राधाची कैद

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
23 May 2019 - 5:15 pm

राधाची कैद.

एखाद्या कथेची सुरुवात कशी होईल हे बऱ्याच लेखकांना सांगता येत नाही . आणि त्याचा शेवट तर जवळजवळ त्या कथेतील पात्रांच्याच हातात असतो .म्हणजे जन्म आपल्या हातात नाही . मरण आपल्या हातात नाही ...फक्त या दोन्ही मधील जगणे आपल्या हातात असते.तसेच काहीतरी ..
कथा आपोआप सुरु झालेली असते . लेखकाने कथेचा मध्य तेवढा लिहायचा . आणि पात्रांनी कथेचा शेवट केला की तो लिहून लेखकाने आपले नाव तेवढे खाली जोडायचे . विक्रम राजे.( अर्थात हे माझे खरे नाव नाही . या कथेतील गावाचे आणि पात्रांची नावे पण खरी नाहीत .प्रसंग मात्र खरे आहेत . )
मी टीवी वरच्या मालिकांच्या कथा लिहितो . एक या क्षेत्रात जम बसवलेला बऱ्यापैकी लेखक अशी माझी ख्याती आहे. त्या मुळे हे मी थोड्याशा अधिकाराने सांगू शकतो .

“ मला एक भय कथा हवी आहे .पंधरा दिवसात लिहून दे !” माझ्या निर्मात्याने फर्मान सोडले.
तर.. माझ्या पहिल्या भयकथेची सुरुवात अशी झाली.

पहिल्या आठ दिवसात काहीच झाले नाही त्या मुळे मीच पुरता घाबरून गेलो . शेवटी आमच्या बायकोने एक मार्ग काढला .
“ तुम्ही आपले कोकणात जा . तिथे भुताखेताच्या बऱ्याच गोष्टी सापडतील .”( इथे उगीच माझे डोके खाऊ नका ..असे स्वगत असले पाहिजे. )
बायकोचा सल्ला मानून मी गुहागर जवळ एक मारुंग नावाचे गाव आहे तिथे जायचे ठरवले. आमच्या निर्मात्याने नेहमीप्रमाणे माझी गोविंदराव खरात यांच्या घरात माझी सोय केली.मागे दोन तीन वेळा मी त्यांच्या कडे राहिलो होतो. त्यांच्या घराचा वरचा पूर्ण मजला ते मला वापरायला देत असत . वरच्या मजल्याच्या बाल्कनीतून समुद्र दिसे त्याचे ते नयनरम्य रूप पहात लिखाण करायला मला खूप आवडे. आणि जवळच राधेची खानावळ होती …
राधा जेवण खूप छान करी आणि ...तिच्या बद्दल एक जबरदस्त सुप्त आकर्षण तिला पहिल्यांदा पाहिल्या पासून माझ्या मनात निर्माण झाले होते. पण मी पन्नाशी उलटून गेलेला एक संसारी गृहस्थ ...तसा मी अजूनही चार चौघात उठून दिसे . मी अजूनही जिम मध्ये जात असल्याने रेखीव शरीरयष्टी .. सावळा पण एकदम डोळ्यात भरावे असे रूप आणि माझे अजूनही काळे असणारे केस. माझे डोळे लोकांच्या हृदयाचा ठाव घेतात असे मला अनेकजण सांगतात. आणि त्यात मी बराच पैसा जवळ बाळगून होतो ….तसेच माझा टीवीवर वावर असल्याने माझ्यावर फिदा असणाऱ्या बायकांची काही कमी नव्हती पण ..का कोण जाणे मी त्याच्या पाशात कधी अडकलो नव्हतो . पण मग ही कोण कुठली खानावळ चालवणारी विधवा राधा ..मला का तिचे इतके आकर्षण वाटते कोण जाणे?
मग ही सगळी राधाची कथा माझ्यासमोरच उलगडत गेली. एखाद्या सिनेमासारखी ...माझी तिथे जाण्याची जणू वाट पहात थांबलेली . मी सहा सात महिन्यापूर्वी गेलो होतो तेव्हा जणू थांबलेली आणि मी जाताच जणू एखाद्या अदृश्य किल्लीने एकदम परत सुरु झाली,आणि माझ्या सहभागाने समाप्त झाली.

कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील गावे असतात तसे एक छोटेखानी गाव. दोनशे तीनशे घरे जेमतेम असतील . गुहागरला जाणाऱ्या रस्त्यावरून , तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर या गावाकडे जाणारा फाटा. पाच सहा किलोमीटर फाट्यापासून . सगळा कच्चा रस्ता. पावसाळ्यात जाणे महा कठीण. गावाजवळ आलात की तुम्हाला लागते एक शिव मंदिर. जुनाट दगडी बांधकाम. आपल्या कंबरेपर्यंत लागेल एवढ्या उंचीचा पूर्ण दगडी नन्दी. अतिशय सुबक . पाहिल्याबरोबर त्या वरून हात फिरवायचा मोह आवरत नाही. मग अंधारलेल्या गाभाऱ्यात काळ्या दगडातील शिव लिंग . जवळ जवळ नंदीच्या उंचीचे. माझे खूप आवडते स्थान. दोन तीन वर्षापूर्वी ,मी पहिल्यांदा इथे आलो आणि या मंदिराच्या प्रेमातच पडलो.
या वेळी सुद्धा गावात जाताना मी या मंदिरात गेलो. नंदीवरून हात फिरवला आणि गाभाऱ्याकडे आलो. या अंधारलेल्या गाभाऱ्यात शिरताना नकळत एक अनामिक भिती मनात शिरली. अंधाराची भिती ? मग वाटले भयकथा शोधण्यासाठी कोंकणात यायची काय जरूर ? आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कितीतरी पाशवी आणि भयप्रद गोष्टी बाहेर यायच्या संधीची वाट पहात पडून असतात. मला एकदम शहारल्या सारखे झाले. शंकराचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. आपल्या मार्गाला लागलो . मग एक मोठे मोकळे मैदान. गावातील मुलांचे आवडते ठिकाण. थोडे पुढे गेलो की एक सरकारी शाळा ..मग एकदम गावच सुरु होते. सगळी बैठी काळ्या कौलांची घरे . काही घरांना पत्र्याचे छत. भिंती मात्र कोकणात सर्वत्र सापडणाऱ्या लाल जांभा दगडांच्या. प्रत्येक घरामागे वाडी . काही मातब्बर लोकांच्या मोठया ..लांबच लांब पसरलेल्या तर काही लहान . सुपारी ,केळी,नारळ आणि काही लोकांच्या कडे आंबा असलेल्या वाड्या .
सगळे गाव उंच सखल भागात पसरलेले ...सगळे कच्चे रस्ते एका छोट्याश्या समुद्र किनाऱ्यापर्यंत जाणारे.
हे कच्चे रस्ते संपत तिथे एकदम पायाखाली शुभ्र पांढरी वाळूच लागे .
मग सुरु होई या गावचा जणू खाजगी बीच ..! कडेला बरीच नारळाची झाडे.
लांबवर पसरलेली शुभ्र पांढरी वाळू . समोर निळ्याशार रंगाचा लांबवर पसरलेला समुद्र . कधी शांत तर कधी उंच लाटा काठावर आदळत असणारा .बरेच शुभ्र समुद्र पक्षी किनाऱ्यावर बसलेले किवा समुद्रावर घिरट्या मारताना दिसत असत . सकाळी किवा संध्याकाळी या बीच वर तासंतास बसून कथेचा विचार करायला मला खूप आवडे ...आणि मग अचानक राधेचा विचार अवतरे ….. मनातील सगळे बाकीचे विचार खाऊन टाकणारा. नकोसा आणि हवासा सुद्धा .
आपण संसारी गृहस्थ आहोत ..आपले आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम आहे ..आपल्याला एक कॉलेजला जाणारा मुलगा आहे हे सगळे विचार मनात येत आणि मी स्वतःचा धिक्कार करी . राधेचा विचार मनातून काढून टाकी. पण एखाद्या किती ही हाकलला तरी परत परत येणाऱ्या भिकाऱ्या सारखा राधेचा विचार चोरपावलाने मनात शिरे आणि माझे मन त्या विचारात केव्हा रमून जाई हे माझे मलाच कळत नसे.
म्हणून मी या गावात यायचेच टाळत होतो इतके दिवस…
पण या न सुचणाऱ्या भय कथेने मला इथे ओढून आणले .
या भयकथेने आणले की आणखी कोणी ?

मी मारुंग गावी पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. माझ्या वाहकाने माझे सामान नीट लावून दिले. माझा Laptop टेबलावर ठेवला..माझी सुटकेस कपाटात ठेवली ..माझे घरी घालायचे कपडे काढून ठेवले ,माझ्या मोबाईल आणि Laptop चा चार्जर लावून ठेवला आणि तो परत गाडी घेऊन चिपळूणला गेला. चहा घेत मी गोपाळरावांना गावात काय काय चालले आहे याची माहिती विचारली . आणि शेवटी अगदी सहज विचारावा तसा प्रश्न विचारला ,
“ मग काय गोपाळराव ? तुमची राधा काय म्हणते ?” तुमची या शब्दावर मुद्दाम भर देत मी एकदम हसलो .
गोपाळराव एकदम लाजले.
“ आमची कुठली ? आता ती मनोहरशेट ची झाली ..”
“ काय सांगताय काय ? तो मनोहर शेट म्हणजे तो टकल्या आणि ढेरपोट्या ? किराणा दुकान चालवतो तो ?”
“ हो ..तोच तो . हलकट साला !” गोपाळराव चिडून म्हणाले . मलापण एकदम संताप आला होता पण तो न दाखवता मी सगळी माहिती काढली.
“ ही एकटी विधवा बाई! पदरात हा असला वेडसर मुलगा . खानावळ चालवते. या गावात किती लोक येणार तिच्याकडे? काही घरात सकाळी पोळ्या पण करायला जाते. आमच्या घरी पण येते. पण किती पैसे मिळणार ? त्यात तिच्या मुलाचा डॉक्टर आणि औषधाचा खर्च . मनोहर शेट कडे चांगली लाख दीड लाख उधारी झाली. आज देते उद्या देते असे करत तिने बराच काळ काढला.पण कुठून आणणार ती बिचारी इतके पैसे ? ..” गोपाळराव सात्विक संतापाने म्हणाले .
“ मग काय झाले ?”
“ काय व्हायचे ? आता मनोहर शेट रोज रात्री उशिरा येतात तिच्याकडे आणि पहाटे पहाटे जातात. आपले पैसे तसे नाही तर असे वसूल करतात...लांडगा साला …”
गावातील अनेक लोकांप्रमाणे या गोविंदरावांचा पण राधेवर डोळा होता. ते तिला तिच्या कामाचे पैसे देताना हळूच तिच्या हाताला स्पर्श करून घेत . मागच्या वेळी एक दोन विस्की च्या पेग नंतर त्यांनीच मला ही माहिती पुरवली होती.
मला एकदम संताप आला . मला काही राधे मध्ये फार रस नव्हता..म्हणजे थोडा होता ... पण ..त्या ढेरपोट्या आणि टकल्या माणसाने तिला हडप करावी म्हणजे काय ?
पण एक मन म्हणाले ,पण हे खरे असेल कश्यावरून ? लहान गावात काहीही वावड्या उठत असतात. मी रात्री जेवायला राधेकडे जाऊन चौकशी करायचा निश्चय केला.
त्या रात्री निळसर रंगाचा सिल्कचा कुर्ता आणि सलवार घालून मी बाहेर पडलो . मी नुकतीच दाढी केली होती आणि भरपूर सेंट पण उडवला होता . बाहेर निघताना आरशात तीन तीनदा पाहून आपण रुबाबदार दिसतोय याची खात्री करून घेतली होती . समुद्रकिनाऱ्या जवळ शेवटचे घर राधेचे.
बाहेर लाल दगडी विटांचे कम्पौंड .पुढे थोडी मोकळी जागा .समोरच एक तुळशीचे वृंदावन पण त्यातील तुळस केव्हातरी काढून टाकलेली. मग एक पडवी,त्यावर पत्र्याचे छप्पर. त्याला आधार असे चार लाकडी खांब.तिथेच एका खांबावर खडूने लिहिलेली पाटी. “राधेची खानावळ” . पडवी आणि समोरचे आवार शेणाने सारवलेले.
मग एक दरवाजा .आत गेले कि एक दिवाणखाना .तिथे दोन ट्यूबलाइट लावून जेवायची जागा जरा जास्त प्रकाशमय करायचा प्रयत्न केला होता . तिथेच तीन चार टेबले आणि खुर्च्या ..बसायला एक सोफा .जुनाट, नवरा जिवंत असताना घेतलेला .उजवीकडे भिंती लगत एक टीवी. तो ही तेव्हाचाच. त्याच्या मागच्या भिंतीवर दिवंगत नवऱ्याचा रंगीत फोटो. अंगात कोट .घारे डोळे ..नीट कापलेल्या मिश्या .डोक्यावर गांधी टोपी ..सावळा रंग. हा इथल्या शाळेत शिक्षक होता. हे घर सुद्धा वडीलोपार्जित. मोठा ध्येयवादी माणूस होता तो . अनाथ मुलीशीच लग्न करणार अशी याची अट होती. चिपळूण मध्ये एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात काम करणारी अनाथ पण सुंदर राधा याला आवडली . लग्न केले ..एक मुलगा सुद्धा झाला. पण तीन वर्षापूर्वी एका अपघातात हा नवरा जागच्या जागीच गेला. मागे राहिली राधा आणि त्यांचा मुलगा. आणि हे घर आता राधेच्या मालकीचे . ही सगळी अर्थात गोपाळरावांनी पुरवलेली माहिती .
मी दिवाणखान्यात आत आलो तर राधाचा मुलगा अनिकेत एका खुर्चीवर टीवी समोर कार्टून पहात बसलेला होता. दहा अकरा वर्षाचा असावा. कृश शरीर , रेखीव आणि निरागस चेहरा , गव्हाळ रंग,काळेभोर आणि सतत इकडे तिकडे भिरभिरणारे डोळे. सांगितले नाही तर हा थोडासा वेगळा मुलगा आहे हे कुणाला समजणार सुद्धा नाही असा मोठा गोड मुलगा.

तिथे बाकी कोणीच नव्हते. मी दाराची कडी वाजवली . अनिकेतने मागे वळून पण पाहिले नाही . तो टीवी चा कार्यक्रम पाहण्यात अगदी गुंग होता. मी परत कडी वाजवली ...थोडीशी अधीरपणे .
“ आले आले ..बसा बसा ..” असा आतून राधेचा आवाज आला. मोठा गोड आवाज होता तिचा . थोड्याच वेळात आतल्या दारातून राधा टॉवेलला हात पुसत बाहेर आली ..ती बहुदा स्वयपाकघरात काही तरी करत असावी ते काम पूर्ण करून ती तशीच बाहेर आली होती . तीस पस्तीशीचे वय. स्थूलतेकडे झुकणारी पण एकदम मनात भरणारी शरीर यष्टी .उंची फार नव्हती ..मध्यम .गुलाबी रंगाची चापून चोपून नेसलेली साडी ..त्याच रंगाचा ब्लाउज अंगात घट्ट बसणारा.चेहऱ्याकडे लक्ष जाताच सर्वात पहिल्यांदा जाणवे ते तिचे पट्टीने रेघ मारावी असे सरळ नाक ..गव्हाळ रंग आणि पुरुषांचे हृदय क्षणभर थांबावे अश्या दोन्ही गालावरच्या खळ्या. आणि एखाद्या चित्रकाराने काढावी तशी ओठांची महिरप . आपले कंबरेपर्यंत येणाऱ्या केसांची एक वेणी घालून ती आपल्या खांद्यावरून पुढे आणायची तिची लकब होती.
मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम हास्य उमटले ..तिच्या गालावरच्या खळ्या अजून खोल झाल्या असे मला वाटले ..तिच्या डोळ्यात पण मला स्वागत दिसले .काहीही मेकअप नसताना सुद्धा किती सुंदर दिसत होती ती !
“ अरे ..विक्रम सर आपण ! केव्हा आलात ? या ! या ! आपले स्वागत आहे !” असे म्हणत ती पुढे आली .तिच्या हातातील टॉवेल गळून पडला आणि माझ्या समोर येत तिने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तिची नजर माझ्यावर खिळून होती. मला तर वेळ क्षणभर थांबलाय असेच वाटले . मी तिच्या डोळ्यात पहात किती तरी वेळ तसाच उभा होतो . तिच्या हाताच्या स्पर्शाने आपले सगळे अंग भाजून निघते आहे असे मला वाटले. सहा सात महिन्यापूर्वी अर्धवट राहिलेली गोष्ट पुन्हा सुरु होतेय का ? पुढचे प्रकरण सुरु होणार का ?
शेवटी तीच भानावर आली. आपले हात तिने माझ्या हातावरून काढून घेतले. आणि तसेच आपल्या गालावर फिरवले. जणू तिला आपल्या गालावर माझ्या हाताचा स्पर्श हवा होता.
“ राधा ,कशी आहेस ? ..” मी काही तरी बोलायचे म्हणून म्हणालो. माझा आवाज माझा मलाच ओळखता आला नाही .
राधेच्या डोळ्यात क्षणभर एक वेदना चमकून गेली ..तिने क्षणभर खाली पहिले ..मग स्वतःला सावरत म्हणाली ,
“ मी आहे त्यात ठीक आहे . पण तुम्ही आता थोडे दिवस राहणार ना ? का लगेच जायचे आहे ?”
“ चार पाच दिवस तरी आहे ..”
“ लगेच जेवायला वाढू का ? का थोडा वेळ आहे गप्पा मारायला ..” तिने समोरील भिंती वरील घड्याळाकडे अस्वस्थ पणे पहात विचारले . मनोहर शेट यायची वेळ झाली होती का ?
“ लगेच नको जेवायला. मला तुझी सगळी हकीकत जाणून घ्यायची आहे. अनिकेत कसा आहे आता? थोडा कमी हायपर होतो का ? औषधे चालू आहेत का ? अजून काही शब्द बोलायला लागला का ?”
“ काही दिवस बरा असतो तर काही दिवस नाही . औषधांचा खर्च मात्र वाढत चाललाय. याला कसल्या कसल्या अलर्जी आहेत. फार काही बोलत पण नाही . यात काही सुधारणा होईल असे वाटत नाही . डॉक्टरनी खूप पूर्वीच सांगितले आहे कि हा autistic आहे . यात फार काही सुधारणा होणार नाही . अनिकेत आता हळू हळू मोठा होतोय ..मला एकट्याला आवरत नाही तो आता. वाऱ्यासारखा पळत असतो . माझ्या शिवाय अगदी रहात नाही . त्याचे रुटीन अगदी ठरलेले असते. थोडे जरी इकडे तिकडे झाले तरी धिंगाणा घालतो . त्याला डॉक्टर कडे न्यायचे म्हणजे त्याला दोन तीन दिवसापासून सांगावे लागते. माझे मिस्टर तर गेले ...मला मात्र या अनिकेतच्या कैदेत टाकून गेले. मला कुणाकडे जाता येत नाही ,एखाद्या सिनेमाला जाता येत नाही ,कुठे फिरायला जाता येत नाही ..सगळीकडे हा असतोच ..माझा जेलरच आहे जणू काही . चिपळूणला माझ्या किती मैत्रिणी होत्या, आता कोणी नाही .”
राधाच्या डोळ्यातून आता अश्रुधारा सुरु झाल्या. मी तिला हात धरून सोफ्यावर बसवले आणि मी तिच्या शेजारी बसलो . तिच्या खांद्याभोवती माझा एक हात टाकून मी तिला जवळ घेतले आणि एका हाताने तिचे अश्रू पुसले .

अनिकेत एकटक टीवी कडे पहात होता. आमच्याकडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते.
राधा बराच वेळ माझ्या शेजारी बसून आपली बिकट परिस्थिती सांगत होती.
“ हे मनोहर शेट बद्दल मी काय ऐकतो आहे ?” शेवटी मी माझ्या मनात बराच वेळ खदखदत असलेला प्रश्न विचारला .
“ तुमच्या पण कानावर आले तर ? मी तुम्हाला खोटे सांगणार नाही . मी आत्तापर्यंत फक्त दोन पुरुषांवर प्रेम केले आहे . एक .माझे दिवंगत पती आणि एक तुम्ही ...तुम्हाला पाहिलं आणि मी तुमच्या प्रेमात पडले .पण तुमचे लग्न झाले आहे आणि तुमच्या आणि माझ्या मध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे याची मला कल्पना आहे ...तुमचे विश्व निराळे आणि माझे निराळे ...तुम्ही माझे स्वप्न आहात आणि तर मनोहर शेट माझे वर्तमान आहेत.गेल्या तीन वर्षात मनोहर शेटनी माझ्या अडचणीच्या काळात मला खूप मदत केली. मला उधारीवर धान्य आणि बाकीचा किराणा माल पुरवला .अनिकेतच्या औषधा साठी ,डॉक्टरांच्या फी साठी मला वेळो वेळी पैसे दिले. जवळजवळ दीड लाख कर्ज झाले मला. कशी फेडणार होते मी ?”
“ या घरावर कर्ज काढायचे नाही का ?”
“ या घरात माझ्या नवऱ्याच्या भावाचा पण वाटा आहे .एक बहिण पण आपला वाटा मागते आहे . शेवटी सगळे मार्ग बंद झाले आणि ..आणि ..मी माझ्या बेडरूमचे दार मनोहर शेट साठी उघडले.” राधा मान खाली घालून म्हणाली.
“ तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणालीस ! मला एक साधा फोन का नाही केलास ?”
“ माझे खूप प्रेम असेल तुमच्यावर , पण ..तुमचे आहे का ? तुमचा संसार आहे ...समाजात स्थान आहे मी कोणत्या तोंडाने तुम्हाला फोन करणार होते ?”
आम्ही अजूनही सोफ्यावरच बसून होतो . राधाचे माझ्यावर प्रेम आहे याचा मला विश्वासच वाटेना .मी एकदम खूष झालो आणि अतिशय आवेगानं तिला आपल्या मिठीत घेतले .तिनेही आपले डोके माझ्या छातीवर ठेवले.
इतक्यात आमच्या समोर काही हालचाल झाली ..
“ए ...ए ...आई .आई ..” असे म्हणत अनिकेतने अतिशय वेगाने त्याचे डोके माझ्या डोक्यावर आपटले .माझ्या डोक्यात एकदम झिणझिण्या आल्या ...डोळ्यासमोर अंधारी आली .तेवढ्यात अनिकेतने जोरात माझ्या हाताचा चावा घेतला .मी जोरात किंचाळलो.
“ अनिकेत ..अनिकेत काय करतो आहेस .थांब ..” असे म्हणत राधाने अनिकेतला माझ्या पासून दूर केले आणि एक जोरदार फटका त्याच्या पाठीत ठेऊन दिला .अनिकेतने जोरदार भोकाड पसरले.
हे सगळे इतके झटपट झाले कि मला काही कळायच्या आत सगळे घडून गेले. अनिकेतच्या दंडाला धरून राधा त्याला आत घेऊन गेली आणि त्याला एका खोलीत कोंडून ठेवले. तो आतून जोर जोरात बंद दार ठोठावू लागला .

राधा लगेच एक बर्फाचा तुकडा घेऊन आली आणि तो माझ्या कपाळावर दाबून ठेवला . मग परत आत जाऊन कसलेतरी क्रीम घेऊन आली आणि माझ्या हातावर लावले.
थोड्या वेळाने मला जरा बरे वाटू लागले.
“ मला माफ करा ..आता बरे वाटते आहे का ? थोडे पडता का इथेच सोफ्यावर ? अनिकेतला मी कोणत्याही पुरुषानी माझ्याशी फार लगट केलेली चालत नाही .एकदम संतापतो तो . मनोहर शेट येतात तेव्हा मी अनिकेतला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवते. त्याने एकदा त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला होता . माझा जेलर आहे हा हे मी म्हणते ते खोटे नाही !” राधा म्हणाली. अतिशय खजील झाली होती ती .
अनिकेतचे दार बडवणे चालूच होते ..धाड..धाड..धाड.अनिकेतला भाषा फारशी नव्हती पण समज बरीच असावी हे माझ्या लक्षात आले. मी मग न जेवताच घरी परत आलो.

दुसरे दिवशी मी सकाळी माझा बीच वरचा फेरफटका मारून परत येत होतो. आपल्या घराच्या campound च्या भिंतीवर अनिकेत बसला होता. समोर कुठेतरी पहात आपले दोन्ही पाय हलवत होता. एका ठराविक लयीत तो आपले पाय हलवत बसला होता . भिंतीच्या खरखरीत विटेवर आपला हात फिरवत तो एकटक समुद्राकडे पहात होता .
“ काय अनिकेत ? काय चाललंय ? “ असे म्हणत मी त्याच्याकडे पाहून हात हलवला .
त्याने माझ्याकडे न बघताच आपला हात हलवला. कालचा प्रसंग जणू तो पूर्ण विसरून गेला होता. त्याला फारसे बोलायला यायचे नाही ..पण आई ..आ ..बा ...असे काही तरी आवाज करायचा . डॉक्टरांनी त्याची भाषा वाढावी म्हणून खूप प्रयत्न केले होते पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नव्हता .

त्या दिवशी रात्री मी राधा कडे जेवायला गेलो . राधाने नेहमी प्रमाणे अनिकेतला झोपेची गोळी देवून झोपवले. पण त्या दिवशी आणि नंतरच्या दोन तीन रात्री मनोहर शेटची जागा मी घेतली . राधाने मनोहर शेटना आता तुम्ही येऊ नका असे कळवले होते.
राधा आता माझी झाली.मनोहर शेटचे राहिलेले पैसे मी एक दोन दिवसात देणार होतो.
राधा आता मला विक्रम म्हणत होती. विक्रम सर नाहीसा झाला होता.

राधाच्या सहवासात रात्र मदहोष होऊन केव्हा संपली कळत नव्हती . दिवसा मी कथा लिहायचा प्रयत्न करी पण मी उतावीळपणे रात्र होण्याची वाट पहात असे. एके दिवशी संध्याकाळी मी बीच वर बसून काही तरी लिहायचा प्रयत्न करत होतो .राधा नेहमीप्रमाणे अनिकेतला घेऊन बीच वर फिरायला आली होती. हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम होता. बीचवर फारसे कोणी नव्हते. सूर्यास्त पहात मी मधूनच राधेकडे आणि मधूनच मावळतीच्या लालबुंद सूर्याकडे पहात होतो . राधा आणि अनिकेत समुद्राच्या काठावरून आता थोडे आत गेले होते. मधूनच येणारी मोठी लाट आपल्या अंगावर घेत होते. एक टिटवी तुरु तुरु पळत पाण्याच्या कडे कडेने काही खाद्य मिळतेय का पहात होती .माझी नजर त्या टिटवी वर खिळून होती . तेवढ्यात राधाचा आवाज आला.
“ अनिकेत खूप आत जाऊ नकोस. .थांब .” आता राधा सुद्धा अनिकेतच्या मागे समुद्रात गेली होती . तिची माझ्याकडे पाठ होती आणि अनिकेत तिच्या पुढे होता ..तो मला दिसत नव्हता. मग एकदम एक मोठी लाट आली ..जरा वेळ मला काहीच दिसले नाही .मग मला दिसले कि राधा पाण्यात हात घालून काही तरी शोधीत होती. मग पुन्हा लाट . परतणाऱ्या लाटे बरोबर राधा थोडी आत गेली ..तिचे हात अजूनही पाण्यात होते .
मग राधाचा आवाज आला ,
“ वाचवा ..वाचवा … अनिकेत ..अनिकेत .”
मी गडबडीने उठलो ..तसाच धावत पाण्यात शिरलो . धावतच राधापाशी पोचलो .
“ अनिकेत ...अनिकेत ..वाहून गेला ...आत गेला ...त्याला वाचवा …” असे काही तरी तिने मला सांगितले .मी एक लाट चुकवत, पोहत आत शिरलो . बराच वेळ शोध घेतला .अनिकेतचा पत्ता लागला नाही . एव्हाना राधाचा आरडाओरडा एकून जवळच्या दोन तीन घरातून काही लोक आले. त्यानीही शोधाशोध केली ,पण काही उपयोग झाला नाही . अनिकेतला समुद्राने गिळून टाकले.

पोलिसात ही घटना नोंदवली . आमच्या दोघांच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या जबानी पोलिसांनी नोंदवून घेतल्या . आम्ही दोन तीन दिवस अनिकेतचे प्रेत किनाऱ्यावर येते का याची वाट पहिली . काही ही उपयोग झाला नाही .राधाच्या अश्रुना अंत नव्हता. तिची समजूत घालता घालता मी राधाला म्हणालो ,
“ आता तू इथे काय करणार ? चिपळूणला चल. माझा एक flat आहे. तू रहा तिथे. तुला मी कुठे तरी नोकरी लावून देतो . ..मला तू माझ्या जवळ हवी आहेस ! येशील का ?”
राधा तयार झाली . पहिल्यांदा , मी एकटाच परत गेलो . राधा नंतर येणार होती . मलाही flat थोडा साफ करून घ्यायचा होता. तसा मोकळाच ठेवला होता मी .

एक विचार मात्र सारखा माझ्या मनाला छळत होता. राधा त्या दिवशी पाण्यात हात घालून काय करत होती ? ती अनिकेतला हुडकत होती का तिने अनिकेतचे डोके पाण्याखाली दाबून ठेवले होते ? हा अपघात होता का खून ? पण राधा आपल्या मुलाच्या बाबतीत असे काही करू शकेल ? तिने माझा साक्षीदार म्हणून उपयोग करून घेतला का ? मला नक्की सांगता येत नव्हते.

अस्वस्थ पणे मी तो विचार बाजूला केला आणि आतूरपणे राधाला पुन्हा मिठीत घ्यायला मिळणाऱ्या त्या रात्रीची वाट पाहू लागलो . प्रेमांध माणसाला बाकी काही दिसत नाही असे म्हणतात ते खरे असेल का ?
शेवटी ती रात्र जवळ आली . आमचा निर्माता मुंबई वरून आला आहे आणि मला गोष्ट ऐकवायला त्याच्याकडे जायचे आहे आणि रात्री बराच उशीर होईल असे बायकोला सांगून मी बाहेर पडलो .

माझ्या flatची बेल दाबताच राधाने लगेच दार उघडले. ती सुद्धा आतुरतेने माझी वाट पहात होती. आज तिने मला आवडती अशी पांढऱ्या रंगाची साडी घातली होती . अगदी हलकासा शृंगार केला होता. मी आत येताच ती मला बिलगली. मी दार बंद करत तिला मिठीत घेतली आणि तिला बेडरूम कडे नेले . आम्ही मग आवेगाने एकमेकांच्या मिठीत बेड वर पडलो. एका हाताने तिची हनुवटी थोडीशी उचलत मी खाली झुकलो ..
आणि एकदम आमच्या flat चे दार कुणीतरी जोर जोरात वाजवले ,
“धाड ..धाड ...धाड”
“ आत्ता कोण आले ? आणि बेल का वाजवत नाही हा ?” असे चडफडत म्हणत मी दार उघडले
बाहेर कुणीच नव्हते. मी लिफ्ट पर्यंत पाहून आलो .कोणीच नव्हते. कोणी तरी चावटपणा केला असावा असे म्हणत मी आत आलो. थोड्या वेळाने परत हाच प्रकार . जरा कोठे राधेला जवळ घ्यावे तर दाराचा आवाज ,
“धाड ..धाड ...धाड”
मग मी सोसायटीच्या रखवालदाराला बोलावले आणि बाहेर उभा रहा असे सांगितले . त्याला काही दिसले नाही आणि काही ऐकू आले नाही ..फक्त मला आणि राधेला मात्र तो आवाज आम्ही एकमेकांच्या जवळ आलो की एकू येत होता ...बाकी कुणालाही तो एकू येत नव्हता .
“धाड ..धाड ...धाड”
आम्ही दोघे हताश झालो. राधा तर भीतीने थरथर कापत होती . राधा मला म्हणाली ,
“ विक्रम ,माझी कैद अजून संपली नाही ,आणि ती आता संपणार सुद्धा नाही .अनिकेत काही माझी पाठ सोडणार नाही .पूर्वी त्याला मी झोपेची गोळी तरी देऊ शकत होते आता ती ही नाही ! मी आता काय करू ? मला अशीच एकटीला भुतासारखे रहावे लागणार बहुदा .” डोळ्यातून अश्रू ओघळणाऱ्या राधेचे अश्रू सुद्धा मी पुसू शकत नव्हतो . जरा तिला जवळ घेतले की दार वाजवणे सुरु ,
“धाड ..धाड ...धाड”

शेवटी मी घरी जायचे ठरवले. माझी गाडी काढून बाहेर आलो . सोसायटीच्या दारातून गाडी बाहेर काढली .आणि सहज उजव्या बाजूच्या आरशात बघितले . मला दाराबाहेर जाताना काही दिसले नव्हते पण आता आरशात स्पष्ट दिसले . सोसायटीच्या दाराजवळ लोकांना बसायला एक लाकडी बाक ठेवला होता .त्यावर एका लहान मुलाची धूसर आकृती बसलेली मला दिसली. एका संथ लयीत आपले दोन्ही पाय हलवत तो खाली मान घालून बसलेला होता. मी एकदम गाडी थांबवली . नीट मागे वळून पाहिले तर तो लहान मुलगा तसाच आपले पाय हलवत बसून होता ,आपली मान त्याने खाली घातली होती .तो माझ्याकडे अजिबात पहात नव्हता.

मी गाडी सुरु करत पुढे निघालो . किती तरी वेळ आरशात तो मुलगा मला दिसत होता.
आता तो कायम एखाद्या काळ्याभोर ढगासारखा माझे आणि राधाचे जीवन व्यापून टाकणार होता .
मी भयकथा शोधत त्या गावात जाऊन एका अश्राप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत झालो होतो का ? का या कथेचा अंत असाच व्हायचा होता ? मी फक्त निमित्तमात्र झालो होतो का ? कुणास ठाऊक ?

मी म्हणतो ते उगीच नाही ? कथेतील पात्रे कथेचा शेवट कसा करतील हे लेखकाच्या हातात कुठे असते ?

*********************************************************************************************

जयंत नाईक

कथालेख

प्रतिक्रिया

रिम झिम's picture

23 May 2019 - 6:51 pm | रिम झिम

खिळवुन टाकणारी कथा

शेखरमोघे's picture

23 May 2019 - 7:08 pm | शेखरमोघे

अतिशय वाचनीय कथा - पण भयकथा म्हणावी तर हे नुस्तीच सुरवात वाटते, पुढील भागात अनिकेतचा आणखी उपयोग होण्यासारखा आहे.

टवाळ कार्टा's picture

23 May 2019 - 7:51 pm | टवाळ कार्टा

प्रसंग मात्र खरे आहेत????

सस्नेह's picture

23 May 2019 - 8:26 pm | सस्नेह

उत्कृष्ट कथा ! मिपावर फार दिवसांनी एक चांगली कथा वाचायला मिळाली.
धन्यवाद !

अन्या बुद्धे's picture

24 May 2019 - 5:58 pm | अन्या बुद्धे

हेच म्हणतो!

एकदम खलास!

जालिम लोशन's picture

23 May 2019 - 8:58 pm | जालिम लोशन

+1

ज्योति अळवणी's picture

24 May 2019 - 8:48 am | ज्योति अळवणी

अप्रतिम कथा. भय कथेपेक्षा गूढ म्हंटल असत तरी चालेल अस वाटत

ज्योति अळवणी's picture

24 May 2019 - 8:48 am | ज्योति अळवणी

अप्रतिम कथा. भय कथेपेक्षा गूढ म्हंटल असत तरी चालेल अस वाटत

सोन्या बागलाणकर's picture

24 May 2019 - 9:25 am | सोन्या बागलाणकर

व्वा जब्राट भयकथा!

थेट मतकरी स्टाइल...लै आवडली.

मराठी कथालेखक's picture

24 May 2019 - 5:19 pm | मराठी कथालेखक

छान कथा आणि लेखनशैली..

टर्मीनेटर's picture

24 May 2019 - 6:30 pm | टर्मीनेटर

कथा आवडली. दुसरा भाग लिहून कथानक अधिक खुलवण्यास वाव आहे.

पद्मावति's picture

24 May 2019 - 9:15 pm | पद्मावति

बापरे.... मस्तंच आहे कथा.

Jayant Naik's picture

26 May 2019 - 9:59 am | Jayant Naik

माझ्या कथेला पसंतीची पावती दिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे अनेक अनेक धन्यवाद. तुमच्या अभिप्रायामुळे मला नवीन काही तरी लिहिण्याची स्फूर्ती मिळते. असाच लोभ असू द्या.

नँक्स's picture

31 May 2019 - 2:44 pm | नँक्स

छान कथा आणि लेखनशैली..

Sanjay Uwach's picture

31 May 2019 - 4:52 pm | Sanjay Uwach

छान कथा ,

गौतमी's picture

17 Jun 2019 - 12:49 pm | गौतमी

छान आहे कथा.

स्वलेकर's picture

19 Jun 2019 - 3:37 pm | स्वलेकर

अप्रतिम कथा

पण मिलनात नेमका प्रॉब्लेम काय आहे ?

Jayant Naik's picture

19 Jul 2019 - 5:07 pm | Jayant Naik

मुलाची अती मानवी शक्ती आपले अस्तित्व दाखवते आहे किवा त्या दोघांचे अंतर्मन दार ठोठावते आहे ...

जॉनविक्क's picture

19 Jul 2019 - 8:52 pm | जॉनविक्क

मुलाची अती मानवी शक्ती आपले अस्तित्व दाखवते आहे
मग ? त्याचा वासनेशी काय संबंध ? दारावर थापा पडण्यापलीकडे काय घडतंय ? काहीच नाही...

किवा त्या दोघांचे अंतर्मन दार ठोठावते आहे ...
मग अवघड आहे खरं. आपल्याशी आपण शत्रुत्व नाही घेऊ शकत मग आपली चूक असो वा नसो.

बाकी तुम्हाला टॉप करायचा एका लेखकाने सॉरी गुरूने बराच वर्षाव सॉरी प्रयत्न केला पण त्यांना ते झेपलेच नाही ;) आपले लिखाण आवडले.

Jayant Naik's picture

20 Jul 2019 - 3:46 pm | Jayant Naik

आपल्याला कथा आवडली . मस्त वाटले.

जव्हेरगंज's picture

19 Jul 2019 - 10:16 pm | जव्हेरगंज

जबरी !!!

आपले आभार .