भारतीयांचे अपमानास्पद पराभव !! प्रकरण -१ खडकीची लढाई

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
28 Dec 2019 - 12:28 pm

भाग -१
भारताला वर्षानुवर्षांचा युद्धेतिहास आहे. या लढायांची यादी अगदी मागे खेचत नेली तर पुराणात वर्णिलेल्या देव दैत्य संग्रामापासून सुरु होईल आणि राम रावण युद्ध , भारतीय महायुद्ध , झेलम चे युद्ध वगैरे प्रवास करत करत १९९९ साली झालेल्या कारगिल युध्दपाशी येऊन थांबेल .यातील काही लढाया अंतर्गत आहेत तर अनेक परकीय शत्रूं विरुद्ध लढलेल्या आहेत .काही लढायातील विजय अभिमानाने मान उंचावणारे आहेत तर अनेक लढयातील पराभव हे शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. या लेख मालेद्वारे आपण भारतीयांना अशा शरमेने मान खाली घालणाऱ्या लढायांची चर्चा कारणार आहोत . आज आपण मराठेशाही बुडवणाऱ्या खडकीच्या लढाईची चर्चा करणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा साम्राज्याचा अंत ज्या लढाईत झाला ती लढाई म्हणजे खडकीची लढाई ही होय. ही लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी पुण्याजवळ (खरेतर हल्लीच्या पुण्यात !) खडकीत पेशवे बाजीराव रघुनाथ भट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये झाली .१७६१ साली पानिपतावर जसे तुमुल युद्ध होऊन जशी प्रचंड प्राणहानी झाली त्या मानाने या खडकीच्या लढाईत झालेली प्राणहानी अतिशय नगण्य म्हणावी लागेल . पण तिकडे पानिपतावर झालेल्या प्रचंड हानी नंतर सुद्धा मराठा साम्राज्य नेटाने उभे राहते आणि इकडे मात्र खडकी (आणि मग येरवडा ) मध्ये मराठ्यांचा निर्णायक पराभव न होताच पेशवाई कशी बुडते हे वरकरणी समजून घेण्यास अवघड वाटते. यासाठी आपल्याला १८१७च्या आधी काही दशके मागे इतिहासात डोकवावे लागेल. एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की वाचकांना आजवर ज्ञात असलेल्या इतिहासास कलाटणी देणारे काही वाचावयास मिळेल या अपेक्षेने जर कोणी हा लेख वाचेल तर मात्र त्याची घोर निराशा होईल . मी कोणतेही नवीन संशोधन मांडणार नाहीये . या लढाईच्या संबंधाने सध्या उपलब्ध असलेल्या विश्वसनीय साधनाचे संकलन करून ती सर्व माहिती मी इथे मुद्देसूदपणे मांडण्याचा यत्न करीत आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.

मराठे इंग्रज संबंध :-

मराठे इंग्रज संबंध हे कायमच किचकट आणि गुंतागुंतीचे राहिले आहेत. (इथे इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यांचे अधिकारी असा अर्थ अभिप्रेत आहे ). न. चि. केळकर यांचे " इंग्रज व मराठे " हे पुस्तक तर संपूर्ण याच विषयाला वाहिलेले आहे ते अभ्यासूंनी जरूर वाचावे. मराठ्यांच्या बाबतीत इंग्रजांचे धोरण कायमच "तोंडावर भाव आणि मनात डाव " असे राहिले आहे . खुद्द छ. शिवाजी राजांच्या काळात मराठ्यांचा इंग्रजांशी प्रथम प्रत्यक्ष झगडा हा सुरत स्वारीच्या वेळी झाला असे म्हणता येईल . अर्थात त्याआधीही इंग्रजांनी मराठ्यांच्या कुरापती काढल्याचं होत्या . खांदेरीच्या प्रकरणात तर मराठे आणि इंग्रज यांच्यात आरमारी युद्धच पेटले होते. संभाजी राजांच्या कालात एलिफंटा बेटाच्या तटबंदीच्या संबंधाने इंग्रजांशी त्यांची कुरबुर झाली पण ती तिथेच थांबली . छ . राजाराम यांचा इंग्रजांशी फार संबंध आलेला दिसत नाही . पुढे छ . शाहू च्या काळात मराठे इंग्रज संबंध हे मुख्यत्वे आंग्रे इंग्रज संबंध असे म्हणावे लागेल. पुढे तुळाजी प्रकरणात इंग्रजांना मराठ्यांच्या प्रत्यक्ष राजकारणात भाग घेण्याची संधी नानासाहेब पेशवयाने उपलब्ध करून दिली . पुढे पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेब वारले आणि थोरले माधवराव पेशवे झाले. या पेशव्याचा काळात इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात चंचू प्रवेश करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही . माधवरावांच्या मृत्यूनंतर राघोबा दादाने ती संधी इंग्रजास उपलब्ध करून दिली आणि त्यावरून इंग्रज मराठा संघर्ष उभा राहिला . यास पहिले इंग्रज मराठा युद्ध असे संबोधले जाते . हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असा सर्व साधारण गैर समज आहे . प्रत्यक्षात या युद्धाचा निकाल "अनिर्णित " आहे . (आता यावर वेगळी चर्चा होईल पण आता नको). पुढे सवाई माधवराव यांच्या मृत्यूनंतर झालेल्या सुंदोपसुंदी मध्ये रघुनाथ पुत्र बाजीराव दुसरे (ज्यांना आपण यापुढे रावबाजी म्हणून संबोधणार आहोत ) ते पेशवे झाले. या रावबाजीचा राज्य कारभाराचा सुरुवातीचा काळ अनेक भानगडींनी भरलेला आहे आणि ती चर्चा मोठी आहे . थोडक्यात सांगायचे तर विठोजी होळकराच्या प्रकरणात रावबाजीचे यशवंतराव होळकरांशी वाकडे आले . हडपसर येथे पेशवे -शिंदे यांच्या संयुक्त सैन्याचा यशवंतरावांनी पराभव केला . पेशवाई टिकवण्यासाठी रावबाजीने इंग्रजांशी सुरत येथे वसईचा तह केला (१८०२ं). त्याबदल्यात इंग्रजांनी रावबाजीला पेशवाईवर पुनश्च बसवले आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली . यातून पुढे इंग्रज - रावबाजी विरुद्ध होळकर-शिंदे युद्ध पेटले आणि इंग्रज - रावबाजी पक्षाचा यात विजय झाला. यासच दुसरे इंग्रज मराठा युद्ध म्हणतात . हे युद्ध म्हणजे मराठेशाहीच्या अंताची नांदी होती .

इथे वसईच्या तहाची कलमे लक्षात घेणे आवश्यक आहे :-
या तहाद्वारे पेशव्याने सहा बटालियनची (६००० सैनिक ) फौज स्विकारली. यात कायमस्वरूपी देशी पायदळाचा समावेश होता आणि त्याला युरोपियन तोफखान्याची व इतर शस्त्रास्त्रांची जोड होती. हे सारे सैन्य पेशव्याच्या मुलुखात कायमस्वरूपी राहणार होते.
या फौजेच्या खर्चासाठी वार्षिक सव्वीस लाख रूपये उत्पन्नाचे जिल्हे कंपनीला तोडून देण्यात आले होते.
या तहाद्वारे पेशव्याने त्याचे सुरतवरील सर्व अधिकार सोडून दिले.
कंपनी व बडोद्याचे गायकवाड यांच्यात जे करारमदार झाले त्यांना पेशव्याने मान्यता दिली.
पेशव्याचे गायकवाड व निजामाशी जे वाद होते ते सर्व मध्यस्थीसाठी कंपनीकडे सोपविले.
इतर सत्तांशी भविष्यात ब्रिटिशांच्या पूर्वपरवानगीशिवाय युद्ध किंवा तह न करण्याचे पेशव्याने मान्य केले.
या तहामुळे पेशवा हा इंग्रजांचे हातचे बाहुले बनला . प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत इंग्रज नाक खुपसू लागले. आता साधारण १८१० ते १८१५ या काळातील परिस्थितीचा आढावा घेऊया . इ .स १८०२ च्या वसईच्या तहाने रावबाजी इंग्रजांचा मांडलिक झाला होता. १८०५ पर्यंत शिंदे , भोसले , होळकर हे ही इंग्रजांकडून पराभूत पाऊन इंग्रजी तहात बांधले गेले होते. सातारकर व करवीरकर छत्रपती यांची स्वतःची विशेष ताकत नव्हतीच . एकुणात आता इंग्रजां विरुद्ध १७७३ प्रमाणे मराठ्यांच्या एकजुटीची कोणतीही शक्यता उरली नव्हती. शिवाय पटवर्धन , पानसे , निपाणकर वगैरे सरदारांशी पेशव्याचे काही न काही खटके उडालेच होते. या सरदारांकडून रावबाजी सतत कोणत्या न कोणत्या कारणाने खंडण्या उकळत असे. शेवटी वैतागून या जहागीरदारानी इंग्रजांकडे दाद मागितली . मग इंग्रजांनी १८१२ साली एक नवीन व्यवस्था अमलात आणली . त्यानुसार या जहागिरदारांनी पेशव्याचा मान राखावा , आपल्याकडील अतिरिक्त मुलुख सोडून द्यावा वगैरे गोष्टी पाळण्याचे बंधन त्यांच्यावर आले. उलट इंग्रजांच्या परवानगी शिवाय या जहागिरदारांचे मुलुख पेशव्याने जप्त करून नयेत से बंधन पेशव्यावर आले. विशेष म्हणजे या जहागीदारां बरोबर स्वतंत्र करार मदार करण्याची मुभा हि इंग्रजांनी घेतली . आता जवळपास सर्वच मराठा सरदारांच्या चाव्या इंग्रजांच्या हातात पडल्या .बहुदा १८१२ च्या नंतरच रावबाजीच्या मनात इंग्रजांशी दोन हात करून स्वतास मुक्त करून घ्यायचे विचार सुरु झाले असावेत.

अहमदाबादच्या वसुलीवरून रावबजीचे गायकवाड याच्याशी मतभेद होते. त्या व इतर काही व्यवहारातून पेशवा गायकवाडांकडे सुमारे अर्धा कोट रुपये मागत होता . त्या संबंधाने बोलणी करण्यासाठी गायकवाड यांकडून गंगाधर शास्त्री हा माणूस पुण्यास आला होता. हा इंग्रजांचा खास इसम होता आणि इंग्रजांच्या संरक्षणाखाली होता . या गंगाधर शास्त्र्याचा २७ जुलै १८१५ रोजी पंढरपूर येथे खून झाला . यामागे पेशव्याचा खास माणूस त्रिम्बकजी डेंगळे व खुद्द पेशवा आहे अशी इंग्रजांची खात्री होती. पण रावबाजी ला थेट आरोपी न ठरवता इंग्रजांनी त्याच्या कडे त्रिंबकजीला ताब्यात देण्याची मागणी केली . रावबाजीने बरीच चाल ढकल करून पहिली . इंग्रज ऐकेनात तेव्हा तो युद्धाची भाषा करू लागला. मग एल्पिस्टन ने शिरूर वरून इंग्रजी फौज मागवली . मग मात्र पेशव्याचे धाबे दणाणले व त्रिम्बक जी ला इंग्रजी हातात सोपवण्यात आले. पण १८१६ मध्ये ठाण्याच्या तुरुंगातून त्रिम्बकजी पळाला . त्यामागेही पेशवाच आहे अशी इंग्रजांची खात्री होती . पुन्हा इंग्रजांनी रावबाजी कडे त्रिम्बकजी साठी तगादा लावला. यानंतर इंग्रजांशी रावबाजीचे संबंध उत्तरोत्तर बिघडत गेले.
मे १८१७ मध्ये इंग्रजांनी रावबाजीस त्रिंबकजीस एका महिन्याच्या आत स्वाधीन करावे आणि त्रिंबकजी स्वाधीन होईपर्यंत सिंहगड , रायगड आणि पुरंदर जामीन म्हणून इंग्रजांचे स्वाधीन करावे अशी तंबी भरली . रावबाजीने पुन्हा टोलवाटोलवी करून पहिली . पण ८ मे १८१७ रोजी एलपीस्टन ने पुणे शहरास वेढा दिला आणि नाकेबंदी केली . मग मात्र पेशव्याने त्रिंबकजीस पकडन्यासाठी जाहीरनामे काढले आणि उपरोक्त तिन्ही किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. मग एलपीस्टन ने वेढा उठवला .यावेळी इंग्रजांनी रावबाजी बरोबर एक करार केला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो . (१९३२ साली झालेला पुणे करार वेगळा ) . या कराराद्वारे इंग्रजांनी पेशव्याच्या उरल्या सुरल्या मुसक्याही आवळल्या .
कराराची कलमे खालील प्रमाणे .

पुणे तह - १३ जून १८१७
१. वसईचा तह कायम राहील शिवाय ,
२. पेशव्याने त्रिंबकजीस गंगाधर शास्त्र्याचा खुनी म्हणून मान्य केले आणि त्यास इंग्रजांचे स्वाधीन करण्यास कबुली दिली .
३. त्रिंबकजिस अटक होईपर्यंत त्याचे कुटुंब इंग्रजांच्या ताब्यात राहील .
४.सरदार , दौलतदार यांच्या कडील अकाबारनीस कारकून , वकील यांस पेशव्याने दरबारी ठेऊ नये . काही सवाल जबाब करावयाचे असले तर ते इंग्रजां मार्फत करावे .
५.इंग्रजांशी स्नेह असलेल्या करवीर , सावंतवाडीकर पेशव्याचा काही हक्क सांगू नये .
६. रावबाजीने इंग्रजांचे ५००० स्वर , ३००० पायदळ , तोफखाना यांचा खर्च चालवून ते स्वतः पाशी ठेवावे . त्यासाठी तोडून दिलेल्या ३४ लक्ष मुलुखावर आणि किल्यावर हक्क चालवू नये .
७. अहमद नगर च्या किल्ल्या भोवतालची ४००० हात चौफेर जमीन पेशव्याने इंग्रजांस द्यावी . इंग्रजी छावणीच्या बाजूची कुरणे कही करी द्यावी .
८. इंग्रज तैनाती फौजेपेक्षा कितीही फौज पेशव्याच्या मुलुखात ठेवतील त्यास पेशव्याने हरकत घेऊ नये .

पुण्यात या सर्व घटना घडत असतांना उत्तरेत आणि मध्य भारतात पेंढाऱ्यांचा उपद्रव वाढतच होता . विषयांतराचा दोष पत्करून हे पेंढारी कोण ते पाहू.

पेंढारी -
पेंढारी हे लोक मोगलशाहीच्या पडत्या काळात (औरंगझेबाच्या शेवटच्या २० वर्षात) प्रथम पुढे आले.पेंढारी म्हणजे पूर्ण प्रशिक्षित सैनिक नव्हेत . यांना सरकारकडून पगार नसे, मात्र शत्रूच्या प्रदेशात खंडणी वसूल करताना तिच्यापैकी कांही ठराविक भाग यांना मिळे. मुख्य लढाई नंतर शत्रूची धान्यसामुग्री लुटणे व त्यांच्या देशाची खराबी करणे हे काम यांच्याकडे असे. होळकरी सैन्यात पेंढाऱ्यांचा खूप भर असे . (खुद्द पानिपतावर मल्हारराव हे १०००० पेंढारी सैन्य घेऊन हजर होते .) हे घोडेस्वार असून यांचे घोडे फार चपळ असत. यांच्या वेगवेगळ्या टोळ्या असत व त्यांचे वेगळे नायक ही असत .१८१६ पर्यंत अनेक सरदारांनी , संस्थानिकांनी आपले संरक्षण इंग्रजांकडे सोपवले होते. (याला तैनाती फौजेचा करार म्हणून ओळखले जाते). त्यामुळे त्यांच्या मुळच्या सैन्यातील सैनिकांना एकतर इंग्रजांकडे नोकरी पत्करावी लागे वा या पेंढारी टोळ्यात सामील व्हावे लागे . १८१० च्या दशकात या पेंढाऱ्यांचा पृथक पृथक टोळ्या होत्या व त्यांचा वेगळा नेता असे . (उदा . मीरखान वगैरे ) . त्यांनी मध्यप्रांत, माळवा, गुजराथ, महाराष्ट्र, मद्रास, बिहार वगैरे प्रांतात धुमाकूळ घातला. स्वत:चे स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे रुष्ट झालेले बरेचसे संस्थानिक त्यांना आंतून मदत करीत. इंग्रजांच्या किरकोळ बंदोबस्ताने पेंढारी टेकीस येईनात . म्हणून इंग्रजांनी पेशवे, शिंदे आदी सरदारांकडे मदत मागितली. रावबाजीने या संधीचा उपयोग सैन्य उभारणी साठी करून घेतला . त्याने आतून शिंदे , होळकर , नागपूरकर भोसले ,सातारकर छत्रपती याच्याशी संधान बांधले . फौज उभी करण्यासाठी पैसा पुरवला . बापु गोखले यांनी पटवर्धन , रास्ते , विंचूरकर याच्या मदतीने फौजा उभ्या केल्या . इंग्रजही काही भोळसट नव्हते . या कार्यक्रमाचा अर्थ त्यांच्याही लक्षात आला होता . त्रिम्बकजी वरून पेशवे इंग्रज संबध विकोपास गेले होते. रावबाजी वरपांगी पेंढाऱ्यांचा विरुद्ध फौज उभी करत आहे पण आतून त्यांनाच सामील आहे असा त्यांचा पक्का समज होता .

आता आपण खडकीत झालेल्या लढाईच्या प्रसंगापाशी येऊन पोहोचलो आहोत . पण वरील प्रस्तावना वाचून एवढे नमनालाच घडाभर तेल जाळण्याची काही आवश्यकता होती काय ? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे . मूळ मुद्दा असा की १७७२ मध्ये ज्या मराठा महामंडळाने एकत्र येऊन इंग्रजांशी मुकाबला केला आणि त्यांस जरी संपूर्ण नेस्तनाबूत जरी नाही केले तरी तुल्यबळ लढत देऊन मराठा साम्राज्य राखले त्या मराठा महामंडळातील शिंदे , होळकर, पेशवे वगैरे आधारस्तंभांची इंग्रजांनी कशी छकलें करून प्रत्येकास वेगवेगळी वेसण घालून आपल्या दावणीस कसे बांधले हे वाचकांनी लक्षात घेणे जरूर आहे.

टीप - संदर्भांची यादी शेवटच्या भागात दिली जाईल .

कौस्तुभ पोंक्षे 

इतिहासलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

28 Dec 2019 - 3:25 pm | आनन्दा

वाचत आहे.

गौरवशाली मराठेशाही फक्त पहिला बाजीराव पेशवा पर्यंतच होती , त्यानंतर झालेल्या ऱ्हासास नामधारी छत्रपती आणि पेशव्यांचे उत्तराधिकारी हेच जबाबदार आहेत .
पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या नंतरचा इतिहास समजून घेताना खूप वेदना होतात .

माधवराव पेशवा विसरलात.

मन्त्रावेगळा मधे या बद्दल विस्त्रुत माहिती मिळ्ते.... छान लिहिले आहे पुढिल भागाची प्रतिक्शा

उगा काहितरीच's picture

28 Dec 2019 - 6:38 pm | उगा काहितरीच

वाचतोय !

जॉनविक्क's picture

28 Dec 2019 - 6:52 pm | जॉनविक्क

चांगल्या विषयाला हात घातलात,

एक मोठ्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. या काळाबाबत लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे या काळातील बहुतेक साधने ही निःपक्षपाती नाहीत. बरीचशी उघड इंग्रजी अधिकाऱ्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यात इंग्रजांना कमीपणा आणणारा मजकूर मुळातच नाही. पेशवाई बुडल्यावरही पटवर्धन आदिक संस्थानिक काही काळ वाचले, त्यामुळे त्यांना जुने राज्यकर्ते सोडून नव्यांचे गुणगान करणे हे प्राप्त होते. ज्यांना महाराष्ट्राला जागृत करून देश स्वतंत्र करायचा होता त्यांना राज्य बुडवणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाबद्दल सहानुभूतीपूर्वक वेगळा विचार करून चालणार नव्हते.

मग खडकीत नक्की काय झाले? तर बाजीरावाचा लष्करी पराभव झाला, आणि नंतरच्या येरवड्याच्या लढाईतही ब्रिटिश सैनिकांचा नाश करणे शक्य नसल्याने त्याला पुणे सोडावे लागले. इंग्रजांचा पराभव करणे त्याला शक्य होते का? थोडीफार शक्यता असली तरी ते फार अवघड झाले होते.

मला नक्की संदर्भ आठवत नाही पण बहुदा कौशिक रॉय यांनी हे आकडे दिले आहेत, १७८० च्या युद्धात २५-३०,००० ब्रिटिश सैनिक बहुदा होते आणि १८१८ मध्ये बहुतेक दोन लाखांच्या वर ती संख्या गेली होती, नक्की आकडे शोधून सांगतो नंतर.

१८०१-०२ साली असई येथे वेलस्लीआणि हिंदुस्तानात मीरत-अलिगढ येथे लॉर्ड लेक यांच्याविरुद्ध झालेले पराभव माझ्या मते निर्णायक ठरले, तिथे the odds turned against Marathas and they lost military superiority.

आणि संपूर्ण भारतात असे कोण होतें की ज्याला इंग्रजांचा संपूर्ण लष्करी पराभव करता आला? फ्रेंचांनी पुष्कळ प्रयत्न केले. अगदी १७५७ साली क्लाइव्हने २,००० सैनिक घेऊन सिराज-उद्दोला याच्या लाखभर सैनिकांना धूळ चारली होती. नंतर अर्काटचा नवाब, टिपू आणि नंतर शीख असे बळवंत सत्ताधीश ब्रिटिशांनी नमवले. त्यामुळें इथे बाजीरावाने व्यक्तिशः अथवा मराठयानी काय चुका केल्या यापेक्षा ब्रिटिश साम्राज्याचा उदय हा असा inevitable कसा बनला यावर थोडं विश्लेषण होणे आवश्यक आहे असं मला वाटतं.

जाता-जाता: याबद्दल इंग्रजीत नवे विचार मांडणारी सुंदर पुस्तके आहेत, मिळाल्यास जरूर वाचा.

जॉनविक्क's picture

29 Dec 2019 - 3:11 am | जॉनविक्क

ब्रिटिश साम्राज्याचा उदय हा असा inevitable कसा बनला यावर थोडं विश्लेषण होणे आवश्यक आहे असं मला वाटतं.

यांत्रिक प्राबल्य, औद्योगिक क्रांती हे एकमेव कारण आहे ब्रिटिश युद्धात वरचढ ठरण्यात. त्यांचा पाडाव व्हायला यांत्रिक प्राबल्य व सर्वंकश महायुद्ध या दोन गोष्टींची एकजुटच आवश्यक होती अन्यथा ते कायम वरचढच राहिले असते

इतकं सरळ नाहीये ते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की

The plunder of India was a main source of the primitive accumulation of capital which made possible the English industrial revolution.

संपूर्ण प्रबंध इथे

त्यामुळं औद्योगिक क्रांतीला श्रेय देणं हा एकमेव मुद्दा ठरू शकत नाही. तसं जर असतं तर मग फ्रेंच लोकांना ते का जमू नये? फ्रान्समधेही औद्योगिक क्रांती झालीच होती की. आणि युरोपीय सत्तांशी जवळचा संबंध येऊनही चीन नाममात्र स्वतंत्र राहिला. जपानने याउलट पाश्चात्य तंत्रज्ञान आत्मसात करून पुष्कळ प्रगती केली. तसं भारतात का झालं नाही?

त्यामुळं औद्योगिक क्रांतीला श्रेय देणं हा एकमेव मुद्दा ठरू शकत नाही. तसं जर असतं तर मग फ्रेंच लोकांना ते का जमू नये? फ्रान्समधेही औद्योगिक क्रांती झालीच होती की.
THEY WERE LATE TO THE PARTY, BESIDES, FRENCH HAVE DIFFERENT PHILOSOPHY DUE TO THEIR OWN REVOLUTION

आणि युरोपीय सत्तांशी जवळचा संबंध येऊनही चीन नाममात्र स्वतंत्र राहिला.
याचा माझा मत व्यक्त करण्या इतपत अभ्यास नाही

जपानने याउलट पाश्चात्य तंत्रज्ञान आत्मसात करून पुष्कळ प्रगती केली.
कारण जपान अमेरिकेने पुनर्वसनासाठी दत्तक घेतला, भारताला कोणी दत्तक घेतले नाही

Shashi tharoor, once said yes India miss the bus of industrial revolution because you (BRITISH) drove that over us. But that is not a case of IT revolution now.

मी तर नेहमी म्हणतो धर्म (शिक्षण) ,अर्थ, काम अन शेवटी मोक्ष बोलणाऱ्या भारतात पहिली क्रांती अध्यात्मिक (मोक्ष) झाली नंतर, औद्योगीक, हरित व आता माहिती तंत्रज्ञानाची झाली हाच किती सॉलिड विरोधाभास आहे. आणी हीच आपल्या पराभूत मानसिकतेची मेखही आहे.

(अध्यात्मात पुढे जाताना जो धर्म जीवनव्यवस्था तयार झाली ती इतकी मोक्ष सेन्ट्रीक होती बाकीचे सगळे फाफलत गेले आणी आपण शारिरीक गुलाम झालो परकीयांचे ज्याचा उघड परिणाम आपल्या मानसिक गुलामीतही झाला त्यामुळे आज आपली चांगली गोष्ट व्हेरिफाय होण्यासाठीही पाश्चात्य कुबड्या लागतात अथवा हेच योग्य म्हणायचा आत्मविश्वासही येत नाही, बाकी अंधश्रद्धा आणी इतरघातक गोष्टी ज्या तयार झाल्या त्याबद्दल तर वेगळा लेख होईल...)

त्यामुळे हो भारतात पहिली हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, माहिती तंत्रज्ञान क्रांती वगैरे झाल्यावर अध्यात्मिक क्रांती घडली असती तर चित्र वेगळे असते. उद्या अमेरिकेत खरी अध्यात्मिक क्रांती झाली तरी तो देश जगातील बलवान देशच राहील

आनन्दा's picture

30 Dec 2019 - 8:34 am | आनन्दा

कल्पना नही, पण माझी या बाबतीतील मते वेगळी आहेत..
१. साधारण हूणांचे आक्रमण इसवीसन १००च्या आसपास परतवल्यावर भारतावर कोणतेही नवीन आक्रमण झालेच नाही, कित्येक वर्षे, त्यामुळे कोणतेही अभिसरण न होता एक वेगळीच एकजिनसी बंदिस्त संस्क्रुती इथे उदयाला आली. याउलट सार्‍या बाह्य जगात त्या वेळेस जोरात अभिसरण चालू होते.
२. त्यात सिंधुबंदी - बाहेरील प्रवासी इथे येणे, आणि आपले लोक बाहेर जाऊन काहीतरी नवीन शिकून येणे (मोठ्या प्रमाणावर) यात खूप फरक आहे. त्या फरकाला आपण जवळ्जवळ १००० वर्षे मुकलो.

तरीही त्यातल्या त्यात प्रगत असल्यामुळे आणि संख्याबळ/शस्त्रबळ असल्यामुळे आपण टिकलो तरी. तुम्ही जपानचा दाखला देता, पण गोल्ड रश मध्ये किती जपानी महासागर ओलांडोन सॅन फ्रन्सिस्को मध्ये गेले आहेत ते पण बघा. नुसते दत्तक घेउन काही होत नाही. मुळात आपल्यात आलेले साचलेपण आपल्या अवनतीला कारणीभूत झाले आहे..

जॉनविक्क's picture

30 Dec 2019 - 8:41 am | जॉनविक्क

आपण समुद्र ओलांडणे पाप म्हणयाचो व सोन्याचा धूर आपल्यात (गोल्डरश, औद्योगिक क्रांती, हरित क्रांती पूर्वीच) असल्याने आयटी रश पर्यंत आपण गुलामी मानसिकताच चोळत होतो

प्रोबलेम अध्यात्मिक क्रांतीची जी अवेळी पाचर घुसली हा आहे, अन्यथा पानिपत सोडा महायुद्ध हारूनही जर्मनी उत्कृष्ट का ? उत्तर हेच की औद्योगिक क्रांती, ती झाली की मानसिकताही समूळ बदलते नुसते इतिहास घोकून कोणी त्या चुका सुधारल्यात कारण दोष निराळाच आहे ?
मराठा साम्राज्य अटकेपार सोडा न्यूयौर्क पर्यंत पसरले असते तरी ते आज ना उद्या धुळीस मिळून आपल्याला औद्योगिक क्रांतीची कास धरावी लागलीच असती

साधारण हूणांचे आक्रमण इसवीसन १००च्या आसपास परतवल्यावर भारतावर कोणतेही नवीन आक्रमण झालेच नाही

आक्रमणे चालूच होती. इंडो ग्रीक (बॅक्ट्रियन), इंडो सिथियन्स (शक) वगैरे सतत येतच होते. चंद्रगुप्त विक्रमादित्याने वाकाटकांची मदत घेत भरुचला शकांचा संपूर्ण पराभव केला तेच गुप्त साम्राज्य मात्र श्वेत हूणांच्या सततच्या हल्ल्याने हळूहळू क्षीण होत गेले.

आक्रमणे होतच होती, नाहीच असे मल म्हणायचे नाही, पण भारतात खोलवर मजल मारण्याइतके आक्रमण मला वाटते १०००नंतर मुस्लिमांनीच केले. मधली काही शतके या बाबतीत शांतच होती.
अवांतर, मला वाटते गुप्त वगैरे सम्राट त्या काळात इंडोनिशिया वगैरेकडे साम्राज्यविस्तार करत होते असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

भारत इस्लामी आक्रमणाबद्दल आणि त्यांच्या धोक्याबद्दल एव्हढा उदासीन कसा धोक्याबद्दल्हा मला कायमच प्रश्न पडून राहिला आहे. मध्यपूर्वेत काय चालले आहे याची कोणालाही गंधवार्ता असू नये?

तर्कवादी's picture

21 Sep 2021 - 6:49 pm | तर्कवादी

मुळात आपल्यात आलेले साचलेपण आपल्या अवनतीला कारणीभूत झाले आहे

म्हणजे नेमके काय ?

मुक्त विहारि's picture

29 Dec 2019 - 6:08 pm | मुक्त विहारि

धन्यवाद.

गॉडजिला's picture

28 Sep 2021 - 6:49 pm | गॉडजिला

हेच म्हणतो