माधवनगरच्या आठवणीतून... गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
14 Apr 2020 - 12:17 am

माधवनगरच्या आठवणीतून...

गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

गुरुवार पेठेतील आमच्या घराच्या अंगणात सायंकालीन रिंग खेळणे हे इतके सहजपणे होत असे कि तो पायंडाच पडला होता. मे महिन्यात पाण्याचा सडा घालून, नेट बांधायचे डांब वेळोवेळी पहारीने ठोकून ठाकून घट्ट तयार केले की जितके टाईट बांधता येईल तितका नेटचा दोर खेचायला गठ्ठ्या सारखा गबदुल तातडीने कामाला येई. त्या आधी आम्ही खेडकरांच्या बंगल्यासमोर कोर्टावर जात असू. चाळीतील कोकणी चेहर्‍याच्या मधु नाईकला त्या काळात हरवणे अशक्य बाब होती. तुफान वेगाच्या सर्विसवर तो अर्धे पॉईंट वसूल करे. नेटपाशी लॉबीला न ओलांडता हळूच पास करत करत तो गुंतवून एकदम तडाखेबंद फोरहँडचा फटका आमच्या आवाक्याबाहेर होत असे. जर चुकून टप्पा आऊटर बाहेर पडला तरच सर्व्हिस ब्रेक होत असे.
तो नोकरी निमित्ताने पिंपरीत गेला. पैसे खिशात खुळखुळायला लागले. सुटीत आला की त्यात त्याने मैत्रीणीवर केलेल्या खर्चाची यादी ऐकायला मिळाली की त्याचा हेवा वाटायला लागला. अंधारात केलेल्या मजेचे किस्से ऐकणे ही त्या वेळी फीस्ट असायची…!
फीस्टवरून आठवण होते ती गोगटे काका आणि काकूंच्या कडील भोजनाचा किश्याची …!

आमच्या बंगल्याशेजारच्या बंगल्यात ६५ च्या सुमारास ते राहायला आले. कॉटनमिलमधे उच्च पदावर ते होते इतपत आम्हाला माहीत होते. दर शुक्रवारी स्क्रीनचा अंक त्यांनी वाचला की आमच्या सारख्यांना हिंदी सिनेमा जगतात काय घडामोडी घडत असत ते कळे….
बाहेर तसेच घरगुती वेषातून अत्यंत नीट नेटक्या व्यक्तिमत्वाला धार होती. काकूंचे घारे डोळे असूनही प्रेमळ वाटायचे. सुभाष, सतीश त्यांची मुले आमच्यात रुळली. रिंग, क्रिकेट खेळात सामिल व्हायला लागली.
एका सणाला आम्हाला जेवणाचे निमंत्रण मिळाले. ताटे सरळ रेषेत मांडलेली. नाजुकशी सुंदर रांगोळी ताटाच्या थाटाला साजेशी होती. आम्हाला हातपाय धुवून आल्यावर लगेच काकांनी तयार ठेवलेल्या हँडटॉवेलला हात पुसून मांडी घालून बसलो. सर्वात शेवटी सतीश व सुभाष बसल्यावर, वाढायला सुरवात झाली. ताटाला डाव्या उजव्या ठरलेल्या भागात चटणी, लोणचे, कुरडया, पापडाने जागा घेतली. शुभ्र मुदीच्या भातावर पिवळ्या धम्म वरणाचे आवरण पडले. तोवर साजुक तुपाची धार पडली. आम्ही आचमन घेऊन चित्राहूती काढल्या. आता हाता तोंडाची गाठ पडणार तोवर वदनी कवळ म्हणायची सक्ती कंटाळवाणी वाटली. 'करा सुरवात' अशी काकांनी आज्ञा केली तोवर सुभ्याने वरणभाताला आपलेसे करायला सुरवात पण केली होती! मी गोड्या, मी पहिल्या घासात श्रीखंडवाटीत बोट घालून केशरकाडी सकट सुगंधी गारेगार चव घेत राहिलो. काकांनी लगेच, 'मी फेडले आहे बरंका' म्हणून आपल्या सहकार्याची पावती दिली. 'वा, फारच सुंदर, मी म्हणालो. तिकडे रव्या, अव्या तोंडलीवाल्या मसाले भातावर पुन्हा तूप घालून घेताना संकोच करायला लागले.' अहो वाढा त्यांना' सांगलीत गेलो की साजुक तुपाचा डबा आम्ही आवर्जून आणतो बरं का' काकांनी शुद्धतेची ग्वाही दिली.
फ्रिज तेंव्हा लग्झरी होती. तांब्यावर बाहेरून अवतरलेल्या गार गार थेंबाना पाहून पाणी पिण्यासाठी तहान वाढली. सुभ्याने दोन गरगरीत फुगलेल्या पुर्‍या घेताना तिसरी मागून आपली आवड सुचवली.
'अहोंच्या हाताला सुगरणीची चव आहे बरं का'! पत्नीवर अशी कौतुकाची पखरण आम्हाला आमच्या घरी कधी अनुभवायला मिळत नसल्याने जरा कावरेबावरे झाल्यासारखे वाटले…!
अव्याला आमटी आवडत असली तरी त्या दिवशीच्या फीस्ट मधे बटाट्याच्या भाजीवर तो तुटून पडला होता. मला श्रीखंड खुणवत होते. तर रव्या तोळामासा प्रकृतीचा. ताटातील पदार्थ टाकायचे नाहीत, नाही तर त्यांचे बापू कावायचे, चवीने खाऊन सर्व संपवायचे अशा शिस्तीचा तो.
' अरे घ्या रे, चापून खा!'
सतीश, आणि सुभाष ही त्यांची मुले समोरच्या पंगतीत होते. त्यांना घसघशीत वाढताना पाहून आमचा संकोच दबला. सुभ्याने पुर्‍या संपवायचा चंग बांधला. माझ्या व अव्यावर श्रीखंडवाटीत पडले की संपले अशी जणू शर्यतच लागली. काकूंना मदत करणार्‍या बाईंची पुर्‍या तळताना तारांबळ उडालेली पाहून काका खूष वाटले.
'नाही म्हणजे पापड कसे वाटले' ? रव्याने पुन्हा मागितल्या बरोबर नरगुंद्यांच्या व्हरायटी स्टोअर्सच्या सिलेक्टेड व्हरायटीतून ते आले असल्याचे त्यांनी सांगितले. भगवानदास कंदी पेढे, मारुती रोड वरच्या दुकानातून मिळवले फरसाण, वगैरे उत्स्फूर्त माहिती सांगलीच्या ख्यातीत भर घालत होती.
आपल्या मुलांच्याकडे कौतुकाने पहात ते म्हणाले, 'अहो, सतीशने तिसरी पुरी घेतली बरं का! असे पंगतीला बसले की आहार वाढतो बरं का!'
काकांना 'बरं का' म्हणताना पाहून खूप जवळपण आले. रोज टाय घातलेल्या वेषात पाहून सवय झालेल्या आम्हाला त्यांच्या प्रेमळपणात आपुलकी दिसली.
कणकेचा गोळा पुन्हा गुंदायला गेला तेंव्हा अहोंच्या हाताला कशी चव असते असे कोड कौतुक ज्या पद्धतीने झाले ते आजही ५० वर्षे उलटली तरी आठवते.'
'पुरणपोळी खावी तर अहोंच्या हातची! उकडीचे मोदक ओ ऽऽहो हो! आणि नॉन व्हेजची हैदराबादी मटण बिर्याणी तर काय विचारू नका बरं का!

मग कसा काय वाटला बेत? काकांनी आमच्या हातात मसाला विडे देत विचारले. आमच्यात सुभ्या बेरका! काकांना तारीफ करायला व करून घ्यायला आवडते हे लक्षात घेऊन, काकूंच्या प्रत्येक पदार्थाचे असे गुणगान करायला सुरवात केली. काका काकू, आजची फीस्ट कायम लक्षात राहील अशी झाली. आमच्या कुरुंदवाडच्या चक्क्याचे श्रीखंड अप्रतिम! काय शश्या? म्हणून माझ्याकडून कौतुकाचे बोल बोलते करायला लावले. 'काका फारच चवदार होते बुवा श्रीखंड, वेलची पूड, जायफळाची मात्रा, केशरी रंग! वाऽ वाऽ… चव घोळतेय जिभेवर.' रव्याला चटणीबरोबर आलेल्या कुरडया कशा कुरुमऽॾ करुम करत खायला मिळाल्या हे ऐकून काका काकूंच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य दिसले.
'पण एक विचारतो' काकांना मसाला पानाला कौतुकाच्या यादीत १२वा गडी म्हणून वाटले की काय? असे हुशार अव्याने ताडले. 'सर्वावर कडी केली ती पानाने! चांदीच्या वर्खात, गुलकंदात कातरलेल्या सुपारीच्या खांडाचे बंबई मसाला पान काका तुम्ही फ्रिजमधून काढलेत… तेंव्हापासून केंव्हा तोंडात भरतोय असे झाले होते! एक आणखी मिळेल का?' काकांनी फ्रीजमधले ४ विडे काढून आम्हा प्रत्येकाला दिले…! अहोंकडे पहात म्हणाले, 'मुलांनी असं मागितलं की बरं वाटतं, बरं का' !
गोगटे काकांच्या घरचे निमंत्रण पुन्हा कधी मिळेल या आशेवर आम्ही त्या दिवशीच्या फीस्टच्या चवीला रसनेवर घोळवतोय…

गोगटे कुटुंब दुसर्‍या मिलमधील ऑफर आल्यावर माधवनगरच्या वास्तवाची छाप कायम ठेवून गेले.

व्यक्तिचित्रलेखअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

14 Apr 2020 - 10:43 am | कंजूस

हुं एवढंच म्हणतो.

शशिकांत ओक's picture

14 Apr 2020 - 7:08 pm | शशिकांत ओक

धाग्याचा जीव तितकाच आहे...
'आम्ही माधवनगरकर' नावाने सध्या पुण्यात राहणाऱ्यांनी आपल्या आठवणी लिहायला आवाहन केले गेले होते ... तिथे त्या प्रसंगातल्या माहितगार काहींना घटना आठवाव्यात हा उद्देश होता.
अंधारछाया कादंबरीतील घटना माधवनगरच्या आमच्या त्या बंगल्यात घडल्या होत्या. मिपावर ती कादंबरी आपण वाचली असेल म्हणून इथे हा धागा सादर केला आहे.

शशिकांत ओक's picture

17 Apr 2020 - 8:59 pm | शशिकांत ओक

बराच पळाला धागा....
माधवनगरकर ग्रुपवर त्या निमित्ताने मित्रांच्या आठवणी जाग्या झाल्या...
शश्या लेका वर्णन मस्त करतोय रे...आवडले... माझ्या मित्राचा अभिप्राय ...
'सौ गोगट्यांची आठवण सांगतो', तो म्हणाला.... '७१ साली गणेशउत्सवात तुकाराम सदेह वैकुंठाला जातात असा देखावा केला होता. तू तेंव्हा हवाईदलात ट्रेनिंगला गेला होतास... त्यातल्या गरूडाचे पंख हालत नव्हते... त्या आमच्या खटपटीच्या प्रयत्नांत सूचना देत थांबल्या होत्या. त्या जर्मन भाषेच्या तज्ज्ञ होत्या. तिकडे राहूनही आल्या होत्या...

सिरुसेरि's picture

19 Apr 2020 - 4:23 pm | सिरुसेरि

छान आठवणी . माधवनगर , बुधगाव , रेल्वे पुल , मीरा होउसिंग सोसायटी , आर टी ओ ऑफिस , दिलिप बिडिवाला दुकान हि ठिकाणे आठवली .

ओक सरांच्या लेखनाची शैली खुसखुशीत आणि रंजक आहे.

चांदणे संदीप's picture

19 Apr 2020 - 5:26 pm | चांदणे संदीप

पंगत छान झाली.
मला आमच्या लहानपणीची एक मजेशीर पंगत आठवली यानिमित्ताने. :)

सं - दी - प

योगविवेक's picture

24 Apr 2020 - 12:14 am | योगविवेक

रव्याला चटणीबरोबर आलेल्या कुरडया कशा कुरुमऽॾ करुम करत खायला मिळाल्या हे ऐकून काका काकूंच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य दिसले.
'पण एक विचारतो' काकांना मसाला पानाला कौतुकाच्या यादीत १२वा गडी म्हणून वाटले की काय? असे हुशार अव्याने ताडले. 'सर्वावर कडी केली ती पानाने! चांदीच्या वर्खात, गुलकंदात कातरलेल्या सुपारीच्या खांडाचे बंबई मसाला पान काका तुम्ही फ्रिजमधून काढलेत… तेंव्हापासून केंव्हा तोंडात भरतोय असे झाले होते! एक आणखी मिळेल का?' काकांनी फ्रीजमधले ४ विडे काढून आम्हा प्रत्येकाला दिले…! अहोंकडे पहात म्हणाले, 'मुलांनी असं मागितलं की बरं वाटतं, बरं का' !

मसाला पानाला १२व्या राखीव खेळाडूतून कॅप्टन बनवल्याची किमया
श्रीखंड पुरीच्या जेवणाला तृप्त करून जाते.