युगांतर - आरंभ अंताचा भाग २७

Primary tabs

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
12 Aug 2019 - 6:17 pm

युगांतर - आरंभ अंताचा!
भाग २८

नंदघरी राहायला यशोदेने रोहिणीला बोलावून घेतले तेव्हापासून नंदाचे घर बलराम आणि कृष्णाच्या किलबिलाटाने भरून गेले होते.
कृष्णाच्या दैवी चमत्काराच्या कैक वार्ता हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरत होत्या. त्याच्या निळ्या रुपाची आणि विशाल काळभोर नेत्रांची भूल पडणार नाही अशी एक गोपिका गोकुळी मिळाली तर नवल!
गोपिकांच्या पाण्याच्या घागरी फोडण्यापासून ते कोणाचाही घरात घुसून शिंकाळ्यातलं लोणी मित्रांसोबत वाटून खाण्यापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टींची तक्रार करायला गावभरच्या बायका नंदच्या घरी रांग लावत असतं. यशोदेचा दिवस त्या तक्रारी ऐकून कृष्णाला शोधण्यात जायचा. कधी रानात जाऊन लपायचा तर कधी इवल्याश्या पावलांनी घरभर पळत यशोदेला दमवायचा आणि हातात सापडला की मग गोड निरागस चेहरा करून डोळ्यात करुण भाव आणि पाणी वगैरे आणून म्हणायचा, "माते, शिंकाळं तर किती उंच असतं. आणि मी किती लहान आहे! माझा हातही पुरत नाही तिथे. मी असं कसं करू शकेन?"
त्याच्या डोळ्यात पाणी आलं की कितीही ठरवलं तरी यशोदा विरघळायचीच. मोहिनीच होती त्याची तशी!
संथ वाहणाऱ्या यमुनेच्या तिरावर मुरली वाजवतं वडाच्या विशाल छायेखाली कृष्ण बसला होता. त्याच्या मुरलीचे सूर सर्वांना मंत्रमुग्ध करायचे. कानातून मनातल्या कोपऱ्या कोपऱ्यात पोचायचे. तो मुरली वाजवू लागला की सृष्टीतला कण न कण त्यावर डोलायचा. हरिण, गोमाता, ससे, फुलपाखरे, अगदी वृक्षाचे प्रत्येक पर्ण सुद्धा! त्या क्षणातच जणू सारे काही सामावले होते....!
त्याने मुरली खाली ठेवली तेव्हा बलराम काहीतरी विचार करत कृष्णाकडे बघत होता.
"दाउ? इतका गहन विचार करण्यासारखे काय आहे ?"
"अनुज, तुला माहित आहे ना, आपल्या घरात गोमाता आहे."
"हो."
"लोणीसुद्धा आहे."
"हो."
"यशोदामातेचं तुझ्यावर खूप प्रेमही आहे."
"हो दाउ. माहित आहे."
"मग सरळ सरळ यशोदा माते कडे मागून खाण्याऐवजी दुसऱ्यांच्या सदनात घुसून शिंकाळे फोडून त्यांचे लोणी का खातोस?"
कृष्ण खळखळून हसला.
"कारण असं खाल्लं की ते जास्त स्वादिष्ट लागतं. दाउ, तुम्ही का येत नाही आमच्या सोबत?"
"कान्हा, तुझ्या तक्रारी ऐकवून ऐकवून थकलेत सगळे. आज तू पुन्हा लोणी खाल्लेस असं कळले आहे यशोदामातेला."
"नेहमी प्रमाणे....."
"नाही, प्रमाण जास्त आहे आज क्रोधाचे. तुझ्या नयनांच्या जादूने कमी होईल असे दिसत नाही!"
"कश्यावरून?"
"शब्द दिलाय यशोदामातेने आज गावकऱ्यांना..... तुला शिक्षा करणारच म्हणून!"
कृष्णाने नाटकीपणे चेहरा लटकावला. दीनवाणी नजर करून बलरामाकडे पाहिले.
"दाउ, तुम्ही वाचवालं न मला?"
बलराम हसू लागला.
"ते प्राक्तनच आहे माझे. असो, चलं, बोलावले आहे तुला यशोदामातेने."
वाटेने जाताना काही पुरुष वाटेने घागरी घेऊन नदीकडे जाताना दिसले.
बलरामाने कृष्णाकडे पाहिले.
"काय? यांची घागर नाही फोडणार?"
"नाही."
"का?"
कृष्ण नुसताच हसला. तितक्यात एकाने कृष्णाला पाहून घागर बाजूला ठेवली.
"काय रे? तूच फोडतोस ना आमच्या बायकांच्या घागरी? तुझ्यामुळे इकडे आम्हाला यावं लागतयं पाणी भरायला..... तुला सोडणार नाही मी.... थांब ए...."
कृष्णा सोबत बलरामही धावत धावत घरी आला. धापा टाकत बलराम कृष्णाकडे बघून हसू लागला. काय करेल आणि कश्यासाठी करेलं, हे उशिरापर्यंत कळतचं नाही कृष्णाबाबतीत, हेच खरे!
"अनुज, मला अजून लोण्याचं खरं कारण सांगितले नाहीस."
"मी काय खोट सांगितलं दाउ? खरचं तर सांगितलं."
"अनुज, ही आज्ञा आहे माझी. खरं सांग."
कृष्ण खेळकर हसला.
"तुम्हाला मी वेगळं काय सांगणार दाउ? प्रत्येकाला हक्क आणि न्याय मिळवून देणे. हे सोडून दुसरे काय कारण असणार माझ्या कृतीचे ?"
"म्हणजे? गावातल्या स्वयंपाकघरांत घुसून लोणी खाण्यात कसला न्याय आणि हक्क?"
"दाउ, तुम्हीच म्हणालात ना, आपल्याकडे गोमाता आहे, लोणी आहे आणि मागितल्यावर देणारी मातासुद्धा! पण माझ्या मित्रांचे काय?"
"तुझ्या मित्रांच्या घरी सुद्धा लोणी आहे, अनुज."
"पण ते लोणी मथुरेकडे निर्यात होते."
"आता धन मिळवण्याकरता काहीतरी व्यवहार करावाच लागणार."
"योग्यच म्हणता आहात, दाउ. पण स्वतःच्या मुलांना न देता मथुरेला जाऊन कमी दरात लोणी विकण्याचा व्यवहार तोट्याचा नाही का?"
"म्हणून निर्यात होण्याआधीच लोणी फस्त करतोस तू?"
"हो..... पण दाउ, मी एकटाच नाही खात. सर्वांसोबत वाटून खातो."
"पण, अनुज...."
"त्या लोण्यावर आधी या गावातल्या मुलांचा हक्क आहे, दाउ. स्वतः चा हक्क मिळवणे आणि दुसऱ्याचा त्यांना मिळवून देणे हाच तर न्याय आहे. "
"पण अश्या पद्धतीने?"
"कार्याचा परिणाम भविष्य ठरवतो आणि बदलतो. कार्याची पद्धत नाही, दाउ!"
कृष्ण आत्ममग्न होतं म्हणाला.
---------
काळाची चाकं पुढे सरकत राहिली. माद्रीला अश्विनी कुमांरांकडून मिळालेला मंत्र प्रसाद.... सुंदरतेची मूर्तीमंत निशाणी..... नकुल आणि सहनशिलतेची परिसीमा.... सहदेव! युधिष्ठिर, भीम आणि अर्जुनचे दोन आज्ञाधारक अनुज! एक संपुर्ण सुखी परिवार! कुंती आणि माद्री पंडुसोबत या स्वप्नाला जगत होत्या..... पण ते आळवावरचं पाणी निघेल आणि नियतीच्या एका फटकाऱ्याने जाग येऊन स्वप्न तुटून जाईल.... कोणाला माहित होते?
पंडुची तब्येत एकाएकी ढासळली. तो क्षीण होत चालला होता. कुंती आणि माद्रीने कैकदा महालात परतून उपचार घेण्याबद्दल आग्रह धरला. पण पंडुने नाकारले. डोळ्यापुढे किंदम ऋषी दिसतात, त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह दिसतो असे काही ज्वर चढल्या सारखा बोलायचा, तेव्हा कुंती आणि माद्री घाबरायच्या.
एक दिवस....
माद्री नदीतून नाहून बाहेर पडत होती. शृंगार न करताही तिचे रुप त्या उगवत्या सुर्याप्रमाणेच सतेज भासत होते. अचानक मागून तिच्या खांद्यावर झालेल्या उष्ण स्पर्शाने ती दचकली. मागे पंडु उभा होता. तिच्या कडे अधिरतेने पाहत. त्याच्या ज्वर तीव्र झाला होता.
"आर्य.... तुम्ही कुटीत जा. आराम करा."
"नाही माद्री. मला किंदम ऋषी बोलावता आहेत."
"काय बोलता आहात आर्य? तुम्हाला काही होणार नाही. मी होऊ देणार नाही."
"माद्री.... मला जीवन नको आहे."
"आर्य...."
"तू हवी आहेस माद्री."
"नाही आर्य.... दूर व्हा."
"मृत्यूची वाट पाहत जगणे भयंकर असते माद्री. हा कणाकणाने वाढणारा ज्वर.... मला तीळ तीळ करून मारू पाहतोय..... आता नाही सहन होत......ये.... माझ्या मिठीत ये...."
त्याने सर्वशक्तीनिशी तिला घट्ट मिठी मारली. ती त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली.... आणि काही वेळात त्याची पकड सुटली.... जमिनीवर तो निश्चल होऊन पडला.

©मधुरा

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

nishapari's picture

12 Aug 2019 - 9:20 pm | nishapari

बाकी सगळं छान आहे पण सुभद्रेचा जन्म कंसाच्या मृत्यूनंतर , वसुदेव देवकीची बंदिवासातून सुटका होऊन रोहिणी वसुदेव देवकी तिन्ही जेव्हा एकत्र राहू लागले तेव्हा झाला ... सुभद्रा ही गोकुळात नाही तर मथुरेत जन्माला आली आणि लहानाची मोठी झाली ...

Birth. Subhadra was the daughter of Vasudeva and his wife Devaki. She was believed to be much younger to Krishna and Balarama since she was born after Vasudeva was released from Kansa's prison, according to the epic.

तसेच लिखाण आवडले तर प्रोत्साहन अवश्य द्यावे ही विनंती आहे.