४_किलबील किलबील पक्षी बोलती.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
28 Jul 2019 - 8:01 am

रंगीत, उठुन दिसणारं ठळ्ळक, शिट्टी सारखं हव?...….. लाल..... हिरवा... पिवळा... नीळा....नील. हां नील. चमकदार , रंगीत उठून दिसणारे ठळ्ळक आहे. लांबून आईने " ए नी.........ल" अशी हाक मारली तर कोणीतरी शिट्टी वाजवतंय असं च वाटेल. "
" व्वा काका छान नाव दिलंत मला. मस्त रंगीत नाव "
" आणि माझं नाव काय हो काका" मला पण छानसं नाव द्या . पण नुसत्या एखाद्या च रंगांचं नको. सगळे रंग यायला हवेत त्यात"
मागील दुवा

मागील दुवा http://misalpav.com/node/44930

रेघवाल्या मुलीचा नावासाठी हट्ट चालूच होता. हीच्यासाठी काहितरी नाव शोधायलाच हवं. डोंगरे सरांनी काहितरी आठवेल , सुचेल या हिशेबाने आजूबाजूला नजर फिरवली. काळ्या फळ्याचं काळंशार आकाश त्या आकाशात दूरवर ती पांढर्‍या खडूची अक्षरे चमकत होती. काळ्या रंगावर चमकदार दिसणारी पांढरी शुभ्र अक्षरे .
….. ठरलं . आपण तुझं नाव शूभ्रा ठेवूया. चमकदार सगळ्या रंगाना सामावून घेणारा रंग पांढरा शूभ्र.. शूभ्रा.
"ओ काका … काय सॉल्लीड नाव सुचवलंत. शूभ्रा. ...मस्त... शूभ्रा….. मला आता कोणी "ती मुलगी" किंवा नुसतं "ए" म्हणून बोलावणार नाही. " ए शूभ्रा इकडे ये" असं म्हणतील. मग मी टेचात नाचत जाईन छुमछुम पैंजण वाजवत". नाव मिळाल्यामुळे शूभ्रा हरखून गेले होती. तीचे ते ठिपक्यांचे डोळे अगस्तीचा तारा चमकावा तसे विलक्षण तेजाने चमकू लागले.
" काका तुमच्या कडे खडू आहेत आणखी?" बराचवेळ फळ्यावरच्या काळ्या मैदानात पांढर्‍या खडूच्या रेघांनी आखलेल्या कौलारू शाळेकडे पाहून झाल्यावर तो रेघवाला मुलगा अर्रर्र …. त्याचे नवे नाव " नील " म्हणाला " तुम्ही खडू घेवून आलाय?"
"बघतो हं . कारे काय झालं? काय करायचं आहे?
सवयीने डोंगरे सरांनी त्याचंए खिसे चाचपले. फळा रंगवताना खडू, हरवू नयेत म्हणून शर्टच्या वरच्या खिशात ठेवायची त्याची सवय सगळ्याना माहीत होती.
"हो आहेत की." खिशातल्या अखंड चार पाच खडूच्या कांड्या काढत डोंगरे सर म्हणाले." पांढरा , तांबडा, निळा हिरवा आणि पिवळासुद्धा आहे "
"आख्खे खडू! " नीलचे ते ठिपक्यांचे डोळे विस्फारले होते. इतके अखंडखडू तो बहुतेक आयुष्यात प्रथमच पहात असावा. अर्थात तेही खरेच होते. शाळेचं चित्र काढताना शाळेच्या इमारतीपासून सुरवात व्हायची. शिकणारी , खेळणारी मुले ही सर्वात शेवटी. तो पर्यंत संपत संपत खडू बोटाच्या पेराएवढा तुकडा झालेला असायचा. खर्‍या शाळेचंही असंच होतं की. शाळेत शिकणार्‍या ,खेळणार्‍या मुलांसाठी सर्वात शेवटचा प्राधान्यक्रम असतो. डोंगरे सरांच्या मनात आले.
"काय हवंय तुला?" त्यानी नील ला विचारले.
" मला ना सांगू का. अं अं …. मला ना.... काय बरं ! मला…" काहीही ध्यानीमनीसुद्धा नसताना अचानक माहीत काय हवे ते देणारी जादूची छडी मिळावी किंवा " काय हवं ते माग म्हणत देव प्रसन्न व्हावा आणि भांबवल्यामुळे आजवर रोज घोकत असलेल्या हव्या असलेल्या शंभर गोष्टींपैकी एकही गोष्ट आठवू नये अशी काहिशी नीलची अवस्था झाली. तो नुसता " अं ...अं..." म्हणत राहीला.
" काका आम्हाला छान निळं आभाल हवंय आमच्या शाळेच्या वर" नील ची ती भांबावलेली अवस्था पाहून शूभ्रा पुढे सरसावली." हे नुसतं काळं काळं आकाश काय बघायचं सारखं सारखं. त्यात दोन मोट्।ठाल्ले आणि पाच चिंटुकले ढग काढून द्या. हे एवढाले आणि एवढेसे पण" तीचे ते पांढर्‍या रेघांचे हात पसरत शुभ्रा म्हणाली.
डोंगरे सरांनी हातातल्या निळ्या खडून फळ्याच्या काळ्या आकाशात दोन चार फरकाटे काढले. बोटांनी ते पुसल्यासारखे करत त्या फरकाट्यांची निळाई आसपास पसरवली. पांढर्‍या खडूने दोन मोठे आणि पाच चिंटुकले ढग काढले. त्यांच्या कडाही थोड्याशा फिकुटवल्या . आता आकाशाची निळाई जाणवायला लागली.
" एक उगवता सूर्य पण द्या काका! डोंगरामागून उगवणारा.. उगवत्या सूर्याच्या उन्हात खेळायचंय आम्हाला. " आता नील ला कंठ फुटला." आणि हो. तिकडे मैदानात शाळेतली आणखी खेळणारी मुले पण काढा. लंगडी खेळणारी, लगोरी खेळणारी"
" काका नुसते मुलगेच नकोत तर मुलीही काढा. झिम्मा जोडीसाखळी खेळणार्‍या. आम्हाला खूपखूप खेळायचंय. शाळेत खेळायला मिळतं , मैत्रीणी भेटतात.
म्हणून आम्ही येतो . आणि हो काका तो डोंगरामागून उगवणारा सूर्य काढाल ना त्या डोंगरातून एक नदीपण सुरू होते ती थेट आमच्या शाळेच्या मागे येवू देत. आम्हाला त्या नदीत पाय बुडवून थब्बाक थब्बाक करायचंय. आणि होड्यापण सोडायच्या आहेत."
" काका आमच्या शाळेच्या मैदानात झाडेपण हवीत.पाना फुलांची "
मुलांची फर्माईश आली तशी डोंगरे सरांनी एम आकाराचे दोन त्रिकोणी डोंगर. डोंगरामागून उगवणारा सूर्य काढला. सूर्याच्या त्या चतकोर वर्तुळाला नाक डोळे काढल्यावर सूर्य डोळे मिचकावून हसला. डोंगरे सरांनी लाल पिवळ्या खडूने त्याच्या कडेवर पाचसहा प्रकाश किरणांच्या लहान मोठ्या रेघा काढल्या. त्या बरोबर जादू झाली. आख्खा फळा तांबूस सोनेरी रंगाने उजळून निघाला. सूर्याची किरणे शाळेच्या कौलांवर पडली तसा त्यांचा पांढरा रंग जाऊन लाल चुट्टूक दिसू लागला. शाळेच्या मैदानात कोपर्‍यात पानाफुलांची झाडे काढली हिरवी पाने, त्यावर लाल निळ्या पिवळ्या ठिपक्यांची फुले काढल्यावर कुठूनशी तीन फुलपाखरे उडत येवून रुंजी घालायला लागली.
डोंगरातून उगम पावणारी नदी थेट शाळेच्या मागच्या बाजूला आली. येताना ती वाटेत तांदूळाची, ज्वारीची शेते फुलवत आली. तीला वाटेत आम्ब्याची चिंचेची झाडे लागली पेरुची, जांभळाची, नारळाची झाडे लागली.
नील आणि शूभ्राच्या सोबत खेळायला मित्रमैत्रीणी आल्या. डोंगरे सरांनी त्यांच्या रेषा लाल पांढर्‍या हिरव्या नीळ्या पिवळ्या रंगात रेखाटल्या. नील आणि शूभ्राने न सांगताही . वेगवेगळ्या रंगांची मित्रमैत्रीणी पाहून दोघे आनंदाने उड्याच मारू लागले.
नील आणि शूभ्रा सांगत होते तसतसे डोंगरे सर एक एक गोष्ट चित्रात आणत होते. नीळी नदी , हिरवा डोंगर , लाल चुटूक पायवाट , नदीतले मासे छोट्याशा होड्या , मासे पकडणारा बगळा , पेरुच्या झाडावर झेपावणारे पोपट, नारळाच्या झाडावरचे गुंतावळा झाल्यासारखे दिसणारे नारळ, पतंग उडवणारी मुले नीलच्या सांगण्यावरून आली. तर झोपाळ्यावर झोके घेणार्‍या मुली शूभ्राने आणल्या.
पाहतापाहता शाळा भरून गेली. डोंगर झाडे नदी पक्षी बाग सूर्य यानी फळा भरून गेला. ती आनंदाने खेळणारी मुले , उत्साही फुले बघून डोंगरे सरांना लहानपणचे गाणे आठवले. " किलबील किलबील पक्षी बोलती... झुळझुळ झुळ झुळ झरे वाहती…. इथल्या वेली गाणे गाती पर्‍या हासर्‍या येती जाती.....
डोंगरे सर या सगळ्याकडे पहातच राहीले. काय हवं असतं मुलांना या पेक्षा वेगळं? छान मनसोक्त खेळता यावं , उड्या माराव्या, गावं नाचावं खिदळावं. अभ्यास काय होतच असतो. एखाद्म गणीत जरा उशीरा समजलं म्हणून काही फारसं बिघडंत नाही. की इतिहासातल्या सनावळी लक्षात नाही राहिल्या तर त्याचंया तारखा बदलत नाहीत. मोठी माणसे मुलांवर उगाच अभ्यासाचं ओझे लादतो. त्यानी झटकन मोठे व्हावं म्हणून अभ्यासाच्या चरकात त्याना पिळून काढतो. सायकल्याच्या ट्यूबचं रबर ताणून लांब करावं तसं त्याचं बालपण ताणून त्याना मोठं बनवतो.
चाखत माखत बालपणाची गोडी घेत आनंदाने बागडाणारे ते दोन जीव पाहून डोंगरे सर हरखून गेले. ते त्यांच्या मनाने त्यांच्यातलेच होऊन गेले. नुसत्या खडुच्या रेघाच्मे हातपाय असलेले. जगण्यासाअठी आनंदाशिवाय इतर काहीच गरजा नसणारे. त्याम्च्या चित्रातले. त्याचंया चित्रातला काळ थांबला होता. सूर्य उगवतीवर होता तिथेच थबकला होता. त्याला मावळतीला जायची कसलीही घाई नव्हती. आकाशातल्या मराठी चार च्या आकड्याने काढलेल्या पक्ष्यांना कुठेही जायचे नव्हते. त्यांना पंख पसरवून हवेत मस्त तरंगायचे होते. डोंगरावर उगम पावलेल्या त्या नदीला शाळेच्या मागे वहात आल्यावर पुढे दुसर्‍या गावाला जायचे नव्हते. त्यामुळे त्यात सोडलेल्या कागदी होड्यांना ही कोणी पुढे पुढे जा म्हणत ढकलत नव्हते. त्या निवान्त शिडे उभारून पाण्यावर आरामात पहुडल्या होत्या.
लुसलुशीत गवत खात हुंदणार्‍या गाईच्या ठिपक्या एवढ्या वासरांना , शेळीच्या कोकराना कशाचेच पडलेले नव्हते. ती आपली मस्त वार्‍यावर डुलणार्‍या गवताच्या हिरव्या गालीचावर दुडदुडत होती.
लहानपणी कधीतरी गावाला मामाच्या शेतावर गेल्यावर असा एखादा दिवस उगवायचा की तो कधी संपूच नये असं वाटायचे. डोंगरे सरांना त्याची आठवण झाली. कित्ती सोप्पं असतं ना बालपण. साधं आणि सोप्पं. आजचा दिवस आज जगून घेणारं. " उद्याला" पुढच्या पानावर आल्यावर पाहू म्हणणारं.
डोंगरे सरांना रविंद्रनाथ टागोरंच्या " व्हेअर द माईंड इज विदाउट फीयर , अँड द हेड इज हेल्ड हाय, व्हेअर नॉलेज इज फ्री , व्हेअर वर्ल्ड इज नॉट ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट्स....." या कवितेची आठवण झाली.
आपण उगाचंच गोष्टी क्लिष्ट करतो. उद्याच्या भविष्याची चिंता करत आज कुरतडून सम्पवतो आणि उद्या "आज" हरवला म्हणून हळहळत बसतो.
शाळेत असताना शिक्षण घ्यायचे ते आनंद शिक्षण , पण आपण नको नको ते क्लासेस , मार्कांची निरर्थक चढाओढ आणि ज्ञानाच्या संकुचित कसोट्या लावत शिकण्यातला आनंदच काढून घेतो. शाळेत सर्वात महत्वाचं काय असतं तर शिकणार्‍या खेळणार्‍या बागडणार्‍या मुलांचं बालपण. पण त्याच घटकाला आपण सर्वात दुर्लक्षीत घटक ठरवत हद्दपार करतो.आणि त्या निरागस आनंदाला हद्दपार करतो.
डोंगरे सरांना अचानक भरून आलं आभाळ भरून यावं आणि ते न कोसळता तसंच रहावं तसं त्यांना गदगदून आलं.खूप रडावसं वाटू लागलं. हुंदके देत ते हमसून हमसून रडू लागले . हातात तोंड लपवत गुढग्यात डोके खुपसून ते तसे हुंदके देत बसून राहिले.
किती वेळ गेला असेल माहीत नाही. कोणीतरी त्यांच्या केसातून पाठीवरून हात फिरवतोय असे वाटले म्हणून डोके वर केले. नील , शूभ्रा आणि त्यांचे मित्र मैत्रीणी भोवती गोळा झाले होते. आपले रेघांसारखे हात सरांच्या पाठीवरून फिरवत होते. कोणीतरी दोन तिरप्या रेघां आखून काढलेल्या ग्लासमधून पाणी घेवून आले. ठिपक्याचे डोळे असलेल्या त्या सगल्या मुलाचंया गोल वाटोळ्या चेहेर्‍यावर काळजी स्पष्ट जाणवत होती.
सरांनी आपले डोळे पुसले चेहेर्‍यावरून हात फिरवला. त्या सगल्यांकडे पाहून डोळे मिचकावले. सरांना पुन्हा पहिल्यासारखे झालेले पाहून मुले आनंदीत झाली.

डोंगरे सरांनी खिशातुन पुन्हा खडू काढले. त्यांच्या कडे होत्यानव्हत्या त्या सगळ्या रंगाच्या खडूनी फळ्यातल्या आकाशात एक छान रंगीत इंद्रधनुष्य काढले . शाळेतल्या काळ्या ग्राउंडवर हिरव्या पांढर्‍या खडुने छोट्या छोट्या फुल्या मारत गवत काढले. आता ती रेघारेघाने रेखाटलेली मुले शाळेच्या मैदानावर खेळू लागली. कोणी शिवणापाणी करत पळू लागले. कोणी पांढरे ठिपके चेंडू म्हणून झेलत होते. तर कोणी रेघांचे हात धरत जोडी साखळी खेळत होते. कोणी तिरप्या रेषेची घसरगुंडी खेळत होते. झोपाळा खेळत होते.
शाळेचं मैदान खेळणार्‍या मुलांनी भरून गेलं. आणखी चार चे आकडे काढत डोंगरे सरांनी आकाशात अजून काही पक्षी काढले फळ्यावरचं जग आनंदाने भरून गेलं. डोंगरे सर त्या चित्रातल्या मैदानात शाळेच्या इमारती शेजारी उभे राहून हा अक्षर अनंद सोहळा अनुभवत होते. हे क्षण असेच थांबून रहाणार आहेत याची त्यांना खात्री होती.
" सर.. कुठे आहात सर" महादेव शिपाई डोंगरे सरांना आवाज देत लगबगीन आत आला. शाळेचे नवे ट्रस्टी येवून बसले होते. त्यांच्या स्वागत समारम्भाचा फळा डोंगरे सरांनी लिहीला असेल तो घेवून ये असे सांगत हेडमास्तरांनी त्याला पाठवले होते.
महादेवला कला वर्गात डोंगरे सर दिसले नाहीत. मघाशी ते लिहीत असलेला फळ्यावर खडूने बरेच गिचमीड रेखाटलेले दिसले.
महादेवने त्या गिचमीड्या चित्राकडे पाहिले. रेघारेघांनी काढलेली झाडे डोंगर नदी, एक कौलारू इमारत , उभ्या आडव्या तिरप्या छोट्या छोट्या रेघारेघांनी कार्टूनसारखे मुलांचे आकार , हिरव्या लाल पिवल्या पांढर्‍या निळ्या रंगांच्या रेघोट्यांनी फळ भरून गेला होता. नक्की काय काढलंय तेच समजत नव्हते.
फळ्यावरच्या वरच्या बाजूला लिहीलेली " सुंदर अक्षर हा एक सुरेख दागीना आहे" हे अक्षरे मात्र स्वच्छ ओळखता येत होती.
वर्गात महादेवने पुन्हा इकडे तिकडे पाहिले. त्याला डोंगरे सर कुठेच दिसले नाहीत. ते असते तर …… पण आता त्याची वाट पहायला वेळ नव्हता. नवे ट्रस्टी साहेब कधीचे येवून थांबले होते.
महादेवने टेवलावर ठेवलेले ओलसर फडके घेतले. आणि फळा पुसायला सुरवात केली. पुसता पुसता त्याला फळ्यावरचा एक आकार ओळखीचा वाटला. त्या इंच दोन इंच भर आकाराच्या चेहेर्‍यावर डोंगरे सरांसारखाच चष्मा होता. अंगावर सरांसारखाच अर्ध्या बाह्यांचा शर्ट होता. तो आकार काहितरी सांगतोय असे महादेवला वाटले.
" हॅ भास झाला....." म्हणत महादेवने ओल्या फडक्याने फळा स्वच्छ पुसला. स्वच्छ काळाशार.
आपण रेखाटलेले डोंगर झाडे नदी अचानक नाहीशी व्हायला लागली. या जाणीवेने डोंगरे सर अस्वस्थ झाले. पतंग पक्षी गाय फुलपाखरे मैदानावरची मुले नील शुभ्रा …. एक एक करत नाहीसे झाले, त्यांचे सगळे जग पुसले गेले. डोंगरे सरही पुसले गेले. उरले ते अथांग स्वच्छ काळेशार अवकाश.
डोंगरे सरांची वाट पहायला आता तेवढा वेळही नव्हता. महादेवने खडू उचलला आणि त्या नुकत्याच लख्ख पुसलेल्या काळ्या फळ्यावर पांढर्‍या खडूने लिहायला सुरवात केली.
" शाळेचे नवीन ट्रस्टी भाऊसाहेब यांचा स्वागत समारंभ.......

समाप्त.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Jul 2019 - 11:37 am | मुक्त विहारि

जबरदस्त. ...

एक बियर लागू. ....

विजुभाऊ's picture

30 Jul 2019 - 11:01 am | विजुभाऊ

_/\_ कधी भेटताय

विनिता००२'s picture

31 Jul 2019 - 3:01 pm | विनिता००२

डोंगरे सरही पुसले गेले. >> म्हणजे ?? :(

सुरेख लिहीलेय