मराठी दिवस २०२०

पंखा

Primary tabs

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
3 Jan 2020 - 11:34 pm

।। पंखा ।।

एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती!

अचानक न जाणे कुठून एक बुलबुल पक्षी खिडकीतून पंख्याकडे झेपावला. मी सगळ्या हॉलिवूड सिनेमात बघितलेल्या साहसदृश्यांना गुरुस्थानी मानून विजेच्या नाही पण तश्याच काहीतरी चपळाईने पंखा बंद करायला झेपावलो. पक्षी पंख्याच्या वर असलेल्या कॅपमधल्या घरट्यात सामावला होता. ती मादी होती, अंडी उबवायला आली होती. तिला काय ठावे की तिच्याखालच्या पंख्याखाली शिक्षणाचे पंख लावून घ्यायला काही पाखरे बसली आहेत ज्यांना उकडत आहे. मुद्दाम मुलांना विचारले ," हिसकावू का तिला? म्गग पंखा लावता येईल आणि तुम्हाला वारा मिळेल." सगळी एकाच आवाजात चिरकली "no....".

आता मुलं उन्हाळा, घाम विसरली. एरवी वीज नसल्याने होणाऱ्या त्रासिक चेहऱ्याची जागा वेगळ्याच समाधानाने घेतली होती( ते sacrifice,त्याग असं काहीतरी) त्यांचे अर्धे डोळे फळ्याकडे व अर्धे पंख्याकडे होते. जणू भ्रूमध्याकडे बघत ध्यान लावलेले तपस्वीच. वर पक्षिणीची तपस्या चालू होतीच. घरटं आणि ती जणू एकजीव होऊन निर्जीव झाले होते आणि नवीन जीवाला जन्म देण्याच्या प्रक्रियेत हातभार लावत होते.

अवघड जागी किती सोप्पं घर. अख्या जगाशी दोन पंख आणि एका चोचीने गरज पडल्यास पंगा घेण्याचा आविर्भाव तरीही चेहऱ्यावर कमालीची शांतता.एजंट, कर्ज, तारण, हफ्ते, काटकसर, आयकर, अंतर्गत सजावट आणि काय काय , ह्या सगळ्या पलीकडले गरजेपुरते घरकुल. कहर म्हणजे गरज संपली की निर्विकारपणे घरटं सोडून जायचं. पुढल्या वेळेस नवीन रचायचं. म्हातारपणी कोणी काळजी घेईल? काठी नाही पण पंख होईल; भविष्याची तरतूद वगैरे असं काहीतरी असतं की, होय ना?कुठून येते एवढी उमेद? कसलाच भपका नाही की उदात्तता नाही. काही घडवल्याचे नाट्य नाही की कर्तव्य पूर्ण केल्याची जपमाळ नाही. फक्त कर्म बस्स.

यथावकाश त्या अंड्यांतून पिल्लं बाहेर येतील. चारआठ दिवस वर्गात भुर्र भुर्र उडतील, जेव्हा आमची मुलं सुट्टीकरता भूर गेलेली असतील. शिक्षक नसतील,ना खडू, शिक्षा नाही ना प्रार्थना पण तरीही ती पिल्लं शिकून आपल्या ताकदीवर पंखांनी जोरदार भरारी मारतील आणि शाळा सोडतील. नंतर आमची शाळा सुरू होईल जुनमधे; मग मुलं येतील जी पक्ष्यांच्या जन्मवेळी 15 वर्षांची होती तरीही पंख शोधत अजून खुरडत खुरडत चालतील अजून काही वर्षे.

आजकाल एखादा बुलबुल आमच्या डोक्यावरून उडून hi bye करून जातो व सुरेल गोSSड शीळ मारुन जातो. सांगत असावा " ऐकलंत का? पंखा बंद ठेवल्याबद्दल धन्यवाद आणि लवकर पंख फुटायला शुभेच्छा।"

-अभिजीत श्रीहरी जोगळेकर

मुक्तकसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

जानु's picture

4 Jan 2020 - 10:40 am | जानु

मनस्वी.

नूतन's picture

4 Jan 2020 - 11:00 am | नूतन

नेमकं आणि सुंदर लेखन.आवडलं.

श्वेता२४'s picture

4 Jan 2020 - 2:32 pm | श्वेता२४

खुपच छान

प्रमोद देर्देकर's picture

4 Jan 2020 - 2:41 pm | प्रमोद देर्देकर

मस्त आवडलं . अजून येवू दे.

स्वलिखित's picture

4 Jan 2020 - 3:14 pm | स्वलिखित

आवडले

अनंत छंदी's picture

4 Jan 2020 - 7:17 pm | अनंत छंदी

बरेच दिवसांनी चांगले लिखाण वाचायला मिळाले.

Cuty's picture

5 Jan 2020 - 11:28 am | Cuty

शाळेतले दिवस पुन्हा आठवले. आठवणी ताज्या झाल्या.

सुधीर कांदळकर's picture

8 Jan 2020 - 6:57 am | सुधीर कांदळकर

संवेदनशील बालमन साध्या प्रसंगातून छान टिपले आहे.

मायमराठी's picture

11 Jan 2020 - 7:52 pm | मायमराठी

सर्व अभिप्रायांबद्दल मनःपूर्वक आभार. ही गेल्या वर्षी एप्रिलमधली गोष्ट.