रायगड भ्रमंती

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
29 Dec 2019 - 8:46 am

रायगड भ्रमंती

दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही रायगड किल्ल्यावर जायचे ठरवले. मी, नवरा श्रीनिवास, मुलगा ईशान (इयत्ता ३री ) आणि भाची जुई (इयत्ता ५वि ). मुलांनी छत्रपती संभाजी मालिकेत अनेकदा ऐकलेला रायगड प्रत्यक्षात कसा आहे बघितला नव्हता. आता जरा मोठी झाल्याने त्यांना किल्ला, आणि त्याची माहिती कळेल अशी आशा होती. त्याप्रमाणे आम्ही प्लॅन केला. जाताना आम्ही चढून जायचं ठरवलं आणि येताना रोप वे ने. जेणेकरून मुलांना दोन्हीची ओळख होईल. रायगड चढायला १६०० पायऱ्या आहेत असं ऐकलं होतं. मुलं कितपत जमवतील जरा शंका होती. पण मुलांचा उत्साह होता. जमेल जमेल म्हणून उड्या मारत होती. श्रीनिवास ट्रेकिंगच्या निमित्ताने रायगड केव्हाच चढून आला होता. माझा म्हटलं तर इयत्ता ७वीत असताना शाळेच्या ट्रिप मधून मी रायगडला जाऊन आले होते. आता तेव्हाच्या आठवणी म्हणजे म्हटल्या तर स्पष्ट पण म्हटल्या तर अस्पष्ट अश्याच होत्या. तेव्हा मलाही उत्सुकता होतीच. मग आज/ उद्या, हो/नाही करता करता १५ डिसेम्बरचा उहूर्त मिळाला. श्रीनिवास ट्रेकिंग वाला असल्याने त्याने भर सकाळी उन्हाच्या आधी गड चढायचा प्लॅन केला. त्याने ठरवल्यावर त्याला नाही कोण म्हणणार?

आम्ही आदल्या दिवशी महाडला आमच्या मावशीकडे राहायला गेलो. रात्री मस्त जेवून गप्पा मारून झोपलो. झोपताना ४चा गाजर लावून ठेवला होता. ५ला मावशीकडून निघून रायगड पायथ्याशी पोहोचायचं नि सहाला गड चढायला सुरवात करायची. ठरल्याप्रमाणे ४ वाजता उठलो. आधी आम्ही तयारी केली नि मग मुलांना उठवलं. एरवी शाळेच्या वेळी उठायला कटकट करणारी दोन्ही मुलं एका हाकेसरशी उठली. बरोबर ५ ला आम्ही महाडहुन निघालो. सकाळच्या वेळी थोडासा गार वारा होता बाहेर, पण थंडी मात्र नव्हती.

साधारण ५.४० ला आम्ही रायगड पायथ्याशी पोहोचलो. डिसेंबर हा शालेय सहलींचा महिना असल्याने जाताना पायथ्यालगतच्या अनेक घरात ट्रिपच्या गाड्या लागलेल्या, मुलं तयार होत असलेली दिसली. गर्दीचा अंदाज येत चालला होता. प्रत्यक्षात पायथ्याशी गेलो तर कितीतरी ग्रुप्स आज रायगड चढायला आलेले. पार्किंगची मोठ्ठी लाईन लागलेली. श्रीनिवासआम्हाला पायऱ्या सुरू होतात तिथे सोडून गाडी पार्क करायला गेला. १० मिनीटातच परतला. जसे जसे नवीन ग्रुप चढायला सुरवात करता होते तसे तसे "हर हर महादेव " च्या घोषणा सुरु होत होत्या. त्याच बरोबर "जय शिवाजी , जय भवानी ","जय जिजाऊ " अशाही घोषणा येत होत्या. आम्ही देखील मुलांसोबत गड चढायला सुरवात केली. अजूनही काळोख होता. पण आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. त्या अंधारात त्या चंद्र प्रकाशातही स्वच्छ दिसत होत. मधेच लागलच तर मोबाईलची बॅटरी लावत होतो. मुलांना चंद्रप्रकाशात लाईट नसताना कसं वाटतं विचारल्यावर "मस्त वाटतंय ,पहिल्यांदाच एवढ्या लवकर उठून एवढ्या अंधारात बाहेर पडलोय. छान वाटतंय ", असं उत्तर आलं. खरंच एवढ्या पहाटेच्या वेळी असं उठून सुंदर टिपूर चांदणं बघण्याची कधी त्यांची वेळच आली नव्हती. आज त्यांना तो अनुभव घेता आला. काळोख असल्याने कडेच्या दरीचा अंदाज येत नव्हता. पण जिथून सुरवात केली त्या हॉटेलचा लाईट चांगलाच प्रकाशत होता. त्यामुळे आपण साधारण किती उंचीवर आलोय याचा अंदाज येत होता. "आते , चंद्र जवळ आल्यासारखा वाटतोय ", इति जुई. आजूबाजूने लोक चढत जात होते. मुलांनी अगदी सुरवातीपासून पायऱ्या मोजायला सुरवात केली होती. ती चांगलीच उत्साहात होती. मी मात्र दोनेकशे पायऱ्या झाल्यावर दमले नि क्षणभर बसले. मुलं पुढे पुढे जात होती, त्यामुळे श्रीनिवासला मुलांबरोबर जाण्यास सांगितले.

अनेक ग्रुप जे चढत होते त्यांच्यापैकी बऱ्याच जणांकडे ब्लूटूथ स्पीकर होते. त्यावर अनेक गाणी चालू होती. एकाकडे शिवाजी महाराजांची आरती चालू होती तर एकाकडे मराठा मोर्चाची गाणी चालू होती. दुर्दैवाने अशाने तिथली निर्मळ शांतता भंग होत होती हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. चालताना एकमेकांना आधार देणं, गप्पा मारणं , इतिहासाबद्दल माहिती घेणं यातलं काहीच त्यात नव्हतं. जाणवत होता तो गोंगाट. आणि पुढचं दुर्दैव हे कि गड बघायला जाताना असच जायचं असतं हे मुलांना कळलं. नको त्या गोष्टी मुलं फार पटकन आत्मसात करतात. कारण असेच ३/४ ग्रुप तिथून गेल्यावर माझ्या मुलाने विचारलंन ,"आई आपण का नाही आणला स्पीकर ?" सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याला त्रास होईल असं वागायचं नसतं हे त्याला या आधीही शिकवलंय, आताही मी तेच सांगितलं, पण एवढे सगळे लोक मग चुकीचं कस काय वागू शकतील असा त्याचा चेहरा मला दिसला.
हळू हळू थोडा थोडा प्रकाश पसरायला लागल्यावर डोंगरांच्या कडा स्पष्ट दिसायला लागल्या. टकमक टोक, हिरकणी बुरुज यांची स्पष्ट रेषा दिसायला लागली. आपल्याला अजून तिथपर्यंत जायचंय हे कळल्यावर मुलांच्या आधी मी दमले. थोडी बसले, घोट दोन घोट पाणी प्यायले. आणि परत एकदा सुरवात केली. आता हळूहळू दिसायला लागलं होत. श्रीनिवास मुलांना सूचना देत होता . मधून चला , कोणत्याही एका बाजूला जाऊ नका. आता खालची दरी दिसायला लागली, खोलीचा अंदाज यायला लागला, पुढे गेलेले लोक दिसायला लागल्यावर अजून किती चढ आहे पायऱ्या कि पायवाट हे कळायला लागलं. मुलं मोठ्याने पायऱ्या मोजत होती, त्यामुळे येणारे जाणारे मधूनच किती झाल्या आतपर्यंत म्हणून विचारात होते. त्यांना मुलांचं कौतुक वाटत होत. मी शाळेच्या ट्रिप मध्ये गेलेले तेव्हाची रायगडची स्थिती आठवत नाही, पण आता बरीच ठिकाणी व्यवस्थित रेलिंग लावलेली आहेत आधाराला. पायऱ्या पण नीट आहेत. मधेच माझ्या साध्याश्या मोबाईल कॅमेरा वर माझं फोटो टिपण चालू होत. अर्थात काळोखातले कुठलेच फोटो चांगले आले नाहीत. मला चंद्र, त्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेली दरी, सूर्याची चाहूल देत पसरणारा प्रकाश असं सगळं काही टिपायचं होत. पण फोटोग्राफी हि कला आहे. ती काही मला साध्य नाही. तेव्हा फोटो काढण्यापेक्षा आहे तो क्षण अनुभवा आणि मुलांना त्याचा आनंद घ्यायला शिकवा हेच मला पटलं. तसाही आम्ही फोटो काढायला लागलो कि किती वेळ काढू भरवसा नसतो त्यामुळे श्रीनिवास आधीपासूनच हाकलत असतो आम्हाला. :)

शेवटी आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. आमच्या आधी पोहोचलेल्या लोकांचं फोटोसेशनच काम चालू होत. एक एक करत ३ ४ जणांना फोटो काढायला मदत केली. शेवटी आमचाही एक फोटो झाला. जसेजसे पुढे गेलो, किल्ला दिसायला लागला. मुलंदेखील आश्चर्याने बघत होती. "केव्हढ्या उंच , केवढे मोठे दगड , कस केलं असेल त्यांनी. कसलं भारी आहे ना ?" अशा प्रतिक्रिया यायला लागल्या. इथे फोटोसेशनला खूप वाव असल्याने सगळे ग्रुप नुसते फोटो काढत होते. वर जा खाली ये, मध्येच गार्ड कुणाला तरी हटकत होते. फोटो च्या नादात भलतंच साहस करायला जाणारे इथेही कमी नव्हते. आम्ही वर गेलो, तर तिथे दोन जण स्लीपिंग बॅग मध्ये झोपले होते, तर एक जण तंबूतून बाहेर आला.मुलांना हि कल्पनाच भन्नाट वाटली. इथेच रात्री यायचं, झोपायचं कसलं भारी आहे ना हे ?, चला म्हणजे पुढच्या वेळी असही करायला हरकत नाही असं वाटलं. आवडेल मुलांना. मुख्य दरवाजा छान फिरून झाल्यावर अजून वर पायऱ्या होत्या. चढत चढत वर आलो . साधारण २ तासात आम्ही रायगडच्या माथ्यावर पोहोचलो. खूप छान वाटत होत. सुरवातीलाच डावीकडे टकमक टोकाकडे अशी पाटी दिसली. आधी तिकडेच जाऊ म्हणून वळलो . रस्ता पायवाटेचा थोडासा झाडीतून जात होता. दुर्दैवाने इथे २/३ ठिकाणी कचऱ्याचा ढीग दिसला. कदाचित गडावरचा कचरा उचलून तिथे एकत्र करीत असतील . पण दृश्य बघून खूपच वाईट वाटलं . कधी सुधारणार आपण लोकं ?प्लॅस्टिकची बाटली विकत घ्यायची नि तिथेच टाकायची काय गरज असते. आणि नसेल जमत तर बसा घरात.पण बाहेर पडून घाण नका करू. किती जणांना समजवणार ?

असो तर तिथून आम्ही पुढे गेलो . टकमक टोक अगदी पूर्ण टोकाला जाऊन बघितलं . सगळीकडे व्यवस्थित रेलिंग लावलेले आहे . त्यामुळे कुठे काही धोका नाही . आता कुणी मुद्दाम त्या रेलिंगच्या बाहेर गेला तर त्याला कुणीच काही करू शकत नाही . ज्याने त्याने स्वतःवर बंधन घालणं गरजेचं आहे . पण असेही नमुने बघायला मिळाले . जिथे शक्य तिथे बोललो ,पण सांगूनही ऐकत नाही तर सोडून दिल . टकमक टोकावरून सुंदर दरीच दर्शन झालं. पूर्वेकडून सूर्य उगवत होता . त्यामुळे एकदम मस्त फ्रेश वाटत होत . तिथून निघालो , जगदीश्वर मंदिरात गेलो . पाठी समाधीला जाऊन नमस्कार केला . मंदिरातून निघून बाजारपेठेच्या बाजूला निघालो आणि आमच्या समोरच एक माणसाने वेफर्सचं रॅपर टाकून दिल. हताश झाले . श्रीनिवासने जाऊन त्या माणसाला हटकलं ,"अभिनंदन ", "कशाबद्दल ?" त्या माणसाला काही कळेना . "अरे तुम्ही रायगड अस्वच्छ करायला हातभार लावताय . "इति श्रीनिवास . त्याच्या लक्षत आलं . तोवर आणखी २/३ जण तिथे जमले . काय झालं ची चौकशी झाली . त्या माणसाने रॅपर फेकल्याचं निदर्शनास आणून दिल्यावर तो सॉरी म्हणू लागला . "सॉरी म्हणण्यापेक्षा ते उचला आणि कचरापेटीत टाका "-श्रीनिवास . एवढ्या लोकांपुढे बोलल्याने लाजेखातर त्याने रॅपर उचलल. किव आली अशा माणसांची .

सहलींचा सिझन असल्याने बरेच विद्यार्थी आले होते . त्यामुळे रायगड गजबजून गेला होता . गाईड आपल्या परीनं माहिती सांगत होते . पण मुलांना माहितीपेक्षा फोटो काढून घेण्यात जास्त इंटरेस्ट होता . काही ठिकाणी अजूनही सर्वेच काम चालू आहे . तिथे त्यांनी दोऱ्या लावून , सूचना लावून त्या भागात जाऊ नका लिहिलेलं आहे तरीही अनेक जण आत जात होते. ४/५ जणांना हटकल्यावर मात्र मन उद्विग्न झालं . हे सगळं दाखवायला मी मुलांना आणलं नव्हतं इथे, असा विचार आल्याखेरीज राहिला नाही . बरेच ठिकाणी त्या त्या जागांची नीट नाव लिहिलेली आहेत .गडाचे मार्गदर्शन करायला गाईड आहेत . पण मुळात कुणाला माहिती हवी आहे का ? तिथून निघून जाण्याची इच्छा झाली . तसाही दरबार, बाजार, बालेकिल्ला, राण्यांचे महाल सगळं बघून झालं होत . मेणा दरवाज्याजवळ आलोच होतो . रोपवे तिथूनच होता . आता मुलाच्या पुस्तकात प्रवासाची साधने मध्ये हा प्रकार होता . त्यामुळे तो दाखवायची संधी मिळाली होती . सकाळी ६ वाजता चढायला सुरवात करून गड बघून आम्ही १० वाजता तिथून निघालो सुद्धा . खर तर मला खूप वेळ जाईल गड फिरायला असं वाटलं होत. पण समोर आलेल्या एक एक प्रसंगाने माझी निराशा होत गेली . श्रीनिवास अनेक ठिकाणी ट्रेकिंगच्या निमित्ताने हिंडून आल्याने त्याला कदाचित अपेक्षा असावी, पण माझा मात्र भलताच हिरमोड झाला.

आम्ही रोपवे ने खाली आलो तर तिथंही मला जरा धक्काच बसला . बर्याचश्या शाळांच्या सहली आल्या होत्या पण मुलं गड चढण्याऐवजी रोप वे साठी लाईन लावून उभी होती . इथे प्रश्न तिकीट परवडण्याचा नाहीये . पण आताच्या लहान वयात मुलांना गड चढायला प्रोत्साहन द्यायचं कि त्यांना शॉर्टकटची सवय लावायची हा प्रश्न मला पडला ? ज्या वयाची माझी मुलं घेऊन आम्ही हा गड चढलो त्याच वयाची मुलं इथे रोप वे साठी लाईन मध्ये उभी आहेत ?का? त्यांना शक्य नाही चढणं ? कि पालकांनीच नकार दिला ? का शाळेला रिस्क वाटतेय ? आपण नक्की काय करतोय ? कुठे जातोय ? मग मी माझ्या मुलांच्या व्यायाम,चांगलेआचारविचार,मिळून मिसळून राहणं , दुसर्यांना त्रास न देणं , दुसर्यांचा आदर करणं , अभ्यास सोडू इतर वाचन करणं , वेगवेगळे साधे तरीही महत्वाचे खेळ खेळणं , मोबाईल/ टॅब अत्यंत कमी वेळ हाताळणं वगैरे गोष्टींसाठी इतकी का पाठी लागतेय ? माझच तर चुकत नाहीये ना ?

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

लेख उत्तम आहे. परिस्थिती छान टिपली आहे. मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाणं स्तुत्य आहे.

शाळेच्या मुलांची सहल एका दिवसांत आटपायची असते ना!
-----------
खोपोलीचे एक नातेवाइक सांगतात - मुलांना तयार करून पहाटे तीनला एकेका स्टॉपवर सोडायला जावं लागलं. बसमध्ये मुलं झोपली. नऊला महाबळेश्वर. नाश्ता करून पाचगणी, परत महाबळेश्वर जेवण करून चारला निघाले. दहाला रात्री घरी सोडलं. डबे दिलेच होते. झाली की नाही महाबळेश्वर सहल एका दिवसात? आणि कित्ती मजा आली ते विचारा.

मुक्त विहारि's picture

29 Dec 2019 - 5:55 pm | मुक्त विहारि

एकाच नाण्याच्या असंख्य बाजू असतात.

वैयक्तिक म्हणाल तर, रोप वे, मुळे खूपच वेळ वाचतो. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे रोप वे असलेले उत्तम.

दुर्गविहारी's picture

29 Dec 2019 - 6:20 pm | दुर्गविहारी

अतिशय उत्तम आणि मनापासून लिहिले आहे. बाकीच्या नकोश्या प्रसंगाबाबत बाबतीत अनेक वेळा लिहून झाले आहे. त्यामुळे जाऊ देत.

माथेरानला सनसेट पॉइंट ते खाली धोधाणी रोपवे होणार होती. वनखात्याने ब्रेकर लावला.

धनावडे's picture

29 Dec 2019 - 8:54 pm | धनावडे

छान लिहलंय...

एकदा राज्याभिषेक सोहळ्याला पण जाऊन या मग....

३१ डिसेंबर गडांवर ओव्हरनाईट मुक्कामाला बंदी आल्याची बातमी आत्ताच वाचली.

जॉनविक्क's picture

30 Dec 2019 - 7:41 am | जॉनविक्क

छान लिहिलंय. रायगडाच्या बर्‍याच आठवणी आहेत. कित्येकदा जाणं झालंय गडावर. प्रत्येकवेळी गडावर गेलं की काहीतरी नव्यानं गवसतं.
मिपाकरांच्या सोबत केलेल्या रायगडवारीचं वर्णन मिपाकरांची वारी: शिवतीर्थ रायगडावर इथे वाचायला मिळेल.

जॉनविक्क's picture

30 Dec 2019 - 8:53 am | जॉनविक्क

एखादी मोहीम गडावर आखाच, परत एखादी

कंजूस's picture

30 Dec 2019 - 1:57 pm | कंजूस

एकदाच गेलो आहे. पण फारसं फिरलो नव्हतो. वल्लीच
या धाग्यामुळे सर्व आताच फिरलो.
फोटोशॉप गडाची चर्चाही खमंग मिपाश्टाईल होती. मला चौराकाका ढालतरवार घेऊन चिलखत घालून उभे दिसायला लागले.

किल्लेदार's picture

31 Dec 2019 - 2:26 pm | किल्लेदार

घाण करणाऱ्यांचा टकमक टोकावरून सरळ कडेलोट करावयास हवा !!!!

प्रसाद_१९८२'s picture

2 Jan 2020 - 11:43 am | प्रसाद_१९८२

३१ डिसेंबर किल्ल्यांवर साजरा करणार्‍या अनेक तळीरांमाना, किल्ले संवर्धन संघटनेच्या कार्यकत्यांकडून चोप देतानाचे व्हिडीओ, सध्या फेसबुक व व्हाट्सअ‍ॅपवर पसरवले जात आहेत. किल्ल्यांवर जाऊन गैरप्रकार करणारे समाजकंटक या व्हिडीओतून काहितरी बोध घेतील ही आशा करुया.

गणेश.१०'s picture

9 Jan 2020 - 10:29 am | गणेश.१०

एप्रिल २०१९ ला शिवनेरी किल्ल्यावर आम्ही सहकुटुंब गेलो होतो. आपल्या रायगड अनुभवाच्या अगदी उलट. सर्वजण अगदी तरुण मुलांचे घोळकेही गडाचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी पुरेपूर काळजी घेताना दिसले.

येत्या रविवारी किंवा सोमवारी मित्रांसोबत रायगडला जाण्याचा योग आला आहे, पहिल्यांदाच. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी मी घेईलच :-)

मिपकरांकडून मार्गदर्शन हवे होते:
१) दुपारी १२ च्या आसपास गडावर जाणे योग्य की सकाळी लवकर?
२) गडावर राहायला परवानगी आहे का? जेणेकरून भरपूर वेळ मिळेल गड पाहण्यासाठी.
३) इतर राहण्याचे पर्याय?

धन्यवाद.

हो तुम्ही गडावर राहू शकता..
भवानी टोकाला बापू नावाचे एक जण राहतात त्यांच्या झोपडी वजा घरात तुम्ही राहू शकता आणि जेवण पण करू शकता.

सकाळी किंवा संध्याकाळी गड चढायला मस्त...