भाग ४ अंधारछाया प्रकरण ३ - ‘बेबी, बेबी’, कुठे निघालीस रात्रीची? ती हात वर करून म्हणाली, ‘ते काय, ते बोलावतायत मला. मी जाऊन येते!’

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
14 Jan 2020 - 11:18 am

अंधारछाया

तीन

बेबी

स्वारगेटवर सुभाष, श्रीकांता आले होते पोहोचवायला. सुभाषच्या ऑफिसातले होते कोणी. त्यांच्या सोबतीने बसले मी सातच्या मिरज गाडीत. सुभाषला काळजी फार, ‘बेबी, पुस्तक घेतलीस का? काल आणलेली साडी ब्लाऊझ घेतलास का? दुपारच्या जेवणाचा डबा घेतलास ना? श्रीकांताला गाडी सुटायला निघता निघता केळी आणायला पिटाळलंन! ऑफिसच्या माणसाला सारखं सांगत होता, ‘प्रथमच जातेय एकटी. नीट लक्ष असू दे.’ मला तर हसूच येत होतं त्याच्या काळजीचं. जरा घाबरट आहे आमचा सुभा. एसटी चालता चालता केळी हातात पडली. हात हालवत दोघे दिसेनासे झाले.
गाडी मेन रोडवर आली. दहा-बारा मिनटात कात्रजच्या वाटेवर लागली. ओसाड डोंगर, लांबवर सिंहगड पाहून मला एकाकी वाटलं. वाटलं, आपण एकट्याच कुठे चाललोय? आपल्याला कोणी नेलं पळवून तर? नाही आलं सांगलीला कोणी तर? नाही नाही ते विचार मनात आले.
घाटाची वळण लागली आणि मला मळमळायला लागलं. पुणं आठवलं. भिकारदास मारुतीला जायची वेळ. चिंचेची झाडं, गाभुळलेल्या चिंचा. पुण्याहून दूर जातोय म्हणजे पुन्हा मी परतणाच नाही असं वाटायला लागलं. करता करता सातारा गेलं. डबा खाऊनही डचमळतच होतं. कराड, इस्लामपुर गेलं आणि मला पेंग आली.
सांगलीला गाडी नगरपालिकेपाशी आली. ‘मा sss वशी’ असं कोणी ओरडलं! पाहते तो शशि आणि लता! आले होते घ्यायला. टांगा ठरवलेला होता. लगेच बसलो नि निघालो माधवनगरला. मी, शशी मागे होते. लता व मधू होते पुढे टांगेवाल्याच्या शेजारी. ‘मधू?’ मला आठवेना.
शशी म्हणाला, हा आईचा मामेभाऊ – नाना पर्वत्यांचा मुलगा. सध्या कॉटन मिलमधे नोकरीला आहे. टांगा घरापाशी आला. फाटकातून आत गेलं तो अक्का वाटच पाहात होती आमची!
घर प्रशस्त छान होतं. फाटकातून आत शिरलं की आठ - दहा फुटाच अंगण. त्यातच गोड्यापाण्याचा खड्ड्यातला नळ. कपडे धुवायसाठीचा दगड. घरात जायला चार पायऱ्या चढून जावे लागे. आत गेलं की हॉल होता. अक्कानं हॉल छान सजवला होता! दोन सोफा कम बेड, मधे टी पॉय, एच एम व्हीचा रेडिओ सेट, भिंतीवर सीन-सीनरीच्या तसबिरी. बर्माशेल कंपनीच भलथोरलं कॅलेंडर लटकलेलं. एका कोपऱ्यात टेबल खुर्ची. त्याला डिझाईनचे कव्हर. मोठ्ठ लाकडी कपाट भरून पुस्तकं.
मधल्या खोलीत गेलं की एका कोपऱ्यात शिसवी लाकडाचा पलंग होता. शेजारीच गोदरेज स्टीलचं आरसेवालं कपाट होतं. बाकी जागेत भिंतीतली कपाटं होती. आणखी एक गोदरेजचा अलमारी होती लहान. त्यावर सुरेख फ्लॉवरपॉट होता. दादांचे पान तंबाखूचे सामान, अडकित्ता, पिना, पेन, सुटे पैसे पडले होते. सैंपाकघरात नुकतच किचन टेबल करून घेतलं होतं अक्कानं. लाल पाट होते बसायला. देव्हारा एका भिंतीतल्या दिवळीत होता. आजींची त्या शेजारी बैठक असे. ताक–लोणी काढणं, वाती करणं, निवडणं, टिपणं चालू असे न बोलता त्यांचं.
बाजूलाच कोठीची खोली होती. शिवाय जोडून बाथरूम. त्यातूनच मागे जायला दार. तिथूनच संडासासाठी शहाबादी फरशा टाकून वाट होती केलेली. मागल्या बाजूला विहीर होती समाईक. सकाळी रहाटाचे पाणी काढून ड्रम भरणे हे काम असे. पाणी शेंदायची मला तर बिलकुल माहिती नव्हती. शिवाय विहीर! बाप रे! वाकून पहायला सुद्धा घाबरे मी!
घराच्या एका बाजूला अर्धा प्ल़ॉट मोकळी जागा होती. अक्काने हौशीने त्यात गुलाब, पारिजातक वगैरे लावले होते. शिवाय शंकासूर, हजारमोगरा, झेंड बिंडू तर होताचं. मधल्या खोलीतून बाहेर बागेत जायला दार होते. दुपारचे जेवण झालं आणि दादांच्या पानांवर माझा डोळा होता. ते विडे बनवूनच आणत. मी एक तोंडात टाकला आणि आडवी झाले.
संध्याकाळी दादा आले. रात्री जेवताना आस्थेनं मला विचारलं, ‘कशी काय आलीस? पोहोचवायला कोण आलं होतं? मधू आला होता का? वगैरे. मी खरी तर मेव्हणी त्यांची, पण त्यांचा चेहराच असा दरारा पुर्ण होता! अक्कात व माझ्यात 7-8 वर्षांचे अंतर होतं. तिच्यात अन दादांच्या 10-12 वर्षांचा तर होत असं ऐकले होतं मी. मला ते मेव्हणे कधीच वाटले नाहीत. वडलांसारखे वाटले!
जेवणं झाली. सगळ्यांची अंथरुणं मधल्या खोलीत असायची. आजी कॉटवर, बाकी अक्का, दादा, शशी, लता मोठ्या तीन जणांच्या मच्छरदाणीत झोपायचे एकत्र. माझी सोय शेजारीच वेगळी मच्छरदाणी घालून केली शशीनं. अंथरुणं घालणं काढणं त्याच काम. अंथरुणावर पडले. लगेच झोप लागली.

दादा

मल्लिकार्जून मन्सूरचे शास्त्रीय संगीत संपले. रेडिओ स्विच ऑफ केला. मच्छरदाणी गादी खाली पुन्हा खोचून अंथरुणावर पडलो. थोडासा डोळा लागला असावा. इतक्यात दाराची कडी निघाल्याचा आवाज झाला. म्हणून मी जरा निरखून पाहिलं नाईट लँप मधे. बेबी वाटली उठलेली. काकूही असतील कदाचित असे वाटून मी डोळे मिटले. तेवढ्यात पुन्हा कडी निघाली. दार उघडल्याचा आवाज झाला. बाहेरची गार झुळूकही आत आली. तेंव्हा मी मच्छरदाणी उचलून पाहिलं तर, ती बेबी होती दारात! पटकन उठून मी दारात गेलो.
‘बेबी, अग बाथरूमला जायचय का? तो दरवाजा इकडे आहे’ असं म्हणालो. तर ती म्हणाली, ‘अं, हो हो, दारापासून परतली गेली. आपल्या मच्छरदाणी घुसली, झोपलीही!
मी अंगणातल्या बाजूला जाणाऱ्या दाराची परत कडी घातली. पुन्हा गादीवर झोपलो. ती परवाची गोष्ट. काल रात्रीही बारा-साडेबाराच्या सुमाराला दाराशी खुट्ट वाजलं म्हणून मला आपसूक जाग आली. दार सताड उघडलेलं! बेबी दाराची पायरी ओलांडतीय! खडबडून उठलो. तिच्याजवळ जाऊन खांद्यावर हात ठेऊन विचारलं, ‘अग बाथरूमला बाहेर कशाला जातेस? आतच जा. दिवा लाव.
म्हणाली, ‘हो हो.’ आणि लगबगीनं गादीवर जाऊन पडली. मच्छरदाणी न खोचताच! मीच डास चावतील म्हणून तिची मच्छरदाणी खोचून झोपलो झालं.
काल रात्री मात्र मी बॅटरी घेऊन झोपलो, काकूंना दम्याच्या खोकल्याची उबळ आली म्हणून जाग आली. तो इकडे कडी काढून बेबी दाराच्या पायऱ्या उतरतेय! मी झटकन बॅटरीचा प्रकाश तिच्यावर पाडला. तो ती पायऱ्या उतरून उजवीकडे वळून फाटकाकडे वळली! म्हणताना मी मच्छरदाणी बाजूला सारून उठलो. कोपऱ्यात शशीचा बॅट पडली होती, ती हातात घेऊ अनवाणीच बाहेर पडलो. तोवर ती फाटकापाशी पोहोचलेली! बॅटरीचा झोत तिच्यावर टाकून दरडावतच मी तिला म्हणालो, ‘बेबी कुठे निघालीस?’
ती पुढेच चाललेली! मग मी तिच्या दंडांना धरले आणि गदागदा हालवले, असे म्हणता, ती हात वर करून म्हणाली, ‘ते काय, ते बोलावतायत मला. मी जाऊन येते!’
दंडाला धरून तिला परत फिरवली. रस्त्यावर दूरवर कोणीच नव्हते. बॅटरीचा झोत टाकून पाहिला. रस्ता निर्मनुष्य होता. तिला परत नेलं. तर सरळ आपल्या अंथरुणत जाऊन झोपली. मी पुन्हा बाहेर जाऊन पाहून आलो रस्त्यावर. कुंपणाला लावलेल्या कडू कोयनेलच्या झुडुपांची नीट तपासणी केली. इतक्यात एक दोन जण येताना दिसले. रात्रीच्या कामगारांना चहा देण्यासाठी हातात पेटवलेली शेगडी व किटली घेऊन जाणारे ते चहावाले होते. त्यांना विचारलं, ‘कुठून आलात रे?’
ते म्हणाले, ‘तिकडून हळिंगळ्यांच्याकडून आलो आता सांगल्यांच्या मागाकडे चाललोय.’
‘आत्ता इकडून कुणी जाताना पाहिलेत का तुम्ही?’ मी म्हणालो.
‘नाही बाबा’ ते म्हणाले. मी परत आलो. गादीवर पडलो. मंगलाला उठवावे काय असे वाटले पण नाही उठवले. रात्र विचारात काढली.

बेबी

तरी म्या सांगतच व्हतो सगळ्यास्नी, हिला जाऊ देऊ नका म्हनून. ऐकलं न्हाई. आता हितं आलोय हिच्या बरोबर. पन ही भाईर पडलं तर शप्पत. आज चार दीस झालं ही घराभाईर य़ीना. दोन्दा गेली ती तिच्या भनी बरबर देवळात. वाटेत एक झाड न्हाई बसायाला. मी तरी काय करनार. बाकीचे म्हनायला लागलेत, ‘काड रातीला भाय़र तिला. पहाटच्या प्यासंजरनी नेऊ परत तिला पुन्याला. कटकट नको.’
दोनदा भाईर काडता काडता, त्यो दादा उटलान धरून घिऊन ग्येला. तिसऱ्यांदा म्याच लई जोर केला. अन नेली फाटका पातूर. बाकीच काय जवळच येईनात. म्हनत्यात, ‘तू पकडलस, आता तूच घिऊन चल. मी किती वडनार?
त्येवड्यात आला दादा. ब्याटरी घ्युन म्हनला, ‘ब्येबी, ब्येबी हित कशी?’ परत घ्युन गेला. माझ्यासकट. वाटलं हात सोडावा अन पळाव यांच्या संगट. आमी धा बारा जन आलोया हिच्या संगट पुन्यासनं. पन ती हात लावाया तयार होईनात. म्हनत्यात, ‘हा दादा आला की भ्या वाटतया! खर तर हे घरच वाईट हाय आमास्नी! सगळी मानसं हैत खमकी!. दोन चार पोटू बघितलं सामीबिमीचं. दादाचं लैच भ्या वाटतया आम्च्या लोकास्नी. आता काही नवा उपाय केला पायजे. जरा घाबरावावं काय यास्नी?

दादा

पडलो मी अंथरुणावर. विचार करायला लागलो. ही बेबी चालली कुठे? झोपेत आहे? का जागी? झोपेत आहे म्हणावे तर कडी व्यवस्थित काढून कोपऱ्यात पडलेल्या चपला घालून होई तोवर तिला जाग आली नाही कशी? मग जागी म्हणावं तर आत्ताच ही चालली कुठे? काही कळत नाही. झोपेत चालणारे असतात त्यातला तर प्रकार नव्हे?
‘ते, ते कोण ते, म्हणजे कोणी आदरार्थी व्यक्ती असावेत. मग ते आत्ता रात्रीला का बोलावतील कोण असतील? असे गुरू नाही असे ही शक्य नाही.
करेक्ट, ते म्हणजे ‘बरेच जण!’
पण असे कोण बसलेत बोलवायला? नेणार कुठे तिला? क्षणिक विचार केला की मी कोणास नेणार आहे म्हणून तर मी कुठे जाणार पायी लांबवर म्हणजे कुठे विठोबाच्या देवळात? का तिकडे साखर कारखान्याकडे? नाही काहीच पर्पझ नाही त्यात मग ...
आता रात्री दोनला एसटी, टांगे इतर वाहनंही जात नाहीत सांगली, बुधगावला. मग काय असेल एखादी मालगाडी, एक पॅसेंजर जाते पुण्याकडे. असो.
तिला काही भ्रम झाला असावा स्वप्नात. खरच स्वप्न म्हणजे काय स्वामी म्हणायचे प्रवचनात, ‘स्वप्नावस्था, ही एक अवस्था आहे. जागृती आणि सुषुप्ती मधली. जेंव्हा निद्रेत आत्मा शरीर कोषाच्या बाहेर हिंडत असतो, तेंव्हा त्याची शक्ती अशक्यातीत असते. तो जेंव्हा वासनामय वस्तूंवर बसतो आणि त्याची ओढ शऱीराला लागते. त्या आत्म्याच्या अवस्थेला स्वप्नावस्था असे म्हणतात. अशी अवस्था तर नसेल हिची?
ते जरा अवघडच आहे! आम्ही इथे रोज बसतोय ध्यानाला, तरीही इतकी प्रगती नाही, काही लागीर तर नाही?
मंगलाला उद्याच सांगावे.

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

15 Jan 2020 - 1:26 pm | राजाभाउ

मस्त चालु आहे. पु.भा.प्र.

उत्कंठावर्धक आहे कथानक ,आणि तुमची शैली पण रसाळ.
लवकर पुढील भाग टाकावेत ही विनंती.

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Jan 2020 - 5:35 pm | अनिरुद्ध.वैद्य

ग्रीप घेतली कथेने एकदम!!