दोसतार -१९

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
28 Feb 2019 - 4:41 pm

मागील दुवा https://www.misalpav.com/node/44158

आज्जीचा तो देवघरातल्या घंटेसारखा किणकिणणारा किनरा आवाज .वेखंडाच्या मिरमिरीत वास , आज्जीचा थोपटणारा मऊसूत हात आणि आज्जीच्या जुन्या साडीच्या गोधडीची ऊब , पावसाळी कुंद गार हवा , झोप कधी लागायची ते समजायचेही नाही .

जाग आली की अगोदर जाणवायचा तो अंगावरच्या दाट गोधडीचा मऊसूत स्पर्ष. आज्जीच्या हाताइतकाच मऊसुत . कुठेतरी असलेल्या फटीतून आत शिरून कानाला जाणवणारी ती ओलसर थंड झुळुक. गोधडी अंगावर अधीकच लपेटून घ्यायचो. चार पाच वाजलेले असायचे तरीही अंधार दाटलेला असायचा. आज्जीने उबेसाठी शेगडी पेटवलेली असायची माझी चुळबूळ जाणवून ती माझ्याजवळ शेगडी आणून ठेवायची. त्यातल्या विस्तवावरच ती चहाची तपेली तापवायला ठेवायची. इकडे हे होतंय तोवर ती काचेच्या बरणीत ठेवलेले बटर काढायची. बटर चहात ओले करून खाता यावेत म्हणून ती ते चाकूने अर्धे कापायची. शेगडीची उब , थेट शेगडीवरून उतरवलेला तो गरम घट्ट चहा , पाठीवर गोधडी तशीच लपेटून मी बसायचो. चहा मधे ते अर्धे कापलेले बटर बुडवून सुर्र करून त्यातला चहा चोखून प्यायचो. रामाच्या त्या कितीही काढले तरी बाण कधीच न संपणार्‍या अक्षय भात्यासारखाच तो कपातला चहा कधीच संपू नये असे वाटायचे .
ही मजा पाटणमधेच. सातार्‍यात इतका पाउस फक्त सुरवातीला येतो. अगदी तडम तडम नंतर नंतर तो चिवड्याचा डबा संपताना त्यात तळाला नुसता मसाला उरला की डब्यात तो नुसता खुसुर खुसूर वाजतो तसा बारीक वाजतो . जुलै एकदम जोरात , ऑगष्ट सुरू झाल्या नंतर जोर कमी होत नुसती भुरभुरी उरते. बिंधास्त छत्री रेनकोट न घेता कुठे जाऊन यायचे असेल तर जाऊन येता येते. शर्ट ओला झाला तरी अंगावर वाळुन जातो.
जुलैतला ज्येष्टाचा जोर ओसरल्यावर श्रावण आला . श्रावण महिना म्हणजे सातार्‍यातला खास महीना. सगळीकडे फुल्ल हिरवेगार झालेले . पावसाची रडकी रीपरीप संपून मस्त भुरभूर सुरू झाली . एखादी जोराची सर सोडली तर दिवसभर सकाळचे नऊच वाजलेत असे वाटणारा उजेड. कधीतरी सुर्य ढगाआडून डोकावला तर पावसाचे ते भुरभुर पडणारे बारीक थेंब एकदम सोनेरी दिसायला लागते. आपण अचानक सोनेरी उजेडात उभे आहोत आणि सोनेरी झालो आहोत असे वाटते.
रस्त्यावर आलो की समोर ढगाची टोपी घातलेला यवतेश्वराचा हिरवागार डोंगर दिसतो.
श्रावणा महिना शाळेसाठी पण खासच . खास म्हणजे श्रावणी शनिवार. प्रत्येकाकडुन दहा दहा पैसे गोळा करून जमलेल्या पूर्ण पाच रुपयांमधून खडीसाखर नारळ आणायचा. घरातून येतानाच हळद कुंकु बुक्का आणायचे. पहिल्या तासाला हजेरी झाली की मग "भीमरूपी महारुद्र "म्हणायचे मारूतीला नारळ फोडायचा कार्यक्रम सुरू व्हायचा. नारळ सोलण्यात हसन्या अत्तार एक नंबर. शेंडी न तोडता नारळ सोलून देणार. संज्या कुल्कर्णी ने त्याच्या बागेतून मारुतीसाठी रुईची पाने आणि बारीक पांढर्‍या फुलांचा हार आणायचा. मारुतीच्या फोटोला हार घालून हळद कुंकू वाहिले की एक बुक्कीत नारळ फोडायचा. हे काम एल्प्याचेच. त्याने फोडलेला नारळ बरोब्बर मधोमध फुटतो अगदी मोजून मापून फोडल्यासारखा. नारळ फोडला की त्यातले पाणी वर्गभर सर्वांच्या अंगावर शिंपडायचे .
मारुतीला नारळ खडीसाखरेचा नैवेद्य झाला की मग नारळाला अंजीच्या ताब्यात. तीने करकटक ने खोबरे काढायचे त्याचे बारीक तुकडे करायचेर , ते खडीसाखरेत घोळवून सर्वांना द्यायचे. या सर्वात शनिवारचा पहिला तास संपून जातो.
त्या दिवशीही असेच झाले. पहिला आणि दुसराही संपुर्ण तास मारुती आणि नारळ खोबर्‍यात संपवून आम्ही असेच बसलो होतो. इंग्रजीचे पहिले दोन तास संपल्या नंतरचा तास होता मासपीटीचा. ग्राउंडवर निसरडे असल्यामुळे सगळे वर्गातच होतो. अभ्यास तसाही नव्हताच. कोणी एक डोळा सरांकडे ठेवतएकमेकांशी हळू आवाजात बोलत होते .कोणी नुसतीच पुस्तकाची पाने उलटत होते. मुलींच्या बाकावर पाहिले . वैजयंती वहीच्या शेवटच्या पानावर चित्र काढत होती. अपी दातात पेन्सील धरून भिंतीवरच्या पालीकडे कधीही न पाहायला मिळाल्यासारखी पहात बसली होती. संध्या तीच्या चष्म्यामुळे नेहमीसारखी कुठे पहातेय कळतच नव्हते. टंप्या मस्तपैकी पेंगत होता. अर्थात तो माझ्या आणि एल्प्याच्या मधे बसलेला नसता तर बाकावरुन खालीच पडला असता.
वर्गात नेहमी येणारा तो फरफर्‍या स्टॉव्ह सारखा आवजही येत नव्हता.
काय झाले कोण जाणे मंदारने अचानक सरांजवळ जावून काहितरी विचारले. सरांनी एकदा त्याच्याकडे पाहिले मग वर्गाकडे पाहिले. मग त्याला कशासाठीतरी परवानगी दिली. मंदार थेट वर्गाबाहेर गेला. संदीप त्याच्या मागोमाग वर्गाबाहेर जायला लागला. " ए ए तू कुठे निघालास रे. " सरांनी त्याला थाम्बवत विचारले.
मी ... मी जाऊन त्याला मदत करतो सर. त्याला एकट्याला जमणार नाही." संदीप.
"काय?" सरांने एकदम उचकून विचारले. सरांच्या त्या जोरदार आवाजाने इतका वेळ मस्त पेंगणारा टंप्या खडबडून जागा झाला. वर्गात कुजबुजीचा होता नव्हता तेवढाही आवाज बंद झाला. एकदम शांतता पसरली. शांततेचा हा असला आवाज आम्हाला कुणालाच कधी ऐकायला आला नव्हता.
"काय म्हणालास त्याच्या मदतीला जायचेय?" सर हसत होते की चिडले होते तेच कळत नव्हते.
हो हो सर तो एकटाच आहे. मी त्याच्या मदतीला जातो"
अरे तुला ठाऊक आहे का तो कुठे गेलाय ते?
नाही सर पण तो एकटाच आहे. त्याच्या मदतीला जायला हवं. एक मित्र म्हणून. मित्राला मदत करावी असे तुम्हीच म्हणाला होतात ना सर.
" अरे पण... " पुढचे वाक्य सरांना हासू आल्यामुळे बोलताच आले नाही
"जाऊ द्या सर मला" संदीपचा आग्रह चालुच होता.
" अरे पण तो लघ्वीला जाऊ का असे विचारून गेलाय. तिथे काय मदत लागणार तुझी त्याला. जा जागेवर जाऊन बैस. "
ते ऐकल्यावर सगळ्यानाच एकाच वेळेस बांध फुटावा तसे हसू फुटले . वर्गात हसण्याचा लोळ उसळला. संदीपसकट प्रत्येकजण बराच वेळ हसत राहीला. स्वतःचे हसणे संपले की शेजारच्या च्या हातावर टाळी देऊन पुन्हा पुन्हा हसत होता. या सगळ्या गदारोळात बाहेर गेलेला मंदार वर्गात पुन्हा कधी येवून बसला ते समजलेच नाही. हसून हसून डोळ्यात येणारे पाणी पुसत होतो.
शाळेचा शिपाई हातात एक कसलासा कागद घेवून वर्गाच्या दारात उभा होता.
सरांनी तो कागद वाचला. आणि म्हणाले तुमच्या साठी एक महत्वाचे प्रकटन आहे.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Mar 2019 - 5:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

एखादा भाग वाचायला लागलो की पुढचे मागचे २-३ भागही वाचुन काढतो. तसेही कुठलाही भाग उघडुन वाचु लागावे अशी सुंदर मालिका चालु आहे.
लगे रहो विजुभाउ

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2020 - 5:54 pm | चौथा कोनाडा

+१
हेच म्हणतो !

यशोधरा's picture

5 Mar 2019 - 6:14 pm | यशोधरा

भारी.

खरे आहे राजेंद्र. ही लेखमाला लिहीताना मलाही खूप मजा येते.

विजुभाऊ's picture

12 Jun 2019 - 5:58 pm | विजुभाऊ
चौथा कोनाडा's picture

13 Jul 2020 - 5:56 pm | चौथा कोनाडा

पुढील भाग :

दोसतार-२०