दोसतार - ३४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Jan 2020 - 8:09 am

आम्ही सगळे शिक्षक होऊन शाळा चालवणार. वैजुच्या सूचनेचे टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केले. मस्त कल्पना होती. सगळ्यानाच आवडली. कोणी कोणता तास घ्यायचा याच्या सूचना येवू लागल्या. माधुरी गाण्याचा तास घेणार होती. आपी गणीताचा, सुधीर इंग्रजीचा, अजित इतिहासाचा, महेश भौतीक शास्त्राचा. टम्प्याने तर आपण शाळेची तास संपल्या नंतरची घंटा वाजवणार असल्याचे जाहीर केले.
शाळा सुटे पर्यंत आठवी ब चा अर्ग त्या दिवशी शाळा चालवणर असल्याचे सर्व शाळाभर झाले होते.

शिक्षक दिन पुढच्या आठवड्यात होता. मुख्याध्यापक सरांनापण ही कल्पना आवडली. आठवीच्या इतर वर्गातील मुलांनाही त्या दिवशी आपण शिक्षक व्हायचे होते.
सोनसळे सर ,घाटे सर. जोशी बाई , तारकुंडे बाईंकडे ज्यांना शिक्षक व्हायचे होते त्यांनी नावे दिली. आम्ही सगळे सातवी पर्यंत च्या वर्गात त्या दिवशी शिक्षक म्हणून एक एक तास शिकवणार या पेक्षाही त्या दिवशी शाळा चालु असताना वर्गात न बसता मधल्या चौकातून अधिकृतपणे चालत जाता येणार याचेच अप्रूप होते.
ज्यांना जे विषय शिकवायचे होते ते त्यांनी निवडून दिले. काहीना जोशी बाईनी दिले. नागरीक शास्त्र , शिकवायला कोणीच तयार नाही म्हंटल्यावर बाईनी तो विषय सुषम , नूतन आणि अमर ला दिला. पाचवी सहावी आणि सातवी च्या वर्गाचे त्यानी नागरीक शास्त्र घ्यायचे. जीवशास्त्र हेमा आणि नयना, रसायन . हे सगळे करत असताना प्रयोगशाळा , शिपाईमामा, कार्यालय हे पण आम्ही मुलेच पहाणार होतो. शालाप्रमुख , प्रयवेक्षक या सगळ्याच जबाबदार्‍या त्या दिवशी आमच्या कडे.
टम्प्याने अगोदरच शाळेची घंटा द्यायची जबाबदरी घेतली होती त्यामुळे त्याला कोणताच तास शिकवायचा नव्हता. त्या मुळे काळजी नव्हती. पण एल्प्याला सातवीचे गणीत शिकवायचे होते. सहावीच्या वर्गांना मी हिंदी शिकवणार होतो.
" ए आठवी अ आणि क तुकडीतल्या मुलांना शिक्षक व्हायचे आहे म्हणे . त्या मंदार ने इंग्रजीचा तास घ्यायचाय म्हणून तारकुम्डे बाईंकडे नावही दिलंय" योग्या तावातावाने म्हणाला.
"म्हणजे आपल्या वर्गाची बातमी बाकी वर्गात पोहोचली त्यांनाही यात सहभागी व्हायचय. खरेतर आपण ही बातमी गुप्त ठेवायला हवी होती. कुणालाच सांगायला नको होती."
" हो ना आपली आयडीया ढापली की त्यांनी"
" आपण त्यांना शिकवूच द्यायचे नाही. ते शिकवायला लागले की बाहेर मोठमोठ्याने बोलून दंगा करु. म्हणजे शिकवताच येणार नाही त्यांना मी घोषणापण ठरवलीये." आमचं शिकु आमचं शिकु . पुण्याला जाऊन जोडे विकू" महेश च्या घराजवळच्या मैदानातली मुले कोणी काही खेळाताना चिडवायला ही घोषणा देत असतात .
" आणि ती सुप्रिया भावे गाणे शिकवायला लागली की बघच मी तर हेच गाणे बाहेरून मोठ्याने म्हणणार अगदी मालकंस रागात म्हणते बघ कशी. चोंबडी आहे फार, उतरवतेच बघ तीचा चोंबडेपणा." शक्य असते तर संगीताने " आमचे शिकु आमचे शिकु पुण्याला जाउन जोडे विकु" हे गाणे तिथल्या तिथे मालकंस रागात गाऊनही दाखवले असते.
कोणी काय कसे शिकवायचे या पेक्षाही.इतर तुकड्यांना शिकवू न देण्याच्य एकेक कल्पना निघायला लागल्या
" सुरू तर करू देत त्यांना शिकवायला मी घंटा देवून तासच संपचून टाकतो त्यांचा" टंप्याची आयडीया चांगली होती पण शिपाईमामांनी शाळेत असे तास चालू असताना मधेच घंटा वाजवून तास संपवल्याचे कधी आठवत नव्हते.
पण आपली आयडीया त्यांनी का ढापावी. हवे तर त्यांनी वेगळा शिक्षक दिन साजरा करावा"
आपण तारकुंडे बाईंकडे जाऊन त्यांनाच विचारूया आमची आयडीया त्यांना का सांगीतली म्हणून" ही सूचना चांगली होती आम्ही आमच्यातच वाद घालत बसलो असतो तर प्रश्न कधीच सुटला नसता. आणि इतर तुकड्यांमधे जाऊन थेट बोलणी करणेही शक्य नाही कारण त्यात बोलण्यापेक्षा कृतीच जास्त झाली असती. त्याचा आम्हालाच फटका बसला असता.
आपी वैजू माधुरी आंजी योग्या महेश एल्प्या टंप्या…. आमची वरात थेट तारकुंडे बाईकडे
" बाई तुम्ही आमची आयडीया इतर वर्गात का सांगीतली आता त्यांनापण शिक्षक दिनाला शिकवायचेय. आमची आयडीया ढापली त्यांनी." एरव्ही समूह गीत गातानाही सगळेजण इतक्या एका सुरात बोललो नसतो.
"अरे एकेक करून बोला.रे म्हणजे मला नीट ऐकू येईल. मला दोनच कान आहेत इतके सगळे जण बोललात तर कसे होणार". तारकुंडे बाईंनी आमच्या मोर्च्याला शांत केले.
" हं बोला काय म्हणताय?"
" बाई तुम्ही आमची शिक्षक दिनाची आयडीया इतर वर्गांना का सांगितलीत"
"आमची आयडीया ढापली गेली" एरवी सांगूनही एल्प्याला इतके योग्य सकर्मक कर्मणी वाक्य रचता आले नसते.
" आयडीया ढापली गेली? ते कसे काय"
" मग त्यांनाही शिक्षक दिन साजरा करायचाय"
" आपण सगळे मिळून साजरा करतोय शिक्षक दिन. ते पण आपल्या शाळेचेच विद्यार्थी आहेत ना"
हेही खरेच होते. आठवी अ आणि आठवी क
" हे बघा शाळेचे त्या दिवसाचे जे वेळापत्रक असणार आहे त्या नुसारच हे तास घ्यायचे आहेत. पाचवी सहावी सातवी च्या प्रत्येकी तीन तुकड्या , एकूण नऊ वर्ग, दिवसाच्या आठ तासीका. म्हणजे बहात्तर तासीका. इतके मोठे काम एकट्या आठवी ब ला एवढे सगळे शक्य आहे का? " तारकुंडे बाईंनी आम्हाला हिषेब करून दाखवले
"एखादे मोठठे काम चांगले करायचे असेल तर त्यात बाकीच्यांनाही सामील करुन घेऊया. तरच ते नीट होते. आणि तुम्हाला शिकवण्याचा जो आनंद मिळणार आहे तो त्यांनाही घेऊ द्या ना. सगळे मिळून शिक्षक दिन साजरा करुया प्रत्येक वर्गावर एक अशा मोजल्या तरी नुसत्या हिंदीच्याच नऊ तासीका होतात नऊ जणांना घेऊ देत हिंदीच्या तासीका काय हरकत आहे. एका दिवसात नऊ तासीका शिकवणे एकाला अवघड जाईल. शिवाय काही वर्गात एकाच वेळेस हिंदी च्या तासीका सुरू असतील तर मग कसे करणार?"
तारकुंडे बाईंचे म्हणणे बरोबर होते. एकच विषय दोन वर्गात चालू असेल तर काय या वर्गातून त्या वर्गात उड्या मारून शिकवायचे का.
' पण बाई घंटा द्यायचे शिपाईमामांचे काम मी कोणाला देणार नाही. "टंप्याला, घंटा द्यायचे काम इतर कोणाला तरी करु द्यायचे नव्हते." तासीका संपल्याची घंटा मीच देणार"
" ठीक आहे. शिपाईमामांना इतरही कामे असतात. शाळेची स्वच्छता राखणे, वर्गावर्गावर नोटीस फिरवणे, शिक्षकांना आवश्यक साहित्य नेऊन देणे, मदत करणे वगैरे त्यासाठीही लागेलच की कोणीतरी" टंप्याच्या मान डोलावण्यावरून समजत होते तारकुंडे बाईंचे बरोबर सांगताहेत.
" बरोबर" बाईंनी विचारल्या विचारल्या आम्ही सगळ्यांनी माना डोलावल्या.
" आता मला सांगा तुमची तयारी कुठवर आली आहे"
"मी मराठीची कविता शिकवणार आहे." नितीन
" मी सातवीला इंग्रजी चेंज द टेन्स शिकवणार" मिलींद
" आणि मी भोगालातला बदाऊन लोकांचा धडा घेणार शेजारच्या अभि कडून पुस्तक पण आणलय" राजा
" मी चित्रकला , स्टील लाईफ नाहीतर वेलबुट्ट्यांची नक्षी" सोनाली
" मी संगीत वर्ग घेणार" माधुरी
" मी पी टी चा तास. क्रिकेट घेणार" योग्या
" जे काही शिकवाल त्याची नीट तयारी करून शिकवा. क्रिकेट सुद्धा शिकवताना त्याचे नियमपण शिकवा म्हणजे विद्यार्थ्यांना ही नवे काहितरी शिकल्याचा आनंद मिळेल त्यांच्या माहितीत भर पडेल. आणि हो आपण कोणाला काही शिकवायला लागलो ना की तो विषय आपल्यालाही नीट समजतोतुम्हाला जे अवघड वाततेय ते शिकवायचा प्रयत्न करा" बाई काय म्हणताहेत या पेक्षाही आम्ही त्या दिवशी कसे शिकवणार याचे चित्र डोळ्यासमोर नाचत होते.
कोणाला येत नसेल त्याने भौतीक शास्त्रातील न्यूटन चा नियम शिकवा म्हणजे तुम्हाला तो नीट समजेल काय सुषम " सुषम चा आणि भौतीक शास्त्राचा कायमचा युद्धाचा पावित्रा असतोहे आम्हीच काय पण बाइंनाही पण माहीत आहे हे आम्हाला आजच कळले.
"आणि तू काय शिकवणार आहेस"
" मी सातवीच्या वर्गाला समांतर रेषां शिकवणार आहे" एल्प्याच्या या उत्तरावर आम्हीच काय पण तारकुंडे बाईपण अचानक दप्तरात बेडूक दिसल्यासारख्या चमकल्या.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

22 Jan 2020 - 12:24 pm | सुधीर कांदळकर

हा भाग छान रंगला आहे. माझ्या आठवणी जागवून नॉस्टाल्जिक केलेत. आवडला, धन्यवाद.

वामन देशमुख's picture

22 Jan 2020 - 9:34 pm | वामन देशमुख

खरंच सुंदर लिहिता राव तुम्ही!
ही लेखमाला कधीच संपू नये असं वाटत राहतं!

विजुभाऊ's picture

23 Jan 2020 - 7:57 am | विजुभाऊ

_/\_