला.
सवांतर - या विषयावर श्री. जयंत कुलकर्णी यांनी एक लेखमाला लिहावयास सुरुवात केली होती. पण पहिल्या भागानंतर काही लिहिलेले दिसत नाही. कुणाकडे लिंक असल्यास कृपया डकविणे.

मित्रहो's picture

21 Jun 2020 - 4:03 pm | मित्रहो

धन्यवाद Marathi_Mulgi, कुमार१, शशिकांत ओक, एस (खूप दिवसानंतर).

ओक सर मला हे चित्र विकिपिडीयावर सापडले.
the great game