जाणिवांची अंतरे

हजारो ख्वाईशे ऐसी's picture
हजारो ख्वाईशे ऐसी in जनातलं, मनातलं
27 Sep 2019 - 1:11 pm

त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक. बाजारहाटासाठी बाहेर पडल्यावर, बसमध्ये, बॅंकेत, रस्त्याने चालताना, पार्क्समध्ये मुलाला घेऊन गेल्यावर भेटणारे.
आता परवाचीच गोष्ट.
मी बसमध्ये चढले. ड्रायवरला हेय! म्हणून एक स्माईल देऊन माझं बस कार्ड स्वाईप केलं आणि एक जागा पकडून बसले. सकाळची गर्दी सोडली तर बसेसना तशी गर्दी नसते.
बसमध्ये मी धरून एक ७-८ माणसे. पुढच्याच स्टाॅपला तो चढला. त्याच्या लहानग्या मुलीने त्याचं बोट पकडलेलं. माझ्यासारखाच तोही. कुठेतरी दूरदेशी त्याची मायभूमी. कामाकरता इथे आला असेल. माझ्यासारखाच बावरलेला. जरा जास्तच. बहुतेक अगदी अलीकडेच इथे आलेला. ड्रायवरशी बोलून तो आत येतो. मुलीला त्याच्या शेजारी बसायला हवं असतं त्यामुळे तशी जागा शोधतो. माझ्या पुढच्या सीटवर दोघे बसतात. त्याची बछडी चिवचिवाट करत असते. मध्येच बालसुलभ आरडाओरडाही. तो तिला हातानेच हळू म्हणून खूण करतो.
मला मी आठवते. नव्यानेच इथे आलेली. माझ्या पिल्लाची शाळा सुरु होण्यापूर्वीची. त्याने बसमध्ये हळू बोलावं, होता होईतो गप्प बसावं असा केविलवाणा प्रयत्न करणारी. कारण इथे बसमध्ये लोकांच्यात जणू शांत बसण्याची स्पर्धा लागलेली असते. त्यात त्याने दंगा केला तर एकदोन करडे कटाक्ष तुम्हाला झेलावे लागतातच. पण जसं इथं रुळत गेले तसं जाणवलं, हि माणसं स्वतः शांत बसत असली तरी मुलांनी बोलण्यावर त्यांचा आक्षेप नाही. मी माझ्या मुलाला मग बिनधास्त बोलू देते, त्याला पडणाऱ्या अगणित प्रश्नांची उत्तर देते पण हळू आवाजात. आपला कमावलेला भारतीय आवाज जरा खालच्या पट्टीत आणून बोलायला शिकते.
माझ्यापुढे बसलेला तो मागे वळून पाहतो, मागे मी. मीही इथली नाही हे बघून त्याने सोडलेला निश्वास बघून मी त्याला एक छान स्माईल देते. त्याच्या मुलीशी बोलते. त्या दोघांच्या डोळ्यात चमक. जाताना ती छोटी मला बाय म्हणून जाते. एक अंतर मिटतं.

पुढे लेकाला शाळेतून घेऊन येताना आम्हाला दोघांना बसमध्ये एकत्र जागा मिळत नाही. मी एका सीटवर बसते आणि त्याला एका ईथल्या आज्जीशेजारी बसवते. ती आज्जी त्याच्याकडे बघून हसते. बाकी ईथल्या आज्ज्या मात्र ऐंशीच्या असल्या तरी विशीत वावरणाऱ्या. चिरयौवना. नेलपेंट आणि लालचुटुक लिपस्टिक लावून बाजारात जाणाऱ्या.
चिरंजीव शाळेत दमल्यामुळे पाचच मिनिटात झोपून जातात. झोपेत त्याचा तोल जाऊन तो पडू नये म्हणून माझा आटापिटा. मी मागच्या सीटवरून त्याच्या डोक्याला आधार देते, त्याचं डोकं आज्जीच्या खांद्यावर झुकतं. मी सॉरी म्हणताच, आज्जी सरळ त्याला स्वतःच्या खांद्यावर टेकवून म्हणते ठीक आहे गं. दमलाय तो. किती गोड छोकरा आहे तुझा. मी हसते. आणखी एक अंतर मिटतं.

संध्याकाळी मी ग्रोसरी आणायला एशिअन ग्रोसरी स्टोरमध्ये जाते. तिथे खरेदी उरकत आल्यावर एक इथली आई दिसते, तिच्या मुलांना घेऊन आलेली. त्यांना इंडियन स्वीट्स ट्राय करायची असतात. तिच्या चेहऱ्यावर प्रशचिन्ह. काय घेऊ? मी लेकाला लाडू घेत उभी. मला विचारते ती. मग तिथल्या प्रत्येक मिठाईतले घटक आणि त्यांची चव यांची मी तिला माहिती देते. ती मनाजोगती खरेदी करून मला थँक यू म्हणून जाते. उरलेली आणखी काही अंतरं मिटतात. बरीच अंतरं अजून शिल्लक असली तरी मला आतून बरं वाटत असतं. कुठेतरी मी या देशाला आणि या देशाने मला स्वीकारायला सुरुवात केलेली असते.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

उरलेली आणखी काही अंतरं मिटतात. बरीच अंतरं अजून शिल्लक असली तरी मला आतून बरं वाटत असतं. कुठेतरी मी या देशाला आणि या देशाने मला स्वीकारायला सुरुवात केलेली असते.

सु-रे-ख!!!
जॉब बदलतांना, घर बदलतांना, शहरं बदलतांना, आणि अर्थातच देश बदलतांना ही अंतरं किती जाणवतात आणि कधीकधी बोचतातही ना? छान लिहिता आहात, लिहित रहा...

आणि हो, राखावी बहुतांची अंतरे ह्या शुभेच्छा. :-)

यशोधरा's picture

27 Sep 2019 - 1:34 pm | यशोधरा

आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2019 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मुक्तक ! आवडले.

परक्या ठिकाणी आपण जरासा मनमोकळेपणा ठेवून वागले तर बरीच अंतरे मिटतात. क्वचित एखादा आढ्यताखोर अनुभव येतोही, नाही असे नाही... त्याला फाट्यावर मारावे.

पद्मावति's picture

27 Sep 2019 - 1:57 pm | पद्मावति

आवडले. लिहित रहा.

श्वेता२४'s picture

27 Sep 2019 - 3:26 pm | श्वेता२४

लिहीत राहा अजून वाचायला आवडेल

जालिम लोशन's picture

27 Sep 2019 - 4:38 pm | जालिम लोशन

छान

नंदन's picture

27 Sep 2019 - 4:44 pm | नंदन

प्रकटन आवडलं. 'माणूस हा इथूनतिथून सारखाच' हे क्लिशे किंवा भाबडं वाटू शकणारं वाक्य बव्हंशी खरं आहे, हे जाणवून देणारं.

जॉनविक्क's picture

27 Sep 2019 - 6:07 pm | जॉनविक्क

मायमराठी's picture

27 Sep 2019 - 11:30 pm | मायमराठी

एकदम प्रामाणिक लेखन. भाषा, देश परके असतात तेव्हा देहबोली धावून येते. एकमेकांचं एकमेकांना सगळं सांगते. बसमधल्या आजीबाईंची हसरी आश्वासक नजर क्षणात डोळ्यांपुढून चमकून गेली.

समीर वैद्य's picture

28 Sep 2019 - 1:10 am | समीर वैद्य

उत्तम लिहिलं आहे, लिहीत राहा.
कोणत्या देशात आहात?

सुधीर कांदळकर's picture

28 Sep 2019 - 7:14 am | सुधीर कांदळकर

अतिशय तरल जाणिवा आणि प्रांजळ कथन. समर्पक शीर्षक. लेखन् आवडले. धन्यवाद.