मुंगूसाची गोष्ट- भाग २

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
7 Mar 2020 - 2:38 pm

।। मुंगूसाची गोष्ट २ ।।

ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो. अर्थात आम्हाला सांभाळत सांभाळत उडवत राहणाऱ्या हातांना मांज्याने कसं कुठं कापलं गेलं असेल हे त्यांनाच ठावं.

थोडक्यात काय तर मे महिन्यात आजोळी दिवसभर आम्ही असे मुक्त पतंग बनून विहार करायचो आणि संध्याकाळनंतर आम्हाला कोणी ना कोणी आमच्या फिरक्या लपेटत लपेटत खाली उतरवायचे. दिवसा तसा कोणालाही तक्रारी,चुगल्या वगैरे करायला वेळ नसायचाच. मस्त्या मावळल्यावर शरीरावर कुठे कुठे त्यांचे पुरावे उगवलेले दिसायचे. मग क्वचित सौम्य कधी परखड भाषेत आरोपींची नावं सांगितली जायची. खरी मजा तर पुढे आहे. तक्रार असो वा नसो सगळ्यांच्याच आया आपापल्या अपत्याला ( कार्ट्याला) निर्विकारपणे व आत्मविश्वासाने बुकलायच्याच. हे पवित्र कृत्य करताना," आमच्या घोड्याने काहीच नाही का केलं? काहीतरी उचापती केल्या असतीलच की. काय रे? खरं सांग." यावर तो केविलवाणा व गोंधळलेला बालघोडा जर बोलला," माझं नाव कोणीही घेत नाहीए. तरीही माझ्यावर उलट फैरी का?" तर प्रत्युत्तर म्हणून एखादी चापटी प्रसाद मिळायचीच व त्यासोबत बौद्धीकही मिळायचं," बघितलंत, कसा आगाऊपणा वाढलाय ते." बरं जो तक्रार घेऊन जायचा त्यालासुद्धा त्याची आई धोपटायचीच आणि आरोपीच्या आईला म्हणायची," तुझा नाही गं, आमचाच आगाऊ आहे. त्यानेच आधी खोडी काढली असेल." आता ह्यावर आमच्या 'मावशी' पक्षाने थंड घ्यावं की नाही? पण तिला भाचरांचा पुळका यायचाच. ती म्हणायची," नाही ग, आमच्याला सवयच आहे मारामारीची, छोट्या छोट्या गोष्टीतही भांडणं उकरून काढतो. 'कलर'ला आलाय; चांगला बघायला झालाय." 'कलरला आलाय' ह्या हिंसक वाक्यप्रचाराचा निव्वळ वाक्यात नव्हे तर व्यवहारात (सढळ हाताने) त्या काळात सर्रास वापर व्हायचा. अशा प्रकारे आम्ही भावंडं एकत्र येऊन पुन्हा खेळायलाही जायचो आणि हरिश्चंद्राला न्यूनगंड देत आमच्या मावश्या व आया न्यायनिवाडा करत बसायच्या.

हाय रे दैवा, कसले हे वकील आपल्याच अशीलाला दोषी सिद्ध करतात? आमचा तर बुवा ह्या अत्याचारांमुळे तेव्हापासूनच न्याय व्यवस्थेवरुन विश्वास उठला.
( निर्भयाच्या आरोपींच्या वकिलांसारखे आदर्श वकील हवेत... एकदम पारदर्शक!!!)

आहारशास्त्र कशाशी खातात हे आम्हाला माहीत नव्हतं. मोठ्यांना माहीत होतं का नाही हे पण ज्ञात नाही. पण गोष्टशास्त्र सर्वांना ठावं होतं. त्यानेही प्रथिनं, कर्बोदके आणि काय काय मिळायची जी शरीराबरोबर मनातंही मुरायची नंतर शरीरावर तरारलेली दिसायची. मोठ्या व्यक्तींकडे आम्हा नातवंडांना, भाचरंडांना द्यायला वेळ होता. आम्हाला त्या वेळेची गरजही होती व जाणही. आहार चौरस असायला हवा तशी नातीही चौरस नको का? मुलांना सर्व प्रकारची नाती अनुभवायला मिळावी, त्यांत सगळ्या पोषक तत्त्वांची रेलचेल असते.

वर सांगितल्याप्रमाणे खूप सारे मांजे होते आम्हाला. गोष्टींसाठी कोणताही मांजा चालायचा. रात्री कधी गप्पांचा तर कधी गोष्टींचा फड रंगायचा. कधी ओटीवरील पलंगावर, कधी पुढल्या किंवा मागच्या पडवीत झोपाळ्यावर, कधी वरच्या घरी तर कधी खालच्या घरी ( आजोबांच्या चुलत्यांची घरं) कधी कधी तर नुकत्याच उगवलेल्या कच्च्या चांदण्यांच्या व पौर्णिमेच्या पिक्क्या चंद्राखाली अंगणात बसायचो. दिवसा आमचं कोंदण बनलेलं आभाळ कंदिलाच्या पिवळा प्रकाशाशी खेळत आमच्या अंगाखांद्यावर आलेलं असायचं व आमच्या डोळ्यांत जमा होऊ घातलेल्या झोपेला पळवत रहायचं.

राम, कृष्ण हे नायक त्यांच्या नायिकांसह यायचे काय काय चमत्कार करत रहायचे. आमच्या भुवया उंच उंच होत जायच्या. मधे मधे सदाचरणाच्या शिकवणीची सम यायची जिथे "...सारखं वागायचं..." यावर आम्ही सगळे एका सूरांत " नाही " असा कोरस द्यायचो. वेळप्रसंगी त्या गोष्टीतून आम्हाला दैनंदिन जीवनात 'हट्ट करायचा...', ' आईबाबांना त्रास द्यायचा...', ' शाळेत मस्ती व मारामारी करायची...', 'शिक्षकांना उलट बोलायचं...' असं खूप काही "नाही" करायचं व तेवढयाच पटीत " करायचंच " असंही बरंच काही पटवायचा प्रयत्न व्हायचा.

आम्ही 'पुढे काय झालं' या जयघोषात ताबडतोब सर्व शिकवण विसरायचो हे काही वेगळं सांगायला हवं का? मधेच ऐकू येणारी झोपळ्याच्या कडीची करकर (जी मागे जातानाची वेगळी अन् पुढे येतानाची वेगळीच)
रातकिड्यांच्या आवाजासोबत एकजीव होऊन सोबत करायची. क्वचित एखादी पालही त्या आवाजांत आपली चुकचुक मिसळून दाद देऊन जायची. तर कधी उत्साही बेडूक त्यांच्या डराव डराव व उड्यांसह त्या मैफिलीत धम्माल उडवून द्यायला यायचे. कधी बाहेर कोणाकोणाचे निरोप देत लगबग करणारा वारा घटकाभर आमच्यामधून धावू धावू करत जायचा. गोष्टीतला एखादा रोमहर्षक क्षण नेमका त्याचवेळी यायचा, ज्याने अंगावर शिरशिरी आल्याशिवाय रहायची नाही. मधेच निसर्गाच्या छोट्या हाकेला ओ देण्याचा सामुहिक कार्यक्रम संपन्न व्हायचा. " आम्ही येईपर्यंत गोष्ट पुढे नेऊ नका ना." अशी नम्र धमकीही दिली जायची. अंधारात कुठे पालापाचोळा उडला किंवा पानं हलली किंवा एखाद्या लाकडावर पाय पडला तरी बजरंगबलींची गोष्ट ऐकणारे आम्ही प्रामाणिकपणे घाबरून व इतरांना घाबरवून पळापळ करायचोच. एव्हाना अंथरुणावर आमच्यासाठी पहुडलेल्या निद्रादेवीला जांभया यायला लागायच्या. ह्या सगळ्याला साक्षी असा एक स्थिर, संथ व अनंत आवाज म्हणजे घडाळ्याच्या लंबकाची टिकटिक. त्या आवाजात गोष्ट ऐकण्याची उत्सुकता, न ऐकण्याचा कंटाळा, आवरायची लगबग, उद्याच्या खेळांची अधीरता, असं काहीच नसायचं. मागेही नाही व पुढेही नाही, फक्त अस्तित्व दुसरं काही नाही. गोष्ट संपवण्याचा आग्रह नाही व चालू दे असा मनमोकळेपणाही नाही. अध्यात्माची वेगळी तपस्या नाहीच.

रामायण, महाभारत, ऋषीमुनी, शिवाजी, मावळे, पेशवे, संतपरंपरा, विवेकानंद, स्वातंत्र्यसैनिक आणि कोण कोण येऊन हजेरी लावून जायचं. नानाविध गुणांनी न्हाऊन चिंब होणं एवढंच शिल्लक असायचं. ह्या महानुभाव व्यक्तींच्या जडणघडणीच्या वेळी घड्याळं नसतीलही पण काळ तेव्हाही होताच. तो उद्याही असणार. लंबकाचा एक पाय भूतकाळात व एक भविष्यात अडकवत मधे वर्तमानात रहायला शिकवत राहणार. कदाचित अलीकडे तो थोडा आशाळभूत झाला असावा कारण पालक व मुलं ह्याच वर्तुळात अडकलाय तो स्वतःच. कोणा महान व्यक्तीला लहानपणी होत असणारा उपदेश ऐकून त्या बालका/ बालिकेच्या चेहऱ्यावर उगवलेले सूर्य उद्या पूर्वेकडे उगवत राहतील, या आशेने तो काळ मोजत राहिला.

आज तो अलेक्सावर अवलंबून आहे . अलेक्सा गोष्ट, गाणी , अंगाई सर्व काही सादर करेल पण ती थोपटू शकत नाही ज्या थोपटण्यातून झिरपणारा ऊर्जेचा प्रवाह मिळतो. त्या हातांना तुपाचा, लोण्याचा, आमसुलांचा, फणसाआंब्याच्या रसांचा, सॅनिटायजरविरहित वात्सल्याचा आवश्यक वास असतो. तो त्या यंत्रात असतो का? एकेकाला उचलून अंथरुणावर ठेवत; पांघरूण सारखं करून; केसांतून हात फिरवून; गालावर आशीर्वाद टेकवणं अलेक्साला जमणार नाही. अलेक्सा वाईट नाही पण ती सोय आहे. मुलं सोयीनुसार वाढवणं हेच सोयीस्कर झालंय का आज? गोष्टीच ऐकायच्या तर त्या तूनळी, ऍप, डिश या सर्वांवर आहेत. एकदा सबस्क्रीप्शन केलं की २४ तास ऐकता येतात. पण त्यांतील विवेक, विचार कोण उलगडून देणार? मुलांनी आपापल्या कुवतीनुसार घ्यावं बाकी रामकृष्ण हरी. एक मोठ्ठा असो.

आमच्या वडीलधाऱ्यांनी इतिहासातील उदाहरणांवरून उत्तम बियाणं रुजवायची भरभक्कम खटपट केली. जे काही बरं मनीं अंगी आलं असेल, त्यात ह्या मशागतीचा मोलाचा वाटा आहे. आहार, शरीर, मानस ह्या शास्त्रांसोबत गोष्टशास्त्र विकसित व्हावं. समाजात एखादी बाब चालू रहावी, व्हायला हवी, असा हट्ट धरणं म्हणजेच ती बाब होत नाहीए किंवा हळूहळू कमी होतेय ह्याचं द्योतक असतं. ( उत्तम उदाहरण- मराठी भाषा टिकवावी, हिंदूंनी एकत्र यावं आणि वगैरे वगैरे...)तेव्हा जे घडतंय ते मान्य करणं हा उपाय नसूनही तीच तडजोड असते.

शेवटी गोष्टी सांगणं हा एक संस्कारांतील एक यज्ञ आहे. आपली पुढील पिढी मुंगूसाप्रमाणे सुवर्णविचारांची होवो ज्याने अविचाराचे विष पचवता येईल, असे एक दान समाजाला न मागताच मिळावे.

इति अलम्।

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
५.३.२०२०

मुक्तकभाषाप्रकटनविचारसद्भावना