येडा होण्याआधी..

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
6 Jun 2020 - 1:00 pm

***

ही कथा लिहली होती त्याला आता बरोबर दोन वर्ष झाली. जेम्स वांड यांची मुक्कामी यष्टी अन संगीचा दृष्टांत ही कथा वाचल्यावर खूप आवडलेली. त्यातला येडा हा येडा का झाला असेल असा विचार करता करता, तो आणि ओरिजिनल कथेत कमी फुटेज मिळालेली संगी यांच्यावर सुचलेली ही गोष्ट. जेम्स वांड यांनी ही पात्रं वापरण्याची परवानगी तर दिलीच शिवाय कथा वाचून काही बदलही सुचवले. त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. पण अनेक कारणांमुळे ही कथा लिहिणे बारगळलेच. ती आता शेवटी नेटाने पूर्ण करून प्रकाशित करीत आहे. जेम्स वांड यांचा हातखंडा असलेल्या ग्रामीण कथालेखनाच्या दर्जाच्या आसपासही ही कथा पोचत नाही, तरिही वाचकांना आवडेल अशी आशा करते. धन्यवाद.

***

नैनो में सपना सपनोंमें हं हं हं हं हमम हं

स्वतःच्याच मस्तीत गुणगुणत संज्यानं गाडीला किक मारली. आधी गाडी घररर घररर करीत जरा कुरकुरली आणि आहिस्ता आहिस्ता सुरात आली. हँडलवरचा हात काढून हिरोसारखी स्टाईल मारीत संज्यानं मालकापुढं घ्या अशा अर्थानं हात वर केला. मालकानं उगा एकसिलरेटर फिरवल्यासारखं केला आणि समाधानानं मान हलवली.

संज्या मॅकेनिकच्या हातात गाडी गेली आणि दुरुस्त झाली नाही, हे आजवर कुणाच्याही पाहण्यात नाही. गावातले लोक म्हणतात बोलायला लागल्या लागल्याचं संज्यान पहिला शब्द कुठला बोलला असेल तर तो 'पाना'. आय नाही, बा नाही, तर 'पाना'. आधी सगळ्यांना वाटलं तो पाणीच मागतोय म्हणून त्याची म्हातारी आजी वाटी चमच्यात पाणी घेऊन संज्याला दाबून पायावर घ्यायची आणि एकेक चमचा पाणी पाजीत बसायची. पण चार दोन घोट पिऊन झालं की संज्या म्हातारीवरच पाण्याच्या पिचकाऱ्या उडवायचा. तशी ती लाडानं त्याच्या पायावर चापट्या मारून त्याला हाडं झालेल्या मांडीवर बसवायची अन दात पडलेल्या तोंडाच बोळकं फिरवीत म्हणायची "द्वाड हाई निसतं अन काय."

संज्याच्या बाचं, श्रीपतीचं गावात एकुलत एक गॅरेज होतं. गावात तशा गाड्या कमीच, पण शेतीचा एक लहानसा तुकडा आणि दुकानातली थोडीफार कमाई यावर त्याचं चांगलंच चाललं होतं. मोप दुष्काळ आले आणि गेले पण संज्याच्या घराला खरी उतरती कळा लागली ते त्याची आई गेल्यावर. संज्या तेव्हा दीड-दोन वर्षांचा असेल. म्हाताऱ्या आजीनं "मला ठिवलीस आन माजी तरणीताठी सून कशी न्हेलीस रं चांडाळा" असं म्हणून टाहो फोडला. तिथून तिनं जे अंथरून धरलं ते पुन्हा उठलीच नाही. लागोपाठ असे दोन घाव झेलून कसाबसा श्रीपती दिवस ढकलीत होता पण किती झालं तरी घट्टे पडलेल्या हातांना काही पोराला दोन घास करून घालता येत नव्हते का त्याला झोपवता येत नव्हतं. तशात माळावरच्या म्हारत्यानं त्याला त्याच्या दुःखावर दारू नावाचं नामी औषध घ्यायला शिकवलं. संज्याचा मामा त्याला आपल्याबरोबर त्याच्या गावाला घेऊन गेला. पण त्याची बायको खमकी. तरी कळता होईपर्यंत मामानं कसातरी ठेवून घेतला. जरा कळता झाला की एक दिवस श्रीपतीपुढं त्याला आणून ठेवलं अन म्हणाला, "पावणं, आता किती दिस तुमी असं राहणार. एखादी गरीबाघरची पोर आणा लगीन करून. तिच्या बी आयुष्याचं कल्याण हुईल आन या पोराच्याबी. आमचंबी हात बांधल्यात ओ. नाहीतर बहिणीच्या माघारी तिचं पोर सांभाळणं जड हाये काय? उद्या देवाच्या दारात मला जागा नाय एवढं खरं बघा." संज्याच्या तोंडावरून चार चार वेळा हात फिरवून जडशीळ मनानं संज्याचा मामा डोळे पुसत तिथून गेला. श्रीपतीला त्या भेदरलेल्या जीवाकडं बघून सगळं कळलं पण वळलं काहीच नाही. दारूपायी शेतीचा तुकडा कधीच सावकारानं गिळला होता. किडुकमिडुक सामानासहित गॅरेज जे काय शिल्लक होतं तिथं जाऊन घोट घोट घेत बसायची एवढंच काम तो करीत होता. मामाच्या पोरांवानी शाळेत जावं असं संज्याला खूप वाटे पण त्याला काय वाटतंय ह्याची फिकीर करणारं उभ्या जगाच्या पाठीवर कुणी नव्हतं. बा काय सुधारत नाय म्हणता ते पोर शाळा सोडून श्रीपतीबरोबर गॅरेजमधली कामं शिकला आणि त्यातच मोठा झाला. ह्या कलाकारीवर त्यानं कमीत कमी घरातली चूल पेटती ठेवली होती.

अशा माळरानासारख्या रखरखीत आयुष्यात एक दिवस संज्याला गारेगार वाटलं. त्याचं कारणही तसंच होतं. दुरुस्त केलेल्या गाडीची ट्रायल घ्यायला संज्या आपला गावाबाहेरच्या रस्त्यावर चालला होता. शाळकरी पोरींचा एक भलामोठा घोळका रस्ता अडवून रमतगमत चेष्टाविनोद करीत चालला होता. संज्यानं हॉर्न मारून पण पोरी काय वाट सोडेनात म्हणता बहिऱ्या झाल्या का काय म्हशी असं स्वतःशीच पुटपुटत तो घोळक्याला कट मारून पुढं गेला. तसं नाजूक, मंजुळ घंटेसारख्या आवाजात कुणीतरी चिरकलं,

"ए.. ए दिसत नाय का..."

आपला धक्का लागून कोण खाली पडली का काय असं वाटून घाबरून संज्यानं मागे वळून बघितलं. तर एक चवळीच्या शेंगेसारखी तरतरीत पोरगी त्याच्याकडेच चालत येत होती.

"दिसत नाय का रे.. ओढणी दे माजी.."

हिच्या ओढणीचा आणि आपला काय संबंध असा चेहरा करून संज्या तिच्याकडं बघत होता. कट मारण्याच्या नादात कडेच्या पोरीची ओढणी निसटून अल्लाद संज्याच्या खांद्यावरून उडत चालली होती. त्याने काही बोलायच्या आधीच पोरीनं ओढणी हिसकावून घेतली. इतका वेळ एखादा सिनेमा बघितल्यासारखा बघत बसलेल्या आपल्या मैत्रिणिना जरासं चिडून म्हणाली, "चला गं". ओढणी एकसारखी करून आपल्या खांद्यावरून घेत पुन्हा आपल्या मैत्रिणींबरोबर हसत खिदळत चालू लागली.

तोंडाचा आ वासलेला मिटून मग संज्यानं जरा वेळानं केसांवर हात फिरवत "सॉरी बरं का " म्हणलं. बरोबर त्याच वेळेला पोरीनं मागे वळून पाहिलं आणि "वेंधळाच आहे" अशा अर्थाचं हसली. हीच ती आपल्या कथेची नायिका - 'संगी'. गावातल्या अगदी मोठ्या नाही पण खात्यापित्या घरातली मुलगी. प्रत्येक इयत्तेत एक दोन वर्ष जास्तीचा अभ्यास करून ढकलत ढकलत दहावीला पोचलेली. अंगापिंडानं भरायला लागलेली आणि चारचौघात उठून दिसेल अशी पोर बघून घरातल्या म्हाताऱ्या साळकाया-माळकाया तिचं लगीन करून टाका म्हणून येताजाता ओरडायच्या, पण तिच्या मोठ्या बहिणीच्या पत्रिकेत मंगळ ठिय्या मांडून बसला होता. तो हलल्याशिवाय काय संगीचा नंबर लावणं बरं दिसलं नसतं. त्यामुळं संगीचे दिवस फुलपाखरासारखे मजेत जात होते.

संगी दिसायला तशी काही फार गोरीगोमटी नव्हती. पण सावळा असला तरी रंग तजेलदार होता. वयात नुकत्याच आलेल्या मुलीच्या डोळ्यात असतं ते अल्लडपणा आणि समज यांचं एक काहीतरी वेगळंच मिश्रण तिच्या डोळ्यात होतं. कमरेपर्यंत येणाऱ्या केसांच्या दोन वेण्या मुडपून वर बांधलेल्या असायच्या, कधी संज्याला त्रास द्यावा वाटलं तर केसांचा शेपटा तसाच खाली सोडलेला असायचा.

आता आपला हिरो रोजच शाळा सुटायच्या वेळी त्याच रस्त्यावर घिरट्या घालू लागला. आधी संगीनं दुर्लक्ष केलं, मग जरा बघून न बघितल्यासारखं केलं आणि एका महिनाभरात संज्याच्या डोळ्यात डोळे घालून लाजत मुरकत हसू लागली. अहा रे गड्या असा उसासा सोडून संज्यानं लाइन क्लियर झालेली ओळखली आणि संगीला भेटायला बोलवलं. संज्या गावातला एकमेव मेकॅनिक म्हणून प्रसिद्ध होता. नुकतंच मिसरूड फुटलेला तो गडी संगीला भेटल्यावर वास्तवापासून दूर कुठल्याशा जगात जगत होता. आपल्या खिशात छदाम नसला तरी आपण तुला राजाच्या राणीसारखं वागवू या त्याच्या साध्याभोळ्या विश्वासावर ती भाळली. मग काय संज्या आणि संगीचं भेटणं रोजचंच झालं. शाळा सुटायची वेळ झाली की संज्या गेरेजमधलं सगळं जिथल्या तिथे ठेऊन लांब मळ्यातल्या विहिरीवर जाऊन थांबू लागला. संगी घोळक्यातून हळूच मागच्या मागे निसटून विहिरीवर येऊ लागली. आतल्या पायऱ्यांवर बसून, दोघे हातात हात घेऊन तासन तास बसून रहायचे. कधी संज्या एखादं भज्यांचं पुडकं घेऊन जायचा, पण ते आधी तू खा मग मी च्या नादात गारढोण होऊन जायचे. तर कधी संगी घरात काय चांगलंचुंगलं असेल ते सगळ्यांपासून लपवून घेऊन यायची. असं दोघांनी आपलं स्वतःच असं एक वेगळंच जग तयार केलं होतं. त्या जगात संज्या राजा होता आणि संगी त्याच्या हृदयाची राणी. अगदी आवडती. या दोघांच्या प्रेमाच्या आड येणारी एकच गोष्ट त्यांच्या जगात होती, ते म्हणजे संज्याचं गॅरेज. संज्याने गॅरेज किती वाजता उघडायचं आणि किती वाजता बंद करायचं यावरून त्यांच्यात लग्नाआधीच वाद होऊ लागले. संगीच म्हणणं, सकाळी व्यवस्थित पोटाला खाऊनच बाहेर पडायचं, दुपारची जेवायला तासभर सुट्टी आणि संध्याकाळी तिन्हीसांजेच्या आधी घरी यायचं म्हणजे यायचं. तर संज्याचं म्हणणं होतं, बंद पडलेली, बिघडलेली गाडी म्हणजे त्याच्यासाठी कोडं. ते कोडं कधी पंधरा मिनटात सुटायचं तर कधी पंधरा तासात. गावातलं एकुलतं एक गॅरेज म्हणजे कधी अडीनडीला कुणी उघडायला लावलं तर उघडायलाच लागणार. बंद ठेऊन कसं चालेल? ही अशी वादावादी काही काळ व्हायची आणि मग जराशी रुसून संगी म्हणायची, "मी येवढा तुझ्यासाठी खपून सैपाक करणार आणि तू येणार नाय जेवायला?" असं म्हणून तिच्या डोळ्यात जरा पाणी येतंय असं वाटलं की इकडं संज्या म्हणायचा, "ए संगे, मी जेवायला नाय आलो तर तूच घेऊन येत जा की गॅरेजवर डबा आणि हातानी भरवतच जा.." त्यानं असं म्हणलं की संगी खालचा ओठ दाताने हलकेच दाबून संज्याला "जा तिकडं" म्हणत तिथून पळायची. संज्याला संगीशिवाय आणि संगीला संज्याशिवाय आता करमेना झालं. दिवस उजाडला की दोघे संध्याकाळ व्हायची वाट पाहू लागले.

बघितलं तर छोटं गाव ते! तिथं असल्या गोष्टी कशा लपून राहणार? संगीच्या घरी कुणीतरी चहाडी केली आणि त्यादिवशी संध्याकाळी संगीचा बाप, आबा वेताचा लांबसडक फ़ोक घेऊन वाघासारखा अंगणात फेऱ्या मारू लागला. आबाचा गावात फ़ार दरारा होता, कधीकाळी त्यांनी कुस्तीचे फ़ड गाजवले होते . संगीच्या आईनं अन म्हातारीनं नुसतं "अवो पर" म्हणलं तरी तो त्यांच्या अंगावर डाफरू लागला. आता संगी आणि संगीचं नशीब म्हणून बाया जीव मुठीत धरून बसल्या.

संगी घरी आल्यावर मग साग्रसंगीत कार्यक्रम झाला. रडून रडून संगीचे डोळे सुजले. अंगावर, पायावर वेताचे लाल लाल वळ उठले. पण ती पण बहाद्दर मुगले आजमच्या अनारकली सारखी बापाच्या डोळ्यात डोळे रोखून बघायला लागली तेव्हा आबानं मनाशी काहीतरी ठरवून एकदाचा तो वेताचा फोक खाली टाकला.

संगीच्या भावानं गावातल्या चार टग्या पोरांना हाताशी घेऊन संज्याचं गॅरेज पार होत्याचं नव्हतं करून टाकलं. बाजारात गेलेल्या संज्याला रस्त्यात गाठून लाथाबुक्क्यांनी बडवला. त्याच्या नाकातोंडातून रक्त यायला लागलं तेव्हा गावातल्या चार मोठ्या माणसांनी मध्ये पडून त्याला सोडवला. कसंतरी करून त्या टग्या पोरांना त्यांनी तिथून हुसकावून लावलं. सगळे म्हणाले, "कशाला कुणाच्या नादी लागतोस पोरा. तुझा जीव सांभाळ. हे काय प्रकरण केलंस ते थंड होईस्तवर कुठंतरी निघून जा बाबा." संज्याला मात्र यातलं काहीच ऐकू येत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर नुसता संगीचाच चेहरा येत होता. संगीला मारलं असंल का? तिला किती लागलं असंल? काही करून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा.

तिकडं घरी संज्याला मारल्याचं कळलं आणि संगीनं आधी आदळआपट केली. पण संगीनं आदळआपट केली की तिला मारता मारता आबांचा एखादा फटका आईला बसू लागला. संगीच्या आणि तिच्या आईच्या डोळ्याला रात्रंदिवस पाण्याच्या धारा लागलया. शेवटी कंटाळून संगीनं काही न बोलता अन्नपाणी बंद केलं. शाळेत जाऊन तसाही काही उपयोग नाहीच म्हणून आबानं तिची शाळा पण बंद केली. आता थोरली तशीच बिनालग्नाची घरात राहिली तरी चालतंय, पण हिला उजवलीच पाहिजे असं म्हणू लागला.

एवढं सगळं रामायण झाल्यावरही संज्यानं एकदिवस आपल्या अर्धवट शुद्धीत असलेल्या बापाच्या अंगावर जरा बरे कपडे चढवले आणि संगीच्या घरी जाऊन धडकला. आतल्या खोलीत भिंतीला टेकून भुइमुगाच्या शेंगा फ़ोडत बसलेल्या संगीनं, आईला "आये जरा च्या कर, पाव्हणं आल्यात" म्हणून आवाज दिला. आता कोण आलं म्हणून संगीची आई डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली तर संज्याला बघून तिला आता ही धरणीमाय मला पोटात घेईल तर बरं होईल असं वाटलं. तेवढ्यात शेतावर गेलेला आबा घरी आला आणि संज्याला आणि श्रीपतीला अंगणात उभं बघून सरळ त्यांच्या अंगावर धावूनच गेला.

"ए पेताडा, काय जीव वर आलाय का काय तुला? तुझी हिम्मत कशी झाली तुझ्या पोराला घेऊन इथं यायची?"

दारू पिऊन पिऊन शरीराचं चिपाड झालेला श्रीपती दोनचार झोकांड्या खाऊन खाली पडला. तशी संज्यानं जाऊन आबाच्या पायावर लोळण घेतली.

"आमचं लै पिरेम हाय आबा. आमची ताटातूट करू नका. तिला मी लै सुखात ठेवीन." असं जोरजोरात म्हणू लागला. हळूहळू गाव जमा व्हायला लागलं तसं संगीची आई पटकन वाड्याचा दरवाजा लावायला गेली. त्यातही एकदुकट्या पोरानं "का ओ काकी, काय प्रॉब्लेम हाय काय?" म्हणून तिला डिवचलं. तशी ती फणकाऱ्यानं, "आमचं आमी निस्तरू. निगा तुमी" असं म्हणून त्या पोरांच्या तोंडावर दार आपटून माघारी फिरली. आता या पोरीपायी आपली गावात अजून किती शोभा होणार आहे असं वाटून ती स्वतःच्याच नशिबाला दोष देत बसली.

"ऐकलं का? सुखात ठेवीन म्हणतोय पोरीला. आर तुजी लायकी हाये का तिच्या वार्याला उभी राहायची. पिरेम म्हणे. तुला आन तुज्या बापाला शेवटची वार्निंग देतोय. गावात राहायचं असलं तर संगीला विसरायचं नाहीतर उभा जाळीन. काय? समजलं का?" असं म्हणून त्याच्या दंडाला धरलं आणि जवळ जवळ उचलूनच वाड्याच्या बाहेर आणून टाकला. पाच मिनीटांनी श्रीपतीचं गाठोडंही झोकांड्या खात बाहेर पडलं. श्रीपतीला धरून कसाबसा संज्याने त्याला घरात आणून टाकला. आणि उदास मनाने अंधारात बसून राहिला. आयुष्यात कधी आईच्या आठवणीने न रडलेला संज्या, तिच्या आठवणीने हळवा झाला. त्याला वाटलं, आपली आई असती तर हा दिवस आला नसता. ना आपल्या बापाने दारू पिऊन स्वतःच्या आयुष्याची माती केली असती ना आपल्या आयुष्याची. आपण पण शिकून सावरून शाळा कॉलेजात गेलो असतो. शहरात गेलो असतो, नोकरीधंदा करून चार पैसे कमवले असते तर ह्याच संगीच्या बापानं माझी पोर पदरात घ्या म्हणून हात पसरले असते. संगीच्या आईनं असा जावई मिळाला म्हणून सणासुदीला आपली सरबराई केली असती. डोळ्यातलं पाणी पुसून संज्या स्वतःशीच म्हणाला, "आता पैसाच कमवून दाखवतो तुम्हाला." जिद्दीला पेटलेल्या संज्यानं दिवसरात्र खपून मोडकळीला आलेलं गॅरेज पुन्हा उभं केलं. पण किती झालं तरी गावच ते. आज कुणी पैसे नाहीत, उद्या देतो म्हणून गळ घालत होतं तर कुणी श्रीपतीला दिलं की कालच, उडवले असतील बाटलीत असं म्हणून डाव साधीत होतं.

आबांनी संगीसाठी लांबलांबची स्थळं बघायला सुरुवात केली. पोरगी नक्षत्रासारखी देखणी आणि बाप पैसा ओतायला तयार म्हणताना तिला स्थळांची कमी नव्हती. पण पै पाव्हण्यात कुणीतरी भाऊबंदकी करून संगीचा पराक्रम मुलाकडच्यांना कळवायचं की कुठलंच स्थळ घरापर्यंत येत नव्हतं. हो नाही, हो नाही करता करता एका स्थळानं पसंती कळवली. धड ना शहाणा, ना अर्धवट अशा मुलाच्या गळ्यात आपली पोर बंधू नका म्हणून संगीच्या आईनं खूप विनवण्या केल्या, पण आबा काही बधला नाही. तुळशीचं लग्न झालं की लगेच मुहूर्त काढूया म्हणून आबानं मध्यस्थाला कळवलं तसं संगीला वाटलं आता हातपाय हलवायलाच पाहिजेत. संज्याला ही बातमी कुठूनतरी कळली आणि त्याचीपण अवस्था संगीसारखीच झाली. आता काहीतरी करून संगीला भेटलंच पाहिजे ह्या विचाराने त्याची झोप उडाली. सरतेशेवटी आता आपल्याला तिला घेऊन पळूनच जावं लागणार या निर्णयापर्यंत तो आला. पण पळून जायचं म्हणलं तर चार पैसे गाठीला पाहिजेत, त्याची जुळवाजुळव कशी करायची हा त्याला मोठा प्रश्न पडला.

लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशी दोघे बिथरली. संगीनं आपल्या एका मैत्रिणीच्या हातापाया पडून तिला संज्याला एक चिट्ठी द्यायला सांगितली. ती गॅरेजवर गेली तेव्हा नेमका संज्या लोकांच्या राहिलेल्या उधाऱ्या मागत त्यांचे उंबरे झिजवत होता. आता काय करायचं असा तिला प्रश्न पडला होता. संज्या येईपर्यंत तिथं थांबली असती तर येताजाता कुणाच्या तरी लक्षात आलंच असतं. घरी गेल्यावर "भवाने कुठं उंडारत फिरतीस" म्हणून चार दोन फटके पडायचीही शक्यता होतीच. आता काय करावं, संगीकडं परत जाऊन तिला सांगावं का थांबावं असा विचार करीत ती उभी होती, तोच गॅरेजच्या कोपऱ्यात अंगाचं मुटकुळं करून बसलेला श्रीपती तिला दिसला. "ही एवढी चिट्ठी संज्याला द्या काय नाना. विसरू नका. लै महत्वाची हाय." असं म्हणून तिनं ती चिट्ठी त्याच्या हातात कोंबली. आपल्याला कुणी बघितलं तर नाही ना याची खात्री करून तिनं तिथून धूम ठोकली. श्रीपतीला वाटलं आज कुणी आपल्या हातात न मागता पैसे कोंबले, लक्ष्मीच आली असं म्हणून त्यानं हात जोडून कागद तसाच खिशात सरकवला.

त्यादिवशी रात्री संज्या रात्री दमून येऊन, उद्याची चिंता करत पार मेल्यासारखा झोपला ते सकाळीच बाहेरचा कालवा ऐकून उठला.

सकाळीसकाळी कोण तड्फडलं असा विचार करून तो आळोखेपिळोखे देत बाहेर आला तर बाहेर आबा त्याच्या भावकीतली सगळी टगी पोरं घेउन आला होता. प्रत्येकाच्या हातात काठी, सुरा जे सापडेल ते हत्यार घेऊन त्यांनी संज्याच्या त्या खोपटाला वेढाच घातला जणू.

"तिच्या आयला तिच्या. भें** झोपा काढतंय. धरा रे त्याला. हाणा. " आबानं दातओठ खात अशी ऑर्डर सोडली आणि पिसाळलेल्या कुत्र्यांसारखी ती पोरं संज्यावर तुटून पडली.

"आव.. आओ पर काय झालंय ते तर सांगा? का मारतायसा?" कळवळून संज्या ओरडत राहिला पण कुणीही मारायचं थांबलं नाही. दोन टग्या पोरांनी घरात, परसात जाऊन बघितलं. सामान अस्ताव्यस्त केलं आणि बाहेर येऊन "आबा, हिथं कुठं दिसत नाही संगी" असं म्हणले तसं चवताळून आबानं संज्याला लाथा मारल्या.

"कुठं लपवलीस संगीला? बोल कुठं हाये संगी? बोल नाहीतर जीव घेईन तुझा?" असं म्हणून संज्याला बोलायचीसुद्धा संधी न देता जनावरासारखं बडवत राहिला.

शेवटी दमून माणसं मारायची थांबली. ओरडून ओरडून संज्याच्या तोंडाला कोरड पडलेली. नाकातोंडातून रक्त येऊन त्याचं तोंड लालभडक झालेलं. तसाच भेलकांडत उठून भिंतीला टेकून बसला तेवढ्यात मान्याचा रामा लांबनं पळत आला. हाफहूफ करीत दम खायला त्यानं हात गुडघ्यावर टेकवले आणि जड झालेल्या आवाजात "आबा.. तिकडं.. तिकडं.. संगी.. चला लवकर" असं म्हणत हातवारे करु लागला. गण्यानं दाखवलेल्या दिशेला सगळा गाव पळत सुटला. दम खायला मागं राहिलेला गणा संज्याजवळ जाऊन त्याला म्हणाला, "भो***, जगायचं असंल तर पळ लेका न्हायतर आज तू मेलास." उगीच त्याला एक लाथ मारून गणा परत गर्दीत मिसळला. अर्धमेला संज्या तसाच पाय खुरडत खुरडत त्यांच्या मागं गेला. सगळी जत्रा मळ्यातल्या विहिरीजवळ पोचली तसं एक एक माणूस विहिरीत वाकून बघून चॅक चॅक करीत बाजूला होऊ लागलं. कुठूनतरी वाट काढीत संज्या कठड्यावर आला. विहिरीच्या पाण्यात संगी फुगून वर तरंगत होती. संज्याच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. तिकडं आबाच्या वाड्यावर बायाबापड्यांनी "काय केलं हे सोन्यासारख्या पोरीनं" असं म्हणून गहिवर घातला. भांबावलेला संज्या लोकांनी मारलेले दगड चुकवत घरी पोचला तेव्हा श्रीपती भेदरून दाराआड बसलेला त्याला दिसला. ह्या नामर्द बापानी आपली जिंदगी बरबाद केली असं म्हणून संज्या त्याला शिव्या देऊ लागला. तसा श्रीपती दारूच्या धुंदीत संगीनं दिलेली चिट्ठी नाचवत म्हणाला,

"अय, आपण आपल्या पैशाची पितो. कुणाच्या बापाची पीत नाय काय."

मघाशी पोराला उभाआडवा लोकांनी कुदलला तेव्हा कुठं गेला होता रे तुझा आवाज असं संज्याला ओरडावं वाटलं. पण अंगणात पडलेली कुणाचीतरी काठी उचलून तो नुसताच त्याच्या अंगावर धावून गेला. संतापानं त्याच्या अंगाची लाहीलाही झाली, पण गरम तव्यावर टाकलेल्या पाण्यासारखी त्या संतापाची वाफ़ झाली आणि आयुश्यभर सहन केलेलं दु:ख, अपमान अनावर होउन काठी लांब भिरकावीत तो खाली कोलमडला. डोकं गुढघ्यात खुपसून हमसून हमसून रडू लागला. काहीवेळाने श्रीपतीच्या हातातला कागद खाली पडला तेव्हा त्याचं लक्ष श्रीपतीकडे गेलं. त्यानं "बा ए बा" म्हणून त्याला हाका मारल्या पण श्रीपती निपचित पडला होता. श्रीपतीच्या जवळ जाऊन संज्या "बा, संगी गेली की रं" म्हणत त्याला हलवू लागला. श्रीपतीच्या हातातून पडलेल्या कागदाकडे त्याचं लक्ष गेलं तसं चपापला. नीटनेटक्या कागदाच्या घडीवर मोठ्या अक्षरात संज्या असं लिहिलं होतं .संज्यानं कागद उघडला, त्या कागदावर लिहिलं होतं,

"प्रिय संजय,

आबा माझं लगीन ठरवाय लागलेत. आपण आज रातच्यालाच हिथन निगुन जाऊया. शेवटची यष्टी रातच्याला धा वाजता असती. काय बी करून तू त्या आधी मला हिरीव यिउन भेट. तू नाय आलास तर मी त्याच हिरीत जीव दिन पण तुझ्याविना कुणाबर लगीन करणार नाय. माझं तुझ्यावर लय लय लय पिरेम हाय.

तुझी आणि फक्त तुझीच,
संगीता"

कागदाला छातीशी लावून संज्या उर फुटेस्तोवर रडला. मग मधूनचं बहकल्यासारखं घरात जाऊन रॉकेलचं एक कॅन आणून ते घरावर ओतलं.एक काडी लावली आणि आगीनी वेढलेल्या घराला लांब बसून न्याहाळू लागला. बघता बघता आगीचे लोट वरपर्यंत धडका देऊ लागले. आजूबाजूला माणसं जमा झाली ती एकदा संज्याकडे आणि एकदा घराकडे बघून "काय खूळबीळ लागलं का काय ए संज्या आर घर जळलं की तुझं" म्हणून त्याला गदागदा हलवीत होती. कुणी पाण्याच्या बाद्ल्या आणून ती विझवण्याचा चुकार प्रयत्न करत होते.

संज्या मात्र वेळकाळस्थळाच्या सगळ्या जाणीवा हरवून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. बघता बघता त्या आगीच्या ज्वाळा लहान लहान होत गेल्या. काहीच उरलं नाही. उरला फक्त चुलीसमोरचा जाळ. साडी नेसलेली, गुढघ्यावर हनुवटी टेकवून बसलेली संगी संज्याकडे लाजून बघत चुलीतला जाळ सारखा करीत होती. संज्याच्या हातात चहाचा कप देऊन म्हणत होती,

"शेवटची यष्टी धा वाजता असते. येणार ना? माझी शप्पथ."

कथा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

6 Jun 2020 - 1:06 pm | गणेशा

आधी मुळ कथा वाचतो, ती हि नव्हती वाचली
मग हि कथा वाचतो...

रातराणी's picture

6 Jun 2020 - 1:08 pm | रातराणी

मूळ कथाच बेस्ट आहे. :)

कथा आवडली... गावातील गॅरेज आणि इतर गोष्टी डोळ्या समोर आल्या..
पहिली कथा मनाला जास्त भिडली कारण फलटण - बारामती- पश्चिम महाराष्ट्रा तील भाषा अनुभवत असल्याने लगेच मनात घर करुन गेली होती..

या कथेतला ग्रामीण बाज हि आवडला.. कथेच्या मध्या पासून कथा जास्त पकड घेते..

संगी चे लग्न कोल्हापूर ला लांब लावले असेल असा शेवट असेल असे वाचताना... या पुढचा भाग मी 'संगी' या नावाने लिहावा असे वाटू लागले.. आपली पहिलीच कथा होईल..
पण संगी ने विहरीत जीव दिला.. आणि माझ्या कथेचं प्रेत तिथेच फुगलेले दिसले.. :-))

लिहीत रहा.. वाचत आहे...

रातराणी's picture

11 Jun 2020 - 10:45 am | रातराणी

असं काही नाही. कुठल्यातरी समांतर विश्वात तुम्ही म्हणताय तसं घडलं असेल असं समजून लिहायची कथा बिनधास्त :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Jun 2020 - 2:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त लिहिली आहे,
आवडली
पैजारबुवा,

चेलुविन चित्तार ची स्टोरी आहे ही.
गाणे मस्त आहेत त्यातली. उल्लास द हुमले बघ. अंदाज येईल.

अय्यो. उल्लास द हुमले बघितलं. एकदम माझ्या मनातली संगी आहे त्या पिक्चरची हिरोईन. शेवट काय आहे पिक्चरचा ही उत्सुकता असल्याने पिक्चर फास्ट फॉरवर्ड करीत बघितला. पिक्चरचा शेवट जास्त छान आहे. :)

गोष्टी वाचूनच कन्नडिगा ( आणि अण्णा ) तसे जगतात.
------------
बाकी गोष्ट वाचत "पाना"पर्यंत आलोय. पकड घेत आहे, पाना नव्हे गोष्ट. हळूहळू नट काढणार तीस जूनपर्यंत. असेही ट्राफीक बंदच आहे. घाई कुणाला आहे?

कंजूस's picture

6 Jun 2020 - 4:00 pm | कंजूस

उल्लास द हुमले बघ. >>> युट्युबवर बर्तीनी?

अभ्या..'s picture

6 Jun 2020 - 4:09 pm | अभ्या..

आद.
भाळ मधुर

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2020 - 5:47 pm | टवाळ कार्टा

_/\_

चांदणे संदीप's picture

6 Jun 2020 - 7:58 pm | चांदणे संदीप

येड्याची श्टोरी दर्दभरी असणार हे अपेक्षितच होतं. लिहिलंयही भारी. पण मला उगं वाटल की ती पण श्टोरी कॉमिक करता आली असती तर!

मिपावर दर्जेदार लेखनाचा वारा सुटलाय हे नक्की!

सं - दी - प

जेम्स वांड's picture

6 Jun 2020 - 8:58 pm | जेम्स वांड

इतका टेम लावायचा व्हय हो ताईसा , मी आपला मिपावर कायम तळ्यात मळ्यात तुम्हाला विचारेन विचारेन म्हणत विसरलो (गाढव वांडो) परत म्हणलं उत्तम लेखक (अन लेखिकांचीही) असते सणक लिहायची न लिहायची, पण लिहिलेत ते बरे केलेत एक नंबरी काम....

तरीच मी म्हणलं यष्टिवर आज इतकी माणसं कशी आली, दर्जा वगैरे काही नसतं ताई, आपल्याला मिळणारं समाधान हेच काय ते खरं असतं बाकी सब झूट , अजून लिहा मोकार एकदम मनभरून, पुढील लेखनाला मनभरून शुभेच्छा

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2020 - 6:15 pm | संजय क्षीरसागर

म्हणून सैराटवर पण काट मारली होती.

कल्पनाच करायची तर दुःखद कशाला ?

पण लेखनशैली आवडली.

एक घटना माहीत आहे मुक्याची. गावात मामाच्या घराजवळच राहायचा. येडा नव्हता. आमच्याच वयाचा. चांगला पोहायचा. शक्ती अफाट. घरच्या गाइगुरांचं प्रेमानं राखण करायचा. चिपाडाची ( जोंधळ्याच्या ताटातलं भेंड )बैलगाडी सुंदर करायचा.
इतरांची लग्न होतात हे पाहून माझंही करा अशी आईच्या मागे लागला. पण मुलगी देणार कोण? शेवटी एक मिळाली. करून दिलं एका महिन्याने त्याने स्वत:ला जाळून घेतलं. सर्व दु:खी झाले. अजूनही आठवण आली की वाइट वाटते.

रातराणी's picture

11 Jun 2020 - 10:52 am | रातराणी

फार दुर्दैवी :(

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2020 - 1:09 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर ! शेवट वाचताना डोळे पाणावयला लागले.
चित्रदर्शी उत्कट लेखन !

सिरुसेरि's picture

8 Jun 2020 - 3:16 pm | सिरुसेरि

सुंदर लेखन . सुरुवातीला विनोदी वाटत असलेली कथा अखेरीस गंभीर वळण घेते . कथा वाचताना संगी , संज्या , भाउ , आबा या पात्रांच्या जागी आर्ची , परशा , तात्या , प्रिन्सदादा हि मंडळी दिसत होती . कदाचित हा सैराटचा अजुनही असलेला परिणाम असेल .

गोष्टीतली भाषा, लिहायची शैली आवडली. जवळपास सगळा लेख विनोदी त्यामुळे सुखांत होईल असं वाटत होतं (दुसऱ्या कथेचा संदर्भ नंतर वाचला ), शेवट वाचून वाईट वाटलं :(

रातराणी's picture

11 Jun 2020 - 10:53 am | रातराणी

सर्वांचे मनापासून आभार :)