सायकलच्या आठवणी

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जनातलं, मनातलं
26 Nov 2019 - 2:56 pm

एका गल्लीतून पोरांचा घोळका सायकलींवरून बाहेर पडला, त्यांना बघून मी थांबलो. पुढच्या सिग्नलपर्यंत त्या पोरांनी रस्ता अडवला होता. मग ती परत एका गल्लीत घुसली. बहुतेक एका क्लासवरून दुसऱ्या क्लासला जात असावी. पण त्या पोरांमुळे माझ्या सायकलीच्या आठवणी जाग्या झाल्या.

मी आणि माझी सायकल 'एक दिल एक जान' होतो तेव्हा. शेजारच्या मित्राकडे, म्हणजे दोन इमारतीसोडून राहणाऱ्या मित्राकडे जायला मला बुडाखाली सायकल लागायची. आई बाबा वैतागायचे कधीतरी पण लक्ष नाही द्यायचे.

इयत्ता पहिलीच्या शेवटी माझी सायकल आली. आठशे ब्याऐंशी रुपयांची. आठशे रुपयांची सायकल आणि ब्याऐंशी रुपयांचे फ्रंट कॅरियर, जे नंतर मी का लावून घेतलं होतं ते विसरलो होतो. सायकल होती ' हिरो हंस'. ही सायकल का घेतली, हा रंग का घेतला वगैरे तिर्थरूपांना विचारायची कोणाची हिम्मत होती तेव्हा. पहिले काही दिवस मी कैची चालवली, मग एकदा का दोनदा बाबांनी धरलं. नंतर मात्र मी सुटलोच. ती शिकताना एकदा गटारात मस्त पडलो, बुड सोलवटल होत, पण एकही दिवस घरी नाही बसलो हे खरं.

माझ्या नशिबात सायकल लौकर होती. मग हळू हळू माझ्या सगळ्या मित्रांकडे सायकली आल्या. मग काय. क्लास, शाळा , सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र सगळं आमचं सायकलीवर. डोंगरावर जायचो तरी जोपर्यंत नेता येईल तोपर्यंत चढवत न्यायचो, मग पुढे ढकलत. मज्जा नुसती. बदलापुरात तेव्हा एक हाय वे होता, म्हणजे अजूनही आहे पण आता तो गावातला रस्ता झालाय. त्यावर आम्ही सुसाट हाणायचो सायकल. एकदा मागून ट्रक आला म्हणून सगळे एकदम बाजूला घ्यायला गेलो आणि एकमेकात अडकून बाजूला पडलो. बाकीचे दोघे एकमेकांवर पडले आणि माझा सुपरमॅन झाला. सायकलवरून पुढे. कोपर, ढोपर आणि चप्पल सगळं खरचटलं. पण असल्या गोष्टींना हार मानणार आपण आसतो का? दुसऱ्या दिवशी परत तिथेच जाऊन ख्या ख्या करून मनसोक्त हसलो.

अश्या अगणित आठवणी निघतील. सगळ्यात प्रकर्षाने आठवते ती बदलापूर ते खोपोली सायकल ट्रिप. शाळेतच होतो तेव्हा आम्ही सगळे. शनिवारी सकाळी सकाळी निघालो, बॅगा घेऊन. खाऊ, पाणी आणि थोडे कपडे. खोपोलीला पोचेपर्यंत दमलो होतो पण जाम (या जाम मधला जा जरा दीर्घ बोलला की जे वाटत ते जाम) मज्जा आली. मग परतीला आम्ही पळसधरी धरणाच्या कडेच्या पाण्यात डुंबलो. डुंबलो कसले, धुमाकूळ केला. मग सणकून भूक लागली आणि आम्ही गोपाळकाला केला. दोन दिवस नंतर पाय दुखत होते मस्तपैकी.

दहावीची परीक्षा तरी आम्ही तीन तीन तास रोज सायकल चालवायचो. पालकांना जाम टेन्शन यायचं असायचं पण ऐकणारे आम्ही कोण.

बारावी झाली, इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळाली. मग सायकल कमी झाली. जेव्हा ती दुसऱ्याला दिली तेव्हा खूप वाईट वाटलं. मन मेल्यासारखं, एखादा अवयव जिवंतपणी दान केल्यासारखा वाटलं.

तेव्हाच बाबांनी एल एम एल चालवून बघतोस का म्हटलं. आधी लुना चालवून झाली होती त्यामुळे मीही लगेच हो म्हटलं.

त्या दिवशी मी जुने अलबम चाळले की सायकलचा एखादा फोटो आहे का बघायला. नाहीये पण एकही. वाईट वाटलं. पण नाहीये तेही चांगलंच आहे एका अर्थाने. ते पहील प्रेम मनात जस आहे तसेच शुद्ध आणि छान आहे.

कथालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Nov 2019 - 3:03 pm | मुक्त विहारि

कोणे एके काळी. .डोंबिवलीत खूप सायकल चालवली.

गेले ते दिन. .

प्रशांत's picture

26 Nov 2019 - 3:24 pm | प्रशांत

आता नवी सायकल घे.

आपण सायकल ने बदलापुरला जाऊ.

सिरुसेरि's picture

26 Nov 2019 - 4:10 pm | सिरुसेरि

सायकलच्या छान आठवणी . तेव्हा ब्येसे , हडकुळी , अ‍ॅटलस , हिरो या सायकल्सची चलती होती . टिव्हीवर लागणारी स्ट्रीट कॅट सायकलची जाहिरात पाहुन त्यातली " हे मॅन जस्ट अ मीन मशीन.." हि जिंगल अ‍ॅक्सेंट सकट म्हणण्याची क्रेझ होती .

सीटकॅट (street cat ) ची जिंगल कहर होती. आणी जोडीला जो जिता वोही सिकंदर ची नशा... बालपण आरोग्यदायी व्हायला हे पुरेसे होते.

आयुष्यातली ही पहिली दुचाकी जेंव्हा मी शिकलो तेंव्हा पहिल्यांदाच ती मी 50 मीटर विनाधार चालवली होती आणि तो क्षण आजही तसाच जीवन्त आहे, मला वाटत होते माझा मित्र स्वप्नीलने सायकला मागून सपोर्ट दिला आहे म्हणून मी पडत नाहीये पण त्याने सायकला आधार देणे हळूच सोडून दिले होते व तो जोरजोराने मला पॅनडल मारायला प्रोत्साहित करत मागे बघू नको असे म्हणत पळत येत होता जेंव्हा मला लक्षात आले की तो मागेच राहिला आहे व मी एकटाच सायकल चालवत आहे ... अवसान जाऊन धाडकन रस्त्यावर आदळलो खरे पण त्या क्षणीही मला एखादी सुपरपॉवर मिळाल्याची भावना मनात अखंड जागी होती... या सायकलीने त्याकाळी अनेक मित्र, छोटे मोठे सन्मान व अपघात भरपूर दिले. पण सगळ्यात मोठे योगदान म्हणजे मला दिलेले शारीरिक कष्ट पेलायचे बाळकडू.

पहील प्रेम मनात जस आहे तसेच शुद्ध आणि छान आहे.

वाह! एकदम मनातलं बोललात.