आज ऋषिकपूर गेला म्हणूनच नाही फक्त

रविकिरण फडके's picture
रविकिरण फडके in जनातलं, मनातलं
3 May 2020 - 4:04 pm

आपल्या जगात कोण कोण असतं? आपली आई, अर्थातच, सर्वात प्रथम, मग क्रमाक्रमाने त्यात भावंडं, बाबा, इतर कुटुंबीय, शेजारी, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, अशी भर पडत जाते. आधी शाळा, मग कॉलेज, त्यानंतर नोकरी-व्यवसाय, त्यानंतर नवरा/ बायको, त्यांचे मित्र मैत्रिणी आणि स्नेही नातेवाईक...हे सर्वजण आपल्या जगात प्रवेश करतात, आणि कधी आपलं जगच बनतात, ते समजतही नाही.
 
आणखी आपल्या जगाचा एक मोठा भाग म्हणजे ते सर्वजण, जे आपलं जगणं समृद्ध करतात. आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी ह्या जगाशी आपली ओळख होत जाते. ह्या जगात कोण म्हणून येत नाही? खेळाडू, नट, लेखक, कवी, गायक-वादक, संगीतकार, चित्रकार, चित्रपट/ नाट्य दिग्दर्शक, समाज सुधारक... यादी खूप मोठी होईल. एकेक करून हे हळूच आपल्या भावविश्वाचा ताबा घेतात, आणि कधी आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात ते समजतही नाही. त्यांच्याशिवाय आपलं जग असूच शकत नाही. माझ्या जगात लता नसती, भीमसेन, कुमार, किशोरीताई नसत्या, अजित वाडेकर, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर नसते, पु. ल. आणि दुर्गा भागवत नसत्या, मदन मोहन किंवा एस डी बर्मन नसते, विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल नसतं, सत्यजित राय नसते आणि गुरु दत्तही, ना चार्ल्स डिकन्स, ना जेन ऑस्टिन - आणि हो, 'ये ताला अब मै तेरी जेबसे चाबी निकालके ही खोलुंगा' म्हणणारा अमिताभ नसता ... किती नावं घ्यावीत? हे सगळे लोक रोटी-कपडा-मकान ह्या पलीकडच्या जगण्याचं प्रयोजन देतात. ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे आपलं जग असतं.

हे असं सगळं, सूर्य माध्यान्हीला येईपर्यंत सुरु राहातं. आपल्या जगात बेरीजच होत राहाते. नवीन नाती, नव्या ओळखी, नवे सहकारी, नवे प्रदेश, नवीन आव्हाने. सगळं कसं वेगवान, दुःखसुद्धा फार काळ रेंगाळू शकणार नाही, इतपत.

मग एक टर्निंग पॉईंट येतो (गंमत म्हणजे, तो येऊन गेला तरी खूप नंतरपर्यंत आपल्याला कळतही नाही) आणि बेरजेऐवजी वजाबाकी होऊ लागते. अरे, ते अमके गेले, तुला समजलं की नाही, तू इथे नव्हतास तेव्हा आपला इस्त्रीवाला अचानक गेला हार्ट अटॅकने, आपला दिवाण दुपारी जरा आडवा झाला तो उठलाच नाही, अशासारखे संवाद वारंवार होऊ लागतात. 'आपला' काशिनाथ घाणेकर रंगभूमीवरच कोसळतो. मग आपल्या मित्रांचीही गळती सुरु होते. आपण ज्यांना गृहीत धरलेलं असतं ते आपले आई वडील, भाऊबंद... आणखी कुणीकुणी एक्झिट घेऊ लागतात. 

ह्या प्रत्येकाच्या जाण्याने आपलं जग आक्रसायला सुरुवात होते.
 
खरंतर, ही गोष्ट सततच चालू असते पण आपल्याला ती जाणवत नाही कारण तेव्हा आपल्या जगाचं प्रसरण होत असतं. सैगल जातो तेव्हा तो आपल्या जगात नसतोच मुळी फारसा. रफी साहेब जातात ते आपले असतात. किशोर कुमार आपला असतो. लक्ष्या बेर्डे म्हणजे आपल्यातलाच कुणीतरी असतो. डॉक्टर लागू कितीही वर्ष सार्वजनिक जीवनात नसले तरी ते आपल्यात आहेत ही जाणीव असते. ते जातात तेव्हा 'आता ते सगळं संपलं' ही भावना आपली पाठ सोडीत नाही.

असं आपलं जग दिवसेदिवस लहान होत जातं.

काल इरफान खान, आज ऋषिकपूर गेला आणि ही जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली. एव्हढंच. 
आणि John Donne ची एक कविताही आठवली. 

No man is an island,
Entire of itself.
Each is a piece of the continent,
A part of the main.
If a clod be washed away by the sea,
Europe is the less.
As well as if a promontory were.
As well as if a manor of thine own
Or of thine friend's were.
Each man's death diminishes me,
For I am involved in mankind.
Therefore, send not to know
For whom the bell tolls,
It tolls for thee.

(३० एप्रिल २०२०)

मुक्तक

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

3 May 2020 - 8:47 pm | कुमार१

ते जातात तेव्हा 'आता ते सगळं संपलं' ही भावना आपली पाठ सोडीत नाही.

असं आपलं जग दिवसेदिवस लहान होत जातं.

>>> +११

अंतर्मुख करायला लागणारं लिखाण
कोहम चे उत्तर कोहम असे देऊन उत्तरे टाळता येतात. मिळत नाहीत

Sandeep Bagade's picture

5 May 2020 - 7:00 pm | Sandeep Bagade

अगदी बरोबर, आपले आपले वाटणारे असे अर्ध्यावर जीवनाची वाट सोडून जातात, त्यावेळी राज कपूर यांचे एक वाक्य आठवते
जीना इसी का नाम है

चौथा कोनाडा's picture

5 May 2020 - 8:06 pm | चौथा कोनाडा

+१

चौथा कोनाडा's picture

5 May 2020 - 8:06 pm | चौथा कोनाडा

ह्या प्रत्येकाच्या जाण्याने आपलं जग आक्रसायला सुरुवात होते.

खरंय ! आपण पोरके होत चाललोय, अशी कुठंतरी जाणीव मनात खोलवर निर्माण होत चाललेली असते !
या छान लेखाच्या निमित्ताने वेगळ्या विचारांना स्पर्श केलात !
शेवटाला दिलेली कविता छान आहे !

OBAMA80's picture

6 May 2020 - 9:24 am | OBAMA80

इरफान व ऋषिकपूर च्या अचानक जाण्याने फार मोठा धक्का बसला...ऋषिकपूर तर मला फार आवडायचा...अगदी बॉबी पासून परवाच्या १०२ नॉटआऊट पर्यत सगळे सगळे चित्रपट न चुकता पाहिले. औंरगजेब मधील व्हिलन त्याच्या नेहमीच्या प्रतिमेला धक्का देणारी होती. काल तूनळीवर परत त्याची आवडणारी सगळी गाणी पाहिली...तो गेलाय यावर अजूनही विश्वास बसत नाहीये...या लेखाच्या निमित्ताने तुम्ही इतर वेळी मनात येऊन सुध्दा कागदावर उतरवता न येण्यासारख्या विचारांना छानपणे उतरवलेत !