सहप्रवासी

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
7 Feb 2019 - 1:39 pm

समर्थ म्हणूनच गेले आहेत की देशाटन केल्याने ज्ञानात वृद्धी होते. त्यांच्यासारख्या अवतारी पुरुषाच्या अफाट ज्ञानात प्रवासामुळे मिळालेल्या ज्ञानाचा भाग मोठा आहे. पण आपण पडलो पामर, त्यामुळे आपण प्रवासाला निघतो तेव्हा ज्ञानप्राप्ती कितपत होते ही शंकाच आहे पण गंमती, मनोरंजन, मनस्ताप आणि डोकेदुखी यांची प्राप्ती नक्कीच होते हे मी सांगू शकतो. आपल्या सगळ्यांचा सतत काही ना काही कारणाने प्रवास होत असतो. आजकाल आपण सगळं नियोजनाने करतो पण एक गोष्ट शेवटच्या क्षणांपर्यंत अनाभिज्ञ असते ती म्हणजे आपले सहप्रवासी! ह्यांच्या बाबतीत काही लय भारी किस्से आहेत आपल्याकडे. सगळ्यात भारी म्हणजे बसच्या प्रवासातील. आपण जर एकटेच असू प्रवास करणारे तर मजाच न्यारी. ही मजा अनुभवण्यासाठी प्रवास हा दिवसा करणे गरजेचे आहे. यातला पहिला प्रकार जो मुबलक प्रमाणात आढळतो तो म्हणजे वाचक प्रवासी. बहुतेक प्रवासी हे दुसऱ्यांच्या पेपर, पुस्तक, साप्ताहिक इतकंच काय व्हाट्सअप्प चॅट मध्ये पण तोंड घालतात. मला मी घेतलेला पेपर फार कमी वेळेस वाचायला मिळाला आहे. त्याच्याऐवजी पुस्तक असेल तर तुमचंच तर आहे, थोडा वेळ वाचतो अस सांगून एका महाभागाने ते वाचलं आहे. एकदा एका काकूने त्यांची मुलगी माझ्यासारखीच मोबाईलला चिटकलेली असते आणि तुमच्या पिढीला हे दारूपेक्षाही घाणेरडं व्यसन लागलं आहे हे बराच वेळ ऐकवलं होतं. तुमच्या मुलीचा नंबर द्या मला मी बोलून बघतो, हे वाक्य बोलायची माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही. कारण मी जर अस बोललो असतो तर त्यापेक्षा तुझ्या आईचा नंबर दे मला, मीच बोलते अस म्हणतील ही भीती वाटली मला. एकदा माझ्या बाजूला मनसे चा धडाडीचा कार्यकर्ता होता. त्याने एकंदरीत महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ही राजसाहेबच कशी ठरवतात ह्याच प्रदीर्घ स्पष्टीकरण मला नको असताना दिल होतं. वर त्याचा नंबरही दिला आणि सांगितलं की कधीही गरज पडली तर अर्ध्या रात्री कॉल कर मागे पुढे नाही बघणार. अजूनपर्यंत तरी ती वेळ आलेली नाही.
ययाव्यतिरिक्त सतत काही ना काही खाणारे, सतत फोनवर बोलणारे असेही काही प्रवासी होते. एकदा एका प्रवाशाने थोडक्यात हुकली राव शिवनेरी, वेळ नाहीय आज नाहीतर मी कधीच एशियाड बसने जात नाही हे सांगून डोकं उठवलं होतं. च्यायला म्हणजे आम्ही काय कैदी होतो का? पण यष्टीचा सौजन्य सप्ताह चालू होता म्हणून काही बोललो नाही(नसता तरी काही मी त्याच्या कानफटात मारणार नव्हतो). सगळ्यात डेंजर म्हणजे मुली. शेकडा 95 (यात शेकडा म्हणजे 100 नव्हे, माझ्याबाबतीत तर 3 किंवा 4) मुली आपल्या बाजूच्या सीटवर मुलगा आहे हे बघून एकच एक्स्प्रेशन देतात..Disgusting! तेसुद्धा विनाकारण. त्यांना काही त्रास झाला असेलही(माझ्याकडून कोणालाही झालेला नाही हे मी अभिमानाने जाहीर करतो). पण जवळपास सर्वानाच हा अनुभव येतो. चांगले प्रवासी देखील असतात. एकदा एका आजीने मला खाऊ घातले होते. सगळ्यात हृदयद्रावक प्रसंग म्हणजे एकदा मला कंडकटरच्या बाजूची सीट मिळाली होती तेव्हा त्या भला माणसाने मला 500 चे सुटे दिले होते! हे कमी होतं की काय त्याने उलट माझेच आभार मानले. एकदा तर त्याने सांगितलेल्या वेळेत बस गावाला पोचली होती. हे अगदी खरं आहे. पण याउलट देखील घडले आहे. माझ्या बाजूची बाई वरिष्ठ नागरिक वाटते की नाही हे तुम्हीच सांगा असं विचारून मला धर्मसंकटात देखील टाकले होते. एकदा एक बेवडा पण होता माझ्या बाजूला. अखंड बडबड करत होता पण दारूच्या नशेत त्याच गाव यायच्या आधीच उतरून गेला. ह्या सगळ्यात मनोरंजन करतात ते म्हणजे थापाडे! आपल्या करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आपण केल्या आहेत हे सांगायला अनोळखी सहप्रवासापेक्षा उत्तम श्रोता असूच शकत नाही. बसच्या प्रवासात मंत्रालयात नेहमी जाणारे भेटतात तर रेल्वेच्या प्रवासात खासदारांना व्यक्तिशः ओळखणारे. विमानात मात्र फारसं कोणी बोलत नाही. अर्थात मला दूरच्या विमानप्रवासाचा फारसा अनुभव नाही. पण गेल्या काही दिवसात एक प्रकार नाहीसा झाला आहे तो म्हणजे ओ भाऊ ही यष्टी नगरला जाईल का? असं विचारणारे लोकं. बहुदा आपला देश साक्षर झाला आहे. ह्यांचे काही नातेवाईक रेल्वेत भेटतात. 'माय ह्या डब्यातले तिकीटं आधीच काढल्येत.. बसा हिथच खाली. आम्हाला काय माहिती? समदे डबे तर सारखेच दिसायलेत." अस बोलणारी एक मावशी मला नुकतीच भेटली. मी थोडी जागा करून दिली बसायला. मग लागली गप्पा मारायला. मुंबईला चाललो आम्ही माझ्या डोळ्याचं आप्रेशन आहे, फुल पडल्यात म्हणून. हा शब्द पुस्तकात वाचला होता. बिनधास्त निघाले होते नवराबायको. रिसर्वेशन नाही की काही नाही. 2 पिशव्या एकात कपडे आणि पांघरायला तर दुसऱ्यात खायला. मालक चला म्हणले म्हणून मावशी निघाली. काय पुण्यवान होता तिचा मालक. इथं बायको मी म्हणलेल्या टॉकीजला येत नाही. आपण थोडी पण रिस्क घेत नाही आजकाल आणि हे लोकं चक्क अप्रेशनला थेट मुंबईला निघाले होते. खाली बसावं लागतंय म्हणून तक्रार नाही की लाज नाही. प्रवासात मिळणार ज्ञान म्हणतात ते काय हेच का हा प्रश्न मला पडला. आयुष्य बिनधास्त जगता येऊ शकतं हे त्या मावशीनं शिकवलं. त्यामुळेच समर्थ म्हणले असतील.. केल्याने देशाटन! बाकी काही झालं तरी मालक म्हणले म्हणून निघाले ह्या वाक्यावर माझा अजूनतरी विश्वास बसलेला नाही. काय सांगा मावशीने पण थाप मारली नसेल कशावरून?

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

शाली's picture

7 Feb 2019 - 1:47 pm | शाली

भारी!!

विनिता००२'s picture

7 Feb 2019 - 1:59 pm | विनिता००२

छान :)

पण जरा पॅरेग्राफ करुन लिहाल तर वाचायला अजून मजा येईल :)

सविता००१'s picture

7 Feb 2019 - 7:36 pm | सविता००१

छान आहे

असंका's picture

8 Feb 2019 - 5:00 pm | असंका

सुरेख!!!

धन्यवाद!!!

मराठी कथालेखक's picture

8 Feb 2019 - 5:42 pm | मराठी कथालेखक

अजून अनुभव लिहा..

पलाश's picture

8 Feb 2019 - 6:48 pm | पलाश

आवडलं.

टिवटिव's picture

9 Feb 2019 - 12:37 am | टिवटिव

खुप छान आहे.

सूर्यपुत्र's picture

9 Feb 2019 - 12:34 pm | सूर्यपुत्र

मी एकदा भावाला सोडायला रेल्वेस्टेशनवर गेलो होतो. मला अचानक इंजिन बघायची हुक्की आली. मग गेलो इंजिनपाशी. अचानक एका भल्या गृहस्थाने ड्रायव्हरला विचारले - दौंडमार्गे जाते का हो? ड्रायव्हर पण शिस्तित हो म्हणाला. मी म्हणलो की यार, रेल्वेची एस्टी केली की, त्यावर त्याने माझ्याकडे खुन्नसपणे पाहिले.

-सूर्यपुत्र.

किल्लेदार's picture

5 Sep 2019 - 7:25 pm | किल्लेदार

शैली आवडली. नेमकी आणि खुसखुशीत.