थांब ना

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
24 May 2020 - 4:39 pm

थांब ना जरा... अरे आज शेवटचं भेटतो म्हटलास ना? मग निदान आता घाई तरी नको करूस.
संबंध शरीराला भूल दिल्यासारखं होतंय मला. माझ्यातल्या जीवंतपणाला जीवनाचं रुप तुझ्या सोबत मिळालं. सातशे... तब्बल सातशे कोटी लोकसंख्या आहे जगाची. तरी मग तुलाच कशी‌ रे माझ्या मनाची किल्ली गवसली? तू असलास की विस्मरणात गेलेले सगळे आनंदाचे क्षण मनात पुन्हा पिंगा घालू लागत. तुझ्या खांद्यावर रडत रडत दु:ख हलकं करायचे त्याचंही मला सुखच लागायचं. माझा श्वास आज मला सोडून जातोय तर हृदयाची तडफड होणार नाही का रे..? आणि माझं सगळं त्राण आजच का संपलंय? की माझी ताकतही तुच होतास?
उजाड माळरानावर नंदनवन बहरावं तसं तू माझ्या आयुष्याला प्रफुल्लित करून टाकलं. सुखाच्या दोन-चार कळ्या सांभाळणारी मी असा सुखांचा पुष्पगुच्छ सांभाळताना जरा वेंधळणारच की. आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काहींची भरच पडलीये. तुझ्यात मात्र एक अलौकिक बेफिकीरी भरलेली होती. तुझ्या संगतीने मी ही या अडचणी बाजूला सारून आयुष्य जगायला शिकले होते. आता तू जातोय तर या अडचणी मला पुन्हा वाकुल्या दाखवत आहेत. तू दरडाव ना त्यांना. सांग त्यांना, की तू मला सोडून नाही जात आहेस.
म्हटलं तर हाडामांसाचा गोळा तू.. अगदी सगळ्यां सारखाच. मग हे असं इतरांच्या हृदयात शिरायचं गुपित कुठे शिकलास? मलाही शिकव ना ते गुपित. मलाही रहायचंय तुझ्या हृदयात, तुझ्या मनात. चिरंजीव. चिरंतन. हा विरह कसा सहन‌ करु मी? पालवीशिवाय झाड कितीसा तग धरेल? माझ्या डोळ्यांना माझ्यापेक्षा तुझं रूप जास्त ओळखीचं वाटतं. त्यांनी आता कुणाला पाहावं? का? तुला जायचंच होतं तर का लळा लागु दिलास मला तुझा? नको ना जाऊस.. फक्त प्रेम नाही रे करत मी..‌ माझा जीव तुझ्यात आहे... माझा जीव माझ्याजवळच ठेव‌ ना.

मुक्तकप्रकटनलेख