राजमाची २०१९०६०४

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
6 Jun 2019 - 7:43 pm

उन्हाळ्यात सह्याद्री न पाहणे अक्षम्य अपराध आहे. एरवी पावसात धबधबे, हिरवे डोंगर असतात. थंडीत भटकणे सुसह्य होते. पण रानमेवा मे महिन्यातच उधळला जातो. करवंदं, जांभळं, आंबे. आता आणखी एक कारण वाढले ते म्हणजे काजवे पाहणे. हे काय नवीन आहे का? नाही. काजवे होतेच, पण आताच्या camera तून फोटो काढण्याचा छंद वाढलाय. हे फक्त DSLR नाही तर नव्या लो लाईट मोबाईल cameraनेही शक्य होत आहे. पर्यटकांची झुंबड उडते आहे. आगामी ८-९,१५-१६ जूनचे विकांत बुक झाले आहेत. या पर्वणीसाठी राजमाची हे ठिकाण क्रमांक १ वर आहे. इथल्या उधेवाडी गावातील पाचसहा गाववाले हॉटेलींग करतात. दीड दोन हजार रुपयांत गुंडाळता येणारे तंबू मिळू लागल्याने जागा मिळेल तिथे तंबू ठोकतात आणि राहण्याची सोय होते. खंडाळ्याकडच्या डेला रिझॉटजवळून १६किमिटरसचा दगडाळ रस्ता पायी अथवा वाहनांनी पार करत दिवसा-रात्री कोणत्याही वेळेस पर्यटकांची गर्दी राजमाचीला येत आहे.

काजवे पाहायचे तर शेवटची अमावस्या उत्तम. किंवा पहिला पाऊस पडायच्या ढगाळ हवेत. मला कर्जत - कोंदिवडे मार्गे चढून जाणे सोयीचं वाटतं. ज्येष्ठ प्रतिपदा, मंगळवार, ४ जून. कर्जत ला सकाळी ट्रेनने येऊन शेअर ट्याक्सीने पावणे अकराला कोंदिवडे गावात उतरलो. इथे चहा-वडा टपऱ्या नाहीत, पोटोबा कर्जतलाच करावा. शिवाय आता या वाटेने पावसाळ्याशिवाय कुणी जात नाही.

फोटो १
अजून पावसाळी हवा नाही.

खरवंडी या पायथ्याच्या गावी जाण्याच्या एक किमी. डांबरी रस्त्यावर साताठ जांभळांची झाडे सडा घालून वाटच पाहात होती. ऊन वाढतय. खरवंडी गावातली विहिर गाठली.

फोटो २
खरवंडी गावचा आड।

पंचवीस फुटी मोठा आडच तो. पाणी खाली तीस फुट पण खूप, एक झरा अजूनही ठिबकठिबक सुरूच होता. पोहऱ्याने पाणी काढलं,बाटल्या भरून घेतल्या.

आता चार तास वाटेत पाणी मिळणार नव्हतं. चढणीला सुरुवातीलाच आमराई आहे. पन्नासेक झाडांपैकी एक दोघांचे आंबे असतातच. पाच दहा पिशवीत घ्यायचे वाटेत खाण्यासाठी.

फोटो ३
सावलीत बसा अन खा.

उन्हामुळे वर पोहोचायला चार वाजले.

फोटो ४
रूट

छत्री असूनही आग जाणवत होती. माथा ओलांडून गावात आलो तर सुखद वारा वाहत होता. आता उद्या दुपारपर्यंत उन्हाळा जाणवणार नव्हता. नेहमीच्या 'शिरिष' ( डुंबरे यांचे) हॉटेलकडे वळलो तर घर बंद, बाजूला मांडव घालत होते. दुसऱ्या एकाकडे गेलो - निलेश. चहा पोहेची सोय झाली. एक ग्रुप भजी खात होता. तिकडून वरच्या भैरोबा देवळात जाऊन ओसरीत पथारी पसरली.

फोटो ५
भैरोबा देऊळ, ओसरी.

अधुनमधून पर्यटक गडावर जात होते. सहा वाजता गावकरी देवळात आले.
"आज तीनचार वर्षांनी गावातल्या डुंबरे कुटुंबियांनी गोंधळ मांडलाय. दूरवर गेलेले भावबंदकीतले डुंबरे आलेत. इथे गावदेव भैरोबाला बोलावणं मग खाली मांडवापाशी 'पाच पावली' पुजा होईल. नऊपर्यंत जेवणं आटपली की गोंधळ पहाटेपर्यंत चालेल. खाली या जेवायला."
त्यांच्यापैकी एकजण पुढे झाला. उदबत्त्या कापूर लावून भैरोबाला मागणं केलं.
"तीनचार वर्षांनी भावबंदकी आली आहे. चुकलंमाकलं असेल मान्य कर." पुजा आटपून खाली गेले.

आठ वाजता आंधार झाला, काजवे जागे झाले. रात्री दोनचार पर्यटक आले आणि गडावर गेले. काजव्यांनी झगझगाट सुरूच ठेवला तो आडवा पडून पाहात होतो. गार वाऱ्याने छान झोप झाली. सकाळी सहाला गडावर पर्यटक येऊ लागले. त्यातल्या एकाशी ओळख होऊन दोघे गड फेरीला निघालो.

रात्रीच खंडाळ्याकडून चालत येऊन खाली गावात तो राहिला होता. मनरंजन गड ढगाच्या पडद्यात होता.

फोटो ६
मनरंजन किल्ला.

देवळामागच्या टाक्यातलं पाणी भरून घेतलं.
फोटो ७
देवळामागचं टाकं

फोटो ८
आडातले स्वच्छ पाणी. टाक्यातलंही स्वच्छ पिण्याचं आहे.

गड फेरी आटपून, खाली निलेशकडे चहापोहे करून परतीच्या वाटेला लागलो. साडेदहाचे ऊनसुद्धा कडक होते. करवंदं, आंबे,जांभळांचा आस्वाद घेत कर्जत स्टेशन गाठायला अडीच वाजले. पाऊस नसल्याने फोटोग्राफी सहज जमली.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Jun 2019 - 8:23 pm | यशोधरा

मस्त.

राजमाची सर्व ऋतूत, दिवसा व रात्रीही भटकलो असल्याने लेखकाचा अनुभव मी जगलो आहे हे नक्कीच ठामपणे म्हणू शकतो.

चौथा कोनाडा's picture

6 Jun 2019 - 8:55 pm | चौथा कोनाडा

सुंदर आटोपशिर वृतांत ! मस्त, झकास !!

उगा काहितरीच's picture

7 Jun 2019 - 8:39 am | उगा काहितरीच

एक प्रश्न आहे, गडकिल्ल्यावर मुक्कामी रहात असलेल्या भरपूर लोकांचे लिखाण वाचले. बाकी सगळं ठीक आहे पण सकाळी सकाळी येणाऱ्या निसर्गाच्या हाकेला ओ कसा देतात ते नाही कळालं.बऱ्याच प्रवासावर्णनात मुली पण असतात असं वाचलंय. हे कसं मॕनेज होतं ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Jun 2019 - 1:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्यात काय विशेष? २-३ जणांच्या ग्रुपने जायचं पाण्याची बाटली जवळ ठेवायची आणि आडोसा बघुन जरा लांब लांब बसायचं. पाच मिन्टात खेळा खल्लास.

मातीत घासुन हात धुवायचे कि मुक्कामाला परत. हा का ना का

उगा काहितरीच's picture

7 Jun 2019 - 1:51 pm | उगा काहितरीच

किल्ल्यावरच का ?

कंजूस's picture

7 Jun 2019 - 2:29 pm | कंजूस

किल्ल्यावरच का ?

- नाही. गडाचा मोठा घेरा आणि अगदी वरचा छोटासा बालेकिल्ला असतो तिथे नाही. याच्या खाली एक सपाट जागा असते त्यास माची म्हणतात. माचीवर एक पन्नासेक उंबऱ्यांचे गाव, मागे झाडी असते तो भाग वापरला जातो. ही छोटीशी गावं,गावकरीच वर्षभर किल्ला संभाळत असतात. हे गावकरी
लोकसंख्या दोनशेच्या आत असते. आणखी शंभर अधुनमधून आले तरी जागा आणि पाणी पुरे पडू शकतात.
पण आताच्या पर्यटनाचा धक्का सहन करू शकणार नाही. शनिवारी-रविवारी/ जोड सुट्टीला दीड हजार!

उगा काहितरीच's picture

7 Jun 2019 - 2:45 pm | उगा काहितरीच

धन्यवाद !

महासंग्राम's picture

7 Jun 2019 - 9:40 am | महासंग्राम

भारीच

गडकिल्ल्यावर मुक्कामी रहात असलेल्या भरपूर लोकांचे लिखाण वाचले. बाकी सगळं ठीक आहे पण सकाळी सकाळी येणाऱ्या निसर्गाच्या हाकेला ओ कसा देतात ते नाही कळालं.

- बऱ्याच वर्णनात टाळलं जातं हे खरं आहे.
१) काही चांगली पुस्तकं यावर सविस्तर लिहितात. उदा 'डोंगरयात्रा' - आनंद पाळंदे.
२) राजमाचीवर काही गावकऱ्यांनी बंदिस्त शौचालय बांधली आहेत.
३) काही अमुक एक संख्येने लोक आजुबाजूस रानात प्रातर्विधी साठी गेल्यास निसर्ग ते वाळवून,कुजवून टाकतो. पण असंख्य लोकांनी तीनचार दिवस मुक्काम केल्यास समतोल बिघडतो.

दुर्गविहारी's picture

7 Jun 2019 - 12:01 pm | दुर्गविहारी

छान लिहिले आहे. हल्ली या काजवे महोत्सवामुळे सह्याद्रीचे पर्यावरण धोक्यात येईल कि काय? अशी भिती वाट्ते आहे. बाकी एक दुरुस्ती सुचवतो, धाग्यात राजमाचीच्या शिखराचे नाव मनोरंजन झाले आहे. धाग्यामुळे कितीही मनोरंजन झाले तरी शिखराचे नाव "मनरंजन" आहे, कृपया दुरूस्ती करावी.

सर टोबी's picture

7 Jun 2019 - 3:15 pm | सर टोबी

नुकतेच या विषयी वाचण्यात आले. जे चमकतात ते नर काजवे असतात तर मादी काजवे मातीत असतात. काजवे पाहण्याच्या निमित्ताने आपण माती तुडवतो ज्यात मादीचा नाश होऊ शकतो. सध्या प्रसिध्धीमुळे अनेक निसर्गावर अत्याचार होणाऱ्या गोष्टी घडत आहेत. काजवा महोत्सव हा त्यातलाच प्रकार.

अँबी व्हॅली मध्ये रात्रीच्या वेळेस प्रकाश झोतात कार्यक्रम होतात. विविध पार्टी लॉन्सवर फ्लड लाईट्सचे दिवे झाडांवर बांधले जातात. हे दिवे अतिशय तापतात आणि वातावरणात प्रकाश प्रदूषण तयार करतात. रात्रीच्या वेळेस प्रकाश असणे हि फक्त माणसांची गरज असते. प्राणी, पक्षी, आणि कीटक यांना प्रकाश लागत नाही. कृपया कोणीही अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ नये किंवा त्यांना प्रसिध्धी देऊ नये.

अभ्या..'s picture

7 Jun 2019 - 6:02 pm | अभ्या..

सहमत आहे,
काजवा महोत्सव आदि गोष्टींना थारा देऊ नये. त्याला प्रसिध्दी तर अजिबात देऊ नये.

महासंग्राम's picture

10 Jun 2019 - 11:19 am | महासंग्राम

काजवा महोत्सवावर बोंब ठोकणारे म्हणजे करून सवरून भागले अन पूजेला लागले असे आहेत. आज जे सह्याद्री वाचवा म्हणून बोंब मारत आहेत त्यांच्या पैकी बहुतांश जण काही वर्षांपूर्वी सरसकट सह्यद्रीत फिरायचे. जंगलात फिरून काजवे, कोकणकड्याचे फोटो फेसबुक ब्लॉग वर टाकून हवा केली त्यामुळे या सर्वाना प्रसिद्धी मिळाली आहे आणि आता सगळं करून सवरून झाल्यावर निसर्ग बिघडला म्हणून जाग आलीये यांना असली ढोंग काय कामाचे.

टिप :याला सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत.

कंजूस's picture

10 Jun 2019 - 11:26 am | कंजूस

व्यवसाय - संधी!

सर टोबी's picture

10 Jun 2019 - 1:47 pm | सर टोबी

पण समंजसपने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

मागच्या पिढीने जे काही केले ते पुढची पिढी हक्क असल्यासारखे करू शकेलच असे नाही. भारतात तर अशी परिस्थिती आहे कि आपल्याकडे जगातील केवळ २.५% जमीन आहे आणि एक नंबरची लोकसंख्या त्यावर राहत आहे आणि हे प्रमाण निदान पुढील काही वर्षे तरी वाढतच जाणार आहे. मोठमोठ्या पायाभूत सुविधांची देखील आपण ५-१० वर्षात चटणी करून टाकतो. पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हे याचे चांगले उदाहरण ठरावे.

माझ्या लहानपणी करडईचे पीक आल्यानंतर करकोच्यांची शिकार करणे, पानकोंबड्यांची शिकार करणे, क्वचित कुठे मुक्कामाला असताना रानडुकराची शिकार झालेली असायची आणि पाव्हण्यांना त्याच्या सागुतीचा लाभ व्हायचा असे किस्से भरपूर ऐकायला मिळायचे. आज वन खात्याने पाहणी केल्याशिवाय पिकांना नुकसान करणाऱ्या हरिणांशिवाय शिकार करण्याची परवानगी नसते. पान कोंबडे पाणथळ जागी सहज दिसायचे ते आता दिसत नाही. आणि रानडुक्कर तर सोडूनच द्या.

तेंव्हा त्वेषाने काजवा महोत्सव साजरा करायचा असला तर जरूर करा. अधिक त्वेषाने तेथील चिखल तुडवा. सोबत आपली पुढील पिढी पण घेऊन जा. क्षुल्लक आयुष्य म्हणजे किडा मुंगीचे आयुष्य असे आपण म्हणतो. पण तेच जर नाहीसे झाले उर्वरित सर्व जीव सृष्टी भुकेली मरू शकते तेंव्हा तो दिवस किती लवकर पृथीवर आणायचा त्याचा विचार करूनच आपल्या सहलीचे नियोजन करा.

महासंग्राम's picture

10 Jun 2019 - 2:06 pm | महासंग्राम

प्रतिसाद भडकाऊ वाटला असल्यास क्षमस्व.

हे महोत्सव थांबायलाच हवेत यात काही वाद नाही, पण ज्या दुटप्पी लोकांनी हि मोहीम सुरु केली आहे त्यांना विरोध आहे.
या लोकांनी आधी महोत्सव सुरु केले मग त्यांचं पाहून इतरांनीही तसंच सुरु केला यातून या लोकांना स्पर्धा सुरु झाली. त्यामुळे त्यातलं यांचं वेगळे पण निघून गेलं. मग आता करायचं काय तर निसर्गाची हानी होतेय अशी ओरड करायची जी कि खरी आहे पण याला जबाबदार पण हेच लोकं आहेत. यांना संधिसाधूंना आधी बाजूला केलं पाहिजे.

सेम तसंच कोकणकड्यावर पण जे गडावर प्लॅस्टिक बंदी आहे हे माहिती असूनही कड्यावरच्या हॉटेलचालकांना प्लॅस्टिक वापरण्यास बाध्य करतात.
पनंतर यातलेच कोकणकडा प्रदूषित होतोय म्हणून ओरड करतात.

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2019 - 3:23 pm | चौथा कोनाडा

अगदी बरोबर. आम्हीसुद्धा मन-रंजन मनोर असंच म्हणायचचो, पण आज-काल लोक मनोरंजन असाच उल्लेख करतात !

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2019 - 1:28 pm | चौथा कोनाडा

काजवा महोत्सव या विषयाला छापील माध्यम, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप्प या वर माहिती प्रसिद्ध करण्यास बंदी करावी,
आणि टप्प्याटप्प्याने या महोत्सवांवर देखील बंदी घालावी.
नैसर्गिक साधनसंपत्ती व पर्यावरण खात्याने देखील नियम मोडणाऱ्या विरुद्ध कडक कायदे करावेत.

श्वेता२४'s picture

7 Jun 2019 - 1:55 pm | श्वेता२४

लिखाणआवडलं

श्वेता२४'s picture

7 Jun 2019 - 1:56 pm | श्वेता२४

असे वाचावे.

अन्या बुद्धे's picture

7 Jun 2019 - 4:38 pm | अन्या बुद्धे

छान लिहिलंय.. अनेकदा सर्व मोसमात राजमाची अनुभवला आहे.. आठवणीतून सगळे टप्पे नजरेपुढे आले.

कंजूस's picture

7 Jun 2019 - 6:58 pm | कंजूस

काजवा महोत्सव आदि गोष्टींना थारा देऊ नये. त्याला प्रसिध्दी तर अजिबात देऊ नये.

तरुण पर्यटक मंडळींनी काजवे पाहायला सह्याद्री रांगेत फिरकू नये असं माझं मत नाही. फक्त एकदोन दिवशीच मोठी धाड न पाडता लहान लहान गटांत महिन्याभरांत ठिकठिकाणी भटकून आनंद घ्यावा.

अभ्या..'s picture

7 Jun 2019 - 7:55 pm | अभ्या..

फक्त एकदोन दिवशीच मोठी धाड न पाडता लहान लहान गटांत महिन्याभरांत ठिकठिकाणी भटकून आनंद घ्यावा.

इतकी स्वयंशिस्त अन जागरुकता आपल्या देशात असती तर महासत्ता महासत्ता क्या चीज है, आपण चीनहम्रिकेला आपली महासत्ता बघायचे तिकिट लावले असते.

जालिम लोशन's picture

7 Jun 2019 - 7:39 pm | जालिम लोशन

सुरेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2019 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं भटकंती !

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 5:08 pm | टर्मीनेटर

भटकंती आणि फोटो आवडले.

प्रचेतस's picture

3 Jul 2019 - 12:39 pm | प्रचेतस

राजमाची सर्वच ऋतूंत तितकाच सुंदर भासतो मात्र पावसकाळात त्याचं सौंदर्य अधिकच खुलतं.
राजमाचीचा लोणावळ्याकडून येणारा रस्ताही नितांत सुंदर आहे. त्या रस्त्याने कधी आला/गेला आहात काय? नसल्यास अवश्य जावे. 'माचीवरला बुधा' गोनीदांना ह्याच वाटेवर अकस्मात गवसला.