कथा – लंचटाईम

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
13 Apr 2019 - 10:49 pm

कथा – लंचटाईम

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

दुपारची वेळ झाली की भूक लागते ... काहीतरी पोटात ढकलावं लागतंच .
माझं आणि दिग्याचं जेवण झालं होतं . डबा आवरून ठेवत होतो , तेव्हा दिग्या म्हणाला , “ चल बिडी मारून येऊ “ .
इंजिनीरिंगची परीक्षा जवळ आली होती . जशी जशी परीक्षा जवळ येऊ लागते तसं येड्यावानी व्हायला लागतं .
उन्हाळ्याचे दिवस . पारा वर - वर चढलेला . नकोशी वाटणारी गर्मी . वातावरणात अस्वस्थ करून टाकणारी तलखी .
आम्ही दोघे कॉट बेसिस वर राहतो . कॉलेज चालू असताना रुटीन वेगळं असतं . आता कॉलेज बंद . फक्त अभ्यास ! उठल्यापासून झोपेपर्यंत तो अभ्यास पाठ पुरवतो ; पण तो संपत नाही . हा उन्हाळाही संपत नाही असं वाटतं , तसंच .
रोज अकरा वाजता मेसचा डबा येतो . रोज वेगळ्या भाज्या असल्या तरी तेच तेच जेवल्यासारखं वाटतं . कसंतरी पोट भरायचं . पोटाची खळगी भरल्याशिवाय अभ्यास कसा होणार ? पण पाणी पिऊनच पोट भरतं . पोटात अन्न कमी आणि पाणीच जास्त. अभ्यासासारखं … ज्ञान कमी आणि कचराच जास्त .
जेवण झालं की दिग्याला सिगारेट ओढायची असते . त्याला नाही म्हणलं तरी तो मला तसल्या उन्हात नेतोच, सोबत म्हणून .
आम्ही बाहेर पडलो . बाहेर एखाद्या जुलमी हुकूमशहासारखं उन पडलेलं . त्याच्या तापाखाली सगळीच प्रजा भरडलेली . दुपारची वेळ असली , गरम होत असलं , डोक्यावर ऊन लागलं की नकोसं वाटत असलं ; तरी दुनियेची लगबग चालूच असते .
गाड्या पळत असतात . लोक चालत असतात . केस असलेले , टकले, टोपी - हेल्मेट घातलेली माणसं , पदर घेतलेल्या बायका . तर काही तसेच बोडक्या डोक्याने- उन्हाचा तडाखा तसाच डोक्यावर झेलत . पण प्रत्येकजण पळत असतो. कशासाठी ? ...पोटासाठी !
इतका प्रखर प्रकाश ! इतकं कमाल तापमान ! नकोच वाटायला लागतं . त्यापेक्षा अंध:कारात खितपत पडलेलं बरं , असं काहीतरी येड्यासारखं वाटायला लागतं .
हा दिग्या ना , मला जायचं नसलं तरी नेतोच .
वाटेत एक बांधकामाची साईट चालू होती , तिथले मजूर डबे सोडून जेवायला बसले होते .
वाटेत एक वडापावची गाडी होती .एक म्हातारं भिकारी जोडपं आलं . त्यांनी त्या गाडीवाल्याला हात जोडले , तसा तो त्यांच्यावर खेकसला . ते मागे हटले . कुठले होते कोणास ठाऊक ? त्यांचे चेहरे आकसलेले , रापलेले होते . ते शहरी नव्हते ; पण ग्रामीण भागातलेही वाटत नव्हते . अंगात मळकट कपडे पण शहरी . कोणीतरी दिलॆले . त्यांना न शोभणारे . पण अंग झाकावं लागतं म्हणून नाईलाजाने घातलेले . बाईने पिवळ्या रंगाची साडी नुसतीच अंगाला गुंडाळलेली , तर म्हाताऱ्याच्या अंगात पांढरा टीशर्ट होता - ' अपना टाईम आयेगा ' असं लिहिलेला .
ते कुठले असावेत ? आदिवासी पट्ट्यातले ? मी विचार करू लागलो . छे ! जाऊ दे . मी तो विचार झटकला .
मनात आलं - उगा भिकाऱ्याचं कूळ कुठे शोधत बसता ? …
टपरीवर पोचलो . टपरीवालाही डबा उघडून जेवत होता . त्याने बटाट्याच्या भाजीचा एक घास खाल्ला . दिग्याला हाताने सिगारेट काढून घेण्याचा इशारा केला . दिग्याने तसं केलं .
दिग्या टपरी मागे गेला .
ते जोडपं लांब गेलं . तिथे एका बंद टपरीजवळ कोणी पोळ्या टाकलेल्या होत्या . शिळ्या आणि कडक . कडकडून वाळलेल्या . ते दोघे त्या टपरीच्या सावलीला बसले . बाईने जवळची प्लास्टिकची बाटली काढली . त्या पाण्यात तिने त्या पोळ्या भिजवल्या . आधी- तिने नवऱ्याला एक पोळी दिली . त्याने खायची सुरुवात केली . तिनेही खायची सुरुवात केली .
मी टपरीमागे शिरलो . ते नजरेआड झाले . बरं वाटलं .
टपरीच्या शेजारी दुसरी टपरी आहे . दोन टपऱ्यांच्या मधून मागे जाता येतं . त्या दुसऱ्या टपरीच्या मागे एक बेंच ठेवलेला आहे . दोन - तीन जण त्यावर बसू शकतात . मागे एक हॉटेलची भिंत आहे . तीन बाजूनी ती जागा बंदिस्त आहे . एकच बाजू उघडी आहे .
त्या मागच्या बाजूला एक नाला आहे . घाण पाण्याचा . खरं तर तो ओढा आहे मूळचा ; पण आपल्या देशातल्या प्रथेप्रमाणे त्यात गटाराचं पाणी सोडलेलं आहे . त्यामुळे त्यात काळसर हिरवटसर पाणी दिसतं . घाण वायूचे बुडबुडे येत राहतात .
जर तो स्वच्छ पाण्याचा ओढा असता ... अहा ! जर त्याचा परिसर स्वच्छ असता ! -
पक्ष्यांचं कूजन ऐकत , झाडांचं डोलणं पहात , पाण्यातल्या माश्यांच्या सुळकांड्या पहात त्याच्या काठाने चालण्यात काय मजा वाटली असती . तेही कोणाचा हात हाती घेऊन ! … एखाद्या झाडाला टेकून उभं राहायचं , ज्याने वर लाल फुलांची नक्षी डोक्यावर पांघरलीये अशा एखाद्या गुलमोहोराला . त्याच्या खाली मधुर काही बोलत. ऊन , ऊन भासलं नसतं . शीतल चांदण्याची बरसात जणू ! …
पण त्या पाण्याचा वास येतो . त्यामध्ये सगळी कडे राडा पसरलेला आहे . काळसर हिरवट पाण्यात चिखलाचे घाणेरडे गोळे दिसतात . त्यात नाना तऱ्हेचा कचरा . कुठे प्लॅस्टिकच्या पिशव्या तर कुठे बिअरच्या फुटलेल्या बाटल्या , चटक मटक पदार्थांचे रॅपर्स …
सुंदरतेचा विनाश सारा !
मी उभा राहून पाहत होतो , त्याच्या दूसऱ्या बाजूला खाली उतरायला मातीचा ढिगारा होता . त्यावर काहीतरी खसफसलं .
पाहिलं , तर एक काळं कुत्रं तिथून खाली गेलं .वेडं कुठचं ! खाली जाऊन काय उपयोग होता ? पण दुपारची वेळ होती ना .काही पोटासाठी मिळतंय का ते पाहायला ते गेलं असावं .
पण त्याच्या हालचालीने तिथून काहीतरी उडालं .मी पाहत राहिलो .मला अंदाज आला नाही . मग ते कुत्रं आल्या पावली परत फिरलं .उडून गेलेला पक्षी पुन्हा आला . तो एक बगळा होता . आधी मला तो दिसलाच नव्हता . तिथे असलेल्या सुक्या मातीशी तो जणू एकरूप झाला होता .
बगळा असला तरी तो पूर्ण पांढरा शुभ्र नव्हता . खालचा , छातीचा भाग पांढरा असला तरी वरच्या बाजूची पिसं , भरपूर दुध घातलेल्या चहाच्या रंगाची होती . त्याची लांब चोच खुपसून तो टिपून टिपून किडे खात होता .
त्या घाण पाण्यात मासे असणं शक्यच नव्हतं …
पण त्या किड्यांची पैदास वाढायला मात्र अगदी पोषक वातावरण होतं .
आजूबाजूला लक्षही न देता तो किडे खात होता . सह्जपणे . चवीचवीने तो किडे मटकावत होता .
दिग्याची सिगरेट संपली. आम्ही निघालो.
-------------------------------------------
दुसऱ्या दिवशी तेच .
जसा उन्हाळ्याचा दिवस सरत नाही , जसे उन्हाळ्याचे दिवस सरत नाहीत -तसं .
काल जे घडलं तेच पुन्हा .
तो बगळाही तिथेच बसलेला होता . किडे खात. ती त्याची रोजची वेळच झाली होती जणू . आज तो मला गेल्या गेल्या दिसला होता .

-----------------------------------------------

असं रोजच होऊ लागलं .
एके दिवशी मी दिग्याला तो बगळा दाखवला . त्याला तो माहितीच नव्हता . तो अगदी तल्लीन होऊन सिगरेट ओढत राहायचा .
“ सालं पोट कोणालाच चुकत नाही . नाही का ? भरावंच लागतं ! “दिग्या म्हणाला .
“ हं ! दिग्या , पण एक बघ ना , आपला जसा लंचटाईम होतो , तेव्हा सगळ्यांचाच लंच टाईम होतो काय रे ? कोणी ना कोणी ,कुठे ना कुठे ,काही ना काही खात असतात. त्या मजुरांचा ,टपरीवाल्याचा , भिकाऱ्यांचा सुद्धा आणि या बगळ्याचा सुद्धा . हा बगळा बघ ना ,मी रोज बघतो . त्याची इथे किडे खायची वेळ ठराविक. जागा ठराविक . त्याचाही लंच टाईम असतोय बघ ! … “
“ बगळ्याचा लंच टाईम ? “ दिग्याने विचारलं आणि तो हसतच सुटला.

-----------------------------------

जेवण झालं .आम्ही रोजच्या प्रमाणे निघालो . ढग आले होते . कसं तरी होत होतं घुसमटल्यासारखं .
दिग्याने सिगरेट घेतली . मी टपरीमागे घुसलो .
आज तो बगळा दिसला नाही .मी सगळीकडे पाहिलं .ज्या जागी उभा होतो तिथून नजरेच्या टप्प्यात येऊ शकेल तेवढा नाल्याचा भाग पहिला . तो - दिसला नाही .मला चुकल्याचुकल्यासारखं वाटलं .
मनात आलं - तो पक्षी आहे ,एके ठिकाणी तो कसा ठरेल ?
निघताना पुन्हा एकदा पाहिलं .मला राहवलं नाही .त्याला तिथे पाहायचा मला जणू चाळाच लागला होता .
शेवटी त्या बेंचवर चढलो . आता नीट दिसत होतं . नाल्यात पाहिलं आणि …
थोडं लांबवर -
त्या भिकारणीने जाळ पेटवला होता .
म्हाताऱ्याच्या हातात मान टाकलेला तो बगळा होता . ‘अपना टाईम आयेगा ‘ असं लिहिलेल्या अक्षरांच्या अगदी जवळ धरून तो त्याची पिसं पिसं काढत होता .
बगळ्याचा ‘ टाईम ‘ आला होता .
म्हाताऱ्याचाही ‘ टाईम ‘ आला होता .
थोड्याच वेळात त्याचा लंच टाईम होणार होता .
दुपारची वेळ झाली की भूक लागते . काहीतरी पोटात ढकलावं लागतंच…
--------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
Bip499@hotmail.com

कथालेख

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

14 Apr 2019 - 7:23 am | शब्दानुज

अनपेक्षित शेवट. कथा फुलवण्यात हातखंडा आहे तुमचा.

तुषार काळभोर's picture

14 Apr 2019 - 8:02 am | तुषार काळभोर

कम्युनिकेशन सिम्प्लेक्स ऐवजी डुप्लेक्स किमान हाफ डुप्लेक्स हवं असं तुमच्या कथा वाचल्यावर नेहमी वाटतं.

नावातकायआहे's picture

14 Apr 2019 - 8:19 am | नावातकायआहे

कथा आवडली!
लिहित रहा. पुलेशु!

नाखु's picture

14 Apr 2019 - 8:37 am | नाखु

पद्धतीची कथा आवडली

श्वेता२४'s picture

14 Apr 2019 - 10:47 am | श्वेता२४

खूप छान लिहिले आहे. काही वाक्ये अगदी मनाला भिडली.

वकील साहेब's picture

14 Apr 2019 - 10:59 am | वकील साहेब

कथा आवडली.
एक शंका
जेवण झालं की दिग्याला सिगारेट ओढायची असते .
मग तो “ चल बिडी मारून येऊ “ . अस का म्हणाला ?

तुषार काळभोर's picture

14 Apr 2019 - 12:47 pm | तुषार काळभोर

ते इंजिनियर लोकांचं slang आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2019 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रवाही कथा. तुमची प्रत्यक्षदर्शी लिखाणशैली आवडली !

बबन ताम्बे's picture

14 Apr 2019 - 12:21 pm | बबन ताम्बे

खूप खूप आवडली कथा. प्रत्यक्षदर्शी आणि काळजाला भिडणारे चित्रण

उगा काहितरीच's picture

14 Apr 2019 - 12:41 pm | उगा काहितरीच

सॉरी टु से , पण मला नाही आवडली कथा. प्रसंग छान रंगवलाय पण कथाबीज कमकुवत वाटलं.

प्रमोद देर्देकर's picture

14 Apr 2019 - 2:37 pm | प्रमोद देर्देकर

तुमच्या सारख्या तुमच्या कथा ही नवोदित आहेत म्हणून आवडतात .
येवू द्या अजून.

जेम्स वांड's picture

14 Apr 2019 - 3:01 pm | जेम्स वांड

फारच जबरी लिहिलंय, अंगाला उन्हाचा दाह जाणवल्यासारखं वाटलं

एकनाथ जाधव's picture

15 Apr 2019 - 12:24 pm | एकनाथ जाधव

छान लिहील आहे. शैली आवड्ली.

खिलजि's picture

15 Apr 2019 - 1:50 pm | खिलजि

शेवट एकदम खत्रूड हाय >>>> बगळ्याची लागली ना कायमची

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2019 - 4:52 pm | मराठी कथालेखक

छान.. शहरी भागात बगळा.. जरी ओढा असला तरी तेथे बगळा येतो ? आश्चर्यच आहे.. असो.. बाकी कथा चांगली आहे.

उपेक्षित's picture

15 Apr 2019 - 5:07 pm | उपेक्षित

तुम्ही सारसबागेत जात नाही वाटत.

बिपीन भाऊ कथा एकदम जबरदस्त तुमच्या नेहमीच्या शैलीतील पण थोडी वेगळी.

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2019 - 5:37 pm | मराठी कथालेखक

नाही जात..
आणि कथेत कोणत्याही बागेचा उल्लेख नाही.. बांधकामाच्या साईटचा उल्लेख आहे

सिक्रेटसुपरस्टार's picture

16 Apr 2019 - 9:44 am | सिक्रेटसुपरस्टार

म्हाताऱ्याचाही टाइम आला होता यातून काही डार्क शेवट अपेक्षित आहे का? तसं असेल तर उत्तम जमलीये.

टर्मीनेटर's picture

16 Apr 2019 - 10:23 am | टर्मीनेटर

मस्त! कथा आणि लेखन शैली आवडली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 1:53 pm | बिपीन सुरेश सांगळे

शब्दानुज
आभारी आहे तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 1:54 pm | बिपीन सुरेश सांगळे

सगळ्या वाचकांचे खूप आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 1:55 pm | बिपीन सुरेश सांगळे

| पैलवान
कम्युनिकेशन सिम्प्लेक्स ऐवजी डुप्लेक्स किमान हाफ डुप्लेक्स हवं असं तुमच्या कथा वाचल्यावर नेहमी वाटतं.

क्षमा असावी
मला कळलं नाही
कृपया समजावून सांगावे

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 1:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

| श्वेता२४
खूप छान लिहिले आहे. काही वाक्ये अगदी मनाला भिडली.

कृपया ती वाकी कुठली , सांगाल काय ?

आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 1:58 pm | बिपीन सुरेश सांगळे

| उगा काहितरीच
सॉरी टु से , पण मला नाही आवडली कथा. प्रसंग छान रंगवलाय पण कथाबीज कमकुवत वाटलं.

तुमच्या प्रतिक्रियेचाही मी स्वीकार करतो
आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 1:59 pm | बिपीन सुरेश सांगळे

| प्रमोद देर्देकर
तुमच्या सारख्या तुमच्या कथा ही नवोदित आहेत म्हणून आवडतात .
येवू द्या अजून.

आभारी आहे
पण मी नम्र पणे विचारतो कि ?
नवोदित म्हणजे , त्या मध्ये काही त्रुटी जाणवतात का ?

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 2:03 pm | बिपीन सुरेश सांगळे

मराठी कथालेखक

आपल्या माहिती साठी मी सांगू इच्छितो
तो नाला मी रोज पाहतो
आणि बगळा सुद्धा

तुम्हाला आश्चर्य वाटलं , यात काही आश्चर्य नाही
त्या वरून हे कळतं की आपले पर्यावरण किती प्रमाणात खालावलेले आहे
पुढच्या पिढी चं तर अवघड आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 Apr 2019 - 2:04 pm | बिपीन सुरेश सांगळे

| सिक्रेटसुपरस्टार
म्हाताऱ्याचाही टाइम आला होता यातून काही डार्क शेवट अपेक्षित आहे का? तसं असेल तर उत्तम जमलीये.

नाही , असे काही डार्क अपेक्षित नाही
आपले आभार