जब I met मी

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
27 Mar 2020 - 5:35 pm

लग्नापूर्वीची मी एक हुशार, मनमिळाऊ आणि थोडीशी टाॅमबाॅईश अशी मुलगी. शाळेत नेहमी चांगले मार्क्स. घरातून भरपूर प्रोत्साहन असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, परिक्षा,खेळ यात सहभाग असायचा. आईवडिल मला व्यवहारज्ञान यावे म्हणून बरीचशी कामे सांगायचे. उदा. बँकेत जाऊन लाईटबिल भरणे, पैसे भरणे-काढणे, एखाद्या परिक्षेचा फाॅर्म भरणे, पोस्टाची कामे इ. मला लागतील त्या वस्तू बहुदा मीच खरेदी करायचे.
माझे अरेंज मॅरेज झाले. लग्नाची माझी खरेदी बहिणींसोबत मीच केली होती. सासरी आल्यानंतर नवी नवरी म्हणून कौतुक व्हायचे. घरातील सर्व बायका अवतीभवती असायच्या, हवंनको ते बघायच्या. मलाही बरे वाटायचे.लागेल ती वस्तू कुणीतरी आणून द्यायचे. मात्र घराबाहेर पडण्याचा प्रसंग कधी आलाच नाही.असं करता करता एक महिना झाला. आपले शेजारी कोण आहेत हेदेखील मला माहित नव्हते. बर्याचदा ओळखीच्या बायका घरी यायच्या आणि हाॅलमध्ये बसून गप्पा मारून जायच्या.मला अशावेळी चहा करण्याच्या निमित्ताने किचनमध्ये पाठविले जाई. अगदीच कोणी बाई माझ्याशी ओळख करून घ्यायला आत आली, तर मला तिच्याशी बोलता येई, अन्यथा मी केलेला चहा दुसरेच कुणी बाहेर घेऊन जाई. हळूहळू माझ्या मनाचा कोंडमारा होऊ लागला,मात्र काहीच बोलता येईना. वरकरणी सर्व ठीक होते.
कधी एखादी वस्तू हवी असेल तर 'अग तू कशाला जातेस?अमका(अमकी) आणेल ना.! अशी नव्या नवरीसाठी काळजी दाखविली जाई.
पुढे मी नवर्याबरोबर राहण्यासाठी पुण्याला निघाले. घरातून बाहेर पडताना जाणवले , मी चक्क दोन महिन्यांनी घराबाहेर पडत होते.
बरे , आता नवर्याबरोबर पुण्याला आले, स्वतंत्र संसार थाटला, तरी हे 'काळजी प्रकरण' काही थांबेना. आता नवर्याला माझी ' काळजी' वाटत होती.
मी जवळच्या एका शाळेत अर्ज केला आणि माझी तिथे लगेच शिक्षिका म्हणून नेमणूक झाली.मात्र अगदी भाजी पासून ते माझे कपडे,चप्पल,पर्स इ. सर्व खरेदी नवर्याच्या सोबतीने पर्यायाने त्याच्या पसंतीने होऊ लागली. कधीतरी एखादी वस्तू मी घेतलीच ,तर ती कशी महाग पडली किंवा खराब आहे, हे ऐकवले जाऊ लागले. अजून काही दिवसांनी अशी वेळ आली कि एकटीने अगदी दहा रूपयांची वस्तू खरेदी करायची सुद्धा
माझी प्राज्ञा नव्हती. मला नवरा बरोबर असल्याशिवाय कोणतेच बाहेरचे व्यवहार करता येईनात! सतत 'घरचे काय म्हणतील किंवा मी चूक तर करीत नाही ना' हीच भिती!
दोन वर्षानी मला मुलगा झाला. आई आजारी असल्याने येऊ शकली नाही. सासूबाई आल्या. त्यांच्याच पद्धतीने बाळाचे सर्व काही करत होते. पटत नसले तरी. उदा. बाळाच्या कानात रोज तेल घालणे, रडत असल्यास नजर काढणे इ.
बाळ पंधरा दिवसांचे होते. अचानक त्याला ताप आला.
यावर त्याला दवाखान्यात न नेता त्या दोन दिवस फक्त नजर काढत होत्या. अजून दोन दिवस गेले. ताप वाढला. बाळाची अवस्था नाजूक झाली होती.माझी घालमेल होऊ लागली. संध्याकाळी बाळ दूध देखील घेइना. तरी सासूबाई ढिम्म .
'काहितरी नजरच लागली असेल , एवढ्याशा बाळाला काय दवाखान्यात न्यायचे. डाॅ. विनाकारण अॅडमीट करून पैसे ऊकळेल' . याला नवर्याचीही सम्मती. रात्रभर मी विचार करीत जागले. शेवटी युक्ती सुचली.!
सकाळी उठून नवरोबा आणि सासूला म्हटले, तुम्ही दोघे देवाला जाऊन या, बाळासाठी साकडे घाला. याला मात्र दोघे तयार झाले. ते दोघे घराबाहेर पडताच बॅग घेतली, बाळाला उचलले आणि तरातरा चालत गेटजवळ पोहोचले, तोच वाॅचमनकाका मागून हाका मारत आले. अहो ताई, तान्ह्या बाळाला घेऊन एकट्याच कुठे निघालात? मग त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. बाळाला डाॅ. कडे नेते हे कळल्यावर
त्यांनाही पटले.त्यांनी आश्वासन दिले, ताई तुम्ही निर्धास्त रहा.
कुणाला कळणार नाही. बाळाला जपून न्या अन जपून आणा!
पायरया चढून दवाखान्यात गेले. बाळाला टेबलवर ठेवले. डाॅक्टर चकित!! वीस दिवसांच्या बाळाला घेऊन एकटीच बाई भर दुपारी कशी आली? मग मीच सर्वकाही सांगितले. त्यांनी बाळाला तपासून सांगितले, ताबडतोब काही अॅन्टिबायोटिक्स सुरू करावी लागतील अन्यथा न्यूमोनियाच होण्याच्या मार्गावर आहे. मग जवळच्या मेडिकलमधून औषधे आणून एक डोस डाॅ. समोरच बाळाला दिला.
घरी आल्याबरोबर सर्व औषधे कपाटात कपड्यामागे लपवली. रोज ठराविक वेळी सर्वांची नजर चुकवून बाळाला औषध देत राहिले. तीन दिवसात बाळ खडखडीत बरे झाले!
नवरोबांना म्हटले, 'देवाने तुमचे ऐकले बरं! देव पावला!'

कथालेख

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

27 Mar 2020 - 6:04 pm | संजय क्षीरसागर

लिहीत राहा.

चिक्कु's picture

27 Mar 2020 - 8:51 pm | चिक्कु

छान

जव्हेरगंज's picture

27 Mar 2020 - 9:37 pm | जव्हेरगंज

नवरोबांना म्हटले, 'देवाने तुमचे ऐकले बरं! देव पावला!'>>>> असाच गणीमी कावा वापरण्याशिवाय पर्याय दिसत नाही!!

असो!

धन्यवाद संजयजी,चिक्कू,जव्हेरगंज !

नावातकायआहे's picture

28 Mar 2020 - 10:25 am | नावातकायआहे

:-( सर्व औषधे कपाटात कपड्यामागे लपवली. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2020 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान तरी कसे म्हणावे असे वाटले. कधी कधी दोन पावले डेरींग करुनही पाहा.
नवरा आणि सासू नावाची व्यवस्था बॅकफूटवर जाऊ शकते.

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

28 Mar 2020 - 11:12 am | धर्मराजमुटके

मस्त कथा ! पुढचा भाग लवकर येऊद्या.