अनामिका

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
4 Jun 2020 - 7:33 pm

मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे.

आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा. त्या डोळ्यांशी नजर भिडली की समोरच्याला खोल सागरात गेल्याचा भास व्हायचा. तिथं सगळंच नवीन वाटतं. नयनरम्य, अद्भूत, विस्मयकारी आणि निर्मळ. माझी ही नजर भिडली होती एकदा तिच्याशी. तेव्हा तिच्यात हरवलो तो कायमचाच.

तिच्या गुलाब पाकळ्यांसम कोमल स्पर्शाने माझ्या हातांना मोगऱ्याचा सुगंध यायचा. मधुमक्षीकेने परागीभवन घडवावं तसा ती सगळीकडे आनंदाचा सडा टाकत जायची. "मला जे द्यायचंय ते मी दिलदारपणे उधळून देते", ती एकदा म्हणाली होती. पिंपळाच्या कोवळ्या पानासारखी होती ती. ज्याच्या हातात जाईल त्याला हे पान हृदयाच्या पानांत जपून ठेवावे वाटेल. कारण या पानाची जाळीदार नक्षी नक्षत्राप्रमाणे देखणी असणार यात शंकाच नाही. मी ही तिला अलगद माझ्या हृदयात लपवलं. आता माझं अख्खं हृदयच जाळीदार झालंय.

इतिहासातल्या सनावळ्यांसारखी होती ती. समजून घ्यायला अतिशय सोप्पी वाटायची पण लक्षात ठेवायला महाकठीण. तिचं कुठलंस एक ठराविक रूप मला आजही आठवत नाही. प्रत्येक वेळी मला नव्याच रूपात दिसायची ती. कधी खोडकर, कधी धीरगंभीर, कधी विचारशील तर कधी कधी अगदी टुकार सुद्धा! जणू जीवनाला पर्याय होती ती. मानवी जीवनाच्या प्रत्येक चौकटीत ती चपखलपणे बसून जायची. अमर्याद होतं तिचं जगणं. तिला कशाचेच वेड नव्हते. पण मला भेटली अन् वेडं करून गेली.

लहरी होती ती खूप, सागराच्या लाटांसारखी. सहजासहजी अंदाज नाही यायचा तिचा. परीक्षेला सर्वांत आवडता विषय अवघड गेल्यावर कसं वाटेल, तसं वाटायचं तिच्याशी बोलणं झाल्यावर. अतृप्त. की माझीच अपेक्षा नेहमी जास्त असायची? कळायला मार्ग नाही. कदाचित सगळ्याच नाजूक नात्यांत असं होत असेल. नातं कितीही ताणलं गेलं, तरी तुझ्या प्रेमात तसुभरही फरक नाही पडला. हा.. पण ते प्रेम लपवायला तू चांगलं शिकली आहेस आता. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असेल तर या प्रेमयुद्धात कुणाचा जय होईल अनामिका? जर सगळीच पापे माफ असतील तर पापाचं फळ म्हणून पराभव कुणाच्या भाग्यात आहे? की प्रेमाची परीक्षा म्हणून मलाच स्वत:हून हा पराभव स्वीकारावा लागेल? अजिंक्य असणारा मी तुझ्या प्रेमात पराजयाचा स्वीकार करू? नाही! सत्याला पराभूत करणारी ती वास्तव नव्हतीच कधी... ती माझी कल्पना होती.

मुक्तकसमाजkathaaव्यक्तिचित्रणविचारलेखविरंगुळा