दोसतार - २८

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
9 Dec 2019 - 7:54 am

मागील दुवा : http://misalpav.com/node/45780
या

प्रश्नावर घाटे सरांना बाउन्सर च्या अपेक्षेने पुढे आलेल्या बॅट्स्मनला एकदम सरपटी बॉल यावा तसे झाले असेल.
टंप्याच्या त्या शंकेने सरांचीच काय पण वर्गातल्या सगळ्यांचीच विकेट घेतली होती.
तास संपल्याची घंटा झाली . घाटे सरांची सुटका झाली.
त्या दिवशी शाळा सुटताना टम्प्याची शंका सगळ्यांच्या घरी गेली.

घरी जाताना कोपर्‍यावर शितल्या आणि आळीतली आणखी दोनतीन जण, सायकलवर बांबू घेऊन आलेल्याला काहीतरी सांगत होते. कसला तरी मांडव घालायचे चालले होते. काहीतरी चालले होते. दप्तरासकट तिथेच थांबायचे म्हणजे बरे दिसत नाही.
घरात दारातूनच दप्तर आत फेकले. या बाबतीत नेम एकदम अचूक आहे. जर आईने बाहेरच्या खोलीतली खुर्ची हलवली नसेल तर दप्तर थेट खुर्चीवर जाऊन बसते.
पण फेकताना नीट बघून फेकावे लागते. त्या खुर्चीवर कोणी बसले असेल तर पंचाईत होते.म्हणजे असे झालेले नाहिये अजून तरी पण समजा म्हणजे समजा त्या खुर्चीत कोणी जर चहा पीत बसले असेल तर दप्तर थेट चहाच्या कपावर जाउन पडेल. रन ऑट करताना बॉल थेट स्टंपावर मारतो ना तसे. आउट आहे.... चे ओरडणे त्या खुर्चीत बसलेल्या स्टंपाने केले असते.
दप्तर घरात फेकून दिले ,चपला न काढताच थेट त्या पोरां च्या घोळक्यात गेलो. सार्वजनीक मंडळाच्या गणपतीसाठी मांडव कुठे घालायचा. दरवर्षी पेक्षा या वर्षी वेगळा देखावा करायचा होता. पाटणला असे देखावे वगैरे नसतात. तेथे सार्वजनीक मंडळाचे इतके मोठे मांडवही घालत नाहीत. रिक्शावाल्यांचा गणपती सगळ्यात मोठा. एस टी स्टँडच्या समोर जेथे रिक्शा लावतात तेथेच थोडी जागा करून मांडव असणार. मग थोडी लायटिंग . मुंगळा मुंगळा नाहीतर महेबुबा महेबुबा या संध्याकाळी लायटिंग बघायला गर्दी होणार. हे दरवर्षीचे. यात बदल फक्त गाण्यांचाच. पॉप्युलर असलेले गाणे वाजवायचे. हे ठरलेले. गाणी वाजवणारा पिशवीत रेकॉर्ड्स ची थप्पी घेऊन येतो. आणि त्याच्या रेकोर्ड प्लेअर वर ती तबकडी लावतो . हे सगळे इथेही असणारच. म्हणजे गणपतीचे दहा दिवस भरपूर मज्जा. इथे लोक गणपती बघायला बाहेर पडतात . रात्री अकरा बारा पर्यंत रस्ते गर्दीने भरून वहात असतात.
गणपती स्पीकरवर लावलेली गाणी ऐकून गण्या नेहमी वैतागायचा. तो म्हणायचा की गणपती वैतागत असेल ही असली गाणी ऐकून. महेबुबा महेबुबा…. हे काय गणपतीला ऐकवायचे गाणे आहे?
अरे पण पण गणपती कशाला ऐकेल ही गाणी.
का ?गणपतीला मनात म्हंटलेली प्रार्थनाही ऐकू येत असेल तर ही गाणी नाही ऐकू येणार?
गण्याची शंका रास्त की काय असते तशी होती. ही कितीतरी मोठ्याने वाजणारी गाणी ऐकून आपण वैतागतो. गणपतीची मूर्ती तर अगदी थेट मांडवात असते.
गेल्या वर्षी ते " गणपती.... आहा पहिला गणपती…. " हे गाणे दहा दिवस सतत वाजत होते. बरे एका मांडवात ते गाणे वाजते. दुसर्‍या ठिकाणे दुसर गाणे वाजतय असे काही नाही. सगळ्या मांडवात तेच गाणे. इच्छा नसतानाही तोंडपाठ झाले होते आमचेच काय पण गावातल्या सगळ्यांचेच. अगदी रेकॉर्डप्लेअर आणि स्पीकरचेही पाठ होत असेल. गणपती विसर्जन झाल्या नंतरही कितीतरी दिवस कानात ते गणपती ... आहा...." वाजत होते. कुठे नुसते स्पीकरचे बॉक्स दिसले तरी त्यातून आपोआप " गणपती आहा.." ऐकू येत होते.
सातारला पाटणपेक्षा मोठे गणपती असतात. आणि त्यात देखावे असतात. हे ऐकून होतो. देखावे म्हणजे काय ते समजत नव्हते. या घोळक्यात उभा राहून ते काय बोलताहेत ते ऐकू म्हणजे कळेल. पण ते काय बोलताहेत तेच समजत नव्हते.
म्हणजे ऐकू येत येत होते पण प्रत्येकाला बोलण्याची घाई झाली होती. दुसर्‍याचे वाक्यच पूर्ण होऊ देत नव्हता.
तरीही ऐकत होतो.
" मी काय म्हणतो" .
तू काय म्हणतो ते सोड. मागल्या वर्षी बाल गणेश ने केला तसले काही करूया."
कशाला तसले. त्यानी लायटिंगचा घोळ घातला. वीस माळा....
" तुकाराम महाराजांची सीन केला तर..... "
" काय म्हण पण लायटिंग ची मजा देखाव्यात नाही. पब्लीक नुसतं लायटिंग बघत बसतं गाणे सम्पेपर्यंत "
त्यापेक्षा विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांची भेट…
विवेकानंद आणि लोकमान्य कधी भेटले होते...…
पण मग शिवाजी महाराज आणि तुकाराम तरी कुठे भेटले होते एकमेकाना. त्यांची भेट दाखवतातच ना....
देखाव्यात काय वाट्तील ते दाखवतील. तो म्हणजे दिवाळीतला किल्लाच असतो. न्यू बाल गणेश मंडळाने मागच्याच्या मागच्या वर्षी सीता हरण च्या देखाव्यात राम एका हरणाला बाण मारायला जातो आणि ते हरण दुसर्‍या बाजूने रावण बनुन येते म्हणून दाखवले होते. ...…
ते सोड त्यानी त्यातच आर्यभट्ट उपग्रह आणि इंदीरा गांधी आणि पण दाखवल्या होत्या……
ओ मांडवाचे माप सांगा...….
लिहा वीस बाय वीस.
ए वीस बाय वीस काय? परीघच नुसता ऐंशी होईल. सगळी वर्गणी नुसती कापडात जाईल
अरे हो. वर्गणीचं कुठवर आलंय. गेल्या वेळेला त्या शिंत्रे नानांनी देतो देतो म्हणून नुसतं झुलवलं आणि विसर्जनापर्यंत दिलेच नाहीत पैसे.
मग दिले का पैसे.
न देऊन जातात कुठे . शेवटी आपला नेहमीचा उपाय केला. रामबाण उपाय.
काय. केले
विचार याला. काय रे. तर रामबाण म्हणजे एकदम रामबाणच. रामबाण कसला ढोल बाण म्हण.
म्हणजे?
विसर्जन मिरवणूकीत त्यांच्या दारात पंधरा मिनीटे ढोल आणि करंडी वाजवत बसलो . काण काणा काण काण. आस्स्सा आवाज दिलाय म्हणून सांगू ! वर्गणी दिल्याशिवाय इथून हलणारच नाही म्हणालो. शिंत्रे नाना एकदम सरळ आले. झक्कत दिली वर्गणी.
अरे तुम्ही इकडे वाजवत बसला होतात. एकाच जागी नाचून नाचून आमचे पाय दुखायला लागले. सगळी पोरं दमून गेली होती.
म्हणूनच म्हणतो या वेळेस शिंत्रे नानांपासून सुरवात करू. ते या वेळेस नाही म्हणणं शक्यच नाही.
तर तर. या वेळेस आळीतून घरटी निदान पन्नास रुपये तरी वर्गणी यायलाच हवी. तर मिरवणुकीचा खर्च निघेल. इन्या अज्या संत्या
पन्नास जास्त नाही होणार?
जास्त कसले! महागाई कसली वाढलीये माहित्ये?. नुसत्या झिरमिळ्याच वीस दोनशे च्या होतील. मूर्ती डेकोरशन चे वेगळे.
ओ मांडवाचे माप सांगा की.
मागच्या वेळेस होता तेवढाच
बघा हं नाही तर नंतर आणखी काही वेगळे सांगाल.
तुम्ही घाला हो मांडव. मूर्ती त्यानुसार ठरवू आम्ही.
चला . चला वर्गणी साठी फिरायचे आहे. अजून. गेल्या वर्षीची पावती पुस्तके तुझ्याकडे आहेत ना अज्या.
नाही रे. माळ्यावर ठेवली होती. त्यावर मांजराने घाण केली म्हणून आईने ती पिशवीच फेकून दिली.
अन तु हे आत्ता सांगतोयेस?
मग कधी सांगायला पायजे होते.
मांजराने घाण करायच्या अगोदर सांगितले असतेस तर निदान दुसरीकडेतरी ठेवली असते पावतीपुस्तके.
ते ना परांजप्यांचे मांजर . अरे सगळ्यांकडचे दूध चोरुन पिते. त्यानेच केलं असेल हे.
बरोबर तेच असेल परांजपे काकुंचे मांजर ना. ते मांजरपण त्यांच्या सारखेच. काकुंना नाहीतरी वर्गणी कधी द्यायचीच नसते. त्यांनीच सांगून सोडले असेल मांजराला त्या पावती पुस्तकाच्या पिशवीवर.
मांजराची घाण परवडली. ती निदान वाळते तरी. कुत्री लै वाईट.
तुला काय माहीत रे .
ओ मांडवाचे माप नक्की सांगा ना ! कुठून कुठपर्यंत घ्यायचाय.?

गणपती आले होते म्हणून आळीतल्या सार्वजनीक मंडळाच्या मुलांची तयारी सुरू होती. नक्की कशावर बोलताहेत तेच कळत नव्हते.
तुकारामांचा देखावा, विवेकानंद लोकमान्य टिळक ,लायटिंग, मांडवाचे माप महेबुबा महेबुबा सीताहरण , रामबाण उपाय. शिंत्रे नाना, पावती पुस्तके, परांजपे काकू त्यांचे मांजर
प्रत्येक स्टेशनवर थांबणारी जनता गाडी असते तशी यांची बोलायची गाडी सगळी कडे थांबत थांबत निघाली होती.
मी बराच वेळ ऐकत बसलो असेन. अजय …. अजय……. तो अज्या दादा होता त्याच्या आईची हाक आली म्हणून यांच्या गप्पांची एश्टी थाम्बली तरी. थाम्बली कसली म्हणायचे, सगळेच उतारू पांगले. कोणाला अभ्यास होता, कोणाला काका कडे जेवायला जायचे होते. कोणाला बहिणीला आणायला जायचे होते.
" काय रे तुला माहीत आहे का. मांडवाचे माप काय ठेवायचे. " तो सायकलवर बाम्बू घेऊन आलेला मांडववाल्याचा माणूस मला विचारत होता. साहजीक आहे त्या पोरांपैकी मी एकटाच आता तिथे उभा होतो.
सांगीतलं की शितल्याने , गेल्या वर्षी एवढाच मोठा घ्यायचाय म्हणून.
पण गेल्या वर्षी किती मोठा होता?
ते तुम्हाला माहीत असेल की.
नाही ना! गेल्या वर्षी मांडव घालायला आम्ही नव्हतो. सोमा नं घातला होता मांडव.ह्या वर्षी आम्ही करतोय ते काम. मी नवीन आहे पण तुला माहीत असेल ना. किती मोठा होता मांडव.
नाही मी पण नवीन आहे. इकडे.
" झक मारली अन झुणका खाल्ला. " तो सायकलवर बांबू घेवून आलेला माणूस वैतागला होता. " " उगाच टाईम खोटी केला माझा. आता शितल्याला सांग. की मी काय आता येणार नाही. तुमचा घोळ संपला की तुम्हीच येवून सांगा आन घोळ संपत नसेल तर मग गणपतीलाच सांगा" एवढे बोलून तो माणूस त्याच्या सायकलवर टांग टाकून निघून गेला. तो तसा गेला खरा पण त्याच्या सायकलच्या कॅरेजला आणि दांडीला बांधलेला बाम्बु खूपच लांब होता . सायकल एष्टी बस लांब झाली होती. इतकी की आळीतल्या रामाच्या देवापुढच्या वळणावरून सायकल वळवायला शुक शुक करत मधे येणार्‍या तीन चार जणांना बाजूला करण्यासाठी त्याला
सायकलवरून खालीच उतरावे लागले.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

22 Jul 2020 - 12:24 pm | चौथा कोनाडा

पण फेकताना नीट बघून फेकावे लागते. त्या खुर्चीवर कोणी बसले असेल तर पंचाईत होते.म्हणजे असे झालेले नाहिये अजून तरी पण समजा म्हणजे समजा त्या खुर्चीत कोणी जर चहा पीत बसले असेल तर दप्तर थेट चहाच्या कपावर जाउन पडेल. रन ऑट करताना बॉल थेट स्टंपावर मारतो ना तसे. आउट आहे.... चे ओरडणे त्या खुर्चीत बसलेल्या स्टंपाने केले असते.

हा .... हा .... हा ....

... आणि गणपती बसवायच्या तयारीची मज्जा ... +१

चौथा कोनाडा's picture

22 Jul 2020 - 12:40 pm | चौथा कोनाडा

पुढील भाग :
दोसतार - २९