चला माणसाप्रमाणे वागूया !

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
24 Mar 2020 - 11:42 am

माननीय आणि प्रिय रसिक वाचक ,
*सप्रे* म नमस्कार !
आपण सगळ्यांनी / काहींनी माझे लेख , कविता , स्केचेस , पेंटिंग्ज , अभिनयाच्या व गाण्याच्या clips , गझल्स , पुस्तक वाचलं असेल.पण आज मी एक वेगळ्याच विषयावर हा लेख लिहितो आहे.

गेले काहि आठवडे जगभरामधे आणि आपला भारत पण जगाचाच एक भाग असलेल्या आपल्या देशात — कोरोना विषाणूमुळे भयंकर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. *आपले पंतप्रधान — ते कुठल्या पक्षाचे आहेत याच्याशी माझं काहीही देणंघेणं नाही , पण त्यांनी — मा.नरेंद्र मोदी यांनी भारताला या संकटापासून कमीत कमी त्रास व्हावा यासाठी केलेले प्रयत्न आपण सगळेच पाहतोय.गेल्या ७ दशकांमधे जे अशक्य होतं अशा अनेक अकल्पनीय बदलांनी त्यांनी भारताचं नांव जगभरात अग्रणी नेऊन ठेवलेलं आहे ! सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या देशात सैनिकांवर दगडफेक होण्यासारखी व देशाचा ध्वज—झेंडा जाळण्याची निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी कृत्यं घडत होती , तशा कृत्यांची वारंवारिता नष्ट किंवा कमी केलीये व सैनिकाला त्याचा सन्मान मिळवून दिला आहे !*
परवा २२ मार्चला देशभरात दिवसभर कर्फ्यू पाळल्यानंतर आपल्यापैकी काहि दीडशहाण्यांनी ५ वाजता रस्त्यांवर जमा होऊन , गच्चीमधे एकत्र जमून , ढोल ताशे वाजवून , टाळ्या वाजवून , थाळ्या वाजवून , शंख वाजवून सेवाभावी लोकांचे जाहीर आभार मानलेत ! काय म्हणावं या वेडेपणाला ? जे टाळण्यासाठी दिवसभर विजनवास पत्करला ते झुगारून देऊन परत एकत्र जमायचं ? जगभरात कोरोना कसा पसरतोय हे बघत—वाचत—ऐकत असूनही ?
दुसर्‍या दिवशी — मी ठाण्याचा रहिवासी असल्याने ठाण्याबाबत लिहितोय , चेकनाक्यावर वाहनांची तूफान गर्दी करावी ? सगळं काही सरकार करणार ? मग आपण काय करायचं ? हे असं जमावबंदी असतानाही , अनेक विनंत्या आवाहनं करूनही गर्दी करायची , मग विषाणूचा प्रादुर्भाव झाला की इतरांपर्यंत तो पोचवायचा व वर मग सरकारला शिव्या घालायच्या ? *नकटीचा मुलगा पण नकटाच!* या न्यायाने मोदीजींचं कर्तृत्व न पाहता त्यांच्या प्रत्येक कृतीचं राजकारण करायचं ?
*आवश्यकतेखेरीज घराबाहेर पडू नका!* — या सरकारी आवाहनाला धाब्यावर बसवून कालपासून अनेक सुशिक्षित विद्वान घराबाहेर व्यायामासाठी ( जाॅगिंग / ब्रिस्क वाॅकिंग / वाॅकिंग ) बाहेर पडलेले दिसत होते.आणि मग यापैकीच काहि / सगळी मंडळी मग सोशल मीडियावर कोरोनापासून वाचण्यासाठी अमूक करायला हवं , सरकारने तमूक करायला पाहिजे होतं..... वगैरे ज्ञान पाजळणार ! सोपं आहे ना ? घरात ए.सी. मधे / पंख्याखाली बसून उपदेश करणं एकदम सोपं ना !
मंडळी , *काळ कुणालाही इन्कम टॅक्स सारखी किंवा इतर कुठल्याही सरकारी नोटिशीसारखी नोटीस देत नाही!* आणि *मला कुणाचीही गरज नाही!* या आत्मप्रौढीमधे वावरणार्‍या तमाम लोकांना *मृत्यूनंतर पण ४ लोकं खांदा द्यायला लागतात!* या कटू सत्याचा विसर पडलेला दिसतो !
मंडळी , अजूनही वेळ गेलेली नाही ! ज्या कळकळीने आराम करायच्या वयामधे पण १८— १८ तास अथक काम करणारे मोदीजींसारखे पंतप्रधान आणि आपल्या देशातील तमाम नागरिक सुरक्षित रहावेत म्हणून अनेक सेवाभावी लोक झटतायत , त्यांच्या त्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी साथ नको का द्यायला ? बरं ते पण काय करून ? तर आपल्याच घरामधे स्वत:ला कोंडून घेऊन , स्वत:च्या स्वार्थासाठी—आरोग्यासाठी ! *जान है तो जहाँ है!* — हे माहित आहे म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी , आपल्याच स्वार्थासाठी !
मंडळी , तुम्ही सगळे भारतीय , मला धडधाकट हवे आहात , पुढची अनेक वर्ष आपले ऋणानुबंध दृढ रहायला हवेत ! मला तुम्ही सगळे हवे आहात — जसे आहात तसे ! आपल्यात *मतभेद असतील पण मनभेद नसावेत!* मला *तुमची गरज आहे!* कधी माझं कौतुक करण्यासाठी , कधी निंदा करण्यासाठी , कधी टाळ्या वाजवण्यासाठी तर कधी चिखलफेक करण्यासाठी ! *मला कुणाचीही गरज नाही!* या घमेंडीमधे मी कधी नव्हतो , आज नाही आणि यापुढेही नसेन !
तेंव्हा मंडळी , *सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या , सरकार सांगेल ते ते सर्व कसोशीने पाळा , आरोग्यमयी रहा , दीर्घायू व्हा !*

लहानतोंडी मोठा घास झाला असल्यास क्षमस्व ! पण जगलो वाचलो तर दीडशहाणपणा करायला भविष्यात भरपूर संधी मिळेल याची खात्री बाळगा! कारण भारतात सगळ्यालाच स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनंच नको तेवढं स्वातंत्र्य नको त्याबाबत न घेता *सरकारच्या विनंत्या , आवाहनं , आदेश याचं पालन करूया!*

कळावे ,
आपला विनम्र ,
उदय गंगाधर *सप्रे* म—ठाणे

समाजलेख