युगांतर आरंभ अंताचा भाग १०

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
26 Jul 2019 - 6:33 pm

"बोलावलेत राजमाता?" भीष्म कक्षात प्रवेश करून हात जोडून उभा राहिला.
"हो भीष्म!"
"काय आज्ञा आहे?"
"उद्याच्या दिवशी काशीनगरीला एक स्वयंवर योजला आहे काशीनरेश नी. त्यांच्या तीन राजकन्यांचा. तु त्यात सहभागी हो. अंबा, अंबिका आणि अंबालिका मला पुत्रवधू म्हणून हव्या आहेत."
"महाराणी सत्यवती?"
"काळजी नसावी. तुझी प्रतिज्ञा मी तुला मोडायला सांगणार नाही."
"मग राजमाता, ही स्वयंवरास जाण्याची आज्ञा ?"
" विचित्रवीर्यसाठी, भीष्म!"
"पण राजमाता, नियमाप्रमाणे, स्वयंवर विचित्रवीर्यने स्वतः जिंकायला हवे. स्वयंवरात कन्या वीराचे सामर्थ्य पाहते राजमाता, त्यांच्या नगरीचे नाही."
"भीष्म, युद्ध सैनिकाने केले तरी त्याचे श्रेय राजालाच जाते आणि त्याचे फलित यश सुद्धा!"
"पण महाराणी, स्वयंवराचे नियम युद्धनियमांपेक्षा भिन्न असतात."
"भिन्न? भीष्मा, युद्ध असो वा स्वयंवर, जिंकणे महत्त्वाचे! ते राजाने स्वसामर्थ्याने जिंकले काय आणि सैनिकांच्या सामर्थ्यावर जिंकले काय; सारखेच!"
"परंतु राजमाता हस्तिनापुरास त्याचे आमंत्रणही नाही."
"भीष्मा, ही राजआज्ञा समज." सत्यवतीने शेवटचा पत्ता टाकला. हा एकच शब्द! 'राजआज्ञा'.
"आज्ञा असावी." भीष्मांनी नमस्कार करून कक्ष सोडला.
भीष्माच्या प्रतिज्ञेचा असा आज्ञा देत वापर करून घेणे, सत्यवतीच्या जीवावर यायचे. पण हस्तिनापूरची राजगादी रिक्त राहू नये ह्या साठी असे करणे गरजेचे होते. शंतनू महाराजांचा देहांत होऊन २० वर्षे झाली. पण भीष्माची प्रतिज्ञा अबाधित होती. एक मनुष्य आपल्या आयुष्याचा असा कारावास करुन घेउ शकतो? तिला लहानपणी पिता निषादने सांगितलेली कथा आठवली. हरिश्चंद्रने सत्यासाठी केलेले राज्यदान! अंगावर काटा उमटला. त्याहूनही त्याच राज्याचे दास बनून राहाणे अवघड. महाराणी म्हणून एका मत्स्यकन्येला भीष्माने दिलेला मान स्वप्नवत होता.
पण सर्वांच्या नजरेत ती गुन्हेगार होती. आता नगरीतली कुजबुज तिच्याही कानांवर पडू लागली होती.
"राजगादीची सेवा करणारा, राजगादीवर बसलेल्या राजापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे असे ऐकलेय का कधी?" - "ज्ञानी, बुद्धीमान आणि तत्वनिष्ठ सुद्धा!"- " हे असे एकच राज्य आहे अवघ्या पृथ्वीवर! हे हस्तिनापुर."- " मग काय त्या महाराणीला काय नाही दिले या हस्तिनापुराने? महाराणी पद, राजमातेचा सन्मान, दोन्ही पुत्रांना मिळालेला मान.... आणि महाराणीने काय केले? आमच्या भीष्माचार्यांना दास बनवले. " नगरी भ्रमण करताना नगरवासीयांच्या नकळत तिने ऐकलेले बोल तिला सतत बोचत होते.

' सत्यवती ने काय दिले? ज्या चित्रांगद ने गंधर्वयुद्धात बलिदान दिले, तो याच सत्यवतीचा पुत्र होता.' तिला चित्रांगत ची आठवण आली तशी सत्यवती तोल गेल्यासारखी आसनावर ढासळली. तिच्या डोळ्यांत पाणी आले. 'पुत्रवियोगाचा श्रावणाच्या अंध माता- पित्यांचा शाप दशरथासोबत साऱ्याच राजवंशाला लागला असावा! चित्रांगद आग्रज म्हणूनच नाही पण योग्यतेनुसारही राजगादीला पात्र होता. राज्याभिषेकानंतर गंधर्वांसोबतच्या युद्धात त्याला प्राण त्यागावे लागले नसते, तर आज या हस्तिनापूरचा राजा म्हणून चित्रांगदच गेला असता हे स्वयंवर जिंकायला.' सत्यवती विचारांमध्ये गुरफटून गेली, " विचित्रवीर्यची नाजूक तब्येत त्याचे दुबळेपण बनले.... पण म्हणून त्याला अविवाहित आणि राजगादीला अवारीस ठेवायचे हा तरी कुठला न्याय आहे? भीष्म ने घेतलेली प्रतिज्ञा त्याला विवाह करु देत नाही आणि ना राजगादीवर बसू देते. मग अश्या स्थितीत भीष्मास मनावर दगड ठेवून त्याला दासाला द्यावी तशी आज्ञा द्यावी लागते. त्याच्या इच्छेविरुद्ध! त्याच्या प्रतिज्ञेचा भाला त्याच्याच पाठीत खुपसताना होणाऱ्या यातना काय माहित या नगरवासीयांना?' सत्यवती ने अश्रू पुसले.
"या योजनगंधेची महाराणी सत्यवती झाली, त्या दिवसापासून ती राजगादीशी प्रामाणिक होण्यास बांधील झाली. मी आज पर्यंत पाळत आलेय माझं हस्तिनापुरप्रती असलेलं कर्तव्य, महाराज!"' तिच्या कक्षेत लावलेल्या शंतनूच्या भल्या मोठ्ठ्या चित्राकडे पाहत ती उद्दगारली.

©मधुरा

धर्मलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 2:48 pm | जॉनविक्क

ओह माय गॉड युगांतर आरंभ अंताचा भाग ११ येऊन त्याला माझे विधानस्पर्श घडून 7-8 प्रतिसादही येऊन गेले पण जल्ला मेला मी या धाग्याला अनुल्लेखाने मारल्याने अजून एकही प्रतिसाद यावर आला नाही ?

निष्ठावान वाचक, चाहता वगैरे वगैरे म्हणता म्हणता घोर अन्यायच घडला कि माझ्या कडून.

असो चूक सुधारायलाच मी प्रतिसाद प्रपंच करत आहे म्हणजे किमान माझे कर्तव्य मी बजावले ते हि बेगडीपणा न बाळगता याचे तरी समाधान असेल.

असो, तर सांगायचा प्रकट मुद्दा हा कि आपण या लिखाणातून नेमकं काय सांगू इच्छित आहात यावर आपण आणि वाचकही अनभिज्ञ भासत आहेत.