मैत्र - १०

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
9 Apr 2019 - 7:01 am

कोणत्याही गोष्टीची अपुर्वाई ही त्या गोष्टीच्या अभावाखेरीज समजत नाही हे अगदी खरय. दरवर्षीच होळी आणि दरवर्षीच पोळी, त्यात काय मोठे कौतुक आहे असं वाटायला लागले होते. पण कालच्या होळीला आम्हा सगळ्यांच्याच गळ्याला बसु पहाणारा फास आकस्मिक सुटला. तेंव्हा कुठे आम्हाला नव्याने होळीचा आनंद समजला. पुरणपोळी तर बाजुलाच, दत्त्या होळीसमोरच्या नुसत्या गुळ खोबऱ्यावर प्रसन्न झाला. संध्याकाळी धोंडबाने त्याच्या आणि दत्त्याच्याही घरचा पोळीचा नैवेद्य गावात आणला होता, तोही दोन दोन. एक होळीसाठी आणि एक पोवळासाठी. त्यादिवशी खरी होळी झाली पोवळाची. त्याला आम्हा सगळ्यांच्या घरच्या पोळीचा घास भरवला गेला होता. आपल्या पोवळ्याचे ते कौतुक पहाताना नानांना आनंदाचे नुसते भरते आले होते. अंगणातल्या बाजेवर बळेच बसवुन त्यांनी आम्हाला स्वतःच्या हाताने गरम गरम भजी भरवली होती. कोर चतकोर पोळी गुळवणीत बुडवून आग्रहाने खायला लावली होती. मी आणि शाम नानांच्या बाजेवर बसुन समोरची होळी पहात होतो. आळीतला प्रत्येकजण येऊन होळीभोवती पाणी फिरवत होता. नैवेद्य अर्पण करत होता आणि रामाला नैवेद्य दाखवून परतत होता. सगळे किती आनंदी दिसत होते. खरंतर नेहमीसारखीच होळी होती पण आम्ही जरा जास्तच आनंदी असल्याने आम्हाला सगळा गावच आनंदात असल्यासारखं वाटत होतं.
बाजेवरुन उठत शाम म्हणाला “अप्पा, उठायला हवे. सगळे जेवायला वाट पहात असतील. या पोवळाने अगदी वेळेत येऊन लाज राखली रे आपली. कृष्णसुध्दा द्रौपदीने हाक मारेपर्यंत धावला नाही पण पोवळा हाकेशिवाय धावला.”
नाना त्याचे बोलणे ऐकत होते याचे त्याला भानच राहीले नव्हते. पण नानांना ‘लाज राखण्याचा’ संदर्भ लागला नाही. मी ही मग फारसा वेळ न घालवता शकीलच्या गाडीवर बसुन निघालो. आज शकील माझ्याकडे जेवायला येणार होता तर दत्ता शामच्या घरी जेवणार होता. इन्नीला मात्र कधी स्वतःच्या आईच्या हातच्या पोळ्या फारशा आवडल्या नाहीत. तिला धोंडबाच्या आईने केलेल्या, पुर्ण तव्याच्या आकाराच्या, जरा जास्त गोड पुरणपोळ्या आवडायच्या. त्यामुळे ती धोंडबाकडे जेवायला निघाली. धोंडबाला हा एक त्रास होताच. कारण आता तिला घेऊन जायचे, रात्री परत गावात आणुन सोडायचे त्यालाच करावे लागणार होते. राम आणि ठोब्बा मात्र आपापल्या घरी गेले. आज शक्यतो कुणी नेहमीसारखे रात्र जागवत बसणार नव्हते. सकाळी उठुन आम्हाला हरिश्चंद्र गाठायचा होता. त्याचीही तयारी करायची होती प्रत्येकाला. त्यामुळे आम्ही आज जरा लवकरच बैठक मोडली. नैवेद्य दाखऊन झाले होतेच. नानांचा निरोप घेतला. पोवळ्यालाही मनोमन नमस्कार केला आणि आम्ही नानांचे अंगण सोडले.

सकाळी लवकर निघायचे होते त्यामुळे मी पहाटेच ऊठलो होतो. पण आईने हातात पंचामृत आणि फुले असलेले तबक ठेवले आणि इतक्या सकाळी गावाकडे पिटाळले. मी कुरबुरतच ताम्हण घेतले आणि शंकराच्या देवळाकडे निघालो. तरीही बाबा म्हणालेच "अगं, नेहमी काय तू त्यांच्या सहलीची ‘यात्रा’ करतेस? चाललीत मुले भटकायला तर जाऊदे. मामा मामीसाठी काही द्यायचे असेल तर दे. हे काय नैवेद्य आणि पुजेचे व्याप लावतेस त्याच्या मागे?”
पण आईने नेहमीसारखे दुर्लक्ष केले. मलाही सवय झाली होती या सगळ्यांची. आमच्या गावचे शंकराचे मंदिर शिवकालीन आणि गावापासुन जरा बाजुला आहे. सुर्योदय व्हायचा होता. मी मंदिराच्या आवारातलीच काही धोतऱ्याची पांढरी शुभ्र फुले तोडली. बेलफळासहीत काही बेलपत्री काढल्या. समोरच्या भव्य नंदीच्या वृषणाकडे दुर्लक्ष करत त्याच्या भरदार वशिंडावरुन हात फिरवला. इतक्या लवकर येऊनही दिनकरभटांनी शंकराची पुजा उरकलेली दिसत होती. तरीही मी त्यांनी लावलेल्या त्रिपुंड्रावर माझा घसघशीत त्रिपुंड्र काढला. हलक्या हाताने बेलपत्रांचा लहान थर रचला. वरच्या अभिषेक पात्रात गडव्यातले पाणी ओतले आणि मोठ्याने “शंऽऽभौ हर हर” म्हणत त्या प्रशस्त आणि थंडगार पिंडीला कव घातली. खुप छान वाटले. जरा वेळ तेथेच मांडी घालुन बसलो आणि समोरील चंदनाच्या कासवावरचा शंख उचलुन बेंबीच्या देठापासुन फुंकला. गळ्याच्या शिरा अगदी तटतटुन आल्या. समोरील भस्माच्या पात्रातले थोडे भस्म कपाळाला, गळ्याला लावले. तेच भस्माचे बोट हलकेसे जिभेवर ठेवले आणि प्रसन्न मनाने घरी निघालो. आता आमचे दोन दिवस अगदी निर्विघ्न पार पाडायला शिव शंभो बांधील होता.
घरी जाताना मी शामकडे डोकावलो. त्याची तयारी होत आली होती. तयारी तशी काही करायची नव्हतीच पण मामा-मामींना काहीतरी घेऊन जाणे, एखादे ब्लँकेट आणि इतर किरकोळ गोष्टी. इन्नी काही दिसली नाही. काकुंना विचारले “काही कोरडा शिधा न्यायचाय का नैवेद्यासाठी?” तर “पाठवलाय” एवढच म्हणाल्या. मला काही समजले नाही. मी शामची वळकटी उचलली आणि दोघेही चालत घरी निघालो. शकीलकडे जायची आवश्यकता नव्हती. वेळेच्या बाबत तो पक्का होता. वेळ आली तर तो रामला आणि ठोब्बाला पारोसं असताना जिपमधे टाकुन घेऊन येईल याची खात्री होती. आम्ही मधल्या वाटेने घरी पोहचलो. दारातच इन्नीचे बुट दिसले. मी शामकडे पाहीले तर त्याने “काय माहीत?” या अर्थाने फक्त खांदे उडवले. दार ढकलुन घरात आलो तर बाबा नुकताच आलेला पेपर वाचत होते. आई किचन ओट्यावर बटाट्याची भाजी परतत होती आणि खाली बसुन इन्नी दशम्या करत होती. मला जरा अंदाज आला. मी ओट्यावर ताम्हण ठेवता ठेवता इन्नीला पायाने ढकल्यासारखे केले. ते आईच्या नजरेतुन सुटले नाही. माझ्या दंडावर हलकासा फटका मारत आई म्हणाली “असं पायाने मारतात का रे अप्पा? पाया पड तिच्या आणि हे ताम्हण येथे कशाला ठेवलेय? उचल आधी येथुन आणि देवघरात ठेव.”
मी ताम्हण उचलुन, इन्नीच्या डोक्यात टपली मारुन तोच हात कपाळाला लावत तिच्या पाया पडल्यासारखे केले. बाहेर आलो तर शाम्या हिरमुसल्यासारखा बसला होता. आता इन्नी सोबत आल्याशिवाय राहत नाही हे त्याच्या लक्षात आले होते. दहा मिनिटात मी माझे सर्व सामान काढुन सोफ्यावर मांडुन ठेवले. इतक्यात धोंडबा आणि दत्ता एकाच सायकलवरुन आले.
दत्त्याने किचनच्या दारात उभे राहुन आईला सांगितले “मोठ्याय, चहा उलसाक पन जराशीक गोडच कर बर्का.”
आईऐवजी इन्नी म्हणाली “चहा कशाला हवाय आता तुला दत्तुदादा? भाई येईल इतक्यात, मग दशम्या खाऊन लगेच निघू.”
“चालंन. पन मला दशम्या नको, रातीची पोळी आसन तर तिच खाईन मी दुधात.” शिळ्या पोळीच्या आठवणीने दत्त्या हुरळला पण एकदम चमकुन म्हणाला “आनी दम दम, काय म्हणलीस आता तु इन्ने? मंग निघु? कुटं?”
दत्त्याच्या जरा उशीरा लक्षात आले होते. ही इन्नी भल्या भल्यांना घोळात घेते बोलताना, दत्त्यातर लिंबु टिंबु होता तिच्या समोर. इन्नीला सकाळी सकाळी घरी पाहुन मला आणि शामला अंदाज आला होताच. दत्त्याला कळाल्यावर तो चिडला “अप्पा हे लचांड येत आसन त मी चाललो घरला. आपला हरिश्चंद्र म्हतारीच्या पायाजवळ ऱ्हातो. काय गड यंघायची गरज नाय त्यापायी.”
इन्नीला आमच्या सोबत यायचे होते. खरंतर तिला हरिश्चंद्रावर येण्यात काही रस नव्हता पण आम्ही अगोदर मढला जाऊन मग पुढे जाणार होतो. मढला बाबांचे मामा-मामी रहात. तिला तेथपर्यंत यायचे होते. आम्ही विरोध करणार हे तिला माहित होते पण दत्ता विरोध करेल असे तिला वाटले नव्हते. मी गावात गेलो होतो तेंव्हा तिने आईला बरोबर फितवले असणार कारण तिने “बघ ग मोठ्याई हा काय म्हणतोय!” म्हटल्यावर आई आम्हा सगळ्यांवरच ओरडली. दत्त्याला क्षणभरातच इन्नीने मोठा वशिला लावल्याचे लक्षात आले. त्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहिले.
इतक्यात आई हॉलमधे येऊन म्हणाली “काय रे दत्ता, लचांड काय म्हणतोस रे तिला. आलाय मोठा ‘येऊ नको’ म्हणनारा. तुम्हाला काय कडेवर न्यायचे आहे का तिला?”
मोठ्याईपुढे काही चालणार नाही हे लक्षात आल्यावर दत्त्या गप्प बसला. धोंडबाची मात्र चुळबुळ सुरु झाली. मला समजेना, कुठेही जायचं म्हटले की हा धोंडबा नेहमी इन्नीचा कैवार घेणार. मग आज त्याला काय झाले होते कुणास ठाऊक. आई अजुन किचनच्या दारात उभी होती तोवर शकील ठोब्बाला आणि रामला घेऊन आत आला. शोल्डर बॅग सोफ्यावर टाकत हसुन तो आईला म्हणाला “कोणाला कडेवर घेऊन जायचं म्हणतेस बडीअम्मी? दत्तुला?”
शकील आल्याने इन्नीची बाजु आता चांगलीच भक्कम झाली होती. ती म्हणाली “मी येतेय भाई मढपर्यंत. मग तुम्हाला जा पुढे कुठे जायचे तिकडे. तर दत्तुदादा म्हणतोय की इन्नी आली तर मी येत नाही म्हणुन. लहान मुलासारखं काहीतरीच आपलं.”
शकील दत्त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला “चुप रे दत्ता तू, हमेशा तिला परेशान करते रहता है. तु बस ग माझ्या शेजारी जीपमधे. जायेंग सब मिलकर.”
“बघ तर!” म्हणत इन्नी समाधानाने किचनमध्ये वळाली. तिचे बोलणे ऐकुन धोंडबा एकदम रिलॅक्स झाला. दत्त्याचाही चेहरा खुलला. म्हणाला “काय बावळं ध्यान हाय रे हे! मढपोत्तर येनार फक्त हे सांगायला काय धाड भरली होती का हीला? बिनकामाच्या मोठ्याआईच्या शिव्या खाल्या रामपहारी.”
आईने एका ताटात बटाट्याची पिवळी भाजी आणुन ठेवली टिपॉयवर. दुसऱ्या ताटात पाच सहा दशम्या आणुन ठेवल्या, दह्याचा वाडगा आणुन ठेवला. त्यातली एक दशमी उचलत धोंडबाने त्यात थोडी भाजी गुंडाळुन त्याची घट्ट वळकटी केली आणि म्हणाला “जातान खाईन रं म्या. एक काम आलं टाळक्यात. मी सायकल आबाच्या टपरीवं लावतो आन् तिथच थांबतो. लवकर निघा. मला ताटकाळाया लावू नका”
“अरे थांब, आबाची टपरी उघडली नसेल अजुन” असं मी म्हणेपर्यंत पायात चपला सरकाऊन धोंडबा गेला देखील.
घाई करायला हवी होती. बाहेर चांगलेच फटफटले होते. इन्नी काही आम्हाला सोडणार नव्हती त्यामुळे पुजेचे आणि नैवेद्याचे तिलाच आवरायला सांगितले होते. सगळ्यांचे डबेही तिच पहाणार होती. तिला सोबत घ्यायला सगळेच तयार झाल्याने ती उत्साहात सगळे आवरत होती. शामने आणि शकीलने सगळे सामान जिपमध्ये नेऊन ठेवले. आईने मामांसाठी बरेच काही बांधुन दिले होते, तेही व्यवस्थित एका बाजुला रचले. बाबांचा उत्साह तर आमच्यापेक्षा जास्त होता. त्यांच्या सख्ख्या मामाकडे निघालो होतो आम्ही. त्यामुळे त्यांच्या हजार सुचना सुरु होत्या “मामाला हे विचार, ते विचार, मामीला हे दे, पोरांना आठवणीने खाऊ द्या, परतीला निघताना मामाच्या हातात अमुक पैसे ठेवा. ते घेणार नाही पण तुम्ही ऐकु नका, गोठ्यात चक्कर मारा, गाईगुजींवरुन हात फिरवा, मामाला बरे वाटेल” वगैरे. आम्ही आई बाबांच्या पाया पडुन एकदाचे निघालो. शकील जिप वळवुन आला होता. शंभरदा सांगुनही आईने परत निघताना बजावलेच “अप्पा, पहिला नैवेद्य खिरेश्वराला ठेव. तारामतीवर गेलाच तर गणपतीपुढे फक्त पान सुपारी आणि नारळ ठेव. नारळ वाढवू नकोस. कुणा आल्यागेल्याची तहान भुक भागवेल तो नारळ. हरिश्चंद्राला कापुर दाखवायला विसरु नकोस.” आईचे काही संपत नव्हते. शकील मुद्दाम गाडी रेस करत होता. इन्नी आईच्या प्रत्येक वाक्याला “बरं! हं! ठिके!” करत होती.

आम्ही चौकातुन उजवीकडे वळालो आणि दोन तिन किलोमिटरनंतर लक्षात आले की धोंडबा राहीलाच की मागे. मग पुन्हा मागे आलो. धोंडबा मैलाच्या दगडावर वाट पहात बसला होता. त्याने हातानेच गाडी थांबवू नका म्हणून खुण केली आणि उडी मारुन जिपमध्ये बसला आणि एकदाची आमची ‘गड हरिश्चंद्रा’ची मोहीम सुरु झाली.
दत्त्याने तेवढ्यातही धोंडबाला चार शिव्या घालुन घेतल्या “काय भानगड असती रं तुही दर टायमाला? तुझ्यापायी तासभर खोळंबा झाला उगी.”
त्याला बाजुला ढकलुन बसायला जागा करत धोंडबा म्हणाला “ऐ अकलेच्या कांद्या, आता पाच मिनिट नाय झाले तुम्ही माझ्या म्होरुन गेला. मी आवाज द्येतोय तं आपल्याच नादात गेले. कसला रं तासभराचा खोळंबा? सरक तिकडं.”
दत्या हसुन म्हणाला “त्ये एक चुकलच पघ गड्या, पन तु तरी काय लई दिवं पाजाळलंत तव्हा तुही आठवन ऱ्हावी?”
धोंडबा कितीही सरळ असला तरी मला आबाचे सगळे धंदे माहित होते. रामोशाचे हे पोर सरळ असले तरी त्याचे धंदे सगळे वाकडे होते. मासे, खेकडे पकडणे, सशाची, पोपटाची पिल्ले पकडून गावात विकणे वगैरे. दारू गाळने हा तर त्याचा पिढ्यांपिढ्या चालत आलेला व्यवसाय होता. बापाच्या हाताखाली काम करता करता आबाने या कलेतली पदवी घेऊन बापालाही मागे टाकले होते. आणि याच आबाच्या टपरीवर धोंडबा भल्या सकाळी जाऊन बसला होता. आता तो काही खेकड़े मासे तर आणायला गेला नसणार हे उघड होते. त्याने सीटखाली सरकवलेली पिशवी मी बाहेर ओढायला सुरवात केली तर धोंडबाने "काय नाय रे त्यात अप्पा" म्हणत स्वतःच पिशवी बाहेर काढून माझ्यासमोर उघडून धरली.
“हे पघ, वाघूर हाय. तेच आनायला आबाकं गेल्तो राती तर म्हनला की टपरीवर हाये. म्हनुन सक्काळ सक्काळ त्याच्या टपरीचा उंबरा झिजावला उलसाक.” असं म्हणत धोंडबाने पिशवीतली पक्षी पकडायची जाळी थोडीशी बाहेर काढुन दाखवली. पण माझी शंका काही फिटली नाही. मला राहून राहून धोंडबाचा संशय येत होता. काही तरी भानगड नक्की होती. मी ती जाळी हाताने बाजूला करुन पिशवीत अजुन काय आहे ते पहायचा प्रयत्न केला. धोंडबा एकदम चिडला.
“काय अप्पा तुबी लावून धरलय उगा. दे ना सोडुन. म्होरं इन्नी बसलीय. लाज काढतो का काय तिच्याम्होरं आता!”
शकीलने जिपचे छत उतरवून ठेवले होते त्यामुळे वारा चांगलाच जाणवत होता. त्यामुळे इन्नीला व्यवस्थित ऐकू गेले नाही तरीही तिच्या तिखट कानांनी काहीतरी ऐकलेच. ती मागे वळुन म्हणाली “काय म्हणतोस रे धोंडीदादा?”
“काय नाय गं. अप्पाला म्हनत व्हतो का इन्नीला घेटलं संग ते बेस केलस. काय करनार व्हतीस दोन दिस आमच्या माघारी गावात राहून. उगा कटाळली अस्ती. नाय का अप्पा?”
मी नुसतीच मान डोलावली. माझ्या डोक्यात अचानक प्रकाश पडला पिशवीत काय असेल याचा आणि मी विषय बदलला.
अगदी सावकाश गेलो तरी प्रवास फार तर तिन तासांचा होता. विस एक किलोमिटर गेल्यावर माझ्या मामाचे शेत लागले. नको नको म्हणतानाही इन्नीने गाडी थांबवायला लावली आणि रस्त्याच्या कडेलाच असलेल्या मामाच्या घराकडे पळत गेली. दहाच मिनिटात ओढणी सावरत, एका हातात कसलासा पितळी डबा घेऊन इन्नी बांधावरुन धावत येताना दिसली. पाठी मागे “अग थांब की कार्टे जरा. सगळ्यांना बोलाव” म्हणत मामी धावत होती. तिच्या हातात खुरपे होते. बहुतेक रानात निघाली असावी.
इन्नी गाडीत येवून बसत म्हणाली “भाई, चालव लवकर गाडी जोरात”
दत्ता म्हणाला “दम जरा शकील. हिच्या टाळक्यात काय कांदं भरलत की काय समजना. बिचारी मामी बिन पायतानाचं बांध तुडवीत पळतीय हिच्या मागं ती काय येडी हाय का. तुला जायलाच कुनी सांगीतलं व्हतं म्हन्तो मी?”
इतक्यात धापा टाकत मामी आली. खुरपं घेतलेल्या हातानेच कपाळावरचे केस मागे सारत म्हणाली “पोर म्हणावं का काय हिला. बोहल्यावर उभं ऱ्हायचा टाईम अाला पन फिंदरीचं पोरपन काय जाईना”
इन्नी हसली. तिच्यावर हातातले खुरपे उगारल्यासारखं करत मामी मला म्हणाली “असं वो काय करता अप्पा. च्या तर घ्या की वाईच. असं कितीक हाय मढ इथून. मस दिस पडलाय अजुन”
मी खाली उतरत म्हणालो “खरच नको मामी. फक्त मढलाच नाही जायचे. हिला मामांकडे सोडून आम्ही हरिश्चंद्रावर जाणार आहोत पुढे. सकाळी उतरु गड. मामा आला की सांग त्याला. आम्ही परवा येताना थांबू जेवायला येथे”
“बरं, तसं त तसं. दमा जरा वाईच” म्हणत मामी परत घराकडे गेली व हातात कापडी पिशवी घेवून आली.
“कालच वांग्याचा तोडा झालाय. चांगली काटेरी पाहुन काढुन ठेवली व्हती. एवढी द्या मामांच्यात. मी इच्यारलं म्हनून सांगा आणि नायीच थांबत त मंग उशीर करु नका. निघा पटशीरी”
मामीने दत्ताकडे पिशवी दिली आणि इन्नीच्या गालांवरुन हात फिरवत म्हटलं “जपून जावा सम्दी. आन आप्पा, पोरीला नेवू नका गडावं. परवा येवा, मी वाट पघते”
शकीलने जिप रस्त्यावर घेतली आणि आम्ही निघालो. आता सरळ मढलाच थांबायचे होते. मी मामीला हात हलवत निरोप दिला. सकाळचे कोवळे उन असुनही सवयीने तिने एका हाताचा तळवा कपाळावर आडवा धरला होता आणि उजव्या हाताने ती आम्हाला टाटा करत होती.
दत्ताने वानवळ्याची पिशवी सीटखाली टाकली आणि इन्नीला म्हणाला “एक मोठ्याई सोडली तर सगळीच बोबंलत्यात हिला नेवू नका म्हनून पन तू कव्हा कुनाचं ऐकलय आजवर तव्हा आज ऐकनार हे. चल, आपल्याला काय”
इन्नीने पायजवळ पडलेल्या प्लॅस्टीक ग्लासमधला एक ओढून काढला आणि दत्त्याला मारला.
दत्ता हसत म्हणाला “दुसरं काय येतय तुला. हाताला भेटंल ते फेकायचा नायतर मांजरावानी बोचकारं काढायचं. तू बोलूच नको ना माह्याबराबर.”
इन्नीने एक पाय सिटवरच दुमडला आणि मागे वळत ती दत्त्यावर चिडली “मी बोचकारते काय मांजरी सारखी? दत्तूदादा तू फार आघाऊ झालाएस हां. थांब, मांजर कसं ओरबाडते ते दाखवतेच” असं म्हणत तिने एका हाताने दत्ताला ओरखडे काढायचा प्रयत्न सुरु केला.
धोंडबा जागेवरुन उठला आणि दत्त्याला बाजूला ओढत म्हणाला “आरं काय बारकाली हाय का तुम्ही आता. दत्त्या तू बस पाहू या अंगाला”
मी आणि शाम दत्ताला हसत होतो. शकीलच्या मागे आता धोंडबा बसला होता तरी इन्नी ओनवे होवून दत्त्याला बोचकारे काढायचा प्रयत्न करतच होती. शकीलने उजव्या हाताने स्टेअरींग पकडत दुसऱ्या हाताने इन्नीला सरळ बसवायचा प्रयत्न सुरु केला. दत्त्यावरही तो ओरडला “जरा चुप बैठ ना दत्ता तू पण. खवीसासारखा काय तंग करतो तिला. तूही सरळ बस गं”
इकडे गाडीत काय चाललय याचं ठोब्बाला काही देनंघेणं नव्हते. दोन सिटांमधील जागेत त्याने मस्त ताणून दिली होती. उश्याला ब्लँकेटच्या घड्या घेतल्या होत्या आणि तो कसली तरी कादंबरी वाचण्यात मग्न झाला होता. इन्नीचा हात पोहचू नये म्हणून दत्त्या वरच्या पाईपला धरुन अर्धा अधिक जिपच्या बाहेर लटकला. ते पाहून शकील चिडला. मीही दत्त्याची पँट धरुन त्याला आत ओढायचा प्रयत्न करत होतो तोवर शाम्या जोरात ओरडला “शकील पुढे बघ, पुढे बघ. मरतोय आता”
शकीलने आणि आम्ही समोर पहाणार तोवर एक भलामोठा ट्रक आमच्या गाडीपासून अक्षरशः दोन-तिन इंचावरुन सुसाटत गेला. कसला तरी खळ्ळकन आवाज आला. शकीलचे गाडीवर काहीच नियंत्रण नव्हते त्यामुळे त्याने करता येण्यासारखी गोष्ट केली. करकचून ब्रेक मारले. अर्धवट बाहेर असलेला दत्त्या एक झटका बसून क्षणात जिपच्या आत फेकला गेला. बेसावध असल्याने तो वेडावाकडा होत ठोब्बाच्या अंगावर कोसळला. इन्नीही विंडशिल्डवर जोरात आपटली. टायर्सचा कर्कश्श आवाज करत जिप एक गिरकी घेवून रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत उतरली. आम्ही जिकडून आलो होतो तिकडे तोंड करुन उभी राहीली. तो ट्रकही काही अंतरावर जावून उभा राहीला होता. कुणीच भानावर नव्हते. ठोब्बाची नेहमीप्रमाणे बोबडी वळली होती. इन्नी चांगलीच भेदरली होती. मी आणि दत्त्या लवकर भानावर आलो. शकील शांत होता. खाली उतरुन त्याने अगोदर इन्नी ठिक आहे का ते पाहीले मग आमच्याकडे वळाला. धोंडबाने तेवढ्यात वॉटरबॅग काढून इन्नीसमोर धरली होती. दत्त्याही तिच्या पाठीवर हात फिरवत होता. ती सावरली होती पण तिच्या अंगाची थरथर जराही कमी झाली नव्हती. झाले असे होते की दत्त्या-इन्नीच्या भांडणात शकील पडल्याने त्याचे रस्त्यावर काही क्षण दुर्लक्ष झाले होते आणि तेवढ्याच वेळात पुढच्या वळणावरुन आलेला ट्रक आम्हाला जोरात घासून गेला होता. जिपचा उजव्या बाजूचा आरसा गेला होता, मागे सामान ठेवायची जाळी असलेली फ्रेम वाकडी झाली होती आणि आम्ही सगळे गाडीतल्या गाडीत माठातल्या पाण्यासारखे चांगलेच हेंदकाळलो होतो. बाकी काहीच नुकसान झाले नव्हते. मानसीक धक्का सगळ्यांनाच बसला होता. पण सगळे सुखरुप आहेत हे पाहून सगळे लवकरच सावरले होते. सकाळी शंकरावर केलेल्या अभिषेकाला शिवशंभो जागला होता.
दत्त्याने इन्नीच्या डोक्यावरुन हात फिरवत विचारले “कशीय तू बाई? कुठंशीक लागलं पघू? घे, पानी पे अदुगर”
त्याने डोक्यावरून हात फिरवला आणि इन्नीला हुंदकाच फुटला. तिला बोलताही येईना. “शामदादा, अप्पा कुठेय?”
दत्त्याने शाम्याला पुढे ओढलं आणि म्हणाला “हा काय. त्याला काय धाड भरलीय. सम्दी धड आहेत. तू रडू नको बरं. गप्प”
इन्नीची ती भेदरलेली अवस्था पाहून दत्त्या चिडला. “अप्पा जरा हिच्याकं पघ. कंच्या भाडखावने या बेन्याला गाडी चालवायला शिकावली त्ये पघतोच”
मी इन्नीला बाजूच्या मैलाच्या दगडाला टेकवून बसवलं. धोंडबाला दत्त्यामागे पाठवलं. शकील मातीतच मांडी घालून इन्नीशेजारी बसला. ठोब्बाही त्याला खेटून तेथेच टेकला.
शकील म्हणाला “अप्पा त्या दत्त्याकडे बघ जरा. त्या ट्रकवाल्याला काही बोलायचे. चुक आपली होती. उलट त्या बिच्याऱ्याने वाचवले आपल्याला”
मला आता कुठे तो ट्रक आठवला. दत्या आणि त्याच्या मागे धोंडबा तिकडे धावला होता. शकीलचे बोलणे ऐकून इन्नीही उठून उभी राहीली.
“भाई त्या दत्तूदादाकडे पहा जरा. मी ठिक आहे. तो एकाचे दोन करुन ठेवेन. तू जा अगोदर”
राम जिपचा आरसा शोधत होता. मी आणि शकील ट्रककडे निघालो. ट्रक ड्रायव्हर खाली उतरलेला दिसत होता. दत्त्या त्याच्याबरोबर काहीतरी हुज्जत घालत होता. आम्ही पोहचलो तोवर प्रकरण चांगलेच हातघाईवर आले होते. दत्त्या त्या ड्रायव्हरच्या अंगावर धावून जात होता आणि धोंडबा सारखा त्याला मागे ओढत होता. एकुन काय झाले ते मला फारसे कळले नव्हते त्यामुळे मलाही दत्त्यासारखाच प्रचंड राग आला होता. धोंडबाने दत्त्याचा नाद सोडला आणि ड्रायव्हरलाच मिठी घालून मागे ओढले आणि ट्रककडे ढकलले. ड्रायव्हर चांगला सहा फुटांचा धिप्पाड शिख होता. डोक्याला किरमिजी रुमाल गुंडाळलेला, वितभर काळी पांढरी दाढी, निळ्या रंगाचा पठाणी झब्बा आणि आणि खाली पायजमा वगैरे काही नाही. डाव्या पायात बोटभर जाडीचे चांदीचे कडे. छातीवर जानव्यासारखा चामड्याचा पट्टा आणि त्याच्या टोकाला आकडेबाज कट्यार. तो फारसा काही हालचाल करत नव्हता, बोलत नव्हता तरी धोंडबाने त्याला ट्रकच्या दारावर दाबून धरले होते.
मी ओरडलो “धोंडबा एक कानफटात मार त्याच्या अगोदर मग बोलू काय ते”
मला गप्प करत शकील मोठ्याने म्हणाला “धोंडबा छोड उसको. त्याच्यामुळे वाचलो आपण लोग. सोड त्याला पहले”
दत्त्या चिडला “तू गप रे मिया. धोंड्या तू दोन हान मुस्काडात अदूगर भाडखावाच्या. पोर भेदरली पार आमची ह्याच्या गुनं. तू हान पह्यली मंग इच्यार काय इच्याराचंय ते त्या बेन्याला”
आम्ही काय बोलतोय ते त्या सरदारजीला चांगलेच कळत असावे, कारण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. त्याने मंद हसत धोंडबाचे दोन्ही हात अगदी सहजतेने बाजूला केले आणि म्हणाला “बात ही करनी है ना बेटा? जरा गर्दन तो छोड”
धोंडबालाच काय आम्हालाही त्याच्या ताकदीचा अंदाज आला. कारण एक आख्खे बाजरीचे पोते कवेत घेऊन धोंडबा अगदी सहज खळ्यातून घरी घेवून येई. त्याची पकड सोडवणे इतकं सहज नव्हते. सरदार मागे वळला आणि टाचा उंचावत त्याने ट्रकच्या ड्रायव्हर सिटखाली हात घालून चाचपडायला सुरवात केली. त्याला हवे ते मिळाले असावे. त्याने जरा जोर लावून आतली वस्तू बाहेर ओढून काढली. आमचे लक्ष होतेच. चांगली लांबलंचक, लाल मखमली म्यानावर सोनेरी नक्षी असलेली, पितळेची भक्कम मुठ असलेली तलवार काढून त्याने ती जमीनीवर टेकवली आणि तिच्यावर काठीवर रेलावे तसे रेलत तो काही क्षण आमच्याकडे पहात राहीला. आम्ही आवाक होवून पहात होतो.
काही वेळाने त्याने तलवार हातात घेवून म्यानाबाहेर पाच सहा इंच ओढली आणि दत्त्याकडे पहात म्हणाला “काय म्हणत होतास बेटा तू?”
बरं झालं राम आणि ठोब्बा इन्नीजवळच थांबले होते नाहीतर ठोब्बाची तर बोबडीच वळली असती. आमच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अगदी वेगवेगळ्या होत्या. मी धोंडबाकडे पाहीले तर तो बाह्या सावरत आजुबाजूला काही हातात येण्यासारखे आहे का हे पहात होता. शकील नेहमीप्रमाणेच शांत होता. दत्त्या चार पावले मागे सरकला होता. तो घाबरला नव्हता तर त्याच्या चेहऱ्यावर इन्नीची काळजी स्पष्ट दिसत होती. शाम्या यातुन मार्ग कसा काढायचा याचा विचार करत होता आणि माझी पाचावर धारण बसली होती.
शाम्या कसंबसं हसत म्हणाला “अरे वा! सरदारकाका तुम्ही मराठी छान बोलता की”
त्या स्थितितही मला शाम्याचे हसू आले. मला मागे सारत धोंडबा बाह्या सरसावत पुढे आला.
“भ्या कुनाला दावतो रे! मस हथ्यारं पाह्यलीत असली. एका गचांडीवर सुटला असता म्हाताऱ्या पर आता हात नायतर पाय मोडून ठेवतो का नाय ते पघच.”
दत्या त्याला दुजोर देत म्हणाला “न्हाय तं काय. आमच्या माळ्यावं बी दोन चार गंजत पडल्यात. पार पानपताच्या काळातल्या हायीत.”
मग तो मला म्हणाला “अप्पा तू या भानगडीत पडू नको. इन्नीकं पघ तू. मी आणि धोंडबा आवरतं घेतो या सरदारजीचं. व्हय लवकर. इन्नीला इकडं येवू देवू नगस”
शकील हे सगळं शांतपणे पहात नुसताच उभा होता. तो कधी सरदारजीकडे तर कधी आम्हा सगळ्यांकडे पहात होता. इतक्यात रामला आरसा सापडला होता, तो हातात घेवून तो सरळ आम्ही उभे होतो तिकडे आला. त्याच्या मागे मागे इन्नीही आली. वातावरण जरा गंभीर आहे हे पाहून राम गोंधळला.
इन्नीने मला विचारले “काय झालं रे अप्पा? आणि सगळे असे काय उभे आहेत. धोंडीदा का चिडलाय एवढा?”
मी काहीच बोललो नाही. धोंडबा म्हणाला “इन्ने, तू व्हय गाडीकडं. जरा या म्हाताऱ्याकडे पघतो मंग निघू. जा तू इथून”
मी इन्नीला मागे ओढत म्हणालो “तू कशाला कडमडतेस येथे? जा, जिपमध्ये जावून बस. शकील मिटवील सगळं”
पण इन्नीने माझ्या हातातला हात सोडवून घेतला आणि सरळ त्या सरदारजीपुढे जावून उभी राहीली. एका मुलीला समोर पाहून सरदार जरा गोंधळला असावा. त्याच्याकडे पहात इन्नी म्हणाली “काय चाललय काका? ही तलवार कशाला घेतलीय हातात? भिती दाखवताय का आम्हाला? की मारणार आहात?”
सरदार गोंधळला “तसं नाही मुली. मी काय म्हणतोय की…”
इन्नी भडकली “तसं नाही मग कसं आहे? वडीलांच्या वयाचे आहात तुम्ही. कसं वागताय? ठेवा ती तलवार आतमध्ये. ठेवा म्हणतेय ना”
बापरे! ही इन्नी चांगलीच पेटली. आता सरदारजी आणखी चिडणार आणि प्रकरण चिघळणार असं मला वाटलं. मी शकीलला म्हणालो “शकील बघ बुवा तूच आता. हे कुठल्या कुठे चाललय प्रकरण”
शकील हसत म्हणाला “सामने देख अप्पा”
मी पाहीले तर सरदारजीने तलवार म्यान करुन पुन्हा ट्रकमध्ये टाकली होती. चेहऱ्यावर अगदी गयावया केल्याचे भाव आणत तो म्हणाला “माफ कर बेटा. पण यांनी एखादी जरी मारली असती तरी या वयात काय अब्रू राहीली असती. मालाने भरलेला ट्रक असूनही मी धोका पत्करुन वाचवले तुम्हाला. पण तो पलीकडे उभा आहे तो मुलगा म्हणत होता एक दोन तोंडात मारा याच्या. त्यांना दुर ठेवायला मी असं केलं”
इन्नीने रागाने दत्त्याकडे पाहीलं. “दत्तूदादा, माफी माग यांची. आणि धोंडीदादा तुही माग. काका चुकलं असेल पण असं कुठे तलवार वगैरे दाखवतात का?”
दत्त्याने आणि धोंडबाने दोघांनीही माफी मागीतली. मीही पुढे होवून “काका चुकलं आमचं. आम्हीच गाडीत दंगा करत होतो. माफ करा” म्हणत त्यांच्यात सामील झालो. दोन मिनिटात वातावरण निवळलं. मग पाच दहा मिनिटे सरदारजी फार गप्पा मारत बसले. मुंबईतच जन्म झाला, आयुष्य मुंबई-नाशीक-पुणे करत कसे गेले, ग्रंथसाहीब वाचण्यापुरतीच पंजाबी वापरतो नाहीतर घरी देखील मराठीच कसे बोलतो, इन्नीसारखीच त्याची मुलगी कशी त्याच्यावर दादागीरी करुन त्याला जेवायला लावते वगैरे वगैरे. सरदारजी तसा बराच गोष्टीवेल्हाळ निघाला. “पागल कही के” म्हणत शकील इन्नीला घेवून जिपकडे गेला. आम्हीही मग सरदारजीला पुन्हा एकदा तलवार काढायला लावून प्रत्येकाने हातात घेवून पाहीली. त्याच्या कमरेची कट्यारही कौतूकाने पाहीली. सरदारजीला उशीर होत होता त्यामुळे तो निघायच्या घाईत होता. तो आम्हाला घेऊन जिपकडे आला. चारही टायरवर त्याने हाताची मुठ मारुन पाहीली. गाडीत बसुन थोडी पुढे मग थोडी मागे घेतली “सब चंगा हे जी. अगदी आरामात जावा. मुंबईला आला तर या गरीबाच्या घरी” म्हणत त्याने हात हालवला. ट्रककडे जायच्या अगोदर “बिलकूल मेरी बच्ची जैसी है” म्हणत इन्नीच्या डोक्यावरुन चार चार वेळा हात फिरवला. या सगळ्या भानगडीत अर्धा पाऊन तास निघून गेला होता. अर्थात मामांचा गाव आता जवळ होता. शकील आता सावकाश गाडी चालवत होता. आमच्या गप्पांचे टार्गेट आता दत्ता होता.
शाम्या म्हणाला “किती तलवारी आहेत म्हणालास दत्ता माळ्यावर?”
“हायला, एकच असली म्हणून काय झालं? पानपतावर लढून कटलेत आमचे खापरपणजे. खांडेनवमीला उगाच पुजत नाय आपन हत्यार” दत्त्याने बाजू मारुन नेली पण इन्नीने त्याला घोळात घेतलेच.
“दत्तूदादा, माझी शप्पथ घे अगोदर मग विचारते”
“तुही शप्पत. काय झालं?”
इन्नी हसत म्हणाली “तलवार पाहून घाबरला होतास की नाही? अगदी खरं सांगायचं”
“त्यात काय शप्पत घेन्यासारकं हाय. घाबरलो म्हंजी काय, बोबडी वळली व्हती. पर माघार नसती घेतली. तुझ्यापायीच झालं सम्द. काय भागूबाईसारखी रडत व्हती मगाशी. त्यापायी चिडलो. आयला, आता मेलो तरी तुला नेनार नाय कुटं”
धोंडबा सोडले तर आम्ही सगळेच घाबरलो होतो. यापुढे नको तिथे आगावूपणा न करण्याचे प्रत्येकानेच मनोमन ठरवले होते पण बिचाऱ्याने घाबल्याचे प्रामाणीकपणे कबूल केल्यामुळे टिंगल मात्र एकट्या दत्त्याचीच चालली होती. सरदारजी मात्र आम्हाला चांगला धडा शिकवून गेला होता.
अर्ध्या तासात आम्ही गाडी हायवेवरुन आत वळवली आणि मामांच्या अंगणात उभी केली. घरी कुणी असण्याची शक्यता फारच कमी होती. पण मामांचे शेत घरापासूनच सुरु होत असल्याने कुणी तरी गाडी पहाणार होतेच. आम्ही अंगणात आलो. मस्त शेणाने सारवलेले अंगण. चारी बाजूने दोन फुटांची भिंत. खुंटीला टांगलेली दोन इरली, शेतीचे सामान, समोर दोन भली थोरली आंब्याची झाडे. बाजुलाच बांधलेली दोन गोंडस वासरे. सगळं पाहून प्रसन्न वाटलं. गाडीचा आवाज ऐकून मामा बाहेर आले. मागोमाग मामीही आल्या. आम्हाला पाहून त्यांना कोण आनंद झाला होता. मामांनी घाईने अंगणातच घोंगडी अंथरली. राधाकाकूने गुळाचा खडा आणि पाण्याची केळी समोर आणून ठेवली. दमलो नव्हतो पण तहान खुप लागली होती. समोर खास पाहुण्यांसाठी राखून ठेवलेला घरचा लोण्यासारखा गुळ. (माझे आजोबाच घरच्या गुऱ्हाळातून मामांच्यासाठी दोन ठेपी बाजूला ठेवत) आम्ही निवांत गुळ खात सगळी पाण्याची केळी खाली केली. पाच दहा मिनिटे बाबा कसे आहेत, आईचे काय चालले आहे वगैरे चौकशी झाल्यावर आम्ही उठलो.
“मामा, आम्ही निघतो आता. इन्नीला सोडायला आलो होतो. उशीर होईल”
“आता ग बया. हे काय इपरीत?” म्हणत मामींनी तळहाताने नथ झाकत गालावर हात ठेवला.
मामींना समजेनाच पोरं अजुन अंगणातच आहेत. ना खळ्याकडे उधळली, ना डोंगरावर कांचन करवंदीत धडपडली, ना घाट उतरली. निघाली कुठे लगेच.
दत्त्या म्हणाला “कसय ना मामीबाय, आज हरिश्चंद्र यंघायचाय. रातीचा मुक्काम गुहेत. सकाळी निवद-नारळ करुन दुपारपर्यंत गड उतरु. जेवायला इथं. असा सगळा कार्येक्रम हाये. तव्हा निघूंद्या आम्हाला”
“आरं पर पेज-पापड तर खावून जाशान का नाय! बसा घडीभर. वैलावर पानी उकळतच असंन. कितीसा येळ लागतोय?” म्हणत मामीने राधाकाकूला नजरेनेच आत पाठवले.
सवयीने डोक्यावरचा पदर उजव्या हाताने ओढून, नथीला झटका देत मामी म्हणाल्या “बाय कशी हाय आमची? सम्दी बरी हायीत ना? आन हे धुळवडीचं काय काढलय हरिश्चंद्रावर अप्पा? तुमी दरसाल चैत्रात जाता नव्हं?”
“हो, मे महिन्यातच जातो पण यावेळी जरा बदल म्हणून चाललोय. चांदण्यात गड पाहू आज रात्री”
मामी म्हणाल्या “बरं तसं करा. पन अप्पा हे पाह्य, सावर्न्याकडं सरकू नका अजाबात. खुबी फाट्यावरुन खिरेसरात उतरा आन निवद नारळ करुन खिंडीतून वर सरका. राजदरुज्याकं फिरकू नका. शाम तूला सांगतीय मी. ऐकलं का ध्यान धरुन?”
शाम्याने मुंडी हालवली. खरं तरं मामींने त्याच्या मनातले ओळखले होते. त्याच्या डोक्यात सावर्ण्यातून साधलं करीत वर जायचे होते. हा रस्ता फार विचित्र आहे. मला फारसे धाडस वगैरे करण्यात जास्त रस नसल्याने मी नकोच म्हणतो होतो पण आता मामींनी वॉर्नींगच दिल्यामुळे शाम्या आता निमुट आमच्या मागुन येणार होता.
धोंडबाकडे पहात मामी म्हणाल्या “धोंडीभाऊ वाघूर आणलं का नाय?”
धोंडबा म्हणाला “त्याबगर काय गड यंघायला मजा हाय का मामीबाय!”
“वाटलच. तू कसा येसीन मोकळ्या हातानं” म्हणत मामींनी राधाकाकूला आवाज दिला “राधे, जरा मसाला एकत्र करुन बांधून दे पोरांना आन साताठ लिंबं दे सोबत”
राधाकाकूने पेजेचे वाडगे आणि मिरगुंडाच्या पापडाचे ताट आणून समोर ठेवले. शाम्यासाठी एका वाटीत काळे मिरे ठेचून आणून दिले. मसाल्याची पुडी आणि काही पिवळीधम्मक लिंबं धोंडबाच्या समोर ठेवली. पेज-पापड खावून आम्ही चांगले ताजेतवाने झालो. बाबांनी मामांसाठी दिलेले सर्व साहित्य धोंडबाने तोवर अंगणात काढून ठेवले होते. इन्नी पंधरा मिनिटात कपडे बदलून आली होती. मामांकडेही सगळेच लाड करत तिचे त्यामूळे तिची आज मजा होती. आम्ही निघालो तो मामांनी “जरा दमा” म्हणत थांबवले. सोपानाला हाक मारली आणि आमच्यासोबत देत म्हणाले “याला राहुंद्या संगं. गड पाठ हाय त्याला आन तसाही शामरावाचा काय भरोसा नाय. कसं? आन जाताना दौलतमामाच्या अंगणात गाडी लावा. सोपाना दाखवीनच तुम्हाला घर”
सोपाना हा मामांचा नातू. धोंडबाच्या वयाचा असेल. हुशार पोरगा. त्याची सोबत म्हणजे आम्हाला बरेच झाले. सोपानाही लगेच कमरेला आकडी लावून तयार झाला. इन्नीला सोडून, सोपानाला घेवून आम्ही निघालो. सावर्णे तसही जमणार नव्हतेच. कारण खिरेश्वराला नारळ देवून परत मागे फिरुन सावर्णे गाठायचे तर वेळ जाणार होता.
शकीलने गाडी हायवेवर घेतली आणि खुबीफाट्याकडे वळवली. इन्नी गाडीत नसल्याने नकळत एक मोकळेपणा आला होता. गाडी रस्त्याला लागताच धोंडबा म्हणाला “अप्पा, तू काय डोक्याने अधू हाय कारं? हायला पंध्रा दिसांमागं त्या आबाकडून गव्हाची दारू गाळून घेतलीय लिटरभर. त्याच्या डोंबलावर अर्धं पोतं घातलं त्यापायी गव्हाचं. आन तू इन्नीम्होरं लाज काढायला निगाला. वाट लावली अस्ती तिनं सगळ्या सहलीची. तू माग आता, देतो का तुला घोटभरतरी पघच”
हा आबा आमची फर्माईश असली की सिजनप्रमाणे कधी मोहाच्या फुलांची, चिकूची, सफरचंदांची अशी दारू गाळून द्यायचा. त्यात तो नेहमी करायचा ती अजिबात भेसळ नसायची. गुळ आमच्या गुऱ्हाळातलाच असे. चवीसाठी मिरच्या टाकी फक्त. बहुतेक सगळी प्रोसेस धोंडबाच्या नजरेखालीच होई. आबाने कधी फसवले नाही या बाबत. त्याला स्वतःला वेगवेगळे प्रयोग करायला आवडायचे. ते प्रयोग तो आमच्या फर्माईशीवर करी. आमचेही काम होई आणि त्याचेही काम होई. आज धोंडबाने एक कॅन आणला होता त्यामुळे मी आणि शाम्या दोघेही खुष होतो. ठोब्बा, दत्ता आणि शकील या भानगडीपासून दुर असत.
मी धोंडबाच्या गळ्यात हात घालून म्हणालो “अगोदर नाही सांगायचे का धोंडबा. मला कसं माहित असणार काय आणलय तू ते. तू आबाकडे गेला म्हणून मला काळजी वाटली इतकच”

शकीलने गाडी फाट्यावरुन खिरेश्वराकडे वळवली. रस्ता खुप खराब होता. आम्ही कसेबसे गावात पोहचलो. सोपानाने दौलतमामाचे घर दाखवले. तेथे गाडी लावली. सगळे सामान व्यवस्थित बांधलेले होते. त्याची वाटणी केली. माझ्याकडचे सामान नको नको म्हणत असतानाही सोपानाने उचलले. तोवर दौलतमामाने भली मोठी ताडपत्री आणून गाडीवर टाकली. आम्ही वेळ न घालवता निघालो. निघताना दौलतमामाने आवर्जून कॅन्व्हासची पाच लिटरची वॉटरबॅग भरुन दिली. ही एक चांगली सोय झाली. आम्ही गावाबाहेर आलो. थोड्याच वेळात मंदिरात पोहचलो. येथे एक नारळ वाढवला. खोबरे खाल्ले आणि मंदिराच्या शिल्पकाम पहाण्यात वेळ न घालवता निघालो. सोपान आणि धोंडबाचे तेवढ्या वेळात बरेच बोलणे झाले होते. गडावर वाघूर लावायची जागा दोघांनीही ठरवली होती. संध्याकाळीही चित्तुर हमखास उतरतील अशा जागा सोपानाला माहित होत्या. सोपानामुळे धोंडबाला बरीच मदत होत होती. शिकार हा दोघांचाही आवडीचा विषय. जी काही मजा करायची ती गड उतरताना करायची हे अगोदरच ठरले होते त्यामुळे आम्ही झपाट्याने गड चढत होतो. ठोब्बालाच जरा सावरायला लागत होते. काटक असुनही मुळात आळशी. ट्रेकींगला न्यायला अगदी नालायक. जवळ काही सामान नसतानाही तो टंगळमंगळ करत चालत होता. सगळ्यात पुढे सोपाना आणि धोंडबा होते. मागोमाग राम, शकील आणि शाम. मी सगळ्यात शेवटी ठोब्बाची शेपटी पिळत चालत होतो. अडीच तिन तासाची चाल होती फक्त. पेज-पापडाची भर होती पोटात. पाणी वगैरे चालताना पिता येणार होते. सुरवातीपासून आम्ही चाल टिकवून धरली होती. उन्हही जाणवायला लागली होती. धोंडबाने शर्ट काढून डोक्यावर घेतला होता. त्याचे पाहून बाकीच्यानीही तेच केले होते. माझ्या डोक्यावर पाण्याची पिशवी आडवी ठेवली होती. तिचे वजन जाणवत असले तरी पिशवी कॅन्व्हासची असल्याने डोकं अगदी थंड व ओलसर रहात होते. ठोब्बाची चाल पाहून मी बाजूची चांगली पाच साडेपाच फुटाची फांदी कमरेच्या हंटींग नाईफने मोठ्या कष्टाने तोडली आणि व्यवस्थित साळून त्याच्या हातात देत म्हणालो “हे घे ठोब्बा आणि आता चाल पकड हां गुमान नाही तर मी मागून पोटरीवर फटके मारीन शिंपटीने”
मध्येच धोंडबाने पाणी मागीतले म्हणून वॉटर बॅग मी पुढे पाठवली. ती दहा मिनिटाने पुन्हा फिरत फिरत माझ्याकडे आली तेंव्हा अर्धी रिकामी झाली होती. ओझे बरेच कमी झाले होते. अडीच वाजले असावेत. आम्ही टोलारखींड चढलो आणि डाव्या बाजूला वळलो आणि बालेकिल्ला गाठला. शकीलचे म्हणने होते की सरळ गणेशगुहा गाठूयात पण धोंडबाचे आणि सोपानाचे अगोदरच काही ठरले असावे. सावलीची जागा पाहून दत्त्याने चादर अंथरली. तिन वाजेपर्यंत आम्ही गड चढलो होतो त्यामुळे मला शकीलची घाई समजेना. चालताना जाणवले नसले तरी चांगलेच दमायला झाले होते. मी ठोब्बाकडून पिशवी घेतली आणि त्यावर रेलत मी चादरीवर आरामात लवंडलो. उन रनरनत असुनही सह्याद्री सुरेख आणि राकट दिसत होता. राम माझ्या पोटाची उशी करुन लवंडला. मग नाईलाजाने शकीलही घाम पुसत बसला. आजचा स्वयपाक रात्री नवाच्या पुढे सुरु करायचा असल्याने घाई अर्थातच नव्हती. फक्त मेन्यु काय असणार ते धोंडबाच्या नशिबावर अवलंबून होते. जर त्याच्या वाघरात दोन चार चित्तूर सापडले तर फर्मास भात रस्सा मिळणार होता नाहीतर खिचडी ठरलेलीच होती. सगळेच सावलीत निवांत होवून पसरले. शाम्याने पिशवीतून दोन सफरचंदे काढली आणि एक शकीलकडे फेकून तो ते कुरतडत बसुन राहीला. सोपाना आणि धोंडबाची मात्र घाई चालली होती.
सोपाना म्हणाला “पल्याडच्या बाजूला वाघूर लावलं तर दोन तिन चित्तुर सापडतील नशिबात असन तर. तासभर लावू वाघूर नायतर वर गडावर लावू”
मग धोंडबा आणि सोपाना ती जाळी आणि खुंट्या घेवून पलीकडच्या लहानशा मैदानावर उतरले. दहाच मिनिटात दोघेही घामाघूम होवून परतले आणि आमच्या शेजारी लवंडले.
धोंडबानी सोपानाला विचारले “धान टाकलय का सोपाना? न्हायतं नुसतं वाघूर लावून आपन निवांत बसायचो”
सोपानाने मान डोलावली. त्यांनी वाघूर लावले होते म्हणजे आता तास दिडतासतरी आम्ही येथून हालत नव्हतो. सगळेच शांत पडले होते तरी धोंडबाने सुचना केली “आता गदारोळ करु नका रं कुणी. गप ऱ्हावा उलसक”
धोंडबा माझ्या शेजारीच लवंडला. मी त्याच्या पायावर पाय टाकले आणि तोंडावर रुमाल टाकून झोपलो. दहा मिनिटांची डुलकी लागली तरी खुप होती. वारा पडला होता. कुणी कुणाशी बोलत नव्हते. मध्येच एखादा पक्षी कर्कश्श शिळ घालत होता. गडावर सगळीकडे उगवलेले गवत पिवळे पडले होते. हिरवळ नावालाही दिसत नव्हती. दुरवर काही गुरे चरताना दिसत होती पण गुराखी दिसत नव्हते. तेही बहूधा सावलीला लवंडले असावेत. पलिकडून दत्त्याच्या हलकेच घोरण्याचा आवाजही यायला लागला. हा दत्त्या म्हणजे बाजारात मिळणाऱ्या बाहूलीसारखा होता. ती बाहूली आडवी केली की डोळे मिटायची तसं दत्त्या कुठेही, कधीही आडवा झाला की पाच मिनिटात घोरायला लागतो.
शकीलने मला हलवत विचारलं “अप्पा जागा आहेस का? चेस खेलेगा. दो बाजी लगा लेते है बैठे बैठे”
मी तोंडावरचा रुमाल न काढताच ‘नको’ म्हणून मान डोलावली. दहा पंधरा मिनिटे गेली असतील शांततेत इतक्यात धोंडबाने त्याच्या अंगावरचे माझे पाय झटकले आणि घाईत उठत ओरडला “सोपाना, कडका आला जनू. ऐकला का?”
सोपाना झाडाला टेकून लिंबू चोखत बसला होता. तोही ताडकन उठला आणि म्हणाला “व्हय रं, ऐकला. पन यवढ्यात काय घावनार हाय? तरीबी पघूया का?”
मी चिडून उठत म्हणालो “काय रे धोंडबा, नुकताच डोळा लागला होता रे. काय गोंधळ आहे तुमचा”
धोंडबा म्हणाला “काय नाय रं. जरा कडका ऐकल्यागत वाटलं. वाघरात कायतरी घावलं असनार. मी आन सोपाना पघतो. तू पड”
मी उठल्यामुळे माझ्या पोटावर डोके ठेऊन झोपलेला रामही उठला. मग त्याने पलिकडे झोपलेल्या शाम्यालाही पायाने ढोसून उठायला भाग पाडले.
शाम्या जागाच असावा. कारण उठतानाच तो म्हणाला “धोंडबा अरे मीही ऐकली खसफस. काहीतरी नक्की असेल. चल मीही येतो”
“तू गप झोप ना निवांत. काय आसंन तर हिकडच आनू ना आमी? का तिकडच भाजून खानारे?” धोंडबा उगाच करवादला आणि उठला. त्याच्या मागे मागे सोपानाही गेला.
शाम्याची उत्सुकता पाहून राम म्हणाला “काही नसेल रे शाम. दिवसभर जाळं लावले तरी काही सापडत नाही कधी कधी. यांना दहा पंधरा मिनिटात काय सापडणार आहे? चल पलिकडची घळ पाहू आपण”
“थांब रे. पाहू तर खरं काय होतय ते. नसेल काही तर निघू पुढे. खुप झाली विश्रांती” म्हणत शाम्या परत चादरीवर आडवारला आणि धोंडबा गेला त्या दिशेला हाताव मान टेकवून पहात राहीला. मला खिचडीही चालणार होती आणि भाजलेले बटेरही चालणार होते त्यामुळे मला फारसा रस नव्हता शिकारीत. माझा तर शक्यतो विरोधच असे या सगळ्याला पण शाम्याच्या आणि धोंडबाच्या इच्छेखातर गप्प बसावे लागे. मी मांडी घालून चादरीचे निघालेले धागे हाताने तोडत बसलो होतो इतक्यात पलिकडून धोंडबाची मोठी आरोळी ऐकायला आली “शिकार फत्ते झाली रं अप्पा. म्हादेव पावला आज”
आम्ही बसलो होतो तेथून ते दिसत नव्हते. हळू हळू ती लहाणशी घळ चढून दोघेही वर आले. मला प्रथम धोंडबाचा वर केलेला हात दिसला मग हळू हळू दोघेहे घळ चढून आले. शाम्याचा सगळा जीव त्याच्या डोळ्यांमध्ये आला होता. धोंडबा आणि सोपाना जवळ आले. धोंडबाच्या हातात चित्तूर नव्हते तर भला थोरला करड्या रंगाचा ससा होता. धोंडबाने त्याचे दोन्ही कान मुठीत गच्च पकडले होते. सशाचा पुढचा उजवा आणि मागचा डावा पाय दोऱ्याने घट्ट बांधलेले होते. हे काम सोपानाचे असणार. धोंडबाने खाली बसता बसता तो गोजीरवाना ससा शाम्याच्या मांडीवर ठेवला. त्याच्या आणि सोपानाच्या चेहऱ्यावरुन आनंद नुसता ओसंडून वहात होता. मी सशाचे कान धरुन त्याला माझ्या मांडीवर घेतले. चांगलाच जाडजूड आणि जड होता तो. डोळे अगदी गुंजासारखे लाल होते. त्याच्या पाठीवरुन हात फिरवताना मला त्याच्या शरीराची थरथर स्पष्ट जाणवली. शाम्या आता उड्या मारायचाच बाकी होता. मला काय करावे ते समजेना. मी कमरेचा हंटींग नाईफ बाहेर काढला. शाम्या माझ्याकडेच बघत होता.
तो ओरडला “थांब थांब अप्पा. मारु नकोस इतक्यात. आपण रात्री नवाच्या पुढे चुल मांडणार आहोत. तोवर खराब होईल मटण”
मी त्याच्याकडे रागाने पहात म्हणालो “बामणा, मारत नाहीए मी त्याला. पायाची दोरी तोडतोय त्याच्या. जाऊदे त्याला त्याच्या मार्गाने”
शाम्याच्या हुशार मेंदूने क्षणात सगळा विचार केला. अप्पाला विरोध करायचा म्हणजे सहलीचे मातेरे होणार आणि ससा सोडून दिला तर रात्रीच्या जेवणाची सगळी गम्मत जाणार. दोन्ही बाजूने तो अडचणीत होता. त्याचा एकमेव आधार म्हणजे शकील. तो त्याला म्हणाला “शकील बघ रे तुच. आता या अप्पाला मी काही सांगू शकत नाही. तुला जे योग्य वाटेल ते करुयात. मी काही बोलणार नाही”
शकीलने काढून ठेवलेले बुट पायात घातले. नाड्या आवळताना तो मला म्हणाला “देख अप्पा. मलाही नाही आवडत असं प्राणी मारुन खायला. तु बेहरत जानता है. पण मग तू अगोदरच का नाही विरोध केला. धोंडबाचे आणि सोपानचे कष्ट वायाला घालवणार आहेस का? ते वाघूर लावत होते तब क्यू कुछ नही बोला तू? आणि आता मांडीवर खरगोश घेतल्यावर तुझ्यातली करुणा जागी झाली याला काय अर्थ आहे? या फिर खरगोश का गोश्त तुझे पसंद नही इस लिए रहम आ रहा है तुझे? ही दया नाही अप्पा कमकुवत मनाचे लक्षण आहे हे. कमजोर दिल अौर रेहमत से भरा दिल दोनो फर्क होता है अप्पा”
शाम्या म्हणाला “नाही तर काय!”
मी कळवळून म्हणालो “अरे पण शकील, मला काय माहित ससा सापडेल म्हणून. एखादे बटेर सापडेल जाळ्यात असं वाटलं मला”
“म्हणजे बटेर मारायला तुला काही वाटणार नाही पण फक्त ससा मारायचा नाही असं काही आहे का?”
“तसं नाही रे. बटेर तर नेहमी पहातोच ना आपण मारताना. मला आवडतोही त्याचा रस्सा”
“म्हणजे तुला ससा मारताना पहायची सवय नाही म्हणून सोडून द्यायचाय का? दे मग सोडून”
आता मला काही समजेना. “शकील शब्दात पकडू नकोस उगाच. करा काय करायचे ते” असं म्हणत मी ससा शाम्याकडे सोपवला. त्याने त्याला लगेच त्याच्या सॅकमधे मान बाहेर राहील असा ठेवून दिला.
दत्त्या माझ्याकडे पाहून म्हणाला “अप्पा तुझं काय चुकीचं नाय वला. पन चालतय एवढं. उसातली रानडुकरं नाय मारत का दरसाली आपन. मंग तव्हा? आन ससा हाय चांगला थोरला. तुला टोपी करु की त्याच्या कातड्याची. मंग तर झालं?”
“आयला दत्त्या, टोपीचा विषय नाहीए. तो अजुन क्रुरपणा नाही का होणार? अरे काय डोक्यावर पडलाय का तू. पहिल्यांदा सोडून दे तो ससा”
धोंडबाने दत्त्याला मागे ओढले “हायला, शकीलन आनलय बरुबर त्याला जाग्यावर तर तू कह्याला काडी टाकीतो अजून त्यात? व्हय तिकडं. घड्या कर चादरीच्या अदुगर. निगायला होवं”

आम्ही आवराआवर केली. उन्हं कलायला लागली होती. संध्याकाळी मटण खायला रामही असणार होता तरी शाहजुक सारखा तो शाम्याला म्हणाला “शाम त्याला धान खावू घाल आणि पाणी पाज मग ठेव पिशवीत”
मी पाण्याची पिशवी रागाने ठोब्बाच्या अंगावर फेकली आणि सगळ्यांच्या पुढे निघालो. तासाभराची चाल होती. उन्हं आता पिवळी पडायला सुरवात झाली होती. बहुतेक सगळा सह्याद्री पिवळाच दिसत होता. आम्ही समोरच्या लहान मैदानात घुसलो. काही ठिकाणी वाळलेलं गवत अगदी खांद्यापर्यंत येत होत. आम्हाला अजुन कुणी गड उतरताना दिसले नव्हते. शाम्याची आता मात्र घाई चालली होती. तारामतीच्या गुहांवर त्याने मनोमन काठ मारली आणि मुक्काम उघड्या आकाशाखाली कड्यावर करायचा असं त्यानं ठरवलं. तसही मला गुहेमध्ये नेहमीच घुसमटल्यासारखे होते. थंडी किंवा पाऊस असेल तर गोष्ट वेगळी. आज दिवस सुरेख होता, हवाही छान होती. चांदण्या जरी फारशा दिसल्या नाही तरी चांदणं झकास पडणार होते. त्यामुळे मीही कोकणकड्यावरच मुक्काम करावा या मताचा होतो. गडावर येवून सुर्यास्त नाही पाहीला मग काय पाहीले असं शाम्याचे मत होते त्यामुळे त्याची घाई सुरु होती. ठोब्बा काठी टेकत चालत होता. शाम्याने मला मागे टाकले आणि तो माझ्या समोर चालू लागला. त्याच्या सॅकमधला ससा माझ्याकडे केविलवाना होऊन पहातोय असं मला वाटत होतं. माझी चलबिचल पाहून धोंडबाने शाम्याला हाक मारुन मागे घेतले. पाच वाजत आले होते. आम्ही येताना जरी घाई केली असली तरी मध्ये बराच वेळ गेला होता. आज काही देवदर्शन आणि नैवेद्य करायचे नसल्याने धोंडबाने आम्हाला सरळ कोकणकड्यावरच नेले. समोर कोकण कडा पाहताच सगळ्यांनी सामान खाली टाकले आणि धावत सुटलो. अगदी कड्याच्या जवळ गेल्यावर सगळे थांबले आणि मग हळू हळू पुढे जावून सह्याद्रीचे ते अनेकदा पाहीलेले रौद्र रुप पुन्हा एकदा डोळे विस्फारुन पहात राहीलो. हा कोकणकडा नेहमीच पहाणाऱ्यावर गारुड करतो. धोंडबाचे समोर कमी आणि शाम्याकडे जास्त लक्ष होते. शाम्याला काय विचित्र सवय होती माहीत नाही पण कोकणकड्यावर उभे राहून त्याने नेहमी एकच इच्छा व्यक्त केली होती “या कड्यावरुन उडी मारायला हवी” ही गम्मत नसायची. हे बोलताना त्याचे डोळे विलक्षण चमकायचे. व्यसनी मानसाला इप्सीत अमली पदार्थ मिळाल्यावर त्याचा चेहरा जसा होतो तसा कोकणकडा पाहून शाम्याचा चेहरा व्हायचा. त्यामुळे कोकणकडाच काय अगदी शिवनेरीवर जरी आम्ही कधी गेलो तरी धोंडबा नेहमी शाम्याच्या आसपास असे. ठोब्बा पालथे पडुन समोर पहात “भारी आहे रे! खरच भारीच आहे” असं काहीतरी पुटपुटत होता. तेवढ्यात रामने हातातली पाण्याची बाटली पुढे होत खाली ओतली. पाणी खाली गेल्यासारखे वाटले आणि क्षणात त्याचा फवारा उलट्या दिशेने वर उडाला. सुर्याच्या मावळत्या किरणांची एक लाल रेष त्यात कापुस पिंजल्यासारखी चमकली. सुर्याच्या मावळत्या किरणात हवेतले धुळीचे कण चमकत असल्याने पुर्ण दरीत एक प्रकारचा लाल द्रव भरल्यासारखा वाटत होता. व्हिजिबीलीटी कमी झाल्यामुळे या इफेक्टला चांगलीच खोली आली होती. सुर्य़ मावळायला अजुन वेळ होता. धोंडबा आणि सोपाना मागच्या मागे गायब झालेले मला समजलेच नाही. सगळ्यात अगोदर दत्त्या मागे फिरला. त्याने जरा दुर कातळ सोडून चांगलीशी जागा पाहीली. येताना तरवडाची मोठी डहाळी त्याने तोडून आणली होती, तिने जमीन साफसुफ केली. खाली घोंगडी अंथरुन त्यावर दोन चादरी टाकल्या. चादरीच्या चारी कोपऱ्यांवर आमचे सगळे सामान व्यवस्थित रचून ठेवले आणि मला हाक मारली. मग एक एक करत सगळे चादरीवर येवून लवंडलो. समोरचे दृष्य आणि आजूबाजूचा परिसर पाहून आमचा श्रमपरीहार झाला होता. प्रसन्न वाटत होते. मी टीशर्ट काढून पिशवीत कोंबले आणि ब्लँकेटसची मोठी वळकटी टेकायला घेतली व पाय पसरले. एकमेकांच्या नादाने जाणवले नसले तरी मुक्कामावर पोहचल्यावर मात्र समजले की बालेकिल्ल्याने चांगलाच दम काढला होता माझा. शाम्याने ससा बाहेर काढून त्याला पुन्हा धान खायला घातले आणि माझ्या शेजारी लवंडला. दत्ता, राम आणि ठोब्बा लाकडे गोळा करायला गेले. सगळीकडे लालसर तांबूस प्रकाश पसरला होता. खालची जमीन अजुन गरम लागत होती. सुर्य जवळ जवळ अस्ताला टेकला होता. सुर्यास्त झाला. चंद्रोदयाला वेळ होता. मी आणि शाम्या चादरीवर लोळत होतो. शकील अजुन कड्यावरच्या खडकावरच बसला होता एकटाच. बऱ्याच वेळाने दत्त्या आणि बाकीचे सरपण घेवून आले. दत्त्याने हंटींग नाईफने फुटभर व्यासाचा खड्डा केला. लहान लहान लाकडे त्यात रचून ठेवली. बाजूलाच वाऱ्याची दिशा पाहून शेकोटी पेटवली. बराच वेळ झाला तरी धोंडबा आणि सोपाना आले नव्हते. त्यांना शोधायला मी रामला पाठवणारच होतो तेवढ्यात दुरुन धोंडबाचीच हाळी आली. थोड्याच वेळात दोघेही आले. सोपानाच्या डोक्यावर सरपणाची लहानसशी मोळी होती तर धोंडबाच्या हातात पाण्याने भरलेली बादली.
मी विचारले “आयला तुला कुठे बादली मिळाली धोंडबा?”
“अरे कुंडावर काय ना काय असतच रे” म्हणत धोंडबा सप्पय बसला आणि त्याने त्याच्या पिशवीतू ‘तो’ खास कॅन काढला. प्लॅस्टीकचे ग्लास काढले. इन्नीने दिलेल्या चकल्यांचे तुकडे झाले होते. त्याही काढून ठेवल्या. लिंबाच्या फोडी केल्या आणि त्याने रामला हाक मारली “ओ रामभाऊ, चला.”
मी धोंडबाला थांबायला सांगीतले आणि शकीलला आणायला गेलो. त्याची आज काय तंद्री लागली होती कुणास ठाऊक. त्याला हाक मारुन बोलावले आणि आम्ही दोघेही पुन्हा चादरीवर येवून बसलो. धोंडबाने ग्लास भरला आणि “भुताखेतांच्या नावानं होऽऽ” म्हणत अर्धा खड्यात रचलेल्या लाकडांवर ओतला व उरलेला अर्धा शेकोटीवर ओतला. धुग धुग जळणारी शेकोटी एकदम ठिणग्या फेकत भडकली.
“हायला हे आबा हाय जरा कामातून गेलेलं पन वस्तू बाकी एक नंबर बनीवतय” म्हणत धोंडबा मनापासुन हसला. त्याने चार ग्लास भरले. भरपुर पानी ओतले आणि आमच्या हातात दिले. आम्ही ‘चांगभलं’ चा गजर करत एका दमात ग्लास रिकामे केले आणि चकल्यांच्या तुकड्यांची मुठ भरली. आबाची कमाल छाती जाळीत पोटात उतरलेली अगदी स्पष्ट जाणवली. मी रामकडे पाहीले तर तो अजुन हातातल्या ग्लासकडे द्विधा मनःस्थित पहात होता. बिअरपर्यंतच त्याची मजल होती. आज हे हार्ड ड्रिंक त्याला झेपत नव्हते. “तू पे रे राम, उलशीकच दिलीय, बाकी नुस्त पानीच वतलय म्या” म्हणत धोंडबाने हाताने बळेच तो ग्लास रामच्या तोंडला लावला.
दत्त्या म्हणाला “हैला, धोंड्या त्ये पेत नाय तं कह्याला पाजीतो रे त्याला? आन ठेव आता ते सम्द एकांगाला. यवढ्या तेवढ्याने ढगात जातो तू आन आमच्या डोक्याला कहार करतो”
धोंडबा हसुन म्हणाला “आरं रोज रोज हाय का ही मजा? आन तसबी म्हादेवाच्या डोंगरावं बसलोय आन वानूरी नाय असं कव्हा झालय का?”
शाम्या खो खो हसुन म्हणाला “धोंडबा, वानूरी नाही रे. वारूणी म्हण”
“त्येच ते. काय बी म्हणलं तरी जाती डोक्यातच ना? मंग झालं तर”
माझ्या तोंडातली कडवट चव अजुन गेली नव्हती तोवर धोंडबाने माझा दुसरा ग्लास भरला आणि म्हणाला “हे खास गोष्टी साटी हाय. अदुगर घे मंग सांगतो”
मी निमूटपणे तोंड वाकडे करत तोही ग्लास रिकामा केला आणि धोंडबाकडे पाहीले. “सांगतो जरा टायमानं” म्हणत धोंडबा उठला. दत्त्याने शेकोटीत अजुन लाकडे टाकली. सोपाना माझ्याकडे आश्चर्यचकीत होवून पहात होता. मी दारु पितो यावर त्याचा कदाचित विश्वास बसत नसावा. उगवतीला आता धुळवडीचा पिवळा धम्मक चंद्र दिसायला लागला होता. शकील आणि ठोब्बा काहीतरी गप्पा मारत बसले होते. राम नुसताच चकल्या खात बसला होता. बराच वेळ आम्ही थंड हवेचा आणि शेकोटीचा आनंद घेत बसलो. मला आता हलके हलके आणि छान वाटायला लागले होते.
दत्त्याने धोंडबाला विचारले “चुल पेटवायची का धोंडबा? आठ वाजत आलं अस्तील”
धोंडबाने काही उत्तर द्यायच्या ऐवजी उठून शेकोटीतले एक लाकूड काढले आणि खड्यातील लाकडांमध्ये टाकले. तासाभरापुर्वी त्यात ओतलेल्या दारुमूळे लाकडे भप्प आवाज करत पेटली.
माझ्याकडचा हंटींग नाईफ घेवून धोंडबा सोपानाला म्हणाला “सोपाना तो ससुला उचल. जरा वाघराकडं चक्कर मारु. ते मोठं भगुन घे संग”
सोपानाने ससा उचलायच्या अगोदर मी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि सोपानाकडे दिला. धोंडबा हसला. यासाठी तर त्याने जास्तीचा ग्लास दिला होता मला. दोघेही अंधारात निघून गेले. मागोमाग शाम्याही गेला. चुल आता चांगली पेटली होती. धोंडबा येईपर्यंत त्यात चांगले निखारे पडणार होते. शकील गप्प गप्प होता.
मी त्याला विचारले “काय रे शकील, तासभर झाला तू अगदी शांत शांत आहेस. काय झालं?”
“कुछ नही अप्पा. ही आपली शेवटची सहल ठरते की काय असं वाटलं. या महिन्यात आपल्या परिक्षा संपतील. एक दिड महिन्यात निकालही लागेल. मग कोण कुठे कुठे ॲडमिशन घेईल अल्ला जाने. शाम्या काहीही झाले तरी मेडीकलला जाणार, इन्नीचे केमीकल नक्की आहे. तुझं आणि माझं इंजिनिअरींगचे नक्की झालय. मी मुंबईला आणि तू पु्ण्याला. राम, ठोब्बा काय करतात कुणास ठाऊक. दत्ता आणि धोंडबा काही घर सोडणार नाही. आता काही शाम्याच्या ओट्यावरचा कट्टा भरणार नाही. अम्मीच्या शेवया खायला कुणी जमा होणार नाही. मोठ्याईची बोलणी खायला फक्त दत्त्ता असणार येथे. कैसे होगा अप्पा? मुश्कील है यार ये सब”
आधीच देशी व्होडका डोक्यात गेली होती त्यात शकीलचे हे बोलणे ऐकून मला एकदम भरुन आले. मी हा विचारच केला नव्हता. बरं यावर काही उपायही नव्हता. रामवर व्होडकाचा अम्मल असावा. तो जोरात म्हणाला “मी कुठेही जाणार नाही. कुणाला जावू देणार नाही. आपण येथेच भाजी भाकरी कमाऊन खावू. इन्नीसाठीही घरजावई पाहू”
हे ऐकून मी हसायला हवं होतं पण मलाही त्या जास्तीच्या ग्लासने भावूक केले होते. मी म्हणालो “तसच करुयात. काय करायचेय पैसे कमावून. आणि एवढी सोन्यासारखी बहीण कशाला द्यायची कुणाच्या घरी? आपण कुणीच गाव सोडायचे नाही” शकील नुसताच केविलवाना हसला. ठोब्बा मात्र एकदम गंभीर झाला.
“पन मी म्हंतो, कह्याला यवढा इचार करायचा? माऊलीनी आयुक्ष दिलय, ते थोडं असं थोडं तसं असायचंच. दोस्ती कव्हा तुटत अस्ती का अप्पा? पण ज्याला त्याला वाट असती आपापली. ती चालायलाच लागती”
मी नुसताच हुंकारलो.
“आन हे पघ अप्पा, तुम्ही डाक्टर, इजेनर नाय झाले तर आमी कुणाच्या भरवशावर गावात छाती काढून चालायचं?
राम वैतागला “ओ दत्तात्रयमहाराज, प्रवचन बास करा आणि त्या धोंडबाला हाक मारा. नवू वाजत आलेत. अजुन कशात काही नाही. भुक लागलीय मला”
दत्त्या बुड झटकत उठला आणि अंधारात नाहीसा झाला. मी कॅनमधून थोडी ग्लासात ओतून घेतली आणि शकीलला घेऊन कड्याकडे असलेल्या कातळाकडे निघालो. चांदनं अगदी लख्ख पडले होते. दुरवरच्या डोंगरांच्या कडा वॉटरकलरमधल्या चित्रासारख्या निळसर काळ्या दिसत होत्या. शकील आणि मी कुठले कुठले शेर आठवत, एकमेकांना सांगत कातळावर आरामात बसलो. थोड्या वेळाने धोंडबाची हाक आली म्हणून आम्ही उठलो. शकील उठता उठता म्हणाला
दोस्त दो चार निकलते हैं कहीं लाखों में
जितने होते है सिवा उतने ही कम होते है
मी त्याच्या पाठीवर थाप मारली. त्यानेही माझ्या गळ्यात हात टाकला आणि आम्ही शेकोटीकडे परतलो.
धोंडबा म्हणाला “अप्पा वैतागनार नसशीन तर इचारतो.”
“तुला कधी पासुन माझ्या चिडण्याची चिंता वाटायला लागली धोंडबा. आणि आता चिडलो काय आणि नाही चिडलो काय, काय फरक पडणारे”
शकील पाठीत गुद्दा मारुन म्हणाला “अप्पा, आँसमासे उतर अब निचे. निरवानिरवीची काय वार्ता करतो. निट बोल जरा त्याच्याशी”
मी जीभ चावून म्हणालो “काय झालं धोंडबा? तांदूळ विसरला की मसाला?”
“ते नाय. इकडं पघ जरा”
मी धोंडबाकडे पाहीले. त्याने मागे धरलेले हात समोर केले. त्याच्या दोन्ही हातात दोन दोन चित्तूर होते. हाताच्या बोटांमध्ये त्यांचे पाय धरल्याने ते वटवाघळासारखे उलटे लटकलेले होते. फडफड करुन दमले असावेत त्यामुळे शांत असावेत.
मी विचारले “अरे पण संध्याकाळी कसे काय सापडले हे जाळीत? रात्री सापडत नाहीत ना?”
“अरं जमीनीवर खेळनारा पक्षी हाय हा. घावला. एकाला दोघं सापडले अस्तील. काय करु? सशाचं पन मटान मोकार पडलय. चांगला गबदूल व्हता”
“बघ तुला सुचेल ते कर. नाहीतर शाम्याला विचार”
“शाम्याच म्हनला अप्पाला इचार. आता यातले दोन सोडून देतो आन दोन भाजतो. सशाचा रस्सा करु. कसं?”
“तू आणि शाम मिळून ठरवा आणि वाढा लवकर जेवायला. भुका लागल्यात धोंडबा”

मी आणि शकील पुन्हा चंद्राकडे पहात गप्पा मारत पडलो. धोंडबा आणि शाम स्वयपाकाला लागले. दत्त्या त्यांना हवे ते पिशवीतून काढून देत होता. पिशवी इन्नीने भरल्यामुळे गरजेच्या सगळ्या गोष्टी त्यात होत्या. मामींनीही मसाला बांधून दिला होता. शाम्याने पहिल्यांदा चार कांदे चिरुन तळून घेतले. त्यात पाणी टाकून चांगले उकळवले व भिजवलेला तांदूळ घालून पातेले शेकोटीतले विस्तव बाहेर ओढून त्यावर ठेवले. अर्ध्या तासात त्याचा कांदाभात तयार होणार होता. मसाल्याची आणि लिंबाच्या रसाची पेस्ट करुन त्यात दोन्ही बटेर घोळवून तेही शेकोटीच्या आहारावर ठेवले. तोवर धोंडबाने मोठे पातेले चुलीवर ठेवून कांदा, बाकीचा मसाला परतुन त्यात मटण शिजायला टाकले. वरुन थोडे बेसनपिठ पेरुन झाकण ठेवले आणि आमच्यात येवून बसला. दत्ताही निवांत झाला. धोंडबाने पुन्हा कॅन बाहेर काढला आणि माझा व त्याचा ग्लास भरला. मला नको होते पण आता मन एकदम तरल झाले होते. दत्त्याने आग्रह केल्यावर सोपानानेही कमरेचा पावा काढला आणि कसलीशी अनोळखी सुरावट वाजवायला सुरवात केली. राम पेंगूळला होता. दत्त्या त्याला जागं ठेवायचा प्रयत्न करत होता. शाम्याने सकाळचे नियोजन सांगितले. लवकर उठून तो अगोदर अभिषेक करुन येणार होता. मग सगळ्यांनी कुंडावर अंघोळी करुन तारामती चढायचे होते. दुपारपर्यंत तारामती उतरुन राजदरवाज्याने गड उतरायचा होता. स्वयपाक झाला होता. धोंडबाने पिशवीवर बांधलेल्या पत्रावळी सोडल्या होत्या. कांदे, लिंबू कापून घेतले होते. चंद्र अगदी डोक्यावर आला होता. त्यामूळे वेगळ्या प्रकाशाची गरजच नव्हती. सगळयांच्या पत्रावळीत दत्त्याने गुलाबी कांदाभात वाढला. रस्सा आणि मटण वाढले. बटेरचेही तुकडे करुन भाताच्या ढिगावर ठेवले. शकीलच्या पत्रावळीत मसाला पावडर आणि तेल मिक्स करुन चटणी वाढली. शाम्याने कांदाभात शकीलसाठीच केला होता. त्यामूळे त्याला वेगळ्या भाजीची गरज नव्हती. रस्सा अगदी चवदार झाला होता. बटेरही अगदी खोबऱ्यासारखे भाजले होते. अर्ध्या तासात आम्ही सगळा भात आणि रस्सा संपवून भांडी अगदी घासल्यासारखी लख्ख केली. हात वगैरे धुवून, तृप्त होवून बाराच्या आसपास आम्ही लवंडलो. थंड हवा सुटली होती. सगळीकडे दुधासारखे चांदणे पडले होते. व्होडका जरा जास्तच झाली होती. शकील आणि शाम्या पडल्या पडल्या काहतरी गप्पा मारत होते. माझे डोळे आपसुक मिटले आणि मी अगदी काही मिनिटातच झोपी गेलो.

सकाळी जाग आली तेंव्हा चांगलेच फटफटले होते. मी आणि धोंडबा सोडून सगळे उठून मंदिराकडे गेले होते. मी धोंडबाला उठवले. बाजूची बादली घेवून दोघेही पलीकडील घळीत जावून आलो. आम्ही येवून सगळे सामान आवरुन, बांधून ठेवले. थोड्याच वेळात सगळे येताना दिसले. शाम्याने कद घातला होता. हातात लहानसे ताट होते. म्हणजे याचा अभिषेक उरकला होता. सगळ्यांच्याच अंघोळी उरकल्या होत्या. शाम्याने कपडे बदलले. ज्याने त्याने सामान पाठीवर व्यवस्थित घेतले आणि आम्ही निघालो. मला काही देवदर्शन करायची इच्छा नव्हती. मी आणि धोंडबाने कुंडात अंघोळी केल्या. कपडे बदलले आणि आम्ही सगळे तारामतीकडे निघालो. मला चालताना चांगलाच शिण जाणवत होता. रात्रीच्या व्होडकाचा परिणाम असावा. मी बळेच सगळ्यांच्या मागे ओढल्यासारखा चालत होतो. उन कोवळे होते. हवा अल्हाददायक होती पण मला उत्साह वाटत नव्हता. मी तारामतीच्या पायथ्यालाच बसकन मारली आणि म्हणालो “तुम्ही जा रे सगळे. मी थांबतो येथेच झाडाखाली. मला नाही चढवणार आता अजिबात” कुणीही आढेवेढे घेतले नाही. शकीलने रामला माझ्या सोबत थांबायला सांगीतले आणि सगळे तारामतीकडे निघाले. या धोंडबाने सगळा घात केला होता. उगाच त्याने आबाकडून ती व्होडका आणली होती. पण त्यामुळे कालची संध्याकाळ फारच सुरेख गेली होती. मी आणि रामने तेथेच ताणून दिली. मला पुन्हा झोप लागली. काही वेळाने दत्त्याने मला हलवून जागे केले.
“आले इतक्यात तुम्ही? की गेलेच नाही?” मी आश्चर्याने विचारले.
“आयला अप्पा झोप म्हनायची का झोपंचं भुत. अकरा वाजून गेलं. हाय कुटं तू!”
खरच की. मी आजुबाजूला पाहीले तर उन्हं चांगलीच लखलखायला लागली होती. सगळे घाम पुसत माझ्या आजुबाजूला टेकले होते.
शाम्या म्हणाला “काय अप्पा, येथेच झोपलास तू. अरे काय दृष्य दिसते वरुन. भारी”
“जावूदे रे. किती वेळा पाहीलय ते. भुक लागलीय मला. खाऊन घेवू आणि गड उतरायला सुरवात करु”
“मी बी तेच म्हंनार व्हतो” म्हणत धोंडबाने पिशवीतून दशम्या काढल्या. दोन कांदे हाताने फोडले. एका दशमीवर मसाला ठेवून त्यात तेल कालवले आणि सगळ्यांच्या मध्ये ठेवले. सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. दहा मिनिटात सगळ्या दशम्या संपल्या. चटणी कालवलेली दशमी माझ्या हातात देत शकील म्हणाला “ही घे. तुला आवडते ना चटणीत भिजलेली दशमी? आता आवरा जल्दी आणि निघा”
पोट गच्च भरल्यामुळे मी पुन्हा आडवे व्हायचा प्रयत्न केला पण दत्त्या एकदम अंगावर आला “अप्पा आता नाटाक करु नको बर्का. सुर्य बोडक्यावर आलाय पार. उन्हात तळायचय का? हाल अदुगर. उठ पह्यला”
आम्ही सगळेच मग बुड झटकत उठलो आणि राजदरवाज्याच्या वाटेकडे निघालो. मी सोडून बाकी सगळे अगदी ताजेतवाने होते. दत्ता सगळ्यांच्या पुढे काठी घेवून चालला होता आणि धोंडबा सगळ्यांच्या मागे होता. चालताना वाळलेल्या गवतातून टप्पोरे नाकतोडे उंच उड्या मारत होते. मध्येच दोन भेकरं आमच्या वाटेवरुन आडवी पळाली. गवत संपले आणि समोर जळून काळे झालेले लहानसे सपाट मैदान लागले. आम्ही गवतातून एकदम उघड्यावर आलो. उन्हाचा चटका चांगलाच जाणवला. मला समजेना आम्ही नक्की कुठे आलो ते. या बाजूला कसे काय पठार असेल? रस्ता तर चुकलो नाही. मी सोपानाला पुढे घेतले. तोही बावचळला होता. त्याने आजुबाजूच्या डोंगररांगा निरखून पाहील्या आणि म्हणाला “आपन राजदरुज्याच्या बाजुलाच हाय पण वाटवर नाय. वाट हरावली जनू”
मी हबकलोच. गडावर वाट हरवने म्हणजे काय असते ते मला चांगले माहित होते.
“अरे सोपाना, तुला पुढे रहायला काय झाले होते? तु असल्यामुळे सगळेच निष्काळजीपणे चालले होते ना? आता काय करायचे?”
दत्त्या म्हणाला “अप्पा यवढा घाबरतो कशापायी? गडावरच अडाकलोय ना? का चंद्रावर अडाकलोय? घावन वाट. जरा दम काढ. त्याला इचार करुदे.” आम्ही त्या जळून काळ्याभोर झालेल्या मैदानाच्या मधोमध उभे होतो. मागे सगळे खांद्याइतके उंच गवत पसरले होते तर समोर कातळ खाली कुठे तरी उतरत होता. दरी होती की उतार होता ते येथून दिसत नव्हते. सगळेच वाटेचा अंदाज घेत आजुबाजूला पहात होते.
इतक्यात धोंडबा अगदी बेंबीच्या देठापासुन ओरडला “आरं पळा म्होरच्या अंगाला. वनवा पेटलाय मागं. थांबू नका, पळा”
मी त्याला थांबवत म्हणालो “तुझं काय मधेच आता. कुठे दिसला तुला वणवा? आणि आपण अगोदरच जळालेल्या जमीनीवर आहोत. काय होणारे? घाबरवू नकोस सगळ्यांना”
धोंडबा घाबरलेल्या आवाजात म्हणाला “आरं तिन परस तरी जाळ आसन. आन चारी बाजूला पघ. सम्दीकडं गवातच हाय. या टिचभर जागत नुसत्या गर्मीनं मरु. पळायचं पघ. हरनावानी पळतोय ह्यो गवताचा वनवा. आवरायचा नाय आपल्याला” (३ परस=साधारण २० फुट उंच)
शकीलला आणि दत्ताला अंदाज आला. त्यांनी राम, शाम आणि ठोब्बाला पुढे काढले. शकीलने दत्तालाही हात धरुन पुढे काढले आणि धोंडबाला आवाज देवून सांगीतले “धोंडबा पळ. अप्पाको निकाल वहाँसे जल्दी”
आम्ही माथ्यावर उभे होतो. मी मागच्या गवताकडे पाहीले. ते छान हवेवर डोलत होते. पण आता हळू हळू बंदुकींच्या फैरी झडाव्या तसा कडकड आवाज यायला सुरवात झाली. डोलणाऱ्या गवताच्या वर हवा एकदम मृगजळासारखी हलताना दिसायला लागली. एकदम अतिशय गरम हवेचा एक झोत अंगावरुन गेला. डोळ्यांची आग झाली. घसा एकदम कोरडा पडल्यासारखा झाला. धोंडबाने एका झटक्यात माझा हात ओढला. चांगलाच हिसडा बसुन मी त्याच्या मागे ओढला गेलो. पण आम्ही जाणार कुठे? दोन्ही बाजूला उंच वाळलेले गवत होते. मागच्या बाजूला हरणाच्या वेगाने धावणारा वणवा होता आणि समोर काय होते ते आम्हाला माहीत नव्हते. कदाचीत उतार असेल किंवा खोल दरीही असेल. पण आम्हाला तिकडे पळण्यावाचून दुसरी वाट नव्हती. माझ्या डोळ्यापुढून आई-बाबा, इन्नी यांचे चेहरे तरळून गेले.

(क्रमशः)

कथालेख

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

9 Apr 2019 - 3:42 pm | सुचिता१

खुप छान... नेहमी प्रमाणे रंगतदार !!!

प्रमोद देर्देकर's picture

9 Apr 2019 - 7:29 pm | प्रमोद देर्देकर

भन्नाट निव्वळ भन्नाट .
च्यायला आम्ही अजून गडाची पायरी पण नाही नीट बघितली .

तुमच्या बालपणीच्या पोतडीत काय काय भरलय हो ? ?

सिरुसेरि's picture

10 Apr 2019 - 12:41 pm | सिरुसेरि

छान सुरुवात .