लो.-भी. भाग २

हृषीकेश पालोदकर's picture
हृषीकेश पालोदकर in भटकंती
3 May 2020 - 5:17 pm

लो.- भी. भाग १

परत मेटलवाडीला जायचा मार्ग पण बंद झाला होता कारण परतीची वाट जास्त गुंतागुंतीची होती. गावातले वाटाडी लोक ज्यावाटेने नेतात ती आपल्याला उमजत नाही. आता उरला एकच पर्याय ...रात्र इथेच काढायची आणि सकाळी वाट शोधून भीमाशंकराचे दर्शन घ्यायचे. त्यात भोळी भावना ही की रात्रीत काही झालच तर भीमाशंकर आहे रक्षणासाठी. नाहीच काही मिळाल तरी सकाळी अनेक गुराखी इथे येतातच,पकडू एखाद्याला. आपण फार जास्त धाडस करतोय असं काही कुणालाच वाटत नव्हते. सर्व काही हसण्या- खिदळण्यात दंग होते. परत एकदा विचार करायला हवा होता नाही का ? आम्ही तश्या मुक्कामच्या तयारीत पण नव्हतो. मागे फिरण्यात फार काही गुन्हा नव्हता, पण जे ठरलं ते ठरलं. ....हर हर महादेव.!!!!!

जवळच झाडाझुडूपापासुन दूर एक खडकाळ जागा मिळाली. मध्यभागी स्याक गोळा करून खाली चादर अंथरली आणि रिंगण घालून बसलो. भीती होती ती रानडुकराची आणि अस्वलाची. त्यांच्याच असंख्य कथा आदल्या रात्रीच समजल्या होत्या. बिस्कीट वगैरे जेमतेम खाण्याचे समान होते ते फस्त केले. वातावरण फक्त ढगाळ होते. वेळ पाहायला दोघांच्या हातातल्या घड्याळी, एक छोटा एफ एम रेडीओ,चार शिट्ट्या आणि एक मध्यम आकाराची ब्याटरी या रसदीवर रात्र काढायची होती.
सुरुवातीचा बराच वेळ मजेत गेला. रात्रीचे नऊ दहा वगैरे वाजले असतील. छोट्या एफ एम वर बातम्या लागल्या होत्या. ऐ पी जे हे राष्ट्रपतीपदी विराजमान झाले होते . आणि अचानक मेघगर्जनेसह कडाडून वीज चमकली. उंच वाटणारं आभाळ हातभर उंचीच उरलं, ढग भरून आले अन गडगडाटासह अशक्य पाऊस सुरु झाला. खूप विजा चमकायला लागल्या. विजेने आजूबाजूचा परिसर इतका भयावह दिसायला लागला की सर्वांची एका झटक्यात दांडी उडाली. काही समजायच्या आत आमच्या खालून पाणि वाहायला लागलं. रपारप झोंबणारे पावसाचे थेंब कधी बदडून गेले समजले नाही. अर्धातास जोरदार बरसुन कुठे वातावरण निवळले. बापरे काय होता तो प्रकोप. सर्वांची रडवेली अवस्था झाली. पावसाचं हे स्वरूप असं चालू राहिलं तर सहन करण मुश्कील होत. खडकाळ वाटणारी जमीन बर्याच ठिकाणी भुसभुशीत वाटायला लागली, खेकडे बाहेर पडायला लागले. रातकिड्यांनी भेसूर आवाजाने पूर्ण जंगल दणाणून सोडले.

आमच्या हलक्याफुलक्या सहलीने काहीतरी वेगळेच स्वरूप घेतले. आधी सर्व गोंधळलो पण लगेच सावरलोसुद्धा. हा तडाखा सुरूच राहणार याची कल्पना आली. त्यामुळे काय करायचे ते लगेच सर्वानुमते ठरले. सर्वांच्या डोक्यावर चादर पुरेल असं दाटीवाटीने बसलो. टेकायला पाठीशी स्याक. प्रत्येकाच्या खिश्यात आपापल्या शिट्ट्या होत्या, त्या वाजवत राहायच्या आणि एकमेव असलेली विजेरी सारखी फिरवत रहायची म्हणजे जनावराची भीती राहणार नाही. सारखं हात पाय जमिनीवर आदळायचे, मोठ्याने बोलायचे, गाणे गायचे म्हणजे सर्व जागे राहतील, अशी सर्वांनी मिळून धीर धरून जशी जमेल तशी योजना आखली. थोड्यावेळातच परत पावसाचा धडाका सूरु झाला तो रात्रभर थोड्या थोड्या वेळाने बरसतच राहिला.

आम्ही थोडं सावरायच्या आत परत दणाणून पाऊस पडायचा आणि लाटेने वाळूचा किल्ला वाहून न्यावा तशी वाताहत करायचा. पाऊस कमी झाला की थंडी अंगात शिरायची, अंग कुडकुडायला लागायचं ,हात पाय आखडून जायचे. त्यामुळे सर्वांनी उठून थोड्या थोड्यावेळाने वार्म-अप करायला सुरुवात केली. दर विसपंचवीस मिनिटांनी हा वीज पावसाचा डाव सुरूच होता.

गेल्या तीन दिवसांच्या चालण्याने आणि भिजण्याने सर्वजण आधीच थकलेले होते. बसल्यावर मधून मधून जंगली श्वापदाबरोबर दिवसभराच्या भूता-खेतांच्या गोष्टी पण आठवायला लागल्या. कुठलेसे युद्ध या भोरी विहिरीपाशी झाले होते म्हणे. म्हणजे खालच्या दरीत असलेल्या पेठच्या कोथळी किल्ल्यावर मोघलांनी का कुणी हल्ला करण्याची वार्ता फुटली आणि गडावर पोहोचली, त्यांनी जवळच्या गडावरून अतिरिक्त कुमक मागवली. रात्रीत ती तिथे पोचणार होती. गडावरील काही मराठे मोघलांना कापण्यासाठी जंगलात दबा धरून बसले होते. मोघलांआधी मराठ्यांची कुमक पोहोचली पण दुर्दैव असे की अंधारात आलेले मोघलच असावे म्हणून मराठ्यांनीच मराठे कापले. पुढे काय झाले माहित नाही पण एक गावकरी म्हणाला हे सगळं भोरी विहिरीपाशीच झालंय. खरंखोट माहित नाही पण अश्यावेळी आम्हाला घाबरवायला ते पुरे होत.

पावसाच्या आणि थंडीच्या फटकार्याने अंग कमजोर पडलं होत. सारखी डुलकी लागत होती. शिट्टी हुकली तर प्राणी हल्ला करेल याची भीती होती. भूत जर खरंच जगात असतील तर त्या सैनिकांचे आत्मे आमच्या आसपास फिरत असतीलच नाही का ?...त्यांचा राग ते आपल्यावर काढायचा विचार करत असतील, अंधारात आम्ही त्यांच्यासाठी गनीमच ना ?.....वगैरे वगैरे विचार डुलकीसरशी येत होते.. शरीर थकले की मनाचे खेळ सुरु होतात. लहान डुलकी जरी लागली तरी सभोवताली युद्ध सुरु असल्यासारखं वाटे,मधूनच कुणीतरी शाळा मास्तर आम्हाला शाळेत मुक्कामाला न्यायला आला असा भास होत असे. कधी जखमी सैनिक आपल्याकडे एकटक पाहतोय की काय असं मनात चित्र येई. झोपेत आहोत की जागे हे कळत नव्हते. बर योगायोगाने सर्वांची हीच अवस्था होती. त्या गडद अंधारात जंगलामध्ये आम्ही पाच जण पाचशे लोकांची भीती उरात धरून बसलो होतो. आम्ही थोडेफार अनुभवी असलो तरी सराईत फिरणारे नव्हतो, ना ही असल्या प्रसंगाची आमची तयारी होती. ही रात्र शेवटची असावी बहुदा...इथपर्यंत विचारांची मजल गेली.

नंतर कधीतरी पावसाचा जोर ओसरला आणि आमचे डोळे लागले असावे. नंतर किलकिल्या डोळ्यांनी पांढराशुभ्र परिसर दिसायला लागला.उक्कड बसून अंग कन्हारलं होत. आमचे शूरवीर चुळबुळ करू लागले. ती पहाटेची वेळ असावी, वेळ समजण्याची सोय नव्हती कारण रात्री ११.१५ च्या आसपास दोघांचेही मनगटी घड्याळ बंद पडले होते. सकाळ पाहायला मिळाली याचाच फार आनंद झाला.
कसेबसे सामान उरकलं आणि पाठीवर घेऊन उभे राहिलो. हर हर महादेव ची आरोळी ठोकली आणि आपण जिवंत आहोत याचा आम्हा सर्वाना परत उलगडा झाला. आता काय करावे यावर सर्वांनी आत्ताच्या आत्ता भीमाशंकर गाठायचं असाच निर्णय घेतला. परत फिरायचे नाही कारण देवाचे दर्शन झालेच पाहिजे, पाहूच कसे दर्शन होत नाही.

जंगलात पहाटेचे धुके लवकर सरत नसते. त्यामुळे जी डावी वाट मिळाली तिने चालत सुटलो. कालचे डोक्यापेक्षा उंच गवत पण ओलांडले. पुढे पुढे मात्र कोणत्याच पाऊलवाटेचा ठाव दिसत नव्हता. जिकडून तिकडून रानवाटा आणि गवत यांनी चक्रव्यूहात अडकवून टाकल. आम्ही कुठे जात होतो माहित नाही, एकही वाट ओळखीची नव्हती. कुठेतरी घुटक्याची पुडी अथवा चॉकलेटचा कागद दिसला की तीच वाट धरायचो. वाटायचे हीच वाट असेल बरोबर. अनेक तास चालत होतो आणि फक्त चालत होतो. वेळेचा पत्ता नाही. पाऊस अधूनमधून सुरू होता. पाण्याने अंग भिजून फुगल होत, पोटात अन्न नाही. जांघेत बगलेत कातडी सोलून निघाली होती. कोळीकिडा जसा पाय शरीरापासून दूर ठेऊन टांगा टाकतो तशीच आमची चाल सुरु होती. यावरून अधेमध्ये विनोद पण व्हायचे. चालतांना कोणी न कोणी घसरून पडणे हे सुरू होत मात्र कुणी थांबत नव्हते. सारखा माणूस किंवा घर दिसल्यासारख व्हायच पण कसल काय ? हे नुसते भासच असायचे. दुपार ढळायला लागली असावी असा अंदाज येत होता. आज जर जंगलात रात्र काढायची वेळ आली तर मग आमचं टिकाव धरण असंभव होत. मनाने तुटलो होतो पण एकमेकांना सर्व धरून सांभाळून राहत होते...अर्थात पर्यायही नव्हता. एका ठिकाणी सर्वांनी आपल्या ब्यागा धुंडाळून काही खायचं सापडत का ते पाहिलं. सुदैवाने प्लास्टिकच्या कचर्याचा पिशव्यात लोणच्याची फेकायची पिशवी सापडली..प्रत्येकाला एक एक चाटण मिळालं आणि हायसं वाटलं. सकाळपासून सगळे उपाशीच त्यामुळे जीव व्याकूळ झाला होता पण कुणी काही बोलत नव्हते.

तिथून निघालो आणि एका विस्तीर्ण पठारावर कुठे एखादे भातशेत दिसते का याचा शोध घ्यायला लागलो. कारण पायवाटा आम्हाला परत परत एकाच जागेवर आणून सोडत होत्या. आम्हाला एक दूरवर भातशेत दिसल. शेतावरून काही अंतरावर एक वृद्ध माणूस पण दिसला...हुर्रे !!!!! घरी परत चाललेल्या “काळूराम भोकटे” या ताडपत्री नावाच्या खेड्यातला हा मनुष्यरुपातला साक्षात महादेव आम्हाला भेटला. त्या वृद्ध बाबाच्या आम्ही आधी पायाच पडलो. त्याना आम्ही कसं हरवलो ते सांगितलं आणि आम्हाला तुमच्या सोबत न्या म्हणून विनवण्या केल्या. त्यांना काही उमजत नव्हत. आम्ही त्यांना भीमाशंकरच्या रस्त्याच विचारले. ते म्हणाले त्याला जायला दिवस लागेल. मग आम्ही त्यांना त्याच्या घरी न्यायची विनवण्या करायला लागलो. बाबा म्हणाले “माझं गाव जंगलातच हाये अन बारकी झोपडी, तुमाला वस्तीला जागा नई.” मग जवळचे एखादे गाव सांगा बाबा जिथून आम्हाला जायला एखादी एस.टी. भेटेल लगेच ? आम्ही अधीरपणे विचारले. बाबानी मोठा पॉज घेतला आणि नकारार्थी मान करून चालायला लागले. आमचा धीर सुटत होता. रडवेले होऊन बाबाच्या मागे चालायला लागलो. त्यांना काय वाटले कोणास ठाऊक. ते म्हणाले “ तुमी हीथून डावी धरून सरळ जा, गाव लागन, तिथून सकाळची यष्टी जाती राजगुरुनगरला”, पण ते म्हणताना त्यांनी उजवा हात केला. आता कसच काय उजवी आणि डावी...खूप झालं होत जंगल. आपला पीच्छा सोडवायला बाबा आपल्याला सांगतायेत असच वाटायला लागले. तरीही विनवण्या करून त्यांना इथून जवळच एस टी येणाऱ्या गावाला नेऊन घाला असं आम्ही म्हणत होतो सोबत पैसे पण द्यायला तयार होतो पण बाबा काही तयार नव्हते. अनेकदा हात जोडल्यावर बाबा डोंगरावरून खालच गाव दाखवायला कबुल झाले. त्यांनी शेवटी सोबत येऊन ते गाव दाखवल आणि आम्ही जवळ जवळ लंगडत, कण्हत, पळत ती दरी उतरलो. काय सांगा परत धुक्यात तेही गायब व्हायचं.

गावात पोहोचलो तेंव्हा पाच का सहा वाजत आले होते.त्या गावात भटकणारे येत नसल्याने त्यांना कुतूहल वाटलं.बारके पोर जमून आमच्या कन्हारलेल्या चालीवर हसायला लागले, कुत्रे भुंकत भुंकत स्वागताला आले. गाव एकदम लहान होते, गावात दुकान शोधून आधी बिस्कीट विकत घेतले पण हाताच्या संवेदना नाहीश्या झाल्या होत्या त्यामुळे बिस्किटे धरता येत नव्हती ते खाली पडत होते. तशेच बिस्किटे खाल्ली. दोनचार शहाणीसुरती लोक चौकशीला आली. त्यांनी आम्हाला गावातल्या सिंधू सावंत यांच्या घरी नेले व दारातल्या ओसरीवर बसवले.

सावंत साहेब बहुदा गावातील जाणते असावे. ते गावाला गेलेले आहेत उद्या येतील असं त्यांच्या चिरंजीवाने सांगितले. “मंडळी आधी चहा घ्या. जेऊन होईपर्यंत मुक्कामाची यसटी यीन, त्यातच मुक्काम करून सकाळी निघून जा” असे चिरंजीवाने सांगितले. तोपर्यत सावंतकाकू आल्या. त्यांनी चौकशी केली अन सरळ चहा करायला आत गेल्या. चहापाणी झाल्यावर त्यांनी मुलाला सांगून त्यांच्या घरातली एक जागा आम्हाला दिली. घर तस जेमतेम आकाराच होत. कपडे बदला आणि जेवायला चला असा निरोप आला. आम्ही पोटभर चहाने जरा ठिकाणावर आलो. कपडे बदलून जेवयला गेलो. काकुंचा चुलीवर स्वयंपाक तयार होता. आम्हाला चुलीभवती बसवले आणि पोटभर जेऊ घातले. कुठलातरी चमत्कार अनुभवावा असं हे सर्व सुरु होत. आम्हाला रात्री मुक्कामास घरातच ठेऊन घेतले. अंथरून पांघरून दिलं. घरात इतरही मंडळी होती पण आम्हाला काही सुधरत नव्हते. कसंबस बोलून आम्ही ढाराढूर झालो. गावातले लोक सावंतांकडे चौकशी करून जात होते त्याचा आवाज येत होता, पण उठायची ताकद नव्हती. तिकडे एका मित्राच्या घरच्यांनी पोलिसांना फोन करून आम्हाला शोधायला वन खात्याचे लोक पाठवले ते वेगळेच प्रकरण घडले. आम्ही भलत्याच वाटेने दिवसभर चालत होतो हे आम्हाला सावंतांच्या घरी समजले कारण इथून भीमाशंकर अजून चार पाच तासावर.

हुश्य !!!! आम्ही जिवंत राहिलो. जंगलात राहण्याची आणि माघारी न फिरण्याची पोकळ जिद्द आम्ही आकारण केली यात वाद नाही. तयारीविना हे वेडे साहस करणे फार महाग पडले होते. आम्ही थोडक्यात बचावलो होतो हे उपकारच. काळूरामबाबा असो वा सावंतकाकू, देवाच्याच रुपात भेटले. सांगायचे झाले तर "का व कसे" चुकलो हे सांगायला गेले तर अनेक गोष्टी सापडतील. पण घेण्यासारखी गोष्ट ही की आम्ही सर्व जणांनी आलेल्या प्रसंगाला एकत्रपणे तोंड दिले. मला हेच महत्वाचे वाटते. यापेक्षा सरस व अचाट साहसकथा आणि सर्व्हायवल गोष्टी नेहमी टी. व्ही. वर पाहायला मिळतात पण ते अनुभवण्याची मजा फार काही शिकवून जाते. सकाळचा चहा नाश्ता करून आम्ही एसटीने परत निघालो आणि थेट पुणे गाठले. भीमाशंकर नंतर करू यावर एकमत अपोआप झाले होते. सावंतांचा निरोप घेताना काकुंचेच डोळे भरून आले होते. अशे वेडे साहस करायचे नाही याचा धडा आम्ही परतीच्या प्रवासात घेऊन टाकला. अर्थात जेंव्हा चुकायचे ते नंतर चुकलोच.

आम्ही निघालो होतो महादेवाच्या दर्शनाला पण योग होता पार्वती दर्शनाचा एव्हडाच काय या घटनेचा मला उलगडा झाला.....

-----------------------------------------------------------------------समाप्त-----------------------------------------------------------

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

3 May 2020 - 8:23 pm | Nitin Palkar

बेअर ग्रिल्सचा एखादा एपिसोड वाचतोय असं वाटलं. रात्रीचा पाऊस आणि जंगल डोळ्यांसमोर हुबेहूब उभं राहिलं. पु ले शु .

हृषीकेश पालोदकर's picture

5 May 2020 - 11:14 am | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद.

मनिम्याऊ's picture

5 May 2020 - 9:51 pm | मनिम्याऊ

भयंकर अनुभव.. थरारक..

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 1:10 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद

Prajakta२१'s picture

6 May 2020 - 12:16 am | Prajakta२१

थरारक
अजून कुठलाच शब्द सुचत नाही
तुम्ही सगळे त्यातून बचावला हि देवाचीच कृपा
पु ले शु

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 1:11 pm | हृषीकेश पालोदकर

खर आहे.
देव्कृपेनेच वाचलो.

प्रशांत's picture

6 May 2020 - 3:23 pm | प्रशांत

बेक्कार अनुभव..

सोन्या बागलाणकर's picture

19 May 2020 - 2:01 pm | सोन्या बागलाणकर

बापरे साहस चांगलंच भारी पडलं म्हणायचं.
तुमचा किस्सा वाचून मला आमच्या कॉलेजचे दिवस आणि केलेली वेडी साहसें आठवली.

अंगावर काटा आला. मस्तच!