जन्मांतरीचे प्रेम

शुभांगी दिक्षीत's picture
शुभांगी दिक्षीत in जनातलं, मनातलं
2 Nov 2019 - 3:14 am

आज बँकमध्ये खुप गर्दी होती. महीन्यातला शेवटचा आठवडा असला की गर्दी ठरलेलीच. मिताली विंडोवर बसून आपलं काम करत होती. स्लिपवर लिहलेली रक्कम मोजून समोरच्या ग्राहकांना देणं आणि घेणं मोठं जोखमीचं काम. म्हणजेच विड्रॉवल आणि डिपॉझिट दोन्ही मितालीकडेच होतं. त्यामुळे मान वर करून इकडे तिकडे बघणं अशक्य. दोन नंतर जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा मिताली लंचसाठी गेली. आल्यावर काम होतंच. चारला बँक बंद होत असे.

आज लंच करून आल्यावर ती कॅश मोजत होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्या विंडोवर आलं. "बसा" तिने वर न बघताच सांगितलं तेव्हा ती व्यक्ती चेअर घेऊन बसली. कॅश मोजून झाल्यानंतर. ती त्या व्यक्तीला म्हणाली, "बोला". जेव्हा तिने पाहीलं की ती व्यक्ती दुसरी कोणी नसून संदिप आहे. तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. "संदिप तू इथे?"
"मिताली तू इथे कशी. तू तर विरारच्या ब्रांचला होतीस ना?"
"अरे ट्रान्स्फर झालं माझं इथे. म्हणून. बरं बोला साहेब काय सेवा करू शकतो आम्ही आपली??" असं म्हणत मिताली हसली.
"सेवा बिवा काही नाही. फक्त डिपॉझिट करायचे आहेत."
"अच्छा. तू कसा इथे पण??"
"इथे जवळच फ्लॅट घेतला आहे. त्यामुळे ब्रांच पण बदलली."
"ओके. ही घे रीसीट. झालं काम."
"म्हणजे आता मी निघायचं. असंच ना?"
"हो. पण तुला थांबायचं असेल तर थांब. मी निघेन आता थोड्यावेळाने."
"बरं."
'नाकारावच्या रागाचं औषध कधी मिळणार माहीत नाही' मिताली पुटपुटली.
"काही म्हणालीस का?" संदिपने वळून विचारलं
"नाही काही नाही." मिताली हसून म्हणाली.

मिताली बँकेतून बाहेर आली तेव्हा संदिप कोठे दिसला नाही. 'गेला असेल बहुतेक. रागवून. जाऊ दे.' मिताली निघून गेली. आता रोजचंच होऊन गेलं संदिपची वाट बघणं. तो तर येतही नव्हता आणि कधी पैसे विड्रॉ केल्याचं अकाऊंटवरून दिसलं नाही. कॉलेजमध्ये असताना किती बोलायचा तो. आपल्यालाच गप्प बसावं लागायचं आणि आता सगळं बदललं होतं पण राग तसाच होता नाकावर अगदी. एक दिवस तो आला. साडेतीनच्या आसपास. जाताना 'बाहेर थांबतो.' असं म्हणाला. मिताली 'बरं' म्हणाली. तिला माहीत होतं हा काही थांबणार नाही निघून जाईल. बाहेर आल्यावर जेव्हा तिने पाहिलं तेव्हा एका बाईकजवळ थांबला होता. कॉलेजमध्ये तो सायकलवर यायचा. आज बाईक. ती पण बुलेट. तिची पंसती अजून लक्षात होती का त्याच्या??
"संद्या मला तर बुलेट जाम आवडते. काय दिसते ती??"
"हो पण एकदा बिघडली की हत्ती इतकी जड असते ती हलता हलत नाही."
"असू दे. तु कधी बाईक घेतलीस तर तीच घे."
"आणि बिघडली तर? तू ये ढकलायला मग"
" तु आहेस की काळजी घेशील मग कशी बिघडेल?" कॉलेजच्या कट्ट्यावर बसून केलेला संवाद तिला आठवत होता.
"मिताली, आता इथेच थांबणारेस की येणारेस." संदिप तिला समोर येऊन विचारत होता.
"ती बाईक तुझी आहे?"
"हो. का? काय झालं?"
" कॉलेजमधलं आठवलं बोलणं आपलं."
"माझ्याही राहतं लक्षात सगळं."

आज मिताली संदिपच्या बाईकवरून घरी आली. म्हणून तिला उशीर नाही झाला. नंतर त्यांच्या भेटी थोड्या वाढल्या. नंबर्स एक्सचेंज झाले. चॅटींग होत असे कधीतरी. एकदा कॉफी शॉपमध्ये निवांत बसले होते दोघं. तेव्हा तिने विचारलं,
"लग्न केलंस??"
"हो म्हणून तुला बाईकवर सोडतो ना घरी आणि इथेही बसलोय आपण."
"इतका कसला राग येतो तुला??"
"मग प्रश्नच तसा आहे तुझा. माझं ठरलं आहे जिच्यावर प्रेम करेन तिच्याशीच लग्न करेन."
"मग भेटली का ती??"
"हो पण मी तिला आवडत नाही."
"ओ. सॉरी."
'इतके क्ल्यू देऊनही हीला काहीच कसं कळत नाही.' संदिप पुटपुटला.
"काही म्हणालास का तू?"
"नाही अजिबातच नाही."
"चल निघूया आता?"
आजही संदिप जेव्हा मितालीला बाईकवर सोडलं आणि परत निघाला तेव्हा सुबोध दादा, मितालीचा मोठा भाऊ त्याने बघितलं दोघांना.

पुढचा एक महीना संदिप मितालीला भेटला नाही. तिने मेसेज केला तर कामात आहे असं म्हणून टाळायचा. मेसेज बोलणं भेटणं बंद झालं. एक दिवस घरी आल्यावर दादा म्हणाला, "मिताली उद्या हाफ डे घ्यायचा आहे तुला. पाहुणे येणार आहेत पहायला."
"अरे पण दादा माझा लग्नाचा विचारच नाही. मला लग्न करायचंच नाहीए. मी सांगितलं होतं तुला आधीच. असं का केलंस तू न विचारता??" मिताली रडवेली झाली.
"मितू, बस हा तुझं. तुला लगेच लग्न कर असं नाही सांगत. फक्त पहायला येणार आहेत. पसंती आणि पत्रिका जुळली तरच लग्न."

पाहुणे पहायला येणार म्हणून मिताली तयार होत होती. ती कॉलेजमध्ये असताना तिच्या आईवडीलांना अपघात झाला होता. त्यादोघांनंतर सुबोधने मितालीला जिवापाड सांभाळलं होतं. पाहुणे आले तेव्हा दादानेच त्यांना पाणी नेऊन दिलं. चहा पोहे घेऊन येण्यासाठी मितालीला हाक मारली. मिताली ट्रे घेऊन बाहेर आली. तेव्हा एक थोडीशी वयस्कर बाई आणि एक मुलगा होता. जेव्हा ती चहा द्यायला गेली मुलाकडे पाहून तिला खुपच आश्चर्य वाटलं. संदिप होता तो. आणि संदिप आईला घेऊन तिला पहायला आला होता.
"संदिप पसंत आहे का मुलगी?" आईने विचारलं
"हो आई कधीपासूनच पसंत आहे."
मिताली लाजून आत पळून गेली. पडद्याआड उभं राहून दादाचं आणि संदिपचं बोलणं ऐकत होती.
"थँक्स दादा. खरंच तू जर बोलला नसतास तर माझ्याशी तर मितालीच्या मनात काय आहे ते मला कळलंच नसतं. तिने मला कधी कळूही दिलं नाही की तिचं माझ्यावर प्रेम आहे ते."
"थँक्स काय त्यात. तिला बघायचो मी लपून रडायची ती. पण दाखवलं नाही तिने. तु बर्थडेला फ्रेंडशिप डेला दिलेले गिफ्ट्स जपून ठेवलेत तिनं. कॉलेजचे फोटो बघत असायची."
मितालीला खुप रडू आलं. दादाने मनातलं न सांगता ओळखलं आणि संदिप त्याला तर माहीत होतं. तरीही आपण दुखावू नये म्हणून सांगितलं नाही त्याने.
मितालीचं आणि संदिपचं लग्न झालं.

आज वटपौर्णिमा होती. लग्नानंतरचा पहिला सण. पुजा करून आल्यावर संदिपने विचारलंस,
"काय मागितलंस आज?"
"पुढचे अनेक जन्म मला संदिपच नवरा म्हणून मिळू दे. आणि.."
"आणि काय?..."
"आणि त्याने जरा लवकर लग्नासाठी विचारू दे. खुप वाट बघितली आहे मी त्याची."
"हो पण तु ही तयार असली पाहिजेस तेव्हा."
मिताली आणि संदिप दोघंही हसले.

कथालेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

2 Nov 2019 - 4:10 am | जॉनविक्क

अजून येऊदे

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 5:13 pm | श्वेता२४

आवडली

तुषार काळभोर's picture

2 Nov 2019 - 10:14 pm | तुषार काळभोर

रोचक रोमँटिक रोमांचक