कोरोना विरूध्द भारताचा लढा

Kingआख्यान 2: फायरस्टार्टर

Primary tabs

शा वि कु's picture
शा वि कु in जनातलं, मनातलं
30 Dec 2019 - 9:56 pm

Kingआख्यान 1:- डोलोरस क्लेबोर्न
टेलिकायनेसीस, टेलीपथी किंगच्या आवडत्या कथा आहेत. किंगची पहिली प्रकाशित कादंबरी "कॅरी" (Carrie- 1974) पण एका टेलिकायनेटिक शक्ती असणाऱ्या तरुण मुलीची गोष्ट होती. अपरिमित जीवितहानी करण्याइतपत शक्ती असलेली, पण बुजरी आणि एकलकोंडी असणारी एक teenage मुलगी, धर्मांध आणि वेडसर असलेली तिची आई, आणि याउप्पर कडी करायला तिला त्रास द्यायला टपलेल्या मुलामुलींचं टोळकं. या सगळ्यांच्या मिलापातून किंग विनाशाचं एक थरारक आणि तितकंच ह्रदयद्रावक तांडव रचतो. या कथेवर दोनवेळा सिनेमा बनवला आहे, पण दोनीही पार गंडले आहेत.
अशा विशिष्ठ शक्ती असणाऱ्या मुलामुलींची गोष्ट किंगने बऱ्याचदा सांगितली आहे. "द शायनिंग" मधला डॅनी आपल्याला माहीतच आहे. डॅनीच्या शक्तीलाच "शाईन" म्हणत असतात. किंगच्या magnum opus "द डार्क टॉवर" मालिकेमध्ये तर हे जागोजागी येतात.
तशीच ही गोष्ट फायरस्टार्टर. हि एका पायरोकायनेटिक (pyrokynetic) शक्ती असलेली 9 वर्षांची चार्ली मॅकगी आणि तिचे वडील अँडी मॅकगी यांची आहे.
पुस्तकाची सुरुवातच अतिशय थकलेल्या आणि भेदरलेल्या अँडी आणि चार्ली पासून होते. अँडी अगदी जीवाची बाजी लावून चार्लीला सरकारच्या हातांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मग हळूहळू "लॉट 6" नावाच्या भयावह वैज्ञानिक चाचण्यांची रक्तरंजित गोष्ट आपल्या समोर येते.
फ्लॅशबॅक मधून आपण बॅचलरेट डिग्री साठी शिकणारा युनिव्हर्सिटीतला अँडी भेटतो. अँडी म्हणजे आपला टिपिकल होतकरू तरुण आहे. अँडी अभ्यासात हुशार आहे. पार्ट टाइम नोकऱ्या करत कॉलेजचा खर्च भागवत आहे. मानसशास्त्र विभागात काम करणाऱ्या एका मित्राच्या सल्ल्याने अँडी "लॉट 6" नावाच्या प्रयोगात भाग घेण्याच ठरवतो. अँडीला सांगण्यात आलं असत कि हा प्रयोग फक्त एका नवीन प्रकारच्या LSD ला टेस्ट करण्यासाठी आहे. कॉलेजचे एक प्रोफेसरच प्रयोग घेणारेत हे कळल्याने त्याला यात काहीही विचित्र असेल अशी शंका येत नाही. तिथेच त्याला कळते की CIA शी संलग्न असणाऱ्या "द शॉप" नावाच्या सरकारी यंत्रणेतील काही व्यक्ती सुद्धा या चाचणीच्या आयोजनात सहभागी असतात.
या प्रयोगादरम्यानच त्याची व्हिकी सोबत ओळख होते. तीसुद्धा त्याच्यासारखीच प्रयोगात भाग घेणार असते. लांबसडक पाय आणि सोनेरी केसांच्या व्हिकीवर अँडी तिला बघताक्षणीच भुलतो. आणि त्या प्रयोगांदरम्यान अश्या काही गोष्टी घडतात की त्या दोघांमध्ये एक वेगळाच बंध तयार होतो. हि या प्रयोगाची एकुलती एक सिल्व्हर लायनिंग असते. ते सोडून प्रयोगाच्या घटनाक्रमाचे किंगने केलेले वर्णन निव्वळ भयंकर. अँडी आणि व्हिकी दोघेही गुंगीत असतात तिथे त्यांना इतर subjects वर काय परिणाम होताहेत हे दिसत तर असतं, पण गुंगीमुळे हे खरच घडतंय का स्वप्न आहे हे कळत नसतं. एक व्यक्ती ह्रदय बंद पडून मृत झाली आहे, तर एक व्यक्ती स्वतःचाच डोळा उपसून काढत आहे असं त्यांना दिसतं, आणि ह्यात शॉपचे लोकं पळापळ करत असतात.
नन्तर शॉप चा हसतमुख वैज्ञानिक हे सगळे त्यांचे भ्रम असल्याचे सांगतो. पण दोन व्यक्तींना एकच भ्रम कसे होतील हा अँडीचा प्रश्न अनुत्तरित राहतो.
अँडी आणि व्हिकीला प्रयोगानंतर वेगळ्याच अनुभूती येत असतात. जवळच्या व्यक्तीच्या भावना त्यांना समजू लागल्या असतात. अँडी आणि व्हिकी तर एकही शब्द न बोलता एकमेकांशी संवाद करू शकत असतात.
गोष्टीच्या सुरुवातीलाच आपल्याला कळते की व्हिकी आता जिवंत नाही. अँडीची दुःख, उद्वेग, असहायतेची भावना, चार्लीच्या भवितव्याची काळजी आणि व्हिकीच्या मृत्यूचा अनावर होऊ पाहणारा संताप आपल्याला पण पोळून जातो.
किंगचे कथाकथन फ्लॅशबॅक्स मधून भूतकाळात पण जात राहते. अर्थात तो भाग फार नाही. पुस्तक प्रामुख्याने शॉप आणि अँडी मधला उंदीर मांजराचा खेळ आहे, जिथे मांजराकडे यूएस गव्हर्नमेंट ची सगळी संसाधनं आहेत.
तर लॉट 6 रसायनांमुळे अँडी आणि व्हिकी ला काही विशेष क्षमता प्राप्त झाल्या असतात.या क्षमता शॉपपासून लपवत त्यांनी आपलं सहजीवन सुरु केलं असतं. अर्थात त्यांना शॉप आपल्यावर नजर ठेवून आहे याची जाणीव असतेच. पण घटना ज्या थराला जातात, त्याची त्यांनी कल्पनाही केली नसते.
व्हिकीला हलकीशी टेलिकायनेसीस शक्ती प्राप्त झाली असती. पण ती दुर्लक्ष करण्याइतपत क्षीण असते. अँडी ला माईंड कंट्रोल ची क्षमता मिळाली असती. अँडी समोरच्या व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे वागवू शकत असतो.अँडी असं करण्याला "द पुश" म्हणत असतो. अर्थात एक मोठी मर्यादा असते. अँडीचे डोके प्रत्येक पुश नन्तर भयंकर दुखत असते. त्याला जाणीव असते की प्रत्येक पुशमधून त्याच्यावर काहीतरी न्यूरॉलॉजिकल दुष्परिणाम होत आहे. पुशच्या वापरानन्तर काही वेळेस अँडीच्या चेहऱ्याचा काही भाग सुन्न होत असतो. त्यामुळे आपण पूर्ण पुस्तक भीतीच्या छायेत काढतो कि अँडीला कधीना कधी चार्लीच्या रक्षणार्थ आपली मर्यादा ओलांडावी लागणार आहे.
अँडीचे व्यक्तिमत्व किंग सुंदरतेने रंगवतो. अँडी घाबरला आहे. शॉप ने त्याचे बँक अकाउंट गोठवल आहे, हायस्कुल मधली शिक्षकाची नोकरी तर सोडायला लागलीच आहे. अशा वेळी पळतीवर असलेला अँडी चार्लीला टेलिफोन बूथ मधली नाणी काढायला सांगण्याइतका हवालदिल झाला आहे. व्हिकीचा मृत्यू , "They pulled her nails out", हे वाक्य डोक्यात घुमून तो दुखातिरेकाने तळमळतो. चार्लीला शॉपच्या हाताबाहेर ठेवणे, तिचा गिनीपिग न होऊ देणे, इतकाच त्याचा उद्देश आहे. त्याची पुशची शक्ती किती उपयोगी आहे हे तो जाणून आहे. पण काही घटनांवरून त्याला समजलं असत कि ज्या व्यक्तीवर पुश वापरलं जाईल, त्याच्या मनारोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अँडी असं होण्याला दरड कोसळण्याची (avalanche) ची उपमा देतो.
अँडीच्या विरुद्ध उभं ठाकल आहे- द शॉप.शॉप काही निवडक व्यक्तिरेखांमधून जिवंत होतं- राष्ट्रहितापुढं काहीही न पाहणारा शॉपचा डायरेक्टर कॅप हॉलिस्टर, चार्लीच्या आगीची चुणूक पाहून जन्मभराची आगीबद्दलची भीती बसलेला शॉपचा एजन्ट ओरव्हील जेम्सन. शॉप सुद्धा अँडी इतकंच अगतिक आहे. चार्लीच्या शक्तींचा अंदाज कुणालाच नसल्यामुळे शॉप तिला मिळवण्यासाठी जीवापाड धडपड करत आहे. जेव्हा लॉट 6 चा प्रमुख शास्त्रज्ञ जेव्हा म्हणतो "की वयापरत्वे चार्लीची शक्ती वाढेलच. उद्या पृथ्वीची दोन भकलं करायची किंवा मनाने अणुविस्फोट घडवण्याची शक्ती तिला आहे असं कळालं, तर काय ?" ह्या शक्यतेवर कॅप हॉलिस्टर हसतो, पण काही क्षणच ! अँडी जगला तर ठीकच, पण मेला तरी चालेल, चार्ली मात्र सापडायला हवीच असा शॉपचा पवित्रा असतो.
शॉपच्या समोर आणखी एक धोका असतो. अगदी टोकाला गेल्यावर अँडी चार्लीचा हत्यार म्हणून वापर करेल हे त्यांना पूर्वानुभवाने समजले आहे. त्यामुळे भडका न उडू देता त्यांना पकडणं हे शॉपसमोरचं आव्हान आहे.
पण कथेतलं प्रमुख खलनायक पात्र आहे जॉन रेनबर्ड. 6'5 असणारा हा रेड इंडियन शॉपने चार्लीला पकडण्यासाठी नेमलेला मारेकरी आहे. त्याला चार्लीबद्दल एक विचित्र आकर्षण, आणि एका प्रकारचं वेडसर प्रेम वाटत असतं. ते मुळातच वाचायला हवं.
सरतशेवटी, खुद्द चार्ली, द फायरस्टार्टर. मी चार्लीच्या व्यक्तिरेखेशी अगदी झटकन प्रेमात पडलो. चार्लीसुद्धा आईच्या मृत्यूला पचवायचा प्रयत्न करत आहे. पुशमुळे सुन्न पडलेल्या अँडीबद्दल तिला सतत काळजी वाटते. तिला सुद्धा पुशमुळे अँडीत होणारे बदल जाणवत आहेत. याउप्पर लहानपणापासून आई वडिलांनी आग न वापरण्याची कडक शिकवण आणि आता स्वसंरक्षणार्थ काही लोकांना जाळावे लागेल याबाबत तिच्या मनात द्वंद्व चाललंय. तिला सुद्धा तिची शक्ती किती विघातक आहे याची चांगली जाणीव असते.
तर या पायावर किंग गोष्ट पुढे नेतो. किंगची शैली खूप ओघवती आहे, भाषा सोपी आहे पण बाळबोध नाही. काही पुस्तकांत किंग पुस्तकाची सुरुवात आणि मध्य जबरी रंगवतो आणि शेवटी काहीतरी अतिरंजित दाखवतो. इथं किंगने एकसंधता छान राखलीये.
तर, पुस्तक आवडलं. किंगची सुरुवात इथपासून करायला हरकत नाही, कोणी इच्छुक असेल तर. आता जमलं तर किंगची छोटी गोष्ट अनुवादित करून टाकतो.
Happy Reading :))

कथामौजमजाआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Dec 2019 - 10:07 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

इंग्रजी कादंबऱ्या बऱ्याच वाचायच्या बाकी आहेत. लेखक आणि त्यांच्या वाचनीय कादंबऱ्यांची नावे अशी फार मोठी यादी जालावर असते पण तीसुद्धा मोठीच आहे. तरी आता एखादे किंग'चे पुस्तक वाचून बघणार.
पुस्तकाची ओळख छोटीशी छान करून दिलीत.

कुमार१'s picture

31 Dec 2019 - 9:54 am | कुमार१

मस्त ओळख. ..

नक्की करा. शुभेच्छा. तुमच्या लेखावरुनच मूळ कथा किती उत्कंठावर्धक असेल याची कल्पना येतेय.

शा वि कु's picture

3 Jan 2020 - 10:05 pm | शा वि कु

मुवि काका, कंजूस, कुमार, श्वेता- प्रतिसादासाठी धन्यवाद !

आता जमलं तर किंगची छोटी गोष्ट अनुवादित करून टाकतो. - नक्की लिहा... वाचायला आवडेल