युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४०

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
21 Sep 2019 - 11:11 pm

गुरु द्रोणांनी केलेला अपमान आणि अर्जुनाचे बाण द्रुपद राजाचे मन घायाळ करून गेले होते. जखम काही केल्या भरत नव्हती. अर्ध राज्य गेल्याचे जितके दु:ख त्याला नव्हते तितके दु:ख अपमानाचे वाटत होते. त्याने यज्ञकुंडातील लाकडांच्या काटक्यांवर आग पेटवली..... त्याच्या हृदयात आधीपासून लागलेली! आणि अखंड यज्ञ सुरू केला. अग्निच्या ज्वाळा त्याच्या अपमानाइतक्या तिव्र झाल्या.
'याच! अश्याच धगधगत्या ज्वाळांमध्ये द्रोणाला जळताना पाहायचे आहे मला.....'
तहान भूक हरपून द्रुपद यज्ञासमोर बसला होता. त्याला केवळ अपमानाचा बदला हवा होता. वेळ, पद, योग्य-अयोग्य.... कशाचीही पर्वा त्याला नव्हती. ज्वाळा जशा जशा आकाशाकडे झेपावत होत्या, तितकेच प्रतिशोधाचे विचार त्याच्या मनात दृढ होत होते.
...... आणि अग्नीतून एक दिव्य आकृती दिसू लागली.
"बोल द्रुपद, काय हव आहे तुला?"
अग्निचा 'धु-धु' करत आवाज यावा तसा आवाज घुमला. घामाने भिजलेल्या द्रुपदाच्या चेहऱ्यावर विजयी झाल्याचे हास्य उमटले.
"हे अग्निदेवता, मला..... मला प्रतिशोध हवा आहे. माझा अपमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दंड द्यायचा आहे. त्या द्रोणाने सर्वस्व गमावलेल पहायचंय मला. जितका लाचार मी होतो.... तितकाच लाचार तो झाला पाहिजे माझ्यासमोर. आणि त्याला मृत्यू द्यायचाय दान म्हणून. त्या अर्जुनाला अपमान द्यायचाय आयुष्यभर पुरेल इतका!"
"तथास्तु"
आणि त्याचक्षणी अग्नि कुंड्यामधून.... त्या यज्ञातून एक तरुण बाहेर आला. आणि पाठोपाठ एक अत्यंत सुंदर युवती बाहेर आली.
अग्निकुंड आतून आवाज आला..... हा पुत्र द्रोण्यांची हत्या करेल आणि ही कन्या अर्जुनाच्या आयुष्यात अपमानाचे बीजारोपण करेल.
द्रुपद आनंदाने नमस्कार केला.
"हे द्रुपद, मी तुझी इच्छा पूर्ण केली खरं. परंतु प्रतिशोध अत्यंत हीन भावना आहे. त्यामुळे द्रोणांचा वध केवळ तेव्हाच होईल जेव्हा ते अधर्म करतील किंवा अधर्मी बाजूने उभे राहतील."
अग्निदेवता ज्वालांमध्ये लुप्त झाली.
द्रुपदच्या आनंदावर शंकांच विर्जन पडलं....
'द्रोण धर्माचरण सोडेल? कसं शक्य आहे! जितकं मी त्याला ओळखतो, तो अधर्म करणार नाही. मग?? पण अग्निदेवतेचा आशीर्वाद! तो असफल नाही होणार!
पण ही कन्या? ही कन्या अर्जुनाच्या आयुष्यात प्रवेश करणार कशी?'
__________
एकचक्र नगर......
रडण्याचा आवाज ऐकून कुंती लहानश्या कक्षातून बाहेर आली.
" रडू नकोस तू रडू नकोस ग..... गावातल्या प्रत्येकानच केलंय ना हे मान्य."
"मग मी जाईन. तुम्ही नका जाऊ."
"नाही, मी जाणार." त्यांचा लहान मुलगा म्हणाला.
"नाही. कोणी काहीही बोलू नका. मी सर्वात ज्येष्ठ आहे आणि हे माझं कर्तव्य आहे. ते मी च पार पाडेन."
'नक्की काय चालू आहे....' कुंतीला कळेना.
"क्षमा असावी महोदय पण एक विचारू?"
त्याने डोळे पुसले.
"बोला ना..."
"कुठे जाण्या विषयी बोलत आहात तुम्ही? "
"टेकडीवर."
"कश्याकरता पण?"
"हे आमच्या गावाचं दुर्दैव आहे..... की इथल्या कुटुंबांतून दर सप्ताहाला एक माणूस तरी बळी द्यावा लागतो.'
"बळी? कशासाठी?"
"सगळ्यांना शांततेत राहता यावं म्हणून. निदान ठराविक काळासाठी अभय मिळाव म्हणून."
"मला समजलं नाही."
"या नगरीत..... एक... एक राक्षस आहे." डोळे पुसत ब्राह्मणाची पत्नी म्हणाली.
"राक्षस?" कुंतीचा चेहरा चिंताग्रस्त झाला.
"हो.... त्यांनी आमच्या गावात येऊन दिसेल त्याला खायला सुरुवात केली. सगळे खूप घाबरले. घराच्या बाहेर पडण्याची भीती वाटू लागली. काय माहित रस्त्यात बकासुर उचलेल आणि पुन्हा घरी येता येणार नाही....
म्हणून आम्ही करार केला. प्रत्येक सप्ताहाला एक व्यक्ती आणि भरपूर..... अगदी गाडाभर अन्न पाठवून देऊ. पण आम्हाला जगू देत. नाहीतर हे गावच अस्तित्वात राहणार नाही."
'भयंकर आहे हे सर्व!' ऐकता ऐकता कुंतीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.... "हे एवढं सगळं सहन करत आहात तुम्ही ?"
ब्राह्मणानी दुःखी चेहऱ्याने होकारार्थी मान हलवली. "तो तर गाडा ओढणाऱ्या बैलांनाही.... काहीच बाकी उरत नाही. कुणीच परत येत नाही." ब्राहम्ण पत्नीने हुंदका दाबला.
कुंती हादरली.
"आमच्या गावातल्या प्रत्येकाने क्रमानुसार कुटुंबातील एक पाठवायला सुरुवात केली. आणि...... आणि आज आमच्या कुटुंबाची वेळ आहे."

कुंती विचारात पडली. 'काहीतरी करायला हवे. आज याच लोकांमुळे आपल्याला राहायला जागा मिळाली.... नाहीतर सुरक्षित जागा म्हणून आपण कुठे राहणार होतो? हस्तिनापुरात? पंडूपरिवार नको म्हणून ज्यांनी..... ' कुंतीला लाक्षागृहा ची आठवण झाली. तिचे डोळे भरून आले. आपल्या परिवाराच्या जीवावर आलेला संकट हे किती वेदनादायी असते हे ती सोडून अजून कोणाला माहित असणार होत?
कुंती ठामपणे म्हणाली.... "काही गरज नाही कोणाला कुठे जायची. या परिवाराच्यावतीने धान्य घेऊन माझा पुत्र जाईल."
ब्राह्मण परिवार दचकून तिच्याकडे पाहू लागला.
"हे काय बोलत आहात तुम्ही ? आमचे अतिथी आहात तुम्ही सगळे. तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे आमची."
"आणि अतिथीच्या शब्दाचा मान ठेवणे? ती ही जबाबदारीच आहे तुमची."
"पण आम्ही तुम्हाला संकटात टाकू इच्छित नाही." ब्राह्मण हात जोडून म्हणाला.
कुंतीने नुसतेच स्मित हास्य केले. आता यांना भिमाच्या ताकदीबद्दल समजावलं तर आपलं गुपित उघडे पडण्याची भीती!
लाक्षागृहानंतर ताक सुद्धा फुंकून प्यावे लागणार होते!
"काळजी करू नका. मला पाच पुत्र आहेत. तुम्हाला मात्र एकच आहे. ना तो तुमच्या शिवाय राहू शकतो आणि ना तुम्ही त्याच्याशिवाय. "
त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. एक माता आपल्या पुत्र्याचं बलिदान आपल्या करता देते आहे? कुणी काही बोलणार तोवर कुंती म्हणाली, "हा माझा निर्णय आहे."

__________________
भीम बैलगाडी सोबत टेकडी च्या पायथ्या पर्यंत पोहोचला. टेकाडावर शुकशुकाट होता. भीमाने फिरून पाय मोकळे केले. एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर.... कितीतरी वेळ अशीच वाट पाहत उभा होता. बकासुर काही आला नव्हता. एकीकडे भीमाची न्याहारी सुद्धा झाली नव्हती. दुसरीकडे बैलगाड्यांवर लादलेले सुग्रास अन्न भीमाला सुवासी संकेत देत वारंवार खुणावत होते.
पोटातील कावळ्यांनी वेगळ्याच तारसप्तकातला सूर लावला होता. शेवटी भीमानी सगळी भांडी बैलगाडीतून काढून स्वतः समोर ठेवली. एक-एक भांडे उघडून त्याचे मोठाले घास तोंडात घालू लागला. उदर शांत होणे महत्त्वाचे! एकदम जमीन हादरल्या सारखी झाली. भीम जेवणात व्यस्त होता.
भीमाच्या पाठीवर जोरजोरात गुद्दे घालत कुणीतरी त्याची पाठ रगडू लागला. आहाहा! अजून काय हवं? भीम जबरदस्त आनंदी झाला. इतके सुग्रास भोजन आणि वर अशी सेवा! उत्तम. महालातल्या सेवकांना काही जमत नाही. सगळे एकजात नाजूक! हा बघा किती छान पाठ दाबून देतो!
"छान! अशीच चेपून दे पाठ. थोडे मधल्या बाजूला डावीकडे आणि वरच्या बाजूला अर्धगोलाकार पण चेप जरा जोर लावून." मागे न बघता भीम अन्नाचे घास घेत म्हणाला. भात, भाजी, वडे, पोळ्या....... 'किती सुंदर जेवण बनवत नै हे ब्राह्मण कुटुंब!' तो अजूनही जागच्या जागी बसून शेवटचे काही उरलेले घास संपवत होता. इकडे त्याच्या बलदंड बाहूंवरती गुद्दे घालत बकासूर वैतागून गेला होता. भीमाने त्याचं जवळ जवळ सगळं अन्न संपवलं होतं. बैल शिल्लक होते केवळ! बकासुराने शेजारचे झाड उपटले आणि भीमाच्या पाठीवर आपटायला सुरवात केली. भीमाने शेवटचा घास संपवला आणि बकासुराच्या हातून झाड काढून घेत स्वतःच्या पाठीवर घासून बाजूला फेकलं. "चेपून छान दिलीस पण तुला नीट खाजवून देता येत नाही पाठ."
बकासुर भयानक चिडला होता. आपले प्रहार सहन करून कोणी जिवंत राहूच कसा शकतो, याचे राहून-राहून आश्चर्य वाटतं होते त्याला.
भीमने वळून पाहिले तर समोर चिडून लाल झालेल्या चेहऱ्याचा भला मोठा बकासुर उभा!
'हाच तो?' भीमाने त्याच्याकडे निरखून पाहिले. बकासुराने रागाने भीमाच्या छातीवर जाडजूड हात आदळले तेव्हा त्याला किंचितही कल्पना नव्हती की हे त्याने नकळतपणे स्वतःच्या मृत्यूला दिलेले आवाहन आहे.
आपल्याहून अर्ध्या अंगाच्या मानवाने आपल्याला अधांतरी उचलून वाऱ्याच्या वेगाने जमिनीवर आदळावे आणि दिवसाढवळ्या डोळ्यांसमोर काजवे दिसू लागावेत हे सगळं त्याला शक्यच वाटत नव्हत. इतक्या दिवसांचा गदाप्रहाराचा सराव! बकासुराला आता ब्रह्मांडातले तारे दिसू लागले होते. शरीराचे किती अवयव कुठे कुठे दुखत आहेत हे कळण्याआधीच नवीन जागी लागलेला मार त्याला विव्हळायला लावत होता. भीम बकासुरावर हात साफ करत असताना हे विचित्र आवाज ऐकून सारी एकचक्रानगरी तिथे जमली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. भीमाने पुन्हा एकदा उचलून त्याला आपटला आणि त्याची हालचाल थांबली.
सगळ्यांनी एकच जल्लोष केला. ब्राह्मण कुटुंब आनंदाने भीमाकडे पाहत होते. कुंतीला पाहून ब्राहमणाने नमस्कार केला. "देवी.... तुम्ही आणि तुमच्या पुत्राने वाचवलं आम्हा सगळ्यांना. तुम्ही खरचं देवासारखे आहात."
गावकऱ्यांना काय सांगणार होती ती? हे देवांचाच मंत्रप्रसाद आहेत म्हणून? कुंती भीमाकडे पाहून स्मित करत होती. भीमाने मस्त ढेकर दिली आणि इकडे तिकडे बघून जांभई देत कुंती जवळ आला.
"माताश्री...."
"झोप आली असणारं...." अर्जुन खोडसाळपणे म्हणाला आणि पुटपुटला....'कुंभकर्ण'
"ए.... काय म्हणालास?" भीमाने चिडून विचारले.
"भीम, उत्तम काम केले आहेस." युधिष्ठिर मधे पडला.
"हो, मग काय? सगळं अन्न संपवलंय भ्राताश्रींनी!" पुन्हा अर्जुन बोललाच.
"अर्जुना, शांत रहा बरे. तो तुझा जेष्ठ भ्राता आहे." कुंती म्हणाली आणि ब्राह्मण कुटुंबाकडे बघत म्हणाली, "महोदय, तुम्ही आम्हाला आसरा दिलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. आता आम्ही प्रस्थान करू इच्छितो."
"पण देवी, तुम्ही का जाता आहात? काही चूक झाली का आमच्या कडून आदरातिथ्यात?" त्या ब्राह्मणाने हात जोडत विचारले.
"नाही, नाही. असा विचारही करू नका. पण आम्हाला जावे लागेल."

_________________
"अनुज? आज प्रसन्न दिसतो आहेस. काय झाले?"
"तुम्ही वार्ता ऐकलीत दाऊ?"
बलरामने नुसतेच कृष्णाकडे पाहिले.
"काय झालं दाऊ? असे का पाहता आहात?"
"मला तुझ्या बाकीच्या कुठल्याच गोष्टींचा तर्क लागत नसला ना, तरी मला एक गोष्ट मात्र पक्की कळली आहे."
"हो? ती कोणती?"
"हेच, की मला कळलेल्या वार्ता तुला आधी पासूनच कळलेल्या असतात. आणि तू जेव्हा हा प्रश्न विचारतोस ना तेव्हा तुझ्याकडे नक्की काहीतरी नविन ताजा वृतांत असतो."
कृष्ण हसला.
"आता सांगणार आहेस की....."
"दाऊ, बकासुराचा वध झाला आहे."
"बरं..... म्हणून आनंदी आहेस होय?"
"दाऊ, खरी आनंदाची गोष्ट पुढे आहे..... मी ऐकलंय की एका भक्कम शरीरबांधा असणाऱ्या जाडजुड आणि उंचपुऱ्या व्यक्तीने त्याला मारलंय, तेही केवळ शारीरिक बळाच्या जोरावर."
"वध करणाऱ्याचे वर्णन ऐकून आनंद होण्यासारखे काय आहे?"
"दाऊ, तो एक मानव होता. त्याने एकट्यानेच त्याच्यापेक्षा विशालकाय असूराला मारले साऱ्या नगरी देखत."
"आला मुद्दा लक्षात."
"काय?"
"हेच की त्याने एकट्यानेच मारले. कोणी असुराला मारायला त्याला मदत केली नाही. मला कळत नाही, बाकी सगळे काय करत होते? नुसते बघ्याची भूमिका घेऊन उभे होते?"
कृष्ण गालात हसला.
"आणि मला वाटते आहे की तू जरा बाकीच्या वार्ता सोडून जरा आपल्यावरच्या संकटाचा उपाय शोध."
"दाऊ..."
"अनुज, जरासंधावर तू मला माझी दैवी शक्ती वापरू देत नाहीस. तू स्वतः त्याचा वध करत नाहीस. का तर म्हणे, तो सामान्य मनुष्य नाही. बरं, हे ही मान्य आहे. मग दुसरा काही उपाय तर दे. तुला माहिती असेलच त्याने यावेळी अजून....."
"......अजून २ राजांचे बळी घेतलेत."
"आणि माहिती असूनही आपण बकासुरवधाचे गोडवे गात बसला आहात, द्वारकाधिश!" बलराम चिडला होता. कृष्णानी हातात घेतलेली बासरी बलरामाने काढून घेतली.
"हे बघ अनुज, आज तुझ्या बासरीने मी शांत होणार नाही. आज सांगावंच लागेल तुला."
"काय सांगू दाऊ?"
"हेच की जरासंधाचे काय करायचे आहे? कधी थांबवणारेस निरपराध राजांचे बळी?"
"दाऊ, मी ही इतका वेळ याच विषयावर बोलत होतो."
"काय? काहीही काय? मी नीट ऐकत होते. तू जरासंधाचे नावही काढले नाहीस."
"दाऊ, नाव तर मी बकासुराचा वध करणाऱ्याचेही घेतले नाही!"
"तु कायम असं रहस्यमयी का बोलतोस? एकेका वाक्याचे कैक अर्थ निघतात."
"मी सरळ सरळच बोलतो दाऊ. वेगवेगळे अर्थ तर ऐकणारा लावतो त्याच्या मतानुसार."
"जाऊ दे..... तुला असं काही विचारलं की तु जास्त गोंधळ वाढवून ठेवतोस."
कृष्ण हसला.
"मला सांग, या बकासूर वध विषयाचा जरासंधाशी काय संबंध?"
"दाऊ, ज्याने बकासुराला मारले, त्याच्या करता एका मानवाला मारणे काय अवघड आहे?"
"म्हणजे? हा.... बकासुराचा वध करणारा..... जरासंधाचा वध करणार?"
कृष्णाने होकारार्थी मान हलवली. "आता तरी बासरी परत द्या दाऊ."
"नाही. नाव सांग आधी त्या असुराला मारणाऱ्या व्यक्तीचं."
"तुमचा विश्वास बसेल दाऊ?"
"तू म्हणालासं तर या वरही विश्वास ठेवेन की तो एक पांडव होता."
"ओळखलत की तुम्ही!" कृष्णाने हसून हात पुढे केला. बलरामाने त्याच्या हातात बासरी ठेवली.
"खरचं, अनुज? पण मी तर ऐकलं की ते परत कुठेच दिसले नाहीत. हस्तिनापुरीही परतले नाहीत. माझ्या अंदाजानुसार, पांडव आणि कुंती आत्या लाक्षागृहातच...."
कृष्णाच्या बासरीचे सूर कक्षेत पसरले. निशब्द करणारे सूर आणि कृष्णाची शांत मुद्रा! बलराम बासरीचे सुर ऐकण्यात गुंग झाला.
__________________

"माताश्री, एक प्रश्न विचारू?"
"बोल ना, अर्जुन."
"आपण का आलो निघून या कुटीत?"
" 'का' म्हणजे?"
"म्हणजे तिकडे चांगलं वातावरण होतं, वेळेवर भोजन मिळत होतं आणि त्यांना काही त्रासही नव्हता आपण तिथे असण्याचा."
"खरं आहे, अर्जुन."
"मग आपण का आलो इथे मातोश्री? इथे तर भिक्षा मागून...." अर्जुन एकदम गप्प बसला. चेहऱ्यावरून त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती.
"अर्जुन, ओळख लपवून कसं राहता येईल, तुमचे शौर्य आणि शक्ती सर्वांनी पाहिल्यावर?"
"मग निदान काही काम करून उदरनिर्वाह का नाही करत आपण?"
कुंती शांत राहिली.
"सांगा ना माताश्री. भिक्षा मागून मिळणाऱ्या मुठभर अन्नाने आपण तृप्त होऊ सुद्धा. पण...."
"पण काय अर्जुना?"
"भ्राताश्री भीमांचे काय?"
"अर्जुन?" कुंतीने अर्जुनाच्या डोळ्यात पाहिले. तो हळवा झाला होता.
"मला वाटलं तूं खोडसाळपणे म्हणतो आहेस. परत त्याला कुंभकर्ण वगैरे म्हणशील! पण तू तर....."
"माताश्री, मला स्मरण आहे. विदुर काकाश्रींनी सांगितले होते लपून राहायला. पण म्हणून आपण असे...."
"अर्जुन, आपण कोणाच्या पदरी काम केले तर ओळख लपवता येणार नाही. काही दिवस अजून सहन कर. आपण लवकरच जाऊ परत हस्तिनापुरात."
"माताश्री, पण लपून राहायची काय गरज? आपण आता लांब आहोत हस्तिनापुरापासून. आपण आपले नविन सदन इथे बनवू नव्याने. शेती करू पिताश्रींप्रमाणे. आणि...."
"आणि?" अर्जुनाच्या स्वप्नाळू डोळ्यांत पाहत कुंतीने विचारले.
"आणि पितामहंना बोलावून घेऊ इथे. विदुर काकांना पण सांगू की इथे या!"
"अर्जुन, तुला वाटतं ते हस्तिनापुर सोडून इथे येतील?"
"का नाही, माताश्री? ते खूप प्रेम करतात माझ्यावर. नक्की येतील."
अर्जुनच्या डोक्यावर हात फिरवत तिने स्मित केले.
"अर्जुन, तुम्ही पाचजण मिळून कुठेही उत्तम निवास करू शकता. एक सदनच काय पण संपूर्ण नगरी स्थापित करू शकता. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला. पण विदुर जन्माने आणि तातश्री प्रतिज्ञेने बांधले गेले आहेत हस्तिनापुराशी. इच्छा असेल तरी ते नाही येणार."
अर्जुनच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. कुंतीने त्याच्या गालाला हात लावला. " ....आणि आपणही हस्तिनापुराचा एक हिस्सा आहोतच ना? एक अतूट हिस्सा! आपण सुद्धा हस्तिनापुरापासून दूर नाही राहू शकत जास्त काळ. परत जावेच लागेल."
कुंती ने उत्तर देऊन विषय सांपवला खरा, पण मनातले विचारांचे वादळ मात्र तिला अस्वस्थ करून सोडत होते.
'काय सांगू तुला, अर्जुन? माझ्याही मनाला नाही पटत हे. कुटीत तर मी आर्य आणि माद्री सोबतही होते, अर्जुना. वनात वास केलाय मी आधीही. या दगड-मातीची, कष्टांची सवय आहे मला. खरतरं तुम्हालाही आहे पुत्रांनो लहानपणापासून. पण या वेळी.... कारण वेगळे आहे.
तातश्री भीष्मही अर्जुनाच्या आठवणींनी अस्वस्थ असणार तिकडे. इकडे अर्जुनही नाराज! मोठ्यांच्या आशिर्वादाशिवाय, त्यांच्या छत्राशिवाय असे पुत्रांना घेऊन त्यांच्यापासून लांब राहायचे. ओळख लपवून वेषांतर करायचे.... संरक्षणाकरता! आणि संरक्षण कोणापासून? तर आपल्याच नातेवाईकांपासून?
तसं विदुर खोटे बोलत नाही. पण दुर्योधन या थराला जाऊ शकतो, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. गांधारी पुत्र आपल्या बंधु-परिवाराबद्दल इतका द्वेष करू शकतो? पण का?
खरचं? खरचं, मुगुटाची किंमत आपल्याच नातेवाईकांचे शव असू शकते एखाद्याकरता?'
_____________

©मधुरा

#युगांतर_आरंभ_अंताचा

धर्मलेख