युगांतर- आरंभ अंताचा भाग ३१

Primary tabs

Madhura Kulkarni's picture
Madhura Kulkarni in जनातलं, मनातलं
15 Aug 2019 - 7:58 pm

आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....

ते ना महालात बदलले ना गुरुकुलात!

आचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो. दुर्योधनाचा घनिष्ट मित्र बनल्यापासून ते दोघे सतत सोबत असायचे.

"बाणाची दिशा आणि धनुष्याची पकड, प्रत्यंचेवरचा ताण योग्य हवा. बाणाची गती ही प्रत्यंचेवरचा ताण ठरवतो. बाणाची दिशा तुमचं लक्ष ठरवते आणि धनुष्याची पकड तुमचा आत्मविश्वास दर्शवते. आज आपण धनुर्विद्येचा सराव करणार आहोत."

"गुरुदेव, आपले लक्ष काय आहे आज?"

"आपले लक्ष त्या पक्षाचा डोळा आहे." द्रोणाचार्य म्हणाले तसे सगळे त्यांनी बोटाने दाखवलेल्या झाडाच्या फांदीवरील लाकडी पक्षाकडे बघू लागले.

"हे कसं जमेल आपल्याला?" "कसं शक्य आहे..." मागे कुजबुज सुरु झाली.

"दुर्योधन, मला सांग, तुला काय दिसते?"

"झाड, पान, फुलं, लाकडी पक्षी, त्याच्या मागचा खरा पक्षी."
"युधिष्ठिर, तू सांग, काय दिसते आहे."

"लाकडी पक्षी....आणि फांदी आणि झाड... आणि गुरुदेव मागचा पक्षी आत्ताच उडला." आपलं काहीतरी सुटत तर नाही ना ते बघत त्याने पुढे सांगितले, "गुरुदेव, आत्ताच सुर्यदेवांना ढगाने झाकलेले आहे."
आपण किती योग्य आणि खरं उत्तर दिलं म्हणून युधिष्ठिराला शांत आणि समाधानी वाटत होतं.
"धन्य आहेस. भीम तुला काय दिसते?"
"गुरुदेव, मला भविष्यातली फळे दिसत आहेत."
"काय?"
"ती बघा गुरुदेव, ती झाडांवरची फुले. डाळिंबाची आहेत. काही वेळात त्याच मस्त डाळींब बनेल." त्याने पोटावर हात फिरवत म्हटले.
"भीम, आपण इथे भोजनाकरता आलेलो नाही."
"क्षमा असावी गुरुदेव."
"अर्जुन, तुला काय दिसते आहे?"
"फक्त डोळा दिसतो आहे गुरुदेव...."
द्रोणाचार्य मनातून आनंदित झाले.
"बाण संधान कर."
अर्जुनाने धनुष्य उचलले, विशिष्ट अंशात पकड घट्ट केली. बाणाच्या एका बाजूला अंगठा तर तर्जनी- मध्यमा दुसऱ्या बाजूला धरून बाण प्रत्यंचेवर नेमत ताणला. ताण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आल्यावर बाणावरचा सगळा ताण एकदम काढून घेतला. साप्प्प....
सर्वजण बघत राहिले. पक्षाच्या बुबुळाला छेदून बाण आरपार घुसला होता. द्रोणाचार्यांनी आनंदाने मान डोलावली.
"धनुर्विद्येत निपुण झाला आहेस तू, अर्जुन. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी. आयुष्यमान भवं!"
भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांनी दिलेले वचन आज त्यांच्या शिष्याने पूर्ण केले होते. अर्जुनला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्यात यशस्वी झालेले द्रोणाचार्य ही वार्ता भीष्माचार्यांना ऐकवायला आतूर झाले होते.
वनातून ते निघणार तितक्यात एक कुत्रा दिसला. द्रोणाचार्य बघतच राहिले. त्याचे तोंड बाणांनी भरलेले होते. आणि आश्चर्य म्हणजे.....ना त्याला कुठे जखम झाली होती आणि ना रक्त आलेले दिसत होते. ते ती अद्वितीय कला स्तब्धपणे बघत उभे राहिले.
'या वनात असा कोण आहे जो इतक्या कुशलतेने बाण चालवू शकतो?' त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली. दूर कुठेतरी कोणीतरी असल्याचा भास झाला. द्रोणाचार्य तिथे गेले. समोर एक त्यांच्या शिष्याच्या वयाचा तरूण उभा होता.
"प्रणाम" त्याने द्रोणाचार्यांना पाहताच पुढे येऊन नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला होता.
"तू कोण आहेस?"
"एकलव्य!"
त्यांना काहीतरी आठवलं...'आपला शिष्य बनण्याची इच्छा घेऊन आलेला लहान वयातला हिरण्यधनूचा पुत्र! शृंगबेर राज्यातला.... आज इतका कुशल धनुर्धारी झाला?'
."तू.... तोच ना?"
"हो."
"त्या श्वानाच्या मुखात बाण तूच मारलेस?"
"हो, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येत होता त्याच्या भुंकण्यामुळे."
"अतिसुंदर! कोण आहेत तुझे गुरु? मला त्यांची भेट घ्यायला आवडेल."
"हे बघा गुरुदेव...." त्याने पुर्वेच्या दिशेने बोट दाखवले. तिथे एक पुतळा होता. तंतोतंत द्रोणाचार्यांसारखा दिसणारा.
"हा तर माझ्या सारखा दिसणारा पुतळा आहे."
"कारण तुम्हीच आहात माझे गुरु."
"काय? पण मी तर तुला शिकवले नाही काहीच. आणि मला आठवतयं, मी तुला नकार दिला होता...."
"हे सांगून की तुम्ही केवळ कौरवांना शिक्षा देण्यास बांधिल आहात आणि मी कौरव नाही." शांत चेहऱ्याने वाक्यपूर्ण करत तो म्हणाला. "आठवते आहे, गुरुदेव."
"मग इथे माझा पुतळा कसा?"
"गुरुदेव, तुम्ही मला शिष्य मानले नाहीत पण माझ्यासाठी तुम्हीच माझे गुरु आहात. या तुमच्या पुतळ्याकडे बघत तुमची प्रेरणा घेऊन मी लक्ष भेद करायला शिकलो गुरुदेव. "
"तू बनवलास हा पुतळा?"
त्याने होकारार्थी मान हालवली.
लांब राहून धनुर्विद्येत पटाईत झालेल्या, न शिकवताही आपल्याला गुरु मानणाऱ्या शिष्याकडे द्रोणाचार्य कौतूकाने बघत होते. आता त्यांच्या डोळ्यात चिंता होती हस्तिनापुरची.... उद्या याने हस्तिनापुर विरूध्द हत्यार उचलले म्हणजे? कानात घोळत होता भीष्माचार्यांना दिलेला शब्द.....! 'अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल.'
....आणि काही क्षणात चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"पण तू हे सगळे केलेस ते गुरुंची आज्ञा आणि अनुमती न घेता?"
"क्षमा असावी गुरुदेव. पण एकदा तुम्हाला गुरु मानल्यावर दुसऱ्या कुणाला गुरु बनवणे पाप होते माझ्यासाठी."
"तू मला खरचं गुरु मानतोस?"
"हो, गुरुदेव." तो हात जोडून उभा होता.
"मग गुरूदक्षिणा देणार नाहीस?"
"का नाही गुरुदेव? सांगा, काय देऊ शकतो हा एकलव्य त्याच्या गुरुंना ज्याने गुरु प्रसन्न होतील?"
त्याचा नम्रपणा, लाघवी बोलणं..... एकीकडे शब्द आणि एकीकडे एकलव्य! शब्दांचं पारडं नेहमीच जड का होते अश्यावेळी? त्यांनी मन कठोर केले.
"उजव्या हाताचा अंगठा."
"जशी आपली आज्ञा...." त्याने नमस्कार केला. कंबरपट्याला बांधलेला सुरा काढला. डाव्या हातात धरला. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बुंध्यावर सरर् कन फिरवला. 'आह्ह..' ऱक्ताचा फवारा उडला. रक्ताळलेला अंगठा द्रोणाचार्यांसमोर धरला.
"गुरुदेव, आपली गुरुदक्षिणा!"
द्रोणाचार्यांच्या डोळ्यांत पाणी उभे होते. मनात कोलाहल माजला होता...... 'हे काय केलं आपण! आपल्या शब्दाची किंमत एकलव्य सारख्या सर्वोत्तम धनुर्धाऱ्याला चूकवावी लागते? ते ही अशी? हे काय केलेस द्रोण? कश्याकरता? अर्जुनाकरता? आपली परवानगी न घेता एकलव्य आपल्याला गुरु मानून शिकला म्हणून ही शिक्षा? त्याच्या विद्येचा वापर त्याला लिलया करता येऊच नये म्हणून ही दक्षिणा मागितलीस? आपणही हस्तिनापुरचे दास झालेलो आहोत! भीष्माचार्यांसारखे! ज्याला हस्तिनापुर, स्वतःचा शब्द आणि कौरव इतकेच दिसतात. बाकी सारे कवडीमोल. मग हा एकलव्य असो, अथवा त्याची आपल्यावरची श्रद्धा. ज्याला खरतर आपण काहीच शिकवले नाही, त्याने एकही प्रश्न न विचारता अशी भयंकर गुरुदक्षिणा द्यावी? चेहऱ्यावर एकदाही रागाचा लवलेश नाही..... आणि गुरुबद्दलच्या विश्वासात तसूभरही फरक नाही? असेही शिष्य मिळू शकतात? इतकाही भाग्यवान कुणी गुरु असू शकतो? .... आणि इतका दुर्दैवी कुणी शिष्य असू शकतो? तू सर्वोत्तम धनुर्धारी होतास, एकलव्य. आणि आता सर्वोत्तम शिष्य आहेस. अभिनंदन तरी कसे करू मी तुझे??? कारण सर्वोत्तम असण्याचा मान तू इथेही पटकवलास माझ्या सर्व शिष्यांना हरवून!'
त्यांच्या तोंडून नकळत बाहेर पडले, "किर्तीमान भवं, पुत्र! किर्तीमान भवं!!"
एकलव्याच्या हातातून होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे त्यांचे लक्ष गेले. तो अजूनही हातात कापलेला अंगठा घेऊन उभा होता..... नम्रपणे, मान खाली घालून आणि गुरुंची भेट घडली हे समाधान घेऊन!

©मधुरा

इतिहासलेख