भूमीका

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
5 Nov 2008 - 9:19 am

घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला.

"अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल.

गोप्या हसला लहान मूलासारखा. हसताना लहान मूलासारखी लाळ गळली.पण ती त्यान पूसली नाही.मग येसू नच पदरान ती पूसून काढली.

"चल लवकर गरमा गरम पेज खाऊन घे"

गोप्या पाय ओढत तिच्या मागे मागे चालू लागला. त्याला पेज वाढून येसू त्याच्या समोर बसली. चांगला तरणा ताठा पोर पण वाईट दशा. जग रहाटी माहीत नाही. कोणी 'उठ' म्हटल की उठतो 'बस' म्हटल की बसतो. नाही म्हणायला येतच नाही जणू. आपल्या मागे पोराच कस व्हायच. आपल पोर जगल असत तर आज अगदी गोप्या एवढच असत. ती हळहळली. त्याला आई बाप नाही अन आपल्याला पोर बाळ नाही. म्हणूनच देवाची योजना म्हणायच दूसर काय? त्या नाटकवालीच्या मागे लागला नसता, तर आज हाताशी आला असता. सोन्यासारख पोर माझ पण त्याच चिप्पाड करून टाकल अगदी. वाट्टोळ होईल ग तूझ बाई. अगदी शंभर पिढ्या रौरव नरकात जातील तूझ्या. येसू रागान थरथरली. गोप्या कुठेशी एकटक दिव्या कडे बघत होता आपलाच नादात. येसून हटकल तसा लगेच उठला हात पंचाला पूसले. हा पंचा म्हणजे त्याचा शरीराचा भागच जणू. कळकट्ट झालेला अगदी. मग येसूच कधीतरी त्याची नजर चुकवून तो धूवून देइ. पण कितीही रगडला तरी त्याचा कळकट्ट पणा जात नसे. अगदी ते 'कळकट्ट हरामजाद' नशीब असत ना चिकटलेल आयुष्याला तस्स तो कळ्कट्टपणा चिकटून बसलेला पंचाला.

" काय बाई मेल्ल ते जेवण. ४ वर्षाच पोर ह्या परीस जास्त जेवेल"

गोप्या ओसरीच्या सोप्यावर आला. त्याला आलेला पाहून सोप्यावर निजलेल कुत्र लगबगीत उठल जागेच्या मूळ मालकाला जागा करून द्यायला आणि बापड पायरीवर जाऊन पडल. गोप्या सोप्यावर निजला. निजल्या-निजल्याच काळ्या आभाळातल्या चांदण्या मोजत राहीला........

....... आजचा प्रयोग छानच रंगला होता. सिंधूच्या भूमिकेत सुप्रसिद्ध गायक नट श्री. गोपीनाथ. सिंधूच्या भूमिकेत ते अगदी शोभून दिसत होते. 'कशी या त्यजू पदाला' म्हणताना सगळ थीयेटर भारावून गेलेल. 'प्रभू अजी गमला' या पदाला श्री गोपीनाथांनी ४ वेळा वन्स मोअर घेतला.रात्री अकरा वाजता सूरू झालेला प्रयोग पहाटे साडे चार पर्यंत रंगला. घरी जाताना लोक श्री गोपीनाथांची भूमिका आठवत त्यांची पद आळवत गेले. आज दूपारी गोपीनाथांना पुणे कोल्हापूर दौर्‍यावर जायच होत. बरोबर ती असणारच होती. त्यांची प्रेरणा. तिच्यासाठीच तर गोपीनाथ नाटकात आलेले. त्यानंतर मुंबई दौरा. जरा म्हणून फूरसत नव्हती. कुठलही नाटक असू दे. संगीत नाटक अथवा ऐतीहासीक. श्री गोपीनाथ म्हणजे हमखास हाउस्फूल्ल चा बोर्ड. करंट बूकींग उघडतच नसे कधी. आगाऊ तिकीट विक्रीतच सर्व तिकीट खल्लास्.लोक भेभान होऊन पैसे फेकत. मनापासून दाद देत. गोपीनाथ सुहास्य वदनाने प्रेक्षकांची दाद स्वीकारत.......

.... गोप्याला स्वतःशी हसताना पाहून येसू बावचळली. त्याला उठवून च्या दिला. थोडा स्वतः घेतला. गोप्या च्या घेऊन लगेच घरा बाहेर पडला. चालत चालत देवळा पाशी आला. तेथे पारावर बाजारगप्पे बसलेले होतेच. पांडूने त्याला साद घातली.

" काय गोपू शेट या की जरा गप्पाला"

गोप्या खूळ्यासारखा तिकडे जाऊन बसला गूडघ्यात डोक खूपसून. आता घोळक्याला नविन विषय मिळाला

" मग आज कोणता प्रयोग लावलाय"
सगळे रिकाम टेकडे हसले. गोप्याही हसला.
" बरोबर ती असेलच प्रयोगाला"
"कोण रे ती?"
" ती रे ती नाटकवाली" पांडू तिरकी मान करून म्हणाला
गोप्या परत हसला. स्वतःलाच. पण ते हसण रडण्या पेक्षा भेसूर होत.

इतक्यात नाना खोताला कसलीशी आठवण झाली.
" गोप्या चल तूला बूंदीचा लाडू देतो"

गोप्या त्याच्या मागन घरी गेला. हिर्‍याच्या झाडून खोतान गोप्या कडून अंगण झाडून घेतल. १०-१० घागरी पाणी काढून घेतल. गोठ्यातल्या गायी धूवून घेतल्या आणि मग कसलासा लाडवाचा तूकडा देवून त्यान गोप्याला हाकलला.तो त्यान खिशात ठेवला येसूला देण्यासाठी म्हणून.

एव्हाना उन तापलेल. कातड भाजून काढणारी गरमी. चटका देणारा रस्ता. मधूनच कुठेशी जाणारी बस अथवा वाहन जाई. गोप्या परत देवळापाशी म्हणून पारावर आला. आता तिथ हूंदड्या शेंबड्या पोरांचा घोळका जमलेला. गोप्याला बघून पोर खिदळली.

" गोप्या गोष्ट सांग"
" कोणती गोष्ट"
" कसली पण नव्वीन"
" रामाची"
" चक्"
" अलिबाबा आणि चाळीस चोर"
"हॅ"
"मग संभाजी राजांची"
" हो" सगळी पोर एक साथ ओरडली ......

...... श्री गोपीनाथ आज संभाजीच्या भूमिकेत होते. तीच काशीनाथ घाणेकरांनी अजरामर केलेली भूमिका. " प्राण गेले तरी बेहत्तर. मी जगेन तर हिंदू म्हणूनच आणि मरेन तर हिंदू म्हणूनच" त्यांनी औरंगजेबाला ठणकावून सांगितल. औरंगजेबाने डोळे फोडण्याची धमकी दिली पण राजे बधले नाहीत. राज्यांना शिरच्छेदा साठी वधस्तंभाजवळ आणल गेल- पण राज्यांची मूद्रा शांत होती. आज श्री गोपीनाथ अगदी वेगळेच भासत होते. पोर खिदळत होती. तात्या वाणी दूरून बघून हसत होता. वधस्तंभ म्हणून गोप्या जवळच्या झाडाच्या फांदीवर चढला. नाटकाचा अंत जवळ आला होता. संभाजी राज्यांचा चेहेरा तेजाने चमकत होता. गोप्याने पंचाच एक टोक झाडाला बांधल. एव्हाना आणखी दोन तीन मंडळी जमा झालेली. खेळाचा आनंद लूटत होती. गोप्याला आज कधी नव्हे ते समोर मारकुटा बा दिसला आणि भेदरलेली घाबरलेली माय दिसली. ती दिसली. त्याच्याकडे बघून हळूच हसली. त्याच्या मनात चांद्ण्या फूलल्या. कान ते मधाळस हसण आठवत राहीले. आपल्या बरोबर असती आज तर... त्याला येसू दिसली. त्याला वाटल थोडस चुकलच आपल. तो मगाचा लाडू तिला द्यायचा राहीला. तिचे पाय चेपून द्यायचे राहीले. तळ पायला तेल रगडून द्यायच राहिल. तिला तू झ्याक चा बनवतेस म्हणून सांगायच राहिल. जपून रहा म्हणून सांगायच राहिल. पण थोडा उशीर झालाय. श्री गोपीनाथांना संभाजीची भूमिका अर्धवट सोडून देता येणार नव्हती. गोप्याने हलकेच जमीनीवर उडी मारली. पण ती उडी हवेतच राहीली अधांतरी. लोबत्या शरीराने थोडेसे झोके घेतले. आणि ते थांबल तसच. डोळ्यात रक्त साकाटलेल. जीभ पांढरटलेली.पण चेहेर्‍यावर एक समाधान होत. शेवटची भूमिका जगल्याच...

समाप्त...................
(जी एंच्या 'वीज' कथेवर आधारीत )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

5 Nov 2008 - 11:21 am | महेश हतोळकर

सगळे म्हणतात तसं, आय डी बदला आता!

झकासराव's picture

5 Nov 2008 - 12:30 pm | झकासराव

तुझ नाव मुखदुर्बळ आहे पण लेखन सशक्त आहे रे. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

घाशीराम कोतवाल १.२'s picture

5 Nov 2008 - 12:34 pm | घाशीराम कोतवाल १.२

तुझ नाव मुखदुर्बळ आहे पण लेखन सशक्त आहे रे
जबर्दस्त्
मी आता तसा कोतवाल नाही बरं?

चाफा's picture

5 Nov 2008 - 4:14 pm | चाफा

कुठे लपवलेलेस रे इतके दिवस या लेखकाला ? :)
कसली जबरा कथा आहे रे !

विनायक प्रभू's picture

5 Nov 2008 - 4:22 pm | विनायक प्रभू

अंदाज बरोबर निघाला. मला वाट्लच होते. म्हणुनच सर्वाआधी सांगितले होते आय्.डी. बदला म्हणुन. छान लिखाण. अगदी आधारित असले तरी सुद्धा.

baba's picture

5 Nov 2008 - 7:59 pm | baba

छान लिहीलेय..

..बाबा

प्राजु's picture

5 Nov 2008 - 9:50 pm | प्राजु

जबरदस्त आहे लेखन आपल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

5 Nov 2008 - 11:38 pm | लिखाळ

कथा आवडली...

जीएंची वीज ही कथा वाचलेली नाही. जालावर असेल तर कृपया दुवा द्यावा.
-- लिखाळ.

शितल's picture

6 Nov 2008 - 8:30 am | शितल

कथा आवडली. :)