३_ किलबील किलबील पक्षी बोलती.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Jul 2019 - 11:11 am

या आकृतीत गोलाला दोन छोट्या रेषा जोडून त्या खाली दोन फुल्या मारल्या. मुलाचे आणि मुलीचे अगदी कमीत कमी रेषांमधे. मग जवळंच आणखी काही रेषा जोडून एक कौलारू बैठी इमारत काढली, शाळेच्या इमारती सारखी.
खडूच्या आणखी दोनचार जुजबी फरकाट्यात शाळेची इमारत जिवंत व्हायला लागली . दोनचार ठिपके इकडे तिकडे दिले . मैदानात खेळणारी मुले दिसायला लागली.....

मागील दुवा http://misalpav.com/node/44923

अजून काय करता येईल बरे….. खरे तर असा विचार डोंगरे सर चित्र काढताना कधीच करत नाहीत. चित्र काढण्या अगोदरच नक्की काय काय काढायचे याचा पक्का आराखडा मनात असतो. स्केचिंग करण्याअगोदर कोणत्या रेषा कुठे असतील हे नक्की झालेलं असतं. रंगवताना कोणता रंग कशाबरोबर जाईल याचे हिषेब करून मगच सुरवात करायची हा धडा आर्ट स्कूल मधे असताना गायतोंडे सरांनी घोटून घेतला होता. फार तर मायनर शेड्स , अस्फूट छटा दाखवताना वापरायचे रंग अचानक सुचू शकतात. पण रंगवाचन करताना रंगांच्या बारीक छटा एकमेकात मिसळायच्या जागा , हे कसे वाचायचे हे दाखवताना त्यानी यलो ऑकर ,गोल्डन यलो , लेमन यलो आणि प्लेन यलो कागदावर एकाशेजारी एक मांडून मखमली सॅटीनच्या पडद्याचा भास दाखवून दिला होता. चिंचेच्या हिरव्या कच्च झाडाचे चित्र काढताना त्या हिरव्या रंगात असलेली किंचीत लालसर काळपट झाक , मधेच डोकावणारा तांबूस मळकटपणा, अगदी नवी कोवळी पालवी कॉपर रेड मधे , तर तीन चार दिवसाची मोठी पालवी त्या कॉपर रेड मधे किंचीत कोबाल्ट ब्ल्यू झाक असलेली, अजून थोडी मोठी होताना कॉपर रेड कमी होत जाऊन त्यात अ‍ॅक्वा ब्ल्यू , पुढे अ‍ॅक्वा ग्रीन आणि शेवटी ऑलीव्ह ग्रीन .
गायतोंडे सरांचं रम्गाचं प्रात्यक्षीक पहात असताना डोळ्याना सुरवातीला न जाणवणार्‍या सेकंडरी शेड्स ही समजायल्या लागल्या. एखादं चित्र कसे पहायचं हे समजायला लागले.रंगांची दुनिया पहायचे डोळे लाभले. कलाकाराला हे सहावे इंद्रीय असावेच लागते. सेकंडरी शेड्स काय जादू करतात हे समजायला तीन जन्म ही अपूरे पडतील.
हातातला खडू अंगठा आणि तर्जनीच्या मधे घोळवत डोंगरे सर फळ्याकडे एकटक पाहू लागले. शाळेची कौलं, मैदानातला झेंड्याचा खांब, शाळेतली घंटा देणारा शिपाई, पालकांच्या हाताला धरून आलेली मुले, मैदानाच्या कोपर्‍यात रंगलेला हुतूतूचा डाव., वेण्यांना बांधलेल्या लालचुटूक रीबीनी मिरवणार्‍या मुली, चार आकड्याच्या आकारातले कावळे …… चित्रातले एक एक बारकावे दिसायला लागले.
घण घण घण घण घंटेचा आवाज आला. कोणीतरी आपल्या शर्टच्या टोकाला धरुन ओढतोय . सरांनी चमकून खाली वाकून पाहिले. मघाशी खडूने रेखाटलेले ते मुलगा आणि मुलगी आपल्या रेघेसारख्या हातांनी सरांचा शर्ट ओढत होते त्यांचे बोलणे ऐकू येत नव्हतं. सरांच्या हाततल्या खडूकडे बोट दाखवत ते काही खाणाखुणा करत ,मधूनच त्यांचे ते ठिपक्याचे डोळे मिचकावत काहितरी सांगत होते.
अगोदर डोंगरे सरांना कळेचना ते काय सांगताहेत ते. नीट लक्ष देवून पाहिल्यावर कळाले, त्यांना बोलण्यासाठी तोंड आणि ऐकण्यासाठी कान हवे होते. सरांनी हातातल्या खडूने त्यांना कान आणि तोंड काढले. कान अन तोंड मिळाल्या नंतर त्या दोघांना इतका आनंद झाला रेघांसासारखे आपले दोन्ही हात उंचावून एक पाय दुमडत त्यातल्या मुलीने एक छान गिरकी घेतली. त्या गिरकीमुळे तीच्या फ्रॉकच्या रेघा आणखी तीरप्या झाल्या वेण्यांच्या रेघा तर पार जमिनीला समांतर जातील इतक्या पसरल्या . त्या मुलाने तस्र त्याच्या रेघांसारख्या बारकुड्या पायांनी उड्या मारत आख्ख्या शाळेला एक फेरी मारली.
" काका थँक्यू. आता आम्ही खूप बोलणार , गाणी म्हणणार , गोष्टी ऐकणार , कविता म्हणणार ,प्रार्थना म्हणणार. थँक्यू काका खूप खूप थँक्यू." आपल्या त्या काटकुळ्या बारीक रेघांच्या हातांनी त्याम्नी डोंगरे सरांच्या हातावर उड्या मारत टाळ्या दिल्या. आणि काचेच्या गोट्यांनी भरलेली परडी फरशीवर सांडल्यावर येईल तशा टकर टकर आवाजात ते हसू लागले.
हसताना त्यांच्या डोळ्याचे ठिपके अधीकच बारीक होत होते. चेहेर्‍याचा गोल थरथरत होता.
डोंगरे सरांना गम्मत वाटली. " काय रे तुम्ही इथे कसे आणि नावे काय तुमची ?"
"आम्ही इथेच आहोत. इथेच होतो. तुमच्या हातात हीला खडू दिसला म्हणून हीने मला बोलावून आणले.
" आणि तू गं?"
काका मी इथेच होते या कोपर्‍यात . तुम्ही मला वेण्या काढल्या , रिबीनीची फुले काढलीत. ती पहात होते. तेवढ्यात तुम्हीच दिसलात. झेंड्याच्या काठीजवळ. डोंगरे सरांनी पाहिले शाळेच्या मैदानावर अअसलेल्या झेंड्याच्या काठी ची पांढरी रेघ त्यचंया बाजुला उभी होती. काळ्यामैदानात कौलारू बसकी इमारत होती, डोंगरे सरांनी आजूबाजूला पाहिले. मघाशी फळ्यावर काढलेल्या चित्रातली प्रत्येक गोष्ट त्यांच्या आजूबाजूला होती. शाळा ,मैदान ,कोपर्‍यात हुतूतू खेळत असलेली मुले, घंटा देणारा शिपाई . सगळे कसे पांढर्‍या शुभ्र खडूने आखलेल्या रेघात होते. पायाखाली महादेव शिपायाने पुसलेल्या फळ्याचे काळेशार मैदान होते.
डोंगरे सरांना जाणवले ,ते त्यांनीच रेखाटलेल्या चित्रात उभे होते. डोक्यावरच्या काळ्या आकाशात काढलेले चार आकड्याचे कावळे त्याच जागी उडत होते. क्षणभर थबकले मग पुन्हा उडू लागले. शाळेची घंटा देणार्‍या शिपायाचा हातही तिथेच थाम्बलेला होता. शाळेच्या त्या बसक्या इमारतीच्या दारात असलेल्या कमानीवर लिहीलेली अक्षरे त्यानी वाचायचा प्रयत्न केला. काहीतरी रेषा फुल्या ठिपके इतकेच काय ते वाचता आले.
वर्गांच्या खिडक्यातून न दिसणारे मुलांचे ठिपके अभ्यास करत होते. सगळं कसं शांत शांत होतं अगदी चित्रातल्यासारखंं डोंगरे सर क्षणभर गांगरले. पण क्षणभरच. चित्रातच तर उभे आहोत आपण. भाग्यवान आहोत. आपणच रेखाटलेल्या चित्राचा भाग होण्याचं भाग्य किती जणांच्या नशीबात असते? अगोदर मनाजोगतं चित्र किती जणांना रेखाटता येतं? त्या चित्राचा भाग होणं हे तर त्याहूनही दुरापास्त.
आपण आपल्या आयुष्याची स्वप्ने रंगवतो. करीयरची , शिक्षणाची , जोडीदाराची, मित्रांच्या जवळच्या नातेवाईकाच्या भेटीची कितीतरी स्वप्ने रंगवतो. कुणी एखाद्या उद्योग धंद्याच्या उभारीची , स्वप्ने पहातो. काही जणांना या स्वप्नात पाहिलेली एखाद दुसरी गोष्ट प्रत्यक्षात रेखाटायला जमते. बहुतेकांची स्वप्ने मनातच विरून जातात. कुणाला स्वप्न रेखाटायला परिस्थितीचा कॅनव्हास मिळत नाही. कुणाला जोडीदारामधे हवा तो रंग मिळत नाही तर कुणाची करीयरची स्केचेस रेखाटणारी शिक्षणाची पेन्सील मधेच कुठेतरी मोडुन नाहीतर हरवून जाते. काहीना पहिलेल्या स्वप्नांचे चित्र पूर्णत्वास नेणार्‍या , सहकार्‍यांचे रंग चित्र पूर्ण झाल्यावर काही वेगळेच दिसायला लागतात . आपण भाग्यवान आहोत आपण स्वतः रेखाटलेल्या चित्राचा भाग आहोत.
हा विचार करताना त्यांना जाणवलं . ती चित्रातली मुलगी त्यांचा हात ओढत होती.
ओ ... ओ काका काय झालं?
काही नाही काही नाही. ….. असंच. तुझं नाव काय म्हणालीस बाळा?
मी कुठे काय म्हणाले? माझे नाव आहे " ती मुलगी"
"ती मुलगी? असे कुठे नाव असते का गं ?"
बहुतेकजण माझ्याकडे बोट दाखवत असंच म्हणतात. फार तर चित्रातली ती मुलगी असं म्हणतात. आणि शाळेत हाक मारताना फक्त " ए" असं म्हणतात"

आणि मलासुद्धा तसंच म्हणतात. " तो मुलगा" इथं शाळेत हाक मारताना मलाही " ए" असंच म्हणतात. आमचं नाव सांगा ना काका. आम्ही तुम्हाला सांगतोय आणि तुम्हीच आम्हाला आमची नावे विचारताय? आमची नावे तुमच्याशिवाय दुसर्‍या कोणाला ठाऊक असणार?"
अरेच्चा खरेच की.काय नावे हवीत तुम्हाला?
काहीही द्या पण छान द्या. त्याचा मस्त अर्थ असायला हवा. कुणी विचारले तर तो आम्हाला सांगताही यायला हवा" ती रेघवाली मुलगी म्हणाली
हे काय हो काका आपल्याला कधी कुणी विचारतं का की काय नाव हवं म्हणून ? असं विचारून नाव थेवायला लागलं तर गम्मतच होईल की. समजा हं नाव ठेवायच्या अगोदर बाळाच्या आत्याने बाळाला विचारळ्म की काय नाव ठेवू तर ते काय " हॅ.... अ‍ॅ' ….असे काहितरी म्हणेल एखादं हुशार बाळ असेल तर ते फार तर "ताताताता किंवा दादादादा " म्हणेल. मग सगळ्या बाळांची नावे हॅ....अ‍ॅ … अशीच होतील. ती रेघवाली मुलगी तोंडावर हात ठेवत हसू लागली.तीने तीचे रेघवाले पाय किंचीत मुडपले आणि रेघवाल्या मुलाच्या रेघेच्या हातावर जोरात टाळी दिली. उड्या मारत ते दोघेही हसत सुटले.
त्यांच्या हसण्याचा आवाज डोंगरे सरांना परिचीत होता. फळ्यावर खडूने एखादे नाठाळ अक्षर लिहीताना खडू घासल्याचा अक्षरात न मांडता येण्यासारखा किर्र किच्च आवाज यायचा. त्या आवाजाची गम्मत आत्ता समजली. ते नाठाळ अक्षर आपल्याला याची कशी फजिती केली म्हणून हसत असते. रेघांचे खुदुखुदू हसणे असेच असणार.
" ओ काका सांगा ना मला एखादे छानसे नाव , ते छान पण असायला हवं आणि म्हणायला सोप्पं सुद्धा." रेघवाली मुलगी.
" मलापण माझे नाव असं असावं की हाक मारताना एखादा पक्षी आपल्याला बोलावतोय असं वाटायला हवं " रेघवाला मुलगा.
हे बघ तुझे नाव आपण राजा ठेवू या का
" नको. राजा नको. राजा म्हंटले की सदा न कदा सिंहासनावर बसून रहायला लागेल. खेळण्बीळण सगळं बंद होईल."
कारे असे का म्हणतोस? राजा नाव कसं रुबाबदार आहे.
खेळता येत नसेल तर काय करायचाय रुबाब? तुम्ही कधी ऐकलय का की आटपाट नगरचा राजा आट्यापाट्या खेळत होता किंवा प्रतापपूरचा चा राजा सूरपारंब्या नाहीतर जोडीसाखळी खेळत होता म्हणून . संग्रामपूरच्या राजाने अबकदुबक तीबक करून विट्टीला सणसणीत टोला हाणलाय म्हणून . सगळ्या गोष्टीत राजा हा कायम ठोंब्यासारखा सिंहासनावर बसून असतो आणि प्रधानाला तितकेच ठोंब्यासारखे प्रश्न विचारत असतो नाहीतर मंत्र्यांना राज्यातील गवत किती उंच वाढलंय ते पहा अशी कामे सांगत असतो. मला नको राजा नाव. नाव कसं छान चमकदार रंगीत उठून दिसणारं ठळक्क आणि शिट्टी वाजल्यासारखं हवं."
रंगीत, उठुन दिसणारं ठळ्ळक, शिट्टी सारखं हव?...….. लाल..... हिरवा... पिवळा... नीळा....नील. हां नील. चमकदार , रंगीत उठून दिसणारे ठळ्ळक आहे. लांबून आईने " ए नी.........ल" अशी हाक मारली तर कोणीतरी शिट्टी वाजवतंय असं च वाटेल. "
" व्वा काका छान नाव दिलंत मला. मस्त रंगीत नाव "
" आणि माझं नाव काय हो काका" मला पण छानसं नाव द्या . पण नुसत्या एखाद्या च रंगांचं नको. सगळे रंग यायला हवेत त्यात"

( क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2019 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

काय ब्रे नाव असेल दुसरे?
पैजारबुवा,

जालिम लोशन's picture

27 Jul 2019 - 1:46 pm | जालिम लोशन

सुरेख