तंबोरा' एक जीवलग - ३

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
31 Aug 2019 - 3:51 pm

मागच्या लेखात उल्लेख केलेली हकीकत आधी सांगते. महाराष्ट्रातलं एक गाव होतं. तिथं रामनवमीचा उत्सव असायचा. म्हणजे अजूनही असेल. पण ही हकीकत अंदाजे चाळीस वर्षा पूर्वीची. तिथं उत्सवात दरवर्षी आई गायची. दरवर्षी न चुकता गाण्याला बोलवायचेच ते लोक. उत्सवाच्या दोन महिने आधी त्यांचं पत्र यायच.

आई गेली त्या नंतरच्या वर्षी सुद्धा त्यांचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं. "गेल्या वर्षा पर्यंत बाई गात होत्या. चिक्कार वर्ष सेवा घडली त्यांच्याकडून. खर तर त्या गेल्याला अजून वर्ष झालेलं नाही. पण ही परंपरा सोडू नका. बाईंच्या ऐवजी तुम्ही गाणं करा."

त्यांचं म्हणण खरं होतं. ती लोकंही सज्जन होती. कित्ती तरी वर्ष आई गात असे आणि मी साथीला असे. साथीदारही तिथलेच स्थानिक असायचे. पेटीला बागुल मास्तर असत आणि तबल्याला मानकर म्हणून एक होते. साथीदार आपले घेऊन जायचं वगैरे असं काही नसायचं. योग्य मानधनही ते देत असत. आई असतानाच मी स्वतंत्र गायला सुरुवात केलेली होती. मी नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं. शिवाय देवाचं काम. "मी येते" असं मी त्यांना पत्र घातलं.

रात्रीच्या गाडीनं मुंबईहून मी निघाले. स्टेशनवर घ्यायला ते लोक येत तसे ते आले होते. गाणं रात्रीचं होतं. दिवसा उतरल्या ठिकाणी जेवण आराम वगैरे झालं. सगळ्यांनाच आईची आठवण येत होती. रात्री मी गायला बसले. यमन घेतला गायला. तंबोरा लावायला घेतला. आजिबात लागेना. कधी दोन श्रुती वर तर कधी दोन श्रुती खाली लागायचा स्वर. मला दडपण आलं. " काय म्हणतील हे लोक? आईची आणि माझी तुलना करत असतील का मनात? किंवा बाईंचं गाणं ते बाईंचंच. ही अजून कच्ची दिसते आहे" असं म्हणतील मला!

खरं म्हणजे आई असताना देखील तंबोरे मीच लावत असे. ऐकून आई लागलेले स्वर बरोबर लागले एवढच खुणेनं सांगायची. अर्थात ते बरोबर लागलेले असायचे. आणि आता हे असं का होतय हे कळेना. मी देवाचं स्मरण केलं. दोन्ही खां साहेबांना मनोमन नमस्कार केला. गाणं सुरू करायला वेळ होऊ लागला. श्रोत्यांमध्ये चुळबुळ वाढायला लागली. तिथल्या मुख्यस्थांनी येऊन विचारलं की काही हवं आहे का? "काही नको" मी खिन्न हसत म्हणाले.

मग वीज चमकावी तसा मनात विचार आला. गेल्यावर्षीपर्यंत इथं आई बसायची. मी मागे तंबोर्‍यावर. आज ती इथं नाही. तिच्या जागी मी बसले आहे. तिचीच साडी नेसले आहे. मग मी तिला नमस्कार केला आणि मनात म्हटलं "आई, हा तंबोरा लागत नाही. तू इथंच कुठंतरी आजूबाजूला असशील तर हा तंबोरा लागूदेत. तू मला आशिर्वाद दे. तुझं नांव खराब होईल असं गाणं, वागणं मी करणार नाही." असं म्हणून मी तंबोर्‍याच्या मण्यांना स्पर्श केला मात्र, काय आश्चर्य! त्या क्षणी तंबोरा लागला. अत्यंत सुरेल षड्ज ऐकू येऊ लागले. स्वरांची वलयं गुंजायला लागली. झालेला बदल श्रोत्यांच्याही लक्षात आला. मी श्रोत्यांना नमस्कार केला. त्यांना सांगीतलं की हा तंबोरा लागत नव्हता. आईचं स्मरण केलं आणि हा तंबोरा लागला. ती इथंच आहे. आईच्या आठवणीनं त्यांनाही भरून आलं आणि मी निषाद लावला. गाणं सुरू केलं. पुढे तीन साडेतीन तास मी गायले. आई म्हणायची ती भजनंही शेवटी म्हटली. मैफिल जिंकली.

मी गात होते तोपर्यंत दरवर्षी या ठिकाणी मी गायले. एखाद दोन वर्ष अपवाद असेल. प्रत्येक वेळी आईची आठवण करून सुरवात केली. तंबोरा लागत नाही असं कधीच घडलं नाही. आता वाटतं त्या कार्यक्रमात आई अदॄष्य रुपाने खरंच असेल का जवळपास? की तिचं मन त्या मैफिलीत अडकलं होत? की तिला माझ्याकडून आश्वासन हवं होतं? या जाणिवेच्या पल्याडच्या गोष्टी. विश्वास ठेऊ नये म्हटलं तर असं का झालं मग? माझाच अनुभव असल्यामुळे सांगोवांगीची गोष्ट नव्हे. विश्वास ठेवावाच लागतो अशा वेळी. तर्कशुद्ध कारण मिळत नाही.

मग आईने सांगितलेली मालकंसाची गोष्ट. खां साहेबांच्याकडून ऐकलेल्या अनेक गोष्टी. कितीतरी गायक गायकांनी त्यांचे मला सांगितलेले अनुभव खरेच असतील. या सार्‍यावर विश्वास ठेवावाच लागतो. दिवंगत व्यक्तीचा तंबोरा वापरू नये. आठवण म्हणून ठेवावा असे काही कलाकार मानतात. पण मी ते मानत नाही. त्या तंबोर्‍याच्या रुपाने ती व्यक्तिच जवळ असते असा माझा विश्वास आहे. आजही आईचा तंबोरा हाताळताना मला तिचा स्पर्श जाणवतो. तिच्यामागे माझे आयुष्य जगताना तिच्या आयुष्यात तिनं सोसलेल्या गोष्टी त्या वरून स्पष्टपणे कळतात. तिची आग्रही मतं जाचक वाटत असली तरी त्याची तर्कसंगती आता कळते. म्हणूनच मी तिची जोडी वापरते. मी ती केवळ बैठकीच्या खोलीची शोभा वाढवायला किंवा अडगळीत टाकलेली नाही याचा मला अभिमान वाटतो.

गौरीबाई गोवेकर

कलालेख

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

31 Aug 2019 - 3:59 pm | प्रदीप

व उत्कट लिखाण. संगीताविषयी, साधनेविषयी, व त्यांतून आलेल्या अनुभवांविषयी. कुठेही 'मी, मी, माझे, मला..' नाही.

कृपया असेच लिहीत रहा, गौरीबाई. आम्ही वाचतो आहोत, आनंदतो आहोत.

तमराज किल्विष's picture

31 Aug 2019 - 6:11 pm | तमराज किल्विष

खूप सुंदर. ती मालकंसाची गोष्ट ऐकण्याची उत्कंठा वाढली आहे. कृपया लिहित रहा.

सुबोध खरे's picture

31 Aug 2019 - 6:45 pm | सुबोध खरे

या जाणिवेच्या पल्याडच्या गोष्टी.
अगदी बरोबर.

प्रत्येक गोष्ट आपल्या विचार शक्तीला समजेलच असे नाही. मी कित्येक महान कलाकारांचे गाणे/ वादन ऐकले आहे.
त्यातील रागदारी, ताल काहीही कळत नसता हृदयात ज्या भावना निर्माण होतात आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात त्यांचे वर्णन करणे अशक्य आहे. हे (मी एक डॉक्टर असूनही) कसे ते सांगता येत नाही.

आपल्या आईंचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे म्हणून आपण नादब्रम्हाची इतकी उत्कृष्ट सेवा करू शकलात असेच म्हणावेसे वाटते.

अनिंद्य's picture

31 Aug 2019 - 6:51 pm | अनिंद्य

@ गौरीबाई गोवेकर

मर्मस्पर्शी लिखाण आणि अनुभव _/\_

दुसरा आणि हा तिसरा भाग एकत्रित वाचला. तुमची लेखनशैली मोहक आहे, एखाद्या वडिलधाऱ्याने सहज आठवण सांगावी असे सोपे लिहिता पण उत्कटता पोचते.

पुढेही लिहीत राहा हीच विनंती !

अनिंद्य

पद्मावति's picture

31 Aug 2019 - 6:54 pm | पद्मावति

अप्रतिम लेखन!
आता वाटतं त्या कार्यक्रमात आई अदॄष्य रुपाने खरंच असेल का जवळपास? नक्कीच __/\__

उगा काहितरीच's picture

31 Aug 2019 - 7:34 pm | उगा काहितरीच

खूप छान !
या मालिकेतील इतर लेखाप्रमाणेच हा लेखही खूप छान झाला आहे.

लेखन,प्रसंग एकूणच छान आहे.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

जॉनविक्क's picture

1 Sep 2019 - 12:50 am | जॉनविक्क

अशाच लिहित्या रहा. तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहिलो पण तुमचे लेख वाचतो आहे यातही आनंदच मिळतोय.

सुधीर कांदळकर's picture

1 Sep 2019 - 6:48 am | सुधीर कांदळकर

लेखन आवडले.


मी ती केवळ बैठकीच्या खोलीची शोभा वाढवायला किंवा अडगळीत टाकलेली नाही याचा मला अभिमान वाटतो.

हे आवडले.

आंबट चिंच's picture

1 Sep 2019 - 11:48 am | आंबट चिंच

तिन्ही लेख आत्ताच वाचले. अतिशय उत्कट भावस्पर्शी लिखाण.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Sep 2019 - 2:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा अनुभव देखिल मस्त आहे,
अजून वाचायला आवडेल.
पैजारबुवा,