जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने

Primary tabs

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
15 Jul 2019 - 12:40 pm

तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या. प्रसारमाध्यमांनी अमावस्या, खग्रास सूर्यग्रहण इत्यादी गूढ धाग्यांनी विणलेला पातळसर का होईना पण एक संरक्षित पडदा संबंधित दोषींच्या सभोवताली गुंडाळला आणि वाहून गेलेल्यांच्या मागे उरलेल्यांचे दुःख कमी करण्याचे पुण्यकर्म पार पाडले. जलसंधारण मंत्र्यांनीदेखील त्यांच्यापरीने त्याचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांना तो त्यांच्या ठायी असलेल्या काळ्या विनोदबुद्धीचा (ब्लॅक ह्युमर) आविष्कार वाटला. पण म्हणून धरणे बांधणे अयोग्य आहे, असे म्हणणे योग्य ठरेल काय ? तर निश्चितच नाही.

परंतु अशी छोटी छोटी धरणं म्हणजे - जमिनीची उपलब्धता, त्यांचा बांधकामाचा खर्च, त्यामध्ये राहणारे तांत्रिक दोष, बांधकाम पूर्ण झाल्यावर निकाली निघणारी सदोष धरणं, बांधकामासाठीचा कालावधी, त्यांची मर्यादित उपयुक्तता, त्यामधील पाणी वापरात आणण्यासाठी राबवावी लागणारी खर्चिक यंत्रणा आणि मोठ्या प्रमाणावर खर्च होणारी वीजऊर्जा, ती यंत्रणा आणि धरण यांच्या निगराणीसाठीचा खर्च, त्यासाठी पोसावी लागणारी यंत्रणा आणि होणारा प्रचंड निष्फळ खर्च, उध्वस्त झालेले विस्थापित, त्यांचे कथित पुनर्वसन आणि त्यासाठी होणारा खर्च आणि सर्वात शेवटी एव्हढे सर्व करूनही पदरात पडणारं तिवरे धरणासारखं एखादं अपयश आणि मनामध्ये भीती बसवणारी त्याच्यापुढेच रांगेत असणारी इतर गळकी आणि उपेक्षित धरणांची यादी, हे सगळं म्हणजे आंधळं दळतंय आणि ....... ह्या म्हणीचा प्रत्यय देणारी वस्तुस्थिती. पाण्याची उपलब्धता ह्या मानवी गरजेतून निर्माण झालेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता कोणत्या मार्गाने व्हायला हवी याचा पुनर्विचार किंवा पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच त्यासाठी पर्यायी विचारांचा शोध घ्यायला हवा.

महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असंख्य धरणे बांधली गेली आणि त्यावर प्रचंड पैसा खर्च केला गेला. काही धरणे मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही अर्धवटच राहिली, आणि काही पूर्ण होऊनही त्यांच्या संलग्न व्यवस्था (कालवे इ.) अपूर्ण किंवा सदोष राहिल्याने त्या धरणांची कार्यक्षमता कायमच प्रश्नांकित राहिली. ह्या धरणांनी राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असला तरी ती बांधण्याचा दुसरा मुख्य सिंचनाचा उद्देश आजच्या घडीला तरी बहुतांशी असफल झालेला दिसत आहे. ह्या धरणांमुळे सिंचनाखाली आलेल्या एकूण क्षेत्राची आकडेवारी देण्यास ह्या प्रश्नावर गोंधळ घालणाऱ्या आणि गोंधळात पडणाऱ्या अशा दोन्ही सरकारांना संधी मिळूनही पूर्णपणे अपयश आले आहे.

शेतीसिंचनासाठी आजच्या घडीला राज्यातला शेतकरी हा पूर्णपणे पावसावर आणि कुपनलिकांवर अवलंबून आहे हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शेतीसाठी अधिकाधिक खोल जाणाऱ्या कुपनलिकांमधून अमर्याद पाण्याचा उपसा होत आहे, हे आजचे चित्र आहे. त्याचाच परिणाम म्हणून एकूणच जमिनीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. "चिंताजनक पातळी" असे म्हणणे म्हणजे अद्यापही स्वतःला फसवत राहण्यासारखेच आहे. पृथ्वीच्या पोटातले पाणी संपले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आपण ह्या हजार हजार फूट खोल जाऊन जमिनीच्या पोटातील पाणी अमर्याद उपसणाऱ्या कुपनलिकांना जबाबदार ठरवत आहोत. पाण्याच्या दुर्भिक्षाची जबाबदारी जेव्हा एकीकडे आपण ह्या कुपनलिकांवर टाकतो तेव्हा दुसरीकडे नकळतपणे आपण धरणांच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत असतो. जर आपण आपल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या दोन्ही गरजा जर बहुतांशी जमिनीच्या पोटातील पाण्याने भागवत असू तर जमिनीच्या वर धरणे बांधण्याचा खर्चिक मार्ग सर्रासपणे अवलंबणे योग्य आहे का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पाणी वापरायचं जमिनीच्या पोटातलं आणि ते अनाठायी खर्च करून साठवायचं मात्र जमिनीच्या वर हा अव्यापारेशु व्यापार तर ठरत नाही ना, याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. 'जिथलं पाणी वापरायचं तिथंच साठवायचं ' ह्या पर्यायाचा विचार सामान्य माणसांसह सर्वांनीच गांभीर्याने करणे आवश्यक आहे. भूगर्भातील हे पाण्याचे साठे म्हणजे "जमिनीखालची धरणेच" आहेत, जी आपण वर्षानुवर्षे अमानुषपणे केवळ उपसतच आलो आहोत. ही "जमिनीखालची धरणे" निसर्गदत्त आहेत. आजतागायत एकही पैसा खर्च न होता त्यांनी आपल्याला सेवा दिली आहे आणि मानवी हस्तक्षेपविरहित सर्वोच्चतम दर्जाची कार्यक्षमता दाखवली आहे. शिवाय ह्या "जमिनीखालच्या धरणांनी" सर्वसामान्य लोकांसाठी नेहमीच एक सहजसाध्य, सर्वसमावेशक, सक्षम आणि स्वावलंबी मार्ग दाखवला आहे.
आता ही "जमिनीखालची धरणे" भरण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनीच ही धरणे पुन्हा प्रयत्नपूर्वक भरण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्या जमिनीखालच्या धरणांनी आपल्याला हजारो वर्षे जगवलं आहे. परंतु काळाप्रमाणे बदलत गेलेल्या आपल्या "निसर्गपरास्त" (निसर्गविरोधी) जीवनशैलीने ती धरणं पुन्हा भरण्याची साधनं कमी कमी होत गेली आहेत आणि त्यांना ओरबडण्याचे प्रमाण मात्र प्रचंड वाढलं आहे. आपल्या ह्या स्वार्थी, अविचारी आणि अदूरदर्शी प्रवृत्तीचे परिणाम म्हणून आजच्या घडीला जमिनीवरची आणि जमिनीखालची अशी दोन्ही प्रकारची धरणं कोरडी पडल्याचे आपल्याला आढळतं. ती ह्या क्षणापासून प्रयत्नपूर्वक भरायला सुरवात केली पाहिजे. अन्यथा पाण्याशिवायच्या आपल्या भवितव्याचे चित्र आपल्या सगळ्यांनाच स्पष्ट आहे.

जमिनीच्या वर असलेल्या धरणांचा विषय आपल्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. परंतु वारसाहक्काने आपल्याला मिळालेली ही निसर्गदत्त जमिनीखालची धरणे पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध करणे हे केवळ आणि केवळ आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याच हातात आहे. तेसुद्धा कुणाचीही मदत न घेता आणि अगदीच अल्पशा खर्चात. छोट्या छोट्या गोष्टींमधून अविश्वसनीय अशा भव्य दिव्य गोष्टी निर्माण करणे हीच तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची ताकद आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने जर एक छोटीशी, सहजसाध्य आणि अल्पखर्चीक अशी गोष्ट सजगपणे आणि जाणीवपूर्वक केली तर आपण सर्वजण ही रिकामी झालेली जमिनीखालची धरणं पूर्वीसारखीच पाण्याने समृध्द करू शकतो आणि आपले पाण्याचे दुर्भिक्ष कायमसाठी संपवू शकतो.

"पाण्याचे कारखाने"

ही जमिनीखालची धरणं जर आपल्याला पुन्हा पाण्याने समृद्ध करायची असतील तर त्यासाठी "जमिनीचे पुनर्भरण" हाच एक कुणालाही सहजपणे करता येईल असा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग उपलब्ध आहे. शेती करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये नैसर्गिकपणे जिरण्याचे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बंद पडलेली शेती, जंगलतोड, होणारी विकासकामे इत्यादी गोष्टींमुळे पावसाळ्यात आकाशातून जमिनीवर पडलेल्या पाण्याचा वाहून जाण्याचा वेग खूपच वाढला आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाण्याचे हे जीवनस्वरूप आकाशातील पाणी जमिनीवर पडून ते समुद्राला मिळेपर्यंतच्या कालावधीपूरतेच मर्यादित असते. हा कालावधी हेच "पाण्याचे आयुष्य" असते. सध्याच्या काळात ह्या कालावधीमध्ये पाण्याला अडवून ते जमिनीमध्ये जीरवणाऱ्या घटकांची (शेती, झाडं, जंगलं, पाळे, मूळे इत्यादी) संख्या कमी झाल्यामुळे जे पाणी थांबत थांबत ( जिरत जिरत ) वहायचे ते जलदगतीने वाहू लागले आहे. साहजिकच वाहत जाऊन समुद्राला मिळण्यापर्यंतचा त्याचा कालावधी कमी झाला आहे. पर्यायाने "पाण्याचे आयुष्य" कमी झाले आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो त्या जीवनाचेच जीवनमान कमी झाले आहे. पाण्याचे आयुष्य जर आपल्याला वाढवायचे असेल तर पाण्याचा समुद्रापर्यंतचा हा प्रवास थांबवला पाहिजे किंवा किमान लांबवला पाहिजे. पावलापावलावर जमीन पुनर्भरणाची साधने उभी राहिली, आपण ती निश्चयपूर्वक निर्माण केली तर ते अजिबात अशक्य नाही.
आपल्यापैकी प्रत्येकाचे घर किंवा आजूबाजूची प्रत्येक इमारत म्हणजे लहान मोठ्या आकाराचा आणि कमी अधिक क्षमतेचा "पाण्याचा कारखाना" आहे याची जाणीव प्रत्येकाने स्वतःला करून द्यायला हवी. कोकणात वर्षभरात सरासरी ३५०० मिमी (३५० सें. मी) पाऊस पडतो. १००० चौ. फू. क्षेत्रामध्ये ३५० सें. मी. पाऊस पडला तर साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीवर पडून वाहून जाते. १००० चौ. फू. च्या घरामध्ये राहणाऱ्या पाच माणसांच्या कुटुंबाला वर्षभरात सुमारे एक लाख लिटर पाणी लागते, जे निसर्गाकडून आपण घेतो. कोकणातले तेच घर वर्षभरात छपरावर पडणारे साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीवर पडून वाहू देते. निसर्गाकडून घेतलेले पाणी ते घर अडीचपटीने निसर्गाला परत करू शकते. आपल्या घराची पागोळी वाचवून फक्त घराशेजारी तयार केलेल्या खड्ड्यात सोडण्याएव्हढी ही सोपी गोष्ट आहे. इतर कोणत्याही बाबतीत परतफेडीची अशी संधी निसर्ग आपल्याला देत नाही. तेव्हा निसर्गाचे अंशतःतरी उतराई होण्याची ही संधी आपण साधायला हवी.

नमुनादाखल माझ्या गिम्हवणे ( ता. दापोली, जि. रत्नागिरी ) गावाचे उदाहरण घेऊ. म्हणजे आपण नेमकं काय करतो आहोत ते लक्षात येईल.
गावाची लोकसंख्या ५०२५ इतकी आहे. दरवर्षी माणशी २०००० लिटर ह्या हिशोबाने गावाची पाण्याची गरज दहा कोटी पाच लाख लिटर आहे. गावाचे क्षेत्रफळ ८.०६ चौ. कि. मीटर म्हणजे ऐंशी लाख चौरस मीटर आहे. ३५० सें. मी. च्या हिशोबाने माझ्या गावावर निसर्ग वर्षभरात एकूण तीन हजार बारा कोटी ऐंशी लाख लिटर पाण्याचा वर्षाव करतो. गावात पडणाऱ्या पावसाच्या एकूण पाण्याच्या केवळ अर्धा टक्का पाणी ही माझ्या गावाची गरज आहे. तरीदेखील माझ्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तुम्हीदेखील तुमच्या घराचे, आवाराचे आणि एकूणच गावाचे गणित मांडा आणि निसर्ग आपल्याला किती पाणी उपलब्ध करून देतो ते पहा, आणि तरीदेखील तुमच्या गावामध्ये जर पाण्याचे दुर्भिक्ष असेल तर त्याचे तुम्हाला मिळालेले उत्तर एकच असेल, "केवळ पाणी न जिरवल्यामुळे !"

सुनील प्रसादे.
दापोली.
दि. १० जुलै २०१९.
( चुकभुल द्यावी घ्यावी)
----------------------------------------

आम्ही सुरू केलेल्या "पागोळी वाचवा अभियानाला" राज्यभरातील वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाणी ह्या विषयाबाबत लोकांची मने आत्यंतिक संवेदनशील असल्याचीच ती ग्वाही आहे. अनेकांनी अशाप्रकारचे काम पूर्वीच केले असल्याचे सांगितले, तर अनेकांनी ते करण्याबाबत क्रियाशील उत्सुकता दाखवली. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या अभियानाने लोकांच्या मनातील तळमळीला वाट दाखवली आणि कृती करण्यासाठी उद्युक्त केले. तुम्हीदेखील तुमच्या मनाची संवेदना हरवू देऊ नका. "पागोळी वाचवा अभियान" बद्दलची माहिती आणि व्हिडीओ कुणाला मिळाला नसेल किंवा अधिक माहिती कुणा इच्छुकाला हवी असल्यास ८५५४८८३२७२ ह्या व्हाट्सअप्प नंबरवर स्वतःचे संपूर्ण नाव, गाव, आणि जिल्हा ही माहिती पाठवली तर सदर माहिती निश्चितपणे पाठवली जाईल.

"आज जे पाणी पेराल ते पुढच्या उन्हाळ्यात निश्चितपणे उगवलेलं दिसेल."

सुनील प्रसादे.

समाजजीवनमानप्रकटनविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतरांनीही कृतीत आणावे असे स्पृहणिय "पागोळी वाचवा अभियान" ! अभिनंदन !!

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 4:45 pm | सुनिल प्रसादे

धन्यवाद डॉक्टर !

यशोधरा's picture

15 Jul 2019 - 1:00 pm | यशोधरा

चांगला लेख. ह्या लेखातच व्हिडिओ का उपलब्ध करून दिला नाही? इथेच लिंक देऊ शकता.

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 11:58 am | सुनिल प्रसादे
उगा काहितरीच's picture

15 Jul 2019 - 1:06 pm | उगा काहितरीच

छान आहे उपक्रम.खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 4:47 pm | सुनिल प्रसादे

धन्यवाद !

प्रमोद देर्देकर's picture

15 Jul 2019 - 1:20 pm | प्रमोद देर्देकर

अतिशय अभ्यासपूर्ण महत्वपूर्ण लेख.
स्तुत्य उपक्रम .

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 4:48 pm | सुनिल प्रसादे

धन्यवाद साहेब !

स्नेहांकिता's picture

15 Jul 2019 - 2:27 pm | स्नेहांकिता

म्हणजे Rain water harvesting च ना ?

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 4:52 pm | सुनिल प्रसादे

हो! त्याविषयीच काहीतरी !
परंतु, संपूर्ण मानवजातीच्या आयुष्याशी निगडित असलेल्या विषयाला एव्हढे किरकोळ समजून चालणार नाही.

जालिम लोशन's picture

15 Jul 2019 - 3:54 pm | जालिम लोशन

अनुकरणीय।

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 4:53 pm | सुनिल प्रसादे

धन्यवाद !

कुमार१'s picture

15 Jul 2019 - 4:21 pm | कुमार१

छान आहे उपक्रम.

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 4:57 pm | सुनिल प्रसादे
मुक्त विहारि's picture

15 Jul 2019 - 11:30 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद. ..

अभ्यासपूर्ण (?) वाटणारा एकांगी लेख!
तुमचे "पागोळी वाचवा अभियान" हा उपक्रम स्तुत्य आहे. पण अमुक वाईट आहे म्हणून तमुक चांगले आहे अशा छापाचा आमचा उपक्रम चांगला आहे हे पटवण्यासाठी धरणे वाईट असल्याचा युक्तिवाद न पटणारा आहे.
धरण फुटण्यासारख्या गोष्टी काही दशकांतून एकदा होत असतात, पण ति बांधली नसती तर दुष्काळी किंवा पूर परिस्थिती वर्षाआड येऊ शकते इकडे दुर्लक्ष होतंय. धरणग्रस्तांचे पुनर्वसन हे राजकीय किंवा प्रशासकीय अपयश असेल पण त्याच्या बांधणीमुळे होणारे फायदे हे बहुउद्देशीय आणि दीर्घकालीन असतात. आजूबाजूच्या प्रदेशात पिण्याच्या पाण्याची, सिंचनासाठीची गरज भागवत असताना जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी स्वस्त आणि स्वच्छ वीज मैलोगणीक प्रदेशातला अंध:कार दूर करत असते.

जमिनीखालची धरणे पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध करणे हे केवळ आणि केवळ आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याच हातात आहे. तेसुद्धा कुणाचीही मदत न घेता आणि अगदीच अल्पशा खर्चात.

धरणे बांधण्यासाठी सरकार पुढाकार घेते त्यासाठी रोज्गागर हमी योजना, मनरेगा सारख्या खर्चिक योजनांचे पाठबळ असते. पण जिथे स्वतःच्या खिशास तोशीस लाउन जमिनीखालची धरणे पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध करण्या सारख्या गोष्टी येतात तेव्हा लोकांना त्या व्यवहार्य आहेत का वगैरेंसारखे प्रश्न पडतात. सगळ्या गोष्टी सरकारने कराव्या अशी अपेक्षा बाळगणाऱ्या समाजाकडून स्वखर्चाने काही करण्याची अपेक्षा बाळगणे अवाजवी आहे.
असो, लेख चांगला आहे पण थोडा एकांगी वाटल्याने हा प्रतिसाद प्रपंच!

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 11:20 pm | सुनिल प्रसादे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
पुन्हा एकदा शांतपणे वाचा. तुम्ही म्हणता तसे त्यामध्ये काहीच नाही, हे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा कोणताही नवीन विचार मांडण्याची आवश्यकता निर्माण होते, तेव्हा त्याच्यामागे निश्चितपणे कोणतीतरी पार्श्वभूमी तयार झालेली असते. कोणत्यातरी अकल्पित घटनेमुळे ती प्रखरपणे पुढ्यात येऊन उभी राहते आणि मग त्या पार्श्वभूमीवरच कोणतातरी नवीन विचार उभा राहतो किंवा त्याचा शोध सुरू होतो. काही मोठी धरणे सोडली तर इतर धरणांचे वास्तव रोज उठून आपल्यासमोर नाचते आहे. ज्यांच्यासाठी मुख्यत्वे ही धरणे बांधली जातात आणि ज्यांचे संपूर्ण जीवनच अशा धरणांवर अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या शेतीचे वास्तव रोज आपल्यासमोर उघडे होऊन नाचते आहे.
धरणांना विरोध कुठेच नाही, परंतु इतर कोणताही विचार न करता सर्रासपणे तो मार्ग अवलंबवावा का हा प्रश्न आहे. शिवाय सगळ्यात मोठा प्रश्न आहे खर्चाचा. ह्याच धरणांच्या नावाखाली तुमचा आमचाच पैसा बेहिशेबी वापरला जातो आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. त्यासाठीच धारणांचेच हेतू साध्य करणारा परंतु अत्यंत अल्प खर्चाच्या अशा दुसऱ्या स्वावलंबी पर्यायाचा विचार लोकांच्या मनात अंकुरावा म्हणून हा प्रयत्न. बाकी काही नाही.
तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद!

कंजूस's picture

16 Jul 2019 - 6:37 am | कंजूस

करायलाच हवे.

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 11:22 pm | सुनिल प्रसादे

धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

16 Jul 2019 - 8:49 am | सुधीर कांदळकर

चांगला मांडला आहे.

ही "जमिनीखालची धरणे" निसर्गदत्त आहेत. आजतागायत एकही पैसा खर्च न होता त्यांनी आपल्याला सेवा दिली

हे पटले नाही. विहीर खणायला खर्च पूर्वी येत असे, आताही येतो.

तरी लेख आवडला. धन्यवाद.

फुटूवाला's picture

16 Jul 2019 - 9:41 am | फुटूवाला

असतील ते. ज्याचा आपण विहीर आणि कूपनलिकांद्वारे उपसा करत आलोय.
भूगर्भातील हे पाण्याचे साठे म्हणजे "जमिनीखालची धरणेच" आहेत, जी आपण वर्षानुवर्षे अमानुषपणे केवळ उपसतच आलो आहोत. ही "जमिनीखालची धरणे" निसर्गदत्त आहेत.

लेख आवडला. यावर शक्य तितक्या लवकर विचार नाही केला तर भयावह परिस्थितीला तोंड देण्याची वेळ यायला उशीर नाहीये.

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 11:24 pm | सुनिल प्रसादे

विषय आपण खणलेल्या विहिरी आणि कुपणालिकांचा नाही आहे. तो भूगर्भातील संपलेल्या पाण्याच्या साठ्यांबद्दल आहे. धन्यवाद!

गवि's picture

16 Jul 2019 - 9:46 am | गवि

सुंदर लेख.

याच विषयावर अनिल अवचट यांचा पाणी आणि माती हा लेख वाचला होता. धोंडेसर आणि अन्य तज्ञ लोकांचे त्यात उल्लेख होते. समपातळीवरील चर, कंटूर मार्कर हे स्वस्त उपयुक्त उपकरण, डोंगराची (जणू) टाळू भरणे असे खूप रोचक भाग त्यात आहेत. शेवटी "हिरवी स्वप्नं पहायला आता हरकत नव्हती" असं समर्पक क्लोजर आहे.

या विषयावर आणखी लेखन वाचन चर्चा व्हावी. सर्वच उपाय व्यवहार्य नसतील, कदाचित काही आशावाद भाबडे असतील. पण केवळ छिद्रान्वेषी विचार करण्यापेक्षा काही वेगळे मार्ग आहेत का याची चर्चा झाल्यास वाचायला आवडेल.

फुटूवाला's picture

16 Jul 2019 - 9:57 am | फुटूवाला

या विषयावर आणखी लेखन वाचन चर्चा व्हावी. सहमत.
बीड जिल्ह्यात अतिशय भयंकर परिस्थिती पाहिली. मागील दोन वर्षात नाम फाऊंडेशन कि अजून कोणी काही काम केलीत. खूप फायद्याचं ठरलंय ते. प्रत्येक ओढा, नाल्यात दर दहा फूट अंतरावर ओढा, नाल्याची जेवढी रुंदी आहे त्या रुंदीच्या चौरस फुटाचे खड्डे केलेले आहेत. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यावर कळलं कि पहिल्याच पावसाळ्यानंतर विहिरीचे पाणी दीर्घकाळ टिकले.
असे काम खूप मोठ्या प्रमाणात झाले तरच काही होणार आहे.
करणार कोण?
त्यासाठी बरेच मार्ग काढता येतात. सगळ्यात आधी भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे हि भाबडी आशा.
शासन, अमुकतमुक मित्र मंडळ, अमक्याढमक्या समाजसेवी संस्था(ज्या ढोंग घेण्यापलीकडे क्वचितच काही करतात) आणि हो शेतकऱ्यांनी सुद्धा हातभार लावला पाहिजे.
या कामासाठी सगळ्यात महत्वाचे JCB. इतर शासकीय कामांचे कंत्राट देतानाच काही अटी घालून कंत्राटदाराला या कामांची सक्ती केल्यास शक्य होईल. अर्थात हे माझे वै.म.

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 11:28 pm | सुनिल प्रसादे

पर्यायांची व्यवहार्यता भावनांवर ठरवायचीच नसते. ती अकड्यांवरच आधारित असावी लागते. धन्यवाद !

Rajesh188's picture

16 Jul 2019 - 10:04 am | Rajesh188

पाणी हे जीवन आहे आणि पाणी नसेल तर जीवन अस्तित्वात राहूच शकत नाही .
धरण ही खूप मोलाची भूमिका बजावतात.
खूप सारी जमीन ओलिताखाली येते त्यामुळे देशाची अन्न धान्य ची गरज भागते,जनावरांना चारा मिळतो त्या मुळे दुधाची गरज bhagte.
वीज स्वस्त उपलब्ध होते खूप फायदे आहेत
धरण आहेत म्हणून जमिनीतील पाण्याचा उपसा सुद्धा कमी होतो आणि जलस्तर राखला जातो .
जमिनीतील पाणी वाचवण्यात धरणांचा मोठा हातभार आहे हे सत्य लेखक डोळ्या आड करत आहेत .
जमिनीत पाणी मुरवल पाहिजे हे अगदी योग्य आहे कारण धरणे असून सुद्धा पाण्याची गरज भागत नाही .
पाणी कमी पडत आहे .
पाणी कसे मुरवावे ह्या वर शास्त्रीय विचार करून उपाय अमलात आणले पाहिजेत .
काही ठराविक रचना असलेली जमीनच पाणी साठवून ठेवते त्याचा सुद्धा अभ्यास हवा .
धरणात विशाल पाणीसाठा असून सुद्धा काही विशिष्ट प्रमाण नंतर ते पाणी जमिनीत मुरते अस नाही .
तसे असते तर धरणालगत असलेल्या भागात जलस्तर उंचावला असता .

गवि's picture

16 Jul 2019 - 10:22 am | गवि

समतोल प्रतिसाद.

हाच मुद्दा आहे की स्थळ काळ लक्षात घेऊन योग्य ती योजना व्हावी. "धरण"वाले विरुद्ध "जिरवा"वाले असा संघर्ष नको.

कुठे किती पाऊस पडतो, कशा स्वरूपात पडतो (खूप कमी काळ पण ढगफुटीसारखा ताडताड, सतत पण कमी जोराने, अतिरिक्त इत्यादि), जमिनीचा प्रकार, खडकाचा प्रकार असे अनेक घटक पाहून तज्ञ लोक हे निर्णय घेऊ शकतात.

पाणी जिथे जिरणं शक्य आहे तिथे ते जिरावं (नंतर पुरेसं पुन्हा मिळणार असेल तिथे). हे एक तत्व म्हणून योग्य वाटतं. अर्थात पुन्हा समुद्रात जाणारं पाणी हेही वाया गेलं असं म्हणवत नाही.

अभ्यासाशिवाय पूर्ण सत्य समोर येणार नाही.

गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल तर तिथे बोरिंग हि असतातच . मग हे पन्हाळीचे पाणी जिरवण्यासाठी ह्या बोरिंगचाच वापर का होऊ नये ? हे पाणी जर बोरिंग च्याच पाइप ने बोरिंग मध्ये सोडले तर सर्व च्या सर्व पाणी खूप कमी वेळ , पैसे आणि शक्ती वापरून जमिनी खाली साठवता येईल आणि भूजल पातळी एका पावसाळ्यात वर आणता येईल . ह्या शक्यतेवर कोणी काम करताहेत का ?

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 11:36 pm | सुनिल प्रसादे

निश्चितच! जमिनीचे पुनर्भरण करण्याच्या अनेक पर्यायांपैकी कुपनलिकांद्वारे पुनर्भरण हा जमिनीमध्ये अधिक खोलवर पाणी नेऊन जीरवणारा एक उत्तम पर्याय अनेक लोकांनी अमलात आणला आहे. फक्त असे करताना जरा विशेष काळजी घ्यावी लागते. धन्यवाद !

Rajesh188's picture

16 Jul 2019 - 2:21 pm | Rajesh188

तुम्ही जमिनी तील पाणी वापरलं जरी नाही तरी पाण्याची पातळी खाली खाली जाते उन्हाळ्यात .
म्हणजे एकाही विहरी तून kupnaliketun पाण्याचा उपसा केला नाही तरी पाण्याची पातळी खाली जाते .
ह्या प्रकार कडे दुर्लक्ष करू नका

Rajesh188's picture

16 Jul 2019 - 2:44 pm | Rajesh188

आपण जसे समजतो तेवढं हा विषय सोपा नाही .नुसते खड्डे घेवून जमिनीत पाणी मुरणार नाही खूप गोष्टी वर ते अवलंबून आहे .
जमीन कोणत्या प्रकारची आहे हे जसे महत्त्वाचे आहे तसेच वनस्पती ची मुळे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात .
पण ह्या विषयात सखोल माहिती कुठेच उपलब्ध नाही.
जी आहे ती उथळ माहिती आहे वरवर ची.

सुनिल प्रसादे's picture

16 Jul 2019 - 11:43 pm | सुनिल प्रसादे

विषयाला हात घालायचा म्हटलं तर अगदी सोपा, समज गैरसमजांमध्ये अडकून पडलो तर महाकठीण. आपल्या घराच्या पागोळीचे पाणी एकत्र करून ते खड्ड्यामध्ये, विहिरीमध्ये किंवा कुपनलिकेमध्ये वरून सोडणे हा सध्यातरी जमिनीमध्ये वेगात पाणी जिरवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

नाखु's picture

16 Jul 2019 - 4:35 pm | नाखु

अत्यंत उत्तम लेख वाचायला मिळाला

धन्यवाद

नाखु वाचकांची पत्रेवाला नाखु

माझ्या गावात सरकारी योजने द्वारे काम झाले आहे .ओढ्या वर छोटे छोटे बांध जागोजागी बांधले आहेत त्यामुळे पाणी त्यात जमा होत असते .
नंतर ते जमिनीत मुरत असेल .
आणि डोंगर उतारावर असंख्य छोटे घेतले आहेत .
पण सिंचन व्ययस्था असल्या मुळे आणि गावात नळ पाणी योजना असल्या मुळे खूप कमी लोक विहरीवर अवलंबून असतात .
पहिले घरटी आड होते पिण्याच्या पाण्यासाठी .
नळ पाणी योजने मुळे त्याचा वापर होत नाही आणि पाणी उपलब्ध असल्या मुळे कमतरता जाणवत नाही .
पाणी जमिनीत मुरवण्याचे काम सर्व गावात झाले पाहिजे सरकार त्यांच्या परिनी करत आहेच लोकांनी सुद्धा आपला सहभाग वाढवला पाहिजे हे पटतंय

शेखरमोघे's picture

17 Jul 2019 - 7:50 am | शेखरमोघे

स्पृहणीय उपक्रम!! अभिनंदन!!
ज्या संस्था/ गावांनी माहिती मागितली त्यांच्या माहिती मिळवल्यानंतरच्या प्रयत्नांची आणि यशा/अपयशाची माहिती देखील जर मिळवता आली तर या प्रश्नाबद्दल आणखीही मोठा प्रमाणावर काम करता येईल,

चष्मेबद्दूर's picture

17 Jul 2019 - 9:59 am | चष्मेबद्दूर

या विषयाला इथे वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद. सध्या या विषयावर tv , social मीडिया वर सुद्धा बरीच चर्चा होत आहे. सामान्य नागरिक म्हणून आपण पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे आणि शक्य तितकं पाणी जमिनीत मुरवलं पाहिजे हि गोष्ट तर खरीच. पण शेतकरी कोणती पिकं घेतात यावर सुद्धा जमिनीतल्या पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. उदा. कापूस, भात आणि ऊस या पिकांना सगळ्यात जास्त पाणी लागतं असं मी वाचल्याचं मला आठवतंय.
आपण पाणी जिरवायला हवंच आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतू आता फक्त एकांगी विचार करून भागेल का अशी माझी शंका आहे.
(प्यायचं) पाणी डोक्यावरून गेलंय.

Rajesh188's picture

17 Jul 2019 - 11:09 am | Rajesh188

भात हे पीक पावसाळ्यात घेतलं जाते आणि ते पावसावर अवलंबून असते अगदीच गरज पडली तर विहरीच्या किंवा धरणाच्या पाण्याचा वापर केला जातो .
त्यात पण जास्त करून वाहत्या ओढ्याचे पाणी वापरतात,
ऊस हे 16 महिण्याच्ये पीक आहे ह्याला जास्त पाणी लागत ह्याचा अर्थ आहे ह्या पिकाला तयार होण्यास वेळ लागतो .
पण हेच पीक शेतकऱ्याला नगदी नफा मिळवून देते बाकी पीक नफा मिळवून देवू लागली की ऊस लागवड कमी होईल .
पण पेट्रोल ला पर्याय देणारे इंथन उसाच्या मळी पासून तयार होते त्याचा वापर वाढवला तर मोठे परकीय चलन वाचेल.
पाणी जिरवणे ह्याला सुधा शेतकऱ्यांच्या मोकळ्या जमिनी च कामाला येतात शहरात कुठे मोकळी जागा आहे .
कधी बातम्या एकांगी असतात तेव्हा अधिक माहिती करून नंतर मत बनवणे योग्य

छान लेख आणि पागोळी वाचवा अभियानही प्रशंसनीय, ह्या विषयावर जनजागृती होणे आवश्यक आहे.
अशाप्रकारचे काही प्रयोग केले आहेत पण अपेक्षित यश अजून मिळाले नाहीये. अभ्यास आणि प्रयत्न चालूच आहे.
धन्यवाद. पुढील लेखनास शुभेच्छा!