लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
30 Dec 2019 - 3:16 pm

साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात. त्यांच्या वकुबानुसार ते यथायोग्य मानधन मिळवत राहतात. याउलट हौशी लेखकांचे असते. त्यांचा चरितार्थाचा अन्य उद्योग असतो आणि केवळ लेखनाच्या हौसेपोटी ते लिहीत असतात. त्यांना साहित्यविश्वात ‘नाव’ वगैरे मिळालेले नसले तरी त्यांचा ठराविक असा चाहता वाचकवर्ग असतो. असे लेखकही त्यांच्या परीने बुद्धी आणि कष्ट पणाला लावतात. अशा लेखकांना प्रस्थापित व्यावसायिक प्रकाशकांकडून मानधन मिळते का, हा या लेखाचा विषय आहे. त्याच बरोबर एकंदरीत लेखक-प्रकाशक यांच्यातील व्यवहारावर थोडा प्रकाश टाकेन.

या संदर्भात अनेक हौशी लेखकांचे भलेबुरे अनुभव मी जाणून घेतले आहेत. त्यातून प्रकाशकांचा अशा लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. हे अनुभव वाचकांना समजावेत या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ते लिहिताना संबंधितांचा नामनिर्देश मी करणार नाही हे उघड आहे. या अनुभवांतून काही मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन वाचकांना व्हावे इतकाच हेतू आहे. लेखाची व्याप्ती अर्थातच विविध छापील नियतकालिकांतील मराठी लेखनापुरती मर्यादित आहे.
………..
सुरवात करतो एका भूतपूर्व मासिकापासून. दोन दशकांहून अधिक काळ ते चालू होते आणि त्यात चांगल्या अभिरुचीचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याच्या प्रकाशकांचे धोरण खूप चांगले होते. ते प्रस्थापित लेखकांबरोबरच हौशी आणि नवोदितांचे देखील साहित्य स्वीकारत असत. त्यांची संपादकीय शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुणाही लेखकाने त्यांना लेखन पाठविल्यानंतर एक महिन्याचे आत ते त्यासंबंधीचा निर्णय लेखकास लेखी कळवत. जर ते लेखन स्वीकारले गेले असेल तर त्याचे मानधन किती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात असायचा. पण याही पुढे जाऊन ते अधिक काही लिहीत. तो मजकूर असा असायचा, “जर आपणास ही मानधनाची रक्कम अपुरी वाटत असेल, तर तसे स्पष्ट कळवा. त्यावर आम्ही विचार करून आपणास कळवू”. अत्यंत पारदर्शक असा हा दृष्टीकोन लेखकांना नक्कीच सुखावत असे. पुढे तो मासिक अंक प्रकाशित झाल्यावर ते त्यातील सर्व लेखकांना मानधनाचा धनादेश आणि अंकाच्या दोन प्रती कुरिअरने पाठवीत. ही सर्व प्रक्रिया त्या महिन्याची १ तारीख उजाडण्यापूर्वीच पूर्ण होत असे. म्हणजे वाचकाच्या हाती जर तो अंक १ तारखेस पडणार असेल, तर त्यापूर्वीच ते लेखकाला तृप्त करीत ! इतका सहृदय दृष्टीकोन बाळगणारे प्रकाशक विरळा असतात, हे हौशी लेखकांनी अनुभवलेले आहे. अशी सुरेख संपादकीय शिस्त असलेले हे मासिक कालौघात बंद पडले याचा खेद वाटतो.
.......
आता एका दिवाळी अंकाबद्दल लिहितो. याचे प्रकाशन फक्त वार्षिक असे आहे. ही मंडळी अनाहूत लेख स्वीकारतात. लेखकाला लेखस्वीकृतीबद्दल काही कळवत नाहीत. लेखकाने दिवाळीच्या दिवसांत वाट पाहत बसायचे ! काहीही उत्तर आले नाही तर लेख नाकारल्याचे समजून घ्यायचे. जर लेख स्वीकारला गेला असेल, तर तो अंक टपालाने लेखकास मिळतो. त्यासोबत संपादकांचे पत्र असते. त्यात स्पष्ट लिहिलेले असते, की हा अंक ना नफा ना तोटा तत्वावर प्रसिद्ध होतो. त्यामुळे ते लेखकास काहीही मानधन देऊ शकत नाहीत. या अंकात व्यापारी जाहिराती सहसा दिसत नाहीत; साहित्यविश्वाशी संबंधित लोकांच्या आर्थिक पाठबळावर हा अंक निघत असतो. त्यामुळे मानधन न देण्याची प्रामाणिक कबुली ही योग्य वाटते. फक्त हेच धोरण त्यातील प्रस्थापित लेखकांनाही लागू आहे की नाही, हे गुलदस्त्यात राहते.
.......................................................
वरील दोन सभ्य अनुभवांच्या नंतर आता पाहूया एक अशिष्ट अनुभव. हे मासिक एका शिक्षणसंस्थेतर्फे चालवले जाते. ही संस्था नाकासमोर सरळ चालणाऱ्या कडक शिस्तप्रिय मंडळींची आहे. त्या मासिकातील लेखन संस्कारप्रधान असते. एका हौशी लेखकाचा इथला अनुभव पाहू.
अन्य एका प्रथितयश मासिकात या लेखकाचा एक लेख प्रकाशित झालेला होता. तो खूप वाचकप्रिय ठरला. तो या मासिकाच्या संपादकांच्या वाचनात आला. तो आवडल्याने त्यांनी या लेखकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्यांच्या मासिकात लिहिण्याची फोनवरून विनंती केली. मानधनाचे बोलणे काही झाले नाही. लेखकही जरा हरखून गेल्याने भिडस्त राहिला. अर्थात ही त्या लेखकाकडून झालेली मोठी चूक ठरली, हे पुढे लक्षात येईल.

लेखकाने लेख पाठवला. काही दिवसांत त्याला फोनवरून स्वीकृती कळवण्यात आली आणि प्रकाशनाचा अंदाजे महिनाही सांगण्यात आला. यथावकाश अंक प्रकाशित झाला आणि तो लेखकास टपालाने मिळाला. सोबत वेगळे पत्रही होते. या लेखकाने मोठ्या उत्सुकतेने ते उघडले. त्यात त्यांनी मानधनाची अल्प रक्कम नमूद केली होती आणि ती जमा करण्यासाठी लेखकाच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. लेखकाने ती कळवली. रक्कम किरकोळ असल्याने निदान त्याचा धनादेश न पाठवून तो भरण्याची आपली हमाली तरी वाचली, असे लेखकाने समाधान करून घेतले. आता पुढचा किस्सा भारीच आहे. या घटनेला महिना उलटला तरी लेखकाच्या खात्यावर ती रक्कम काही जमा झालेली नव्हती. तरी तो शांत होता. अचानक एके दिवशी त्याला त्या मासिकाकडून पत्र आले. या पत्रात धनादेशासोबत “तुम्हाला *** इतके रुपये मानधन धनादेशाने देण्यात येत आहे“, असे वाक्य लिहिलेले होते आणि त्यातील रकमेचा आकडा (दिसत राहील असा) खोडून त्याच्या डोक्यावर कमी केलेल्या रकमेचा आकडा टाकला होता ! यावर लेखकाने कपाळावर हात मारला. आता त्याला या रकमेत शून्य रस होता. त्याने तो धनादेश सपशेल फाडून टाकला आणि त्या प्रकाशकास एक खरमरीत इ-मेल पाठवली. मानधनाचे बोलणे आगाऊ न केल्याची चूक त्याला महाग पडली होती आणि वर मनस्तापही झाला. आजच्या काळात अत्यल्प रक्कम आपल्याला कोणी धनादेशाने पाठविल्यास तो बँकेत भरून यायची हमाली खरोखर महाग पडते हे उघड आहे. शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या या संस्थेकडून लेखकास मिळालेली ही वागणूक अशिष्ट आणि अजब होती. खाडाखोड करून पत्रलेखनातील किमान सभ्याताही त्यांना पाळता आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
.........................................................
पुढचा किस्सा एका दिवंगत नामवंत साहित्यिकाबाबत घडलेला आहे आणि तो मी एका मासिकात वाचलेला आहे. तो रोचक आणि चालू विषयाशी संबंधित असल्याने लिहितो.
हे लेखक त्यांच्या अजोड साहित्यकृतींमुळे तमाम मराठी वाचकांच्या हृदयात प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळवून बसले आहेत. एकदा एका दिवाळी अंकाचे संपादकांकडून त्यांना लेखासाठी विचारणा झाली. मग त्यांनी तो पाठवला. हे संपादक महोदय देखील नामांकित, साक्षेपी वगैरे. त्यांनी तो लेख ३-४ वेळा वाचला पण त्यांना काही तो अजिबात पटला नाही. लेखात सुधारणा वगैरे सुचवायचे काही त्यांना धाडस झाले नाही. मग त्यांनी तो लेख नाकारून या लेखकांना साभार परत पाठवला. पण गंमत पुढेच आहे. या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! “सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”, असा सुरेख मजकूर या पत्रात लिहिलेला होता. लेखकाचा यथोचित आदर केलेले यासारखे प्रसंग मराठी साहित्यविश्वात घडू शकतात, यावर क्षणभर खरेच विश्वास बसत नाही !
..................................................
आता पाहूया एका लेखकाने प्रकाशकावर कशी कुरघोडी केली ते. हे लेखक बऱ्याच नियतकालिकांत लिहीत. एकदा एका दिवाळी अंकाच्या संपादकांनी या लेखकांना लेख मागितला. तो प्रकाशित केला आणि चांगले मानधनही दिले. तो लेख बऱ्यापैकी गाजला. एक वर्षाने त्या मंडळींनी यांचेकडे पुन्हा लेख मागितला. पण या खेपेस प्रकाशकांनी लेखकास चाचरत विचारले की मानधन जरा कमी घ्याल का? आता यावर लेखक बरे ऐकतील? त्यांनी सरळ सांगितले, “ लेख तुम्ही पुन्हा मागत आहात. तेव्हा मानधन कमी तर होणारच नाही, उलट याखेपेस ते वाढवले जावे !” प्रत्येक लेखकास असा आपल्या लेखनक्षमतेचा अभिमान जरूर असावा.
…………………………………

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत आढळणाऱ्या तऱ्हा आपण वर पाहिल्या. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! किंबहुना आपल्या देशात हिंदी व इंग्लीश वगळता बहुतेक प्रादेशिक भाषांची हीच स्थिती असावी. जिथे मानधन दिले जात नाही तिथे प्रकाशकांनी लेखकाला भेट अंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते. लेखन स्वीकारून अंकही नाही आणि मानधनाचे तर नावही नाही, असे देखील अनुभव काही लेखकांना आलेले आहेत.

या संस्थळावर लिहिणारे माझ्यासारखेच अन्य काही लेखक अन्यत्रही लिहीत असतात. त्यांनाही व्यावसायिक प्रकाशकांकडून असे काही अनुभव आलेले असणार. या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. संबंधित प्रतिसादांचे तसेच निव्वळ वाचकांच्या मतांचेही स्वागत आहे.
********************************************

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

पण हे वरील वाचून बिढार मधला शेवटचा चांगदेव-नारायण संवाद आठवला.

कुमार१'s picture

30 Dec 2019 - 7:00 pm | कुमार१

बिढार वाचलेले नाही. त्या संवादाचा गोषवारा सांगता का ?

शा वि कु's picture

30 Dec 2019 - 7:57 pm | शा वि कु

नारायण कम्युनिस्ट चळवळीतून बाहेर पडून आता mnc मध्ये नोकरी करत असतो. तर चांगदेव नोकरीसाठी मुंबई सोडून लहान गावात चालला असतो. नारायणाने mnc मध्ये मोठ्या पगारासाठी नोकरी घेऊन तत्वांशी प्रतारणा केली आहे असं मित्रमंडळींचं म्हणणं असतं. तर चांगदेव आणि नारायण नारायणाच्या बीचला लागून असलेल्या आलिशान घरात बसून बियर पित गप्पा मारत असतात.
तर विषयाशी सम्बंधित म्हणजे नारायण सांगत असतो की सारंग नावाच्या त्यांच्या एका मित्राला एका प्रथितयश प्रकाशकाने कस फसवलं. या अनुषंगाने तो पुढं मराठी प्रकाशक संस्कृती, देश याबद्दल भरभरून बोलतील पण रॉयल्टीच नाव काढलं तरी टाळाटाळ करतील असं बोलतो. तो त्याचा स्वतःचा अनुभव सांगतो. त्यानं मुंबईच्या भूमिगत चळवळींबद्दल स्वानुभवाने पुस्तक लिहिले असते, जे इंग्लड मधला एक प्रकाशक प्रसिद्ध करतो. तर नारायणला इंग्लड मधल्या प्रकाशकाचे प्रोफेशनल वागणे प्रचण्ड आवडते.प्रकाशनपूर्वी रॉयल्टी, किती प्रति छापणार, आवृत्या, सगळी सुस्पष्ट चर्चा त्या प्रकाशनाने केली असते. यापुढे मराठीत लिखाण करणार नसल्याच सुद्धा नारायण सांगतो.

सुधीर कांदळकर's picture

30 Dec 2019 - 7:58 pm | सुधीर कांदळकर

१. मिपासारख्याच संस्थळावर सुप्रसिद्ध मराठी मासिकात अबक विषयावर लेख पाहिजेत. पसंत पडल्यास योग्य ते मानधन दिले जाईल अशी उद्घोषणा आली. मी लेख पाठवला. प्रसिद्ध झाला आणि रु. २५०/- मानधन मनी ऑर्डरने महिन्याभरात आले देखील. साल होते २००८ किंवा २००९.

२. हा अनुभव साहित्याविषयी नाही. अध्यापन-साहित्याबद्दल आहे. एका व्यवस्थापन शास्त्राचे अध्यापक असलेल्या खास स्नेह्यांना अध्यापनासाठी संपूर्ण अभ्यासक्रमाची एकूण ४०-५० पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन्स बनवून दिली. आणि काही कच्चे प्रबंध बनवून दिले. खरे तर टाईम पास म्हणून दोस्तीखात्यातच बनवून दिले होते. पण त्यांनी चारसहा महिन्यातच आपणहून माझा बँक अकाउंट वगैरे तपशील घेऊन वाजवी मोबदला पाठवला जो ५० हजारांच्या आसपास होता. पण त्यातला मजकूर लिहितांना, आकृत्या काढतांना, चित्रे डकवतांना आणि मुख्य म्हणजे अभ्यासक्रमातल्या माझ्या सत्राशे पन्नास शंकांचे निरसन त्यांच्याकडून करून घेतांना केलेल्या चर्चांतून सर्जनशीलतेचा अपूर्व अवर्णनीय असा आनंद मिळाला. त्याची किंमत करता येणार नाही.

३. इथे सरळ लबाड प्रकाशनाचे नावच देतो. विचक्षण प्रकाशन. त्यांच्या कार्यालयातून श्री परदेशी यांचा फोन आला. ई - पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यासठी साहित्य पाहिजे. त्यांची वेबसाईट पाहिली. अनेक पुस्तके अजूनही दिसतात. त्यांना मिपावरचे ओरिसातले प्रवासवर्णन पसंत आले. पाठवले. मग दोन हजार रु. नोंदणी शुल्क द्यावे लागेल म्हणाले. नंतर पुस्तक विक्री मधून तुमचे पैसे वसूल होतील. फारतर अक्कलखाती जमा होतील अशा अपेक्षेने मी त्यांच्या अमरावतीच्या बँक खात्यावर आरञीजीएसने पैसे पाठवले. त्यांनी चित्रे डिझाईन वगैरे मला पाठवली. मी निवडही पाठवली. मुद्रितशोधनासाठी मला त्यांनी प्रत पाठवली. टायपिंगमध्ये अगणित चुका होत्या. दुरुस्ती पाठवली. त्यांनी नवे प्रूफ पाठवले. पुन्हा वेगळ्या अगणित चुका. पुन्हा दुरुस्ती पाठवली. असे चार वेळा झाले. मग मी नाद सोडला. चोर लोक आहेत. त्यांना माझ्याकडून फक्त २,००० रु. उकळायचे होते. नंतर मी ई मेलने स्मरणे पाठवली अर्थातच प्रतिसाद आला नाही. आता त्यांनी हे वाचून माझ्यावर मानहानीचा खटला घातला तर मज्जा येईल कारण मी सारे पुरावे ठेवलेले आहेत.

असो. छान लेख. पहिले दोन्ही अनुभव फार चांगले आहेत. ते लिहावेसे वाटलेच. तिसरा मजेशीर.

कुमार१'s picture

30 Dec 2019 - 8:50 pm | कुमार१

शा वि कु, धन्यवाद. रोचक.

सुधीर,
रोचक किस्से. पहिल्या २ बद्दल तुमचे अभिनंदन आणि तिसऱ्यासाठी सहानुभूती !

त्यांच्या प्रथम दिवाळी अंकाच्या छापील प्रतीचे प्रकाशनात घोड चूक झाली व चक्क मूळ लेखकाचे नावा ऐवजी भलत्याचे नाव जोडले गेले. पुढील कळस तर असा आहे की आम्ही प्रकाशक म्हणजे देव, आमचे(हौशी) कष्ट म्हणजे म्हणजे लेखकांवर उपकार त्यामुळे आम्ही कष्ट करताना चुक्लो असल्याने आमचो कोरी दिलगिरी मान्य करा,बाकी काही याघाडीस होणार नाही काय कारायाचे ते करा हवं ते समजा अशी मानसिकता वरून प्रदर्शित केली.

मित्रहो's picture

31 Dec 2019 - 8:05 am | मित्रहो

एकाने तुमचा हा लेख आवडला आम्ही घेऊ का अशी परवानगी घेतली. मानधनाविषयी काही बोलणे झाले नव्हते. त्यांनी अंक पाठविला आणि त्यात मानधन सुद्धा त्याच लिफाफ्यात पाठविले. फार गंमत वाटली. ही फार जुनी गोष्ट आहे.
तुमचा अमुक अमुक लेख आवडला आम्ही दिवाळी अंकासाठी घेऊ का, योग्य ते मानधन दिले जाईल. अंक छापला गेला पण अकं नाही की मानधन नाही. विचारणा केली असता ते चुकुन राहिले, दोन्ही आताच पाठविले असे सांगण्यात आले. आठवडाभराने अंक आले पण मानधनाचा चेक नाही. मानधनाची चौकशी केली असता सांगितले की इतरत्र आधीच प्रकाशित असल्याने मानधन मिळणार नाही. प्रश्न मानधनाचा नव्हता तो होता तो पारदर्शकतेचा. हेच आधी सांगायला हवे होते.
लेखक झोलावाला असतो , तो आमच्याकडे खेटे घालणार, मग आम्ही छापणार, मग आम्ही वाटेल तेवढे पैसे देणार. या साऱ्या व्यवहाराला आम्ही मराठी साहित्याची सेवा करतोय, किंवा तुम्हाला व्यासपीठ मिळवून देतोय असा पवित्रा घेणार. मुळात प्रवृत्ती पैसे देण्याची नसते. हौशी लेखकांसाठी प्रश्न पैशाचा नसतो पण व्यवहारात पारदर्शकता नसेल तर याचा अधिक मनस्ताप हौशी लेखकाला होतो. तो हौशेखातर लिहित असतो. मानधन नाही असे सांगितले तरी तो हौशेसाठी लिहिणार पण मानधन देतो सांगायचे आणि द्यायचे नाही हे चुकीचे आहे. अशातही सारे व्यवहार सचोटीने करणारे सुद्धा काही प्रकाशक असतात.
माझ्या मते तरी हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून छापील माध्यमापेक्षा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहचता येते.

कुमार१'s picture

31 Dec 2019 - 8:30 am | कुमार१

जॉन व मित्रहो, +१

माझ्या मते तरी हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून छापील माध्यमापेक्षा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहचता येते.

>>>>>> सहमत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Dec 2019 - 9:04 am | ज्ञानोबाचे पैजार

जर मी प्रतिथयश लेखक असतो तर मलासुध्दा या दिव्यातून जावे लागले असते.
पैजारबुवा,

अनिंद्य's picture

31 Dec 2019 - 10:38 am | अनिंद्य

लेखनाचे मानधन ? ते काय असते ? :-)

सुबोध खरे's picture

31 Dec 2019 - 10:43 am | सुबोध खरे

माझे पण दोन चार लेख कोणत्या कोणत्या मासिकात छापून आले आहेत. परंतु त्याच्या मानधना विषयी मी काही बोलणं केला नाही आणि त्यांनीही दिलं नाही. मुळात हे लेख नौदलाबद्ल होते ज्यातून तरुणांना स्फूर्ती मिळून ते लष्कराकडे एक चांगली करियरची संधी म्हणून बघतील असा माझा दृष्टिकोन होता म्हणून मी ते फारसे मनावर घेतले नाही किंवा काही अपेक्षा केली नाही.
परंतु लेखकाला "वाजवी" मानधन मिळालेच पाहिजे याच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.

अशी स्थिती केवळ लेखकाचीच आहे असे नाही तर सर्वच व्यवसायात दिसून येते. कापड उद्योगात होतकरू चित्रकारांकडून डिझाईन मागवली जातात बघून सांगतो म्हणून ती ठेवायला सांगतात आणि एका रात्रीत त्याची रंगीत झेरॉक्स काढूनघेतली जाते. दुसऱ्या दिवशी चित्रकाराला डिझाईन आवडली नाहीत हे केली जातात आणि काही दिवसांनी तीच डिझाईन बाजारात सर्व तर्हेच्या कपड्यावर दिसायला लागतात.

एक अत्यंत प्रथितयश हृदय शल्यक्रिया चिकित्सकाला तो नवोदित असताना एका प्रथितयश हृदयविकार तज्ज्ञाने केवळ १५००० रुपयात हृदयाची बायपास शल्यक्रिया करण्यास भाग पाडले होते. याची चीड येऊन त्याने एक देशातील मोठे हृदय रोग रुग्णालय उभे केले

मोठा मासा छोट्या माशाला गिळतो हे सर्वच क्षेत्रात दिसते म्हणून प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला केवळ लेखनावर पोट भरणे आपल्या देशात शक्य होत नाही.

कुमार१'s picture

31 Dec 2019 - 11:27 am | कुमार१

लेखनाचे मानधन ? ते काय असते ?

>>
काय राव, लेखकांनीच असं विचारल्यावर कसं व्हायचं !

प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला केवळ लेखनावर पोट भरणे आपल्या देशात शक्य होत नाही.

>>> अगदी. प्रादेशिक भाषेतील लेखनावर तर खूप कठीण .

गुणिले १ लाख...

मित्रहो's picture

1 Jan 2020 - 12:53 am | मित्रहो

हे आपल्याच देशात नाही सर्वत्र आहे. प्रादेशिक भाषांत फक्त लेखन करुन शक्य नाही

कुमार१'s picture

1 Jan 2020 - 9:08 am | कुमार१

इथे मला पुलं ची प्रकर्षाने आठवण होतेय. आयुष्याचा थोडा काळ नोकरी आणि पुढे ती सोडून दीर्घ काळ लेखनावर (आणि अन्य कला) चरितार्थ.

असे दुसरे उदा मराठीत आहे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

जाणकार नव्हे पण माहिती असल्याने ....
'रमेश मंत्री'. केवळ लेखनावर उपजिवीका करणाऱ्या इन्यागिन्या मराठी लेखकांमध्ये हे नाव होते. रमेश मंत्री बहुतेक युसीसमध्ये नोकरीला होते (जयवंत दळवींप्रमाणे). पण नंतर नोकरी सोडून केवळ लेखन करत होते. १९७९ या एकाच वर्षात ३४ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९९१ सालच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे.

कुमार१'s picture

2 Jan 2020 - 8:33 am | कुमार१

नि पा,

मंत्री यांच्या माहितीसाठी धन्यवाद. त्यांच्या एका पुस्तकातले एक विधान माझे आवडते आहे. ते असे :

"या दशकातील जागतिक परिस्थिती गंभीर होती", यासारखे दुसरे विनोदी विधान नाही !

(परिस्थिती कायमच गंभीर असते, कुठल्या दशकात नव्हती? ).

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jan 2020 - 2:04 pm | प्रकाश घाटपांडे

निरंजन घाटे हे लेखनावर उपजीविका असणारे लेखक आहेत

कुमार१'s picture

5 Nov 2021 - 10:37 am | कुमार१

यांना आदरांजली वाहणारा एक लेख इथे आहे.

त्यातले निवडक :


आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून नाईक यांना ओळखलं जातं. मात्र नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळलं.

अनेक ठिकाणी लेखकाला भीड पडल्याने त्याने मानधनाचा विषय आपणहून न काढणे, किंवा त्याबद्दल काहीच स्पष्टता नसतानाही गप्प राहणे असं केलेलं दिसतं. सर्वसाधारणपणे लेखक क्रिएटिव्ह असला तरी या क्षेत्रात धंदेवाईक नसतो. कलाकार, निर्मितीक्षम, सृजनशील अशा शब्दांतून एकदम रुपये, पैसे, देणे घेणे, घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं. विशेषतः आपण त्या क्षेत्रात आधीच प्रसिद्ध नसल्यास.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Dec 2019 - 11:42 am | प्रकाश घाटपांडे

काही लेखकच पुस्तक छापल्याबद्दल प्रकाशकाला मानधन देतात. प्रथितयश प्रकाशकाला जास्त मानधन मिळत असावे :)

अनिंद्य's picture

31 Dec 2019 - 12:16 pm | अनिंद्य

:-) आहेत. माझ्या ओळखीत आहेत.
मग ते पुस्तक 'साभार' प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला स्वहस्ते देऊन फोटो काढून घेणे वगैरे...

कुमार१'s picture

31 Dec 2019 - 6:15 pm | कुमार१

घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं >>>
बरोबर, व्यवहार शिकायला लेखकाला वेळ लागतो.

प्रथितयश प्रकाशकाला जास्त मानधन मिळत असावे :)
>>>
अगदी ! अशा बऱ्याच हौशी लेखकांनी प्रकाशकाला श्रीमंत केले आहे !

आहेत. माझ्या ओळखीत आहेत. फोटो, सत्कार ... >>>
खरंय, अगदी उबग येतो अशा कार्यक्रमाचा.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Jan 2020 - 10:05 am | प्रकाश घाटपांडे
कुमार१'s picture

1 Jan 2020 - 11:23 am | कुमार१

तो लेख वाचला. अगदी सहमत ☺️

स्वोर्डफिश's picture

2 Jan 2020 - 9:41 pm | स्वोर्डफिश

नामक लेख मी प्रतिथयश मासिकाच्या दिवाळीअंकासाठी लिहला होता अत्यन्त वेळेत त्यांनी पोच व योग्य मानधनसुद्धा दिले

कुमार१'s picture

3 Jan 2020 - 1:39 pm | कुमार१

नुकतेच दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन चिपळूण येथे झाले. त्यातील "वाचनसंस्कृती टिकून राहील" या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा इथे :

https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/the-culture-of-reading-w...

कानडाऊ योगेशु's picture

3 Jan 2020 - 6:02 pm | कानडाऊ योगेशु

सुहास शिरवळकर सुध्द्दा पूर्ण वेळ लेखन करत असत. त्यांच्या फलश्रुती ह्या पुस्तकात कादंबरीसाठी विषय हुडकण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागत असत ह्याबाबत उल्लेख आहेत.

कुमार१'s picture

6 Jan 2020 - 11:37 am | कुमार१

लेखनावर उपजीविका केलेले ४ मराठी लेखक प्रतिसादांतून कळले:

पुलं
रमेश मंत्री
निरंजन घाटे
सु शि.

.....
माहितगारांनी अजून भर घालावी !

गोपाळ नीळकंठ दांडेकर. मात्र त्यांनी उपजीविकेसाठी लेखन हे साधन महत्वाचे मानले नाही.

चौकस२१२'s picture

19 Jul 2021 - 1:47 pm | चौकस२१२

वपु?
त्यांनी नगरपालिकेतील नोकरी कधी सोडली ते मात्र माहित नाही ..

कुमार१'s picture

19 Jul 2021 - 2:00 pm | कुमार१

निवृत्तीवेतनास पात्र झाल्यावर सोडली.
(चु भू दे घे )

कुमार१'s picture

12 Jan 2020 - 5:45 pm | कुमार१

या लेखात जो खालील किस्सा दिला आहे त्याबद्दल थोडे अधिक :

“सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”

.... हा किस्सा छापलेले पुस्तक आज मी माळ्यावरून हुडकून काढले. अशोक जैन लिखित 'अशोक-वन' असे त्याचे नाव आहे. किस्सा त्यातील असल्याने आता संबंधितांची नावे लिहितो.

लेखक : ना. सी. फडके
लेख नाकारणारे संपादक : द्वा. भ. कर्णिक.

उपजीविकेसाठी अन्य काही व्यवसाय करायचे की नाही ठाऊक नाही.
मराठी जनतेच्या तीनचार पिढ्यांच्या इंग्रजीच्या ज्ञानाला आकार देणारे द्वारकानाथ राघोबा तर्खडकर हे असेच दुसरे नाव घेता येईल. हे पंचांग देखील काढीत.

शिक्षकी/प्राध्यापकी पेशात जम बसलेले काही तर काही जम न बसलेले अनेक लोक पाठ्यपुस्तक लेखन वा गाइडे काढून चांगली कमाई करतात. तर काही गाईड प्रकाशनात जम बसलेले चलाख प्रकाशक जम न बसलेल्या नवख्या शिक्षकांकडून कवडीकिंमतीत वा फुकटात गाइडे लिहून घेऊन बक्कळ पैसा कमावतात. अनेक वेळा गाईड प्रीस्क्राईब करणार्‍या शिक्षकांना मोबदला दिला जातो.

अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट रायटर म्हणून काही व्यक्तींना एक मानधन रक्कम देऊन एखादे पुस्तक लिहून घेतात. माझ्याकडे दोनतीन इंग्रजी/मराठी प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.

कुमार१'s picture

13 Jan 2020 - 7:48 am | कुमार१

प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.

>>> हे बाकी छान झाले !

अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट रायटर म्हणून काही व्यक्तींना एक मानधन रक्कम देऊन एखादे पुस्तक लिहून घेतात. माझ्याकडे दोनतीन इंग्रजी/मराठी प्रस्ताव आले होते. संपूर्ण आगाऊ मानधनाची अट आणि रक्कम ऐकून पळून गेले ते पुन्हा उगवले नाहीत.

एक उत्सुकता म्हणून विचारतो. त्या अटी मान्य असत्या (आगाऊ मानधन आणि रक्कम) तर घोस्ट रायटिंग या संकल्पनेला तुमची काही हरकत नाही का?

म्हणून सर्वसमावेशक मत समजू नये. एकदा एका उत्साही आजोबांचे एक उपदेशपर लिखाण असलेले पुस्तक पुनर्लिखानासाठी माझ्याकडे आले होते. मजकूर आणि चित्रं अगोदरच त्यात होती. भाषा मात्र मिंग्लिश होती. "लिसन फ्रॉम वन इयर अँड लेट द एअर गो फ्रॉम अनादर इअर" अशी वाक्य होती. त्याचे सर्व पैसे एक रकमी मिळाले आणि घोस्ट रायटिंग म्हणजे काहीतरी गैर करतो आहोत असे वाटण्याचे काही कारणही नव्हते.

परंतु कथा बीज आपलेच, ते फुलवण्याचे कसबही आपलेच परंतु नाव दुसऱ्याचे हा प्रकार उमेदीच्या दिवसांपर्यंतच ठीक वाटत असावा. कायम स्वरूपी नाही.

कुमार१'s picture

13 Jan 2020 - 2:50 pm | कुमार१

प्रतिसाद आवडला. सहमत.
माझा एक किस्सा.

एकदा एक नात्यातील व्यक्ती एका प्रसंगाने खूप दुखावली होती. तिच्या डोक्यातून त्या कटू आठवणी काही जात नव्हत्या. मग मी तिला सुचवले की ते सगळे नामनिर्देश न करता लिहून मोकळी हो. तशा प्रकारच्या लेखनाचे एक सदर तेव्हा पेपरात होते. तिला ते पटले. ती क्षणभर सुखावली. पण तिला लेखनाची अजिबात सवय नव्हती. मग तिने मला विनंती केली.
तिची परिस्थिती पाहून मी होकार दिला. मग तिला कच्चा आराखडा लिहून दिला आणि त्यात मुद्दाम काही बदल तिच्या भाषेत करायचे सुचवले.

पुढे तिचा तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला बरेच जणांनी सांगितले. त्यातून तिला वेगळे समाधान मिळाले. ते पाहून मलाही बरे वाटले.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2020 - 8:00 pm | मुक्त विहारि

ह्यांचा छापखाना होता आणि चष्म्याचे दुकान होते.

कुमार१'s picture

17 Feb 2024 - 7:49 am | कुमार१

क्रीतलेखन (घोस्ट रायटिंग) केलेल्या एका इंग्लिश पुस्तकाने गतवर्षी एक गिनीज बुक विक्रम घडवला आहे :

पुस्तकाचे नाव : Spare
विषय : आत्मचरित्रात्मक
जाहीर लेखक : Prince Harry, Duke of Sussex
क्रीतलेखक : J. R. Moehringer (पुरस्कार प्राप्त पत्रकार)
गिनीज विक्रम : बिगर काल्पनिका गटातील पुस्तकांत प्रकाशनानंतर पहिल्या 24 तासात 14.3 लाख प्रति विकल्या गेल्या.

सुधीर कांदळकर's picture

13 Jan 2020 - 6:31 am | सुधीर कांदळकर

काही विशिष्ट विचारसरणी असलेले काही प्रकाशक ती विचारसरणी जर असेल तर चांगले मानधन देऊन प्रकाशन करतात. पण ती विचारसरणी नसेल तर कितीही चांगले पुस्तक असले तरी स्वीकारत नाहीत. पण 'आमच्या वैचारिक धोरणात हे बसत नाही' असे स्पष्ट सांगतात. कालापव्यय करीत नाहीत.

( अशोक जैन यांच्या अशोक-वन पुस्तकातून साभार !)

१. शंकर पाटील यांनी ‘स्वराज्य’ला कथा दिली त्यावेळी त्याचे मानधन नगण्य होते. पण त्यांनी स्वराज्यचा खप खूप असल्याने कथा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचणे अधिक महत्वाचे मानले.

२. ना. ग. गोरे यांना ‘केसरी’त लिहील्याबद्दल ठराविक मानधन पाठवले होते. त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले की आपली उपजीविका लेखनावरच असल्याने मानधन वाढवून द्यावे.

३. कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ कवितेस ‘सकाळ’ने तब्बल ५००० रु. मानधन दिले होते. पुढे ती कविता सर्व सरकारी कार्यालयांत लावण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढला होता. परंतु त्यासाठी मात्र कुसुमाग्रजांनी अजिबात मानधन घेतले नाही.

४. विजय तेंडूलकर मटासाठी एक साप्ताहिक सदर लिहीत. त्यासाठी ते मजकूर डीटीपी करून त्याची छापील प्रत पाठवीत. यासाठीचा त्यांचा होत असलेला खर्च त्यांना मानधनाव्यतिरिक्त दिला जाई.

सुधीर कांदळकर's picture

14 Jan 2020 - 10:41 am | सुधीर कांदळकर

अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींना आपल्या आयुष्यातले काही प्रसंग, हकीकती प्रसिद्ध करावयाच्या असतात. परंतु लेखन हे बहुतेकांना जमेलच असे नाही. त्या प्रसंगांच्या हकीकतींच्या शब्दांकनाचे काम घोस्ट रायटर म्हणून करायला हरकत नाही. परंतु कविता-कथा-कादंबर्‍या, ललित्/तांत्रिक लेख मात्र इतरांच्या नावाने लिहू नयेत. व्यक्ती वंदनीय पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यास, पुस्तकातून मिळणारे उत्पन्न त्या व्यक्तीलाच मिळणार असल्यास फुकटही करायला हरकत नाही. पण प्रकाशकच उत्पन्नाचा मोठा वाटेकरी असल्यास योग्य तो मोबतला नक्कीच घ्यावा.

घोस्ट रायटिंगबाबत प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद..

कुमार१'s picture

14 Jan 2020 - 11:58 am | कुमार१

घोस्ट रायटिंगला मराठी शब्द सुचवा !

गामा पैलवान's picture

14 Jan 2020 - 5:04 pm | गामा पैलवान

कुमारेक,

क्रीतपुत्र म्हणजे विकंत घेतलेलं अपत्य. त्या धर्तीवर क्रीतलेखन म्हणजे विकंत घेतलेलं लेखन. क्रीतलेखक म्हणजे मोबदला देऊन करवून घेतलेलं लेखन.

हा अर्थ जर मान्य नसेल तर पटलेखक हा ही एक पर्यायी शब्द होऊ शकतो.

आ.न.,
-गा.पै.

वामन देशमुख's picture

14 Jan 2020 - 5:19 pm | वामन देशमुख

>>> घोस्ट रायटिंगला मराठी शब्द सुचवा !

लेखनिक हा शब्द आहे.

शब्दांकन या शब्दाला बहुधा वेगळा अर्थ आहे. शब्दांकन करणारा मूळ व्यक्तीच्या विचारांची फक्त नीट शब्दांत मांडणी करतो. आणि त्याबद्दल शब्दांकन करणाऱ्याला ते श्रेय दिलं जातं.

घोस्ट रायटिंगमध्ये प्रत्यक्ष शब्द लिहिणारी व्यक्ती नेहमीच अज्ञात राहणं अपेक्षित असावं.

कुमार१'s picture

20 Apr 2022 - 4:12 pm | कुमार१

क्रिकेटपटू पतौडी आणि कपिल देव यांच्यासाठी क्रीतलेखन (घोस्ट रायटिंग) केलेल्या सुरेश मेनन यांच्या पुस्तकाचा परिचय:

https://www.asianage.com/amp/books/160422/book-review-of-writers-ghostwr...

शाम भागवत's picture

15 Jan 2020 - 4:26 pm | शाम भागवत

उपरा लेखक

कुमार१'s picture

14 Jan 2020 - 5:42 pm | कुमार१

क्रीतलेखक

>>> ठीक आहे.

लेखनिक

>>> नाही पटत. कारण एखाद्या लेखकाने जर पगारी कारकून लेखनासाठी (म्हणजे सांगितलेले उतरवून घ्यायला ) ठेवला तर तो लेखनिक असेल.

कुमार१'s picture

14 Jan 2020 - 6:03 pm | कुमार१

पटलेखक >>>>
हा नाही पटला. समजा, एखाद्याने स्वतः 'पटकथा' लिहीली, तर तोच पटलेखक ठरेल.

@ गवि,
बरोबर. अलीकडे अनेक वलयांकित व्यक्तींच्या वतीने अनेक लेखक शब्दांकन करीत आहेत आणि त्यांना पुस्तकाच्या मुखपृष्ठावर
ही स्थान मिळते. मागे एका दिवाळी अंकात शब्दांकन या कलेवर लेख आला होता.

गामा पैलवान's picture

15 Jan 2020 - 1:52 pm | गामा पैलवान

कुमारेक,

पटलेखक व पटकथाकार वेगळे धरायचे ना? हल्ली चित्रपटांत पटकथाकार म्हणून श्रेयोल्लेख असतात.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

15 Jan 2020 - 2:05 pm | कुमार१

पटलेखक व पटकथाकार वेगळे धरायचे ना?

>>>>
बरोबर. तरीही पटलेखक हा खरा लेखक होईल असे वाटते.
जालकोश तर चक्क "भूतलेखक " असे भाषांतर देतोय !

कुमार१'s picture

13 Jul 2021 - 12:36 pm | कुमार१

वृत्तमाध्यमे आणि लेखकांचे मानधन या विषयावरील एक वास्तवदर्शी लेख

त्यातील हे वाक्य फारच मार्मिक :

अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ‘तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात.

टर्मीनेटर's picture

13 Jul 2021 - 1:53 pm | टर्मीनेटर

अजून एक मराठीतले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक माहित आहेत ज्यांची उपजीविका लेखानातून मिळणाऱ्या मानधनावर चालायची.
एका मिश्रवापर इमारतीच्या तळमजल्यावर माझ्या काकांचे वर्कशॉप होते. त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या २ खोल्यांमध्ये हे लेखक महाशय आणि त्यांची आई रहात असत.
मी साधारण दहावी - अकरावीत असताना त्यांची ओळख काकांनी करुन दिली होती. एकंदरीत लेखक आणि त्यांच्या जीवनशैली बद्दल त्यावेळी असलेल्या माझ्या भ्रामक समजूतींना त्यावेळी तडा गेला होता.
सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, शरचंद्र वाळिंबे अशा रहस्यकथा लेखकांचे समकालीन, आणि वाचकप्रिय असलेले हे लेखक महाशय कायम लुंगी आणि बनियानवर तोंडात सिगरेट धरून एका लाकडी टेबल खुर्चीवर बसून लेखन करत बसलेले दिसायचे किंवा सतरंजीवर ऐसपैस पसरून (देशी) दारू पिताना दिसायचे.
आता ते हयात नसल्याने त्यांचे नाव जाहीर करुन मृत्यूपश्चात त्यांची बदनामी करणे योग्य वाटत नाही!

असो लेख आवडला, धमाल किस्से लेखातून आणि प्रतिसादांतून वाचायला मिळाले.

कुमार१'s picture

13 Jul 2021 - 1:58 pm | कुमार१

कुतूहलजनक प्रतिसाद आवडला आणि

मिश्रवापर इमारतीच्या

हा शब्दप्रयोग देखील !

चौथा कोनाडा's picture

19 Jul 2021 - 1:12 pm | चौथा कोनाडा

" मिश्रवापर इमारत "
छान आहे हा शब्द. पुढे हा शब्द वापरीन.

अजून एक मराठीतले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक माहित आहेत

त्यांचे नाव जाहीर करुन मृत्यूपश्चात त्यांची बदनामी करणे योग्य वाटत नाही!

साधारणपणे ओळखू आलेत. नावाचे सरुवात अक्षर ना आणि आडनावाचे मधले अक्षर र आहे ना ?

नाव जाहीर न करण्याचा संकेत आजकाल पाळला जात नाही असे दिसते.
आता हेच लेख पहा ना, किती चर्चा झाली या लेखामुळे:
https://www.loksatta.com/lokrang-news/story-of-shantabai-by-subhash-awch...

याच मालिकेत असे आणखी काही लेख आहेत. आरती प्रभूंच्या लेखामुळे तर वादळ उठलं होतं !

कुमार१'s picture

19 Jul 2021 - 1:45 pm | कुमार१

किती चर्चा झाली या लेखामुळे:

>>
चर्चा कुठली झाली ते समजलं नाही.
त्या लेखात वादग्रस्त असे काय आहे तेही नाही कळाले.

कुमार१'s picture

12 Jun 2022 - 4:20 pm | कुमार१

प्रसिद्ध चरित्रकार वीणा गवाणकर यांनी नुकतेच वयाच्या ८०व्या वर्षांत पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने ९ जून २०२२ रोजी त्यांचा राजहंस प्रकाशनाकडून मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. एखाद्या लेखकाचा अशा प्रकारे सत्कार-सन्मान करण्याचा हा मराठीतला दुर्मीळ प्रसंग आहे.

अभिनंदन !!

कुमार१'s picture

15 May 2023 - 9:01 am | कुमार१

मोलें घातले खरडाया…
प्रवीण टोकेकर यांचा एक सुंदर लेख

https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?One#currPage=1
आजच्या मुख्य अंकात पान ७ वर आहे.

अमेरिकेच्या हॉलीवुडमधील चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे लेखक सध्या संपावर गेलेले आहेत. मागणी अर्थातच:
तुटपुंजे मानधन वाढवावे
ही आहे !

कंजूस's picture

17 Feb 2024 - 10:29 am | कंजूस

मानधन नको मूल्य म्हणूया.

आणि ते लेखकाने वाजवून घ्यायचे असते. त्याअगोदर त्यांचे प्रसिद्ध झालेले लेखन वाचकांना पटलेले असते.

अहिरावण's picture

22 Feb 2024 - 11:24 am | अहिरावण

प्रकाशकांना त्याची काही पडलेली नसते. मराठी प्रकाशक म्हणजे भयाण प्रकार आहे..

कुमार१'s picture

22 Feb 2024 - 11:55 am | कुमार१

विंदा करंदीकर यांचे हे अवतरण आहे :

आमचे प्रकाशक हस्तलिखितावर इतकं प्रेम करतात की ते मुद्रकाला देण्याची कल्पनाच त्यांना अनेक वर्षे सहन होत नाही !
विवेकपटाईत's picture

23 Feb 2024 - 4:54 pm | विवेकपटाईत

हजारो रुपये खर्च करून पुस्तक प्रकाशित करा. ५०० प्रति ही विकल्या जात नाही. ( एका लेखकाचा अनुभव. त्यापेक्षा मिसळपाव बरे.कितीही बेक्कार लेखन असेल, कीतीही अशुध्द असेल.तरीही ५०० च्या वर वाचतात. प्रतिसाद ही भरपूर देतात. प्रतिसाद वाचताना न खर्च केलेले पैसे ही वसूल होतात.