तोल

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
31 May 2019 - 10:30 pm

विहिरीच्या बाहेर असतो आपण..
आजूबाजूचा परिसर..
उत्तुंग पर्वत, विशाल सागर,
वारे, फुलं, गवत, नद्या..
अगदी वाळवंट अन बर्फाळ प्रदेशही..
या साऱ्याचा विस्तीर्ण पसारा..
त्या तुलनेत असलेलं
विहिरीचं छोटेपण..

नन्तर त्याकडे पाठ फिरवत..
सामाजिकता दूर ठेवत
कपडे उतरवून पाण्यात उतरतो
विहीर अगदी उराऊरी भेटते..
सर्व बाजूंनी मिठीत घेते..
आपलेच किरटे पातळ आवाज
वजनदार घुमारेदार असे होऊन ऐकू येतात..
स्वत्वाची जाणीव हरवते..
शरीराच वजन हरपते..
पिसासारखे हलके होतो आपण..

विहिरीचं सानपण आणि प्रेमळ आपलेपण..
दोन्ही एकाचवेळी खरं असतं..
खोटी असते आपली एकांगी मानसिकता..

वेळोवेळी बाहेरच्या जगातही फिरलं पाहिजे..
पुनः पुन्हा विहिरीत स्वतःला हरवलं पाहिजे..
तोल सावरायलाच हवा.. नव्हे का?

-अनुप

कविता

प्रतिक्रिया

कूपमंडूक ऐकले होते. पण ज्याला बाहेरच्या जगाची ओळख आहे आणि विहिरीची नाही अशा कुणाची कल्पना केली नव्हती. :-)

यशोधरा's picture

20 Nov 2019 - 8:31 am | यशोधरा

आवडली.