प्रेम 2

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जनातलं, मनातलं
15 Nov 2019 - 12:50 pm

प्रेम 1

त्याला जाग आली तेव्हा त्याच्या गावात पोचलापण होता. बर्याच वर्षांनी तो घरी परतला होता. तस त्याच कोणाशी भांडण वगैरे झालं नव्हतं, परंतु त्याला दूर दूर फिरायची, नवं नवी आकाश धुंडाळायची इच्छा होती. बाबांनी त्याला कधीच थांबवलं नाही, उलट त्याला मदतच केली. एवढं मोठं कुटुंब बाबा कस सांभाळतात तेच जाणे. हा विचार संपतो आहे तोच समोरून त्याच्या मोठ्या भावांपैकी एक येताना दिसला. आज त्याला एकदम बाबांनाच भेटायची इच्छा होती, त्याने त्या भावाला हात केला आणि नंतर भेटतो म्हणून सांगितलं. गावात आल्यावर असे सगळे भेटणार, त्याला अंदाज होताच. त्याच्या घरच्या रस्त्यावर त्याला अजून एक भाऊ दिसला. हा दादा नंतरचा, दादा एवढा कडक नाही पण जवळपास. उलट थोडासा प्रेमळच. या प्रेमळ भावाच्या घराभोवती त्याने जमवलेली बरीच मित्रमंडळी राहत होती. अनेक छोटेमोठे भाऊ यांच्या आजूबाजूला राहत होते. तो त्याच्याकडे बघून प्रेमाने हसला आणि त्याला हात केला. त्या भावाच्या लक्षात आलं असावं की आज मला बाबांना भेटायचं आहे म्हणून. विचारात तो घराच्या जवळ कधी पोचला त्याला कळलंच नाही.

दुरून बाबा दिसायला लागले होते कधीच, पण नेहमी सारखी त्यांच्या आजूबाजूला भरपूर मंडळी होती. बाबांचं ते तेजस्वी रूप, तो करारी चेहरा, मिस्कील डोळे. त्यांच्या असण्यानीच आजूबाजूच्या मंडळींवर दबाव येतो. त्याला हसायला आलं. त्याने अंगावरची धूळ झाडली. केस सारखे केले. हे सगळं चालू असताना त्याला बाबांची करडी नजर स्वतःवर जाणवली. त्याने त्यांच्याकडे पाहिलं. क्षणभर त्यांची नजरानजर झाली. त्या क्षणातच त्याला काय बोलायचे होते ते बाबांना कळले आणि बाबांना काय सांगायचे होते ते त्याला कळले. जणू अंगाच पाणी पाणी झालं. परत बाबांची नजर आजूबाजूच्या लोकांकडे गेली आणि त्याला असं वाटलं की प्रकाशझोतातून तो अंधारात आलाय.

इथे स्वतःला सावरतो आहे तोच बाबांच्या पाठून दादा पुढे आला. बाबांची प्रतिकृतीच तो. बाबांसारखा तेजस्वी नाही पण शिस्तीचा. बाबा शिस्तीला कडक नाही परंतु चुकीला माफी नाही. दादाकडे कडक शिस्त. त्याच्याबरोबर त्याची नेहमीची मंडळी होतीच. जसं बाबांचं भलमोठ्ठ कुटुंब होतं, दादाच त्यातलं सगळ्यात मोठ्ठ. बाबांचा प्रभाव प्रेमळ, तुम्ही करा उद्योग पण सीमेत राहून. दादाच म्हणजे ही सीमा हिच्या पुढे जायचं नाही, अन्यथा शिक्षा.
दादा त्याच्या गोतावळ्यासकट त्याच्यापुढे आला. नमस्कार, चमत्कार झाले. नेहमीच्या गोष्टी झाल्या. तू येत जा अधून मधून, दादाने नेहमीसारख सांगितलं. त्यानेही मान डोलावली. शेवटी दोघांची नजरानजर झाली, क्षणभरच. याच्या परत लक्षात आलं की दादा सुध्दा बाबांसारखाच आहे. फार फरक नाही. मी बाबांना भेटतो म्हणल्यावर दादाने काळजी घे सांगितलं आणि तो पुढे गेला.

तो परत बाबांच्या दिशेने निघाला.

इकडे तिकडे बघताना त्याला त्याचा अजून एक भाऊ दिसला. हा एकलकोंडा. कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. परंतु त्यांच्या दोन्ही बहिणीसारखा सृजनशील. आजही तो त्याच्या त्या दोन कुत्र्याबरोबर खेळत होता. त्याने वर बघितलं, त्याला बघून त्याने हर्षाने मान हलवली आणि त्याला हात केला. यानेही त्याला प्रतिसाद दिला आणि तो पुढे निघाला.
गावाच्या वेशीवरून घरापर्यंत पोचायला किती वेळ लागतो, त्याच्या मनात विचार येऊन गेला.

आता त्याच लक्ष जायची पाळी होती मधल्या बहिणींकडे. या दोघी नेहमी बाबांच्या जवळ. बाबांच्या प्रभावापासून फार लांब नाही, परंतु स्वतंत्र. पहिली तापट आणि दुसरी शांत. आज दोघींचं काहीतरी बिनसलं होत. दोघी एकमेकांपासून लांब बसल्या होत्या.

बाबांच्या जवळ जवळ येऊन आता त्याला राहवत नव्हतं. कधी एकदा त्यांना भेटतो, मिठी मारतो आणि मन मोकळं करतो असं झालं होतं त्याला. त्यांच्या आजूबाजूची गर्दी पांगत चालली होती. एक छोटा भाऊ त्यांनी सांगितल्या प्रमाणे गोष्टी करत होता. त्याला या छोट्या भावाच नेहमी कौतुक वाटे. हा कायम बाबांच्या आजूबाजूला, सतत. कधी पुढे कधी पाठी, पण कायम हाकेच्या अंतरावर. जसा तो बाबांजवळ पोचला हा आलाच पळत पळत त्याला भेटायला. तो हसला, आता त्याला फक्त बाबांना भेटायचं होत.

बाबांची आणि त्याची नजरानजर झाली. आता त्याला त्यांच्या डोळ्यातली आग आणि प्रेम दोन्ही जाणवले. अंगाची जणू लाही लाही होत होती त्याच्या. अस वाटलं त्याला की जणू त्याला मोठ्ठी शेपटी फुटली आहे. बाबांच्या पुढे उभं राहून त्यांची तेजस्विता याच्या चेहर्यावर सुद्धा दिसायला लागली होती. पुन्हा खूप लहान असल्यासारखं वाटलं त्याला.

बाबांनी हलक्या हातांनी त्याला जवळ ओढले आणि मिठीत घेतले. त्या उबदार मिठीत तो सगळ्या गोष्टी विसरला.

--

इकडे पृथ्वीवर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर फोटोसकट बातमी झळकली.

" मनुष्यजातीच्या इतिहासातील महत्वाची घटना, शतकातला सगळ्यात तेजस्वी धूमकेतू सूर्यात विलीन."

' सहा महिन्यांपूर्वी शोध लागलेला पासोळकर-जिंग धूमकेतू आज सूर्यावर जाऊन आदळला. जगभरच्या हौशी खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरलेला हा धूमकेतू सुरुवातीपासूनच सूर्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होता.

शेवटच्या एका महिन्यात पासोळकर-जिंग धूमकेतू आकाशात संध्याकाळपासून दिसत होता. रात्रीच्या आकाशात त्याची स्पर्धा चंद्राशी चालू होती सर्वात तेजस्वी आकाशीय वस्तू म्हणून.

आतापर्यंतच्या इतिहासातला आकारमानाने सगळ्यात मोठा असलेला हा धूमकेतू बर्याच गोष्टींमुळे वैविध्यपूर्ण ठरला. आतापर्यंत सापडलेली सगळ्यात हायपरबोलीक कक्षा, तरीही सूर्यमालेत असलेला उगम. सहाशे वर्षांपुर्वी येऊन गेला असावा असा कयास. नेपच्यून , शनी आणि गुरूच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बऱ्यापैकी जवळून येऊनही पासोळकर-जिंग कुठल्याही ग्रहाच्या धूमकेतू परिवारात सामील नाही झाला. मंगळाच्या बऱ्यापैकी जवळून हा धूमकेतू सूर्याच्या दिशेने गेला.

पृथ्वीवासीयांसाठी चांगली गोष्ट अशी की पासोळकर-जिंग फार जवळून नाही गेला. परंतु ही चांगली गोष्ट का वाईट यावर दुमत आहे. खगोलप्रेमींसाठी हा धूमकेतू जवळून गेला असता तर अजून फार मोठी पर्वणी असली असती. आपल्याला या धुमकेतूमुळे यापुढे उल्कावर्षाव पाहिला मिळेल अशी अपेक्षा आहे.

यावर सर्वांचं एकमत आहे की जर आपण बुधावर राहत असतो तर पासोळकर-जिंग ने पूर्ण आकाश व्यापल असत.

पासोळकर-जिंग चा शोध, जस नाव सांगत त्याप्रमाणे राहुल पासोळकर आणि झी जिंग यांनी संयुक्तपणे लावला.
जगभरच्या चॅनेल्स वर लाईव्ह स्ट्रीम झालेला हा दुसरा धूमकेतू. परंतु हा हेल बोप, जो गुरूवर आदळला, त्यापेक्षा जास्त पाहिला गेला. आंतर जाळाची किमया.
काहीच दिवसात हबल दुर्बिणीकडून काढलेले तसेच जगभरच्या पृथ्वीस्थित दुर्बिणीने काढलेले फोटो आंतरजाळावर येतील आणि चर्चा अजून पुढे चालू राहील. वैज्ञानिक निरीक्षण, काही नवी माहिती समोर येत जाईल.
शेवटी शेवटी हा धूमकेतू खरच डोळ्यांचे पांग फेडून गेला. पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ असताना फुटलेल्या तीन शेपट्या, त्यातून होणार बाष्पाचे उत्सर्जन. बुधाच्या कक्षेत गेल्यावर त्याची स्वतःभोवती गिरकी घ्यायची वाढलेली क्षमता. तो सूर्याच्या विलीन झाला तेव्हा दिसू शकला नाही परंतु लोकांनी आंतरजाळावर आलेल्या फोटोंवर समाधान मानले. '

कथालेख

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

18 Nov 2019 - 12:22 pm | मनिम्याऊ

छान सुरु आहे सिरिज